माचीप्रबळ येथील कॅम्पिंग

Submitted by सौमित्र साळुंके on 13 June, 2019 - 02:44

पनवेल जवळील शेडुंगच्या साधारण दहा किलोमीटर पूर्वेला प्रबळगड स्थित आहे. यापूर्वीही अनेकदा इथे जाणं झालं होतं मात्र तेव्हा इथे येणाऱ्यांची संख्या तुरळक होती.

पायथ्यापासून साधारण दीड तासांत आपण माचीप्रबळ या पाड्यावर/पठारावर येतो. कलावंतीण दुर्ग अथवा प्रबळगडावर जाण्यासाठी हा बेस.

गडांवर जायचे नसेल तर या इथे मुक्काम करता येतो. निलेश भुतांबरा या स्थनिक युवकाने इथे निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय केली आहे. माती आणि घराच्या ओढीने निलेशने चेन्नईतल्या नोकरीला रामराम केला आणि घरी परतला. प्रचंड शारीरिक मेहनत, कौशल्यपूर्ण योजना आणि चिकाटीच्या जोरावर या 'इको टुरीझम'ची स्थापना झाली आहे. निलेशच्या दोन्ही हातांची सोलवटलेली त्वचा या परिश्रमाची साक्ष आहे.

काजव्यांच्या शोधात काही दिवसांपुर्वी आम्ही गेलो तेव्हा निलेशच्या या वननिवासाचा अतिशय उत्तम अनुभव आम्ही घेतला. नीटनेटके पिच केलेलं उत्तम दर्जाचे टेंट, स्वच्छ परिसर, साधे आणि आरोग्यदायी जेवण, स्वच्छ पाणी, आणि हवं नको ते बघण्याची अंगभूत वृत्ती या सर्व जमेच्या बाजू. काही अतिशहाणी मंडळी ब्लुटूथ स्पीकर आणून शांततेचा भंग करतात. सदर परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आता पायथ्याला चौकी बसवली आहे. दारू, सिगरेट, अंमली पदार्थ आणि स्पीकर्स यांना संपूर्ण बंदी आहे. याचा फरक लवकरच जाणवेल अशी आशा आहे. आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला आवश्यक त्या कमीत कमी गोष्टी घेऊन जाणे आणि इथल्या निरव शांततेचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेणे इतक्याच गोष्टी कराव्यात. सौजन्याने आणि जबाबदरीने वागावे आणि आपल्या सोबतच्या सदस्यांना तशी सूचना द्यावी.

साधारण या काळात या परिसरात काजव्यांची जत्रा भरते. फांद्यांना जणू काही चांदण्या लगडाव्यात असे काही वृक्ष आम्ही आणि आमच्यासोबतच्या बालचमूने पाहिले. काजव्यांच्या जीवनचक्राची आणि निसर्गातील त्यांच्या भूमिकेची माहिती असेल तर काजवे बघणे हा "अनुभूतीचा सोहळा" होतो. "बाबा, हे तर मनमंदिरा गाण्यातल्यासारखे काजवे आहेत'... लहानग्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यांतला आनंदाचा डोह खोल असतो. माझी अडीच वर्षांची भाची टक लावून या तरंगणाऱ्या सोनबिया पाहत होती!

वर्षातून एकदाच घडणारी ही गोष्ट आवर्जून पहावी. अर्थात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा सोहळा संपेल. मात्र हे ठिकाण जायला सोपे असल्याने मोठ्यांसाठी पावसाळ्यात आणि कुटुंबासाठी-लहानांसाठी हिवाळ्यात जाणे उत्तम ठरेल.

संपर्क:
१. निलेश भुतांबरा: 08056186321
२. खासगी वाहन नसल्यास श्री. अशोक पाटील
(पनवेल पासून ऑटोरिक्षा): 09322580995

आणि जाता जाता इतकंच:

"Take only memories
Leave only footprints"

Prabal Camping.jpgCapture.PNG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults