विषवल्ली !

Submitted by अँड. हरिदास on 15 July, 2019 - 07:16

images(5).jpg
विषवल्ली !

माणूस किती बुद्ध बनू शकतो..? किती इशार्‍यांकडं दुर्लक्ष करू शकतो? किती खाणाखुणांचा अर्थ लक्षात घेत नाही?... कधीकधी माणसाच्या मेंदूवर असा काही गंज चढतो की डोळ्यासमोर होत असलेल्या गोष्टीही दुर्लक्षित होऊन जातात.
आता हेच बघा ना..!
राजेशचा पटवर्धनांशी थेट काहीही संबंध नसतांना त्याला एक पत्र आलं. अन, मृत्यपत्राद्वारे त्यांची सर्व मालमत्ता राजेशच्या नावावर झाली. कोण कुठला नंदकिशोर पटवर्धन? त्याचा आणि आपला काय संबंध? याची कोणतीच माहिती नसतांना राजेशने मालमत्ता स्वीकारली. ज्या व्यक्तीला आपण आयुष्यात कधी बघितले नाही..ज्याचे नावसुद्धा कधी ऐकले नाही. त्याने जवळजवळ पन्नास लाखाची प्रॉपर्टी आपल्या नावावर का करावी? याचा तरी विचार राजेशने करायला हवा होता. पण नाही..जसा काही त्याचा विवेक गहाण पडला होता. पटवर्धनांचा वाडा आणि पटवर्धनांच्या गूढ व्यक्तित्वाबद्दल इतक्या गोष्टी कानावर आल्या असतांनाही राजेशने कारारनाम्यावर सही केली. त्याचं मन त्याला सातत्याने धोक्याचे इशारे देत राहिले. पण राजेशला त्याचाही अर्थबोध झाला नाही. “केवळ योगायोग” समजून तो सर्व बाबी मान्य करत गेला..!
अर्थात, तो नुसता योगायोग नव्हता.सर्व प्रसंग एका ठरावीक अर्थाने आपापल्या जागी व्यवस्थित बसवलेले होते. एक भीषण हेतूच्या साखळीने बांधलेली ती प्रसंगमालिका होती.

*
त्याचं झालं असं की,
एकदिवस अचानक राजेशला ऍड. जंगम नावाच्या वकीलाचं पत्र आलं..!

“तुमचे नातेवाईक नंदकिशोर पटवर्धन यांचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला आहे..त्यांच्या मालमत्ते संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण तात्काळ माझी प्रत्यक्ष भेट घ्यावी..!”

असा त्रोटक मजकूर आणि खाली ऍड. जंगमचा पत्ता होता.

पत्र वाचल्यावर राजेश बुचकळ्यात पडला. कारण, नंदकिशोर पटवर्धन नावाचा आपला कुणी नातेवाईक आहे, हेच त्याला आजवर माहीत नव्हते. बर, एकदा दूरचा नातेवाईक असेलही! पण, त्याच्या मालमत्ते संदर्भातील चर्चेसाठी त्याला का बोलविण्यात आलंय? राजेशला कशाचाच उलगडा झाला नाही. शेवटी त्याने जंगम वकिलाची भेट घ्यायचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजेश पत्रात दिलेल्या पत्त्यावर हजर झाला. जंगम वकिलांचे ऑफिस चांगल्या पॉश एरियात होते. दोन मजली इमारतीवर जंगमच्या नावाची एक भली मोठी पाटी लटकवलेली होती. राजेश ऑफिसमध्ये आला तेंव्हा सेक्रेटरी, असिस्टंट कोणीही हजर नव्हते. केवळ एक शिपाई फाईलिंचे गाठोडे बांधण्यात व्यस्त होता. राजेशने जंगम वकीलाबाबत विचारणा करताच त्याने त्याची कोणतीही चौकशी न करता त्याला आत जाण्याचा इशारा केला. जणूकाही जंगम वकील त्याचीच वाट पाहत होता ! राजेशला थोडं नवल वाटलं. पण, त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही.
आतल्या खोलीत टेबलापाशी ऍड.जंगम बसले होते. राजेशला पाहताच ते म्हणाले, ‘‘कोण राजेश का? या! या!’’ राजेश त्यांच्या टेबलासमोरच्या एका खुर्चीत बसला. काही वेळ जंगम नुसता राजेशचे निरीक्षण करत होता. राजेशला त्यामुळे थोडे अवघडल्यासारखे झाले. शेवटी त्यानेच सुरवात केली,

‘‘आपलं पत्र वाचून मी आश्चर्यचकित झालो..नंदकिशोर पटवर्धन यांच्याशी मला तरी माझा काही संबंध आठवत नाही..!’’

