माझे आजी आजोबा

Submitted by www.chittmanthan.com on 20 June, 2019 - 14:15

आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली.

मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली . कुण्या साहित्यिकांन सांगितलेलं की पत्नी ही आई बहिणींची जागा भरून काढते पण इथे तर पत्नीला आई होताना मी बघितलं.

माझ्या लहानपणी आजोबा आजारीच असायचे पण मी लहान असल्याने दंगा करायचो .त्यामुळे आज्जीला दोघांचा त्रास व्हायचा. मी आजीला न सांगता झाडाच्या चिंचा काढायला ,कधी सुगरणीचा खोपा काढायला विहिरीवर जायचो.माझी आई शिक्षिका असल्याने आजोबांच्या आजारपणात माझ्या संगोपनाची दुहेरी जबाबदारी आज्जीवर होती.त्याचा तिला त्रास झाला पण कधी बोलली नाही. मी इतका त्रास देऊनसुद्धा मला आजीने कधीच साधी चापटपण मारली नाही.

माझ्या आजोबांचा जन्म १९२९चा . ते सातवीला जाईपर्यंत त्यांना पायावर उभे राहता येत नव्हते . पण तरीही शिकण्याची जिद्द एवढी मोठी की छोट्या धकल गाडी वर बसून शाळेला जायचे . वडगांव ला दहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती पण पुढच्या शिक्षणाला कोल्हापूरला जाणं भाग होत. त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचा खर्च द्यायला नकार दिला. जिद्द न सोडता ते अनवाणी पायाने चालत कोल्हापूरला जायचे. जेवायची सोय अशी की ज्या घरी शिकवणी द्यायची त्या घरी ठरलेल्या वारी जेवण .

शिक्षण झाल्या झाल्या त्यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लागली. त्यांची मुलाखत कर्मवीर भाऊराव पाटलांनी घेतली होती त्यामुळे अण्णांचा प्रभाव आजोबंवर होता.

लग्नानंतर ज्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी कुटुंब या नियमाने भरपूर जागी भटकंती झाली . थोडे शिस्तीचे असल्याने वा संस्थेचा नियम असल्याने बदल्यांचे प्रमाण हे ज्यास्तच होते . पण कधी बदली रद्द करावी वा गावाजवळ करून घ्यावी असे त्यांना कधी वाटलं नाही . ३० वर्षे नोकरी केल्यानंतर भारत सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मिळाला . निवृत्तीनंतर आजोबा सर्व कुटुंबासह गावी आले . गावात आल्यावर संस्कार वाचनालय चालू केले तसेच स्वतः लिहलेले लेखांसहित्य प्रकाशित केले .

थोड्याच कालावधीत त्यांना शारीरिक त्रास सुरू झाला. पार्किन्सन्स चे निदान झाले . आजोबांचे लिखाण , वडगांव रोड च्या पलॉटवर फिरायला जाणे बंद झाले . आयुष्यभर प्रामाणिक जीवन जगणाऱ्याच्या नियती काय नशिबात टाकते ते समजलेच नाही.

माझी आजी स्वयंपाकात सुगरणच आहे. आजोबांच्या बदल्यामुळे खूप ठिकाणचे पदार्थ तिने शिकून घेतले . आजही तिने केलेले पदार्थ special च. कोणतेही काम जीव वोटून केले की ते चांगले होतेच हा तिचा दंडक.

शेवटी मला इतकंच वाटत की आहे आजोबा मिळतात तेव्हा माझ्यासारखा नशीब न मानणारा नास्तिक पण म्हणतो की आपल्यावर नियतीने खूप मोठे उपकार केले...!!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख सुंदर, पण थोडा त्रोटक वाटला.
तुमच्या भावना व्यवस्थित पोहोचल्या.
आजोबा नातूच्या आधारावर कोको नावाचा चित्रपट आहे, नक्की बघा...

लेख सुंदर, पण थोडा त्रोटक वाटला.>>+१

आज्जी आजोबांबद्दल लिहायचे म्हणजे शब्द कमी पडतात. मला आजोबांचा भरपूर सहवास मिळाला. ते शेवटच्या दिवसापर्यंत ठणठणीत होते व 99 व्या वर्षी गेले. त्यानंतर आजवर मला इतका उत्तम मित्र मिळाला नाही.

लेख चांगला आहे.पण वर म्हटल्याप्रमाणे त्रोटक वाटला.

आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. >>>>> आमची आजी असे.पण तिचा खाक्या खटखटीत होता.असं काही मऊ तिच्याबाबत आठवतही नाही.तरीही आजी म्हटली की आमची तीच आजी आठवते.रात्री अपरात्री उठवून, जरासं तिच्यावर ओरडून आपलं काम करून घेताना नंतर कळत गेले की किती त्रास देत होतो ते.
आईचे आईवडील कधीही आजीआजोबा वाटले नाहीत.का ते माहित नाही.सहवास कमी किंवा ते लवकर गेले ही कारणे असावीत.आजीआजोबा यांचे गोड नाते साहित्यातून्,माबोवर वाचलं.माझ्या मुलाची,भाचरांची आजी मात्र ही अशीच मऊ,मायाळू आहे हे त्यांचे भाग्य.
अवांतर अति लांबले.क्षमस्व.

तुम्ही सातवीला (१२-१३ वय?) असतानाच आजोबा गेले, त्यांची शेवटची १० वर्ष ते पार्किंसनने आजारी होते -> म्हणजे तुम्हाला केवळ आजारी आजोबाच माहीत आहेत, बाकी सगळी ऐकीव माहिती तरीही
> शेवटी मला इतकंच वाटत की आहे आजोबा मिळतात तेव्हा माझ्यासारखा नशीब न मानणारा नास्तिक पण म्हणतो की आपल्यावर नियतीने खूप मोठे उपकार केले...!!! > हे असं लिहावंसं वाटतं हे रोचक आहे.

> ते सातवीला जाईपर्यंत त्यांना पायावर उभे राहता येत नव्हते . पण तरीही शिकण्याची जिद्द एवढी मोठी की छोट्या धकल गाडी वर बसून शाळेला जायचे......…जिद्द न सोडता ते अनवाणी पायाने चालत कोल्हापूरला जायचे. > रोचक. बालपणापासून चालता न येणारी व्यक्ती पौगंड झाल्यावर चालू लागेल असा विचारही माझ्या मनात येणार नाही.

बायकांबद्दल तर चूल-मुलं/नातवंड खेरीज सांगण्यासारखं काही नसतंच, त्यामुळे ते ठीक...
===

देवकी,
प्रतिसाद आवडला.