कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या

Submitted by मी अभिजीत on 9 April, 2009 - 02:20

कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या.
काट्यांतुनही फ़ुलून येते हिरवळ आयुष्या.

उगाच छत्तिसचे नाते तू धरले वार्‍याशी.
तुला कुठे लाभला स्वतःचा दरवळ आयुष्या.

नदी, झरे अन सागर सारे प्राशुनिया झाले.
तहान आता भागवेल का मृगजळ आयुष्या?

प्रवास अपुला तसा चुकीच्या दिशेनेच होता,
किनार्‍यास बघ नेते आहे वादळ आयुष्या.

झुळझुळ वाहिल माझे मीपण निर्झराप्रमाणे
फोड जरासा अस्तित्वाचा कातळ आयुष्या.

तुला काळजी त्या अंधार्‍या जुन्या कोपर्‍यांची.
जपली मी सामानासोबत अडगळ आयुष्या.

मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची.
क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या.

नसे तोडगा गर्दीवरती, एकटेपणा हा.
एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या.

तुझ्यात वसतो शंभो, तुझिया आत अगस्तीही
बघ तर घेउन हलाहलाची ओंजळ आयुष्या.

कसा मिळावा तुला आसरा तिच्या लोचनांचा.
तिच्या आसवाइतका का तू निर्मळ आयुष्या ?

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

निर्मळ,अडगळ, ओंजळ आवडले आणि वादळ भलतच फेवरेटच त्यामुळे तेही .
आवडेश जबरी झालीये हिही गझल

व्वा सर्व गझल मस्त झाली आहे...

त्यातही मतला, कातळ, पुष्कळ, निर्मळ खूप आवडले...

बहोत खूब मजा आला

नचिकेतची 'आयुष्या' मनात ताजी आहे तोवर अजून एक 'आयुष्या'...
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या - खुप सुंदर....

नदी, झरे अन सागर सारे प्राशुनिया झाले.
तहान आता भागवेल का मृगजळ आयुष्या?

हा शेर खुप आवडला... अप्रतिम....

तुमचे आभार मानले पाहिजेत, इतक्या सुंदर सुंदर कलाकृतींचा आस्वाद लाभतो तुमच्यामुळे...

छान ग़ज़ल!

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

सुरेखच ! त्यातही वादळ, कातळ, वर्दळ आणि निर्मळ खासच.

    ***
    Real stupidity beats artificial intelligence.

    वा अभिजीत.. एक अत्यंत दर्जेदार गझल वाचण्याचा आनंद मिळाला
    तुला कुठे लाभला स्वतःचा दरवळ आयुष्या.. वा! ह्यात दोन आशय दिसलेत..
    क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या.. क्या बात है!!
    बघ तर घेउन हलाहलाची ओंजळ आयुष्या... भारतीय संस्कृतीशी समरस झालेली एक मस्त कल्पना!
    तिच्या आसवाइतका का तू निर्मळ आयुष्या ?.. बहोत खूब!

    नसे तोडगा गर्दीवरती, एकटेपणा हा.
    एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या.,.. ह्या शेरात मात्र दोन मिसरे एकमेकांशी कनेक्टेड वाटले नाहीत.. दुसरा मिसरा हा तोडगा सांगणारा असावा.. अशी पहिल्यांदा अपेक्षा निर्माण होते...तो नीट स्पष्ट होत नाहीय..असे मला प्रथम भासले...किंबहुना मला हा मिसरा नीट कळला नव्हता...
    अथवा/आता..
    गर्दीवरती, एकटेपणा हा तोडगा नसावा/ तोडगा कुठला?,
    एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या.. असे केल्यास?.. असो..
    पु.ले.शु.
    -मानस६

    मस्तच एकदम . वादळ अन अडगळ फारच छान.

    तुझ्यात वसतो शंभो, तुझिया आत अगस्तीही
    बघ तर घेउन हलाहलाची ओंजळ आयुष्या. >>
    यात ' हे शंभो तुझ्या आत मी वसतो ' असा अर्थ लागला मला. कदाचित "आयुष्या, तुझ्या आत शंभू आहे , अगस्ती पण आहे " असं म्हणायचं होतं का?

    शंभो हे संबोधनार्थ आहे असं मी समजते.

    मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची.
    क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या.---- खास!

    बाकी मानस६शी सहमत.
    जयन्ता५२

    मस्त गझल... एकदम आवडली... Happy

    मलापण नचिकेतची 'आयुष्या' गझल आठवली...

    त्या ऑनलाईन मुशायर्‍याचा भाग तीन टाका की लवकर...

    सुरेखच अभिजीत - परत एकदा - सहज आणि सुंदर गझल
    मजा आली दोस्ता !!
    धन्यवाद !

    झुळझुळ वाहिल माझे मीपण निर्झराप्रमाणे
    फोड जरासा अस्तित्वाचा कातळ आयुष्या.

    तुला काळजी त्या अंधार्‍या जुन्या कोपर्‍यांची.
    जपली मी सामानासोबत अडगळ आयुष्या.

    मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची.
    क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या.

    खूपच छान.
    आयुष्या या नावाची एक गझल already असल्याने या गझलेला जिवना असेही संबोधून तसे बदल करता येतील. कारण हि गझलही खूप सुंदर आहे.

    ..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

    वाह वाह...मस्त.

    व्वा वा!! अभिजीत, मजा आली!! मस्त!!

    बाकी चर्चा आपण केलेलीच आहे Happy

    अभिनंदन व पु.ले.शु.
    ~ नचिकेत

    शेवटचे २ शेर फार आवडले!

    आयुष्या रदिफाचे प्रयोजन मला मतला, मृगजळ आणि वर्दळ या शेरात चपखल वाटले नाही. विशेषतः मतल्यात. तसेच माझ्या आयुष्याने (मी नाही) माझ्या अस्तित्वाचा कातळ फोडणं हेही नीटसं कळलं नाही.
    चु.भू.दे.घे. Happy

    कसा मिळावा तुला आसरा तिच्या लोचनांचा.
    तिच्या आसवाइतका का तू निर्मळ आयुष्या ?>>>>>>>
    हा शेर खूSSSSSप आवडला.
    तुझ्या सगळ्या गझल वाचल्या, (माबोवरीलतरी)
    पण ही म्हणजे खूपच आवडली.
    अप्रतिम गझल!

    नसे तोडगा गर्दीवरती, एकटेपणा हा.
    एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या.

    याचा feel खूप छान् आहे...पण मानस६ ला अनुमोदन..confusion होऊ शकतं..

    all in all 80% mark देतो.. Happy

    क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या>>> हा मिसरा फार आवडला.

    हे ८० % मार्क्स वगैरे ऐकून गंभीर समीक्षक आठवले. पण ते फारच कंजुष होते याबाबतीत....