माय डियर लोकसत्ता, गुड बाय टु यू!

Submitted by pkarandikar50 on 9 April, 2009 - 04:53

मी लोकसत्त्ताकारांना एक पत्र लिहलं आहे, ते लोकसत्तेत छापून येण्याची शक्यता नाहीच पण त्याचा विषय सर्वसाधारण वाचकांच्याही जिव्हाळ्याचा आहे असं मला वाटलं, म्हणून इथे पोस्ट करतो आहे. याच विषयावर मी 'मराठी अभिजात भाषा: कधी आणि केंव्हा' असाही एक लेख यापूर्वी मायबोलीवर पोस्ट केला होता. कदाचित तो आपल्या वाचनांत आला असेल.
------------------------------------------------------------------------------------
महोदय,
माझ्याप्रमाणेच अनेक मराठी भाषिक एक इंग्रजी आणि [अगत्यपूर्वक] एक मराठी दैनिक विकत घेऊन वाचतात. माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर मी लोकसत्तेचा नियमित वाचक आहे पण अलीकडे मला जाणवू लागलं आहे की लोकसत्ता हे मराठी दैनिक राहिलेलं नाही. ते इतके ईंग्रजाळले आहे की मराठी ऐवजी 'मिंग्लिश भाषेतले दैनिक' असे त्याचे वर्णन अधिकृतपणे लोकसताकारांनी करावं.

आपल्या गुरुवारच्या अंकात Viva नावाची एक पुरवणी असते. या पुरवणींतल्या विविध स्तंभांची शीर्षकं अशी आहेत - कॅम्पस Mood, थर्ड आय, स्मार्ट बाय, क्रेझी कॉर्नर, मेल बॉक्स, ग्रूमिन्ग कॉर्नर, यंग अचीवर्स, ओपन फोरम इ. मराठी मथळ्याचा एकही स्तंभ किंवा सदर या पुरवणींत नसते, मग मजकूर तरी मराठी भाषेत का असावा? देवनागरी लिपींत सरळ इंग्रजी मजकूर किंवा रोमन [युनिकोड] लिपीत मराठी मजकूर का देत नाही?

केवळ पुरवणींतच नव्हे तर मुख्य दैनिकाच्या मथळ्यांमधे आणि लेखांच्या शीर्षकातही देवनागरी लिपीत लिहीलेलं इंग्रजी वाचावे लागते. उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडे एका रविवारच्या अंकांतला ' दि क्यूरियस केस ऑफ स्लमडॉग मिलिनॉयर' हा लेख पहावा. लेखकाला लिहायचे होते 'स्लमडॉग मिलिनॉयर' ह्या बहुचर्चित चित्रपटासंबधी पण मथळ्यासाठी त्याला 'दि क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन' ह्या हॉलीवूड चित्रपटाच्या नावाचा आधार घ्यावासा वाटला आणि संपादकांनीहि हा धेडगुजरीपणा चालू दिला! वास्तविक पहाता ह्या दोन चित्रपटांचा एकमेकांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही आणि त्या लेखांत बेंजामिनविषयी एक अवाक्षरही नाही. हा सगळा काय प्रकार आहे?

दुसरं उदाहरण: ७ एप्रिल २००९ च्या अंकातल्या पहिल्या पानावर, राहूल द्रविडने घेतलेल्या विक्रमी झेलांची बातमी पहावी. ह्या बातमीचा मथळा आहे, ' कॅची .... !' याच अंकांतले आगामी लोकसभा निवडणुकांसंबधीचं सदर -'इंडियन पोलिटिकल लीग' -ही असंच विनाकारण इंग्रजाळलेले आहे.

एखादा इंग्रजी शब्द मराठींत इतका रुळलेला असतो की त्याचा मराठी प्रतिशब्द 'परका' वाटावा. उदहरणार्थ, लोकल, बस, स्टेशन, पोस्ट ऑफीस इ. अशा शब्दांच्या बाबतीतही, अट्टाहासाने मराठी प्रतिशब्द वापरावेत असा माझा हट्ट नाही पण जेथे अशी व्यावहारिक गरज नाही तेथेही 'मिन्ग्लीश' भाषा का वापरावी? असं केल्याने, आपल्या दैनिकाचा वाचकवर्ग - विशेषत: - इंग्रजी माध्यामांतून शिकलेली युवा पिढी - वाढेल अशा भ्रमांत लोकसत्ताकार आहेत काय?

मुंबई विद्यापीठाने 'बॅचलर ऑफ मास मिडिया' [बी. एम्.एम.] चा अभ्यासक्रम इंग्रजीप्रमाणेच मराठी माध्यमांतूनही उपलब्ध करून द्यावा ह्या मागणीला लोकसत्तेने सतत पाठिंबा दिला. मराठी माध्यमांची प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज पहाता, हे रास्तच होतं. मुंबई विद्यापीठाने ही मागणी मान्यही केली आहे. मला असा प्रश्न पडतो की मराठी माध्यमांतून बी. एम्.एम. ची पदवी घेऊन बाहेर पडणारे पदवीधर जेंव्हा उद्या मराठी दैनिकांकडे किंवा टी.व्ही. वाहिन्यांकडे काम करू लागतील तेंव्हा ते कोणती भाषा वापरतील? मराठी का मिंग्लीश? आणि ते जर अशी इंग्रजाळलेली धेडगुजरी मराठी वापरणार असतील तर अभ्यासक्रम तरी मराठींत ठेवण्याचा आग्रह कशाकरता धरायचा?

एक वाचक आणि प्रेक्षक म्हणून मी मराठी माध्यमांमधल्या ह्या बदलत्या [इंग्रजी भाषेने गढूळलेल्या] प्रवाहाकडे पाहतो, तेंव्हा माझ्यापुढे प्रश्न पडतो की मी ह्या संबधी काय करू शकतो ? का हताशपणे, 'जे जे होईल ते ते पहात रहावे' असे म्हणत स्वस्थ बसायचं? माझ्यापुरतं तरी मी ठरवलं आहे की एक ग्राहक म्हणून का होईना, मी लोकसत्ता खरेदी करायचं थांबवू शकतो. त्याने कितपत फरक पडणार हा भाग अलाहिदा.

तेंव्हा, माय डियर लोकसत्ता, गुड बाय टु यू!
-----------------------------------------------------------------------------------
प्रभाकर [बापू] करंदीकर.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मला लोकसत्ता आवडायचा पण आता वाचावासा नाही वाटत्..भाषा ,विचार यांच्यात खूप फरक पडला..लेखांतील (संपादकीय) दूटप्पीपणा नाही पचनी पडत विशेषतः कुमार केतकर यांचे लेखन...........माझ्यासाठी वैयक्तीक, केतकरांचे अचाट अन अतर्क्य लेख हे एक कारण लोकसत्ता बंद करायला पुरे आहे....anumodan.

Pages