‘‘हो- आश्चर्य ना? वाटणारच. साहजिकच आहे. पण तुम्हाला कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. गोष्ट तुमच्या फायद्याची आहे..”

‘‘हे पाहा, वकील साहेब, मला कशाचाही अर्थ समजत नाही.’’

‘‘सांगतो, सांगतो. सर्वकाही सांगतो. आधी मी काही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं द्या.’’

"नंदकिशोर पटवर्धन हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं?’’

‘‘नाही. हे नाव मी प्रथमच तुमच्या पत्रातून वाचलं आहे.’’

‘‘आता तुम्ही नावचं ऐकलं नाही तर त्यांचाबाबतीत तुम्हाला काहीच माहीत नसणार.”

जर वेळ विचार करुन जंगम यांनी बोलायला सुरुवात केली..!

“त्याचं असं आहे राजेश जी, हे नंदकिशोर पटवर्धन माझे जुने क्लायंट. त्यांच्याबद्दल मला जी माहिती आहे त्यावरुन हा इसम एकाकी जीवन व्यथित करायचा. त्यांचा व्यवसाय काय, किंव्हा त्यांनी ही मालमत्ता कशी कामविली? हे विचारत असाल? तर त्याबद्दल मला फारशी माहिती नाही. पण आजूबाजूने जे कानावर आलं आहे त्यावरून पटवर्धन म्हणजे वेगळ्या मितीतला माणूस. जगरहाटीला सोडून अनेक उद्योग करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे ऐकायला आले आहे. माझ्याकडे त्यांचे काम म्हणजे त्यांच्या ऐकून मालमत्तेची कामे पाहणे किंव्हा त्यांच्या गुंतवणुकीविषयी त्यांना सल्ला देणे. बाकी त्यांचे काय उद्योग चालत, याशी माझं काही कर्तव्य नाही. आता मूळ विषयाबद्दल सांगायचे झाले तर..
सहा सात महिण्यापूर्वी हे पटवर्धन अचानक माझ्या ऑफिसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपले मृत्यपत्र तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या माहितीत पटवर्धनांना कुणीही नातेवाईक नव्हता. पण, मृत्यपत्रात त्यांनी तुमचं नाव नातेवाईक म्हणून घातलं. पटवर्धनांची आई आणि तुमची आजी मावसबहीण असल्याचे त्याने मृत्यूपत्रात नमूद केलं आहे. तुमचा पत्ता किंव्हा इतर कोणतीही माहिती त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर मी ती शोधून सर्व मालमत्ता तुमच्या स्वाधीन करावी, अशी गळ त्यांनी मला घातली. अर्थात, हा माझा व्यवसायाचा भाग असल्याने त्यात काही नवीन नाही..! मात्र यातही एक नवलाची बाब आहे. ती अशी कि , मालमत्ता वारसाच्या म्हणजेच तुमच्या ताब्यात देतांना त्यांनी काही अटी घातल्या आहेत.. तशा त्या काही लिखित नाहीत. तोंडींचं आहेत. पण मी त्या तुम्हाला सांगाव्यात आणि आणि त्या अटी तुम्ही पाळणार असल्याचं कबूल करुन..नव्हे तर तस शपथेवर तुमच्याकडून वचन घ्यावं, असं त्यांनी सुचवलं आहे.

राजेश काही बोलणार होता. पण, त्याला थांबण्याचा इशारा करुन ऍड. जंगम यांनी आपला वार्तालाप पुढे सुरु ठेवला.

" खरं म्हणजे मला तर हा प्रकार थोडा हश्यास्पदचं वाटला. एव्हडी मोठी प्रॉपर्टी एखाद्याच्या नावावर करायची ! आणि कायदेशीर अटी न घालता त्याला शपथ घ्यायला सांगायचे. हे आजच्या जमान्यात थोडं स्ट्रेंजच वाटणार ! आजकाल लोक शपथेवर काहीही कबूल करतात, नाही का?
असो, माझी ही शंका मी पटवर्धनांना देखील विचारली. त्यावर त्यांनी मलाही बुचकळ्यात टाकणारं उत्तर दिलं “ काही शपथा मोडता येत नसतात..!” इतकं सांगून त्यांनी मृत्यपत्रावर स्वाक्षरी केली. आता माझ्याकडे जी जबाबदारी सोपविण्यात आली आहे ती पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलावलं आहे. पटवर्धनांची संपूर्ण मालमत्ता कायदेशीर रित्या तुमच्या नावावर करुन देण्यासाठीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे..तुमच्या काही सह्या घेतल्या की त्यात फारसा वेळ जाणार नाही. त्यामुळे ठरल्यानुसार त्यांची अटी तुमच्याकडून शपथेवर वदवून घेतल्या की पुढची प्रक्रिया आपल्याला पार पाडत येईल. आता सांगा, राजेशजी तुमची काही हरकत आहे का? तुम्ही याला तयार आहात का?”

जंगम वकीलाकडून पटवर्धनांची अनपेक्षित आणि काहीशी गूढ हकीकत ऐकून घेतल्यावर राजेशचा जीव भांड्यात पडला. काय करावं? हे त्याला काही सुचत नव्हतं. राजेश विचारात पडला. एका अनपेक्षित मार्गाने चालत आलेली लाखो रुपयांची संपत्ती खरंच आपण स्वीकारली पाहिजे का? किंबहुना, आपल्याला ती स्वीकारण्याचा नैतिक अधिकार आहे का? एक प्रश्न जो केंव्हा पासून त्याच्या मनात घोळत होता..तो अखेर समोर आलाच..! 'हा फुकाचा पैसा आपल्याला पचेल का?

राजेशची विचारमग्न चर्या पाहून ऍड. जंगम यांनीच त्याला संभ्रमातून बाहेर येण्यास मदत केली..

“ अहो राजेश जी, यात इतका विचार करण्याचे काही एक कारण नाही..! म्हणजे बघा, त्या शपथेवरील अटी-शर्तीची बाब थोडीशी खटकणारी आहे. पण, असतो काही लोकांचा स्वभाव. त्याचा काय एव्हडा विचार करायचा...! आणि, मी तुम्हाला सांगतो अगदी साध्या अटी आहेत त्या..! ”

ऍड. जंगम यांच्या या बोलण्याचा राजेशवर हवा तोच परिणाम झाला..!

“खरंचं आपण किती फालतू विचार करतोय..कशी का होईना एवडी मोठी संपत्ती पुढे होऊन चालत आली..तिचा उपभोग घ्यायचा सोडून उगाच तत्वांची उगळनी करण्यात काय अर्थ..?”
त्याचा विचार पक्का झाला आणि राजेशने संपत्ती स्वीकारायला होकार दिला.

राजेश ची संमती मिळताच ऍड जंगम यांनी ठरल्यानुसार काही शपथा त्याला घ्यायला लावल्या. त्यात राजेशला काहीच विशेष वाटलं नाही..उलट, आपण विनाकारण घाबरून गेलो होतो. याची त्याला खात्री पटली. कारण, त्या तीन शपथाचं तश्या होत्या. पहिली शपथ “मी शपथ घेतो की, मी पटवर्धनांच्या वाड्यात कायमचा राहायला जाईन.. कोणत्याच परिस्थितीत वाडा विकणार किंव्हा सोडणार नाही.” दुसरी “ आजपासून माझं सर्व जीवन पटवर्धनांच्या ऋणात असून..त्याची उतराई होण्यासाठी त्यांचा संपूर्ण वारसा चालविण्याची मी शपथ घेतो” तिसरी “ मी माझ्या स्वइच्छेने पटवर्धनांची संपूर्ण संपत्ती सर्व गुण दोषासाहित स्वीकारत आहे..ती वाढविण्यासाठी जे काय कार्य करावे लागतील त्यासाठी मी कायम बांधील आहे..”

शपथांचा कार्यक्रम झाल्यावर ऍड. जंगम यांनी अवघ्या तीन दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन पटवर्धनांची सर्व संपत्ती ज्यामध्ये त्यांचा राहता वाडा, बँकेच्या ठेवी, सोन्याचे दागिने सर्व काही अगदी कायदेशीररित्या नावावर करुन दिले. वाड्याच्या किल्ल्या राजेशच्या हातात देऊन त्यांनी त्याला मोकळं केलं.. आता त्या संपत्तीचा उपभोग घ्यायला राजेश मोकळा झाला होता...!

