जगजीतसिंग ... Face to Face

Submitted by अमर विश्वास on 1 August, 2019 - 05:40

जगजीतसिंग ... Face to Face

काल जगजीतचा Face to Face हा अल्बम ऐकला . हल्लीच्या स्मार्ट जमान्यात (फोन वगैरे ... ) प्ले लिस्ट वगैरे प्रकार जोरात असल्यामुळे बरेचदा एखादा अल्बम सलग असा ऐकलाच जात नाही. पूर्वी कॅसेट असताना सलग ऐकावेच लागायचे ....

तर हा Face to Face अल्बम. त्याकाळी जगजीतच्या अल्बमची नावे इंग्लिश असायची. InSearch , Insight, Cry वगैरे .... हा त्यातलाच एक अल्बम. १९९४ सलाला ... २४ वर्षांपूर्वीचा ... एकूण आठ गज़ल (त्यातल्या काही खर तर नज्म)

अल्बमची सुरवात होते सबीर दत्त यांच्या नज्म ने . नज्म म्हणजे कविता ( गजल नाही )

सच्ची बात कही थी मैंने
लोगों ने सूली पे चढाया
मुझ को ज़हर का जाम पिलाया
फिर भी उनको चैन न आया

जणु येशु ख्रिस्त स्वतः सांगतोय ... सच्ची बात कही थी मैंने.
संपूर्ण गाण्यात भरुन रहातो एक गूढ गंभीर भाव. सच्ची बात कही थी मैंने याओळीचा कोरसमध्ये केलेला वापर ... एखाद्या पुरातन मंदिरात घंटानादाचा प्रतिध्वनी यावा तसा .. आणि मागे वाजणारी बासरी .. या पार्श्वभूमीवर उलगडत जाणारी ही नज्म

पुढे उपरोधाने शब्द येतात
सब से बेहतर कभी न बनना
जग के रहबर कभी न बनना
पीर पयम्बर कभी न बनना
सच्ची बात कही थी मैंने...

निदा फाजलींनी लिहिलं होत .. उसके दुष्मन बहोत है .. आदमी अच्छा होगा .. कोणीही संत, प्रेषीत यातून सुटलेला नाही

याचा शेवट होतो एका सल्ल्याने .. तोही उपरोधिकपणेच
चुप रह कर ही वक़्त गुज़ारो
सच कहने पे जाँ मत वारो
कुछ तो सीखो मुझ से यारो
सच्ची बात कही थी मैंने...

हे गाणं अंतर्मुख करून जात ...

यानंतर येत ती दैर-ओ-हरम में बसने वालों ही गज़ल ... ख़ामोश ग़ाज़ीपुरी यांचे शब्द. पूर्वीच्या कॅसेटच एक बर असायचं. कॅसेटच्या इन ले कव्हरमध्ये बरीच माहिती असायची. कवीच (शायर) नाव आणि बरेच वेळा गाण्याचे शब्दही . आता या गोष्टी गुगलबाबाला विचारायला लागतात.
खामोश गाझीपूरी च नाव आले की आठवतात ते हे शब्द
आग को खेल पतंगों ने समझ रखा है
सब को अंजाम का डर हो .... यह जरूरी तो नहीं
गज़ल म्हणजे काय ? एकच जमीन असलेल्या ५ किंवा त्यापेक्षा जास्त शेर (उर्दू भाषेत आशर) यांचा समूह म्हणजे गज़ल. पण यातली मजा अशी कि यातला प्रत्येक शेर स्वत:चा अर्थ घेऊन येतो. दैर-ओ-हरम में बसने वालों याचे उत्तम उदाहरण

दैर-ओ-हरम में बसने वालों
मैख़्वारों में फूट न डालो

दैर-ओ-हरम म्हणजे मंदिर आणि मशीद ... थोडक्यात धर्माच्या ठेकेदारांनो आमच्यात फूट पडू नका

यालाच थोडा सुसंगत शेर म्हणजे
मैखाने में आए वाइज़ (वाईज : धर्मोपदेशक)
इनको भी इंसान बना लो

पण यातले मला आवडणारे दोन शेर

तूफ़ाँ से हम टकरायेंगे
तुम अपनी कश्ती को संभालो

आणि शेवटी येणारा

आरिज़-ओ-लब सादा रहने दो
ताजमहल पे रंग न डालो

आरिज़-ओ-लब म्हणजे गाल आणि ओठ ... ताजमहालाच सौन्दर्य त्यांच्या नैसर्गिक पांढऱ्या संगमरवरामुळे आहे .. उगाच कृत्रिम रंगरंगोटीची काय गरज ?
तुझ्या चेहर्याचंही तसच नाही का ?

