आखाडी
रानोमाळ चालणाऱ्या पांभरी. पांभरीच्या चाड्यावर एका लयीत धरलेली धान्याची मूठ. एक सरली की दुसरी. पुढे जोतलेले सुबान्या-गबान्या बैल पट्टीनं आखून दिल्यागत एका रेषेत चालत राहतात. बांधाला पोहचलं.. ‘वय…’ म्हटलं की यू टर्न. पुन्हा दुसऱ्या सरीत बरोबर पाय ठेवून चालू लागतात. मागं भुईची कुस उजवण्यासाठी तिच्या पोटात धान्याचा एक-एक दाणा पाभरीच्या चारी नळकांड्यांतून खाली मातीत अलगद रुजतो. ओटीभरणच जणू. शेजारच्याच तुकड्यात नांगराच्या सरीमागे नवऱ्याच्या मागं मागं ओटीत शेंगदाण्याचं बी घेऊन एक एक करून ठरावीक अंतरावर सरीत सोडणारी त्याची बाइल. मागे शेंगदाणे वेचायला टपलेले पाच-दहा कावळे बी टाकलं की त्यांच्या तीक्ष्ण चोचीनं उचललंच समजा. औतामागे निघालेले किडे लगोलग टिपायला चार-दोन बगळेही येऊन बसतात. काळे कावळे नि पांढरे बगळे यांचं एकत्र येणं हे सत्ताधारी नि विरोधक एकत्र बसून जेवल्यासारखं. बगळे मला राजकारणीच वाटतात, चिखलातून शेकडो किडे खातील, पण अंगाला एक मातीचा कण लागू देणार नाहीत. कधी आरामशीर औताला जुंपलेल्या बैलाच्या पाठीवर बसून आरामशीर सवारी करतील. साळूंक्यांचाही एक थवा चक्कर टाकून पोट भरून जातो. चारी बाजूंच्या बांधांवर उगवलेली कोवळी हरळ, माठ, बावचा असे सर्वसमावेशक गवत एकत्रपणे नांदतं. बांधावर एखादं पेरूचं, जांभळाचं झाड, विलायती चिंच, कडुनिंब अशी अनेक झाडं. मध्येच घरी खाण्यासाठी माळव हवं म्हणून बांधावर गिलके, दोडके, कार्ल्याचे नुकतेच फुले आलेले दोन-तीन वेल. असं हे बांधा-बांधावरचं चित्र.
जवळच्याच बाभळीच्या, लिंबाच्या अशा कुठल्याशा झाडाखाली साडीच्या पटकुराची झोळी टांगलेली. त्यात एखादं सहा-आठ महिन्यांचं बाळ. सांभाळायला त्याचीच मोठी बहीण वा भाऊ. खाली फडक्यात बांधून आणलेल्या जाडजूड बाजरीच्या भाकरी. कधी जर्मनच्या डब्यात आणलेलं पातळ कालवण. सगळ्यांना चुरून खायला पुरंल असं. त्यातच लोणचं, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा... असं काही बाही... कुत्र्यानं तोंड घालू नये म्हणून जमिनीवर भाकरीची फडक्यात बांधलेली चळत ठेवून वर घमेलं पालथं मारून त्यावर मोठा दगड ठेवलेला. नि मुंग्या? त्यांना कोण रोखणार? झाडाच्या बुंध्यावरून उतरून थेट भाकरीत गेलेली एक अखंड रांग. भाकरीच्या पापुद्र्यातून अन्नाचा एक एक कण तोंडात धरून पुन्हा लगबगीने मागे फिरून वारुळात नेणाऱ्या. पेरणीचे हे दिवस. अजिबात उसंत नसलेले. शाळेत जाणाऱ्या पोरांनाही चार-दोन दिवस मुद्दाम घरी ठेऊन घेतलेलं. त्यांनाही त्या निमित्तानं अभ्यास बुडवायची आयती संधी.. अन् पोरानं शेतीची पारंपरिक कामं शिकण्यासाठी बापासाठी ही आयती संधीच. पोरानं वखर येठायला शिकावं, नांगराची मूठ कशी पकडायची, तो खोलवर जाण्यासाठी कसा जोर द्यायचा, बैलांना नुसतं ‘हं…’ म्हणून जूआखाली शिंग घालून खांद्यावर घ्यायला कसं शिकवायचं? हे सगळं शिकवण्यासाठीची ही प्रयोगशाळा. थेट प्रॅक्टिकलच. थिअरीला थारा नाही. चुकला का रट्टा. कधी रुमण्याचा टोला पाठीत. रुमणं हे औजार की हत्यार? औताच्या वेळी औजार अन् इतर वेळी शेतकऱ्याचं हक्काचं हत्यार. पोराच्या पाठीत बसणारं, बायकोच्या अंगावर वळ उठविणारं आणि भाऊबंदाचं डोकं फोडणारं. दोन-तीन रट्ट्यात पोरगं वखर येठायला, बैलं जुतायला, वखराची पास लावायला शिकतं. शाळेत पास होईल की नाही माहीत नाही, पण ही पास त्याला लावावीच लागते. पेरताना किती दाणे मुठीत घ्यायचे, किती वेळानं सोडायचे, पांभरीच्या चारी नळकांड्यांतून एकसारखं धान्य पडलं पाहिजे, याचं हे अलिखित ज्ञान. कुठल्याही पुस्तकात नसलेलं. पिढ्यान् पिढ्या असंच बापाकडून पोरांकडं चालत आलेलं. कोणत्या कृषी विद्यापीठात हे शिकवतात बरं? नांगर कसा लावावा, रुमणं किती उंच पाहिजे, जू किती अंतरावर हवे, येलं किती अंतरावर बांधायचं? कोणत्या औताला कोणतं जू वापरायचं? हा खजिना वडिलोपार्जितच. शिव्यांसारखा. त्या कुठं कोण कोणाला शिकवतं? कोणत्या पुस्तकात, शाळेत शिकवतात? तरी झाडून सगळ्या शिव्या, त्यांच्या स्पष्ट, अस्पष्ट, गर्भीत अर्थांसकट पोरांना माहिती असतातच ना. तसंच हे.
आखाड म्हटला की आभाळातून भूळ भूळ चालूच. बरा पाऊस झाला की, पेरण्या आटपून घेतल्या म्हणजे बरं. नंतरच्या पावसात पेरलेलं तरातरून वर येतं. काळ्याभोर मातीमध्ये कोवळ्याशार ठोंबांच्या रांगाच रांगा..सगळी शेतं सारखीच. भुईमूग कोणता, मूग, मठ, तुरी, सोयाबीन हे लांबून सगळं एकसारखंच दिसतं. बाजरी, ज्वारी, मका तंतूमूळ वर्गीय, कणसं येणाऱ्या पिकांच्या सुरुवातीपासून वेगळ्या वाटतात. टोकदार, उभ्या पानांमुळे. पेरताना मध्येच एखादं दुसरंच कसलंतरी रोपही मध्ये उगवलेलं असतं. एकदा पेरण्या आटोपल्या की मग पहिली निंदणी, चिमटणी येईपर्यंत आनंदोत्सव. घरोघरी गुळाच्या गोड चाणक्या, भजे, कुरडई, सार असा खमंग बेत. वार तसा निश्चित नाहीच. ज्याला जसं काम आटपून जमेल तसं घरच्या बाईनं आखाड तळायचा. देवीला नैवेद्य दाखवायचा. ‘पेरलेलं उगवू दे गं बाई... रोगराई टळू दे, सुक लाभू दे.!’
आखाडाच्या पंचमीलाच मग गावातली कर्ती, कडक टोप्या घालून मिरवणारी कारभारी पुरुष मंडळी बोहाड्याच्या तयारीत गुंततात. यंदा कोणती सोंगं ठेवायची, लिलाव कधी ठेवायचा… वगैरे! काही सोंगं पिढीजात एखाद्या घरात. प्रत्येक सोंगापुढं नाचणारे दोन राजे हमखास चार-पाच घरांतून तरी असणार. अनेकदा नुकतेच शाळा सोडून कॉलेजात जाऊ लागलेल्या नाहीतर नापास होऊन शाळा सुटलेल्या पोरांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाते. पुढच्या मोठ्या सोंगांसाठीची तयारीच म्हणा ना. राजे म्हणजे तरी काय, ज्या प्रमुख सोंगापुढं नाचतोय, त्यानं तलवार मारली की झेलायची. सनई, संबळाच्या तालावर नाचायचं. काही सोंगं महत्वाची. जसं नरसिंह. सगळ्यात मोठं, जड पार्ट. चार-चार लोकं लागतात म्हणं मुखवटा धरायला. केळीचा खांब तोडून बाहेर येतो डरकाळ्या फोडत. सिंहच तो. या सोंगाचा मान वर्षानुवर्ष एकाच घराला. चाळीशी पार केलेला, गावात मानसन्मान असलेला घरातला कर्ता पुरुष ही महत्त्वाची जबाबदारी पेलतो. ‘नरशाचं सोंग घ्यायला दोन दिवस घरात कोंडत्या म्हणं! त्याला शुद्धच कुठं आसते? त्याच्यात देवच संचारलेला आसतो म्हणत्या. म्हणून तं नाचतो एवढं वझं घेऊन.’ दुसरा - ‘कोण म्हणतं? तसं नसतं रे. सोंग घ्यायच्या दोन-तीन तास आधी एखादी देशीची क्वाटर टाकून घेतो. पुढं त्याला काही कळत नाही, त्यामुळं नाचत राहतं.’ पहिला - ‘पण हे देवाला चालतं.’ ‘का नाही? इंद्र नव्हता का सुरापान करीत?’
राक्षस पार्ट घेणाऱ्याला तर सुरापान पाहिजेच. त्यासाठी खास सोंगाच्या खोलीतच पाण्याचा तांब्या, चपटी आणून ठेवलेली. इकडं तिकडं कोणी नाही हे पाहून गुपचूप तांब्यात ओतून कडूमडू तोंड करून घटकन गिळून घेतो. मग पुढचे दोन-तीन तास तंद्री... टारीरारी टारीरारी टारी रारी रा...ढुम...ढुमळक ढुमळक…
वेताळ... हेही विशिष्ट घरात पिढ्यान् पिढ्या चालत आलेलं सोंग. भुताखेताचा देव. ‘इकडं गावात येताळ निघला का तिकडं गावकुसाबाहेर नुसतें टेंभे नाचत्या म्हणं.. वरच्या वर हवेत झुलात्या.’ जुनं जाणतं कोणीतरी सांगतं. पोरांच्या मनात धस्स... ‘खरंच?’ ‘हा मंग. वरल्यांगच्या मारुत्यानं पाहिलं सोत्ता. चार दिवस शुद्धीत नव्हता. बडबडत व्हता नुस्ता येड लागल्यासारखा.’ म्हणून वेताळाचं सोंग महत्त्वाचं. श्रद्धेचं. ‘देवा, भुता-खेताची बाधा हटू दे. वावर-शिवार येऊ दे.’ सवासनी मनापासून हात जोडतात. वेताळाचं सोंग घेणारा भारदस्त मिशांचा, काळसावळा, मजबूत देहयष्टीचा. सोंग घेतलं की साक्षात वेताळच!
राम-लक्ष्मण, कृष्ण-बलराम यांच्यासह वामन, कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह असे विष्णूचे दहा अवतार. प्रभावळ मात्र रोजचीच. भला मोठा सजविलेला टोप, लायटिंगचा. रोज वेगवेगळ्या जणांकडून, अधून मधून घेतलं जाणारं हे सोंग. बोहाडा रात्री नऊला सुरू झाला की रात्र कधी उलटते समजत नाही. शेवटच्या दिवशी शेवटचं सोंग देवीचं, महिषासूर मर्दिनीचं. सगळ्यात महत्त्वाचं. सोंग पहाटे निघतं आणि सकाळी विसर्जित होतं. कधी कधी चार-पाच तास गावभर ही मिरवणूक सुरू असते. नखशिखांत सजविलेली, मढविलेली अष्टभूजा देवी. हातात सगळी शस्त्रे, राक्षसाचं मुंडकं अन् पुढे दिमतीला राजे. सोंग घेणारा पुरुषच. पण सोंगात असताना तो साक्षात महिषासूर मर्दिनी वाटतो. लालभडक डोळे, हातभर बाहेर आलेली कागदाची जीभ, भाळी मळवट.. भीतीदायक अन् नतमस्तक व्हावं असं. देवीचं सोंग विसर्जित करायचं तर बळी लागतोच... ठरल्याप्रमाणे बोकड आणला जातो. तो कापून त्याच्या रक्ताचा टिळा लावला की देवी शांत होते. सोंग असलं तरी देवी झालेल्याच्या डोक्यात संबळ वाजत राहतो. त्याच्या अंगातली, मनातली देवी दिवसभर तरी राहते. दोन दिवस अंथरुणातून त्याला कोणी उठवत नाही.
आखाडी आमावस्या येते. देवीचा सण. महिनाभर तीन आखाड झाल्यानंतर शेवटचा चौथा आखाड आमावस्येला तळायचा. गुळाच्या गोड चाणक्या, भजे, कुरडई, सार असं साग्रसंगीत भोजन. घरोघरी सकाळपासून बायाबापड्यांची दगडी पाट्यावर वरवंट्यानं मसाला वाटायची लगबग, पोरं टोरं पुरणाचा एखादा गोळा मिळण्यासाठी आईच्या मागं पुढं फिरणार. चुलीवरच्या कढईत टाकलेल्या साराच्या काळ्या मसाल्याचा खमंग वास, भज्यांचा तेलकट घमघमाट थेट वावरात काहीतरी किडूकमिडूक काम करीत असलेल्या माणसांपर्यंत पोहचतो. स्वयंपाक कधी होतो, याची माणसंही वाट पाहत असतात, पण त्यांना पोरांसारखं उतावळं होता येत नाही. आई भजे तळायला बसली की एखादं लहानगं कार्टं मागं येऊन थांबतं. ‘थांब रे.. देवीला निवद दाखवू दे’ आई त्याच्याकडं न पाहता म्हणते. तिकडून म्हातारी म्हणते, ‘दे त्याला दोन-तीन भजे. बाळमुंज्याहे तो. त्याला सगळं माफ आस्तं.’ असा देवांच्या आधी नैवेद्य खाण्याचा मान पोरांना घरोघरी मिळत असतो. स्वयंपाक तयार होताच देवीसाठी वेगळा नैवेद्य. लहानशा पाच चाणक्या. त्यावर एक-एक घास भात, वरण, कुरडई, पापड, सार, भजे, तूप असं सगळं काही. घरातल्या एखाद्या मोठ्या पोराला घेऊन सवाशीण हा नैवेद्य घेऊन गावाबाहेर असलेल्या लक्ष्म्याईच्या देवळात जातात. एरव्ही वर्षभर या देवळाकडे कोणी फिरकतही नसतं. आणि, आज देवीच्या दगडी पायऱ्यांपुढच्या नारळ फोडण्याच्या दगडांवर नारळाच्या शेंड्या, करवंट्या, खोबऱ्याच्या असंख्य ठिकऱ्या इतस्तत: पसरलेल्या दिसतात. दगडावर तसंच आसापास उडालेलं नारळातलं पाणी, त्यामुळं जरासा आंबूस वास पसरलेला. एखादा पावन झालेला नारळ तेथेच फोडून शेंडीसकट टाकलेला. किती सकारात्मकता. नारळ खराब निघाला की पावन झाला. देवाला पावला. आणि चांगला निघाला की, देवाला पाच खांडं आणि बाकीचा माणसांना. आसपास सगळीकडे नारळाच्या शेंड्या पडलेल्या. शेजारीच लहानसा त्रिशूळ खोचलेला, हिंगूळानं रंगविलेला, त्याच्या तिन्ही शूळांमध्ये हिरव्या, लाल बांगड्या वाहिलेल्या, कोणी लाल फडकं बांधलेलं. लक्ष्मीआईचं मंदिर वर्षातून असं कधीतरीच उघडतं. अन्यथा देवी वर्षभर कुलूपबंद. बंद दाराआड देवीचा मुखवटा वर्षानुवर्षे येणाऱ्या-जाणाऱ्याकडे पाहत असतो. कोणासाठी ती कृपादृष्टी असते तर कोणासाठी कोप. पायऱ्यांवर सगळे नैवेद्य मांडून ठेवलेले. तिकडं दोन-चार टवाळ कुत्री नैवेद्याकडे टक लावून शेपटीचा पंखा झुलवत ठेवतात. नवखे कुत्रे थेट खायला जातात आणि पेकाटात लाथ बसली की ‘क्याँव क्याँव’ करीत मागे फिरतात. अनुभवी कुत्र्यांना माहिती असतं, एकदा का नैवेद्य ठेवणाऱ्यांची पाठ फिरली की सगळं आपलंच. ‘कुत्रं पाह्य, निवदात तोंड घालील. निवद पावणार नै.’ ‘शाळेतल्या धड्यात लिहिलंय, संत एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं होतं. सगळे जीव सारखेच. मंग कुत्र्यानं खाल्लं तर त्याच्या पेकाटात लाथ का?’ पोरांना पडलेला प्रश्न. याचं उत्तर कोणाकडेच नसतं. वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या हेच चालत आलेलं. का, कशासाठी माहीत नाही. पण, हे सगळं यथासांग करायचं. घरी आलं की जेवणं. मग दुपारनंतर घरातले सगळे दिवे वर्षातून एकदाच अंघोळीला बाहेर निघतात. वाकड्या शेपटीचे, चिचकुळ्या तोंडाचे, काजळी धरलेले, तेलकट, मोठ्या गोल पोटाचे. समया, पंचपाळे यांनाही या निमित्ताने अंघोळ मिळते. राखुंड्यानं स्वच्छ घासलेल्या दिव्यांवर बाभळीची पिवळीधम्मक सुंदर फुलं, आघाड्याची फुलं वाहून त्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची. पूजा म्हणज काय? शेणानं सारवलेल्या जागेवर हे दिवे ठेवून त्यांना मनोभावे हात जोडायचे. ‘ईडा पीडा टळू दे. बेंडं-खेंडं बरे होऊ दे. रोगराई जाऊ दे. गाई-गोऱ्हे सुखी ठेव. सुख लाभू दे.’ यातली आर्तता, श्रद्धा इतर कुठे असणार? मोठ्या मठांत, आश्रमांत? श्रद्धा की दिखावा? जेथे दिखावा असतो तेथे श्रद्धा नसते, श्रद्धा असते तेथे दिखाव्याची गरज काय?
कुठं कुठं संध्याकाळी अख्खा गाव बाहेर निघतो. पुढं डफडं वाजत राहतं ‘डडांग डडांग...’ गावातली पोरं टोरं गंमत म्हणून त्याच्याबरोबर पळत राहतात. बाया-माणसं त्यांच्या मागं निघतात. ही जत्रा गावाबाहेर जाऊन लक्ष्मीच्या देवळाबाहेर स्थिरावते. तेथे खेळ होतात. कुस्त्या, बारा गाडे. कोणाच्या अंगावर येते. कोणी भगत उघड्या अंगावर साठ मारून घेतो अंगावर लाल चट्टे येईपर्यंत. एरव्ही दहा दिशांना तोंडं असणारी गावातली मंडळी अशा यात्रांच्या निमित्तानं एकत्र येतात. जातीभेद विसरून. हा सर्वधर्मसमभावच नव्हे का? श्रावण लागणार म्हणून वशाट खाणारे खाटकाकडं सकाळीच वाटा सांगून ठेवतात. पोरंसोरं पोटभर खातात. न खाणारे आखाड तळतात. गोडधोड करून खातात. साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंतचे हे चित्र. गावांमध्ये आजही आखाड साजरा होतो. पण, आज आखाडी आखडून तिची गटारी झालीय.... सगळंच गटार...तोंडाचंही अन्....
आखाडी
Submitted by टोच्या on 31 July, 2019 - 12:53
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद पुरंदरे शशांक
धन्यवाद पुरंदरे शशांक
खूप सुन्दर लेख
खूप सुन्दर लेख
सातवी ते बारावीपर्यंत गावी होते
माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ
खूप मिस करते मी ते दिवस
धन्यवाद, पुरंदरे शशांक
धन्यवाद, पुरंदरे शशांक
आखाडी म्हणजे गटारी वगैरे चे
आखाडी म्हणजे गटारी वगैरे चे वर्णन असेल असे म्हणून टाळलं होतं लेख वाचण्याचं. पण आता वाचून खरंच भुतकाळात गेलो. मी माझी बायको व एक की दोन मुलं असे जग नव्हतंच तेव्हा. गाव म्हणजे गावच. सणसमारंभात सगळे भरभरून आनंद लुटत. लहान थोर, जात पात हे विचार मनाला शिवलेही नाही कधी. पेरणीपूर्वी सिता मातेची पूजा करणं, इर्जिक या साऱ्या गोष्टी आठवल्या. हिरवं झालेलं शिवार पाहून मनांमध्ये हिरवे अंकूर उगवायचे. लेखासाठी खूप धन्यवाद.
अॅमी जी अहो खेड्यात जन्म झालेला माणूस कुठेही पोहोचला तरी त्याची नाळ गावाशी, त्याच्या निसर्गाशी जोडलेलीच राहते.
चैतन्य रामसेवक धन्यवाद
चैतन्य रामसेवक धन्यवाद
Pages