**

वाड्याच्या किल्ल्या आणि मालमत्तेचे कागदपत्रे हातात येताच राजेशचं आयुष्यचं बदललं..त्याने ऐकून संपत्तीचं अंदाजे मोजमाप केलं तर त्याची किंमत पन्नास लाखाच्या वर..आजच्या बाजारभावाने तर कोटीच्या घरात जात होती. त्याला जणू काही हर्षवायू झाला. एक मोठी रक्कम बँकेतून काढून त्याने पाहिले आपल्यासाठी मोठी खरेदी केली. आजवर ज्या गोष्टी करण्याचे तो नुसते स्वप्न बघत होता त्या आता त्याला सहजा सहजी उपलब्ध झाल्या होत्या. आनंदाच्या वाऱ्यावर उडतचं राजेश पटवर्धनांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. जवळजवळ पाच गुंठ्यांच्या जागेत पटवर्धनांचा प्रशस्त वाडा उभा होता. बांधकाम थोडं जुनाट पण आकर्षक होतं. दार उघडून राजेश वाड्यात दाखल झाला. साधारण सोळा बाय वीसच्या खोलीत ते दार उघडलं गेलं. खोलीच्या तिन्ही भिंतीत दारं होती आणि मोठ्या दाराच्या दोन्ही बाजूंना खिडक्या होत्या. खिडक्यांचे खालचे वरचे बोल्ट सरकावून त्याने त्या उघडल्या. खोली प्रकाशाने उजळून निघाली.दिवाणखान्याच्या भल्या मोठ्या खोलीत तो उभा होता. वाड्यातील किमती समान पटवर्धनांच्या ऐश्वर्याची साक्ष देत होते. राजेशने सर्व वाड्यात एक चक्कर टाकली.
सुखसोयीचं सर्व साधन त्याठिकाणी उपलब्ध होते. पण, तरीही त्याला काही तर खटकत होतं. मागाहून त्याच्या ते लक्षात आलं. एव्हडा मोठा वाडा.. त्यात गरजेपेक्षा कितीतरी जास्त किंमती समान पण पटवर्धनांचा एकदा फोटो किंव्हा त्यांच्या वापराचे कपडेलत्ते काही कागदपत्रे पुस्तके असं कोणतंच समान त्याला आढळून आलं नाही. त्यांने दुसऱ्यांदा संपूर्ण वाडा नजरेखालून घातला..आता त्याच्या लक्षात आलं की, वाड्यात पटवर्धनचा सोडा, देवघर किंव्हा देवाची एकही तसबीर लावलेली नाही.
म्हटलं तर ह्या गोष्टी क्षुल्लक, आणि म्हटलं तर सगळ्यात गंभीर! एव्हड्या मोठ्या वाड्यात मालक राहत असल्याचा एकही पुरावा सापडू नये? माणूस वरुण कितीही नास्तिक असला तरी आतून तो आस्था जोपासना करतचं असतो. त्यामुळे घरात देवाची एकही तसबीर नसणे..इतकंच नाही दरवाज्यावर साधी गणेशाची प्रतिमा सुद्धा नसणे, राजेशला बुचकळ्यात टाकून गेले. संपत्तीचा अत्यानंद एव्हाना दूर झाला होता..मनावर वेगळंचं दडपण यायला लागलं.

“आताच्या आता या घरात देवाची स्थापना करायला हवी..! ”

एका क्षणाला राजेशच्या मनात विचार आला, आणि दुसऱ्याच क्षणी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधल्या गेलं..त्याच्या मनात दुसराच विचार उत्पन्न झाला.

“आधी दोन घोट पोटात गेले पाहिजे..!”

अतिसूक्ष्म तंतूसारखा हा विचार राजेशच्या मनात शिरला. कुणीतरी..कोणत्यातरी अनामिक शक्तीने त्याच्या विचारात जाणीवपूर्वक बदल घडवून आणला होता..राजेशलाही थोडंस जाणवलं..पण, पिण्याचा विचार मनात आल्यावर त्याला स्वतः ला आवरता आलं नाही.
तसा, राजेश काही सराईत पिणारा नव्हता. मात्र, खिशाची सल्ला असली की दोन पेग घेण्याचा मोह त्याला आवरता येत नसे. आणि, आतातर पैश्याची कोणतीच उणीव नव्हती.

