चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार - स्पॉईलर अलर्ट

Submitted by भागवत on 16 July, 2019 - 01:28

हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे "शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई". पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे. एक गरीब विद्वान गणितज्ञाला शिक्षणा साठी पैसे न मिळाल्यामुळे जीवनाच्या संघर्षा साठी सायकल वर फिरून ५ रुपयाचे पापड विकावे लागते हे बघून हृदय पिळवटते. चित्रपटाचा पहिला भाग उत्तम रित्या साकारण्यात आला आहे.

कास्टिंग दिग्दर्शकची कमाल आहे. हृतिक रोशनला मुख्य भूमिकेत घेण्यात आले आहे. कुठे धूम, आणि bang bang चा निळ्या डोळ्याचा स्टाईलिश हिरो आणि कुठे शिक्षणासाठी संघर्ष करणारा, आणि परिस्थिती ने गांजलेला नायक... हृतिकने ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली आहे. त्याच्या अभिनयातून, देह बोलीतून, डोळ्यातून, आणि बोलण्यातून "आनंद कुमार" सुंदर रित्या उलगडला आहे. चित्रपटाचा पहिल्या फ्रेम पासून हृतिक आपल्याला हृतिक न वाटता गणितज्ञ "आनंद कुमार"च वाटतो. उत्तम संवाद आणि संयमित अभिनय यामुळे हृतिक उठून दिसतो. गणितज्ञ "आनंद कुमार" यांना केंब्रीज इथे शिक्षणा साठी संधी मिळते ते ३० गरीब विद्यार्थीना घेऊन IIT च्या तयारी साठी “सूपर ३०” चा संघर्ष मय स्थापना करणार आनंद उत्तम रंगवला आहे. आनंदला आनंद साजरा करतानाचे दृष्य पाहण्या लायक झाले आहे. जेव्हा आनंद कुमारच्या स्वप्नांना परिस्थितीने विराम लागतो त्यानंतर आनंद कुमार दुप्पट मेहनतीच्या जोरावर दुसर्‍यांच्या स्वप्नांना बळ देतो. हाच महत्वाचा संदेश चित्रपटात देण्याचा प्रयत्न करतो.

आनंदच्या वडीलांची “ईश्वर” यांची भूमिका करणारे जेष्ठ कलाकार “विरेंद्र सक्सेना” यांनी उत्कृष्ट रित्या उभारली आहे. त्यांनी भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे आणि त्यांच्या पात्राचा उत्तम आलेख उंचावण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. हे पात्र पहिल्या भागात हास्याचे कण शिंपडतो. “मृणाल ठाकुर” ची मोठी भूमिका नसली तरी पण तिने उत्तम काम केले आहे. आनंद कुमार वर मनापासून प्रेम करणारी प्रेयसी छान रंगवलेली आहे. कथेत तिला जास्त वाव नाही. पण ऐन मोक्याच्या क्षणी आनंद कुमार ला वाचवणारी पूर्व प्रेयसी भाव खाऊन जाते. या चित्रपटातील मृणालचा प्रवेशाचा पहिला संवाद जमून आला आहे. “पंकज त्रिपाठी” या कलाकाराला कोणतेही काम दया आणि पात्र कितीही वेळाचे घ्या. “त्रिपाठी” तिथे आपली छाप सोडतोच. इथे सुद्धा विनोदाला व्यंग्यात्मक फोडणी देत भ्रष्ट मंत्र्याची भूमिका अत्यंत कडक केली आहे. “आदित्य श्रीवास्तवा” यांनी सुद्धा “लल्लन सिंग” यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. हा खलनायक साम-दाम- दंड- भेद या नीतिचा वापर करून तो “आनंद कुमार” यांना नमवण्याचा प्रयत्न करतो. आनंद कुमारच्या भाऊ, आई आणि इतर ३० विद्यार्थी यांनी आप-आपल्या भूमिका मस्त साकारल्या आहेत. अमित सदने एक छोटीशी पण चांगली भूमिका निभावली आहे.

