माय डियर लोकसत्ता, गुड बाय टु यू!

Submitted by pkarandikar50 on 9 April, 2009 - 04:53

मी लोकसत्त्ताकारांना एक पत्र लिहलं आहे, ते लोकसत्तेत छापून येण्याची शक्यता नाहीच पण त्याचा विषय सर्वसाधारण वाचकांच्याही जिव्हाळ्याचा आहे असं मला वाटलं, म्हणून इथे पोस्ट करतो आहे. याच विषयावर मी 'मराठी अभिजात भाषा: कधी आणि केंव्हा' असाही एक लेख यापूर्वी मायबोलीवर पोस्ट केला होता. कदाचित तो आपल्या वाचनांत आला असेल.
------------------------------------------------------------------------------------
महोदय,
माझ्याप्रमाणेच अनेक मराठी भाषिक एक इंग्रजी आणि [अगत्यपूर्वक] एक मराठी दैनिक विकत घेऊन वाचतात. माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर मी लोकसत्तेचा नियमित वाचक आहे पण अलीकडे मला जाणवू लागलं आहे की लोकसत्ता हे मराठी दैनिक राहिलेलं नाही. ते इतके ईंग्रजाळले आहे की मराठी ऐवजी 'मिंग्लिश भाषेतले दैनिक' असे त्याचे वर्णन अधिकृतपणे लोकसताकारांनी करावं.

आपल्या गुरुवारच्या अंकात Viva नावाची एक पुरवणी असते. या पुरवणींतल्या विविध स्तंभांची शीर्षकं अशी आहेत - कॅम्पस Mood, थर्ड आय, स्मार्ट बाय, क्रेझी कॉर्नर, मेल बॉक्स, ग्रूमिन्ग कॉर्नर, यंग अचीवर्स, ओपन फोरम इ. मराठी मथळ्याचा एकही स्तंभ किंवा सदर या पुरवणींत नसते, मग मजकूर तरी मराठी भाषेत का असावा? देवनागरी लिपींत सरळ इंग्रजी मजकूर किंवा रोमन [युनिकोड] लिपीत मराठी मजकूर का देत नाही?

केवळ पुरवणींतच नव्हे तर मुख्य दैनिकाच्या मथळ्यांमधे आणि लेखांच्या शीर्षकातही देवनागरी लिपीत लिहीलेलं इंग्रजी वाचावे लागते. उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडे एका रविवारच्या अंकांतला ' दि क्यूरियस केस ऑफ स्लमडॉग मिलिनॉयर' हा लेख पहावा. लेखकाला लिहायचे होते 'स्लमडॉग मिलिनॉयर' ह्या बहुचर्चित चित्रपटासंबधी पण मथळ्यासाठी त्याला 'दि क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन' ह्या हॉलीवूड चित्रपटाच्या नावाचा आधार घ्यावासा वाटला आणि संपादकांनीहि हा धेडगुजरीपणा चालू दिला! वास्तविक पहाता ह्या दोन चित्रपटांचा एकमेकांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही आणि त्या लेखांत बेंजामिनविषयी एक अवाक्षरही नाही. हा सगळा काय प्रकार आहे?

दुसरं उदाहरण: ७ एप्रिल २००९ च्या अंकातल्या पहिल्या पानावर, राहूल द्रविडने घेतलेल्या विक्रमी झेलांची बातमी पहावी. ह्या बातमीचा मथळा आहे, ' कॅची .... !' याच अंकांतले आगामी लोकसभा निवडणुकांसंबधीचं सदर -'इंडियन पोलिटिकल लीग' -ही असंच विनाकारण इंग्रजाळलेले आहे.

एखादा इंग्रजी शब्द मराठींत इतका रुळलेला असतो की त्याचा मराठी प्रतिशब्द 'परका' वाटावा. उदहरणार्थ, लोकल, बस, स्टेशन, पोस्ट ऑफीस इ. अशा शब्दांच्या बाबतीतही, अट्टाहासाने मराठी प्रतिशब्द वापरावेत असा माझा हट्ट नाही पण जेथे अशी व्यावहारिक गरज नाही तेथेही 'मिन्ग्लीश' भाषा का वापरावी? असं केल्याने, आपल्या दैनिकाचा वाचकवर्ग - विशेषत: - इंग्रजी माध्यामांतून शिकलेली युवा पिढी - वाढेल अशा भ्रमांत लोकसत्ताकार आहेत काय?

मुंबई विद्यापीठाने 'बॅचलर ऑफ मास मिडिया' [बी. एम्.एम.] चा अभ्यासक्रम इंग्रजीप्रमाणेच मराठी माध्यमांतूनही उपलब्ध करून द्यावा ह्या मागणीला लोकसत्तेने सतत पाठिंबा दिला. मराठी माध्यमांची प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज पहाता, हे रास्तच होतं. मुंबई विद्यापीठाने ही मागणी मान्यही केली आहे. मला असा प्रश्न पडतो की मराठी माध्यमांतून बी. एम्.एम. ची पदवी घेऊन बाहेर पडणारे पदवीधर जेंव्हा उद्या मराठी दैनिकांकडे किंवा टी.व्ही. वाहिन्यांकडे काम करू लागतील तेंव्हा ते कोणती भाषा वापरतील? मराठी का मिंग्लीश? आणि ते जर अशी इंग्रजाळलेली धेडगुजरी मराठी वापरणार असतील तर अभ्यासक्रम तरी मराठींत ठेवण्याचा आग्रह कशाकरता धरायचा?

एक वाचक आणि प्रेक्षक म्हणून मी मराठी माध्यमांमधल्या ह्या बदलत्या [इंग्रजी भाषेने गढूळलेल्या] प्रवाहाकडे पाहतो, तेंव्हा माझ्यापुढे प्रश्न पडतो की मी ह्या संबधी काय करू शकतो ? का हताशपणे, 'जे जे होईल ते ते पहात रहावे' असे म्हणत स्वस्थ बसायचं? माझ्यापुरतं तरी मी ठरवलं आहे की एक ग्राहक म्हणून का होईना, मी लोकसत्ता खरेदी करायचं थांबवू शकतो. त्याने कितपत फरक पडणार हा भाग अलाहिदा.

तेंव्हा, माय डियर लोकसत्ता, गुड बाय टु यू!
-----------------------------------------------------------------------------------
प्रभाकर [बापू] करंदीकर.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी जवळजवळ तीन वर्षांपुर्वीच लोकसत्ताला शेवटचा नमस्कार केला Sad लोकसत्ता माझ्या घरात माझ्या जन्माआधीपासुन सुरू होता. पण आताअ अगदी वाचवत नाहीत त्यांच्या पुरवण्या आणि मुख्य दैनिकही...

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

खरय! मी देखील लोकसत्ताला रामराम ठोकुन म. टा. वाचतो. अगदी ८/१० दिवसांपूर्वीच लोकसत्ताची एक प्रत हातात घेतली तर. फ्रंटपेजवर पूर्ण पानभर कसलीतरी अ‍ॅड होती. मला आता नक्की आठवत नाही कदाचित नॅनोची असावी. पण ती बघुनच पुढे पेपर वाचावासा वाटला नाही. किमान फ्रंटपेजवर तरी पानभर अ‍ॅड नको.
.................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

१०० टक्के अनुमोदन! Happy
लोकसत्ताच काय, बहुधा एक सकाळ सोडला तर बहुतेक वृत्तपत्रान्ची भाषा भयन्कर बिघडलेली आहे!
तरीही मी लोकसत्ताच घेतोय अजुनतरी
पण वर उल्लेखलेली विवा वगैरे पुरवण्या हातातही धरत नाही!
लोकसत्ताकडून आपणास काय प्रतिक्रिया मिळते ते बघु, मिळाल्यास त्याबद्दलही इथे नन्तर जरुर लिहा

अगदी खर आहे. आम्हीही आता लोकसत्ता सोडून सकाळ पेपर घेतो. तुम्हाला जर लोकसत्ता कडून प्रतिक्रिया आली तर नक्की इथे दर्शवा.

मला देखिल हा प्रश्ण पडला होता. मुद्दा तुमचा रास्त आहे पण शेवटी हे व्यवसायाचं गणित आहे हे लक्षात घ्यायला हवं असं माझ मत आहे.
१. विशेषतः शहरातून अशी परिस्थिती आहे की पालक अन नविन पिढी यांन्ना बरेच वेळा वर उल्लेखलेले "स्मार्ट बाईट", "क्रेझी कॉर्नर" वगैरे शब्द अधिक जवळचे अन ओळखीचे वाटतात.. so they are catch phrases.
२. जसा वाचक असेल तसा कंटेट असणारच्..पूर्वीचा लोकसता जो ठणठणीत मराठी होता तो आता इतका बदलतो तेव्हा त्यामागे निश्चीत वेगळी कारणं असतात. मला आठवतं पूर्वी सत्ता अन मटा मुळमुळीत अन प्रादेशिक असा अरोप करून लोक मुद्दामून "राष्ट्रीय" समजला जाणारा express, times घेत असत.
३. राहता राहिला प्रश्ण, विद्यापिठातून अगदी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या "वाचक" वर्गाचा तर दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की बातम्या, राजकारण, समाज, धंदा इत्यादी विषयी रोजच्या दैनंदीन घडामोडी मुख्यत्वाने हिंदी अन इंग्रजी प्रसारमाध्यमातून २४ तास कानावर आदळत असतात, तेव्हा आपसूकच नकळत त्या भाषेचे संस्कार वाचकावर अधिक होत असतात. तुम्ही so called मराठी बातम्या, वार्ताहर, अन चॅनल्स पाहिलेत तर तिथे खुद्द मराठी भाषेतील मुखदुर्बळ अधिक समोर येतात. याचं कारण पुन्हा नविन पिढी जी या माध्यमातून कार्यरत आहे त्यांच्यावर मराठीखेरीज हिंदी व इंग्रजीचे श्रवण वाचन संस्कार अधिक होत आहेत, इंटरनेट काही अपवाद सोडता पूर्णपणे इंग्रजाळलेलेच आहे.. ज्याच्या या संस्कारात आज खूप मोलाचा वाटा आहे.
४. छापण्या आधी proof reading मधे चुका सुधारल्या जाव्यात ही अपेक्षा निश्चीतच योग्य वाटते पण तिथेही मला वाटतं असा सर्वसमावेशक वाचक वर्ग (म्हणजे वर मुद्दा १, व ३ मधे उल्लेखलेला ) डोळ्यापूढे ठेवून काही शब्द तसेच वापरत असतील.
५. ईतर गाव व दूर भागातून सत्ता किंवा मटा वाचणारा वाचक किती आहे हा संशोधनाचा विषय ठरेल
६. सर्वात शेवटी अन सर्वात महत्वाचे म्हणजे "खप" (sales). चांगल्या कंटेट ला खपही चांगला असतो असे गृहीत धरले तरी दुर्दैवाने जमाना हा "page 3" चा आहे. इथे स्फोटक, खेचक, डिवचणार्‍या तर प्रसंगी भावनांशी खेळणार्‍या बातम्या छापण्याची शर्यत आहे. अन मुळातच तुमच्या कंटेट मधे catch phrases नसतील तर त्याचा वाचक वर्ग कमी होणार निश्चीत.

तेव्हा मला वाटतं, कितीही मनाला पटत नसल तरी आपल्या वाटणार्‍या अशा सत्ता, मटा, सकाळ वा इतर मराठी वृत्तपत्रांचे हे व्यावसायीक गणित लक्षात घेवून आपल्यालाही थोड नरम व्हावं लागेल. जसं आपण इथे मा.बो. वरही खपवून घेतो तसच. किंबहुना मी मुद्दामून तरिही लोकसत्ता अन मटा दोन्ही घेतो, घेणार, कारण निदान त्यामूळे तरी आहे तेव्हडे मराठी माध्यम टिकण्यास आपलाच खारीचा वाटा होईल.

अन्यथा कुणीतरी म्हटले आहेच की "The only way to get the businesses to listen to you (consumer) is by impacting their profits"... मग आपण सर्वानी मिळून लोकसत्ता घेणे बंद केले तर परिणामी खप कमी झाल्याने ते आपले ऐकतील याची शक्यता कमी असली तरी मुळात मुद्दा भाषेच्या बदलत्या स्वरुपाचा आहे.

माझ्यासाठी वैयक्तीक, केतकरांचे अचाट अन अतर्क्य लेख हे एक कारण लोकसत्ता बंद करायला पुरे आहे. Happy

अर्रेच्या! केवळ लोकसत्तेबद्दलच नाही तर एकंदरीतच मराठी भाषेवरील इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल मी हाच मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. विशेषतः मायबोलीवर, जी मराठी भाषिकांना एकमेकांशी मराठीतून सुसंवाद साधण्यासाठी निर्माण केली आहे, तिथे सुद्धा असेच इंग्रजीचे आक्रमण. त्याबद्दल मला काय कारणे मिळाली ती मी माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहीली आहेतच.

व्यवहारात गरजेनुसार इंग्रजी बोलणे भाग आहे. पण मराठी वृत्तपत्रे, मराठी पुस्तके यांनीहि असेच करावे? पूर्वी इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्रे वाचावीत असे म्हणत. आता मराठी वृत्तपत्रे वाचून मराठी शिकणे शक्यच नाही.

इंग्रजीचा प्रदुर्भाव होण्याचे कारण असे की त्या त्या शब्दांना यथोचित मराठी शब्द एकतर माहित नसतात किंवा मुख्यतः ते प्रचलित नसल्याने वापरण्यात येत नाहीत. शब्द प्रचलित का होत नाहीत? कारण अगदी मराठी लेखक, मराठी वर्तमानपत्रे, मराठी साठी उघडलेले बातमी फलक ते वापरतच नाहीत!

आजकाल मुळी सुशिक्षित मराठी लोक म्हणजे इंग्रजीतूनच बोलणार! कुठलाहि मराठी चित्रपट, नाटक पहा!

कालच मला पुनः एकदा संगण्यात आले की भाषा 'प्रवाही' असते व जसे मोडी व संस्कृत जवळपास नाहीसे झाले तशी मराठीहि होईल!

ठीक आहे. होऊ दे.

पण असे म्हंटले तर मात्र लोकांना राग येतो. "व्हाडू यु मीन? वि आर वेरि प्रोउड ओफ अवर मराथी अँड महरश्त्र कल्चर!" बट द लँग्वेज हॅज टु चेन्ज, यु फालो मी?! असे उत्तर मिळते.

योग,

मराठी पेपर, मराठी भाषा
मराठी वाहिनी, मराठीच भाषा

हेच गणित आहे. मध्येच इंग्रजी बोलने, इंग्रजी टायटल असनारे स्तंभ वैगरे केवळ 'आम्ही प्रगत आहोत असे दाखविन्यासाठी आहे. कोणी ती गुरुवारची पुरवणी वाचत असेल की नाही ही शंकाच आहे. तसेच करायचे तर मग सरळ लोकसत्ता इंग्रजी एडीशन म्हणा. (एक्स्प्रेस असला तरी हा दुसरा काढा). हेच नाहीतर बहुतेक मराठी वाहिन्यांवर निवेदक पण काहीही टुकार इंग्रजी बोलत असतात. हे सर्व थांबायला पाहिजे. (थांबवल पाहिजे).

लोकसत्ता खुप पुर्वीच वाचणे सोडले...आधी त्याच्या पुरवण्या वाचनीय असत..आता तर अगदी लोकसत्ता ची वेबसाइट पण उघडुन बघत नाही...
पहिल्यापासुनच सकाळ, तरुण भारत (खजाना साठी :)), आणि पुढारी (गावच दैनिक..) चे चाहते आहोत..

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

लोकसत्ताच नाही, तर मटाही त्यात मागे नाही. त्यांचे मथळे बघूनच डोके हलते.
सकाळ त्याबाबतीत अजून बराच सुसह्य.
लोकसत्ता अन मटा या दोघांची खपाच्या बाबतीत (पुण्यात तरी) अतिशय दयनीय अवस्था आहे. लोकसत्तेचा खप तर भयंकर वेगाने कमी होतो आहे.
तस्मात, योगचे मुद्दे अजिबात पटले नाहीत.

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

मटाचे रुप भयानक बदललेय.. त्यांची ती मुंटा पुरवणी म्हणजे लोकसत्तेच्या विवा सारखीच आहे.. मटाचे रुप बदलत असताना मी बघितले होते.. ह्या बदलास कारणीभुत असलेल्यांन असं का करताय म्हणुन विचारलं पण होतं... त्यावेळी मला मिळालेलं उत्तर योगच्या पोस्ट सारखंच होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईमध्ये ज्या कुटुंबांमध्ये मटा येतो त्यातिल नवी पिढी निर्णयक्षम वयाची होत आहे.. आज नाही पण पुढच्या ५-१० वर्षांमध्ये कुटुंबामध्ये कोणते दैनिक घ्यायचे हे ह्या पिढीतील सदस्य ठरवतिल (ते कुटुंबप्रमुख होतिल) ह्या पिढितले तरुण तरुणी हीच भाषा वापरतात व हे सगळे विषय त्यांना जिव्हाळ्याचे वाटतात (सं. मटाची मुंबई टाईम्स पुरवणी). म्हणुन हा बदल.. त्यांच्याकडच्या आकडेवारीप्रमाणे मटाचे स्वरुप बदलल्यापासुन खप वाढला आहे.
त्यामुळे मी हल्ली स्वत: मटा, लोकसत्ता वाचत नाही..
केदार पुढारी मुंबईतुन निघतोय आणि मुंबई टाईम्सचे संपादक ज्यांनी हा पेपर बदलला ते पुढारीचे संपादक झालेत (मुंबई एडिशनचे) त्यामुळे आता तिथे किती बदल होतात बघु या..

योग ह्यांना अनुमोदन.
भाषा हि बदलांतून जातेच. जेव्हा मुघल लोकांचे आक्रमण झाले तेव्हा कितीतरी पर्शियन, अरेबिक शब्द हे आपल्या भाषेत आले. मी आज दुबई मधे गेली ८ वर्षे आहे आणि तेव्हा मला जाणविले कि मराठीत असंख्य शब्द हे अरेबिक भाषेतून आले आहेत.
उदा.
१. दाखला
२. वाडी
३. कसबा (१००% मराठी पुण्यातील कसबा पेठ)
४. सराफ
५.माफी
६. बुरुज
७. बकरी
८. आसमान

आणि इतर असंख्य शब्द आपल्या मराठीतील अरेबिक ओरिजीनचे आहेत. त्यामुळे आत्ता आज आपल्याला जो अगदी १००% आपला शब्द वाटतो त्याच्या उगमापर्यंत गेले तर कळेल तो कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतून आला आहे. आपल्या सर्व भारतीय भाषांची जननी संस्कृत हि असली तरी फारसी, अरेबिक, तुर्की, पोर्तुगिज अशा इतर अनेक भाषांमधिल शब्द आपण आपलेच म्हणुन दिमाखाने वापरतो.
ज्ञानेश्वरांच्या काळात किंवा त्यापुर्वी बोलली जाणारी मराठी आणि आत्ताची मराठी ह्यात जमिन-आस्मनाचा (पुन्हा एक अरेबिक शब्द) फरक आहे.
तेव्हा संस्कृती, भाषा हि बदलामधुन जातेच. इतर भाषेतील शब्द हे आपल्या भाषेत येतात आणि ते आपण टाळु शकणार नाही. Happy

