युगांतर - आरंभ अंताचा! भाग ११

Submitted by मी मधुरा on 26 July, 2019 - 06:37

काशीचा राजमहाल सुवासिक फुलांनी सजला होता. दास दासी येणाऱ्या राजांचे गुलाब पाणी, अत्तरे शिंपडत स्वागत करत होते. स्वयंवरात जमलेल्या राजांनी आसन ग्रहण केले. काशीनरेशने सर्व स्वयंवरात आलेल्या राजांना अभिवादन करून स्थानबद्ध झाले. लाल रंगाच्या पायघड्यांवरून डोक्यावर माळलेल्या सुवर्ण हिरेजडीत शिरोमणी ते पायातल्या बोटात घातलेल्या जोडव्यांचा भार पेलत अंबा, अंबिका, अंबालिका तिथे पुष्पवर्षावात तिथे हजर झाल्या. स्वयंवर सुरु करण्याची घोषणा देत दासांनी तीन सजवलेले पुष्पहार तिन्ही राजकन्यांसमोर धरले. भीष्माचार्यांनी महालात प्रवेश केला आणि थेट काशीनरेश पुढे जाऊन उभे राहिले. विनम्र अभिवादन करत त्यांनी आपले धनुष्य हातात घेतले, " प्रणाम महाराज. हस्तिनापूर युवराजसाठी आपल्या कन्यांचे दान घ्यायला आलो आहे." राजकन्यांकडे पाहून भीष्मांनी नमस्कार केला, "क्षमस्व!" आणि सरळ तिघींना घेऊन भीष्मांनी आपल्या रथात बसवले. सारथ्याने घोड्यांच्या पाठीवर चाबकाचा फटका मारला. रथाने वेगाने हस्तिनापुरची वाट धरली. स्वयंवरातून राजकन्यांना अचानक घेऊन गेल्याने सर्वजण गोंधळलेले होते. स्वयंवरात सहभागी राजांनी भानावर येत आपले रथ, घोडे भीष्मांच्या रथामागून दौडवले. बाण संधान करत राजा शाल्व सर्वांच्याअग्रणी होता. भीष्मांनी धनुष्य हवेत उचलले आणि बाण चढवत प्रत्यंच्या खेचली. त्यांचा एक- एक वार अचूकपणे राजांना निशस्त्र करत होता. रथ उध्वस्त करत होता. काही जणांना किरकोळ जखमी करत होता. भीष्मांच्या बाणांनी सर्वांना गुडघ्यावर बसत पराभव स्विकारण्यास भाग पाडले. राजकन्या भीष्माच्या युद्धकौशल्याकडे पाहतच राहिल्या. रथ हस्तिनापुरात पोचला आणि पुष्पपाकळ्यांच्या वर्षावात राजकन्यांचे स्वागत महालात झाले.
सत्यवती मध्य दालनात उभी होती. विचित्रवीर्य शेजारच्या आसनावर शांतपणे बसला होता. सत्यवतीने गळ्यातले कंठहार काढून तिघींवरून ओवाळून दासीच्या हातात ठेवले. विचित्रवीर्य कडे पाहत सत्यवती म्हणाली, " तुमच्या होणाऱ्या पतीचे दर्शन घ्या पुत्रींनो! तुम्हाला या हस्तिनापुरच्या वैभवशाली राज्याची राणी बनण्याचे भाग्य प्राप्त झालेले आहे."
अंबिका, अंबालिकेने विचित्रवीर्यकडे नजर टाकली. बारीक अंगकाठीचा विचित्रवीर्य कसाबसा मुकुटाचा आणि अवजड अलंकाराचा भार सांभाळत बसला होता. 'ज्याने आपल्याला स्वसामर्थ्यावर पळवून आणले, तो महावीर आपल्या नशिबात नाही.... तर हे घाबरट ध्यान आहे? स्वयंवरात सुद्धा ज्याने स्वत: ऐवजी एका वीराला पाठवून दिले तो?' राजकन्या उदास झाल्या. अंबेचे मात्र कशातही लक्ष नव्हते.
"राजमाता, मी हा विवाह करु इच्छित नाही." भीष्मांच्या कानावर हे वाक्य दालनात प्रवेश करताना पडले.
"का देवी? काय कमी आहे हस्तिनापुरात?" भीष्मांनी प्रश्न केला.
"मी शाल्वला पती मानले होते राजन्! मी या आज त्यांनाच वरणार होते."
