आयेगा आनेवाला...

Submitted by 'सिद्धि' on 13 June, 2019 - 07:07

टण....टण....मंदिरातील मोठ्याल्या घंटेला एकदाच टोला दिल्यावर घुमतो तो आवाज.
दुरदर्शन असाव तेव्हा. बाबा hall मध्ये t.v. बघत होते. मी बाजुलाच झोपलेले. मला अजुनही आठवतय. दोन टोले कानावर पडले तेव्हा मी तडक उठुनच बसले होते. घाबरून थोडं बाबांकडे सरकत माझा पहिलाच प्रश्न होता.
" बाबा हा एकटाच आहे ?
बाबांचं उत्तर होत: नाही दोघे आहेत. पण तो ही एकटाच आणि ती ही एकटीच!
मी: अस कस काय बाबा ? (मला म्हणायच होत या चित्रपटामध्ये अजुन कोण-कोण आहे.)
बाबांचं उत्तर: असच असत आयुष्यात. हा दुनियादारिचा गोतावळा फक्त नावालाच....बाकी आपण सगळे एकटेच येतो आणि एकटेच जातो."
(चित्रपट बघताना काही प्रश्न विचारला की बाबा असच काही-बाही बोलायचे....तेव्हा मला वाटायच त्यांना डिस्टर्ब होत असाव. पण त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ समजण्यासाठी मला पुढे काही वर्ष मोजावी लागली. आणि वयानुसार त्याची उकलही झाली.) तेव्हा मात्र जास्त प्रश्न नको म्हणुन मी t.v. कडे मान वळवली होती.

बॉम्बें टॉकीजचा चित्रपट- महल (1949).
WhatsApp Image 2019-06-13 at 4.39.11 PM.jpeg
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला आणि अशोक कुमार हि जोडी.
गीत-आयेगा आनेवाला...
https://www.youtube.com/watch?v=03DXW_rV54U
गायिका लता दीदी ' दीदी ते भारताची गान कोकीळा' या पर्वाच्या प्रवासाची सुरुवात होती ती कारण या गाण्यानंतर लता दीदींना चांगली प्रसिद्धी मिळाली असं म्हणतात. गाण्यात प्रतिध्वनी निर्माण करण्यासाठी या गाण्याचे ध्वनीमुद्रण एका बंद खोलीत करण्यात आलं. दोन भाग आहेत पहिला script demand म्हणुन दुसरा मुखडा. पहिला भाग हा माईक पासुन थोड दुर फिरत-फिरत गायला गेला आहे. आणि याचे effects काय अफलातुन आहेत हे गाण ऐकताना क्षणो-क्षणी जाणवत. रिमिक्स, पॉप सॉग्सं च्या जमान्यात आज हे गाणं मनात घर करून बसलं आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या मुकूटातील सुरुवातीच्या काळात खोवल गेलेल एक अढळ मोरपिस जणू.
खेमचन्द प्रकाश यांच गूढगम्य म्युझिक. विणा,पेटी,झांज,तंबोरा,तबला,व्हायोलिन काय अन कोणती-कोणती वाद्य वापरली आहेत या गाण्यात माहीत नाही. पण गाण ऐकताना ह्र्दयात असंख्य विणेच्या तारा झंकारतात. मनाच्या कोपर्यात कुठे तरी भावनांची पेटी वादन चालु होत, ह्र्दयाचे ठोके अन तंबोर्याचा टणकार यातला फरकच जाणवेनासा होतो. दुर्दम्य आशावाद आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा अप्रतिम देखावा.
टण..... टण.... तेच ते दोन टोले....हा गजर आहे घडाळ्याचा. अन बजर आहे विश्वासाचा. काळोखाच्या रांगोळीने श्रुंगारलेला भव्यदीव्य महल, लपत-छपत दिसणारा सावल्यांचा खेळ करत ढळणारी रात्र, बेसहारा नावेप्रमाने पण वारा नसतानाही हेलकावे घेणारे झुंबरं, एकटाच नायक, आणि आर्त टोले देणारी २ ची घटीका, काळोखाला घाबरणारा देखील रात्रीच्या प्रेमात पडेल असा कृष्णधवल देखावा (कृष्णधवल या शब्दाचा खरा अर्थ मला इथे उमगला) आणि जन्म घेते एक विश्वासक आळवणी.

"खामोश है ज़माना, चुप-चुप हैं सितारे
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे में कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे कि चल रहा है, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, इक आस के सहारे"

मिट्ट काळोखात एक मिनमीनती मेणबत्ती घेऊन विश्वासाने उजेडाला आमंत्रण देणारी कामिनी. तिच्या प्रेमाच्या शोधात फिरत असते. काहीही झालं तरी कामिनीचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे, खात्री आहे. तिचा प्रियकर तिला नक्की भेटायला येईल असा दृढ विश्वास तिला आहे. अंधार्या रात्री गर्द दाटलेल निराशेच सावट,सारच शांत,निस्तेज,निष्क्रिय. पण एवढ्या निराशेमध्ये देखील जन्म घेते एक विश्वासक साद...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला. "

"दीपक बग़ैर कैसे, परवाने जल रहे हैं
कोई नहीं चलाता, और तीर चल रहे हैं
तड़पेगा कोई कब तक, बे-आस बे-सहारे
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे"

सारच गुढ, कल्पने पलीकडुन आलेल आणि कधिही न पाहीलेल. झुल्यावर बसुन झुलणारी नायिका, अजुनही अंधाराच्या दिशेने चाचपडत चालणारा नायक आणि रिकामा झुला पाहुन हिरमोड झालेली त्याची पाठमोरी छबी. तरी देखील तिच विश्वासक साद...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला. "

"भटकी हुई जवानी, मँज़िल को ढूँढती है
माझी बग़ैर नय्या, साहिल को ढूँढती है
क्या जाने दिल की कश्ती, कब तक लगे किनारे
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे"

आधीच भटकता प्रवास तरीही मँज़िल शोधताना..... झाडांच्या मधोमध अडखळलेली ती नायकाची गंभीर पण शोधक नजर.
माझी बग़ैर साहिल शोधताना, किणारा कधी मिळेल याची काहीच कल्पना नाही, पण तरीही अद्रुष्य होत असणार्या नावेतून येणारा तोच आश्वासक इशारा...."आएगा, आएगा, आएगा, आएगा आनेवाला, आएगा आनेवाला."
................................................................................................................................................................................