मला वाटते की काहीतरी गैरसमज होतोय. जे शब्द इतर भाषांमधून मराठींत आले, रुळले आहेत त्यांच्या ऐवजी अट्टाहासाने मराठी शब्द वापरावेत असा माझा मुळीच आग्रह नाही. किंवा भाषांमध्ये शब्दांचे आदान-प्रदान चालणारच आहे, त्यालाही माझा आक्षेप नाही. प्रशासन आणि न्यायालयविषयक कामकाजांत वापरले जाणारे असंख्य शब्द मुळचे फारसी [उर्दु]आहेत किंवा फारसी-मिश्रीत आहेत. उदा. वकील, पक्षकार, साक्षीदार,जमीन, महसूल, दस्त, दस्तावेज, तहसिलदार[पूर्वीचा मामलेदार], तहसिल, जिल्हा, सुनावणी, फेर सुनावणी, जामीन, कैफियत, सबब, कचेरी, अटक, दावा, दावेदार, खटला, गुन्हा, अर्ज, कर्जदार, फाजील दस्त, वसूल, जमा, नक्कल,हद्द, जबानी, उतारा, नकाशा, मंजूर, तारीख.. एक ना दोन.
किंवा इंग्रजी - अपील, कोर्ट, जज्ज, समन्स, रिट, एंजिनियर, डॉक्टर इ.इ.
हे सर्व शब्द आता मराठी भाषेत दाखल झाले आहेत, त्यांना मराठीने आपल्यात सामावून घेतले आहे. प्रशासनिक मराठी शब्दकोषकारांनी त्यापैकी बहुतेक शब्दांना ‍कृत्रिमरित्या मराठी शब्द देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते प्रतिशब्द रुळले नाहीत. शासकीय कामकाजात भले तुम्ही अभियंता शब्द वापरा, दैनंदिन व्यवहारांत लोक एन्जिनियरच म्हणतात.त्यालाही आक्षेप घेण्याचे कारण नसावे. पण जे मराठी शब्द अगदी नेहमीच्या सरावातले आहेत, त्यांना फाटा देण्याचे काय प्रयोजन आहे? विधानसभा म्हटले की आता सर्वाना समजते. पण तुम्ही मुद्दाम वर्तमानपत्रांत 'असेंब्ली' लिहणार का?
दुसरे म्हणजे बोली-भाषा आणि लेखी-भाषा ह्यात थोडा फरक राहणारच आणि तो आवश्यकही आहे. तुम्ही बोली-भाषेत बहुदा न चुकता काँप्युटर म्हणत असला तरी पण मराठी भाषेत अग्रलेख लिहताना 'संगणक', असा शब्द वापरणेच युक्त ठरते. हे सर्व भाषांमध्ये आणि सर्व देशांमध्ये घडते. बोली-भाषेत इंग्रज 'टेली' असेच बोलतो पण बी.बी.सी. वरच्या बातम्यांत किंवा 'टाइम्स'मधल्या लेखांत 'टेलिव्हीजन' असाच शब्द वापरला जातो. विशेषतः एकीकडे 'मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे काय?' ह्या विषयावर चर्चासत्रे आणि परिसंवाद झडत असतात आणि दुसरीकडे, रोजच्या व्यवहारांतले, सगळ्यांच्या परिचयाचे मराठी शब्द मुद्दाम टाळून इंग्रजी शब्द देवनागरींत लिहण्याचा पायंडा मुख्यप्रवाहांतल्या मराठी दैनिकांनी [आणि वाहेन्यांनी] पाडायचा याला माझा विरोध आहे. अशा प्रकारे आपण मराठी भाषा समृद्ध करतो आहोत का? मराठीचा वापर वाढण्यास मदत करतो आहोत का? याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.
खूप वर्षांपूर्वी मराठींतून क्रिकेटचे धावते वर्णन देण्याचा प्रयोग पुणे आणि नन्तर मुंबई आकाशवाणीने केला होता. त्यामूळे कितीतरी नवे आणि सोपे मराठी प्रतिशब्द प्रचारांत आले. उदा. शतक [century], अर्धशतक[half-century], चौकार [boundary], षट्कार[sixer], अवांतर[extra], पायचीत[LBW], यष्टीरक्षक[wicket-keeper], गोलंदाज[bowler], फलंदाज[batsman], धावचीत[run out] , बळी [wicket], नाणेफेक [toss], सामनावीर [man of the match].... इ.इ. पण हल्ली वाहिन्यांवर क्रिकेटच्या बातम्या देताना प्रयत्नपूर्वक असले मराठी शब्द टाळले जातात आणि "धोनीने टॉस जिंकून बॅटींग घेतली. सेहवागची सेंचुरी थोडक्यात चुकली पण त्याने बारा बॉउन्डरिज आणि चार सिक्सर्स मारल्या नंतर तीन विकेटसही घेतल्या त्यामुळे तो आजचा मॅन ऑफ द मॅच ठरला" असली मराठी ऐकवली जाते. का रे बाबांनो? तुमच्या असल्या धेडगुजरीपणामुळे मराठी भाषा समृद्ध होणार आहे का आणि तुम्ही असली इंग्रजाळलेली भाषा वापरली नाही तर तुमचा टी. आर. पी. घसरणार आहे का? हा शुद्ध आचरटपणा नाहीतर काय आहे?
'भाग्य आमचे, आम्ही मराठी बोलतो' असे सुरेश भट म्हणून गेले. आता म्हणावेसे वाटते, 'दुर्भाग्य आमचे , आम्ही करंटे म.टा. -लोकसत्ता वाचतो, आणि झी मराठी पाहतो'
बापू करन्दिकर

वा बापू, अगदी "लढ बाप्पू" असं म्हणावंसं वाटलं. लोकसत्ता ची भाषा हा तर एक संतापाचाच विषय आहे.अत्यंत प्रदुषित आणि धेडगुजरी भाषा असते. "त्यांनी इतिहास रचला, त्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले, खूप सारे लोक होते....".अरे काये, श्शी! अत्यंत घाणेरडी भाषा.आणि वर पुन्हा य प्रमाणात गफलती. कधी बातमी अर्धवटच सोडून देतील तर कधी भलताच मथळा छापतील. एकदा त्यांनी अडवाणींच्या सभेचा वृत्तांत देताना मथळ्याच्या जागी वाजपेयींचे उद्गार छापले होते, जे प्रत्यक्षात अडवाणींचे होते, आणि वाजपेयी त्या सभेला नव्हतेच!
एक प्रशान्त कुलकर्णींची भेदक अर्कचित्रं आणि अच्युत पालवांचं सुलेखन असलेले लेखांचे मथळे, निलेश जाधवांची चित्रं, रविवारचं लोकमुद्रा चं पान असे मोजके अपवाद सोडल्यास लोकसत्ता म्हणजे सगळा आनंदी आनंद आहे, जाहिरातीसाठी स्वतःचं पहिलं पान ही विकणारं बाजारू वर्तमानपत्र!

"तुमच्या असल्या धेडगुजरीपणामुळे मराठी भाषा समृद्ध होणार आहे का आणि तुम्ही असली इंग्रजाळलेली भाषा वापरली नाही तर तुमचा टी. आर. पी. घसरणार आहे का? हा शुद्ध आचरटपणा नाहीतर काय आहे?"

अनुमोदन.

बापू,

तुमचा राग बरोबर आहे हो. पण योगचे काही मुद्दे पटण्यासारखे आहेत. त्यामुळे "तुमचा टी आर पी घसरणार आहे का?" या तुमच्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने "हो" असे आहे असे मला वाटते. वर्तमानपत्रांनी भाषा समृध्द करायचा ठेका थोडीच घेतला आहे? शेवटी तो ही एक धंदा (business) आहे. नफ्याचे गणित त्यांना जुळवावेच लागणार.

भाषा टिकून वगैरे होण्यासाठी त्या भाषेचा वाचकवर्ग वाढला पाहिजे, आणि त्यासाठी त्याभाषेतून शिक्षण झाले असले पाहिजे. आजकाल सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मला भलेही माझ्या मुलांना मराठी शाळेत घालायची इच्छा असेल हो, पण त्या शाळांमधल्या शिक्षकांची (ऐकीव) परिस्थिती पाहता मी घालणार नाही. लहानपणापासूनच जर इंग्रजी भाषेत शिक्षण झालं असेल तर ती मुलं पुढे मराठी वर्तमानपत्र तरी का वाचतील? आणि उरलेली मुलं जी मराठी शाळेत शिकलेली असतील ती मराठी वर्तमानपत्र वाचतील, पण त्यांनाही बिचार्‍यांना इंग्रजीमय झालेल्या समाजात वावरायचे आहे, तेव्हा त्यांनाही अशीच मिंग्रजी आवडणार. कारण उद्या तो एखाद्यासमोर म्हणायचा की "सचिनने काय चौकार मारला.. " तर इतर त्याला वेड्यात काढतील आणि म्हणतील "ओह.. यु मीन बौंडरी मारली" ..

मी इथे युनिव्हर्सिटीत शिकायला होतो तेव्हा तिथे माझी एक मराठी मैत्रीण मला म्हणाली की तिला जर मराठी वर्तमानपत्र वाचायला दिले तर तिला एक-एक शब्द वाचून वाक्य पूर्ण वाचायला खूप कष्ट पडतात! म्हणून ती मराठी कधीच वाचत नाही. याचे कारण मला एकच वाटते -ते म्हणजे इंग्रजी भाषेतून झालेले शिक्षण. याला अपवाद नक्की आहेत, पण बहुसंख्य लोक असेच असणार. माझ्या माहितीतले सर्व इंग्रजी माध्यमातून शिकलेले लोक मराठी वाचताना मी कधीही पाहिलेले नाहीत.

त्यामुळे वर्तमानपत्रांना शिव्या देऊन काही उपयोग नाही. त्यापेक्षा मराठी भाषेतील शब्दांची उत्पत्ती आणि अर्थ सांगणार्‍या, चांगल्या मराठी पुस्तकातील काही उतारे देणार्‍या (जसे मायबोलीवर चिनूक्सने सुरू केले आहे) पुरवण्या वर्तमानपत्रांनी सुरू कराव्यात. त्याने कदाचित काहीतरी फायदा होईल.

मराठी शाळा सुधारल्या पाहिजेत. चांगल्या (मध्यमवर्गीय) लोकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालता येण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आता शाळा सुधारूनही उपयोग होईल असे नाहीच. आजकाल पुष्कळ लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्राबाहेर राहतात. त्यांना कुठे तिथे मराठी शाळा मिळणार?
बहुभाषिक देश असणे आणि त्या सगळ्या भाषा टिकून राहणे म्हणजे एकंदरीत अवघडच आहे.

करंदीकर,
आता मात्र तुम्ही हा विषय मराठी भाषेचा प्रचार्/प्रसार या मार्गाने नेत आहात.. "शिळ्या कढीला ऊत" कारण यावर चर्चा वाद संवाद सर्व काही (साक्षी झक्की) इथे अनेकवेळा झाले आहे.
वैयक्तीक तुमचा लोकसत्तावरचा राग समजून घेता येईल पण त्यावरून थेट भाषा समृद्धी वगैरे म्हणजे अतीशयोक्ती होते आहे. तुमच्या मूळ लेखातील हे शेवटचं वाक्य केवळ एकांगी अन नकारात्मक आहे:
>>का हताशपणे, 'जे जे होईल ते ते पहात रहावे' असे म्हणत स्वस्थ बसायचे? माझ्यापुरते तरी मी ठरवले आहे की एक ग्राहक म्हणून का होईना, मी लोकसत्ता खरेदी करायचे थांबवू शकतो.

इतके वर्ष त्यांन्नी मराठीतूनच चालवले ना वृतपत्र? त्याचं श्रेय नाकारता येणार नाही. आणि त्यांन्नाही समिक्षक, तपासनीस म्हणून उत्कृष्ट मराठी शिकलेले अन तरिही कमी पगारावर काम करायला तयार असलेले लोक मिळत असतील कशावरून? तेव्हा मला वाटतं वरकरणी फक्त भाषा शुध्दलेखन अन वापर असा सोपा प्रश्ण दिसत असला तरी त्याला बरेच ईतर कंगोरे आहेत, ज्याकडे एक सुजाण वाचक म्हणून आपण लक्ष द्यायला हवे. शिवाय मराठी भाषेची सम्रुध्धी हा कुठल्याही वृत्तपत्राचा "अजेंडा" असल्याचं माझ्या तरी वाचनात नाही. खुद्द इथे मायबोलीचाही नाही (आश्चर्य?)!

