विषवल्ली ! -2

Submitted by अँड. हरिदास on 16 July, 2019 - 03:21

प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण हे असतंच..काही वेळा समोर दिसतं, काही वेळा अज्ञात असतं. पण,कारणाशिवाय काहीही घडत नाही. आपण घटनाक्रमाकडे कोणत्या दृष्टीने बघतो यावर सर्व काही अवलंबून असतं असतं. राजेशला अर्धजागृत अवस्थेत आलेला अनुभव बऱ्याच अर्थाने सूचक होता. पटवर्धनांच्या वाड्यात कोणते प्रकार चालायचे; किंबहुना, पटवर्धनांचे व्यक्तित्व कसं होतं. हे दर्शवणारा तो एक इशारा होता. राजेश ने तो समजून घेतला असता तर कदाचित पुढच्या घटना रोखता आल्या असत्या.. ? कुणी सांगावं? कदाचित हा घटनाक्रम अगोदरच निश्चित झाला असावा..!

राजेश सकाळी जागा झाला तेव्हा त्याचं डोकं प्रचंड ठणकत होतं. “आपण कुठे आहोत?” हेच त्याला क्षणभर कळलं नाही. चार दोन क्षण गेल्यावर त्याची स्मृती जागृत झाली.. संपूर्ण घटनाक्रम नजरेसमोरुन तरळुन गेला, आणि राजेशच्या अंग शहारलं.

“या जागेपासून दूर गेल पाहिजे!”

मनात आलेल्या विचारावर त्याने ताबडतोब अंमल केला. चेहऱ्यावर पाणी मारून आणि नुसतच तोंड विसळून तो वाड्याच्या बाहेर पडला. पोटात भुकेची आग लागली असल्याने प्रथम एका हॉटेलमध्ये जाऊन त्याने भरपेट नाश्ता घेतला. नाष्टा संपवून हातात कॉफीचा कप आल्यावर त्याचे विचार काहीशे स्थिर झाले. रात्रीच्या प्रसंगावर आता तो खुलासेवार विचार करू शकत होता.

“रात्री जे दिसलं ते स्वप्न होतं की, आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होतो?”, यावर त्याचं स्पष्ट मत बनलं नाही. पण, वाड्यात काहीतरी काळंबेरं आहे, यावर मात्र त्याचं ठाम मत झालं.

“आता पुन्हा वाड्यात जायचं असेल तर सुरक्षिततेची काळजी आपण घेतली पाहिजे!”

“पण, काळजी घेणार कशी?”

“पुन्हा त्या वाड्याकडे फिरकू नये! ”

एक क्षण त्याच्या मनात विचार आला..पण त्याने तो रद्द केला. ही मालमत्ता आपण काही कुणाकडून बळजबरीने मिळवलेली नाही. नशिबाने चालून आलेली प्रॉपर्टी अशीच सोडून द्यायला राजेशचे मन काही तयार होईना..!

“या वाड्याचं आणि पटवर्धनांचं काय प्रकरण आहे?, हे कळल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही. आणि त्यांच्याबद्दल केवळ जंगम वकीलच माहिती देऊ शकतात!” असा विचार करून राजेश जंगम वकिलाच्या कार्यालयाच्या दिशेने चालायला लागला.

राजेश कार्यालयात आला तेव्हा ऍड. जंगम कोर्टात जाण्याची तयारी करत होते. राजेशला पाहून त्यांना नवल वाटलं नाही..जणू काही राजेश चे येणे त्यांना अपेक्षितचं होते. राजेशला समोरच्या खुर्चीवर बसवून त्यांनी आपली जागा घेतली.

“बोला राजेशजी आज काय काम काढलं इकडे?”

ऍड. जंगमनी व्यावसायिक मधुरतेने सुरवात केली.

“वकील साहेब, जास्त प्रस्तावना करत बसत नाही..त्याची काही जरुरीही मला वाटत नाही. काल रात्री पटवर्धनांच्या वाड्यात मला एक विचित्र अनुभव आला.. त्यावरून त्या वाड्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा माझा संशय आहे. कदाचित तुम्हाला काही माहित असेल...! किंव्हा नसेलही. पण मला वाडा आणि पटवर्धन यांच्याविषयी तुमच्याकडे असलेली सर्व माहिती हवी आहे...त्यासाठी तुम्हास काही फिस हवी असेल तर ती सुद्धा देण्यास माझी तयारी आहे.. फक्त मला हे पटवर्धन आणि त्यांच्या त्या वास्तु संदर्भात पूर्ण माहिती मिळाली पाहिजे.”

राजेश ने सरळ मुद्द्याला हात घातला.

“बघा, राजेशजी पटवर्धनांशी माझा संबंध कागदपत्रांच्या कामापुरताच. त्यांचा वाडा आणि त्यांचे उद्योग, याबद्दल मी फार काही सांगू शकणार नाही... काही गोष्टी कानावर आल्या आहेत.. पण, त्यावरून आपण काय अंदाज बांधणार? सत्य काय आणि असत्य काय? हे आपल्याला थोडेच माहित आहे!”

“वकील साहेब, सत्य-असत्याच्या भानगडीत पडू नका.. तुम्हाला जे काही माहिती आहे ते सर्व तपशिलासह सांगा.!”

राजेशने हात जोडून विनंती केली..जंगम वकिलांनी काही क्षण त्याच्याकडे निरखून बघितले. ते काहीसे विचलित झाल्यासारखे वाटले. मात्र लगेच स्वतःला सावरत त्यांनी बोलायला सुरुवात केली..!

“हे पटवर्धन म्हणजे विलक्षण माणूस! साधारण सहा सात वर्षांपूर्वी एका संध्याकाळी पटवर्धन माझ्या ऑफिसात आले. त्यांच्या एका जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. त्यात त्यांनी वकील म्हणून माझी नेमणूक केली. त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. जमिनीच्या दाव्यात निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. पण तरीही, पटवर्धनांनी त्यांची सर्व कामे माझ्याकडे सोपवली. मलाही अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळत असल्याने पटवर्धनांचे काम मी प्राधान्याने करू लागलो..
बरोबर तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सकाळी सहा वाजताच मला नजीकच्या पोलीस स्टेशनमधून फोन आला. फोनवर पटवर्धन होते.. पोलिसांनी त्यांना एका मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केली होती. मी त्यांचा जामीन घ्यावा यासाठी पटवर्धनांनी मला फोन केला होता. तसं बघितलं तर माझ्यासारख्या वकिलांसाठी ही सर्वसाधारण बाब! आरोपीचा फोन येणे आणि त्याची जमानत घेणे हे नित्याचेच!! पण, पटवर्धनांच्या फोन मुळे मला थोडा धक्का बसला. एक श्रीमंत आणि सरळ मार्गे माणूस मी त्याला समजत होतो. तो असा अपहरण प्रकरणात सापडल्याने मला नवल वाटले. नंतर पटवर्धन यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.. ! अपहरण स्थळी पटवर्धन योगायोगाने उपस्थित असल्याचे न्यायालयाने मान्य केले. मात्र माझ्या मनातली शंका मिटली नाही.. या प्रकरणातील तपास अधिकार्‍याचेही समाधान झाले नव्हते. पण पुरावा नसल्याने तो काहीही करू शकत नव्हता. दोन महिन्यानंतर त्या अपहृत मुलीचं शव पोलिसांना मिळालं..छातीत सुरा भोकसून तिची हत्या करण्यात आली होती. त्या मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आले होते. मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर प्रकरण मोठे गाजले. पण पुराव्याअभावी खुन्याचा पत्ता लागू शकला नाही. त्या घटनेनंतर पटवर्धन विषयी माझं मत दूषित झालं. मी त्यांच्या भेटी टाळू लागलो. अर्थात, ते काही शक्य झालं नाही. मी दोन-तीन वेळाचं तसा प्रयत्न करुन बघितला. पण त्यानंतर आलेल्या अनुभवाने शहाणा होऊन नंतर मी प्रयत्न केला नाही.
एक दिवस पटवर्धन मला भेटण्यासाठी कार्यालयात हजर झाले.. त्यांना भेटण्याचं टाळून मी तसाच कोर्टात निघून गेलो. कोर्टातूनच परस्पर एका मित्रासोबत पार्टीला गेलो.. रात्री अकराच्या सुमारास मी घरी परतत होतो. काय झालं कुणास ठाऊक? पण माझी गाडी आपोआप पटवर्धनांच्या वाड्याकडे वळली. बरोबर 12 वाजता मी वाड्यासमोर उभा होतो. दरवाजा लोटून आत गेलो..खोलीत फक्त दरवाजा उघडा तेवढाच प्रकाश आत पोहोचला होता... खोलीमध्ये पाउल टाकले सगळ्या फरशीवर कुंकू आणि हळदीचा थर साचला होता...समोरच्या गोष्टी अगदी स्पष्ट दिसू लागल्या...! समोर कोणीतरी जमिनीवर पाट टाकून त्यावर मांडी घालून बसल होत अंगात फक्त धोतर होते पाठीवरती लांबसडक काळीभोर जट नागासारखी लोंबत होती कंबरेच्या धोतरा भोवती लालसर कापडाचा पट्टा गुंडाळला होता. दोन्ही हात कुंकूवाणे अगदी हाताच्या कोपरा पर्यंत भरलेले होते. हाताच्या डाव्या बाजूस एक मुलगी बसली होती. पूर्णपणे नग्न..तिच्या मागे अजून मुली असाव्यात! समोर बसलेल्या व्यक्तीचे वेगळेच मंत्रोच्चार चालू होते. दुसऱ्या क्षणी त्याने आपले सर्व उच्चार थांबवले. उधळत्या कुंकूचे हात थांबवले..आता त्याचा चेहरा मी बघू शकत होतो..तो पटवर्धनचं होता. त्याची माझी नजरानजर होताच माझं काळीज भीतीने शहारलं. खोलीत एक भयानक रौद्र हास्य उमटलं..खीखीखी करणारा आवाज केव्हा राक्षसमय होऊन गेला, समजलेच नाही...! त्या आवाजाने माझी शुद्ध हरपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेंव्हा मी माझ्या गाडीत होतो. गाडी, ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली तिच्या आवारातचं उभी होती. जास्त झाल्याने मला झोप लागली असल्याचा निष्कर्ष सगळ्यांनी काढला. अर्थात, ही हकीकत मी कुणालाचं सांगितली नाही. ते स्वप्नं होते की हकिकत? मला माहित नाही. पण एक मात्र सत्य, 'पटवर्धनांना नाही म्हणता यायचं नाही' हे मला त्यादिवशी उमगलं..नव्हे तर तसे शब्दच माझ्या मनावर कोरले गेले. त्यानंतर पटवर्धनांची अनेक कामे मी केली. त्यात आता कायदेशीर-बेकायदेशीर तपासण्याचा अधिकार मला राहिला नव्हता. तुमच्याकडे मालमत्ता सोपविण्याचे कामही त्यातील एक.

दोन घोट पाणी पिऊन ऍड जंगम यांनी आपली हकीकत समोर नेली!

“राजेशजी काही गोष्टी अपरिहार्यपणे स्वीकाराव्या लागतात. आपला त्याला नाईलाज असतो. अर्थात, या गोष्टी रोखण्याचे किंव्हा त्याला प्रतिकार करण्याचे काही उपाय असतीलही! पण, मी त्या मार्गाने गेलो नाही. जे समोर आलं ते मूकपणे सहन करण्याचा मी निर्णय घेतला होता. त्या दिवशीच्या घटनेनंतर माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत..! पटवर्धन अघोरी आणि काळ्या शक्तीचे साधक आहेत..कुमारी तरुणींनीचा बळी देऊन त्यांनी कसली तरी शक्ती जगवलेली आहे. आशा एक ना अनेक कथा त्यांच्याबद्दल ऐकायला मिळाल्या. पण त्यावर मी कधीच विचार केला नाही. त्या दिवशीच्या घटनेनंतर माझा सर्व ज्ञानावरचा, सर्व गृहितांवरचा विश्वासच कोसळून पडला, त्याचा चक्काचूर झाला. तुम्ही मला काहीही म्हणा पण त्या घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची माझी इच्छा नव्हती.. आजही नाही. मुळात, मी त्याचा विचारचं करत नाही..!”

“मला जी माहिती होती, ती तुम्हला दिली आहे..आता सर्वस्वी निर्णय तुमचा..!”

जंगम वकिलांचे आभार मानून राजेशने त्यांचा निरोप घेतला. पण, आता करायचे काय? हा प्रश्न त्याला सतावत होता. ऍड. जंगम यांच्या हकीकती वर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच नव्हता; घटना घडल्या होत्या हे निर्विवाद होतं. त्याच्या विश्वास-अविश्वासाला काय महत्त्व होतं? घटना त्यांच्या मार्गाने घडत राहणारच होत्या; पण आता त्याला निवड करायची होती. त्या वास्तूत राहून तो त्या घटनाप्रवाहात सहभागी होणार होता का?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप लहान वाटतोय भाग.>>
>>पुढील भाग देतांना लिंक तुटणार नाही, याची काळजी घेईल. धन्यवाद

Hi Katha evdyatach mi wachli ahe, fakta patranche nav tevde badalale ahe baki sagli katha sarkhich ahe, mala kathech nav atta athwan nahi ahe krupaya tumhi ekda tapasun ghya

अतुलजी एवढंसं सांगायला नवीन आयडी का काढतात बरं लोक्स !!
जुन्या आयडीने मत मांडले तर काही शिक्षा नाही करत इकडे कोणी Light 1

> धारपांची अशीच एखादी कथा आहे का?
मला अशी कथा वाचल्यासारखी वाटतेय > खरंतर या साहित्यप्रकारातल्या सगळ्या कथा थोड्याफार सारख्याच वाटतात. मला आठवतंय त्यानुसार द्वादशांगुलाची एक कथा होती, अज्ञातवासीची एक, मिरिंडाची चिरूमला आहेच....

Hi Katha evdyatach mi wachli ahe, fakta patranche nav tevde badalale ahe baki sagli katha sarkhich ahe, mala kathech nav atta athwan nahi ahe krupaya tumhi ekda tapasun ghya>अतुल जी, आपण वाचलेल्या कथेची लिंक मिळू शकली तर शंका उरणार नाही.

खरंतर या साहित्यप्रकारातल्या सगळ्या कथा थोड्याफार सारख्याच वाटतात.> सहमत, हा साहित्यप्रकार बहुतांशी काल्पनिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे कदाचित असावं.

Narayan Dharapanchi Kadambari, "SANKRAMAN" Amezon Kindel war available ahe, watlyas apan ekda to kadambari wachawi, donhi kathanchya surwatis khup samya distay.