यानंतर शाहिद कबीर ची गजल
बे-सबब बात बढ़ाने की ज़रूरत क्या है
हम ख़फ़ा कब थे मनाने की ज़रूरत क्या है

पहिल्या दोन गाण्यांच्या तुलनेत अगदी साधी ... खास जगजीतसिंगच्या पठडीतली .. पण या गजलेतही एक खास शेर येऊन जातो .. ज्याला हासिल-ए-गजल म्हणावा असा

दिल से मिलने की तमन्ना ही नहीं जब दिल में
हाथ से हाथ मिलाने की ज़रूरत क्या है

व्वा .. क्या बात है

कॅसेट्च्या पाहल्या बाजूच्या शेवटी आहे

ज़िन्दगी तूने लहू ले के दिया कुछ भी नहीं
तेरे दामन में मेरे वास्ते क्या कुछ भी नहीं

मला फारशी न भावलेली गज़ल. कदाचित याचा अर्थ कळायचं ते वय नव्हतं .. आताही नाही
यातलाच एक शेर

मेरे इन हाथों की चाहो तो तलाशी ले लो
मेरे हाथों में लकीरों के सिवा कुछ भी नहीं

आमचे सुधीर मोघे लिहून गेले ..
क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.

पण हे कदाचित आजून वीस वर्षांनी कळेल / भावेलही .. पण आज मात्र आपला पास ....

यानंतर येते ते बी साईड .. कॅसेट ची दुसरी बाजू. तिथेही चार गाणी ... त्याविषयी दुसऱ्या भागात

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जगजीत सिंग यांची गझल ऐकणं म्हणजे एक चिंतन असतं. स्वर आणि शब्द सरमिसळून गेलेले असतात. मनाला भिडतोय तो अर्थ शब्दांचा कि स्वरांचा, असा संभ्रम सतत होत रहातो.
आणि आवाजाबद्दल काय बोलावे. एकाच वेळी पुरूषी करकरीतपणा आणि रेशमाचा मुलायम स्पर्ष ! तरीही वजन भारून टाकणारं..

तुम्ही या गझल खूप छानपणे मनाने टिपून घेतल्या आहेत. हे भावणे खूप आनंददायी असते. जगजीत तुम्हाला असेच सापडत रहावोत ..
असेच लिहित रहा आणि विश्वाची सैर घडवत रहा.

जगजीत.....

एक दीर्घ उसासा

सच्ची बात कही थी मैंने
लोगों ने सूली पे चढाया

ह्या ओळींच्या पुढे वाचूच शकलो नाही...

वाचेन परत कधीतरी

सुन्दर रसास्वाद! आमची पारायणे झाली होती या कॅसेट ची!

ज़िन्दगी तूने लहू ले के दिया कुछ भी नहीं
तेरे दामन में मेरे वास्ते क्या कुछ भी नहीं - ही खरे तर खूपच आर्त गजल आहे.

जगजीत आवडता आहेच पण जगजीत-चित्रा जोडीने गायलेल्या गझल फार सुंदर आहेत!

जगजीतच्या "सहर" आणि "मरासिम" होत्या माझ्याकडे..... अजुनही असतील!
आणि नंतर PC आल्यानंतर कुठुन कुठुन जमवलेल्या बऱ्याच गझल्स आहेत!

सगळी गाणी आठवली आणि मनात ऐकू आली.सच्ची बात ऐकलं तेव्हा त्यातल्या कोरस ची गंमत वाटली होती.यापूर्वी गझल मध्ये असा कोरस ऐकला नव्हता.सगळी गाणी सुंदर.
मला मराजिम आणि सहर च्या गाण्यांच्या चाली एक सारख्या वाटतात(असं म्हटलं की नवरा चिडतो). पण फेस टू फेस खरंच सुंदर आहे. दुसऱ्या भागात तुम्ही प्यार का पहला खत लिखने मे बदल लिहालच. आवडतं गाणं.