फेंगशुई, कासव आणि चिरंजीव

Submitted by Cuty on 12 July, 2019 - 05:42

D mart मध्ये खरेदी चालू असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले ,त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या.त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही. मात्र नवरोबांचा आहे.
घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तर काय?चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत होते. मग लक्षात आले, हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत ते खरेदी करून आणले होते.
मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.लेकाला ते सर्वांना दिसेल अश्या जागी ठेऊन मित्रांना दाखवायचे होते, तर पप्पांना ते फेंगशुई नुसार 'योग्य' जागी,'योग्य' दिशेला ठेवायचे होते. मात्र 'योग्य' जागा नेमकी कोणती हे पप्पालाही ठाऊक नव्हते.मग नंतर सांगतो,विचारून सांगतो असे करतकरत अजून दोन दिवस गेले.
अजून दोनएक दिवसांनी मी सकाळी बाथरूममध्ये पाण्याची भांडी साफ करत होते. अचानक एका पांढरया रंगाच्या ड्रममध्ये काहितरी जोरात खाडखाड वाजले. दिसत मात्र काहिच नव्हते. मग पूर्ण ड्रम खाली केला, तर चक्क पाण्याच्या रंगात बेमालूमपणे मिसळून गेलेले ते कासव दिसले. लख्खकन डोक्यात बल्ब पेटला! अन मी एकटीच खोखो हसू लागले. 'योग्य' जागेची वाट पाहून कंटाळून चिरंजीवांनी त्या कासवाला पोहायला 'योग्य' जागा शोधली होती.
आता मी रोज तो ड्रम साफ करून ,परत ते कासव हळूच पोहायला सोडते.रोज चिरंजीव शाळेतून आल्यावर ते कासव 'योग्य' जागी पोहतेय ना , ते चेक करतात आणि त्याचे पप्पा कासवाला कधीच विसरलेत!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज पाणी ओतून देऊन ड्रम रिकामा करता का? थोडेसेच असेल तर ठिकय पण जास्त असेल तर नका वाया घालवू पाणी. तेकाही शिळे होत नसते. <- माहित असेलच पण तरी लिहलं.

किस्सा छान.

खरंच आमच्याकडे पाणी खूप कमी येतं. आणि दोन छोटे ड्रम रिकामे होतात. पण त्या कासवाला पोहता येईल इतकं पाणी नक्कीच उरतं.हा: हा: