लेप्रेकॉन रिटर्न्स

Submitted by पायस on 23 June, 2019 - 18:23

बॉलिवूडच्या चित्रपटांचा रसास्वाद घेतल्यानंतर हॉलिवूडची मुलुखगिरी करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. अगदी ऐश्वर्या, प्रियांका या मोहात अडकल्या तर आमची कथाच ती काय! तरी सेफ जॉनर म्हणून रसग्रहणाकरिता हॉरर बघण्याचे ठरवले. हॉरिबल आयडिया! त्यानुसार लेप्रेकॉन रिटर्न्स नामे हा महान चित्रपट बघण्यात आला आणि यात महान काय आहे हे तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रपंच!

०) पूर्वपीठिका

लेप्रेकॉन ही एक हॉरर फ्रँचाईज आहे. यात एकूण आठ चित्रपट आहेत. त्यांची रॉटन टोमॅटो वरची रेटिंग्ज - लेप्रेकॉन (२३/१००), लेप्रेकॉन २ (०/१००), लेप्रेकॉन ३ (०/१००), लेप्रेकॉन ४: इन स्पेस (०/१००), लेप्रेकॉन इन द हूड (२२/१००), लेप्रेकॉन बॅक २ द हूड (२५/१००), लेप्रेकॉन ओरिजिन्स (०/१००), लेप्रेकॉन रिटर्न्स (३८/१००). सरासरी १३.५/१००. आंग्लभाषक क्रिटिक्सवर आमचा फारसा विश्वास नसला तरी नमनालाच रिस्क नको म्हणून रिटर्न्सची निवड करण्यात आली. लेप्रेकॉन रिटर्न्स हा जरी २०१८ च्या डिसेंबरमध्ये आला असला तरी तो प्रत्यक्षात १९९३ च्या पहिल्या लेप्रेकॉन सिनेमाचा सीक्वेल आहे. या १९९३ च्या सिनेमाचा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे.

०.१) लेप्रेकॉन म्हणजे काय रे भाऊ?

तत्पूर्वी लेप्रेकॉन म्हणजे काय ते समजून घेऊयात. लेप्रेकॉन हा आयर्लंडमधला एक पर्‍यांचा प्रकार आहे. इथे परीचा अर्थ खोडकर भूत असा घ्यायचा. हे सहसा दाढी वाढलेले बुटके असतात. या बुटक्यांना दोनच कामे असतात - चपला-बूट बनवणे/दुरुस्त करणे आणि मनुष्यांच्या खोड्या काढणे. यांच्याकडे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले एक मडके असते. जर त्यांच्या भांड्यातील एक जरी नाणे तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांच्या सोबत जिनी-जिनी खेळू शकता. म्हणजे ते नाणे परत दिलेत तुम्हाला तीन इच्छा मिळतात आणि लेप्रेकॉनने त्या पूर्ण करणे बंधनकारक असते. आयर्लंडमध्ये कोणाचेही नाव सोन्या नसल्याने त्यांच्या सोबत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराची ट्रिक करता येत नाही, चिंता नसावी. अर्थात अशा गिव्ह-अ‍ॅन्ड-टेक लॉजिकचा वापर केला तर सिनेमात लॉजिक वापरावे लागेल याचे भान असल्याने ही फ्रँचाईज मनाला येईल तसे लेप्रेकॉनचे नियम बदलत राहते. कधी कधी सिनेमातल्या सिनेमात तीन-चारदा हे नियम बदलतात. आणि जसे मध्ये मध्ये "त्वाडा तुस्सी इथ्थे ओथ्थे" जोडलं की पंजाबी होतं तसेच मध्ये मध्ये माय ला मी म्हटलं, समोरच्याला लॅड म्हटलं की आयरिश होतं.

०.२) १९९३ मध्ये काय घडले?

१९९३ मध्ये या संकल्पनेचा वापर करून एक हॉरर कॉमेडी बनवण्यात आली. हा जेनिफर अ‍ॅनिस्टनचा (हो हो तीच फ्रेंड्सवाली) पहिला चित्रपट! याची आठवण निघाली की अजूनही जेनिफरच्या चेहर्‍यावर "ओह गॉड व्हाय" चे भाव येतात. लेप्रेकॉनची भूमिका केली होती वॉर्विक डेव्हिसने. याला हॅरी पॉटर सीरिजमध्ये ग्रिफूक आणि प्रोफेसर फ्लिटविकच्या भूमिकेत आपण बघितले असेल. वॉर्विकने मात्र ही भूमिका एंजॉय केली आणि हा धरून तब्बल सहा सिनेमात तो लेप्रेकॉन म्हणून उभा राहिला. रिटर्न्ससाठी तो नाही म्हणाला अन्यथा यावेळेसही लेप्रेकॉनची भूमिका त्यालाच मिळाली असती. त्याजागी लेप्रेकॉन म्हणून वर्णी लागली आहे लिंडेन पोर्कोची! लिंडेनने आपल्या परीने बरा प्रयत्न केला आहे पण त्याचा चिरका आवाज घात करतो.

तर होतं असं की ओरिजिनलमध्ये नॉर्थ डकोटामधल्या एका फार्महाऊसमध्ये एका लेप्रेकॉनला (वॉर्विक) कोंडून ठेवलेले असते. टोरी (जेनिफर) तिथे शिफ्ट होते आणि नेमका त्याच वेळी लेप्रेकॉन स्वतंत्र होतो. त्याला त्याचे सोने परत हवे असते (आय वाँट मी गोल्ड!). मग तो शिस्तीत तशी मागणी करतो पण हे लोक ऐकत नाही. मग तीन-चार जण मरतात, दोन-तीन जण जखमी होतात. लेप्रेकॉनला हायवेवर गाडी चालवल्याबद्दल एक पोलिस अडवतो. अशा अनेक छोट्या मोठ्या गंमती होतात. मग त्याचं एक नाणं ऑझी नावाचे पात्र गिळते. मग तो टोरी, हिरो, हिरोचा धाकटा भाऊ आणि ऑझीच्या मागे लागतो. हे चौघे मिळून त्याची कमजोरी - फोर लीफ क्लोव्हर, चार पाकळ्या असलेले एक फूल - शोधून त्याचा नायनाट करतात. तिथल्या एका पडक्या विहिरीत पडून तो मरतो. यानंतर आलेल्या सहा सिनेमांचा या पहिल्या सिनेमाशी काहीही संबंध नाही. इतकेच काय एकमेकांशीही फारसा संबंध नाही. मग गेल्या वर्षी अचानक काही जणांना पहिल्या सिनेमाचा थेट सीक्वेल बनवावा ही फर्स्टक्लास आयडिया सुचली आणि लेप्रेकॉन रिटर्न्ड!

वैधानिक इशारा: सिनेमा पाहणार असाल तर जरूर पाहा. यात घाबरण्यासारखे काहीही नाही. पण प्रोस्थेटिक मेकअप व रक्तपात विपुल प्रमाणात असल्याने आणि विभूतीप्रमाणेच "संस्कार नाम का चीज" अजिबात नसल्याने, त्यांची अ‍ॅलर्जी असल्यास जरा जपून.

१) स्लॅशरचे मुख्य पात्र हिरोईन असते, हिरो नव्हे!

१.१) जग वाचवण्यासाठी सेल्फी पोस्टणे बंधनकारक आहे

सिनेमाच्या सुरुवातीला (०.२) मध्ये नमूद केलेला लेप्रेकॉन मरतानाचा शॉट जरा स्टाईलाईज करून दाखवला आहे. कोल्ड ओपन न करता थेट श्रेयनामावली पडद्यावर बघून अनुभवी प्रेक्षकाला या सिनेमाची संकलक-दिग्दर्शक जोडी किमान पंचवीस वर्षे मागे असल्याचे झटकन लक्षात येते. त्यामुळे इथे लेट एटी-अर्ली नाईंटीच्या स्लॅशरचे एस्थेटिक लावण्याची मानसिक तयारी तो पहिल्या अर्ध्या मिनिटात करतो. स्लॅशरचे नियम असल्याने हिरोईन, म्हणजेच फायनल गर्ल, जगणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ! तसेच स्लॅशरमध्ये हिरो मरतो हे कायम ध्यानात ठेवा. त्यामुळे यातली सर्व पुरुष पात्रे मरणार हे सिनेमा सुरु करण्यापूर्वीच सांगता येते.

श्रेयनामावलीचा सीन हिरविणीचे स्वप्न होते असे दिसते. तिला स्वप्नात वगैरे येऊन लेप्रेकॉन घाबरवत असल्याने ही हिरोईन असल्याचे नक्की होते, नाहीतर भूत एवढी मेहनत कशाला घेईल? या स्वप्नांचा त्रास होऊन ती रडत असल्याचे तिचा फिस्कटलेला मस्कारा सांगतो. बसमध्ये बसून ती कुठेशी चाललेली असते. स्थळकाळाचे भान असल्याने मेकअप नीट करून ती "फनस्टाग्राम" वर सेल्फी पोस्ट करून "ऑफ टू सेव्ह द वर्ल्ड" हे कॅप्शन टाकते. एव्हाना तिचा थांबा आलेला असतो - डेव्हिल्स लेक! इथे लेक म्हणजे सरोवर, सिनेमात डेव्हिलची लेक नाही.
अशा भयाण नाव असलेल्या ठिकाणचा बस स्टॉप निर्जन नसला तरच नवल! तिथे बसून ती आपल्या केटी नावाच्या मैत्रिणीला फोन लावते. केटी तिला न्यायला येणे अपेक्षित असते. पण फोन जातो व्हॉईस मेलमध्ये आणि केटीचा अजून पत्ता नसतो. इथे आपल्याला हिरोईनचे नाव लायला जेंकिन्स असे समजते. लायलाची भूमिका वठवली आहे टेलर स्प्रिटलरने. त्यातल्या त्यात अभिनय हिनेच केला आहे. वाट बघण्याखेरीज पर्याय नसल्यामुळे ती तिथेच बसून राहते. पण आधीच्या शॉटमध्ये न दिसलेले एक काळे कुत्रे मात्र निघून जायचा पर्याय असल्याने "कोण हिच्या नादी लागेल" चेहरा करून निघून जाते. अचानक धडाम असा आवाज होतो आणि एक मळकट, ओढगस्तीला आलेला ट्रक (म्हणजे मिडवेस्टच्या भाषेत एसयूव्ही) दिसतो. हा ट्रक चालवणारा असतो ऑझी (मार्क होल्टन). तोच पहिल्या सिनेमातला ऑझी आणि तो ट्रकही पहिल्या सिनेमातलाच (रंग जरासा बदलून) आहे. किमान पंचवीस वर्षे जुने असूनही वाहन त्यामानाने काहीच पिचलेले नाही. पहिल्या सिनेमातला रंगार्‍याचा धंदा बंद करून त्याने टॅक्सी आणि डिलीव्हरी सर्व्हिस सुरू केली आहे. याचा एकंदरीत अवतार बघून ती मॉडर्न कन्या ही ब्याद कटावी म्हणून प्रार्थना करते पण तो स्मॉल टाऊन स्पेशल अगत्याने तिला राईड देऊ करतो.

१.२) टेंपो चालवणारे टॅक्सीवाले भाड्याचे पैसे घेत नाहीत

ऑझी वेंधळा दाखवला असल्याने ती साहजिक त्याला टाळू बघते. पण छोट्या शहरात कथानक असल्याने ऑझीला सगळी बित्तंबातमी असते. उगाच लपवाछपवी करण्याची वृत्ती नसल्याने संवादांतून सर्वकाही घडाघडा सांगितले जाते. हिच्या प्रमाणे आणखी काही कॉलेजकन्यका इथे आल्या आहेत. हे ठिकाण त्यांच्या कॅम्पसपासून बरेच दूर असून, इथल्या एका जुनाट घराची दुरुस्ती करण्यासाठी त्या आल्या आहेत. ऑझीला लायलाचा चेहरा ओळखीचा वाटतो पण का ते त्याला आठवत नाही. ती त्याला उडवून लावते आणि तो परत जायला निघतो. मग ती सर्वश्रेष्ठ सर्च इंजिन "बूगल" वर डेव्हिल्स लेकमधली टॅक्सी शोधते. बूगल तिला सरळ एक नंबर देतो. तो नंबर ७०१ ने सुरू होतो. ७०१ हा बिस्मार्क (नॉर्थ डकोटाची राजधानी) व आसपासच्या एरियाचा फोन कोड आहे. हे कथानक याच एरियात घडते आणि हा भूगोल कधीही चुकवला जात नाही. भले भले नावाजलेले सिनेमे सुद्धा भूगोलाच्या बाबतीत इतके पक्के नाहीत. असो, तर तो नंबर अर्थातच असतो ऑझीचा. नाईलाजाने ती त्याच्या सोबत घराकडे जायला निघते.

एका अतिशय जुन्या टेंपोमध्ये बसून त्यांचा प्रवास सुरू होतो. गाडीच्या आत सर्वत्र फोर लीफ क्लोव्हरची स्टिकर्स आहेत. लायला काहीतरी बोलायचे म्हणून ऑझीला आयरिश आहेस का असे विचारते. तो झटकन नाही म्हणतो. मग काहीतरी बोलायचे म्हणून तोही तिला विचारतो की तू इथे पहिल्यांदाच आली आहेस का. त्याने आधीच्या प्रश्नाला नाही उत्तर दिले म्हणून ती हो उत्तर देते. ऑझीला सतत असे वाटत असते की त्याने तिला कुठेतरी पाहिले आहे. ती सांगते की तिची आई पूर्वी इथे राहत होती, त्याच घरात जिथे ते चालले आहेत. ती टोरी अर्थात पहिल्या सिनेमातल्या जेनिफर अ‍ॅनिस्टनची मुलगी असल्याचे उघड होते. लायला आणि टोरी यांच्या चेहर्‍यात जराही साम्य नसतानाही ऑझीला ती तिची मुलगी वाटते हे बघून प्रेक्षकाचे डोळे पाणावतात. त्याने आता टोरी कशी आहे विचारल्यावर लायला निर्विकारपणे ती वारली असे सांगते. तिचा निर्विकारपणा बघून प्रेक्षकाच्या घरात पूर येतो. स्क्रीनमधून तो पूर बघू शकत असल्याने ऑझीही दोन आसवे ढाळतो.

मग त्याला मुख्य मुद्दा आठवतो. लायलाला आपल्या आईकडून त्या घराविषयी काही माहिती मिळाली आहे का? लायला नकारार्थी मान हलवते. इतक्या वर्षात काही न झाल्याने कदाचित आता सर्वकाही ओके आहे असे समजून ऑझीही विषय फारसा वाढवत नाही. कॅम्पसपासून सुदूर अशा निबिड अरण्यात मध्येच एक ओसाड माळरान आहे. तिथे एक जुना बंगला आहे. शेजारी एक लाकडी शेड आहे. एवढ्यानेही ओळख न पटली तर काय घ्या म्हणून घरावर इंग्रजी "ए यू" अशी अक्षरे आहेत. इथे प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेण्याचा हेतु नसून लेप्रेकॉनला फोरशॅडो केले गेले आहे (गोल्डचा केमिकल सिम्बॉल!). ऑझी लायलाचे सामान गाडीतून बाहेर काढत असताना त्याचा फोन खाली पडतो. २०१८ सालीसुद्धा नोकिया ३३१० वापरत असल्याने ऑझीची परिस्थिती एकंदरीत फारशी बरी नसल्याचे समजते. आणि असेलही कशी? तो टॅक्सीचे पैसे न घेताच जायला निघतो. जाण्यापूर्वी तो पडक्या विहिरीकडे ज्या पद्धतीने बघतो ते पाहता कोणालाही इथे काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय यावा, भले विहीर कोरडी ठक्क का असेना! "काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही" वृत्तीचा ऑझी जाता जाता लायलाला सांगतो की बहुतेक सगळं ठीक आहेच पण तसे नसेल तर तळघराची तपासणी कर. तिला तसाच गोंधळात टाकून तो निघून जातो.

१.३) इंटरनेट नसेल तर कुठलेही काम होत नाही.

"जिथे नाक खुपसण्याची गरज नाही तिथे नाक खुपसलेच पाहिजे" हा हॉरर सिनेमांच्या पात्रांचा गुण लायलात आहेच. त्यामुळे ती पहिले काम करते ते विहिरीत डोकावून पाहते. एवढ्या लवकर भूताला आणण्यात काही फायदा नसल्याने इथे टुकार जंप स्केअर निघणार आहे हे प्रेक्षक ओळखू शकतो. हॉरर पाहण्यासाठी अशा जंप स्केअरच्या जागा ओळखण्याची सवय असल्याचा प्रचंड फायदा असतो. त्यामुळे प्रेक्षक भयरसाखेरीज इतर रसांचाही आस्वाद घेऊ शकतो. तिला मागून दचकवण्याचे काम करते केटी. लायला चार वाजता येणार होती तर ती इथे कशी? बुचकळ्यात पडलेल्या केटीला लायला सांगते की आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत. यावर केटी निर्विकारपणे सांगते की तशी पण केटी तिला घ्यायला येऊ शकली नसती कारण मेरेडिथ गाडी घेऊन कुठेतरी गेली आहे. या सिनेमातल्या पात्रांचा निर्विकारपणा वाखाणण्याजोगा आहे. आणि तो चढत्या आलेखाप्रमाणे वाढतच जातो.

तर या मुली इथे का आहेत. या मुलींच्या सोरोरिटीने (ही संकल्पना माहिती नसेल तरी काही फरक पडत नाही, एकप्रकारची संस्था समजून सोडून द्या) ही जागा विकत घेतली आहे. आता ती शेड, तो बंगला हे सगळं पाडून तिथे सोरोरिटी हाऊस बांधण्यात येणार आहे. त्या कामासाठी या मुलींना पाठवण्यात आले आहे. केटी लायलाला सांगते की बंगल्याच्या मागे एक क्लोव्हरचा वाफा आहे. त्यामुळे तिला रोजच क्लोव्हर ज्यूस प्यायला मिळेल. हे पुन्हा एकदा फोरशॅडोईंग आहे कारण लेप्रेकॉनचा वीकनेस ....! इथे आपल्याला तिसरी कॉलेजकन्यका भेटते - रोज. चेनस्मोकरला कित्येक दिवस सिगारेट न देता ठेवल्यावर तो जसा वैतागलेला दिसेल तशी रोज दिसते. आणि संवादफेकीची शैली बघता हिला कधीही अँक्झाईटी अ‍ॅटॅक येईल असे वाटत राहते. लायलाचे स्वागत ती या प्रश्नाने करते - प्रातर्विधी घरात उरकायला आवडेल का घराबाहेर? इथे आपल्याला कळते की केटी आणि मेरेडिथ कामचुकार असल्याने, निदान रोजच्या मते, काम रखडलेले आहे. अ‍ॅपरंटली, केटी सोलार पॅनेल्सच्या मदतीने इंटरनेट वापरण्याचा प्रयत्न करत असते. यातून असे समजते की इथे सेल्युलर नेटवर्क, इंटरनेट वगैरे काहीही नाही. रोजला सर्वकाही स्वयंपूर्ण हवे असल्याने ती सोलार पॅनेल्सच्या मदती विहिरीतले पाणी उपसायचे ठरवते. त्यासाठी लायला मदत करेल असे ठरते. मग लायला विचारते ही मेरेडिथ कोण आहे?
मेरेडिथ ही त्या चौघींपैकी नेटिव्ह प्लांट्स आणि आर्किटेक्चर शिकत असलेली एकमेव स्टुडंट असल्याने तिला हाकलून देता येत नाही अशी माहिती कळते. पण खरे उत्तर केटी देते - शी लव्हज् हर नेटिव्ह प्लांट्स. थोडक्यात अशा सिनेमांत कंपल्सरी असणारे नशेडी पात्र!

२) भूताखेतांच्या सिनेमात भूताला शक्य तितक्या लवकर जिवंत करावे

२.१) दूषित पाण्यापासून सावधान!

इकडे ऑझी जंगलातून चाललेला असतो. आपला फोन कुठे पडला हे आठवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो आहे. मग त्याच्या लक्षात येते की आपला फोन त्या बंगल्यावरच राहिला. तिकडे मेरेडिथ नॉर्मल मनुष्यांकरिता आठवडाभर पुरेल इतकी, आणि तिच्यासाठी बहुधा रात्रभर पुरेल इतपत बियर घेऊन येते. सोबत पिझ्झा आणि दोन मुले असतात. यांची नावे आहेत अँडी व मॅट. अँडी आणि केटीचा पुराना याराना असल्याचे स्पष्ट होते. रोज कष्टाने आपला संताप आवरते. त्यावर मेरेडिथ म्हणते - "यू टोल्ड मी टू फाईंड पीपल दॅट आर हँडी, दॅट्स मॅट अ‍ॅन्ड अँडी!"
वैधानिक इशारा: लेप्रेकॉन सिनेमांमध्ये वाट्टेल तेव्हा वाट्टेल तसे यमक संवाद आहेत. काही गुंडाची आठवण करून देण्याइतपत दर्जेदार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकाला डोळ्यात कचरा गेल्याचा अभिनय करावा लागतो.
दुर्दैवाने मेरेडिथकडे पिझ्झा (वाचा: रात्रीचे जेवण) असल्याने सर्वांना पडते घ्यावेच लागते आणि काम पूर्णपणे थांबते. अजून एक फोरशॅडोईंग व्हावे म्हणून केटी लायलाला म्हणते की अँडी तिचा एक्स असला तरी ती अजिबात रोमँटिक होणार नाही आहे.

हा गोंधळ चाललेला असताना ऑझी परत आलेला आहे. फोन शोधत शोधत तो विहिरीपाशी जातो. हे साफ गंडलेले आहे कारण त्याचा फोन विहिरीपासून बराच दूर पडला होता. मग विहिरीतून हसण्याचा आवाज येतो. "अनोळखी आवाज आला की काढता पाय घेण्याऐवजी त्या आवाजाच्या रोखाने जाणे" हा हॉरर सिनेमांत शहीद होण्यास आवश्यक गुण असल्याने ऑझी विहिरीत डोकावून बघतो. त्याला वाटते की प्लास्टिकचे क्लोव्हरचे फूल त्याचे रक्षण करेल. हा त्याचा गैरसमज असतो. जणू याच क्षणाची वाट पाहत असल्याप्रमाणे विहिरीतून पाण्याचा फवारा उडतो. हा फवारा ऑझीला चिंब करण्यास पुरेसा ठरतो. ही घटना आणि दूषित पाणी तोंडात गेले ही दोन कारणे त्या मुलींकडून किमान टॉवेलची मागणी करण्यास पुरेशा आहेत. तरी ऑझी जंगलातून तसाच परत जायला निघतो.

२.२) सोन्याचे नाणे पचत नाही.

"हा निव्वळ योगायोग आहे" असे स्वतःला बजावण्याची कंडिशन पूर्ण झाल्याने ऑझीची शंभरी भरली हे कळते. त्याला गाडीतच आंबट ढेकरा यायला लागतात. तो शर्ट वर करून बघतो तर पोटात काहीतरी वळवळत आहे हे त्याच्या लक्षात येते. तत्काळ गाडी थांबवून तो बाहेर पडतो. घोटभर पाणी त्याच्या तोंडातून बाहेर पडते. अखेर लेप्रेकॉनला त्याची दया येते आणि तो त्याचे पोट फाडून बाहेर येतो. इथे बेसावध प्रेक्षक श्वास रोखून बसल्याचा संवादलेखक फायदा घेतो. पोट फाडून बाहेर येताच लेप्रेकॉन म्हणतो - पापा (इथे प्रेक्षक गार)
पापा ऑझी पोट फाटल्यानंतरही जिवंतच असतो. मग तशाच अर्धवट बाहेर आलेल्या लेप्रेकॉनशी तो थोडा वेळ शिळोप्याच्या गप्पागोष्टी करतो. अरे तुला तर आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी मारले होते, तू परत कसा आलास इ. इ. यावर लेप्रेकॉन एक अतिशय न-विनोदी ड्वायलॉक मारतो आणि ऑझी मरतो. (०.२) मध्ये नमूद केल्याप्रमाणे १९९३ मध्ये गिळलेले सोन्याचे नाणे अजूनही ऑझीच्या पोटात असते. ते मिळाल्याने लेप्रेकॉन खुश होतो आणि जंगलात कुठेतरी निघून जातो.

२.३) यमक जुळवणे हे भयंकर महत्त्वाचे असते.

या घटनेची माहिती नसलेले ते सहा निष्पाप जीव दारू आणि पिझ्झ्यात मग्न आहेत. इथे रोज पुन्हा एकदा स्वयंपूर्णतेचा निर्णय बोलून दाखवते - पाणी विहिरीचे, वीज सोलार, स्वतःचे भाजीपाल्याचे वाफे, बकर्‍या इ. इ. इथे केटी व अँडीला उगाच यमक जुळवायची हुक्की येते - केटी: इट्स गोईंग टू बी टोटली किकअ‍ॅस, अँडी: यू डू हॅव अ ग्रेट अ‍ॅस. असे आणखी भयंकर संवाद नकोत म्हणून लायला एका सोनेरी ट्रॉफीकडे बोट दाखवून हे काय आहे विचारते. या ट्रॉफीला गवंड्याच्या थापीचा आकार आहे. ते रोजला कशासाठी तरी मिळालेले असते. त्याचा आकार तसा का आहे असे फुटकळ प्रश्न विचारायचे नसतात. इथे दोन गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे.
१) जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे या सिनेमात सोने वापरले जाणार आहे - जसे ही ट्रॉफी सोन्याची आहे.
२) हा सिनेमा चेकॉव्ह्ज गनचे धार्मिकपणे पालन करतो. प्रत्येक वस्तु, प्लॉट पॉईंटचा वापर झालाच पाहिजे. त्यामुळे यात इतके फोरशॅडोईंग आहे की ज्याचे नाव ते. या ट्रॉफीचा काय उपयोग आहे ते खूप नंतर स्पष्ट होते.

लायला या कॉलेजमध्ये आणि ग्रुपमध्ये नवीन असल्याने मेरेडिथ तिची विचारपूस करते. लायलाला तिची ओळख करून द्यायला सांगितल्यानंतर ती म्हणते - माझं लहानपण एकटं एकटं गेलं, मला कोणी मित्र-मैत्रिणी नव्हते कारण मला माझ्या आईची काळजी घ्यायला घरी थांबायला लागायचं. तिला आजूबाजूला भूतंखेतं असल्याचा भास व्हायचा. तिची मानसिक अवस्था खालावत गेली आणि अखेर कॅन्सरने ती गेली. कहर म्हणजे हे सर्व मॅट त्याच्या हँडीकॅममध्ये शूट करतो आणि ती मस्तपैकी कॅमेर्‍यात बघून हे सगळं म्हणते. यावर सर्वांच्या प्रतिक्रिया अशा - अँडी व केटी आणखी बियर आणायला स्वयंपाकघरात जातात, मॅटला लायलामध्ये इंटरेस्ट निर्माण झाल्याचे दिसते, मेरेडिथ "जस्ट सेइंग" चेहर्‍याने लायलाच्या फॅमिलीवर जजमेंटल कमेंट मारते आणि रोजला जोपर्यंत हे सर्व लोक सकाळी सहाला उठून काम करत आहेत तोवर काहीच फरक पडत नसल्याने ती सगळ्यांना सहाचा गजर लावायला सांगून घराच्या ब्लू प्रिंट्समध्ये डोके खुपसते. प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नसल्याने स्वयंपाकघराचा शॉट लावला जातो. केटी अँडीला म्हणते - बिईंग सुपर क्लेव्हर, विल गेट यू नोव्हेअर. अँडी जिथे जायचे तिथे पोहोचतोच, यावरून अँडीच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज यावा. रात्र झाल्याने सर्व थकले जीव झोपी जातात.

३) भूत जर लोकांना मारणार नसेल तर त्या भूताला काय अर्थ आहे?

३.१) भाजीपाल्याचे भाजी करण्याव्यतिरिक्तही महत्त्वाचे उपयोग असतात

पहाटे लायला दु:स्वप्नाने जागी होते. स्वप्नात ऑझीचे भूत तिच्याकडे बघत असते आणि तिच्या गालावर एक रक्ताचा थेंब पडतो. भुताटकी सुरू झाल्याचे कळवणे क्रमप्राप्त असल्याने ती उठल्यावर तिच्या गालावर खरंच रक्ताचा थेंब असतो. बाकी सर्व अजूनही साखरझोपेत असतात. तळघरातून येत असलेल्या आवाजाच्या रोखाने ती जाते तर बघते की विहिरीतून उपसलेले सर्व पाणी गळक्या पाईपमधून तळघरात साठले आहे. जसे मगरीचे फक्त डोळे किंवा शार्कचा फक्त पंख/कल्ला पाण्याबाहेर दिसतो तशी लेप्रेकॉनची टोपी फक्त पाण्याबाहेर दिसते आणि तो इकडे तिकडे पोहत राहतो. लायलाला मात्र ते दिसत नाही. फायनल गर्ल असल्याने ती मरणे अशक्य आहे त्यामुळे या सीनमधून पुन्हा एकदा दिग्दर्शकाचा प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेवर असलेला अविश्वास स्पष्ट होतो. रोज एव्हाना उठलेली असते. ती हा प्रकार बघून वैतागते. पण लायला जेव्हा हे पाणी ड्रेन करायची तयारी दर्शवते तेव्हा तिचा जीव भांड्यात पडतो. तळघरात व्हेजिटेबल ज्यूसच्या बरण्या असतात. त्या म्हणे मेरेडिथच्या असतात. मेरेडिथ आणि आरोग्यवर्धक भाज्यांचा रस? यावर रोज स्पष्टीकरण देते - या ज्यूसमध्ये व्होडका मिसळलेली आहे. त्या दोघी जातात, लेप्रेकॉन आणखी असंबद्ध संवाद म्हणतो आणि निघून जातो.

तिकडे छतावर केटी व अँडी सोलार पॅनेल्स बसवत आहेत. केटी त्याला म्हणते की तू स्क्रू नीट बसवत नाही आहेस. अशाने पॅनेल्स ढीले राहून पडण्याची शक्यता आहे. अँडी यावर "तुला काय कळतं त्यातलं गप्प बस" म्हणतो. केटी प्रत्युत्तर म्हणून काल रात्रीची वॉर्निंग खरी करते आणि अँडीचा हिरमोड होतो. मदत व्हावी म्हणून आलेला मॅट एका ड्रोनला कॅमेरा जोडून संपूर्ण क्षेत्राचे शूटिंग करत असतो. त्यात दिसते की मेरेडिथला जबरदस्त हँगओव्हर असून ती आंतरिक रसांनी ड्रम भरण्याचे काम करते आहे. चिडून रोज तिला विचारते की तुला या कामात इंटरेस्ट आहे का? ती म्हणते अर्थात - या भाजीपाल्याकडे (इथे चार रोपटी कल्पावीत) इतर कोणीतरी लक्ष देतं का? पुढे ती म्हणते की वनस्पतींमुळे आसपासच्या जागेचे नंदनवन बनते. तिच्या तोंडून अशा वैचारिकाची अपेक्षा नसल्याने रोज आणि प्रेक्षक क्षणभर आश्चर्यचकित होतात. पण ती लगेच गैरसमज दूर करते - आणि तुम्ही जवळपास सर्व वनस्पतींपासून दारू बनवू शकता.

लायला घराजवळच्या शेडमध्ये असते. त्या शेडमध्ये एक मोठ्ठे नळकांडे असते (साधारण आठ-दहा फूट उंच). त्यातून ढम्म ढम्म असा आवाज येतो. लायलाला वाटते की या पाचजणांपैकी कोणीतरी तिला घाबरवायचा प्रयत्न करते आहे. मागून येऊन तिला मॅट दचकवतो. पिंपातून आवाज काढणारा तो नसल्याचे स्पष्ट होते. मग लायला जवळच पडलेला एक लोखंडी आकडा घेऊन ते नळकांडे आडवे पाडते. पण त्यात कोणीच नसते. तिची शक्ती बघून मॅट भलताच इंप्रेस होतो. हा उद्योग कोणाचा? अर्थात लेप्रेकॉनचा. तो लपून त्या दोघांवर नजर ठेवून असतो. आपल्या जादूने तो एक खुरटे त्यांच्यावर फेकून त्यांना मारण्याचा असफल प्रयत्न करतो. ते खुरटे फेकलेच जात नाही. एकंदरीत मुद्दा असा असतो की पंचवीस वर्षांत त्याच्या जादूत दम राहिलेला नसतो. अनाकलनीय कारणास्तवे त्याने जर लोकांना मारले तर त्याची शक्ती परत येऊ शकत असते (हा नियम आधीच्या सातही सिनेमांच्या विरोधात जातो, पाहा ०.१). आता कापाकापी सुरू होणार असल्याचे हे द्योतक आहे.

३.२) कापाकापीचे काम कंटाळवाणे असल्याने भूतांनाही त्यामध्ये डार्क ह्यूमर मिसळायला आवडतो.

मॅट लायलाशी जवळीक वाढवायचा प्रयत्न करतो. मॅटला फिल्ममेकिंगमध्ये रस असतो पण घर दुरुस्ती/रिनोव्हेशन वगैरे मध्ये त्याला शून्य गती असते. काहीतरी करायचे म्हणून तो डॉक्युमेंटरी बनवणार असतो. लायला आणि तिच्या रामकथेवर माहितीपट बनवायची ऑफर तो देतो. ती ते हसण्यावारी नेऊ बघते आणि तिला ऑझीचे भूत दिसते. मॅटला अर्थातच ते दिसत नाही आणि काल रात्रीच्या माहितीनंतर साहजिकच तो तिच्याकडे विचित्र नजरेने बघून निघून जातो. यानंतरची लायलाची हताश प्रतिक्रिया बघता तिलाही त्यात थोडाफार इंटरेस्ट निर्माण झाला असल्याचे दिसते. (स्लॅशर्सच्या नियमानुसार मॅट मरणार, काळ्या दगडावरची पांढरी रेघ!).

इकडे केटीच्या मदतीने रोज सौर उर्जेचे वीजेत रुपांतर करण्यात यशस्वी होते. या आनंदात मेरेडिथ नवीन दारूची बाटली आणायला जाते. केटीला जंगलातून कोणीतरी हसत असल्याचा आवाज येतो. पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. लेप्रेकॉनचे लक्ष्य आत्ता ती नसल्याने काही होत नाही पण दुसरं कोणीतरी तितकं भाग्यवान नाही आहे. भरदुपारी गावच्या पोस्टमन काकांची बटवड्याची वेळ असते. या निर्जन स्थळी एक सोडून चार पत्रपेटी आहेत. म्हणजे असे अजून तीन बंगले आहेत. यांच्याकडून मदत मागवली जाणार नसली तरी या मुलींप्रमाणेच अजून तीन वेडपट गट आहेत याची नोंद घ्यावी. ती पत्रे कॉलेजमधून आली आहेत असे समजूयात. तर पोस्टमन पेटी उघडून पत्र आत टाकतो आणि काहीतरी त्याच्या हाताला चावते. भूताची शक्यता जरी सोडून दिली तरी हाताला जर काही चावले असेल तर तो एखादा साप असू शकतो, अशावेळी पेटीत डोकावून पाहणे वेडेपणाचे आहे हा विचार त्याच्या मनास शिवत नाही. इतर काही नाही तरी एवढ्या एका कारणासाठी त्याचे मरण अटळ आहे. जर हा इतका निवांत असेल तर तसाही तो विषबाधा होऊन मरेलच.

या सिनेमास साजेशा निर्विकारपणे तो पत्रपेटीत डोकावतो. अपेक्षेप्रमाणे आत लेप्रेकॉन असतोच. तो त्याचे डोके आत ओढून घेतो आणि बाहेर टेलिपोर्ट होतो. डोके अडकल्याने पोस्टमनला बाहेर काय चालले आहे हे काही कळत नाही. लेप्रेकॉन पोस्टमनच्या गाडीत जाऊन बसतो. आश्चर्यजनकरित्या त्या ठेंगूचे पाय अ‍ॅक्सलरेटरपर्यंत पोहोचू शकत असतात. पोस्टमन गाडीला धडकून जमिनीवर पडेपर्यंत तो वाट पाहतो आणि मग गाडी रिव्हर्समध्ये घालून तो चाक पत्रपेटीवरून नेतो. पोस्टमनचे डोके कलिंगडाप्रमाणे फुटते आणि तो मरतो. लेप्रेकॉन शांतपणे जाऊन त्या पेटीवर "हँडल विथ केअरः फ्रॅजाईल" चे स्टिकर लावतो. जुन्यांचे काहीतरी नियम पाळावेत म्हणून बुटावर उडालेले रक्ताचे डाग तो स्वच्छ करतो (पाहा ०.१).
"किलिंग इज की टू माय हेल्थ अ‍ॅन्ड हेल्प्स मी इन फाईंडिंग माय वेल्थ". (इथे अ‍ॅक्चुअली त्याने मी हेल्थ/मी वेल्थ म्हणायला पाहिजे पण मूळ आयरिश नसले की नकली बेअरिंग सुटायला वेळ लागत नाही.)

लेप्रेकॉनच्या शक्ती परत येत आहेत. या संकटापासून ते सहा जीव अजाण आहेत. हे सर्व लेप्रेकॉनपासून वाचतील का? लायला आपल्या आईप्रमाणेच लेप्रेकॉनचा सामना करण्यात यशस्वी होईल का? आणि मुख्य म्हणजे या लेप्रेकॉनच्या सोन्याचे दर्शन घडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे उर्वरित रसग्रहणात. अल्पविरामानंतर उर्वरित रसग्रहण प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे! किती पेशंस आहे तुमच्यात!
हे असले भंकस सिनेमे बॉलिवुड मधे चवीचवीने बघितले जातात?

बघावा का विचार करतेय. फार बिभित्स मला बघवत नाही. चांगली भुतं असली तर बघते. Happy

भरदुपारी गावच्या पोस्टमन काकांची बटवड्याची वेळ असते. >> मी चुकून 'बटाटावड्याची वेळ' वाचलं...सारांश भुक लागलेली असली की असे दिसू लागते Happy

मस्तय!!
पायस, तुमच्या कथा, नेहमी वाचत असल्याने ही पण एक नवी मालिका आहे का वाटलं!! बट thats more interesting!!

माझ्याकडे आयर्लंडमधून आणलेला लेपरेकॉन आहे (सॉफ्ट टॉय). सुवेनीअर म्हणून विकत घेताना दुकानदार आजोबांनी सांगितलं होतं की हा लोकल धनदेवता आहे आणि घरात ठेवला की संपन्नता येते इ इ

आज तुमच्या लेखातून भरपूर त्या लेप्रेकॉनची भरपूर माहिती मिळाली. भरपूर पेशन्स आहेत एवढा मोठा लेख इतक्या unpopular मुव्ही सिरीज पाहून त्यावर लिहायला. वाचायला तरी मजा आली.

जबरी. भारी रसग्रहण. मला चित्रपट पाहण्यापेक्षा रसग्रहण आवडतं. मनात पाहिजे तशी कल्पनाचित्रं रंगविता येतात.

अल्पविरामाचा दीर्घविराम झाला. असो, सध्या थोडा वेळ मिळाला आहे तर अमर-शक्तीसोबत लगे हाथ हा पेंडिंग प्रोजेक्टही संपवूयात.

४) पात्रयोजनेतील सर्वाधिक डोक्याला ताप पात्राला लवकरात लवकर मारावे.

४.१) सायकोला आदरांजली वाहण्याचा मोह कोणत्याही हॉरर चित्रपटाला होऊ शकतो.

लायला दिवसाभराच्या श्रमानंतर शॉवर घेत असते. नळाला गरम पाणी असल्याने ती बालिका मनसोक्त नहाते आहे. अशावेळी खोडा घालायला लेप्रेकॉन टपकतो. उगाचच दहा-बारा कट देऊन सस्पेन्स बिल्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण लायला मरणे शक्य नसल्याने प्रेक्षक असल्या रेड हेरिंग्जना भीक घालत नाही. लेप्रेकॉन काहीतरी जादू करतो आणि नळाला गरम ऐवजी थंडगार पाणी यायला लागते. अचानक थंड पाणी अंगावर पडल्याने लायलाची बोंब उडते. ते ऐकून केटी आत डोकावते. लायला म्हणते नळाला गरम पाणी येत नाही आहे. यावर केटी तिला "चिल" म्हणून निर्विकारपणे टॉवेल ओढलेल्या अवस्थेत लायलाचा स्नॅपचॅटवर टाकण्यासाठी फोटो काढते. यावर लायला आणि प्रेक्षक भयचकित नजरेने बघत राहतात.

घरात वायफाय सुरू झाल्याने सर्व गँग आनंदात असते. मॅट स्वतःला डेव्हिड लिंच समजत असल्याने तो ड्रोनमधून घेतलेल्या खराब फुटेजचं काहीतरी नॉनसेन्स विश्लेषण करत असतो. अचानक फुटेजमध्ये काहीतरी हलताना दिसल्याने तो फुटेज पॉज करतो (निदान प्लेअर मध्ये तसे दिसते). या सिनेमाला संगणकातल्या आभासी दुनियेचे नियमसुद्धा मान्य नसल्याने तो पॉज केलेला व्हिडिओ सुद्धा चालूच राहतो. मॅटला वाटते की तिथे ससा आहे. प्रत्यक्षात त्या फुटेजमध्ये काहीही दिसत नाही. मॅटचे नाव कवी ठेऊन काव्यात्मक न्याय देण्याची संधी आंग्लभाषक दिग्दर्शकाला दुर्दैवाने मिळालेली नाही. अचानक घरातल्या म्युझिक सिस्टिमवर आयरिश संगीत वाजू लागते. ते ऐकून घाबरून जाण्याऐवजी सगळेजण "चला झोपायची वेळ झाली" करून आवराआवर करू लागतात. अँडी पोर्टेबल बेडमध्ये हवा भरणार असे जाहीर करताच केटी म्हणते की तसं नको करू, पॉवर पुरेशी नसल्याने अतिवापर होऊन फ्यूज उडेल. अँडीच्या डोक्याचा फ्यूज उडालेला असल्याने तो याचा अर्थ आपण केटीला हवे आहोत असा काढतो. हा प्रकार आणखी वाढायला नको म्हणून गाणी ऐकण्याकरिता लायला तिचे पोर्टेबल स्पीकर्स वापरूयात असे सुचवते.

४.२) समोर भूत दिसले तर किमान एक लाथ तरी हाणावीच, कधी कधी पेकाटात बसून भूतही कळवळते

पोर्टेबल स्पीकर्स आणायला ती आपल्या खोलीत जाते. खोलीत तिच्या बेडवर एक पांडा झोपवलेला असतो. जंप स्केअर झाल्यानंतर कळते की तिच्या पांडा बाहुलीचे डोके मास्क सारखे घालून तिथे लेप्रेकॉन असतो. लेप्रेकॉन तिला टोरीची मुलगी म्हणून बरोब्बर ओळखतो. तो तिला सांगतो की ऑझीच्या पोटातल्या सोन्याच्या नाण्यामार्फत तो परत आला आहे. आता त्याला त्याची उरलेली सोन्याची नाणी परत पाहिजेत. लायला म्हणते मला नाही माहित तुझं सोने कुठं आहे. तिच्या गळ्यात आईने दिलेले एक सोनेरी नाणे लॉकेटसारखे आहे. लेप्रेकॉन ते हिसकावू बघतो तर त्याचा हात भाजतो. फॉरवर्ड रेफरन्स - लेप्रेकॉनची आणखी एक कमजोरी असते कास्ट आयर्न, ते नाणे सोनेरी मुलामा दिलेल्या बिडाच्या लोखंडाचे आहे. या गोंधळाचा फायदा घेऊन लायला लेप्रेकॉनला लाथा बुक्क्यांनी तुडवते. अलम दुनियेत इतर कोणत्याही भूतावर अशी लाजीरवाणी वेळ आली नसेल.

एखादी जड वस्तु याच्या डोक्यात घालून सोक्षामोक्ष लावावा असा विचार ती अंमलात आणणार इतक्यात अँडीच्या पराक्रमाने घराचा फ्यूज उडतो. याचा फायदा घेऊन लेप्रेकॉन निसटतो. निसटताना तो मॅटला धडकतो. लायला मॅटला "तुला जनावर नाही लेप्रेकॉन धडकला" हे कसे समजवावे या विचारात असते. रोज "ससा आहे तर बागेला कुंपण घातलेच पाहिजे, आत्ताच्या आत्ता" म्हणून अंधाराची कुंपण घालायला जाते. केटी घराचा फ्यूज आधी दुरुस्त करावा का अँडीचा या दुविधेत असते. हा सावळा गोंधळ मेरेडिथ बीअर पीत बघत असते. त्यातल्या त्यात हीच शहाणी असे बघून लेप्रेकॉन तिची भेट घेतो.

४.३) भूत दिसले तर त्यासोबत किमान एक सेल्फी घ्यावा, लाईक्स मिळवायला बरा पडतो

लेप्रेकॉनला फक्त सोन्यामध्ये इंटरेस्ट असल्याने तो मेरेडिथकडे त्या दृष्टीकोनातून विचारपूस करण्यासाठी आलेला असतो. मेरेडिथची तो आधी वारेमाप स्तुती करतो. यावर मेरेडिथला आपण टल्ली झाल्याचे लक्षात येते. लेप्रेकॉन "मी भास नाही आहे, तुझी कॅपॅसिटी अजून बरीच आहे" अशी तिची समजूत काढतो. यावर हसून ती लेप्रेकॉन सोबत एक सेल्फी घेते. लेप्रेकॉन या सेल्फी प्रकाराने भलताच इंप्रेस होतो. तो तिला एक डील ऑफर करतो (ऑफस्क्रीन, पण एकंदरीत प्रेडिक्टेबल पटकथा बघता आपण अंदाज बांधू शकतो).

तिकडे लायला रोज आणि मॅटला तो प्राणी लेप्रेकॉन असल्याचे पटवून द्यायची पराकाष्ठा करत असते. अर्थातच त्यांना हिचा स्क्रू ढिला असल्याची शंका येत असते. तेवढ्यात मेरेडिथ धावत येते आणि स्वयंपाकघरात एक सोन्यासाठी हपापलेला बुटका असल्याचे सांगते. तो लेप्रेकॉनच असल्याचा पुरावा म्हणून तिच्याकडे सेल्फी असतो. या सीनमध्ये एकसे एक मीम रेफरन्स आहेत जे संदर्भासहित स्पष्ट करायला दहा पाने खर्च करावी लागतील. तरी सारांश हवाच असेल तर इथे टिचकी मारा. आता मात्र त्या सर्वांची तंतरते. कधी नव्हे ते हॉरर सिनेमाला न साजेशा शहाणपणाचा, केटी आणि अँडीला घेऊन पळण्याचा निर्णय घेतला जातो.

तिकडे केटीने अँडीचा फ्यूज दुरुस्त केलेला असतो. यानंतर अँडीला लघुशंका येते. जंगलात हलके झाल्यानंतर त्याला लेप्रेकॉन भेटतो. लेप्रेकॉन अतिशय भंकस यमक मारतो. याने खुश होऊन अँडीसुद्धा लेप्रेकॉनसोबत सेल्फी घेतो. यावेळेस लेप्रेकॉनही छानपैकी पोज वगैरे देतो. या बदल्यात अँडीने सोन्याची नाणी परत द्यावीत अशी तो मागणी करतो. अँडीचा मेंदू आधीच, लहान त्यात हा असा असंबद्ध प्रश्न. तो पुरता गोंधळतो. लेप्रेकॉन चिडून त्याला गरागरा फिरवून फेकून देतो. तो आवाज ऐकून सगळे तिथे धावत येतात. अँडीने सोलार पॅनेल्सचे स्क्रू नीट न लावल्याचा फायदा लेप्रेकॉन घेतो आणि जादून ते ढिले स्क्रू उचकटून तो सोलार पॅनेल थेट अँडीच्या डोक्यावर पाडतो. याने अँडी उभा चिरला जातो. हे बघून एकदाचे त्या सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. लेप्रेकॉन अँडीवर पोटभर हसून घेतो आणि या गॅपचा फायदा उठवून हे लोक तिथून काढता पाय घेतात.

५) मार खाणारे भूत

५.१) दोस्त दोस्त ना रहा

धावत धावत ते गाडी गाठतात. गाडीपाशी पोचल्यावर मेरेडिथच्या लक्षात येते की गाडीची किल्ली घरातच राहिली. केटी आपण अँडीचीच गर्लफ्रेंड असल्याचा पुरावा देत म्हणते की ते अँडी चिरला गेला वगैरे ठीकच आहे पण तो मेला का? तिच्या या प्रश्नावर मेरेडिथ (आणि पर्यायाने प्रेक्षक) भयचकित होते. मॅट म्हणतो की खड्ड्यात गेली गाडी, आपण धावत जाऊन हायवे गाठू. मेरेडिथ म्हणते ओके पण रोज कुठे आहे? रोज घरात एका क्लोजेटमध्ये लपलेली असते. जरा सामसूम होताच ती दार उघडून अंदाज घेते. एक हॅट तिथे भिरभिरत येते आणि हॅटमधून लेप्रेकॉन बाहेर येतो. रोज किंचाळते. त्यावर लेप्रेकॉन आपल्या चेहर्‍यावरची कातडी मास्क काढावा तशी काढतो आणि तिच्या दुप्पट इंटेन्सिटीने किंचाळतो. हे बघून रोज त्याला चपलांनी मारते. अलम दुनियेत इतका मार खाल्लेले दुसरे भूत नाही. मग रोज तिथून पळते. पण लेप्रेकॉन तिच्यामागे जात नाही. रोजने जाता जाता तिथले छान मांडून ठेवलेले चपला बूट अस्ताव्यस्त पसरवलेले असतात. लेप्रेकॉन बिचारा निमूटपणे ते सर्व नीट मांडून ठेवत बसतो. रोजचा चपलांचा चॉईस भलताच अनफॅशनेबल असतो. लेप्रेकॉन त्यांना कचर्‍यात फेकता फेकता म्हणतो - प्रोबॅबली डूईंग फॅशन अ फेवर बाय किलिंग दॅट वन!

इकडे उर्वरित चौघे रोजला वाचवायला परत जायचे ठरवतात. केटी आणि मॅट रोजला शोधण्याचे काम अंगावर घेतात. लायला मेरेडिथच्या डेस्कमधून किल्ल्या आणायला जाते आणि मेरेडिथ काय करते ते तिचे तिलाच माहित! केटी-मॅट रोजला शोधत असताना अचानक कोणीतरी मॅटच्या नाकाडावर जोरदार प्रहार करतं. ती रोजच असते. केटी रोजला विचारते की तू आमच्यासोबत यायचं सोडून घरात परत का गेलीस? रोज मी काहीतरी विसरले होते असं मोघम उत्तर देते. पुन्हा इथे सिनेमा चेकॉव्ह्ज् गनचे धार्मिकपणे पालन करतो हे लक्षात ठेवले की तुम्हाला बराच नंतर येणारा प्लॉट ट्विस्ट ओळखता येईल. तिकडे मेरेडिथ आणि लायला किल्ली घेऊन परत फिरतात. त्यांना दिसते की लेप्रेकॉन बाहेर जायच्या मार्गावर गस्त घालतो आहे. मेरेडिथ सुचवते की आपण बेसमेंटमध्ये लपूया आणि तो गेला की मग पळ काढू. लायला म्हणते की हा बावळटपणा आहे कारण आपण बेसमेंटमध्ये अडकू शकतो. यावर मेरेडिथ तिला म्हणते "लायला, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?" प्रेक्षकांनी इतका वेळ नुसताच बावळटपणा पाहिलेला असल्यामुळे आता लायला त्यांना शुद्ध बावळटपणा दाखवायचे ठरवते. ती बेसमेंटच्या पायर्‍या उतरू लागते आणि मेरेडिथ तिच्यामागे दार लावून घेऊन तिला बेसमेंटमध्ये कोंडते.

५.२) मार भूतांनाही पडतो, मलमपट्टीची गरज भूतांनाही असते

लायलाची टरकते. पण मेरेडिथ तिचे एक ऐकत नाही. अर्थातच मेरेडिथने लेप्रेकॉनसोबत लायलाची डील केली होती. मेरेडिथ तिला म्हणते की त्याला त्याचं सोनं देऊन टाक, तू वाचशील. लायला तिला सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करते की त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस पण मेरेडिथ तिचे काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. ती दाराला बाहेरून खुर्चीचा अडसर लावते आणि पळ काढते. बाहेर येऊन ती सर्वांना खोटंच सांगते की लेप्रेकॉनने लायलाला मारले. त्यांना एक क्षण जरा वाईट वाटते. पण "आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले" चेहरे करून ते गाडीत बसतात. इथे एक संपूर्णतया अनाकलनीय प्रकार घडतो. केटी आणि मॅट मागच्या सीटवर बसतात. तिथे लेप्रेकॉन आधीच येऊन बसलेला असतो. नोंद घ्यावी की तो भूतांप्रमाणे तिथे अवतरत नाही, तो तिथे आधीच येऊन बसला आहे. पण गाडीत शिरताना त्या दोघांनाही तो तिथे दिसत नाही. लाईक हाऊ? एनीवे, लेप्रेकॉन उगाच एक फालतू डायलॉग मारण्यात वेळ घालवतो आणि त्याचा फायदा घेऊन अँडी त्याला एक सणसणीत ठेवून देतो. त्या फटक्याच्या जोराने तो उडून गाडीच्या बाहेर पडतो. मेरेडिथ लगेच गाडी गिअरमध्ये टाकते आणि ते तिथून पळतात.

गाडी हायब्रिड टोयोटा प्रियस आहे. नक्कीच ती पर्यावरणप्रेमी रोजची असावी. काही कारणाने ती गाडी बैलगाडीच्या वेगाने धावते. ते बघून लेप्रेकॉनही हताश होतो. या वेगाने चाललेल्या गाडीला पकडणे सहज शक्य असल्याने तो मोर्चा घराकडे वळवतो. तिकडे लायलाला तळघरात ऑझीचे भूत दिसते. क्लिअरली ऑझी लेप्रेकॉनने मारल्यामुळे भूत झाला असल्याची लक्षणे दिसत असतानाही ती त्याच्यासोबत यक्षप्रश्न खेळते (तू झाँबी आहेस? नाही. मग तू भूत आहेस? हो). ऑझीला बोलता येत नाही आहे. मग तो इशार्‍यांमधूनच तिच्याशी संवाद साधतो. लेप्रेकॉनने पोट फाडल्याची जखम तशीच आहे. लायला त्याला ती जखम बांधायला प्लॅस्टिक व्रॅप देते. का? माहित नाही. भूताची जखम बांधल्याने काय होणार आहे? तिचे तीच जाणो. अखेर ती मुद्द्याची गोष्ट विचारते. हा लेप्रेकॉन आणि तिच्या आईला त्रास दिलेला लेप्रेकॉन एकच आहे का?

५.३) गाडीचा पाठलाग ड्रोनने करावा

ऑझी हो म्हणतो. तिला तो खाणाखुणांनी फोर लीफ क्लोव्हर आणि त्याचा वापर करून लेप्रेकॉनचा त्यांनी कसा नाश केला हे सांगायचा प्रयत्न करतो. तिला मात्र यातले ओ का ठो कळत नाही. मग तो तिला तिथल्या खोकड्यांच्या मागे बघायला सांगतो. ती खोक्यांमध्ये डोकावून त्यात काही नसल्याचे जाहीर करते. जवळपास रडकुंडीला येऊन तो खोक्यांच्या मागच्या भिंतीकडे इशारा करतो. तिथे पहिल्या सिनेमातल्या मुख्य पात्रांची नावे आणि फोर लीफ क्लोव्हरचे चित्र असते. ती चारही नावे वाचते (फोर लीफ क्लोव्हरची चार पाने असल्याचे रुपक) पण त्या फुलाच्या चित्राकडे संपूर्ण दुर्लक्ष करते. आपली मुलगी एवढी मूर्ख निघणार हे ठाऊक असल्याने जेनिफर अ‍ॅनिस्टनने तिथे एका विटेमागे एक नकाशा लपवलेला असतो. या नकाशावर त्याच्या सोन्याचे ठिकाण आणि त्याची कमजोरी फोर लीफ क्लोव्हर विषयी इत्थंभूत माहिती असते. आता फक्त बेसमेंटमधून बाहेर पडण्याचा प्रश्न असतो. लायला ऑझीच्या भूताकडे मदत मागते. ऑझीचे भूत भिंतीतून आरपार होऊन निघून जाते आणि गुंडाळलेला निरर्थक प्लॅस्टिक व्रॅप मागे सोडते. यावर लायला (आणि प्रेक्षक) आ वासून बघत राहते.

लायलाला बेसमेंटला एक जाळी लावलेली खिडकी दिसते. ती टूलबॉक्स फेकून ती जाळी तोडण्याचा प्रयत्न करते. जाळीला तर काही होत नाही पण तिचा इमर्जन्सी लाईट फुटतो. टूलबॉक्समध्ये एक जाळी उचकटण्याची क्लॉ हॅमर असते. आपला मूर्खपणा ती मान्य करते आणि जाळी उचकटते. तिची सुटका झाली. पण इकडे पळालेल्या चौकडीचे काय झाले? मेरेडिथ दारू पिऊन बेफाम गाडी चालवत असते. इथे बेफाम शब्दप्रयोग केला असला तरी गाडीचा वेग अजूनही बैलगाडी इतकाच आहे, फक्त तिची गाडी धूमधडाकातील महेश जवळकरांच्या कटिकेप्रमाणेच वक्रगतीने मार्गस्थ होते आहे. लेप्रेकॉन कुठेच दिसत नसल्याने ते सुटकेचा निश्वास सोडतात. लायलाबद्दल त्यांना वाईट वाटत असले तरी नाईलाज होता छाप उद्गार निघतात.

मग मेरेडिथ गौप्यस्फोट करते. लेप्रेकॉनने तिला सांगितले की तो लायलासाठी आला आहे. जर लायलाला त्याच्या ताब्यात दिले तर तो मेरेडिथला जिवंत सोडेल. मेरेडिथला दारू आणि गांजा नंतर आपला जीव प्रिय असल्याने तिने लायलाचा विश्वासघात केला. हे ऐकून रोज भलतीच चिडते आणि चालत्या गाडीत ती आणि मेरेडिथ कॅटफाईट सुरू करतात. ही फाईट गरगर अशा आवाजाने थांबते. हा काय आवाज आहे ते सगळे बघतात. त्यांना दिसते की लेप्रेकॉन मॅटच्या ड्रोनवर बसून रिमोट कंट्रोलने ड्रोन उडवत आहे. एकतर त्या ड्रोनच्या पंखांमुळे त्याच्या पायच्या चिंधड्या उडाल्या पाहिजेत, जे होत नाही. दुसरे म्हणजे लेप्रेकॉनचे वजन घेऊन उडण्याइतका काही तो ड्रोन भारी वाटत नाही. तरी लेप्रेकॉन केवळ उडतच नाही तर त्यांच्या गाडीला गाठतो. तो त्यांना छानपैकी हाय करतो आणि मधले बोट दाखवतो.

केटीला अचानक एक कल्पना सुचते. लेप्रेकॉन हसत हसत त्यांचा पाठलाग करत असताना ती मेरेडिथला "दात ओठ खाऊन अचानक स्टिअरिंग फिरवणे" ही रॉजर मूरकालीन टेकनिक वापरायला सांगते. त्यानुसार लेप्रेकॉनला जोराचा धक्का बसतो आणि तो ऑफ कोर्स जातो. झाडीची एक फांदी अतिशय कन्व्हिनिअंटली त्याच्या आड येते आणि फांदीचे टोक त्याच्या डोक्यात घुसून तो तिथे कोट लटकतो तसा लटकतो. लेप्रेकॉनची अवस्था बघण्याच्या नादात यांची गाडीही रस्त्यावरून बाजूला जाते आणि त्यांना समोर ऑझीची गाडी दिसते. अ‍ॅक्सिडेंट टाळण्यासाठी मेरेडिथ गरागरा स्टिअरिंग फिरवते आणि ब्रेक दाबते. यामुळे ते गाडीला न धडकता एका झाडाला धडकतात आणि त्यांचा गाडीने पळण्याचा प्लॅन फेल जातो.

Lol कमाल लिहिलंय.
महेश जवळकरांच्या कटिकेप्रमाणेच वक्रगतीने>>>>>> Lol कसकाय सुचतं एकेक.

Lol
एकसे एक पंचेस! गिरीश कुलकर्णीची स्कुटर आणि महेश जवळकरांची कटिका, कायम लक्षात राहील.
बादवे या सगळ्यांमध्ये तो लेपरेकॉनच जरा नॉर्मल वाटतो...

६) स्लॅशरच्या क्लायमॅक्सपूर्वी चिल्लर पात्रांना मारावे

६.१) छूना मना हैं

तिकडच्या गाड्या खड्ड्यांमधून रस्ता शोधत चालवण्यासाठी बनवलेल्या नसल्याने यांची गाडी एका फटक्यात बंद पडते. मग ते ऑझीच्या ट्रकची चाचपणी करतात. गाडीच्या चाव्या न सापडल्यानंतर ते जरा इकडे तिकडे बघतात तर त्यांना थोड्या अंतरावर ऑझीचे शव दिसते. केटी किळस झटकून त्या प्रेतापाशी किल्ल्या शोधते. किल्ल्या ऑझीच्या कंबरेला असतात. पण हाय रे दैवा, तिथे लेप्रेकॉन येऊन टपकतो. अर्थातच त्याला फांदीचे टोक घुसल्याने काही फरक पडलेला नसतो. एक डोळा फक्त फुटलेला असतो. केटी त्याला एका फांदीने रट्टा लगावते आणि स्वतःची सुटका करून घेते. एवढा मार खाल्ल्यानंतर अखेर लेप्रेकॉनला जादू वापरायचे सुचते आणि तो जादूने केटीला पळू देत नाही. शेवटी तो पण लेप्रेकॉनच आहे, किती मार खायचा बिचार्‍याने!

तो आपला फुटका डोळा ऑझीच्या डोळ्याने रिप्लेस करतो. हे चालू असताना मेरेडिथ आपण लेप्रेकॉनसोबत सौदेबाजी केल्याचे उघड करते. सौदा असतो की लायला लेप्रेकॉनची और उसके बदले में मेरेडिथ को हात नही लगाने का. बाकीचे इतकेही ग्यान गेलेले नसल्यामुळे ते सुमडीत पळतात. पण मेरेडिथ "टच नही करने का" पुराण चालू ठेवते. लेप्रेकॉन म्हणतो ऑफ कोर्स मी तुला हात नाही लावणार, आपण मित्र आहोत. आता कोणीही सांगू शकतं की लेप्रेकॉन तिला हात न लावता मारणार आहे. पण मेरेडिथला ते उमगत नाही. ती निवांत जॉगिंग करत जाऊ बघते. वाटेत तिच्याच लाडक्या वनस्पतींचा वाफा असतो. त्या वाफ्यातले सगळे तुषार सिंचनाचे नळ सोडले जातात. काही अनाकलनीय कारणाने या नळाच्या पावसात तिला पळता येत नाही. प्रत्यक्षात तिला रिमझिम पावसात पळण्यासदृश काम करायचे आहे. असो, लेप्रेकॉन येतो आणि तिला "हात लावणार नाही" मधली टेक्निकॅलिटी समजावतो. मग त्याला म्युझिक कंडक्टर खेळण्याची हुक्की येते. मागे ऑर्केस्ट्रा म्युझिक वाजते, लेप्रेकॉन कंडक्टरप्रमाणे हातवारे करून एक एक नळ उडवतो आणि अखेर एक नळ उडून तिच्या तोंडात घुसतो. मेरेडिथ रक्त ओकते आणि निसर्गाशी एकरुप होते.

६.२) सिनेमातील रेफरन्स मॅजिकच्या दर्जाचा आणि सिनेमाच्या दर्जाचा काही संबंध नसतो.

इकडे पळालेल्या तिघांना मॅटचा ड्रोन सापडतो. मॅट म्हणतो की मी ड्रोनच्या मदतीने त्याला थोपवत, तुम्ही जाऊन पोलिसांना बोलवा. रोज म्हणते तुला जमेल? इथे या सिनेमाच्या मानाने एक फारच सोफिस्टिकेटेड रेफरन्स आहे. या तोडीचे सोफिस्टिकेटेड/डीप रेफरन्स मी फक्त एडगर राईटच्या स्पेस्डमध्ये पाहिले आहेत (अवांतरः स्पेस्ड ही खास गीक पब्लिकसाठी बनवलेली, सार्वकालिक सर्वश्रेष्ठ सिटकॉम आहे. रॉटन टोमॅटो रेटिंग - १००%). रेफरन्स असा: मॅट म्हणतो की जर वेर्नर हर्जगॉगला जमू शकतं तर मला का नाही? हर्जगॉग हा अतिशय नावाजलेला जर्मन अभिनेता/दिग्दर्शक/ऑपेरा दिग्दर्शक आहे. याचे हिरो सहसा अशक्यप्राय स्वप्ने साकार करून दाखवतात, म्हणून तो संदर्भ. सिनेमाच्या क्वालिटीला न साजेसा हा रेफरन्स बघून कसलेला प्रेक्षकही हबकतो. रोज मॅटला म्हणते हर्जगॉगला तुझा अभिमान वाटेल. मग त्या दोघी जाऊ लागतात तर केटी हलकेच तिला विचारते हा हर्जगॉग कोण आहे? रोज - हाऊ द हेल शुड आय नो?

एनीवे, इथे मॅटच्या अवतार समाप्तीची वेळ झाली असल्याचे शेंबडे पोरही सांगू शकतं. त्यात असा रेफरन्स बेसावध प्रेक्षकावर फेकून मारल्यानंतर तर अनुभवी प्रेक्षकही त्या माराने "आऊ" करून या निष्कर्षाप्रत येतो. थोडे जंप स्केअर्स काढून घेतल्यानंतर मॅट ड्रोनमार्फत लेप्रेकॉनला ट्रॅक करू लागतो. तिकडे रोज आणि केटी जंगलात हरवतात. केटी अवकाश-निरीक्षण अ‍ॅप वापरून ध्रुवतारा शोधते. रोज म्हणते आता? केटी म्हणते ते घर आग्नेयेला आहे पण ध्रुवतार तर फक्त उत्तर दिशा दाखवतो. या महान दिशाज्ञानाने प्रभावित होऊन प्रेक्षकाला केटीचे मुस्काट फोडण्याची इच्छा होऊ शकते. पण हे ध्यानात ठेवा की तिचे थोबाड तुमचा स्क्रीन आहे आणि या इच्छापूर्तीत तुमचेच नुकसान आहे. तरी सावधान रहे, सतर्क रहे. हे चालू असताना मागून लायला येते. रोज चित्कारते की अरे तू जिवंत आहेस, भारीच की!

लायलाला हे समजलेले असते की यांच्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ती शांतपणे त्यांना सांगते की हे बघा लेप्रेकॉनचे सोने तर शोधले पाहिजे. माझ्या आईने (आणि ऑझी व इतर लोक) त्याच्या सोन्याचा नकाशा मागे सोडला आहे. आपण सोनं परत मिळवू, त्याला देऊ आणि पहली फुरसत मध्ये पळू. हा प्लॅन त्यांना पटतो. तिकडे मॅटचा ड्रोन फेल जातो. लेप्रेकॉन जादूने त्या ड्रोनवर नियंत्रण मिळवतो आणि "लाईट्स, कॅमेरा, डिकॅपिटेशन!"

७) क्लायमॅक्सपूर्वी अँटी क्लायमॅक्स केला तर क्लायमॅक्सची इंटेन्सिटी वाढते.

७.१) पर्यावरणवाद्यांचे वाईट दिवस

आता गोष्टी वेगाने घडू लागतात. लायला थोडक्यात त्यांना अप टू स्पीड आणते. मग ते जंगलात एका जुनाट खटारा गाडीला शोधतात. पहिल्या सिनेमात इथेच ऑझीला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले भांडे सापडलेले असते. यांनाही सापडते. पण भांडे नाण्यांनी गच्च भरलेले नसते. केटी म्हणते की हा फारच गरीब लेप्रेकॉन दिसतो. लायला म्हणते सानू की? रोज म्हणते की ए ना चॉलबे. तर .... मुद्दा असा असतो की रोजला ते सोन्याचे भांडे आधीच सापडले होते. तिने त्यातले पैसे वापरून आपला पर्यावरणवादी प्रोग्राम फंड केला कारण पर्यावरणवाद्यांना कोणी वर्गणी देत नसतं (अ ड्यूड आस्क्ड मी टू सेंड न्यूड्स फॉर ट्वेंटी बक्स, विच बाय द वे आय डिड! - रोज कमिंग आऊट क्लीन). त्या गच्च भरलेल्या भांड्यात आता दहा-बाराच नाणी उरलेली असतात. उरलेली रोजने बिस्मार्क शहरात गहाण ठेवलेली असतात. नंतर ती ते कर्ज फेडणार असते पण आत्ता काय करायचं? लायला म्हणते की लेप्रेकॉनचं फार बिल झालं, त्यात सिनेमाही संपवायची वेळ झाली आहे, तर आपण प्लॅन बनवू आणि लेप्रेकॉनला मारूयात.

मग थोडे रिव्हिल्स होतात. लायलाचे लॉकेट फूल्स गोल्डने बनलेले (म्हणजे लोहाचा अंश असलेले) असते. लेप्रेकॉनचे फोर लीफ क्लोव्हर आणि लोखंड असे दोन वीकनेस स्पष्ट होतात. घराचा रस्ता सापडतो आणि मॅट मेल्याचेही या तिघींना कळते. मग त्या घरी जाऊन खोटेखोटे भांडण करतात. लेप्रेकॉन हे सगळे गवताच्या गंजीमागे लपून बघतो. त्याला लायलाच्या गळ्यात त्याचे सोन्याचे भांडे दिसते. आता भांडे नाण्यांनी गच्च भरलेले आहे. लायला म्हणते की मी जाऊन त्याला सोनं परत देऊन येते. याने बेसावध होऊन लेप्रेकॉन लायला समोर येतो. घरात आता ते दोघेच आहेत. लेप्रेकॉनही कच्च्या गुरुचा चेला नसतो. तो म्हणतो आधी नाण्यांची मोजदाद होईल मग तुला जाता येईल. मग तो बसून एक एक करत नाणी मोजू लागतो. इथे प्रेक्षकाच्या मनात एकच प्रश्न आहे - यांनी वरून नाणी टाकून खाली काहीतरी फिलर भरलं आहे, लेप्रेकॉनला फसवायला. प्रश्न असा की फिलर काय आहे? कमकुवत हृदयाच्या प्रेक्षकांनी आपल्या प्रियजनांना जवळ घेऊन बसावे कारण याचे उत्तर दिल दहला देने वालं का कायसेसे आहे.

७.२) दिल दहला देनेवाला फिलर

लायलाने नाण्यांच्या खाली टॅम्पॉन्स भरून ठेवलेले असतात. हा प्रकार केवळ लायलाला लेप्रेकॉनला "आय गेस इट्स युअर टाईम ऑफ द मंथ" हा टोमणा मारता यावा म्हणून केला आहे. माणसासारखा माणूस, आपलं प्रेक्षकही यावर हतबुद्ध होईल हा तर लेप्रेकॉन आहे. त्याचा राग अनावर होतो. त्यामुळे त्याला हे दिसत नाही की रोज आणि केटी त्याच खोलीत लपल्या आहेत. मग त्या दोघी लेप्रेकॉनला उशांनी मारतात. ते पाप्याचं पितरसुद्धा या माराने हतबल होतं. लायला हीच संधी साधून त्याच्या गळ्यात आपले लॉकेट बांधते - यप मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार या प्रश्नाचे मिडवेस्टमध्ये उत्तर लायला आहे. आता चेकॉव्ह्ज गन अविरत धडाडणार आहे. या घरात डायरेक्शनल शॉट्स मार्फत गेले तासभर अनेक लोखंडी वस्तु दाखवल्या आहेत. त्या सगळ्या वस्तु लेप्रेकॉनभोवती मांडल्या जातात. लेप्रेकॉन या लोखंडी कुंपणात अडकतो. त्यात गळ्यातले लॉकेट त्याला जाळू बघते. केटीने फ्यूज बदलताना आणखी एक फ्यूज असल्याचे सांगितलेले असते. त्यानुसार ती जाऊन दुसरा फ्यूज लावते, घरातले लाईट परत येतात. तळघरात जेव्हा लायला पाणी उपसायला गेलेली असते तेव्हा तिला मेरेडिथच्या कलेक्शनमध्ये क्लोव्हर ज्यूस दिसलेला असतो. रोज तो ज्यूस घेऊन परत येते.

एक फायनल ट्राय म्हणून लेप्रेकॉन जेनिफर अ‍ॅनिस्टनच्या आवाजात लायलाकडे विनवण्या करतो. तो म्हणतो की मी तुझ्या आईला परत जिवंत करू शकतो. पण लायला म्हणते की धोंडू, सिनेमा संपत आला आता, बिलही खूप झालंय. तर सॉरी. ती एक पाईप याच्या तोंडात टाकते आणि लॉकेट काढून घेते. हा पाईप क्लोव्हर ज्यूस थेट त्याच्या पोटात पोहोचवतो. लेप्रेकॉन शब्दशः फुटतो आणि या तिघी खुश होतात. पण तो अजून मेला नाही. लायला म्हणते की लेप्रेकॉनचा अंत करायचा असेल तर त्याला जाळून टाकला पाहिजे. त्याचा इतकुसा देखील अंश मागे राहता कामा नये. केटी म्हणते की ठीक आहे, आपण दोघी जाऊन मागे शेकोटी रचूयात. रोज त्या लेप्रेकॉनचा रक्तामांसाचा चिखल पिशवीत भरून घेऊन येईल. मग त्या तिघी कामाला लागतात.

८) क्लायमॅक्स

आता एकच चेकॉव्ह गन बाकी आहे. रोजची सोनेरी ट्रॉफी! लेप्रेकॉन इथे रक्तबीजाप्रमाणे त्याच्या प्रत्येक मांसखंडातून जिवंत होऊ लागतो. रोज यापासून अनभिज्ञ असते. तिला खोलीभर उडालेले शिंतोडे साफ करताना वैताग येत असतो. ती शिडाळ्यावरचे शिंतोडे साफ करायला जाते तर ती ट्रॉफी खाली पडते. अनेक छोटे लेप्रेकॉन तिला वेडावून, तिचे लक्ष वेधतात. मग तिला एक हतोडी फेकून मारली जाते. थोडा वेळ व्हॅक मी चा खेळ खेळला जातो. मग एक लेप्रेकॉन तिला शिडाळ्यावरून वेडावतो. ते बघून ती रागारागाने त्याच्या दिशेने जाऊ बघते. लहानपणी आपल्या आया "बाळा खाली बघून चाल" असे का म्हणत याचे उत्तर आपल्याला मिळते. दोन लेप्रेकॉन खाली एक दंडुका तिच्या पायाच्या लेव्हलवर धरून उभे असतात. ती खाली बघून चालत नाही आणि त्याला अडखळून ती पडते. पडते तर पडते, थेट त्या ट्रॉफीवर पडते. ती गवंड्याची थापी तिच्या चेहर्‍याच्या आरपार होते.

लायला आणि केटीला हा गोंधळ ऐकू जातो. लायलाला अचानक लक्षात येते की अरे सोनं हा धातु विद्युत-सुचालक आहे. रोजचा आत्मा वरून "ही आयडिया तुला आधी नाही सुचली?" असे ओरडल्याचे आमच्या कानी आले आहे. मग ती लेप्रेकॉनला डिस्ट्रॅक्ट करते. हे घर बहुधा सक्सेनाजीचे असावे कारण तिथे दोन "बिजली की नंगी तारे" उपलब्ध असतात. लेप्रेकॉनही आज्ञाधारकपणे सोन्याच्या नाण्यांवर जाऊन उभा राहतो. केटी त्या तारा नाण्यांवर टेकवून त्याला शॉक देते. तसे बघता लेप्रेकॉनच्या पायात जाड रबर सोलचे, लेदरचे बूट आहेत. सो या शॉकचा त्याच्यावर काही एक परिणाम होता कामा नये. पण सिनेमा संपतो आहे या आनंदात प्रेक्षकच लेप्रेकॉनला विनंती करतो की घे रे शॉक. लेप्रेकॉन जमातीला विज्ञानातले काहीही कळत नसल्यामुळे तोही बापडा लगेच पेटतो. आय मीन इट, शब्दशः पेटतो. लायला आणि केटी घराबाहेर पडतात. या घराचे वायरिंग काही और असल्यामुळे लेप्रेकॉनसोबत ते अख्खे घर पेट घेते आणि अक्षरशः स्फोट होतो. लाकडी घराच्या चिरफळ्या उडतात. पण यातले एकही लाकूड या दोघींना लागत नाही. गेला बाजार एक कुसळ, मातीचा खडा सुद्धा यांच्या डोळ्यात जात नाही. तेवढा लेप्रेकॉनच्या रक्ताचा वर्षाव मात्र अगदी नेम धरून यांच्यावरच होतो.

सिनेमा संपण्याची वेळ झाली आहे. ऑझीचे भूत येऊन लायलाला टाटा करते. लायलाही गोड हसून त्याला रिटर्न टाटा करते. कॉलेजमधून कोणीतरी या सोरोरिटीचे काय झाले बघायला येतं. त्याच्या चेहर्‍यावरून त्याला या दोघींना दोन ठेवून द्यायच्या आहेत असे दिसते. पण प्रसंग बघून तो त्यांना घेऊन तिथून निघून जातो. आणि एकदाचा सिनेमा संपतो. पण खरंच लेप्रेकॉन संपला? त्याची हॅट त्या आगीतही सुरक्षित असते. मग दुसर्‍या दिवशी लेप्रेकॉन हायवेवर बिस्मार्कला जाण्यासाठी लिफ्ट मागताना दिसतो. त्याला रोजने आपले सोने बिस्मार्कला गहाण ठेवले असल्याचे कळले असावे. एक कोंबडीवाला त्याला लिफ्ट देतो. रात्रभर मरेस्तोवर मार खाल्ल्यानंतर बिचारा लेप्रेकॉन घटकाभर विसावतो आणि पडदा पडतो.

(समाप्त)

इसेन्शिअल व्ह्यूईंग

जर सो बॅड इट्स गुडमधले दर्दी असाल, पण वर्णनावरून लेप्रेकॉन बघण्याची हिंमत होत नसेल तर हे इसेन्शिअल व्ह्यूईंग! लेप्रेकॉन इन स्पेस या सीरिजचे शिखर आहे. यापेक्षा भयानक चित्रपट कोणीही बनवलेला नाही. सो एकच सिनेमा पाहणार असाल तर इन स्पेस पाहा. आणि पूर्ण सिनेमा बघायचा नसेल तर त्यावरचा डेड मीट (जेम्स ए. जनिस) ची कमेंट्री बघा - https://www.youtube.com/watch?v=kJRbWlAHA1E

सक्सेनाजीचे असावे कारण तिथे दोन "बिजली की नंगी तारे" उपलब्ध असतात.>>>
Rofl
कुठून कुठून शोधून आणतात तुम्ही हे सगळं?