युगांतर - आरंभ अंताचा! भाग-२

Submitted by मी मधुरा on 19 July, 2019 - 11:01

वशिष्ठ मुनींच्या आश्रमात एकच गोंधळ माजला होता. त्यांची आवडती गाय नंदिनी नेहमीच्या स्थानी दिसत नसल्याने ऋषीमुनी हैराण झाले होते. रानात, डोंगरावर, नदीकाठी, झाडाजवळ, सर्वत्र परिचित ठिकाणी शोधणे व्यर्थ ठरले. नंदीनी कुठेच नव्हती. वशिष्ठ ऋषींच्या मनात कोलाहल माजला. शेवटी ते ध्यान लाऊन बसले. आपली दिव्य-दृष्टी जागी करत त्यांनी नंदिनीला शोधायला सुरवात केली... क्षणातच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नंदिनी हरवली नव्हतीच! वशिष्ठ ऋषींच गोधन खुद्द प्रभास नामक एका वसूनेच पळवून नेलं होतं. एव्हडच नव्हे! बाकीच्या अनिल, पृथ्वी, अनला, अपा, आदित्य, सोम, धृव या सात वसुंनीही यात त्याची सहाय्यता केली होती.

वशिष्ठऋषी भयंकर संतापले. डोळ्यात रक्त उतरून आल्याचा भास व्हावा, इतपत त्यांचे डोळे आरक्त भासत होते. अष्टवसू.... पंचमहाभूते आणि सुर्य, चंद्र, नक्षत्र यांच्या देवता असूनही त्यांनी चौर्य कर्म करावे? एका साधूच्या कुटीतली गोमाता पळवावी? एका तपस्वीची ही अशी चेष्टा? असह्य! त्यांनी कमंडलूतले पाणी हातात धरले. डोळे बंद करून मंत्रोच्चार करू लागले. ऱागाच्या भरात त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली.... कि नियती ने ती वदवून घेतली, कोण जाणे ?
आता अष्टावसूंनाही मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागणार होता. वेदना, यातना आणि पिडांनी भरलेला जन्म.

नदी पाण्याला ओढ बसू लागली. हवेतील तप्तता अनाकलनीयपणे वाढू लागली. अवेळी सावळे मेघ भरून आले. पावसाच्या धारा प्रचंड वेगाने धरेवर आदळू लागल्या. धरेवर त्या आवेगाच्या माऱ्याने चिरा पडू लागल्या. वारा वादळाचे रुप घेउ लागला. निसर्ग जणू काही आक्रोशच व्यक्त करत होता.

वशिष्ठांच्या हातातल्या जलाचा शेवटचा थेंब भुमीवर पडला आणि अष्टवसू तिथे प्रकटले. वाशिष्ठांच्या चरणावर त्यांनी लोळण घेतली. त्यांची गाय परतवत माफी याचना करू लागले. चेहऱ्यावरची पश्चात्तापाची भावना पाहून ऋषि मावळले.

वसूंना शाप तर दिलेला होता. तो विफळ होणे अशक्य. शापाला तोड एकच - उ:शाप! वशिष्ठांनी सप्तवसूंना उ:शाप दिला. " तुम्हा सप्तकाचा जन्म वर्षापेक्षा कमी असेल." वसूंच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून ऋषींचे मन द्रवले. प्रभास अजूनही मान झुकवून हात जोडून अश्रू ढाळत होता. "शापाचा परिणाम कमी करता येतो, प्रभास. मी केला. तुला मर्त्य जन्म पूर्ण करावा लागेल. पण तू आत्मक्लेश करू नकोस. तुझं हे आयुष्य आदर्श बनेल. जन युगानुयुगे तुझे स्मरण करतील. तुझ्या सामर्थ्याची स्तुती करतील." नमन करणाऱ्या अष्टवसूंना आशिर्वाद देत आपल्या गायीसोबत ऋषींनी कुटीकडे प्रस्थान केले.

मेघ पुन्हा पांढरे शुभ्र झाले. वारा आधीसारखा संथपणे वाहू लागला. सुर्यदेवांचे तापमान पुर्ववत झाले. धरा हिरवीगार दिसत होती. डोंगरावरून मेघांसोबत गंगादेवी धरेवर उतरली. पाऊस आणि ऊन यांच्या मिलनाने तयार झालेले सुंदर इंद्रधनू अंबरावर फुलले होते.

क्रमश:
©मधुरा

#Yugantar_Part2
#Mahabharat
#Yugantar_Aarambh_Antacha

Part 1 Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2536580073068020&id=10000148...

Part 3 Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2540685042657523&id=10000148...
टिपः चित्र नेट वर मिळालेले आहे.
yugantar 2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांकजी, मी काही कथा, कविता, गझला लिहील्या आहेत. त्यातल्या काही फेबू.वर आहेत. उर्वरित आहेत त्या आणि नवीन रचना, साहित्य मायबोली वर टाकेन. त्यांची लिंक इथे नक्की देईन. Happy खुप खुप धन्यवाद ! Happy