" मग तुम्ही स्वयंवरास का उभ्या राहिलात देवी? स्वयंवर तर त्या राजकन्यांसाठी रचला जातो, ज्या सामर्थ्यपरीक्षण करून आपला वर निश्चित करतात. तुमच्या पिताश्रींना तुमच्या निवडीबद्दल माहित नव्हते का?"
अंबाने मानेनेच नकार दिला.
सत्यवती हे सगळ ऐकून चिडली होती. ती काही बोलणार इतक्यात भीष्मांनी अंबेला पुढे येत नमन केले, "तुम्ही मुक्त आहात अंबादेवी ! शाल्वनरेश कडे तुमची रवानगी करण्याची जवाबदारी हे हस्तिनापुर पुर्ण करण्यास बांधिल आहे."
भीष्मांनी दास-दासींना आज्ञा दिली. अंबाला शाल्वनरेश कडे पाठवण्याकरता रथ सज्ज झाला.
"देवी, तुमच्या आणि शाल्व नरेशच्या विवाहाकरिता हस्तिनापुरतर्फे शुभेच्छा!" भीष्मांनी काही तलम वस्त्रे आणि दागिने दासींच्या हतातल्या तबकातून अंबेच्या हातात ठेवले.
सत्यवती घडला प्रसंग रागाने तणतणत बघत होती. अंबा निघून गेली तसा सत्यवतीने रागाने प्रश्न केला, "हे काय होते भीष्म? जिंकून आणले होतेस ना? मग ह्याचा काय अर्थ समजायचा?"
भीष्मांनी सत्यवतीकडे वळून पाहिले, "राजमाता.... तुमच्या आज्ञेनुसार मी स्वयंवरातून राजकन्यांना इथे घेऊन आलो. मी तुमची आज्ञा पाळलेली आहे."
"आणि त्यातल्या एकीला परतही पाठवलेस. ही कोणाची आज्ञा होती?"
"आज्ञा नाही राजमाता, हा अंबादेवींचा अधिकार होता."
"अधिकार? जिंकलेल्यावर जिंकणाऱ्याचा अधिकार असतो भीष्मा! ज्याला जिंकलय त्याचा कसला अधिकार?"
"राजमाता, स्वयंवर हे अस एकच रणांगण आहे जिथे जिंकल्यावरही दानच मिळते.... कन्यादान! आणि अनिच्छेने मिळालेले दान हस्तिनापूर कसे स्विकारेल?"
सत्यवती शांत बसली. धर्म, न्याय आणि स्त्री-सन्मान हे भीष्मांच्या ठायी असलेले मूळ गुण ती जाणून होती.
भीष्मांनी अंबिका, अंबालिकेकडे पाहिले, "देवी अंबिका, देवी अंबालिका, तुमची युवराज विचित्रवीर्यांशी विवाहबद्ध होण्यास सहमती आहे?"
स्त्री दाक्षिण्य आणि अद्वितीय शौर्याचे अचाट प्रदर्शन पाहून भीष्मांबद्दल मनात तयार झालेला आदर राजकन्यांना भीष्मांच्या विनंतीवजा प्रश्नाला नकार देऊ देत नव्हता. त्यांनी माना होकारार्थी हलवल्या.
ब्रह्मवृंदांनी दुसऱ्याच दिवसाचा मुहूर्त काढला आणि हस्तिनापुर महाल सजला. विचित्रवीर्य भव्य सजलेल्या मंडपात आला तेव्हा स्वस्थ वाटत नव्हता. परंतु वैद्य स्वतः जातीने विचित्रवीर्य कडे लक्ष ठेवत होते. महालात कैक वर्षांनी शुभ कार्य घडणार होते. महाराज शंतनू आणि महाराज चित्रांगद यांच्या मृत्यूंच्या अघटित घटनांवर आता सुखाची फुंकर बसणार होती. महालात गर्दी झाली होती. विचित्रवीर्य आणि अंबिका, अंबालिका यज्ञापुढे ब्रह्मवृंदासोबत मंत्रोच्चार करत होते आणि तितक्यात अंबा भीष्माचार्यांसमोर आली. तिच्या डोळ्यांत लाल रंगाची गडद छटा पसरली होती. डोळ्यांतून पाणी वाहात होते. विवाह थांबवून सर्वजण अंबेकडे पाहू लागले. आपल्या बहिणीची अवस्था पाहून अंबिका, अंबालिका चिंतीत झाल्या. एव्हाना शाल्व नरेश सोबत तिचा विवाह झाला असेल असे त्यांना वाटत होते.
" काय झाले देवी? " भीष्मांनी चिंताग्रस्त होत विचारले.
