युगांतर- आरंभ अंताचा!

Submitted by मी मधुरा on 18 July, 2019 - 22:57

अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा!

युगांतर- आरंभ अंताचा!

महाभारत! ही कथा नक्की कोणाची?
सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची? की ज्याने कर्तव्य करत, युद्ध नावाच्या अग्निकुंडात, प्राणांची आहूती देउन, वीर गती प्राप्त केली त्याची? की.... जो यात सहभागी होउन सुद्धा निशस्त्र राहिला त्याची?

ही कथा आहे ढळलेल्या पदराची! तुमच्या नजरेसमोर असहाय्यपणे श्रीकृष्णाला लज्जारक्षणासाठी हाक मारणाऱ्या द्रौपदीची छबी आली असेलच. पण एक पदर त्या आधीही ढळला होता....खुप आधी!

स्वर्ग.... सुगंधी द्रव्ये आणि तालबद्ध वाजणाऱ्या वाद्यांच्या लयित मुग्ध करून टाकणारे मनोहर नृत्य आणि नृत्य करणाऱ्या अप्सरांचे इहलोकीचे अप्रतिम सौंदर्य. सर्व सुखे देवलोकांच्या ठायी रेंगाळत होती. महाभिषक, इंद्र देव, वरूण देव सारे तल्लीन होऊन नृत्य बघत असतानाच ब्रह्मदेव आणि ब्रह्मापुत्री गंगा तेथे अवतरले.
गंगा.... शुभ्र वस्त्र, गोरा वर्ण, घनदाट वळणदार केस, मानेवर रुळलेले हिऱ्यांचे नाजूक दागिने, चेहऱ्यावरील स्मित. आहाहा! डोळ्यात साठवून घ्यावे असे सौंदर्य. महाभिषक तिच्या काळभोर नेत्रांकडे पाहत होता. त्या काळ्याशार समुद्रात खोलवर तळाशी आपल्या अस्तित्वाचे सार आहे असे भासू लागले. तो बघतच राहिला. गंगा आसनस्थ झाली. तिने सर्वत्र नजर फिरवली आणि महाभिषकावर तिची नजर खिळली. दोघे एकमेकांच्या नजरेत असे काही हरवले की गंगेचा पदर वाऱ्याच्या एका खट्याळ झुळूकेने उडवून दिला तरी तिला आणि त्याला त्याचे भानच राहिले नाही. नृत्य थांबले. स्त्री- दाक्षिण्य दाखवत बाकी साऱ्या देवांनी मान झुकवली.
परंतु गंगा आणि महाभिषक अजूनही एकमेकांमध्ये मग्न होते. त्या क्षणी सर्व जगाचा विसर पडलेल्या गंगा आणि महाभिषकाला पाहून ब्रह्मदेवांची क्रोध पातळी शिगेला पोचली.
आणि विज कडाडावी तसे ब्रह्मदेव कडाडले.
गंगा आणि महाभिषक दचकून ब्रह्मदेवाकडे पाहू लागले. आपण शीघ्रकोपी शिव-शंकर नाही, ब्रह्म देव आहोत, गंगा आपली पुत्री आहे, हे सारं विसरून दोघांनाही मृत्यूलोकांत जाण्याचा अभिशाप देउन तेथून पुढच्या क्षणीच ब्रह्मदेव अंतर्धान पावले.

अनपेक्षित! सारे निस्तब्ध झाले होते. एक असह्य शांतता वातावरणात भिनली.

महाभीषकाच्या अंतर्मनात विचारांचे काहूर उठले. 'नजरानजर झाली म्हणून एव्हडा भयंकर शाप ? जन्म मृत्यूच्या फेऱ्यात स्वर्गातून केलेला कडेलोटच की! स्वर्गी आपल्या कर्तुत्वाने मिळविलेले स्थान असे क्षणात गमावले आपण? नृत्य करणाऱ्या अप्सरांचे अत्यल्पशा वस्त्रांमधले रुप ज्या नजरेने बघतात त्या नजरेत असते वासना! त्या नृत्यांगनांवर खिळलेल्या नजरांबद्दल मात्र कुणालाच आक्षेप नव्हता. गंगादेवी आणि माझी झालेली नजरानजर तर पवित्र प्रेमाची होती. वासनेचा लवलेश तरी होता त्यात? का ब्रह्म देवा? का केलत असं?'' शापित महाभिषक हळहळला.

परंतु, हा शाप भोगतानाही गंगादेवी सोबत असेल तर आपण हा शापाचा भार लिलया पेलू असेही महाभिषकाला कुठेतरी वाटत होते. पण नियतीचे चाक नेमके कोणत्या दिशेने फिरेल हे खुद्द काळ सुद्धा सांगू शकत नव्हता. कोण जाणो, एक शाप पूर्ण होण्याआधीच, कुठेतरी दुरवर, कोणी तरी एखाद्या महा तपस्वी ऋषी मुनींच्या शापाला आमंत्रण देत असेल आणि तो भार आपल्या शापाला अजून कठीण बनवेल!

गंगादेवी पिताश्री ब्रह्मदेवांच्या शापाने आत्मक्लेशात जळत होती. हा दाह कमी व्हायलाच हवा.... सर्वांना शितल पवित्र जल देणारी, स्वत: आज शाप भोगण्यासाठी स्वर्गातून धरेवर आगमन करायला सज्ज झाली. देवी देवतांनाही शाप-उ:शापाच्या अनियंत्रित फेऱ्यांतून सुटका नसते, हेच सत्य!

महाभिषकाला मात्र मृत्यूलोकात येण्याकरिता मनुष्य रुपात जन्म घेणे बांधिल होते. या शापातही गंगादेवी सोबत असेल या विचारांनी मुखकमलावर पुसटसे स्मित उमटले. ती एकच त्याच्या शापरुपी जन्माच्या तप्त उन्हातली दाट छाया बनणार होती.

गंगा धरतीच्या मार्गाकडे बघत उभी होती. गंगेचा ढळलेला पदर अजूनही हवेत हेलावत होता.

#Yugantar_Part1
#Mahabharat
#Yugantar_Aaramb_Antacha
क्रमशः

© मधुरा
Part 2 link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2539196086139752&id=10000148...
तळटिप: खालील चित्र नेट वर मिळालेले आहे.
yugantar 1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मन्या ऽ ! Happy फे.बु. वर ३ भाग पोस्ट केलेले आहेत.
Part 1 Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2536580073068020&id=10000148...
Part 2 Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2539196086139752&id=10000148...
Part 3 Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2540685042657523&id=10000148...
नक्की वाचा आणि लोकांसोबत वाटून द्या. महाभारत आणि रामायण सर्वांना अधिकाधिक आवडावेत, हाच प्रयत्न आहे. Happy

छान लेखन. भगिरथामुळे गंगा धरतीवर अवतरली एवढीच माहिती होती. आता नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.

MAST

अगदी अभ्यासपूर्ण कथा आहे. मस्तच
मधुरा उर्वरित भाग फेसबुक पेक्षा इथेच वाचायला आवडतील.
लवकरच करा पोस्ट.

धन्यवाद सिद्धी Happy
मी रोज कमीत कमी एक भाग मायबोलीवर टाकेन.