आणि एकीकडे मराठी भाषेत आलेले "ईतर" भाषांतील असंख्य शब्द तुम्ही मान्य करता तर मग आजच्या काळात सर्रास वापरले जाणारे काही बोलीशब्द का नाही मान्य करू शकत? या ईतर भाषांतून घेतलेल्या शब्दाने मराठी लोप पावली नाही तर आत्तच असं काय मोठ आभाळ कोसळणार आहे?
आग्रह धरावा.. त्यासाठी दबावही आणावा.. पण केवळ ते एक कारण देवून वृत्तपत्र (आज लोकसत्ता उद्या दुसरा कुठला तरी?) विकत घेणे बंद करणे म्हणजे गळू झालं म्हणून तो अवयव काढून टाकण्यासारखे आहे.
आणि मुळात क्रीकेट (चेंडू फळी ?) सामन्यांचं धावतं समालोचन (वि. वि. करमरकर) हा मराठी भाषिकांसाठी एक अभिनव, सुंदर प्रयोग होता, त्यातून मराठी काही फार सम्रुध्ध वगैरे झाली असे मला तरी वाटत नाही. किमान महाराष्ट्रात तरी किमान मराठी लोकांन्नी फक्त मराठीच बोलले तरी मराठी जतनास (सम्रुद्धी पुढची पायरी आहे) मदत होईल. बाकी मराठी माणूस आहे तोवर हा मराठीचा वादही कायमच राहणार......
एक वाचक म्हणून तुम्हाला ईतर पर्याय (दुसरी वृत्तपत्रे) खुले आहेत याबद्दल दूमत नाही. कंटेट भिकार आहे म्हणून टाकाऊ हे पटण्यासारखे आहे पण केवळ भाषेची सरमिसळ (जो तुमच्या मूळ पोस्टचा रोख आहे) म्हणून टाकाऊ म्हणणे हे काही पटत नाही. .
असो.

दुर्दॅव, दुसरं काय! खर सांगायचं तर, भाषा हा विषय, अभ्यासक्रमात नाइलाजाने शिकवल्यासारखा, शिकवला जातोय. इंग्रजीत शिक्षण झालं म्हणून ती भाषा तरी नीट येइल, तर, तसेही नाही. बारा वर्षे मातृभाषा शिकुनही चार चांगल्या लेखक- कविंची ओळख होत नाही. आज किती टक्के विद्यार्थी (आणि त्यांचे पालकही) बरं काही वाचतात?
मार्कांच्या शर्यतीत, चांगलं साहीत्य वाचनाचा आनंद मुलांनी घ्यावा म्हणून कुठली शाळा प्रयत्न करतेय?
सात आठ वर्ष भाषा विषय म्हणून आणि नंतर आयुष्यभर एक माध्यम म्हणून वापरली जाणारी इंग्रजीही अशीच दुर्लक्षीत आहे. इतकं सारं लिहीलय आणि लिहीतायत, पण ते वाचायच कसं आणि कशासाठी तेच माहीत नाही. नुस्तं अनुकरणानं वेडेवाकडे उच्चार करत तरतरीत पणे बोलणं वागणं हेच इतीकर्तव्य!
लोकसत्ता काय, विकलं जातय तेच देतायत.
आनंद आहे,
नशीब एवढच की मायबोली आहे!

चला, म्हणजे वर्तमानपत्रे म्हणजे धंदा. मग कथा, कादंबर्‍या, कविता इ. लेखनहि 'धंदा' च का? कारण त्यांनाहि पैसे हवेच. असो. नाहीतरी सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयंते. तर काही करून पैसा मिळवावा. मग कॅलिफोर्नियातील मुलांना मराठी पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून २५ लाख रु. देणगी द्यावी. नि मग म्हणावे, मराठि इज अवर मदरटंग ओन्ली! (मातृभाषा) च चा अनुवाद ओन्ली! एकदम कोकाटे इंग्रजी!! आम्ही हेल्प करतो ना मराठी स्प्रेड करायला!

आनंदी आनंद गडे! थोडक्यात काही गरज नाही मराठीत मराठी शब्द ठेवायला. इंग्रजीच आता आपली भाषा. हे आमचे चाळीस वर्षापूर्वीच झाले. नंतर लक्षात आले, नाही, आपली मराठी. ज्ञानेश्वर, चिपळूणकर, पु. लं, अत्रे, मायबोली! म्हणून परत मराठीकडे. तर ती फार बदलली.

असो. बाकीचे काही का करेना. मला दु:ख होते म्हणून मी लिहीले. इतरांना माझ्यासारखेच वाटले पाहिजे असा आग्रह नाही.

वा झक्कि ! कसे बोललात!!
बापू करन्दिकर

१२ एप्रिल च्या अन्कात लोकसत्त्ता ने काय छापले आहे बघा .............
मी प्रविण महाजन बोलतोय
हे आत्मचरित्र नाही. माझे बचावपत्रही नाही. माझी कैफियत नाही, त्याच.. प्रमाणे माझ्याबद्दल करुणा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्नही नाही. मग हे लहानसे पुस्तक कशाबद्दल आहे?
ही माझी ‘स्मृती-छायाचित्रे’ आहेत. म्हटले तर एक कौटुंबिक छायाचित्रांचा अल्बम आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, परिचितांना असा अल्बम दाखवतो. कौतुकाने आणि उत्साहाने. परंतु माझा हा अल्बम तसा कौतुकाने दाखविण्यासारखा नाही. अभिमान वाटण्यासारखा खचितच नाही.
ही स्मृतीचित्रे पाहून, म्हणजे आठवून, मला यातना होतात. मन उदास होते. अगोदरच तुरुंगात भेडसावणाऱ्या एकटेपणाला या आठवणींनी अधिकच मन:क्षोभाच्या ऊष्ण कोठडीत ढकलले जाते; पण या सर्व स्मृती पुन: पुन्हा एखाद्या डॉक्युमेण्टरी फिल्मप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून जात असतात.
तुरुंगात माझ्या लहान खोलीत टेलिव्हिजन नाही. मन गुंतवण्याचे वा रिझवण्याचे साधन नाही.

वर्तमानपत्र मिळतात, पण ती वाचून झाली, की पुन्हा माझा मनातला ‘डॉक्युमेण्टरी चॅनल’ सुरू होतो. कित्येकदा रात्र-रात्र झोप लागत नाही आणि या मनाने टिपलेल्या ‘डॉक्यु-मेमरीज्’ डोळ्यासमोरून जात नाहीत. या अल्बममधील प्रत्येक स्मृतीचित्र सत्य आहे. वृत्तपत्रांमध्ये किंवा संगणकावर जसे चित्रांचे ‘कट-रिअ‍ॅरेन्ज-पेस्ट’ करता येते तसे मला शक्य नाही. करताही येत नाही. मला माझ्या मनातली ही ‘डॉक्यु-पिक्चर्स’ फॉरवर्ड करून कुणाला पाठविता आली असती; पण तसे तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेले नाही! त्यामुळे माझ्यापुढे एकच पर्याय होता. तो म्हणजे त्या स्मृतींचे शब्दांकन करणे. येत्या २२ एप्रिलला प्रमोदवर झालेल्या खुनी हल्ल्याला तीन वर्षे पूर्ण होतील.
त्या खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी म्हणून मी तुरुंगात ही तीन वर्षे काढली आहेत. खालच्या कोर्टाने मला जन्मठेपेची शिक्षाही ठोठावली आहे; परंतु प्रत्यक्षात काय घडले, कसे घडले आणि कुणी काय केले हे पूर्णपणे व स्पष्टपणे कधी लोकांसमोर येणार नाही. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, टी. व्ही.च्या वृत्तवाहिन्यांवर दिसलेली चित्रे, माझे व माझ्या वकिलांचे न्यायालयातील निवेदन इतकाच ‘डेटाबेस’ लोकांकडे आहे.
मला जवळून ओळखणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. त्यात संघपरिवारातल्या, तसेच भारतीय जनता पक्षातल्या अनेक कायकर्त्यांचा आणि नेत्यांचा समावेश आहे. माझे बरेच पत्रकार मित्रही आहेत. या व्यतिरिक्तही मला अनेकजण ओळखतात. त्यांच्यापैकी कुणीही मी ‘खुनी प्रवृत्ती’चा माणूस आहे, असे म्हणणार नाही. माझ्या आयुष्यात मी कोणताही गुन्हा केल्याची पूर्वीची नोंद नाही, असणे शक्यच नाही याची खात्री मला ओळखणारेच देतील. माझ्या तीन वर्षांच्या कारावासात, पोलिसांना व तुरुंग कर्मचाऱ्यांना माझ्यात कोणतीही विकृती आढळलेली नाही. मी कधी ‘हिंस्र’ झाल्याचे त्यांना दिसलेले नाही. तुरुंगातले वातावरण मनाची शांतता विस्कटवणारे असते. एकटेपणाने चित्त उद्विग्न झालेले असते. अनेकदा त्या अस्वस्थतेतून मन प्रक्षुब्ध होते. पण मन काबूत ठेवावे लागते. ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ असे मनाचे श्लोक पाठ असलेल्या मला ते अचपळ मन आवरावेच लागते. मी मनाचे नियमन कसे केले, याचे साक्षीदार तुरुंगाचे अधिकारी तर आहेतच; पण इतरही ‘सहकारी’ आहेत.
या कारावासात मी बरेच काही शिकलो. केवळ मनावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र नव्हे, तर स्वत:शी प्रामाणिक राहिल्याने माणूस आपली चित्तशुद्धी कशी करू शकतो, हेही मला समजते. काही वाचकांना माझे हे निवेदन शहाजोगपणाचे वाटेल, काहींना राजकीय चलाखीचे वाटेल, तर काहींना मी माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण करू पाहतो आहे, असेही वाटेल; परंतु तसे काहीही करण्याची मानसिक, कौटुंबिक आणि राजकीय गरज मला नाही.
माझ्यावर ‘खुनी माणूस’ म्हणून शिक्का मारला गेला आहे. माझे कौटुंबिक जीवन अस्ताव्यस्त करून टाकले गेले आहे. सर्व कैद्यांना मिळणारा ‘पॅरोल’चा हक्कही मला दिला गेलेला नाही. माझ्याच बायकोला वा मुलांना भेटणे हे मुश्कील झाले आहे. मोकळेपणाने गप्पा-गोष्टी करणे हा माझा आवडता छंद. तोही माझ्यापासून हिरावला गेला आहे. मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. आमदार, खासदार व्हायची इच्छा नाही. असती तरी आता ती पूर्ण होणे शक्य नाही, त्यामुळे खोटे-नाटे, निंदा-नालस्ती करणारे ‘राजकारण’ करणारे लेखन करून मी काही साध्य करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
प्रविण महाजन यांचे ‘माझा अल्बम’ हे पुस्तक
लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील हा काही अंश..