" भीष्म, शाल्वने मला नाकारले." हुंदके देत अंबा म्हणाली.
" पण का देवी? "
" तुमच्यामुळे ! "
"माझ्यामुळे?"
" हो. 'मला दान म्हणून मिळालेली कन्या पत्नी म्हणून नकोय.' अस म्हणाले ते!"
"असं म्हणाले? चला देवी माझ्यासोबत."
"कुठे? "
"शाल्वनगरीला. शाल्वनरेशची माफी मागून, मनधरणी करेन. ते तुम्हाला नक्की स्विकारतील."
"मी करून पाहिली नसेल का मनधरणी?"
" मग त्यांना समज देण्याचे इतर अनेक मार्ग अवगत आहेत देवी मला." भीष्मांनी पुतळ्याच्या हातात अडकवलेली लोखंडी वजनदार गदा उचलली.
"नाही भीष्माचार्य, मला रक्तपात नकोय. शाल्वशी करायचे असते तर मी काशीचे सैन्य घेऊन गेले नसते का?"
'काशीचे सैन्य? आपल्या राजकन्यांना पळवून नेले तेव्हा भीष्माला अडवूही न धजणारे सैन्य.... शाल्व वर आक्रमण करणार?' सत्यवतीला आलेले हसू तिने चेहऱ्यावर येऊ दिले नाही.
" मग काय अपेक्षा आहे देवी आपली?"
"मी विवाह करायला आले आहे इथे."
भीष्मांनी सत्यवती कडे पाहिले. सत्यवतीच्या चेहऱ्यावर विजयी आनंद पसरला होता. शेवटी जिंकलेली राजकन्या परत आली होती. सत्यवतीने होकारार्थी मान डोलावली.
" राजमाता सत्यवती यांना तुमची इच्छा मान्य आहे देवी." यज्ञकुंडाच्या दिशेने आनंदाने पाहत भीष्म म्हणाले, "विचित्रवीर्य, या तुमच्या होणाऱ्या पत्नी काही वेळातच वधूरुपात तयार होऊन येतील. ब्रह्मवृंदांनो, तो वर काही क्षण थांबण्याची विनंती आहे."
अंबा गोंधळली, "राजन् भीष्म, पळवून तुम्ही आणले होतेत आम्हाला. आणि विवाह दुसऱ्याच कोणाशी तरी लावताय? हा कुठला न्याय आहे?"
"अंबा, भीष्माने तुमचे हरण विचित्रवीर्य साठी केलेले होते." सत्यवतीने ठासून सांगितले.
"पण मला विचित्रवीर्यशी विवाह नाही करायचा. भीष्मांसोबत करायचा आहे."
सत्यवतीला अंबेच्या बोलण्याचा प्रचंड राग आला. भीष्म अंबेसमोर हात जोडून उत्तरले, "क्षमा असावी. पण हे असंभव आहे, अंबा देवी."
" का राजन्? "
"मी राजा नाही, हस्तिनापूरचा दास आहे."
"मला त्याने फरक पडत नाही. मला शाल्वशी विवाह करायचा होता. तुमच्यामुळे ते स्वप्न बनून राहिले. आता तुम्हाला माझ्याशी विवाह करावा लागेल."
"मी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतलीये, अंबा देवी! मला क्षमा करा."
"हा अन्याय आहे भीष्म! तु एका नारीचा अपमान करतो आहेस." अंबाचा स्वर तीक्ष्ण झाला आणि सैनिकांनी उगारलेल्या तलवारी खाली ठेवायची खूण करत भीष्मांनी अंबेकडे पाहिले.
"देवी, विचित्रवीर्य माझे अनुज आहेत. त्यांचा आपल्या भगिनींनी पती म्हणून स्विकार केला आहेच. हा हट्ट आपण सोडावा."
"हे शक्य नाही, भीष्म! विवाहास तयार हो अथवा तुला माझ्या केलेल्या अपमानाचा दंड भोगावा लागेल."
भीष्म यावर काहीच बोलेनात हे पाहून अंबेचा क्रोध मस्तकात गेला. तशीच तिथून ती निघून गेली. सत्यवतीने विवाहमंत्र चालू करण्याची आज्ञा देत घडलेल्या प्रसंगाला काहीच गांभीर्य नसल्यासारखे केले असले, तरी भीष्म अंबेच्या शब्दांनी दुखावला गेल्यासारखा व्यथित होऊन उभा होता.

©मधुरा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबिका व अंबालिकेने बहिणीची बाजू का घेतली नसेल हा हा प्रश्न पडला आहे. आजचा भागही सुंदर झाला आहे.‌

खर आहे शशिकांतजी, पण त्यांना तिची बाजू पटावी असे काहीच नव्हते. भीष्मांनी कोणाताच अन्याय केला नव्हता. स्वयंवरात पुर्वग्रह असताना उभे राहणे ही चूक होती, तरीही तिला मान द्यायला परत पाठवून भीष्मांनी तिचा सम्मान केला होता. परत आल्यावर शाल्वला मनवण्याची तयारीही भीष्मांनी दाखवली. अर्थात त्यांचे कर्तव्य तिला शाल्व कडे पाठवले तेव्हाच संपले होते.
वर विचित्रवीर्य सोबत सन्मानाने विवाह करायला ही परवानगी दिली होती.

तिला समजून घ्यायला हवे हे ठिक आहे पण ती कोणालाच समजून घ्यायला तयार नव्हती. तिला विचित्रवीर्यशी लग्न करायचे नव्हते, आणि परत ती काशीला जाऊ शकली नसती हे ही मान्य ! पण भीष्मांनी जमले तितके प्रयत्न तिला मनवण्याचे केले होतेच की. आणि त्यांची प्रतिज्ञा त्यांच्या करिता किती महत्वाची होती हे तर आपल्याला माहित आहे.तिची इच्छा पूर्ण करणे त्यांना अशक्य होते.

कदाचित हेच विचार करून अंबिका, अंबालिका यांनी वादात पडणे टाळले असावे.

अजून एक.... त्या अजून राण्या बनल्या नव्हत्या. कुठल्या अधिकाराने त्या तिची बाजू घेणार होत्या?

त्यात अजून एक मुद्दा.... स्त्रियांचे बोलणे, त्याहूनही उद्धटपणे बोलणे कोणालाही खपत नाही. अगदी इतर स्त्रियांनाही नाही. तिने भीष्मांचा एकेरी केलेला उल्लेख, उद्धट धमकावणीचा सूर यामुळे तिच्याबद्दल बहिणींना वाटणारी दया सुद्धा बहिणींच्या मनातून नाहीशी झाली नसेल कशावरुन?

..... एक आपला निष्कर्ष! Happy
धन्यवाद! Happy

प्रत्येक भाग वाचतेय, महाभारत कित्येकदा वाचून झालंय, पण नेहमी नवी बाजू कळते.
महाभारताची मजाच ही आहे, की कुणीही चांगलं वाईट असं नाही, सगळे परिस्थितीशरण!!!

मधुराताई,
स्वयंवरात जिंकलेल्या स्त्रिया अशक्त आणि रोगी अनुजाच्या पायी घालण्याची भीष्मांची कृती त्यांच्या कठोर धर्मशास्त्राला अनुसरून होती का?
अर्थात अर्जुनानेही नंतर तेच केले म्हंणजे हे तेव्हा शास्त्रसंमतच असावे.

प्रत्येक भाग वाचतेय, महाभारत कित्येकदा वाचून झालंय, पण नेहमी नवी बाजू कळते.... महाश्वेता दी हे अगदी मनातलं बोललात.
भाग आवडला. प्रश्नच नाही.

अश्विनी जी सहमत. स्वयंवर म्हणजे नवरीला जो आवडेल तोच वर म्हणून निवडणे. बलाचा वापर करून नवरी पळवून नेणे हा राक्षस विवाह झाला. पितामह भीष्म स्वत:ला राजगादी चे सेवक,रक्षक मानत होते म्हणून त्यांनी राजमातेच्या आज्ञेवरून तिघींना पळवून आणले. द्रोपदी स्वयंवरात माशाचा डोळा बाणाने भेदण्याचा पण होता, सीतामातेच्या वेळी धनुष्य सज्ज करण्याचा होता, तसा या ठिकाणी पण नव्हता असे मला वाटते. म्हणून हा राक्षस विवाह आहे हे मला वाटते.
मधुरा जी सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद सिद्धीजी. Happy
खरं आहे महाश्वेता जी!
अश्विनीजी, यथार्थ लिहिले आहेत आपण.
माझ्या दृष्टिकोनातून मात्र- भीष्मांनी राजकन्यांना पळवून आणले होते. जर स्वयंवर जिंकून आणले असते, तर नियमांनुसार भीष्म लग्न करायला बांधिल झाले असते.

अजून एक महत्वाचे, की त्यांनी आज्ञा पूर्ण केली पण लग्न करायची जबरदस्ती केली नाही.
भीष्मांनी दोन्ही बाजू सांभाळल्या. Happy

शशिकांतजी, आज्ञा पालनासाठी ते बांधिल होते. Sad आणि त्यांनी हे स्वतःसाठी केलेले नाही.
जसे मी वर लिहिले आहे,

भीष्मांनी राजकन्यांना पळवून आणले होते. जर स्वयंवर जिंकून आणले असते, तर नियमांनुसार भीष्म लग्न करायला बांधिल झाले असते.

अजून एक महत्वाचे, की त्यांनी आज्ञा पूर्ण केली पण लग्न करायची जबरदस्ती केली नाही.
भीष्मांनी दोन्ही बाजू सांभाळल्या. >>copy paste

आणि,
भिष्मांचा प्राधान्यक्रम मला या प्रमाणे दिसतो-
प्रतिज्ञा
धर्म
न्याय
स्त्रीसन्मान

कृपया जाणकारांनी स्वयंवर या विवाह प्रकारावर अजून प्रकाश टाकावा. स्वयंवर लावणे म्हणजे सामर्थ्य, कौशल्याला आव्हान देऊन दिलेलं आव्हान पुर्ण करणाराशी विवाह लावणं. स्वयंवरात नवरी पळवणे नितीनियमात बसत होते का? हत्तीच्या सोंडेत माळ देऊन वर निवडणे ही पद्धत अस्तित्वात होती का?

नमस्कार शहाणा माणूसजी,
तुम्हाला पडलेला प्रश्न योग्य आहे.

स्वयंवर म्हणजे कन्या स्वतः वराची निवड करते. मग कधी एखादा पण लाऊन, तर कधी फक्त तिला बघितल्यावर आवडला म्हणून ती वराची निवड करते.
सितेच्या, द्रौपदीच्या स्वयंवरात 'पण' होते. अंबा, अंबिका, अंबालिकेच्या नव्हते.

भीष्मांनी केलेले कृत्य तटस्थ म्हणून पाहायचे तर अधर्मी होते. भीष्मांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलेत तर ते फक्त कर्म होते. जे त्यांना करणे भाग होते पण ते त्यांनी कोणत्याही स्वार्थीपणाने केलेले नव्हते. जसे श्री कृष्ण गीतेत सांगतात, कर्म करताना जर मनात फळाची आसक्ती ठेवली नाही, तर त्या कर्माचा भार त्या व्यक्तीवर राहत नाही.

अर्थात, हे अर्ध सत्य आहे. केलेल कार्य हे धर्माला अनुसरून हवे.
त्यामुळे उत्तर द्यायचे झाले, तर हो. भीष्मांनी जे केले, ते चुकीचेच होते. Sad