स्वैराचार !

Submitted by अँड. हरिदास on 2 July, 2019 - 11:21

images_1.jpg
स्वैराचार..!

मनासारखं लबाड काहीही नाही. सर्व प्रसंगांना सोयिस्कर वळण देण्यात ते मोठं तरबेज असतं. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून घेणं मनाकडून शिकावं. मन कधी डोळ्यावर पट्टी बांधून खरा देखावा लपवून टाकतं, तर कधी पट्टी सोडून वास्तविकता समोर आणतं..! 
मनाचा हा खेळ समजून घेतांना भल्याभल्यांची फसगत होते. 'जिथं मोठमोठे विचारवंत मनाचा ठाव घेण्यात अयशस्वी ठरतात, तिथे चार वर्ग शिकलेल्या 'सिद्धी' ची काय कथा..?

हजारभर लोकवस्ती असलेल्या एका खेड्यात राहणारी सिद्दी सुबोध सोबत लग्न करुन मुबई शहरात आली होती. सगळ्यांनाच जसं या मायनगरीचं आकर्षण वाटतं, तसंच सिद्दीलाही मुंबईचा मोह होता. परंतु, नव्या नवलाईचे दोन-तीन महिने सरताच सिद्दीची या शहरात घुसमट होऊ लागली. अर्थातच, त्याचं मुख्य कारण होतं 'सुबोध'. 

सुबोध तसा तिच्याच गावचा. दोघांचीही लहानपणापासून ओळख. एकाच गल्लीत राहत असल्याने लगोरी, लपंडाव सारखे खेळही दोघांनी सोबत खेळलेले. काहीसा लाजाळू आणि काहीसा मनमोकळा स्वभाव असलेला सुबोध सिद्दीला लहानपणी फारच आवडायचा. पुढे सुबोध शिक्षणासाठी मुंबईला गेला आणि शिक्षण पूर्ण करुन मुंबईतच एका कंपनीत त्याने नोकरी पत्करली. मध्यंतरी सिद्दी आणि सुबोधमध्ये काही संवाद नसला तरी, एकाद्या कार्यक्रमात, लग्नसमारंभात त्याच्या भेटीगाठी होतं होत्या. अशाच एक लग्नात सुबोधच्या आईने सिद्दीला पाहिले आणि सुबोधसाठी तिला मागणी घेतली. चांगला पगार, मुंबईत स्वतःची राहण्याची जागा, स्वभावाला सुस्वरूप आणि महत्वाचे म्हणजे एकाच गावतील असल्याने सिद्धीच्या आईवडिलांनी तिची पसंती घेऊन तात्काळ या संबंधाला होकार दिला. धुमधडाक्यात लग्न पार पडले आणि सिद्धी आपलं घर सोडून सुबोधसोबत मुंबईला त्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. सुरवातीचे दोन तीन महिने गुलाबी रंगात भिजून गेले. त्यानंतर मात्र तिला सुबोधचा एक एक रंग दिसू लागला.
लग्नाची सुट्टी संपवून सुबोध आपल्या कामावर रुजू झाल्यानंतर सुरवातीला तो अगदी दररोज वेळेवर घरी परत यायचा. सिध्दीशिवाय त्याला दुसरं काहीही दिसयाचं नाही. मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे सुबोधच्या वागण्यात फरक पडत गेला. सुबोधचे मध्यरात्रीपर्यंत  बाहेर असणे, ही आता नित्याचीच बाब झाली. त्यातच बॅचलर असतांना सुबोध आणि त्याच्या मैत्रिणींच्या फ्लॅटवर रंगलेल्या पार्ट्या, ऑफिसातले, कॉलेजातले एकेक किस्से सिद्धीच्या कानावर यायला लागले..!
सुबोध आपल्या ग्रुपसोबत दर विकेंडला आऊटिंगला जातो, हे सिध्दीला माहीत होते. पण, त्याच्यासोबत मुलीही असतात. एकाद्या रेंटवर मिळणाऱ्या बंगल्यात किंव्हा हॉटेलमध्ये त्यांची पार्टी रंगते. या पार्ट्यात ते मुलींच्या गळ्यात गळे घालून नाचतात. सर्व निषिद्ध प्रकार त्याठिकाणी केले जातात.
आशा एक ना अनेक गोष्टी सिद्दीला कळू लागल्या. त्यामुळे ती बेचैन झाली.
सिद्दी खेड्यात वाढली असली तरी शहरी संस्कृतीपासून ती अनभिज्ञ नक्कीच नव्हती. नवऱ्याला मैत्रिणी असण्यावरही तिचा आक्षेप नव्हता. पण, प्रत्येक नात्यात एक मर्यादा असावी, हा तिचा आग्रह होता. पण तिच्या कानावर येणाऱ्या अफवांनी तिच्या मनात वादळ निर्माण केलं होतं. या गुजगोष्टीमध्ये थोडी जरी सत्यता असली तर तिने रंगवलेल्या एकमेकाला समर्पित सुखी संसाराच्या स्वप्नांना सुरंग लागणार होता. सिद्दी बेचैन झाली पण तिने संशयाला आपल्यावर हावी होऊ दिले नाही.
एकदा संशय डोक्यात घुसला की, सुबोध सोबत आपलंही आयुष्य मातीत जाईल, याची जाण तिला होती. त्यामुळे तिने मनाला सावरलं.
"ज्या गोष्टीत आपल्याला काहीही कर्तव्य नाही त्या गोष्टीत निष्कारण रस घेण्याची लोकांची मनोवृत्ती असते. त्यामुळे आपण अपुऱ्या माहितीवर भलेबुरे तर्क काढून, त्यावर काही तरी पूर्वग्रह बनवायचा नाही." असं तिने मनाशी ठरवलं.
**

