संस्कृत भाषा, मनःस्वास्थ्य आणि समुपदेशन

Submitted by अतुल ठाकुर on 25 June, 2019 - 10:16

4c84640866a934ead206ca8a44a54361.gif

संशोधनाच्या दरम्यान काही आजारांचे स्वमदतगट अभ्यासावे लागले होते, तेव्हा लक्षात आले की व्यसनासारख्या आजारात प्रामुख्याने समुपदेशनाचा वापर केला जात असला तरी इतर गंभीर आजारांमध्येही औषधोपचारांसोबत समुपदेशन हे अतिशय परिणामकारक ठरत असते. काही विशिष्ट विचार हे समुपदेशनात सांगितले जातात. त्यांचा वारंवार वापर केला जातो. उदाहरण घ्यायचे झाल्यास व्यसनमुक्तीमध्ये "वन डे अ‍ॅट अ टाईम" हा विचार रुग्णाला दिला जातो. त्यामागचा उद्देश हा की त्याने फार पुढचा विचार आतापासून करून स्वतःचा ताण वाढवू नये. व्यसनमुक्तीसाठी छोट्या पायरीने सुरुवात करावी. आजच्या दिवसाचे नियोजन करावे. मी आज व्यसन करणार नाही असा विचार करावा. उद्याचे उद्या पाहु. उद्याचा विचार आजच करून डोक्याचा ताप वाढवू नये. व्यसनमुक्तीसाठी अशा तर्‍हेने वर्तमानकाळात राहणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा रुग्णाला भविष्याचा विचार करून अस्वथता येते. आणि मानसिक अस्वास्थ्याचा परिणाम पुन्हा व्यसनाकडे वळण्यात होऊ शकतो.

आता याच पार्श्वभूमिवर पुढील संस्कृत सुभाषित पाहता असे लक्षात येते की जवळपास हाच विचार त्यात सांगितला आहे.

गते शोको न कर्तव्यो भविष्यं न चिन्तयेत् |
वर्तमानेन कालेन वर्तन्ते हि विचक्षणा: ||

होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करु नये. भविष्याची चिंता करु नये. चतुर, हुशार माणसे वर्तमानकाळात जगतात.

खरं तर "वन डे अ‍ॅट अ टाईम" पेक्षा कितीतरी जास्त अर्थ या सुभाषितात ठासून भरला आहे. व्यसनात किंवा नैराश्यासारख्या मानसिक आजारांमध्ये माणसे गतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करीत राहतात. नैराश्यात हे बरेचदा आढळतं. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करीत राहणे हे उदासीनतेला आमंत्रण देण्यासारखे असते. अनेकदा व्यसन आणि नैराश्य हे हातात हात घालून चालताना दिसतात. उदासीनता येते म्हणून पुन्हा व्यसनाकडे वळणे. गतकाळी केलेल्या गोष्टींचा विचार मनात येतो म्हणून त्यापासून पळण्यासाठी व्यसनाकडे वळणे आणि व्यसनाकडे वळल्यावर व्यसनाचा अपरिहार्य परिणाम म्हणून उदासीनता येणे असे विषारी वर्तुळ अनेकांच्या बाबतीत आढळते. असे असताना आता आपल्या हातात काय आहे, त्या उपलब्ध गोष्टींचा आपण कशा तर्‍हेने वापर करु शकतो याचा विचार होणे महत्त्वाचे असते. भूतकाळापेक्षा वर्तमानातील परिस्थिती बदललेली असु शकते. काही गोष्टी आपल्याला अनुकूल झालेल्या असु शकतात. पण गतकाळाचा विचार करणारी माणसे या सकारात्मक बाबींकडे नकळत दुर्लक्ष करीत असतात. आणि आपला आजार वाढवित असतात.

अशा तर्‍हेने या सुभाषितावर मानसिक स्वास्थ्य आणि समुपदेशनाच्या दृष्टीने बरेच काही बोलता येईल. किंबहूना आजारागणिक या सुभाषिताचा वेगळा विचार करता येईल. माझे काम व्यसन आणि नैराश्य या विषयावर सुरु असल्याने मी त्या संदर्भात या सुभाषिताचा विचार करीत आहे. संस्कृत भाषेत अल्पाक्षरी असण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण त्यामुळे हे सुविचार किंवा एकंदरीत अनेक तर्‍हेचे ज्ञान हे सूत्रमय भाषेत साठवले गेले आणि मुखोद्गत झाले. संपूर्ण पातंजल योगसूत्र फक्त १९६ सूत्रांमध्येच सांगितले गेले आहे. आणि त्यातील एकेका सूत्रांवर प्रदीर्घ भाष्य होऊ शकते इतका ठासून अर्थ भरलेला आहे. संस्कृत भाषेच्या सूत्रमयतेचा वापर मानसिक स्वास्थ्य आणि समुपदेशन म्हणून करता येईल असे मला मनापासून वाटते. अर्थात त्यावर काम होणे आवश्यक आहे. माझ्या छोट्याश्या क्षेत्रात मला हे काम सुरु करायचे आहे. अर्थात संस्कृत आणि समुपदेशनाच्या क्षेत्रातील विद्वान याला कितपत मान्यता देतील हा प्रश्न आहेच.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे "वन डे अ‍ॅट अ टाईम" हे लक्षात राहायला जितकं सोपं तितकं वरील सुभाषित सोपं नाही हा पहिला आणि महत्त्वाचा आक्षेप असु शकतो. तो योग्यदेखिल आहे. पण येथे पाठांतरापेक्षा मला विचार महत्त्वाचा वाटतो. आजकाल मोबाईलमुळे ही सुभाषिते साठवली जाऊ शकतात. वारंवार वाचली जाऊ शकतात. त्यावर मन चिंतन घडू शकते. तसे अनेक वॉटसग्रुप्स आहेत ज्यावर सुभाषिते, सुविचारांचा नुसता पाऊस पडत असतो. सतत या गोष्टी फिरत असतात. मला हे तसे नको आहे. माझा भर आहे तो विशिष्ट आजारांसाठी, त्यामुळे आलेल्या ताणावर उपाय म्हणून एखादा विचार संस्कृत वाङमयातून देणे. त्यावर त्या आजारानूसार त्यावर भाष्य करणे. त्या आजाराच्या कक्षेत त्या सुविचाराचा विचार करणे. शास्त्रीय पद्धतीने त्याची मांडणी करणे. मग ते एखादे सुभाषित असेल. कदाचित कालिदासाच्या महाकाव्यातील एखादा श्लोक असेल. पाठांतर बाजूला ठेवून विचारांवर भर देता येईल. कुणाला हे सोपी गोष्ट उगाचच कठिण केल्यासारखी वाटेल. पण मला तसे वाटत नाही.

सूत्रमयता हा संस्कृत भाषेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि एखादा शब्द एखाद्या ठिकाणी कवी का वापरतो याचेही येथे महत्त्व आहे. तेथे दुसरा शब्द चालणारच नाही. आमच्या काव्यशास्त्रात त्याचा बराच उहापोह आहे. मेघदूतात महाकवी कालिदास जेव्हा "कश्चित् कान्ता" म्हणतो तेव्हा "कान्ता" या शब्दाशिवाय दुसरा शब्द तेथे चालणारच नाही. कारण ती नुसती पत्नी नाही तर आवडती भार्या आहे. प्रिय आहे. आणि ते त्याला तेथे अधोरेखित करायचं आहे. त्यामुळे शब्दाचा चपखल वापर आणि अल्पाक्षरी असताना त्यात भरपूर आशय साठवण्याची शक्यता हा संस्कृत भाषेचा जो विशेष आहे त्याचा या कामासाठी वापर करता येईल अशी माझी समजूत आहे. रुग्णांना संस्कृत येण्याची आवश्यकता नाही. कारण हे समुपदेशन त्यांना समजेल अशा भाषेतच करायचे आहे. मात्र या सुविचारांचा रुग्णासाठी वापर करणार्‍याला मात्र त्याचा अर्थ नीट समजावून घेऊन त्यावर समस्येप्रमाणे भाष्य करता आले पाहिजे. ही सारी चर्चा माझ्यापुरता तरी व्यसन आणि नैराश्य या वर्तुळातच सुरु आहे. कारण या दोन्हींसाठी समुपदेशनाचा प्रामुख्याने वापर केला जातो.

जर हे शक्य झाले तर सुभाषित, महाकाव्य, कथावाङमय आणि अर्थातच संस्कृत भाषेतील तत्त्वज्ञान यांमध्ये अशा अनेक गोष्टी आढळू शकतील ज्यांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करून यातील विचारांचा समुपदेशनात समस्येनूसार वेगळा अर्थ लावता येईल. त्याद्वारे आपले आजचे जीवन जास्त सुकर करता येईल अशी माझी नम्र समजूत आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाणभारती
तस्यां ही काव्यं मधुरम् तस्मादपि सुभाषितम्!!
अर्थातच अतुल जी जीवनाचा ,अनुभवांचा अर्क सुभाषितकारांनी सुभाषितांत सांगितला आहे. संस्कृतातील सुभाषिते वाक्प्रचार ओठांवर, मनात येत नाही असा एकही दिवस जात नाही. विवेक जागृतीसाठी मला तरी पंचतंत्र कथांप्रमाणे सुभाषिते मला खूप उपयोगी पडली आहेत.

काव्य शास्त्र विनोदेन काले गच्छति धीमताम् या सुभाषित ओळींनी बऱ्याचदा मनाला लगाम लावला आहे. मी माझ्या जीवनात एकेकाळी दारू चा इतका गुलाम झालो होतो की खिशात पाच रुपये असले तरी देशीच्या दुकानापुढून पाऊल पुढे टाकू शकत नव्हतो. पाय आपोआप गुत्त्यात घेऊन जायचे.
देशी,गावठी व फ्रेंच पॉलिशसारखी विषारी दारू यांच्या विळख्यात पुर्णपणे अडकलो होतो. पण आत कुठेतरी केलेले वाचन, संस्कार हे चूकीचे आहे याची टोचणी देत होते.
परत माणसांत यायला या सर्व वांग़मयाची मग गीता असेल, इतर ग्रंथ असतील यांचा फार उपयोग झाला.

काव्य शास्त्र विनोदेन सुभाषिताचा शेवट कलहेन, व्यसनेनच मुर्खाणाम् असा काहीसा आहे. आपण व्यसनी म्हणजे मुर्ख आहोत असं आतून व्यसनमुक्त होण्यासाठी घंटानादासारखं आठवण करून देत होते.

अगदी चांगला विचार केला आहे तुम्ही अतुल जी. लाघव हा विशेष असल्याने सुभाषिते पाठ करण्याची कदाचित आवश्यकता भासणार नाही. नक्कीच सकारात्मक परिणाम व प्रतिसाद मिळेल तुम्हाला. शुभेच्छा. नीति शतकात वगैरे अशा आशयाचे वाङ्मय असेलच.

अतुल जी नैराश्यावर संगीत सुद्धा उपयोगी पडेल असे मला वाटते. गतं न शोचयेत या अर्थाने भले बुरे ते घडून गेले.. जरा विसावू या वळणावर यासारखी गीतं दु:खी मनांवर फुंकर घालतात. एकदा एक मुलगा आत्महत्या करायला निघाला होता, रेडिओवर 'या जन्मावर शतदा प्रेम करावे' हे गीत ऐकून विचार बदलला.
नैराश्य अनेकदा घरातील लोक भावनिक आधार देत नाहीत,
भविष्याच्या ताण यामुळे सुध्दा येत असते.

काव्य शास्त्र विनोदेन सुभाषिताचा शेवट>> व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहेन वा असा आहे.

लहानपणी लाड झाल्याने मुले बिघडतात. संस्कार म्हणजे आयुष्यात पराभव असू शकतो हे शिकवले जात नाही. ते पुढे कशानेही सुधारता येत नसावे.

खरं सांगायचं तर संशोधनाच्या दरम्यान निदान व्यसनाचं तरी एकच एक कारण असं कारण दिसून आलं नाही. काही ठिकाणी लाड दिसले, व्यसनी व्यक्तीच्या हातात भरपूर पैसा खेळताना दिसला. निरंकुश सत्ता दिसली. पण असं सगळीकडे नव्हतं. शिवाय व्यसन हे विशिष्ट क्लासमधून येतं असंही आढळलं नाही. डिप्रेशन तर आणखिनच गुंतागुंतीचा प्रकार आहे. माझ्या कामाचा रोख हा व्यसन आणि नैराश्य या दोन गोष्टींवर असल्याने त्या संदर्भात माझा विचार सुरु असतो.

धन्यवाद . अतुल जी मी आतापर्यंत मी दारूच्या व्यसनातून कसा बाहेर पडलो हे लिहिले आहे. मी घरापासून दूर असताना व्यसनाधीन झालो होतो. लग्नाच्या अगोदर दारू सोडली होती त्यामुळे मी असे काही वागलो असेल हे माझ्या घरचे कधीच कबुल करणार नाही. मला कुणीही असा व्यसनात अडकलेला माणूस भेटला तर मी माझी सगळी कथा त्याला सांगतो व तू देखील मुक्त होऊ शकतो असं समजावून सांगतो.
एकदा एका नातेवाईकाला खरं सांगून व्यसन नको करू सांगितले. तर बहादराने माझ्या पत्नीला व मुलांना मी दारू पिऊन वाया गेलो होतो हे जाऊन सांगितले. मुलांनी विश्र्वास नाही ठेवला. पण पत्नीला मी अगोदरच सर्व सांगितले होते
त्यामुळे काही डॅमेज झाले नाही. पण मनाला त्रास फार झाला.
तुम्हाला एक सुचवायचे आहे, या व्यसनातून बाहेर पडलेल्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज इकडे लिहा. व्यसनाने आर्थिक, सामाजिक नुकसान कसे होते हे लिहा. धन्यवाद.

डिप्रेशन तर आणखिनच गुंतागुंतीचा प्रकार आहे. माझ्या कामाचा रोख हा व्यसन आणि नैराश्य या दोन गोष्टींवर असल्याने त्या संदर्भात माझा विचार सुरु असतो.

यांचा यशाचा आलेख सतत चढता असेल अगोदर. मनाप्रमाणे गोष्टी घडत असतील. अचानक डाव फिरू शकतो हे कधी मान्य केलं नसेल. ठरावं लागलं नसेल.