चित्रपटाला संगीतकार अजय-अतुल याचं संगीत लाभलेले आहे. पार्श्वसंगीतावर सैराटचा प्रभाव टळक जाणवतो. पाच गीत आहेत पण विशेष असे एकही गीत लक्षात राहत नाही. त्यातल्या त्यात “जुगर्फिया” हे गाणे चांगले झाले आहेत. छायाचित्रण, चित्रपट संपादन, कॉस्टयूम डिझाइन, इतर विभागाने आपले काम चोख रित्या पार पाडले आहे.

एका क्षणात तुमचे संपूर्ण जग बदलण्याची क्षमता असते. तो क्षण फक्त तुम्हाला ओळखायचा आणि अमलात आणायचा असतो. हा प्रसंग दुसर्‍या भागात अधोरेखित केला आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढा तुमच्या स्मरणशक्ती, विचार, नेतृत्व आणि सहनशक्ती यांचा कस लागून तुमचे धैर्य आणि संयम वाढण्यास मदत होते. यांचे सुंदर चित्रण दुसर्‍या भागात आहे. पण त्यासोबत काही अतार्किक गोष्टी सुद्धा आहेत. त्या गोष्टी सोडल्या असत्या तर चित्रपट आणखी बहरला असता. जसे “बसंती नो डान्स” हे गाणे टाकले नसते तरी चालले असते. पटकथेवर आणखी काम करायला हवे होते. काही चुका झाला आहेत त्या कमी करता आल्या असत्या. दिग्दर्शकाचा बायोपिक ड्रामाचा प्रयत्न चांगला आहे. चित्रपट एक हुकलेला षटकार आहे कारण पटकथा आणखी प्रवाही होऊ शकली असती.. दुसरा भागातील उणिवा कमी शकल्या असत्या. जसे की “बसंती नो डान्स” ऐवजी दुसरे काही प्रतिमात्मक दर्शवले असते किंवा चित्रपट रीळ लांबी सुद्धा कमी करता आली असती. चित्रपटात काही-काही क्षण खुप सुंदर आहेत पण त्यांचा एकसंध प्रभाव तयार होत नाही. एकसंध प्रभाव तयार झाला असता तर चित्रपटाने षटकार लगावला असता.

हृतिकचा चांगला अभिनय, चांगली कथा, सर्वसाधारण पटकथा, सहायक अभिनेते आणि अभिनेत्रीने केलेले उत्तम काम, एका खऱ्या घटनेला एका चांगल्या प्रेरणादायी चित्रपटात रुपांतरीत करायचा चांगला प्रयत्न... काही वेळा अचंबित करणारा आणि काही वेळा साधारण वाटणारा... एक हुकलेला षटकार... पण तुम्हाला संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देणारा चित्रपट एकदा आवर्जून पाहण्या सारखा नक्कीच आहे. हा चित्रपटाला कमीत कमी अडीच स्टार द्यायलाच हवेत...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हृथिक कलाकार म्हणून फार भावला नाही कधी फक्त कहो ना प्यार है मधे आवडला. पण तू लिहिलेला प्रतिसाद बघून आता लवकरचं बघणार आहे. आभार.

कुठल्यातरी जाहिरातीमध्ये ह्या चित्रपटाचा एक छोटा सिन दाखवत असतात सध्या. ऋतिक आहे त्यात. भातावरून शित चांगले असावे असे वाटत होते. हे परीक्षण पाहून पहायला हवा आता.

चांगले परिक्षण.
कुठे धूम, आणि bang bang चा निळ्या डोळ्याचा स्टाईलिश हिरो आणि कुठे शिक्षणासाठी संघर्ष करणारा, आणि परिस्थिती ने गांजलेला नायक.>>>अगदी. तसे दिसण्यासाठी त्याला किती मेक-अप करावा लागतो Happy

शिक्षणा साठी संधी भेटते >> येथे 'संधी मिळते' असे असायला हवे ना?

नाही, सोलापुरात कधीही संधी भेटत नसते. फक्त मिळत असते.

चित्रपट अत्यंत आवडला. हृतिकने कमाल केलीये. टाळ्या.

चित्रपट काल पाहिला. हृतिकचे आजवरचे सर्वात चांगले काम. तो क्षणभरही हृतिक न वाटता आनंद कुमार वाटतो, भाषेचा लहेजा त्याने उत्तम उचललाय. केम्ब्रिजला संधी मिळाली हे कळल्यावर, गाडीला धडकून सायकल पडल्यावर पडलेले पैसे शोधताना, आपली पूर्व प्रेयसी समोर आलीय हे लक्षात आल्यावर, 30 च्या 30 मुले निवडून आल्यावर ह्या सगळ्या प्रसंगात त्याने कमाल केलीत. त्याला पुढेही अशाच चांगल्या भूमिका मिळोत.

शेवटचा हॉस्पिटलातील प्रसंग थोडा नाटकी वाटला.

आनंदकुमारबद्दल विकीवर वाचले. त्याने सलग 3 वर्षे पूर्ण 30 जणांच्या तुकडीला प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. त्यानंतरही 25 ते 28 च्या दरम्यान मुले यश मिळवत आहेत. अंबानी, महिंद्रा इत्यादी लोकांनी सामाजिक जबाबदारीअंतर्गत देऊ केलेली मदत नाकारून आजही आई व भावाच्या साहाय्याने तो हा एक वर्ग चालवतोय. पैसे घेऊन दुसरे वर्ग चालवून यासाठी पैसे गोळा करतोय आणि आजही त्याच्यावर शिक्षणक्षेत्रातील माफियांकडून हल्ले होताहेत.

आनंद कुमारची मुलाखत बघितली. त्यात तो म्हणाला की चित्रपटाच्या कथेत त्याचा खूप मोठा सहभाग आहे, लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी अतिरंजित काहीही घालायला त्याने नकार दिला, हृतिकने आपली भूमिका करावी हा त्याचाच आग्रह.

या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलचा प्रसंग किती खरा असे वाटते, पण शेवटी reality is stranger than fiction हेही तितकेच खरे आहे.

तसे दिसण्यासाठी त्याला किती मेक-अप करावा लागतो >>>>>
खऱ्या आनंदकुमारने चित्रपटात मुख्य भूमिका केली असती तर इतकी चर्चा झाली असती का?

मेकप विक्रम गायकवाडनी केलाय. अप्रतिम काम. डोळ्यांना फारसा मेकप करता येत नसल्याने मला खूप वेळा ते निळसर वाटले व सावळ्या चेहऱ्यावर विसंगत वाटले. Happy Happy

प्रदर्शित झाला तेव्हा डळमळीत सुरवात झाली पण आता चांगला जोर पकडलाय. इथे नव्या मुंबईत सर्वत्र जवळपास हाऊसफुल जातोय.

reality is stranger than fiction >> अगदी खरंय.
तो ‘छलांग लगाना‘ चा संवाद पण आवडला.
खर्‍या आनंदकुमारवर म्हणे खोट्या केसेस ठोकल्या आहेत सध्या. त्यातच त्याचा वेळ जाऊ नये ही इच्छा. त्याला इतरांचा आधार पण मिळायला हवा.

reality is stranger than fiction >> +१
चित्रपट काल पाहिला. हृतिकचे आजवरचे सर्वात चांगले काम. तो क्षणभरही हृतिक न वाटता आनंद कुमार वाटतो, भाषेचा लहेजा त्याने उत्तम उचललाय. केम्ब्रिजला संधी मिळाली हे कळल्यावर, गाडीला धडकून सायकल पडल्यावर पडलेले पैसे शोधताना, आपली पूर्व प्रेयसी समोर आलीय हे लक्षात आल्यावर, 30 च्या 30 मुले निवडून आल्यावर ह्या सगळ्या प्रसंगात त्याने कमाल केलीत. त्याला पुढेही अशाच चांगल्या भूमिका मिळोत. >> +१
प्रतिसादा साठी धन्यवाद साधना आणि सुनिधी !!!

सिनेमा जमलाय.
आनंदचं काम पोहचतं प्रेक्षकांपर्यंत.
रीतीक अगदीच कोमिग मधल्या रोहितसारखा संवाद्फेक करतो (आणि थोडीफार लकबपण) काही काही सीन्समधे.
तो गरीब न वाटता रीच वाटत रहातो.

सिनेमात तर साफ सफाई चे काम करणारा, डोंबारिण ईत्यादि ज्यानी कधीच शाळेत गेले नसतील, ज्यांना साधे गुणाकार, भागाकार हे शब्द ही माहित नाही असे विद्यार्थी दाखवले आहेत. ते कधी शाळेत जात होते असे ही दाखवले नाही आहे !!!

जात होते हो. पहिल्या क्लासच्या वेळी आनंद कुमार विचारतो अभ्यास कधी करत होता म्हणून... मुले उत्तरे देताना दाखवलीत

मुलांना काय बनायचे हे त्यांना माहीत होते, आनंद कुमार भेटायच्या आधीपासून त्यांचे स्वप्न होतेच. फक्त स्वप्नपूर्ती शक्य नव्हती, आनंदकुमारने शक्य करायचा मार्ग उपलब्ध करून दिला.

मी ट्रेलर पाहिला त्यात को मी ग ची छाप दिसली हृतिकच्या बोलण्यात चालण्यात. पण चित्रपट पाहताना मला तरी त्रास झाला नाही. तरुण आनंदकुमार जरा अवघडल्यासारखा वाटतो, वडील गेल्यानंतर अगदी सामान्य वाटतो.

मुलांना ऍडमिशन देण्या आगोदर आनंदकुमार त्यांची परीक्षा घेतो. प्रत्येक मुलांना त्यांच्या स्वप्नांन बद्दल विचारतो. साफ सफाई व डोंबारिण दाखवले असले तरी त्यांचे बारावी शिक्षण झाले आहे.

अजुन एकदा पहायचाय. थेटरातुन गेला इथल्या. बघु केव्हा पहायला मिळतोय.
मलापण कोई मिल गया सारखे काही वाटले नाही. अर्थात त्यातली ती भुमिका पण खुप आवडली होती.
उगीच ते मुझसे दोस्ती करोगे वगैरे केले याने. जाऊदे , आता करत नाही हे चांगले आहे.

नाटकीपणा आहे सिनेमा म्हणजे. कास्टींगचीच गडबड आहे
प्रोटोगॉनिस्टचं कास्टींग चुकलं आहे. गरीबीतून वर आलेला गरिबातला नायक ह्र्तिक वाटत नाही. त्याच्या लुक,कमावलेलं शरीर ,ताम्रट बनवलेला चेहरा हा आनंदकुमारशी विसंगत वाटतो,बिहारी ॲक्सेंट गडबडला आहे हे कुणीही सांगेल.
एकंदर अनेक विसंगतीने भरलेला सिनेमा आहे जो मुळ व्यक्तीला कमीपणा आणतो. हॉस्पिटलवर झालेला हल्ला आणि त्याला लिलया परत्वलेलं दाखवणं हा फाजील पोरखेळ वाटावा इतका हास्यास्पद प्रसंग आहे. सिनेमा आवडला नाही पण मुळ आनंदकुमार अनेकांनी युट्युबवर पाहिले व माहित झाले ही जमेची बाजू.

आज हा सिनेमा पाहिला. आवडला. विशेषतः पहिला भाग.
हृतिकने काम छान केलेय पण त्याचा रुबाबदारपणा कितीही रापलेला मेकप केला तरी लपत नाही. ती बिहारी स्टाइल्ची हिंदीही त्याला विसंगत वाटते.
>>हॉस्पिटलवर झालेला हल्ला आणि त्याला लिलया परत्वलेलं दाखवणं हा फाजील पोरखेळ वाटावा इतका हास्यास्पद प्रसंग आहे.
हो हा आणि तो कंपलसरी इंग्लिश बोलणयचा होळिचा प्रसंग अगदीच अ आणि अ वाटले. नशीब हृतिकची लवस्टोरी फार घुसडली नाहीय.
अजय अतुलचे संगीत खूप आवडले. शेवटचे नियम हो गाणे छान आहे.

