युगांतर आरंभ अंताचा भाग १८

Submitted by मी मधुरा on 2 August, 2019 - 05:43

हस्तिनापुरात अंबालिकापुत्र पंडुचा राज्याभिषेक झाला आणि राजगादी सजली. भीष्माचार्य मनातून निश्चिंत झाले. धृतराष्ट्र शूरत्वाचं, पांडू धर्माचं आणि विदूर बुद्धीचं प्रतिक! पंडु आणि धृतराष्ट्राचे बंधुत्व त्यांच्यात कोणाला द्वेष पसरवायला जागाच देत नव्हते. दासीपुत्र विदूरची निष्ठा पाहून दोघांच्या मनात त्याच्या बद्दलही आदर वाढला होता. न्यायदानाच्या वेळी पंडु आधी विदुराचा सल्ला ऐकायचा.
अंधत्व ही एक बाधा नसती तर धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असल्याच्या अधिकाराने त्यालाच राजगादी प्राप्त झाली असती, असं राहून राहून अंबिकेला वाटायचं. 'पंडु राजा म्हणल्यावर त्याच्याशी विवाह करायला कोणतीही राजकन्या होकार देईल. मग पुढे त्याचेच पुत्र गादी चालवणार?' ती स्वतःवरच चिडली.
राजघराण्यातील एका अंधाशी कोण विवाह करेल? हा प्रश्न मात्र सत्यवतीलाही सतावत होता. अनुज पंडुच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू झाली आणि जेष्ठ असूनही धृतराष्ट्र दुर्लक्षित राहिला तेव्हा मात्र अंबिकेला काळजी वाटू लागली. नगरीत पंडुचा जयजयकार होत असे. न्यायी राजा म्हणून स्तुती ऐकू येत असे..... महालातही भीष्मांना पंडुबद्दल जास्त स्नेह आहे असे वाटून ती खिन्न व्हायची.
पंडुने कुंतीभोज राज्याच्या कन्येच्या स्वयंवराबद्दल ऐकलं आणि भीष्माचार्यांची आज्ञा घेऊन तो रवाना झाला.
'स्वयंवरात काही पण नाही म्हणल्यावर राजकन्या पंडुच्या रुपावर भाळून त्यालाच माळ घालणार यात शंकाच नाही. म्हणजे पुत्रप्राप्ती त्यालाच आधी होणार. राजगादी वर त्यांचाच हक्क अबाधित राहणार आणि आपल्या पुत्राच्या नशिबीही त्याच्या डोळ्यांत जागणारा अंधारच असणार!' अंबिका अस्वस्थ झाली.
"राजमाता, आत येण्याची अनुमती आहे?"
"अंबिका? ये, बस."
"राजमाता, एक चिंता सतावते आहे मला."
"कसली चिंता?"
"धृतराष्ट्राची!"
"अंबिका, याविषयी आपले बोलणे आधीच झाले होते. त्याला आपलं राजगादी का दिली नाही हेही माहिती आहे तुला. माझ्याकडून वदवून घेण्यात काय आनंद मिळतो तुला?"
"आनंद? मला समाधान मिळाले तरी पुरेसे आहे, राजमाता. धृतराष्ट्राला सिंहासन नाही मिळाले हे दु:ख पचवले आहे मी. पण राजा म्हणून नाही, तर निदान राजघराण्याचा सदस्य असल्याचा मान त्याला मिळायला हवा असे वाटते."
"स्पष्टपणे बोल."
"मला त्याच्या विवाहाची चिंता आहे राजमाता."
"ती तर मलाही आहे....."
"मग राजमाता, तसे असेल तर भीष्माचार्यांना आज्ञा का देत नाही तुम्ही?"
"भीष्माला? तो यात काय करू शकतो?"
"काय नाही करू शकत राजमाता? क्षमा असावी पण माझा आणि अंबालिकेचा विवाह कसा झाला, हे तुम्हाला ज्ञात आहे ना?"
"अंबिका...."
"राजमाता, आज्ञा असावी."
सत्यवती विचारात पडली. अंबिका बोलली तो शब्द न् शब्द खरा होता. भीष्मांना पुन्हा अशी आज्ञा द्यायची? अंबेने केलेला अपमान, भीष्मांना झालेला त्रास तिने डोळ्यांनी पाहिला होता.
'भीष्म आज्ञा दिली की पालन करणार हे जितके सत्य तितकेच हे ही सत्य की त्यात झालेला त्रास ते निमूटपणे सहन करणार. आपल्या मुलांना सिंहासन मिळाले म्हणून त्याने घेतलेली प्रतिज्ञा! त्या प्रतिज्ञेचा वापर करून घेणारे आपण! त्याचं सामर्थ्य, शक्ती, विद्या, निष्टा.... आणि त्याच्या माथी आपण कोरलेलं दास्यत्व.' सत्यवतीने स्वतःला भावनिक जगातून बाहेर आणलं, ' ठिक आहे, अंबिका. धृतराष्ट्रासाठी कन्या शोधली जाईल. भीष्मच शोधेल.'
"भीष्मा, बोलावयाचे आहे."
"बोला राजमाता. आपण का आलात? मला बोलावले असते....."
"भीष्मा, एक कामगिरी सोपवायची आहे तुझ्यावर."
"कोणती कामगिरी, राजमाता?"
"धृतराष्ट्राच्या विवाहासाठी.... त्याच्या नेत्रांची विझलेली ज्योत त्याच्या भविष्यात न उलटणारी रात्र बनत चालली आहे, भीष्मा. त्याच्या जीवनात प्रकाश देणारी निदान एक तरी तारका हवी. " थोडावेळ थांबून सत्यवती म्हणाली, "वार्ता आहे, की गंधारनरेश सुबलच्या राजकन्येला परमेश्वर शंकरांनी शंभर पुत्रांचे वरदान दिले आहे."
"राजमाता परंतु....."
"कल्पना कर भीष्म! हस्तिनापुराचे रक्षण करायला शंभर राजकुमार ! तुझीही हस्तिनापूरची चिंता मिटून जाईल आणि माझीही! राजकुमारी गांधारीचा विवाह धृतराष्ट्रासोबत व्हायला हवा."
"ही आज्ञा आहे का राजमाता?"
"नाही भीष्मा. विनंती आहे. तुला आज्ञा देऊन स्वतःच्याच नजरेतून पडण्याचे पातक एकदा केले आहे मी. आता त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. तुला पटेल किंवा वाटेल त्या पध्दतीने माझी विनंती पूर्ण कर...."
भीष्मांनी प्रसन्न मनाने नमस्कार केला आणि तडक गांधार नगरास निघाले.
'भीष्माला पटणारी पध्दत म्हणजे धर्माचरण. धर्मसंगत आणि धर्ममान्य असलेला मार्ग. सविस्तर कल्पना देत राजकन्येचा हात मागायचा. पण खरं बोलून? भीष्म कसा काय धृतराष्ट्रासाठी राजकन्या आणणार आहे, कोण जाणे? एकवेळ धृतराष्ट्र राजा असता तर होकार मिळाला असताही. पण राजगादी मिळण्याची शक्यताच नसलेल्या अंध व्यक्तीशी विवाह करायला कोणती राजकुमारी तयार होईल?' सत्यवती विचारांत मग्न झाली.

भीष्म गांधार नागरीत पोचल्याची वार्ता सुबाला यांना कळाली तसे ते स्वतः स्वागता साठी आले. भीष्मांशी वैर कोण घेणार? भीष्मांनीही सुबालाला अभिवादन केले. महालात अथितींसाठी जय्यत तयारी झाली. सुग्रास अन्न, राजेशाही थाट, आपुलकी... सगळं पाहून भीष्मांना भरून आलं.
'या लोकांना आपण विचारले, तर अतिथीच्या विनंतीचा मान ठेवायचा म्हणून ते नकार देणार नाहीत. पण... गांधारीचे काय? तिच्याही विवाहाबद्दल काही अपेक्षा असतील. गांधारीच सौंदर्य पाहून तिच्याशी विवाह करायला तर कोणताही राजकुमार हो म्हणेल. मग तिला अंध व्यक्ती सोबत आयुष्य काढायला लावायचे?' भीष्मांसाठी काम कठीण झाले होते. 'पण राजमातेचे म्हणणेही योग्य होते. आणि असाच विचार केला, तर धृतराष्ट्राचा विवाह होऊच शकणार नाही.'
सुबल राजा, त्यांचा पुत्र शकुनी आणि भीष्म राजमहालाच्या समोरील मोकळ्या हिरवळीवर फिरत होते.
"आमची नगरी आज धन्य झाली भीष्माचार्य!"
"मी ही धन्य झालो इथले आगत्य पाहून महाराज."
"हस्तिनापुरास सर्व कुशल आहे ना?"
"होय महाराज. मी आलोय ते वेगळ्याच कारणा साठी." मुद्द्याला हात घालत भीष्माचार्य म्हणाले.
"बोला भीष्माचार्य, असे इथे काय आहे जे तुम्हाला हवे आहे आणि हस्तिनापुरास नाही?" आश्चर्याने सुबालाने विचारले. शकुनीही कान टवकारून लक्ष देऊ लागला.
"तुमची कन्या, महाराज." सुबाला आणि शकुनीला आनंद झाला. 'आमची गांधारी समस्त हस्तिनापुरची महाराणी होणार.'
"वचन देतो, भीष्माचार्य! आजपासून गांधारी हस्तिनापुरची!" सुबालाने आनंदात शब्द देऊन टाकला.
भीष्मांनी त्यांच्या चेहऱ्यांवर दिसणाऱ्या भावनांवरूनच ओळखले की यांचा काहीतरी गैरसमज झालाय.
"महाराज.... मी धृतराष्ट्रा साठी गांधारीचा हात मागायला आलोय." कानात गरम तेल ओतावे तसे हे वाक्य ऐकून क्षणभर सुबाला सुन्नपणे उभा राहीला.
शकुनी मात्र चिडला,
"भीष्माचार्य, तुमच्या शूरत्वाच्या कैक कथा ऐकल्या आहेत आम्ही..... पण हा काशीचा स्वयंवर नाही. गांधार नगरीचे सैन्य आणि प्रत्येक नगरवासी स्वतःचे प्राण द्यायला मागे पुढे पाहणार नाही राजकुमारीच्या प्रतिष्ठेसाठी."
भीष्मा शांत राहिले. सुबाला सावरला आणि शकुनीच्या खांद्यावर हात ठेवत त्याला गप्प बसण्याची तंबी दिली.
"भीष्माचार्य, शब्द दिला आहे मी तुम्हाला. पण मला वाटले तुम्ही पंडू राजांसाठी विचारत आहात. धृतराष्ट्रासोबत कसं जीवन जगेल माझी कन्या?"
"मी फक्त विनंती करायला आलो आहे महाराज. दबाव टाकून मी तुम्हाला तुमचा शब्द पाळायला लावणार नाही. पण एक वचन देतो. तुमची कन्या धृतराष्ट्राची पत्नी बनली तर तिला राणी सारखीच वागणूक मिळेल. तोच मान मिळेल जो एका राणीला मिळतो."
"मी तयार आहे महाराज." मागून एक नाजूक आवाज सर्वांच्या कानी पडला.
"काय बोलतेस हे गांधारी?"
"पिताश्री, तुम्ही दिलेले संस्कार रक्तात भिनलेले आहेत माझ्या. अतिथीचा अपमान होऊ देणार नाही मी. आज त्यांनी महाराजांना विनंती केली आणि ती माझ्यामुळे पूर्ण केली नाही, हे मला सहन होणार नाही."
"पण गांधारी, अग एका अंध व्यक्तीशी विवाह करणार आहेस तू?" गांधारी कडे पाहत आश्चर्याने पाहात शकुनीने विचारले. "ज्याला देवानी नेत्रही दिले नाहीत, त्याच्या करता इथे आमचे नक्षत्र मागायला आलात तुम्ही भीष्माचार्य?" संतापाच्या भरात शकुनीचा आवाज वाढला होता.
"युवराज शकुनी, कितीही क्रोध आला तरी त्याला बांध घालता यायला हवा. कोणाच्या शारीरिक दुर्बलतेचा असा उल्लेख करू नका." भीष्म शांतपणे उत्तरले.
"मग काय म्हणायचे आम्ही धृतराष्ट्रांना, महामहीम?"
"शांत हो शकुनी." सुबालाने गांधारी कडे बघितले, "तु विचार केला आहेस भविष्याचा गांधारी? माझ्या नीट न ऐकून घेता दिलेल्या शब्दा साठी तुझे आयुष्य बिघडवण्याची गरज नाही. माझ्या शब्दांचे मोल तुझ्या आनंदापुढे काहीच नाही."
"पिताश्री, भ्राताश्री, भीष्माचार्यांनी मागणी घालताना विचार केलाच असेल की." तिने भीष्मांकदे पाहिले, तसे ते मान झुकवून उभे राहिले,"रुपाच्या प्रकाशाने आनंदी होणारा नसेल तरी वृद्धपणीच्याअंधारातही दु:खी न होता सोबत राहणारा पती मिळणे हे ही काय कमी आहे? हे रुप वृध्दपणी साथ सोडेल. त्यानंतर एखादा डोळस पती प्रेम का करेल? पण अंध असल्यामुळे का होईना ते शेवट पर्यंत प्रेम करतील." भीष्म बघत राहिले. 'त्यागाची एक नवीन सीमा!' ते काही बोलण्याआधीच गांधारीने वस्त्राचे एक कापड फाडून डोळ्यांभवती गुंडाळले.
"हे काय आहे गांधारी?" शकुनी घडणाऱ्या घटनांनी हतबल झाल्यासारखा उभा होता. 'भीष्मांनाही आंधळ्या धृतराष्ट्रासाठी अख्ख्याभुप्रतलावर आपलीच भगिनी सापडली? अडवण्या आधीच गांधारीने संमती द्यावी, आणि आता हे?'
"वैवाहिक सहजीवनात सुखदु:खात सहभागी व्हायचे असते ना, पिताश्री? मग हे ही दु:ख वाटून घ्यायला नको?"

तिने धडपडत पिता सुबाला, भ्राता शकुनी आणि भीष्मांना नमस्कार केला.
शकुनीला काय करावे काही कळत नव्हते. जागच्या जागी रुतल्या सारखा तो उभा होता.

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान

खरा पेच असा आहे की, मी ॲप वापरते आहे. ब्राऊजर वर प्रत्येक वेळी नव्याने लॉग इन करावे लागते म्हणून. या ॲप मध्ये लिंक दिसत नाही. तुम्ही लिंक दिलीत तर मी नक्की टाकेन. सहकार्याबद्दल धन्यवाद स्वतिजी. Happy

धन्यवाद मन्या Happy

टग्या, पंडूच लग्न झालयं असा उल्लेख नाही केलेला मी. लग्न आधी धृतराष्ट्राचेच होते. Happy

टग्या, असे काही संदर्भ मला सापडले नाहीत. तुझ्याकडे लिंक असेल तश्या काही संदर्भाची तर कृपया मला पाठव. एकदा बघेन मी नक्की Happy

कथा चांगली चालु आहे.
फक्त मला सत्यवती भीष्माचार्यांना सारखी भीष्मा भीष्मा संबोधते ते खटकतंय.

धन्यवाद सस्मित! Happy

आता ती त्यांची राजमाता आहे. आणि ते तिचे सावत्र पुत्र! काय करणार?
पण चिंता नको. आता सत्यवती नसेल जास्त वेळ ! Happy