मी गंगोत्री

Submitted by मुक्ता.... on 17 July, 2019 - 16:23

मी गंगोत्री!!

पुढे जाते गंगा वाहत वाहत
हिमालयाच्या कडेवरून
अशी उड्या घेत घेत,
लयदार वळणे घेत घेत
दुथडीने वाहते ती...

वाहता वाहता संथ होते
आणि संत पण होते,
आणि काय सांगावी कथा,
कुणालाच नाही कळत
माझ्या लेकीची व्यथा
पाप पोटात समावते ती,
तरीही
दुथडी भरून वाहते ती....

अनेक मंदिरे, अनेक घाट
जिथे तिथे पूजेचा थाट,
करतात आरती मांडून पाट,
तेच पाणी पवित्र,
जिथे हजारो लोक एकाच वेळेला
धुतात त्यांची पापं,
अनेक कारखान्याचं, मैलापाणी
करतं शरीर पवित्र,
त्यातच मिळते मृतांना मुक्ती
जेव्हा त्यांची राख इथे होते पवित्र!!

माझी लेक वहातच रहाते,
घेऊन जाते सगळ्यांचे सगळं काही,
करते अर्पण सागराला,
तो जलधी, पुन्हा पाठवतो
अमृत, मेघरुप देऊन,
बरसते हिम पुन्हा पुन्हा

मी गंगोत्री,
उनस्पर्शाने मी वितळत रहाते
तिला जन्म देत राहते,
अमृत तिला पाजत रहाते,
उणे मात्र तुमचे ती चुकवत रहाते,
माझी गंगा,

मी गंगोत्री,
अनेक इतिहास मी पाहत आले,
निसर्गाचे सौम्य, रौद्र मी रिचवत आले,
कहर मात्र तुम्ही करताय,
जहर मात्र तुम्ही पसरवताय!

मी गंगोत्री,
आज उणाचे ऋण परत मागते
आटत चालला माझा पान्हा,
तो परत मागते.....
मला नुसते हात जोडू नका
गंगेला घुसमटवून मारू नका,

मला वाचवा....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा..प्रवास जितका सुंदरतेने सुरु होतो तितकाच तो नंतर अस्वच्छ आणि विद्रुप होत जातो.याची खंत कवितेत खुप सुंदरतेने मांडलीये.
पु.क.प्र! Happy