१ चित्रपट म्हणून आवडला

२ ऋत्विक रोशन हा प्रत्यक्ष आयुष्यात कसा माणूस आहे कल्पना नाही (कंगणा केसमुळे आणखी संभ्रम तयार झालेत) पण पडद्यावरचा हृतिक बघताना नेहमीच तो एक प्रामाणिक सहृदयी व्यक्ती वाटतो, त्याबद्दल एक आपलेपणा वाटतो. त्याच्या घटस्फोटाची बातमी ऐकली तेव्हाही एका सेलिब्रेटीचे नाते तुटले, त्या लोकांत कॉमन आहे असे वाटले नव्हते तर आपल्याच नात्यातले एखादे लग्न तुटल्यासारखे वाईट वाटलेले.

३ ऋत्विकचा यातला अभिनय आवडलाच. त्याचा लूकही आवडला. त्याची बोलण्याची ढबही आवडली. वर काही प्रतिसादांत वाचले की ते मूळ बिहारी ॲक्सेंट वाटत नाही. पण मला त्यातले काही कळत नसल्याने जे आहे तेच गोड मानले गेले.

४ क्लायमॅक्सला जे दाखवलेय की मुलं आपल्याला शिक्षकाला गुंडांपासून वाचवतात ते काही खरेही असू शकते. पण त्याचे सादरीकरण जसे केलेय त्यामुळे ते अचाट आणि अतर्क्य वाटत आहे. मूळ व्यक्ती जर खरेच असे शिक्षणमाफियांविरुद्ध जाऊन काहीतरी करत असेल तर ती मुळात धाडसीच असणार यात शंका नाही. पण शेवटची हाणामारी अविश्वसनीय वाटणे टाळता आली असती. सत्यघटनेवर आधारीत चित्रपटात ही काळजी घ्यावी लागते अन्यथा सारेच अविश्वसनीय वाटू लागते. जे खरे घडलेय ते सुद्धा...

५ गाणी बोअर नाही करत. लक्षातही राहत नाहीत. अपवाद - बसंती डोन्ट डान्स ईन फ्रंट ऑफ धिस डॉग. हे गाणे बघूनच मी हा चित्रपट बघितला. अन्यथा मला बघण्याआधी चित्रपट काय कश्यावर आहे जराही माहीत नव्हते. या गाण्याचा सीनही तसा अतिरंजित असला तरी तो क्लायमॅक्सला नाही आणि गाण्यांमध्ये अतिरंजितता दाखवली तर आपल्याकडचे प्रेक्षक ते चालवून घेतात.

हा पिक्चर खूप गोड आहे.शेवटच्या थोड्या अचाट अतर्क्य सहित.ह्रितिक ची ब्राऊनफेस (मूळ उजळ व्यक्तीने मुद्दाम टॅन करून भूमिका करणे) बद्दल निंदा झाली.पण आपल्या इथे चांगल्या कल्पना पण ग्लॅमर वाल्या लोकांना घेऊन विकाव्या लागतात.रियल लाईफ हिरोज घेऊन त्यांना अभिनय करता येईल का/त्यांना बघायला पब्लिक तिकीट काढून येईल का ही रिस्क असते.सगळं खरं दाखवून डॉक्युमेंटरी बनवली तर पुरस्कार मिळतील पण थेटरात ओस पडेल.पिक्चर बनवायचा खर्च निघणार नाही.(हे वीर सावरकर/वासुदेव बळवंत फडके अश्या काही पूर्ण खऱ्याला धरून बनवलेल्या पिक्चर्स चे झालेले आठवते.)
ह्रितिक ने अभिनयात त्याचे 110% दिले आहेत.या पिक्चर ला ऑस्कर ला जायला हरकत नव्हती.

मलापण अजुन एकदा बघायचा आहे. खुप आवडला होता. दवाखान्यातल्या सुपर मारामारीबद्दल अनुमोदन, जरा अती वाटले. कदाचीत त्यांना नीट टिपता आले नसेल प्रत्यक्षात घडलेले.