- पाऊस -:

Submitted by jayshree deshku... on 29 June, 2019 - 13:25

:- पाऊस -:
रात्र भर गरम होत होत. उकाडा कधी संपतोय अस झालं होत. सकाळी झोपेतून जाग आली आणि सहजच नेहमीप्रमाणे खिडकी बाहेर पाहिलं, मळभ दाटून आलेलं होत. केव्हाही पाऊस कोसळू लागेल अशी चिन्हे होती. मी माझ आवरून छत्री घेऊन फिरायला बाहेर पडले. छत्री घेतली खरी पण पावसात भिजण्याचा आनंद लुटावा असाही विचार मनात येऊन गेला. खुप दिवसाच्या उन्हाळ्या नंतर अस पावसाच आभाळ पाहून माझ्या मनातला मोरही थुई थुई नाचू लागला. पावसाची गाणी मनात रीमझीमू लागली.
‘येरे येरे पावसा......’
‘येरे घना येरे घना .....’
इत्यादी इत्यादी. फिरून परत आले, पण पाऊस आलाच नाही. फसवल लबाडाने. आणि थोड्या वेळात पुन्हा चक्क उन्ह पडलं. मनात म्हणल, ‘अरे कोसळ ना बाबा एकदाचा, का अंत पाहतोस सगळ्यांचा. किती वाट पहायची तुझी? ये एकदाचा आणि सगळीकडे गारेगार, आनंदी वातावरण करून टाक. हिरवीगार पालवी फुटू दे. हिरवा साज लेवून झाडे तरतरीत होऊन जाऊ दे. चातकच तुझी वाट पाहतो असे नाही. ह्या धरेवरची सारी सृष्टीच तुझी वाट पहात आहे. प्राणी,पक्षी, माणस, वनस्पती सारी जीवसृष्टी तगमगत आहे तुझ्या थेंबासाठी. बळीराजा तुझ्या बरसण्याची डोळे लावून वाट पहात आहे. तू नाही आलास तर त्याच्या डोळ्यातला पाउस सुरु होईल. तुझ्या स्वागताची नांदी आकाशात विद्युलतेच्या रोषणाईने सुरु आहे.ढगाचे ढोल ताशे वाजत आहेत. पण तू कुठे गायब आहेस? कित्येक कवी मन आसुआसुली आहेत. कागद लेखणी घेऊन सरसावून बसली आहेत. तुझ बरसण सुरु झालं की इकडे काव्याची बरसात पण सुरु होईल.’ प्रेमी युगुलं पावसात एकत्र भिजण्याची स्वप्न बघत आहेत, गवई मेघ मल्हार आळवत आहेत. तू साऱ्यांचा जिवलग सखा आहेस. तेव्हा आता फार भाव खाऊ नकोस. असा दणकून बरस आणि जीवाची तगमग दूर कर. पावसाच्या या आणि अशा विचारातच दिवस गेला. आणि दुपारून पुन्हा आभाळ भरून आल. आता दुपारी चार नंतर कोसळणार नक्की. मी नवऱ्याशी पैज लावली एका सिनेमाची. तेही पावसात घेऊन जाण्याची. आणि पाच वाजता तो धाड धाड कोसळू लागला. मी कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत आले, कॉफीच्या एक एक घोटा बरोबर त्याच मनसोक्त कोसळण आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने अनभवू लागले. जसा काही आयुष्यातला पाहिला वाहिला नवा अनुभवच जणू! वाऱ्याचा घोंगावता आवाज, कोसळणाऱ्या पावसाचा आवाज, त्याच्या धारांचा पत्र्यावर होणारा तड तड आवाज, झाडाच्या पानांवर होणारा आवाज ह्या सगळ्याचा एकत्रित निर्माण झालेला नाद अनुभवताना कान आणि मन तृप्त झाले. या अनोख्या संगिताची धून मी मनात साठवत राहिले. झाड, वेली बेधुंदपणे पावसात नहात होती. तृप्तीचे उसासे घेत होती. पाउस खोलवर झिरपत होता. मी म्हणल,
धुवून जाऊ दे सारे मळभ
तू असाच बरसत रहा.
होऊ दे तृप्त धरेला
मग तिचे दान पहा.
एक पाऊस किती उलथा पालथ करत असतो साऱ्या सृष्टीत! अर्थात सर्वच ऋतू, प्रत्येकाचे काही ना काही देणे चालूच असते ह्या सृष्टीला. उन्हाळ्या नंतरच्या एक दोन पावसात वातावरण किती बदलून जात. तृषार्त धरणी पावसाच्या पाण्याने हर्षून जाते. लगेच पेरलेल्या बी, बियाण्याला न्याय देण्यास सज्ज होते. वैशाख वणवा पचवलेली सगळी झाड, झुडप, वेली एकदम ताजीतवानी होतात. त्यांचे पोपटी हिरवे रंग तजेलदार दिसायला लागतात. सुकून गेलेले दुर्वांकुर लगेच हिरवे होतात आणि त्यांची मखमली पाती आनंदाने डोलू लागतात. शेतात पेरणी झालेली असली तर बीज अंकुरते त्याची कोवळी पालवी मनाला उभारी देऊन जाते. हे दिवसच कसे हिरवेगार, मंतरलेले असतात. आणि अशातच सुरु होतो चातुर्मास. नव्या नव्हाळीचे गजबजलेले दिवस घेऊन येणारा. माहेरवाशीणीला माहेरची सय येऊ लागते. तीच्या पाठवणीची तयारी सुरु होते.
ही धरा बळीराजा कडून मुठीने घेतलेलं दान पसा भरून परत करते. त्याच्या घामाच्या थेंबाचे मोत्यात रुपांतर करते. निर्सग आपल्याला घेतलेलं दान ओंजळीने परत करायला शिकवत असतो. पण आपण कायम कृपण राहणेच पसंत करतो, ओंजळ रिती ठेवत.
हा प्रिय सखा नदी, नाले, ओढे तुडूंब भरून टाकतो. आणि हो महापुरही आणतो. तेव्हा त्याच थैमान तांडव नृत्यापेक्षा कमी नसत. तो त्या जगत नियंत्याला स्मरून राहण्याचा सूचक संदेश देत असतो. आपला अंहकार दूर ठेवला पाहिजे हे शिकवत असतो. ह्या निसर्गा पुढे खरच आपण केवढे क्षुद्र असतो! काहीच आपल्या हातात नसताना, आपल्यात मीपणा का धरून बसतो? हे पावसाच बरसण पण हातात नसत.
माझ्या मनात मात्र एक पाऊस कायम बरसत असतो, जो मला आनंदी ठेवत असतो. आसपासची माणसे बऱ्याचदा दुखवत जातात. शाररीक मानसिक भोगाने कधी मन होरपळत तेव्हा हा माझा सखा हळूच माझ्या कानात कुजबुजतो मी आहे ना तुझ्याजवळ कशाला काळजी करतेस? अशीच ताजीतवानी रहात जा. मी स्वतःशीच हसले आणि गुणगुणू लागले,
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा .....’
“वा वा! कवयत्री बाई ! पाऊस पाहून झाला असेल तर सांजवात लावणार का देवापाशी? नाही म्हणल तासभर झाला पाऊस पहात आहेस. आता तो थांबायला आला”
शेजारीच उभ्या असलेल्या नवऱ्याने उद्गार काढले आणि माझी तंद्री भंग पावली.

जयश्री देशकुलकर्णी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults