हे ही दिवस जातील..

Submitted by साधना on 9 April, 2009 - 04:35

(नुकतीच ही गोष्ट वाचली, खुप आवडली म्हणुन माबोकर मित्रांसाठी तिचा अनुवाद देत आहे.)

एकदा एका राजाने त्याच्या सल्लागारांना बोलावले आणि विचारले, "असा काही सल्ला किंवा मंत्र आहे जो कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही वेळी, कुठल्याही जागी उपयोगात येऊ शकेल? जेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला सल्ला द्यायला नसेल तेव्हा मदत होईल असा काही मंत्र तुम्ही सांगु शकाल का?"

सगळे सल्लागार विचारात पडले. सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर? सगळीकडे अंमलात येऊ शकेल असा मंत्र? जो दु:खातही मार्गदर्शन करेल आणि सुखातही, पराजयात आणि विजयातही? असा काही मंत्र असु शकेल काय? खुप खल केल्यावर एका वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सल्लागाराने एक मंत्र सुचवला. सगळ्यांना तो लगेच पटला. त्यांनी तो लिहुन काढला आणि कागद राजाला दिला. अर्थात सोबत एक अट होतीच. राजाने मंत्र लगेच वाचायचा नाही तर जेव्हा गरज पडेल तेव्हाच तो मंत्र वाचायचा. गरजही अशी की जेव्हा सगळे मार्ग खुंटले असतील, प्राणांशी गाठ पडतेय की काय असे वाटेल तेव्हाच, फक्त तेव्हाच तो कागद उघडायचा आणि बघायचे काय आहे तो मंत्र. राजाने बोटातल्या हि-याच्या अंगठीत कागद ठेऊन दिला.

काही दिवसांनी राजाच्या राज्यावर हल्ला झाला. राजाच्या शत्रूंनी एकत्र येऊन अचानक जोरदार हल्ला केला होता. राजाने सर्व सैन्यानिशी जोरदार मुकाबला केला, पण त्याला यश आले नाही. रणांगणावरुन जीव वाचवुन त्याला पळून जावे लागले. घोडा राजाला घेऊन खुप खोल जंगलात गेला. मागुन शत्रूसेना पाठलाग करत होतीच. दुरवर घोड्यांच्या टापांचे आवाज दुमदुमत होते. अचानक राजाचा घोडा एका कड्याच्या टोकाशी पोचला. राजाने पाहिले, पुढे खोल दरी होती, मागे फिरावे तर टापांचे आवाज जवळ आल्यासारखे वाटत होते. काय करावे? राजाला काहीच सुचेना. अंत जवळ आलाय असे वाटु लागले.

तोच त्याच्या बोटातली अंगठी सुर्यप्रकाशात चमकली. त्याला एकदम सगळे आठवले. त्याने अंगठीतुन कागद काढला आणि वाचला.

'हेही दिवस जातील....' कागदावर लिहिले होते. राजाने परत परत वाचले आणि अचानक त्याला सगळा अर्थबोध झाला. 'हो, हेही दिवस जातील! काही दिवसांपुर्वी माझे राज्य होते, मी सार्वभौम राजा होतो, आणि आज.. आज माझे राज्य, सगळे सुखोपभोग, सगळे नाहीसे झालेत. राज्यहीन असा मी, ह्या जंगलात शत्रूंपासुन स्वतःला लपवत फिरतोय. जर ते राज्य, सुख कायम टिकले नाही, तर मग हे दु:ख, हा अपमान तरी कसा कायम टिकेल? हेही दिवस निश्चितच जातील.'

राजाला या विचाराने खुप हुशारी वाटली. तो घोड्यावरुन खाली उतरला. आजुबाजूला पाहिले. अतिशय सुंदर असा निसर्ग चहुबाजूने खुणावत होता. आपल्या राज्यात अशी सुंदर जागा आहे हे त्याला माहितही नव्हते. कागदावरील मंत्र वाचुन त्याच्या चित्तवृत्ती ब-याच शांत झाल्या होत्या. निसर्गाने त्याचे मन अजुन शांत केले. थोड्या वेळाकरता तो समोर उभे असलेले संकटही विसरला. आजुबाजुचा निसर्ग तो पाहात राहिला.

थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की घोड्यांच्या टापांचा आवाज हळुहळू कमी होत होता. शत्रुसेना बहुतेक दुसरीकडे वळत होती.

राजा खुप शुर होताच. काही दिवसातच त्याने आपले सैन्य जमवले आणि शत्रुशी जोरदार लढाई करुन राज्य परत मिळवले.

विजयी राजा जेव्हा नगरात परतला तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारली. राजाच्या रथावर जागोजागी पुष्पवृष्टी होत होती. प्रजानन गात नाचत राजाचे गुणगाण करत होते. राजाचा उर अभिमानाने आणि गर्वाने भरुन आला. 'मी सर्वशक्तिमान असा शूर आणि अजिंक्य राजा आहे. मला हरवणे आता कोणालाच शक्य नाही' त्याचे मन आनंदले. 'असे स्वागत केवळ माझ्यासारख्या महाप्रतापी राजाचेच होऊ शकते. दुस-या कोणाचाही हक्क असू शकत नाही यावर'.

अचानक सुर्यप्रकाशात अंगठीतील हिरा लखलखला आणि राजाला तो मंत्र आठवला. त्याने परत कागद उघडुन वाचला. 'हेही दिवस जातील!' राजा एकदम विरक्त झाला. 'जर हेही एक दिवस संपणार असेल तर मग हे माझे कसे? हे माझे नाहीच. पराभवही माझा नव्हता आणि आताचा विजयही माझा नाहीय. मी आपोआप पुढे जातोय, प्रवाहाला गती देणारा मी नाही, त्याला स्वतःची गती आहे.'

कालातीत असा तो मंत्र क्षणभरही न विसरता राजाने त्यानंतर अनेक वर्षे न्यायाने राज्य केले आणि प्रजेला सुखात ठेवले.

गुलमोहर: 

वा साधना गोष्टीचा आशय खुपच छान आहे. खरच काळ हा आपल्या हातात नसतो. कोणत्याही परीस्थितीवर आपला अधिकार नसतो.
अजुन लिहीत रहा.

कोणत्या पुस्तकातली आहे ही गोष्ट ?

चांगला मंत्र, कुठल्या पुस्तकातली गोष्ट आहे ग ही?

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

साधना कथा आवडलीही आणि पटलीही. तुला पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा.
प्रत्येक गोष्टी काळ ठरवत असतो आपण निमित्तमात्र.
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

खरच सुन्दर आणि वास्तविकतेत उपयोगि येनारा सल्ला/उपदेश्/मन्त्र

शिकण्यासारख बरच काही आहे ह्यात..........
थोडक्यात बरच सांगून गेली गोष्ट.........
फार छान , धन्यवाद..........
----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

छान आहे कथा.
वि.स. खांडेकरांची बर्‍यापैकी याच अर्थाची 'विजयस्तंभ' नावाची रुपककथा आहे ती पण छान आहे. Happy

कथा फारच छान आहे साधना..
नविन प्रेरणा मिळाली... दु:ख वा आनंदात संयमी रहावे हे थोडक्यात पण छान पद्धतीने सांगितलंय.. Happy

छान ! आवडली म्हणजे पटली.... Happy

मित्रांनो, प्रतिसादांबद्दल खुप खुप आभार.

मलाही हा सल्ला पटलाय. जेव्हा दु:खात असते तेव्हा ह्या सल्ल्याने दु:ख सोसायला बळ मिळते, पण सुखात असताना मात्र घाबरते, हे सुखही एक दिवस संपणार म्हणुन...

स्थितप्रज्ञ होणे हा सदासुखी होण्याचा मार्ग आहे हे मला कळते पण अजुन वळले नाहीय Sad

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

स्थितप्रज्ञ होणे हा सदासुखी होण्याचा मार्ग आहे हे मला कळते पण अजुन वळले नाहीय >> ज्या दिवशी वळेल तो दिवसही असाच येईल आणि निघून जाईल, बरच काही शिकवून जाईल...

हे जिवन एक चक्र आहे.. आणि वरिल मंत्र हा त्यावरच तर आधारीत आहे... जसे दिवस-रात्र होतात, ऋतू बदलात... खरचं आपण संपुर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहोत... तोच खरा देव आणि तीच खरी शक्ती Happy

मी आपोआप पुढे जातोय, प्रवाहाला गती देणारा मी नाही, त्याला स्वतःची गती आहे.'
>>> छान!

हे जिवन एक चक्र आहे.. आणि वरिल मंत्र हा त्यावरच तर आधारीत आहे... जसे दिवस-रात्र होतात, ऋतू बदलात... खरचं आपण संपुर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहोत... तोच खरा देव आणि तीच खरी शक्ती

हे पटवुन द्यायला साक्षात इंद्रदेवच खाली आले आहेत मग विश्वास ठेवलाच पाहिजे.
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

वा साधना मस्त गोष्ट आहे...

वा साधना मस्त गोष्ट आहे...

साधना, खूप काही शिकवून जाणारी गोष्ट Happy
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

गोष्ट छोटी आहे पण मतितार्थ खुप मोठा आहे...छान गोष्ट!!

वा साधना गोष्टीचा आशय खुपच छान आहे....
म्हणुन तर गीतेमध्ये म्हटंलय ....जो आज आप का है ...कल किसी और का था .....और कल किसी और का होगा ...