आर्थर रोडच्या कारागृहात येण्याअगोदर तब्बल १२ दिवस मी पोलिसांच्या ताब्यात होतो. त्या दरम्यान अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी माझी जबानी घेत. मी त्यांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देत असे. माझा शांतपणा पाहून ते थक्क होत. त्यांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते.
कारण २२ एप्रिल २००६ नंतरचे सुमारे १५ दिवस देशभर वृत्तपत्रांमध्ये आणि टी. व्ही. चॅनेल्सवरती फक्त प्रमोदच्या खुनाचीच चर्चा होती. प्रमोदच्या जाण्याने भाजपचे किती नुकसान होईल याची गणिते मांडली जात होती. बडय़ा उद्योगपतींकडून कोटय़वधी रुपयांचा निधी जमा करण्याची हातोटी असणारा प्रमोद, तुफानी दौरे काढून भाषणांचे फड लावणारा प्रमोद आणि कधी अटलबिहारी वाजपेयींच्या तर कधी लालकृष्ण अडवाणींच्या विश्वासातला म्हणून ओळखला जाणारा प्रमोद- पक्षाचा एक आधारस्तंभ होता हे खरेच; परंतु ते त्याचे बाह्यरूप होते. पत्रकारांना तेच रूप माहीत होते. दिल्लीच्या आणि काही मुंबईच्या पत्रकारांना प्रमोदची (पंतप्रधान व्हायची) महत्त्वाकांक्षा माहीत होती. त्याचप्रमाणे प्रमोदच्या चारित्र्याविषयी संघपरिवारात असलेल्या गंभीर तक्रारीही पत्रकारांच्या कानावर होत्या. पैसे, बायका आणि सत्तेची त्याला चढू लागलेली धुंदी पत्रकारांच्या कानावर येत असे, ती भाजपच्याच अनेक नेत्यांकडून, वा या भानगडींना ‘सांभाळून’ घेणाऱ्या कार्यकर्त्यांकडून. प्रमोदची पक्षकार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षकचेरीतील कर्मचाऱ्यांमध्ये एक दहशत होती. कोणताही कर्मचारी वा कार्यकर्ता, केव्हाही त्या पदावरून हटवला जाऊ शकतो आणि प्रमोद त्याला शब्दश: देशोधडीला लावू शकतो, अशी ताकद त्याच्याकडे होती हे त्यानेच हुशारीने प्रसृत केले होते.
अनेक पत्रकारांचे, अगदी वार्ताहरांपासून ते संपादकांपर्यंत आणि तरुण, देखण्या स्मार्ट महिला पत्रकारांपासून ते उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांपर्यंत प्रमोदने स्वत:चे एक वर्तुळ निर्माण केले होते. त्या वर्तुळाचा दबाव अगदी वाजपेयी-अडवाणी यांच्यापासून ते मुरली मनोहर जोशी- राजनाथसिंह यांच्यापर्यंत सर्वाना जाणवत असे. त्या दबावामुळेच प्रमोदची अरेरावी आणि त्याचा बेबंद बाहेरख्यालीपणा खपून जात असे. अर्थातच प्रमोदकडे अचाट कार्यशक्ती होती. त्याचा आवाका मोठा होता. त्याचे इस्रायली दूतावासापासून ते अमेरिकन दूतावासापर्यंत अनेक अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्याचा ‘सचिव-सहकारी’ विवेक मैत्रा वा प्रमोद स्वत: इस्राएल, इंग्लंड, अमेरिका या देशांचे सहज दौरे करीत असत. प्रमोदच्या या दौऱ्यांमध्ये तो नक्की काय करीत असे त्याबद्दल पक्षात गूढ होते. या दौऱ्यात त्याच्या बायकोऐवजी दुसरीच कुणी तरुणी त्याच्याबरोबर गेल्याच्या कुजबुजी पक्षात चालत. माझ्याही कानावर येत; परंतु प्रमोदच्या यशाबद्दल मत्सर वाटल्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी या अफवा पसरवीत असे मला वाटे; परंतु हळूहळू परदेशातच नव्हे तर इथल्याच पंचतारांकित हॉटेलांमध्ये वा ‘१२०१ पूर्णा’ या वरळीतील फ्लॅटमध्येही अशा फॅशनेबल, श्रीमंत ललनांचा वावर वाढल्याचे बोलले जाऊ लागले.
प्रमोदचे मंत्रीपद जायला जी अनेक कारणे आहेत वा असतील त्यात या बाहेरख्यालीपणाचेही कारण होते. सुरुवातीला म्हणजे अशा ‘गॉसिप’ कानावर येण्यापूर्वी आम्हा सर्वानाच प्रमोदच्या कर्तबगारीचा गर्व वाटत असे; परंतु या ‘गॉसिप्स’चा गुंता वाढून जसजसा कर्कश्श होऊ लागला, तसतसे त्याचे मंत्रीपद व पक्षातील स्थान धोक्यात येऊ लागले. पंतप्रधान होणे दूरच राहो, त्याला मंत्रिमंडळातही कनिष्ठपद आणि कमी अधिकार दिले जाऊ लागले. या गोष्टींमुळे तो चिडचिडत असे आणि जोपर्यंत आपण पक्षाला निधी पुरवितो, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ‘नेटवर्क’ करून देतो, विरोधी व इतर पक्षांमध्येही सर्वोच्च पक्षनेत्यांना- शरद पवार ते जयललिता ते बाळासाहेब ठाकरे- यांना ‘विश्वासात’ आणतो, तोपर्यंत आपल्या व्यक्तिगत चारित्र्याची कुणी चौकशीही करू नये, असे तो जाहीर सांगत असे.
प्रमोदचा अगदी लहानपणापासूनचा प्रवास कुतूहलाने व कौतुकाने आम्ही सर्वानीच पाहिला होता. अंबेजोगाईसारख्या गावातून सुरुवात करून दिल्लीच्या ‘तख्ता’च्या जवळपास जाणाऱ्या व्यक्तीकडे काहीतरी विशेष असणारच. नाहीतर लग्न झाल्याबरोबरही हनीमूनला जाण्याऐवजी संघाच्या शिबिराला जाणारा तरुण स्वयंसेवक इतक्या स्तरापर्यंत कसा पोहोचला असता? म्हणूनच पक्षातले स्पर्धक आणि प्रतिस्पर्धक प्रमोदच्या विरोधात डावपेच करीत असत.
परंतु त्या डावपेचांना प्रमोदच, अनेक भानगडी करून, खतपाणी घालत असे. जुन्या पिढीतील ज्येष्ठ व सर्वसंगपरित्याग करून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना सुरुवातीला प्रमोद हा एक ‘अ‍ॅसेट’ वा ‘हिरा’च वाटत होता; परंतु त्यांनाच पुढे वाटू लागले, की ज्याला आपण ‘हिरा’ समजत होतो तो वरून चमकत असला तरी आतून काळाकुट्ट आहे.
कुटुंबातूनच, खुद्द रेखावहिनींकडून आणि अगदी निकटच्या मित्रमंडळींकडून मुरली मनोहर जोशी, अडवाणी आणि वाजपेयी यांच्यापर्यंत प्रमोदच्या ‘बदफैली जीवनशैली’च्या तक्रारी जाऊ लागल्या होत्या. जो वेगाने वर जातो तो तितक्याच वेगाने खाली येतो, असे म्हणतात, तसेच होऊ लागले होते. जेव्हा हे मी शांतपणे माझी जबानी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत असे तेव्हा त्यांना कमालीचे आश्चर्य वाटत असे. हळूहळू माझ्या ‘इन कॅमेरा’ जबानीतील तुटक-फुटक निवेदन बाहेर पसरू लागले होते. निदान तसे मला जाणवत असे; परंतु तसे अर्धवट व संदर्भशून्य पद्धतीने माझे निवेदन पसरल्यामुळे माझ्याबद्दल अगोदरच निर्माण झालेले गैरसमज वाढण्याची शक्यता होती. ती शक्यता दूर व्हावी आणि मला काय वाटते, काय आठवते, कसे दिसते ते थेट ‘माझ्याच शब्दचित्र-अल्बम’मधून लोकांसमोर यावे म्हणून मी लिहायचे ठरविले.
आर्थर रोड तुरुंगात अनेक रात्री व दिवस मी त्याबद्दल विचार केला आणि प्रामाणिकपणे शब्दांकन करायचे ठरविले. मला कोठडीत पोलिसांनी कोणताही त्रास दिला नाही. आता तर मी १० वी- १२ वीच्या मुलांना शिकविण्याचे काम करतो. इतर कैद्यांबरोबर गप्पा मारतो, चर्चा करतो, वर्तमानपत्रे वाचून बातमीमागील घटनांचा उलगडा करून सांगतो आणि वेळ घालवितो.
परंतु जन्मठेपेचा पूर्ण काळ म्हणजे मला आणखी १५-२० वर्षे अशीच एकटेपणाने काढावी लागणार आहेत. मग आपल्या जीवनातील काही ठळक प्रसंग शब्दांकित का करू नयेत, असे मला वाटते.
ज्या वेळी ‘इन-कॅमेरा’ जवाब प्रसिद्ध होईल त्या वेळी उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे.
माझ्यावरील खटल्याच्या निकालानंतर सरकारी वकिलांनी काही वृत्तपत्रांत असे निवेदन दिले, की प्रवीणचा ‘इन-कॅमेरा’ जवाब लोकांपुढे आला तर तो किती विकृत आहे हे लोकांपुढे येईल व लोक त्याचा तिरस्कार करतील.
खरंतर ‘इन कॅमेरा’ची विनंती ही सरकारी पक्षाची हे ते विसरतात. हे पुस्तक माझ्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले प्रामाणिक विवेचन आहे. हे वाचल्यावर विकृत कोण हे मी लोकांच्यावर सोडतो. या लिखाणात काहीही लपवायचा प्रश्नच येत नाही. घरातील सर्वाना हे सर्व माहीत आहे.
मी फक्त इतकेच म्हणू शकतो, की मी आपल्यासमोर ठेवलेला हा स्मृतीचित्रांचा अल्बम शंभर टक्के सच्चा आहे, सद्सद्विवेकबुद्धीला साक्ष ठेवून शब्दबद्ध केलेला आहे आणि त्यातून माझे मन मोकळे करण्यापलीकडे दुसरा कोणताही हेतू नाही.
अर्थातच हा अल्बम पाहून भाजप व संघ परिवारातले अनेक जण माझ्यावर खवळतील. आपल्या कौटुंबिक जीवनातल्या खासगी गोष्टी जगासमोर मांडायची काय गरज होती, असेही विचारतील. त्यांना मी फक्त इतकेच सांगू इच्छितो, की प्रमोद महाजन ही व्यक्ती फक्त कौटुंबिक सीमांपुरती मर्यादित नव्हती. प्रमोदच्या सार्वजनिक- राजकीय- संघीय जीवनामुळे त्याला खासगी जीवन उरलेच नव्हते. त्याचप्रमाणे त्याला खासगी वा ‘गुप्त’ वाटणाऱ्या कित्येक गोष्टी (वा भानगडी) त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या बहुतेकांना माहीतच होत्या. प्रमोदचा जसा अनेकांनी ‘फायदा’ उठविला असेल, तसाच प्रमोदही आपल्या अनेक सहकाऱ्यांना स्वत:साठी ‘जुंपत’ होताच. म्हणजेच त्याचे जीवन तसे खासगी नव्हतेच; पण ते सर्वासमोर आले नव्हते इतकेच. माझ्या या स्मृतिचित्रांमुळे महाजन कुटुंबाची शब्द छायाचित्रे आता सर्वानाच उपलब्ध होतील!
तसं आमचं कुटुंब काही श्रीमंत वा सुखवस्तूही नव्हे. जातीने ब्राह्मण असूनही पुण्या-मुंबईची प्रतिष्ठा ‘महाजन’ कुटुंबाकडे नव्हती. अगदी भुकेकंगाल नाही पण तशी गरिबीच. संस्कार ब्राह्मणी पण संकुचित अर्थाने नाही. परिसर मराठवाडय़ाचा, पण त्यातही औरंगाबादसारख्या शहराचा नाही.
माझा जन्म आणि संयुक्त महाराष्ट्राचा जन्म यात फारसे अंतर नाही. प्रमोदचा जन्म आणि ‘हैद्राबाद मुक्ती’ यात फारसे अंतर नाही. प्रमोदचे बालपण (पहिली १०-१२ वर्षे) हैद्राबाद संस्थानाच्या पण स्वतंत्र भारताच्या वातावरणात गेले. माझे बालपण भाषिक राज्य स्थापन झाल्यानंतरच्या काळात गेले. या बाबींचा आमच्या संस्कारांवर कदाचित अप्रत्यक्ष परिणाम झाला असेलही. हिंदुत्वाच्या विचाराचे आकर्षण आणि मराठीचा अभिमान या दोन्ही गोष्टी आमच्या राजकारणात आल्या, त्याची पाश्र्वभूमी आमच्या अंतर्मनात तेव्हा तयार झाली असेल वा नसेलही.
त्या वेळेस कुणा ज्योतिषाने आमच्या कुंडल्या पाहून आमचे भविष्य सांगितले असते तर गेल्या २० वर्षांत विशेषत: गेल्या तीन वर्षांत जे घडले, ते तो सांगू शकला असता का? प्रमोदचा कुंडल्या, पत्रिका, हस्तरेषा या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. तसा तो ‘कठोर बुद्धीप्रामाण्यवादी’ होता, असे म्हणता येईल.
त्या दोन शब्दांपैकी ‘कठोर’ हे विशेषण महत्त्वाचे, हे पुढे वारंवार निदर्शनास येत गेले. हिंदुत्व आणि तशा अंधश्रद्धा या धर्म-राष्ट्राच्या संकल्पनेत जोडता येणार नाहीत, असे मानणारा प्रमोद पुढे लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेचा मुख्य सारथी झाला, ही बाब तशी परस्परविरोधी वाटेल; पण ती तशी नाही. मात्र मला आताच त्याकडे वळायचे नाही ते ओघात येईलच.
तर माझे वडील एक सत्प्रवृत्त, शुद्ध चारित्र्याचे, कनिष्ठ मध्यमवर्गीय शिक्षक. आई तितकीच, साधी, काटकसरी, कुटुंबवत्सल. अशा पालकांना आपल्या मुला-मुलींबद्दल म्हणजे आमच्याबद्दल राजकीय महत्त्वाकांक्षा असणे शक्यच नव्हते. आज मात्र प्रमोदच्या हत्येनंतरसुद्धा, आमच्या कुटुंबाची महाराष्ट्राला ओळख आहे ती एक राजकीय ‘घराणे’ म्हणून. खरे तर तशी ‘घराणेशाही’ नसूनही; किंवा असलीच तर ती प्रमोदपासूनच सुरू होते. आता तर मी, प्रमोदची पत्नी रेखा, मुलगी- पूनम, मुलगा- राहुल, भाऊ- प्रकाश, मेव्हणे- गोपीनाथ मुंडे- आम्ही सर्वच जण एक राजकीय घराणे म्हणून ओळखले जातो. गेल्या काही वर्षांतील घटनांमुळे तर अतिशय वादग्रस्त- स्कॅण्डलग्रस्त घराणेसुद्धा!
सुमारे ५०-६० वर्षांतील हा प्रवास कसा झाला ही कहाणी जितकी हृदयद्रावक आहे तितकीच चित्तथरारक, जितकी कष्टाची आहे तितकीच नवसमृद्धीची, जितकी नैतिकतेची आहे तितकीच अनैतिकतेचीही.
तरीही मी वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे हे आत्मचरित्र वा आत्मकथन नाही किंवा महाजन कुटुंबाचा कुलवृत्तान्त नाही. या लहानशा पुस्तकात आहे आत्मचिंतन, गेल्या ३० वर्षांतील उलथापालथींचे कालक्रम मोडून केलेले स्मृतीचित्रण. माझा अल्बम.
तसा या छायाचित्रांचा- म्हणजे शब्द- छायाचित्रांचा क्रम कसा लावायचा हा प्रश्न माझ्यापुढे आहेच. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा असा अल्बम होऊ शकतो; परंतु नियती तरी काही जणांच्या जीवनात असे प्रसंगी आणते, की त्यांच्या प्रचंड गर्दीत काही प्रसंग अती-गडद होतात तर काही अती-फिकट होतात. काही अनुभव सतत मनासमोर तरळत राहतात तर काही चक्क विस्मृतीतही जातात.
आपल्या स्मृतींमधली माणसं आपल्याला जशी दिसतात वा भासतात तशीच ती अंतर्बाह्य असतात का या मानसशास्त्रीय वा तांत्रिक प्रश्नात मी पडू इच्छित नाही. मी फक्त स्वत:शी शंभर टक्के प्रामाणिक राहून मला जे सुस्पष्ट आठवते तेच या अल्बममध्ये ठेवले आहे. त्या आठवणी ठेवतानाचा क्रम आठवणींच्या कालक्रमानुसार नसला तरी त्यातील संगती वाचकांच्या ध्यानात येऊ शकेल.
अगदी प्रथम आमच्या कुटुंबाची- म्हणजे महाजन परिवाराची थोडक्यात ओळख करून देणे मला कर्तव्य वाटते. आमच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाबद्दल इतकी चर्चा, गावगप्पा आणि कुजबुज माझ्या कानी आली आहे, की त्यांच्या कितीतरी पटींनी जास्त प्रमाणात अशा गावगप्पा त्या लोकांमध्ये झिरपल्या असणार. त्या कुजबुज- गावगप्पांमुळे आमच्याबद्दल काही प्रतिमाही निर्माण झाल्या आहेत. माझी इच्छा इतकीच आहे, की ही पाने वाचताना तशा प्रतिमांचा कोणताही पूर्वग्रह वाचकांच्या मनात असू नये. मी वर म्हटल्याप्रमाणे मला करुणा वा सहानुभूतीची गरज नाही, पण त्याचबरोबर एक बदनाम, कृतघ्न आणि क्रूर माणूस अशीही माझी प्रतिमा असणे माझ्यावर अन्याय करणारे ठरेल.
माझे हे स्मृतीचित्रांचे निवेदन थोडक्यात असले तरी बरेच बोलके आहे. मुख्यत: अलीकडच्या, गेल्या २० वर्षांतल्या ठळक गोष्टींवर त्यात भर दिसला तरी त्याचे धागेदोरे थेट आमच्या कौटुंबिक जीवनात, लहानपणच्या आयुष्यात त्या वेळच्या संस्कारात पोहोचतात.
माझे, म्हणजेच आम्हा पाच भावंडांचे वडील- व्यंकटेश देविदास महाजन, म्हणजेच आमचे काका. त्यांचे मूळ गाव जरी उस्मानाबाद, तरी नोकरीच्या निमित्ताने त्यांची कर्मभूमी झाली अंबेजोगाई.
आज मराठवाडय़ाला, ‘मागासलेला’ विभाग म्हणून जरी पश्चिम महाराष्ट्रातले लोक ओळखत असले तरी आताचा मराठवाडा पूर्वीसारखा मागासलेला नाही. पूर्वी उस्मानाबाद, बीड, अंबेजोगाई- अगदी नांदेड, लातूरसुद्धा खरोखरच उजाड प्रदेश होते. रखरखीत उन्हाळा, एकूणच पाऊस कमी, विकासही कमीच आहे, हैद्राबाद संस्थानाने उपेक्षित ठेवल्यामुळे दरिद्रीसुद्धा.
अशा वातावरणात आणि मर्यादित उत्पन्नाच्या कौटुंबिक स्थितीत आम्हाला वडिलांची एकच मुख्य शिकवण होती- ती म्हणजे चारित्र्याची. ‘कॅरेक्टर’ शब्द फार पुढे वापरात आला. आपले सामाजिक- कौटुंबिक जीवन स्वच्छ व पारदर्शी (हा शब्दही नंतर रूढ झाला) असले पाहिजे हा वडिलांचा अलिखित संकेत.
आमचे काका विचाराने गांधी-नेहरूवादी. मराठवाडय़ात तेव्हा रामानंद तीर्थ यांचा प्रभाव होता. त्यामुळेच गांधीवाद आणि नेहरूंचा संस्कार आमच्या प्रदेशात आला. प्रमोद जेव्हा संघाच्या शाखेत जाऊ लागला, तेव्हा वडिलांना ते पसंत नसे. त्यावरून काका त्याला रागवीत असत. वडील (त्या काळातील बहुतेक इतर वडिलांनुसार) रागीट स्वभावाचे. प्रमोदला लहानपणापासूनच केवळ ‘ऐकून’ घ्यायची सवय नाही. त्यामुळे काकांचे व त्याचे भांडण होत असे. अगदी तिखट भांडण. मग आई प्रमोदची बाजू घेऊन मध्ये पडत असे. काकांचा स्वभाव कडक असला आणि त्यांचा धाक असला तरी त्यांचे मन फार मायाळू होते. निदान माझ्यावर तरी त्यांनी मायाच केली. शाळेपासूनच माझा मित्रपरिवार मोठा. मी बराच वेळ बाहेरच घालवीत असे. साहजिकच खूपदा मला उशीर होई. मी घरी आलो, की मला फोडून काढायला आई काठी घेऊनच बसलेली असे. तिचा जरा अधिक ओढा प्रमोदकडे होता. त्यामुळे प्रमोद उशिरा घरी आला तर ती त्याला मागील दाराने घरात घेत असे. काकांच्या रागीट स्वभावाचा आम्हा तिन्ही भावांवर मात्र एक प्रकारे चांगला संस्कार झाला, असेच म्हणावे लागेल. आम्ही तिघांनी आमच्या मुलांवर कधीही हात उगारला नाही. मला अजूनही जेव्हा आई व काकांची भांडणे आठवतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होते. बहुतेक वेळा त्यांच्या भांडणाचे कारण प्रमोदच्या वागण्यामुळेच असे. एक मात्र खरे, की काकांचा ठळक असा ठसा आमच्यावर आहे. निदान मला तरी तो सतत भासतो.
काका गेले तो दिवस मला अगदी स्पष्ट आठवतो. अक्षयतृतीया होती. २७ एप्रिल १९७१. त्याच्या अगोदर काही दिवस घरातले वातावरण तसे तंगच होते. आई व काकांचे कडाक्याचे भांडण झाले होते. काकांनी रागारागाने काचेचा ग्लास फेकला होता. त्याचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो. त्यानंतरच त्यांना हार्टचा त्रास झाला होता. त्यांना दवाखान्यात नेले, तिकडेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रमोद तेव्हा पुण्याला होता. जर्नालिझमचा कोर्स करण्यासाठी. माझे वय फक्त ११ वर्षांचे. त्या काळात फोन करणे वगैरेही कठीण असे. पण प्रमोदला कळविले गेले. प्रमोद लगेचच एसटी बस पकडून अंबेजोगाईला आला. मी घराच्या दारातच विमनस्कपणे उभा होतो. एक प्रकारची बधिरता मनाला आली होती. प्रमोद दिसताच माझे अवसान गळून पडले आणि मी त्याला अक्षरश: मिठीच मारली. ‘आपले काका गेले रे’ असे मी धसमसून त्याला सांगत होतो.
काकांची अंत्ययात्रा त्यानंतर उशिरा निघाली. प्रमोदही निर्विकार दिसत असला तरी मनातून चांगलाच हलला होता. पायात चप्पल न घालता तो पाच किलोमीटर दूर स्मशानापर्यंत चालत आला. (हे मला विशेषकरून आठवते. कारण प्रमोदच्या अंत्ययात्रेला मात्र, त्याचा मुलगा राहुल जीन पॅण्ट, ब्लॅक फॅशनेबल शूज घालून आला होता. खरोखरच काळ आणि माणसे बदलली आहेत.)
आपल्याकडे असे म्हणायची पद्धत आहे, की कुटुंबात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘रक्ताचे नाते’. ज्यातून जिव्हाळा तयार होतो; परंतु कुटुंबात, दोन वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्ती विवाहाने एकत्र येतात. त्यांची ‘रक्ताची’ नाती वेगवेगळ्या कुटुंबात असतात.
या सर्व एकत्र येण्यातच अनेक वेळा कुटुंब विघटनाची बीजेही असतात. मग ‘रक्ताची’ म्हणून ओळखली जाणारी जिव्हाळ्याची नातीही उसवली जाऊ लागतात. सर्व घरांमध्ये दिसणारी ही ‘घर घर की कहानी’ महाजन कुटुंबाच्या ‘मालिकेत’ही आली. ही गोष्ट अर्थातच दुर्दैवाची आणि सर्वानाच क्लेश देणारी आहे.
ही क्लेशकारी कहाणी नक्की केव्हा सुरू होते हे अजून मला उमगलेले नसले तरी ती साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होत नाही हे मात्र खरे. प्रमोद या कहाणीच्या केंद्रस्थानी असल्याने त्याच्या जीवनातील चढउतार आणि त्याचा स्वभाव यांनीच गेल्या ३० वर्षांतील उलथापालथी झाल्या.
ज्या प्रसंगात राजकारण, कुटुंबकारण आणि आमचे (म्हणजे मी व प्रमोदच्या कुटुंबीयांचे) परस्पर संबंध ठळकपणे येतात, त्याचप्रमाणे ज्या घटनांनी माझ्या मनावर कोरलेला व्रण अजूनही ताजा आहे, असे प्रसंग या अल्बममध्ये असणार हे उघड आहे. मला राजकारण वाचायची विलक्षण आवड आहे. राजकारण म्हणजे जाड-जूड ग्रंथ अशा अर्थाने म्हणत नाही, तर वर्तमानपत्र, नियतकालिकं, त्यातील बातम्या, लेख, अग्रलेख- अगदी व्यंगचित्र व छायाचित्रसुद्धा मी बारकाईने पाहतो-वाचतो. न्यूज चॅनल्स वरल्या बातम्या हाही छंदाचा भाग आहे. परंतु न्यूज चॅनल्स तसे अलीकडले.
१९८० ते १९९५ या काळात मुख्यत: वृत्तपत्रांतल्या बातम्या वाचणे, नीट व सविस्तरपणे वाचणे, विविध वार्ताहरांच्या व संपादकांच्या खुबी, तपशील, शैली, त्यांची मते, गैरसमज त्या शब्दांच्या द्वारे समजून घेणे हे एक माझे व्यसनच होते. म्हणूनच मी १९९० चा एक संदर्भ देऊन माझ्या अल्बमचे पहिले पान उलगडतो.
माझ्या आठवणीप्रमाणे १९९० चा नोव्हेंबर महिना. पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांचे सरकार आल्यापासूनच, म्हणजे डिसेंबर १९८९ पासून, तसे डळमळीतच होते. व्ही. पी. सिंग ‘हीरो’ झाले होते ते डाव्यांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यामुळे. अयोध्या व बोफोर्स या दोन जंजाळांमध्ये सापडून १९८९ च्या नोव्हेंबरमध्ये राजीव गांधींचे सरकार पडले होते. राजीव गांधींचा लोकप्रियतेचा महिमा ४०० हून अधिक जागांवरून एकदम २०० लोकसभेच्या जागांवर आला होता. भाजपच्या पाठिंब्यामुळे आपले सरकार आले व आपण पंतप्रधान झालो, इतपत कृतज्ञता व भान व्ही. पी. सिंग यांनी ठेवले नाही. त्यामुळेच त्यांनी जुलै-ऑगस्ट १९८९ मध्ये, म्हणजे सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आठ-नऊ महिन्यांनीच मंडल आयोगाचा अहवाल बाहेर काढला. तो अहवाल जनता पक्षाच्या राजवटीत, १९७९ साली तयार होऊन १० वर्षे बासनात पडून होता.