"महल संपला तेव्हा बाबांना म्हणाले होते, " बाबा पुन्हा केव्हा हा चित्रपट लागला तर सांगा, मला पहिल्या पासुन बघायला आवडेल. बाबाही हो म्हणाले होते." पण परत कधीही महल लागण्याच्या आतच बाबा आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघुन गेले, परत कधीही न येण्यासाठी. साल २००५,मे महीना,आणि आएगा आनेवाला या गाण्यापासुन पुढचा सगळा महल चित्रपट चांगला लक्षात राहीला. परत कधीही न विसण्यासाठी.
म्हणतात की अपुर्ण काही ठेवु नये, पण काही गोष्टी या अपुर्णच एवढ्या परिपुर्ण असतात की त्याना पुर्णत्वाच्या मोहोरेची गरज नसते. बाबांबरोबर हा चित्रपट पाहीला! पहील्यांदाच अन शेवटचा. त्यानंतर बघायला धीरच होत नाही. आजही तो माझ्यासाठी अपुर्ण असुनही परिपुर्ण आहे बाबांच्या आयुष्यासारखाच."

( बाबा आणि मी -एक आठवण )
(Happy father's day to all)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस !!
पु. ले. शु. बाबांच्या स्मृतीस अभिवादन. काही गोष्टी फक्त थोड्या खटकल्यात >> ह्र्दयाचे ठोके अन तंबोर्याचे ठोके यातला फरकच जाणवेनासा होतो<< इथे तंबोर्याचे ठेके म्हणायचं आहे का ? तंबोर्याचे ठोके कसे पडतील ? ठोका हा ताल वाद्याचा पडतो ना जनरली ?

प्रसन्न हरणखेडकर - लेखनाच्या दुरुस्ती दाखवल्या बद्दल धन्यवाद.
अजुन काही बदल असेल तर सांगा... थॅक्स.
तंबोऱ्याचा टणकार येतो ठोके नाही. लिहिण्याच्या ओघात शब्द चुकला.

महल मात्र पाहिला नाही.
शालीदा थॅक्स पणएकदा तरी बघा महल .
https://www.youtube.com/watch?v=nWPwrPFial0 लिन्क पाठवली आहे.

अज्ञातवासी-धन्यवाद

छान लिहीलयं. तुमची वेदना जाणवली. महल दूरदर्शनवरच पाहीला होता. अप्रातीम कलाक्रुती आहे. मधुबाला स्वर्गीय !!

महल खूप वर्षांपूर्वी उत्सुकतेने पाहिला पण मला अजिबात आवडला नव्हता.शेवट तर जाम गण्डल्यासारखा वाटला होता.कदाचित मला नीट कळला नसेल.अर्थात गाणी अप्रतीम.आणि मधुबाला ऑलटाईम फेव्हरेट.ह्या चित्रपटाने सुरैय्याची नायिका आणि गायिका अश्या दोन्ही करियरसअनुक्रमे मधुबाला आणि लता ह्यांनी संपवल्या असं वाचलं होतं.

खूप छान लिहीलय तुम्ही. उगाच क्रिटीसाईज करावं म्हणून नव्हे, पण अगदीच रहावत नाही म्हणून सांगतो . ते 'गाण-कोकिळा' चं गान-कोकिळा कराल का?

रश्मी- मनापासुन धन्यवाद.

स्वप्ना_राज- हो मी सुद्धा असा उल्लेख वाचला होता.

फेरफटका- धन्यवाद! तुम्ही सुचवलेले बदल केले आहेत...
मी just लिखाणाची सुरवात केली आहे त्यामुळे काही टायपिंग मिस्टेक, करेक्शन असेल तर नक्की सांगा. मला खरंच खुप बर वाटत कोणी काही सजेशन दिले तर.

भावुक लेखांवर मी सहसा फिरकत नाही पण हा लेख खरंच आवर्जून वाचण्यासारखा लिहिलाय.

पण काही गोष्टी या अपुर्णच एवढ्या परिपुर्ण असतात की त्याना पुर्णत्वाच्या मोहोरेची गरज नसते. -- perfectly said.

छान लिहलंय.

> महल खूप वर्षांपूर्वी उत्सुकतेने पाहिला पण मला अजिबात आवडला नव्हता.शेवट तर जाम गण्डल्यासारखा वाटला होता.कदाचित मला नीट कळला नसेल.> +१
> अर्थात गाणी अप्रतीम.आणि मधुबाला ऑलटाईम फेव्हरेट. > हे एकच गाणं आठवतंय. मधुबाला सुंदर आहे मान्य, पण मला आवडत नाही.
> ह्या चित्रपटाने सुरैय्याची नायिका आणि गायिका अश्या दोन्ही करियरसअनुक्रमे मधुबाला आणि लता ह्यांनी संपवल्या असं वाचलं होतं. > नवीन माहिती.