तात्काळ सगळी व्यवस्था झाली.. दोनाचे चार पेग कधी झाले, हे राजेशच्याही लक्षात आलं नाही. जरा जास्त झाल्याने तो वाड्यात तसाच झोपी गेला. रात्री अंदाजे 12 वाजेच्या सुमारास कशाच्या तरी आवाजाने त्याला जाग आली. तो प्रत्यक्ष जागा झाला की स्वप्न पाहत होता, हे त्याला समजलं नाही. पण, तो आता वाड्यात कुठे तरी उभा होता. अंधार असल्याने नेमकी जागा त्याला उमगली नाही..तो शांतपणे नुसता उभा राहिला. आसपास काहीतरी चोरटी हालचाल होत असावी- शंका होती; पण खात्री नव्हती. "असं एका जागी उभ राहणार तरी किती वेळ? हालचाल केली पाहिजे, कोठे आहोत ते तरी निदान जाणून घेतलं पाहिजे" राजेशच्या मनात विचार आला.. हात पुढे करून राजेशने एका दिशेला एक लहानसं पाऊल टाकलं. आणखी एक पाऊल. आणखी एक- हाताला दरवाजा लागला. त्याने तो आत ढकलला. उघडलेल्या खोलीतून हलकासा प्रकाश दिसत होता. आत मध्ये काय आहे? हे पाहण्यासाठी राजेश पुढे झाला. आतला नजारा पाहून त्याच्या काळजाला एक झटका बसला.

खोलीत कंदिलाचा मंद प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशात राजेशला स्पष्ट दिसलं की खोलीत एक रिंगण काढलं होतं.. त्यात एक होम पेटला होता. आणि त्या होमापलीकडे एक काळी-भिन्न आकृती मंत्रोच्चार करत होमात काहीतरी टाकत बसली होती. हळूच त्याची नजर बाजूला फिरली आणि तो दचकला. होमाच्या दुसऱ्या बाजूला एक सोळा-सतरा वर्षाची मुलगी बसली होती..संपूर्ण केस पाठीवर मोकळ्या अवस्थेत सोडलेले ... कपाळ कुंकवाच्या मळवटाने भरलेले... राजेशला तिचे निर्विकार डोळे दिसत होते..त्याची नजर थोडी खाली गेली आणि त्याला ते दिसलं.. पूर्णपणे नग्नावस्थेत असलेल्या त्या कुमारिकेच्या छातिच्या मधोमध एक खंजीर खुपसण्यात आला होता..रक्ताचे ओघळ मांडीवरून वाहत गेले होते..त्याच्या सर्व शरीरावरून शहाऱ्यामागून शहारे जात होते...मनातून भीतीची किंकाळी येत होती..त्याला तेथून हालायचं होतं.. पण, हात-पाय गोठल्यासारखे झाले. अगदी शेवटच्या क्षणी त्याला ते सुचलं..त्याने आपले डोळे गच्च मिटून घेतले. एक मिनिट, दोन मिनिट हळूहळू चित्त ठिकाणावर आलं आणि त्याने डोळे उघडले.. तो पलंगावर बसलेला होता. इतका वेळ दाबून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर आला. हे काय झालं होतं? मेंदू आता खडबडून जागा झाला होता. भीतीच्या प्रतिक्रिया तर होत्याच. शरीरावर सरसरता काटा आला होता. चेहरा आणि मान व गळा घामाने भिजून गेला होता. असं वाटत होतं, पार डोक्यावरून पांघरूण घेऊन चिडीचूप पडून राहावं. पण त्याने काय साध्य होणार होतं? दुर्लक्ष केल्याने काय समोरची समस्या दूर होणार होती..?

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.
पुढचा भाग लवकर येऊद्या प्लिज.

सुरुवात चांगली झालीये कथेची पण जरा व्याकरण एकदा तपासून घ्यावे.
जीवन एकाकी व्यतित करतात ते व्यथित असं झालं आहे..
आणि
हा प्रकार थोडा हास्यास्पद असं पाहिजे ते हश्यास्पद असं लिहिलंय, तेवढं सुधारून घ्या...
पुढील लेखनास शुभेच्छा!!

जरा व्याकरण एकदा तपासून घ्यावे.>>
>>व्याकरण चुका आहेत..लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या शुभेच्छा प्रेरक आहेत.. धन्यवाद!

अशाच पद्धतीनं लिहिलेले चिरूमाला खूप आवडलं होतं पण लेखक महाशयांनी शेवट पुर्ण केलाच नाही.