व्ही. पी. सिंग यांनी तो अहवाल आकस्मिकपणे अंमलबजावणीसाठी बाहेर काढल्यानंतर सर्वच पक्षांची गडबड उडाली. काँग्रेसपासून भाजपपर्यंत सर्वच जण भांबावून गेले. विरोध केला तर ओबीसींच्या भावना दुखावल्या जाणार आणि स्वीकारला तर समाजात पुन्हा जातीय विभाजनाला सुरुवात होणार. शिवाय विरोध केला तर ब्राह्मणवादाचा शिक्का बसणार.
भारतीय जनता पक्षातही गोंधळ उडाला होता; परंतु त्याच वेळेला भाजपला एक अनोखी संधी प्राप्त झाली. विश्व हिंदू परिषदेने आयोध्येला ‘त्याच जागी’ राममंदिर व्हावे म्हणून प्रचारासाठी एका रथयात्रेचे नियोजन केले होते. त्या रथयात्रेचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणींनी करायचे असे संघ व भाजपच्या धुरिणांनी ठरविले. १९८४-८५ च्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडून अवघ्या दोन जागा लोकसभेत निवडून आल्या होत्या. रथयात्रेच्या माध्यमातून हिंदू मतदार एकवटता येईल, असा राजकीय हिशेब त्या यात्रेमागे होता. यात्रा सुरू झाली ऑक्टोबर १९९० मध्ये आणि त्यामुळे देशातले वातावरण तापू लागले. वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून ‘हिंदू जनजागृतीचे नवे वारे कसे वाहत आहेत याची वर्णने प्रसिद्ध होऊ लागली. व्ही. पी. सिंग सरकार डळमळीत झाले होतेच आणि लालूप्रसाद यादव यांनी अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये अडवल्यावर भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. लालूंनी अडवाणींना अटक केल्यामुळे, तेही राममंदिराच्या मुद्दय़ावर, लालकृष्ण अडवाणी काही दिवसांतच ‘नॅशनल फोकस’ झाले. व्ही. पीं.चे सरकार पडले. लवकरच निवडणुका येणार, अशी चिन्हे दिसू लागली.
हा सर्व राजकीय पट अशासाठी रंगवला कारण रथयात्रेच्या नियोजन प्रक्रियेत प्रमोदने स्वत:ला झोकून दिले होते. मात्र राजकारण असे अटीतटीला आलेले असताना आणि रथयात्रा व मंडलवाद यामुळे देशात प्रक्षोभ झालेला असताना, प्रमोद त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मात्र ‘वेगळ्याच’ गोष्टींमध्ये व्यग्र होता- रममाण झालेला होता; परंतु या सर्व कथेला कधी आणि कशी सुरुवात होते?
जरी मी या महाजन-मालिकेला ‘घर घर की कहानी’ असे संबोधले असले तरी आमच्या घराच्या दुर्दैवी कहाणीला राजकारणाचा पाश्र्व-पडदा आहे. नाटकात वा हिंदी चित्रपटात नायक-खलनायक असा सरळ संघर्ष असेल तर ते समजायला सोपे असते. आमच्या कौटुंबिक- राजकीय कहाणीमधला प्रमोद हा ‘नायक’ होता आणि ‘खलनायक’ सुद्धा. काका गेल्यानंतर रेखावहिनींच्या मदतीने कुटुंब उभा करणारा तो एक आधारस्तंभ होता आणि सत्तेच्या राजकारणाची धुंद चढल्यावर तो आधारस्तंभच निराधार झाला होता. अखेर तो ‘निराधार-स्तंभ’ कोसळला आणि नाटकाचा तिसरा अंक सुरू झाला.
प्रमोदचे लग्न झाले १९७२ साली. तारीख ११ मार्च. पण तेव्हा विशी ओलांडलेला प्रमोद अतिशय उमदा आणि आदर्शवादी होता. इतका, की लग्नानंतर मधुचंद्रासाठी जायच्या ऐवजी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, नूतन मराठी विद्यालयात भरलेल्या वर्गात शिबिरार्थी म्हणून गेला होता.
अनेकांना ‘रोल मॉडेल’ वाटावा, अशी तडफ प्रमोदमध्ये होती. मी त्याच्यापेक्षा बराच लहान असल्यामुळे मला त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटत असे.
प्रमोद ‘रत्न’ असेल तर वसंतराव भागवत ‘रत्नपारखी’ होते. त्यांनी प्रमोदमधील गुण ओळखून त्याच्यावर मुलासारखे प्रेम केले. त्यांच्यामुळेच प्रमोदला १९८४ साली लोकसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी तिकीट मिळाले होते. त्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या त्या निवडणुकीत देशातील सहानुभूतीची लाट राजीव गांधींच्या बाजूने होती. त्या लाटेत भाजप वाहून गेला होता. भाजपची स्थापना होऊन फक्त चार वर्षे झाली होती. जनसंघाने, रा. स्व. संघाच्या सूचनेनुसार जनता पक्षात विसर्जन केल्याने, तो पक्ष आता नव्हताच. जनता पक्ष ‘दुहेरी निष्ठां’च्या मुद्दय़ावर फुटला आणि सर्व जनसंघवाले १९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षात आले होते. प्रमोद काही वेळा राजकारण सोडून द्यायची भाषाही करीत असे. तो एक चांगला शिक्षक, आणि वक्ता होता. आपण शिक्षण क्षेत्रात उतरावे, असेही त्याला वाटे. पण १९८४ साली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वसंतराव भागवतांच्या आशीर्वादाने त्याला १९८६ साली राज्यसभेवर पाठविले गेले.
परंतु आयुष्याच्या शेवटी भागवत प्रमोदविषयी फार दु:खी होते. पुढे तर भागवतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रमोद कडवटपणे म्हणत असे, हे सर्वश्रुत आहे.
प्रमोदला तसा मनातून कोणाविषयी आदर नव्हता. अडवाणींचे भाषण रटाळ असते, असे तो नेहमी म्हणत असे. संघाबद्दलचे त्याचे विचार मला धक्का देणारेच होते. २००४ च्या निवडणुकांच्या दरम्यान, एकदा तो मला म्हणाला होता, की जसे गणपती वर्षांतून एकदा दहा दिवस येतात तसाच संघाचा वापर निवडणुकांपुरताच करायचा असतो.
प्रमोद हा पुढेपुढे ‘फिक्सर’, ‘डबल डीलर’, कारस्थानी, विधिनिषेधशून्य आणि ‘नव्या’ राजकारण्यांमधील सर्वात यशस्वी राजकारणी होता! अमरसिंगप्रमाणे. त्याच्या या ‘सर्वगुणसंपन्नतेमुळे’ पवारांनी त्याला एकदा वाचविले होते, असे त्यानेच मला सांगितले. त्याची सुरस कहाणी अशी..
१९९८ मध्ये प्रमोदने राज्यसभेचा अर्ज दाखल केला तेव्हा तो पंतप्रधानांचा राजकीय सल्लागार होता. जे ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्याचा त्याने राजीनामा दिला नव्हता. राज्यसभेच्या जागा सहा व उमेदवार सात. पवारांनी एक दिवस आधी फोन करून त्याच्या लक्षात आणून दिले. प्रमोदने लगेच मागील तारीख घालून ‘बॅकडेटेड’ राजीनामा दिला. पवारांनी असे का केले? प्रमोद म्हणाला, की माझा अर्ज फेटाळला गेला असता तर कलमाडी बिनविरोध निवडून आला असता, म्हणून पवारांनी मला मदत करून कलमाडींना टांग दिली. पवार-मुंडे कलगीतुऱ्यात प्रमोद जाणीवपूर्वक दूर राहिला होता. मुंडेंनी पवारांवर १९९३ पासून जे आरोपसत्र सुरू केले होते याचा परिणाम प्रमोदने पवारांशी असलेल्या मैत्रीवर कसा होऊ दिला नाही, हे एक त्याच्या क्षमतेचे उघड उदाहरण होते. पवारांबरोबर हवाईदलाच्या विमानात दोन आरोपींनी (मुंबई बॉम्बब्लास्ट) प्रवास केला हे मुंडेंना संबधित वकिलांनी सांगितल्याचे प्रमोदनेच मला सांगितले होते.
१९९६ च्या शेवटास गाजलेल्या बरखा प्रकरणाच्या लावणी महोत्सवाचा बोलवता धनी कोण होता? अण्णा हजारे? पवार की प्रमोद का विवेक मैत्रा?
युतीच्या राजकारणात राज्यात प्रमोदसारख्या कार्यक्षम व्यक्तीला फार मोठय़ा संधीची दालने उघडली जातात. प्रमोदला पक्षात जेवढे शत्रू होते त्यापेक्षा जास्त मित्र त्याला पक्षाच्या बाहेर होते. अस्थिर राजकारणाचा फायदा शरद पवारांप्रमाणेच त्याने करून घेतला होता.
विशेषत: १९८९ ते २००४ या पंधरा वर्षांत प्रमोदने सहा सार्वत्रिक लोकसभा निवडणुका व चार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका व जवळजवळ डझनभर इतर राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षातर्फे प्रमुख भूमिका निभावल्या. निवडणुका म्हणजे निधी संकलन. त्या पैशातूनच तो त्याचे खासगी शौक पुरवित असे. त्याने पक्षाकडे कधीही सर्व सोर्सेसची माहिती दिली नाही आणि तशी कधीही ती द्यायची नसते हे तो मला आवर्जून सांगत असे!
१९८४ मध्ये लोकसभेला उभा असताना प्रमोद भाषणात ठणकावून सांगे : राजकारण माझ्यासाठी ‘मिशन’ आहे. ‘प्रोफेशन’ नाही. प्रमोदचे ‘मिशन’ कधी व का विस्कटले?
प्रमोदसारखा माणूस बदलतो, की त्याच्यातला दबलेला खरा माणूस यश येताच बाहेर येतो? याचा शोध घेण्यासाठी मला माझ्या जन्मठेपेचा उपयोग करायचा आहे. मी प्रमोदच्या आयुष्यात रेखा, पूनम, राहुल यांच्या आधीपासून आहे वा होतो. हे सर्व जण माझ्याविरुद्ध. मी तुरुंगात. बाहेर पत्नी व दोन मुलं जमेल त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आई- दोन बहिणी, भाऊ- रेखा यांना गेल्या वीस वर्षांत काय भयानक परिस्थितीला सर्वाना तोंड द्यावे लागले हे फारसे कुणाला माहीत नाही. पक्षातील काहींना माहीत आहे आणि काहींना अंदाज आहे.
आज रेखावहिनी कबुली देतील, की त्यांना घटस्फोट हवा होता? आणि अडवाणींकडे त्यांनी प्रमोदच्या बेबंद बाहेरख्यालीबद्दल तक्रार केली होती?
माझी बहीण बिन्नी. तिच्या वरळीच्या ‘१२०१ पूर्णा’ या घराचा प्रमोदच्या भानगडींसाठी कसा उपयोग झाला होता हे निदान परळीच्या वैजनाथापाशी तरी ती कबूल करील?
काय माझी आई हे कधी मान्य करील? की प्रमोदने तिच्यावरच हात उगारला होता आणि त्याबद्दल मी त्याला जाब विचारला होता?
काय हे मुंडे साहेबांना माहीत नाही? निदान दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर याचा पाठ मुंडेंनी निदान मनातल्या मनात वाचावा. काय राहुलने स्वत: १९९७ मध्ये श्वेताच्या स्वैराचारी वागण्याची तक्रार माझ्याकडे केली नव्हती?
काय पूनमने १९९२ मध्ये, ‘माझे बाबा’ (म्हणजे प्रमोद) दुसऱ्या कोणा बाईला बरोबर घेऊन युरोप-अमेरिकेला गेले आहेत म्हणून माझ्या गळ्यात पडून अश्रू ढाळले नव्हते? प्रकाश व प्रतिमा यांच्याविषयी काय बोलावे? त्यांच्यापेक्षा वेठबिगार बरे!
प्रमोदने सर्वाना खरेदी तरी केले होते किंवा त्याच्यावर दहशत बसविली होती. ती दहशत होती पैशाची, पक्षातील प्रतिष्ठेची, शरद पवारांपासून बाळासाहेब ठाकरेपर्यंत नेते मंडळी आपल्या बैठकीत आहेत यातून आलेल्या दर्पाची.

बापू, तुम्हाला १००% अनुमोदन. लोकसत्तानी 'व्हिवा' नावानी पुरवणी काढावी हे दुर्दैवी आहे.

>>लोकसत्ताच काय, बहुधा एक सकाळ सोडला तर बहुतेक वृत्तपत्रान्ची भाषा भयंकर बिघडलेली आहे>> लिंबुटिंबू, जागू - सकाळ मधलीही मराठी भाषा अजिबात चांगली राहिली नाही आता.
मधे एकदा एका अपघाताच्या बातमीमधे कोणीतरी मुलाला शाळेत 'सोडवायला' निघाले असताना त्यांना 'बाईकने' उडवले असे वाचले होते. एखाद्या माणसाच्या (कलाकाराच्या किंवा खेळाडूच्या) तोंडची वाक्य लिहिताना "मी अमूक अमूक 'करेल' असं तो म्हणाला" असंच हल्ली लिहिलेलं दिसतं. बातम्यांचे मथळे तर वाचून तर संध्यानंद वाचतोय कि काय असं वाटतं. मी तर सकाळ वाचणंही सोडलय आता.

तीन वर्षांपूर्वीचा बाफ तुम्हाला कसा काय सापडला बुवा?
असो. तरीही वाचायला आवडला.
बाकी काय बोलावे? या लेखाच्या निमित्ताने ती महाजनांची पोस्ट वाचायला मिळाली. आता अल्बम मिळवून वाचणे आले.. झाला आहे का प्रसिद्ध?

या लेखाच्या निमित्ताने ती महाजनांची पोस्ट वाचायला मिळाली. आता अल्बम मिळवून वाचणे आले.. झाला आहे का प्रसिद्ध?>>.

प्रसिध्द होवुन जूना झाला.... मी वाचला... बेकार आहे... फक्त आणि फक्त टिका आहे... काही काही पानं वाचनिय आहेत...आर्थात आता तो लिहिणाराही नाही आणि ज्याच्या बद्दल लिहिले तो ही या जगात नाही.

महेश +१

लेखांची शीर्षके मराठीत नसतात म्हणून तो वाचणे बंद करणाऱ्या बापूंना स्वत:च्या लेखाचे शीर्षक लक्षवेधी करण्यासाठी त्यांना ह्याच सो कॉल्ड मिंग्लिशचा आधार घ्यावासा वाटला..

Viva अजूनही दणक्यात निघते आहे. आता गुरुवाराऐवजी शुक्रवारी निघते.
ही पुरवणी ज्या वयोगटाच्या वाचकांसाठी आहे, त्यांना आवडेल, उमजेल अशी भाषा तीत वापरली आहे. सदरांचे विषयही तसेच आहेत.

शीर्षकात इंग्रजी शब्द वापरून वाचकांना आकर्षित करण्यात वावगे काय ते कळले नाही.

लोकसत्ताला मुद्रितशोधक, व्याकरण-मार्गदर्शक परवडत नाहीत का अशी शंका येण्याजोगा मजकूर अधूनमधून दिसतो हे मात्र खरे. पण तसा तो अन्यत्र कुठे दिसत नाही?

.........विद्याधर गोखलेंचे अग्रलेख वाचून मराठी भाषा शिकलेला लोकसत्तेचा आजीव वाचक.

लोकसत्ता आणि मराठीतले एकमेव पोर्न दैनिक महाराष्ट्र टाइम्स ही पेपरे मरणपंथास लागली आहे . 'बुढ्ढी घोडी लाल लगाम' या न्यायाने म्हातारपणाकडे झुकलेल्या वेश्येने जरा अधिक रंगरंगोटी करून तरुण मुलींच्या स्पर्धेत उतरावे तसे या पेपरांचे झाले आहे. वेश्या प्रामाणिक असतात त्या धंद्याला तात्विक मुलामा देत नाहीत. हे तसे नाहीत. हे पिढी बदलल्याच्या गोष्टी करतात. असू द्या आपण त्यांची कींव करू या आणि आपले पैसे आणि वेळ वाचवू यात....

महेश आणि पियु,
उपरोध नावाचा एक भाषालंकार आहे. माझ्या लेखाचा मथळा हे त्याचं एक उदाहरण होतं. पण जाऊ द्या, माझं गाडं कुठेतरी फसलेलं दिसतंय.

-बापू.

Pages