"Man Proposes, God Disposaes." "माणूस योजना योजतो एक, पण नियतीच्या मनात वेगळंचं असतं.." आपण एखादा निर्णय मनात घेतला, म्हणजे तो तडीस गेला. असं कुठं होतंय का? आपला निर्णय नियतीला मान्य असेलच, याची काय शाश्वती?
' संशयाला मनात घर करू द्यायचे नाही', असं सिद्धीने कितीही ठरवलं असलं, तरी मनाच्या एका कोपऱ्यात संशयाचे भूत जागृत झालंचं होतं. ठरवून वैगरे नाही..अगदी सहजपणे सिद्दीची दृष्टी आता प्रत्येक बाबीकडे चिकित्सेने बघू लागली. सुबोधच्या वर्तणुकीत खटकणाऱ्या प्रसंगांची  अनावधानाने सिद्धीच्या मनात नोंद घेतल्या जाऊ लागली. त्यातच एक दिवशी बाजारातून परतत असतांना सिद्दीने सुबोधच्या कंपनी ऑफिस कडची वाट धरली. कावळा बसण्याचा आणि डांग तूटण्याचा मुहूर्त अगदी तंतोतंत जुळून आला. टॉक्सित बसलेली सिद्धी समोरच्या इमारती न्याहाळत असतांना अचानक तिला सुबोध एका मुलीच्या कंबरेत हात घालून इमारतीच्या बाहेर पडत असल्याचे तिला दिसले. एव्हाना टॅक्सी इमारती च्या समोरुन पुढे आली होती.
नजरेचा काहीतरी घोळ झाला का? 'मनी बसे ते चित्ती दिसे' असं म्हणतात. हा मनाला झालेला भास होता का?
सिद्धीचे कोणत्याच विचारावर एकमत झाले नाही. पुन्हा खात्री करण्यासाठी तिने टॅक्सी परत घ्यायला सांगितले.
यावेळी चित्र अगदी स्पष्ट होतं..दृष्टीवरची झापड गळून पडली होती..आजवरची फसवणूक संपली होती...तो सुबोधचं होता.. आधुनिक फॅशनचे कपडे घातलेल्या एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून दोघेही गप्पात दंग झाली होती. त्यांची बॉडी लँग्वेज पाहून कुणालाही ते प्रेमीयुगलचं वाटले असते. सिद्धीने दोन क्षण वाट बघितली आणि टॅक्सी त्यांच्याजवळ घ्यायला सांगितली. टॅक्सी जवळ उभी राहिल्यावर सुबोधने आत बघितलं तर त्याला सिद्धी दिसली. तो जवळ येऊन तिच्याशी बोलणार तोच सिद्दीने टॅक्सी घरी घ्यायला सांगितली.झाल्या प्रकाराने सिद्धीचं मन अस्वस्थ झालं.. ज्याची भीती होती, ते उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर आता कोणताच संभ्रम उरला नव्हता. 'बॅग भरावी आणि घरी निघून जावं, किंवा मग सुबोधला त्याच्या कृत्याचा सणसणीत जाब विचारावा. सिद्धीच्या डोक्यात विचार द्वंद पेटलं. 'साक्षमोक्ष लावायचा, पण शांततेने.' "एखादवेळी सुबोध कडून अविचार झाला असेल.. मनावर दगड ठेवून तो पचवायचा.. त्याला एक संधी द्यायची." इथपर्यंत सिद्दीने आपल्या मनाची समजूत घालून ठेवली. रात्री एक वाजता सुबोध घरी आला. पूर्णपणे दारूच्या अंमलाखाली असलेल्या सुबोधशी आता बोलणे, म्हणजे वाद घालने होईल. याची जाण असल्याने सिद्दीने रात्री कोणताच विषय घेतला नाही.
सकाळीचं सिद्दीने विषयाला हात घातला..

    “सुबोध,”  “तुम्हाला राग आला तरी मी विचारणारच आहे. तुम्हाला असं नाही वाटत की, तुमच्या वागण्याचं तुम्ही - निदान काही तरी स्पष्टीकरण द्यायला हवं ?”
“असं काय मोठं स्पष्टीकरण देण्यासारखं घडलं बुवा?” सुबोधने पूर्वीचा हलकाफुलका पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला;
“सुबोध, प्लीज ! मला तुम्ही फसवू शकणार नाही.”
“मी तुला कधीच फसवलं नाही.” तो जरा रागाने म्हणाला.
“आतापर्यंत नसेल; पण आता फसवायचा प्रयत्न करीत आहात. आजवर तुमच्याबद्दल माझ्या कानावर बरंच काही आलं. पण, मी त्यावर मी विश्वास ठेवला नाही. तसेही लग्नाअगोदर तुम्ही काय केलं, हे मला विचारायचं नाही. पण काल रस्तावर तुम्ही जे चाळे करत होतात. ते पाहून मला ऐकीव गोष्टींसुद्धा आता खऱ्या वाटू लागल्या आहेत.. विवाहित असतांना तुम्ही दुसऱ्या बाईसोबत सबंध कसे ठेवू शकता??
सुबोध सिद्दीच्या डोळ्यातील अश्रू पाहत होता.. पण त्याची नजर अंतर्मुख झाली होती.
सुबोध जेव्हा बोलला तेव्हा खूप विचार करून बोलल्यासारखा बोलला...
“सिद्दी, काही गोष्टी तुझ्या कानावर येऊ नयेत, अशी माझी इच्छा होती. त्यामागचा हेतू तुला फसविण्याचा किंवा तुझ्यापासून काही लपवून ठेवण्याचा नव्हता. तुझा कोणताही गैरसमज होऊ नये, अशी माझी इच्छा होती."

सुबोधच्या बोलण्यातील प्रांजळपणा पाहून सिद्दीने डोळे पुसले.. आता ती लक्षपूर्वक त्याचे बोलणे ऐकू लागली.

" सिद्धी, मला तू लहानपणापासून आवडायची. म्हणूनच मी आईला तुला मागणी घालयाला लावली. तुझ्यासोबत लग्न करुन मी फार आनंदी झालो. पण सुरवातीच्या दिवसातचं एक गोष्ट माझ्या लक्षात आली...सिद्धी, तुझे विचार अजूनही अठराव्या शतकातल्या खुळचट बायांसारखे आहेत. एक स्त्री आणि एक पुरुष फक्त मित्र असूच शकत नाही, ही तुमची धारणा..म्हणूनच मी आमच्या ग्रुपबद्दल तुला खुलासेवार माहिती दिली नाही. आमच्या ग्रुपमधील खुलं वातावरण, आम्ही एकमेकांशी करत असलेली थट्टामस्करी, सोबत करत असलेला डान्स, ड्रिंक ह्या सर्व गोष्टी तुझ्या आवाक्याबाहेर गेल्या असत्या...!
एक खेड्यात तू वाढलीस..शहरी संस्कृतीची तुला ओळख नाही. मुलं-मुली या संस्कृतीत एकत्र फिरतात... एकत्र पार्ट्या करतात..इथं कुणी मुलींना अबला समजत नाही.. सगळ्यांना आपली चॉईस आहे.. आता हेच बघ ना.. आमचा आठ जणांचा ग्रुप..आम्ही अगदी 12 व्या वर्गापासून सोबत आहोत..सोबत शिकलो..सोबत खेळलो..एकाच ग्रुपमध्ये एकमेकांची अफेयर देखील झालीत..शेवटी काय जीवन जगण्यात मजा आहे..नसती खुळचट बंधने हवीत कुणाला? आणि पुराणमतवादी संस्कृती कुठवर जपायची? माणसाने काळानुसार बदलल पाहिजे.. जो बदल स्वीकारतो, तोच आजच्या काळात जीवनाचा आनंद घेऊ शकतो. शील, एकपत्नीत्व, सौभाग्य, पातिव्रत्य ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत..ज्यांनी ह्या चालीरीती आणल्या त्यांनीच त्या आपल्या फायद्यासाठी वापरल्या. आणि तसं ही काय नैतिक आहे, अन काय अनैतिक? हे कुणी ठरवलं?  नैतिकतेचा आव आणणारे दिवा विझल्यावर कोणते अनैतिक धंदे करतात. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मुळात, लोकांवर बंधनं घालणारा हा शब्दांचा खेळ आहे.

एक क्षण दम घेऊन सुबोधने आपलं तत्वचिंतन कन्टीन्यू केलं..!

सिद्धी, आपण आधुनिक जगात जगतोय..यात निभावून न्यायचं असेल तर बदलत्या काळची पाऊले ओळखून आपले विचार आपल्याला बदलावे लागतील. आज सोबत राहण्यासाठी लोकांना लग्न करण्याची जरुरी राहिली नाही. लिव्ह इन रिलेशनशिप सर्वमान्य होत आहे..मग कसली नीती अन कसला धर्म? कुणी काहीही म्हणत असलं, तरी हीच आमची संस्कृती आहे..तुही ती समजून घ्यावीस, आणि यापुढे असल्या क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नये..!

आपल्या नवऱ्याचे विचार एकूण सिद्धी चाट पडली.
आजवर दृष्टीवर एक पडदा आला होता. त्यातून जग वेगळं दिसत होतं. पण आता दृष्टीवरची झापड गळून पडली. आणि एका नवीन मनोवृत्तीचं जग सिध्दीसमोर आलं.. तेही तिच्या नवऱ्याच्या विचारातून.

आपल्या तथाकथित उदात्त विचारांच्या व्याख्यानाचा सिद्धीवर काय परिणाम झाला? हे जाणून घेण्यासाठी सुबोधने सिद्धीकडे बघितलं.

डोळ्यात आग परंतु चेहऱ्यावरील मिश्किल हसण्याचे भाव पाहून सिद्दीच्या मनोभावणेचा त्याला अंदाज बांधता आला नाही......!

  -क्रमशः-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म. आता सिद्धि पण अठराव्या शतकातल्या खुळचट बायांसारखे विचार टाकुन मॉर्ड होणार वाटतं Happy