रेंज ट्रेक भाग दुसरा : ‘आंबेनळी’ ‘रायलिंग’ ‘बोचेघोळ’

Submitted by योगेश आहिरराव on 3 June, 2019 - 05:42

रेंज ट्रेक भाग दुसरा : ‘आंबेनळी’ ‘रायलिंग’ ‘बोचेघोळ’

सकाळी उठल्यावर मनोजच्या खोलीत जमलो, काल रात्री सर्वच जण दमलेले त्यामुळे काहीही चर्चा झाली नाही. खुद्द मनोज सर्दी आणि डोकेदुखीमुळे हैराण झालेला. आजचा प्लान ठरवत असताना, नेमकं त्याच वेळी मल्ली आणि त्याच्या भावाने इथून परत जातोय असं सांगून टाकले. खास करून आता पर्यंत कुठलाही अनुभव नसलेल्या त्याच्या लहान भावाला ही रेंज भारी पडणे स्वाभाविक. असो… फार चर्चा न करता पहिलं गरम पाण्याने अंघोळ मग दर्शन झाल्यावर बोलू असं ठरले.
गिरीचे मस्तकी गंगा ! तेथून चालली बळे !
धबाबा लोटती धारा ! धबाबा तोय आदळे !
'समर्थ रामदास स्वामी' यांनी 'दासबोध' या शिवथरघळीत लिहून पूर्ण केला. सह्याद्रीतील जंगल, गुहा, विवर, कडेकपारी, घळी याचं समर्थांना विशेष आकर्षण. अशीच रमणीय आणि नितांत सुंदर शिवथर घळ. दर्शन घेऊन येतो तोच तिथले सभासद काका म्हणाले या नाश्ता तयार आहे. ट्रेकर तुम्ही, नाश्ता करून जा. तोवर मागे सुनील आणि अविनाशची कुजबुज. अविनाश समोर येत मनोजला म्हणाला, मनोज एव्हाना तुझ्या कानावर पडले असेलच. तरी पण मी सांगतो, ‘I am also give up. माझेही पाय थरथरत आहेत.’ आता हा आमच्यासाठी दुसरा धक्का. पहिल्या दिवस होत नाही तोच तीन गडी बाद.
हा प्रसंग पाहून मला १९९७ सालची लाहोर गडाफी स्टेडियम मधील पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका मॅच आठवली. अजूनही लक्षात आहे, पाकिस्तानला २७२ करायचे असतात. शॉन पॉलोकच्या पहिल्याच ओवरमध्ये झिरो वर तीन विकेट जातात. ‘सईद अनवर’, ‘आमिर सोहेल’ आणि ‘इजाज अहमद’.
हे सारं पाहता मनोजने आजच्या दिवसात ज्या दोन घाटवाटा होत्या त्यापैकी फक्त एक करून ‘मोहरी’ किंवा ‘चांदर’ मध्ये मुक्काम असं जाहीर केले. खरंतर कालच्या दिवसात सारेच दमले होते. घाटवाटेचे ट्रेक असेच मोठे आणि शारीरिक व मानसिक क्षमता पाहणारे. यासाठी सराव, सातत्य मुख्य म्हणजे स्वतःला आत्मविश्वास हवा. असो...
‘मल्ली’, ‘सागर’ आणि ‘अविनाश’ महाडकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहत थांबले. शिवथरघळहून निघून आम्ही पायी चालत अर्ध्या पाऊण तासात कुंभेशिवथरला आलो. गावात प्रशस्त विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. गावाच्या पलीकडे सह्याद्रीची मुख्य रांग भलतीच उंच भासत होती. याच भागातल्या आंबेनळी घाटातून आम्हाला केळद गाठायचे होते.
24.JPG
त्या रांगेकडे पाहत डेविलने क्रॅम्पमुळे परत फिरायचा निर्णय घेतला. तसाही त्याच्या सोयीनुसार तो तिसऱ्या दिवशी सकाळी घरी परतणार होता पण असो.. गावात थोड थांबून चौकशी करत असताना मागून काही वेळात ते तिघेही गाडीची वाट न पाहता पायीच आले मग डेविल त्यांच्या सोबत गेला. आता उरलो आम्ही तिघे, एवढ्या उत्साहात तयारी करून आलो नि हे काय झालं. कसेही असो पण असे एक एक जण माघारी फिरतात त्यावरून मनात चलबिचल झालीच. एक विचार असाही आला जाऊ दे आलो आहोत तर निवांत दोन तीन दिवस रायगडावर जाऊ.
यावर फार चर्चा विचार करत वेळ न घालवता नदी पलिकडच्या आंबेशिवथर मध्ये दाखल झालो.
आंबेशिवथर हे सुध्दा सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले सुंदर गाव तसे पहिलं तर कुंभेशिवथर, आंबेशिवथर, कसबेशिवथर या लहान लहान वाड्या वस्त्या.
26.JPG
गावात तानाजी मालुसरे यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो सिंहगडावर बलिदान दिलेल्या तानाजी मालुसरे यांचे शव याच भागातल्या केळदहून मढे घाटाने त्यांच्या मूळ गावी उमरठ इथे नेण्यात आले. इथले राम मंदिर आणि जिल्हा परिषदेची शाळा जर मुक्काम करायचा असेल तर सोयीचे. आधी म्हणालो तसे या भागात सह्याद्रीची सरळ मुख्य रांग फारच मोहक दिसते. उंची साधारण सात आठशे मीटर सहज असेल. दूरवर शेवत्या घाटानजीकच्या दुर्गाच्या कड्यापासून या रांगेत असलेल्या मढे, उपांड्या, आंबेनळी, गोप्या, सुपेनाळ, भोवरा नाळ, पाळदार, खुट्टे अश्या या शिवथर परगण्यात उतरणाऱ्या पूर्वापार वापरात असलेल्या प्रचलित घाटवाटा.
मुख्य म्हणजे इथे पदरात वसलेली लहान पाडे वस्त्या जसे नाणेमाची, कर्णवडी, आंबेनळी कधीकाळी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून, पण हल्ली या भागात रस्त्याचे काम रखडत रखडत अर्धवट का होईना थोड काही आहे हीच या भागातल्या ग्रामस्थांसाठी जमेची बाजू. आम्ही सुद्धा एका पिकअप मधून कच्च्या रस्त्याने पदरात आंबेनळी गावात दाखल झालो. आदल्या दिवशी गावात लग्न होऊन गेलेले त्यामुळे बहुतेकांची परतीची गडबड सुरू होती. अशी एखादी गाडी मिळाली तर ठिक अन्यथा सामान डोक्यावर खांद्यावर घेऊन तासा दीडतासाची पायपीट ठरलेली. सकाळ पासून डोकं दुखत असलेल्या मनोजने ड्रायव्हर काकांना गावात चहा मिळेल का विचारले. त्या काकांनी एका घरातल्या आजोबांना आवाज देऊन आमच्यासाठी चक्क चहा ठेवायला सांगितला.
‘शिवराम मालुसरे’ त्या आजोबांचे नाव. आजी आजोबा त्यांच्या सोबत लहान नातू. आजोबांचे घर पाहुणे गेल्यामुळे नुकतेच खाली झालेले. मुलं सगेसोयरे कार्यानिमित्त अथवा काही कामामुळे येतात एरवी हे तिघेच. त्यांच्या अंगणात गप्पा मारत बसलो क्षणभर वाटले, जाऊदे दुपारचे जेवण इथेच करू मस्त झोप काढू तसेही पदरातली वाड्या वस्त्या मला तर खूप आवडतात. चहा झाल्यावर मनोजने आजींना हळूच किती झाले विचारल्यावर, "हो! माझी काय हॉटेल आहे काय". असे खणखणीत आवाजात सुनावलं. खरचं असे अनेक आपुलकिचे अनुभव अश्या भटकंतीत मिळतात. या आंबेनळी गावातून दोन वाटांनी केळद जाता येते, पहिली आंबेनळीची वाट तर दुसरी थोडी दुरून पुढच्या कर्णवडीतून उपंड्या घाटाची वाट. आम्ही आंबेनळी घाटातून जायचे ठरवले. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात नाळेत पडझड होऊन वाट काही काळासाठी बंद होती.
गावाबाहेर पडताच शेतावर बांधावरून पुढे पदरातील मस्त चाल सरळ गेलो तर थेट कर्णवडी. उजवीकडच्या मुख्य रांगेच्या लहान खिंडीतून आंबेनळी घाटाची वाट जाते हे जरी माहित होते तरी तिथे पोहचणे सहज सोपे नव्हतेच. असंख्य आंबा, फणस, आणि जांभळं उंबरांची झाडी असलेल्या या पदराच्या वाटेत अनेक ढोरवाटा चुकवू पाहत होत्या. वाटेच्या सुरुवातीला लावून द्यायला मालुसरे आजोबा आणि त्यांचा नातू दोघेही सोबत आले. 30.JPG
साधारण अर्धा तासानंतर माथ्यावरील खिंड जवळ दिसु लागली, वाट त्या दिशेने रानात शिरून तिरक्या रेषेत चढाई. इथेच पुढचा मार्ग समजवून घेत आजोबांचा निरोप घेतला. दहा पंधरा मिनिटांचा झाडी भरला चढ संपवून वाट बरोब्बर नाळेत आली.
31.JPG
सुरुवातीला काही ठिकाणी ठिसूळ दगडी, घसारा आणि काही मोडून पडलेल्या झाडांच्या फांद्या. या भागात उन मात्र जाणवू लागले. हळूहळू चढताना घामाच्या धारा वाहू लागल्या. मागे वळून पाहताना आम्ही आलो तो पदर त्यामागे तळाशी नदी पल्याड शिवथरघळीचा गाडी रस्ता, समोर रामदास पठार डावीकडे दूरवर पारमाची कावळ्या किल्ल्याचा काही भाग. इथेच थांबून फोनला नेटवर्क मिळतंय का ते पाहिलं, कारण आधीच्या नियोजनानुसार आम्हा सात जणांचे दुपारचे जेवण पुढचा वेळ वाचवावा म्हणून केळद गावात सांगून ठेवले होते. पण आता उरलो तिघे आणि केळद मध्ये पुण्याहून ‘नचिकेत जोशी’ आम्हाला जॉईन होणार होता, पण त्याचाही फोन नॉट रीचेबल त्यामुळे तो नक्की कुठे आहे ? येईल का ? याचीही खात्री नव्हती. त्यामुळे उगाच अन्न आणि तयार करायला लागणारी मेहनत वाया नको जायला म्हणुन सकाळ पासून फोन ट्राय करत होतो. शेवटी मनोजच्या मोबाईल वर संपर्क झाल्यावर त्यांना काय ती आमची स्थिती सांगितली, त्यांनीही शांतपणे समजून घेतले. हे सारं होईस्तोर सुनीलने झटपट लिंबू सरबत तयार केले. पुन्हा तीव्र दगडांची चढण मग नाळेला अगल बगल देत पुढे वाट मुख्य नाळेतून बाहेर येत डावीकडून चढू लागली अगदी मळलेली त्यात वाटेत चॉकलेट बिस्किटाचा प्लॅस्टिकचा कचरा. जसे उंची गाठू लागलो तशी नाळ अरुंद होत गेली. गार वारा जाणवू लागला थेट माथ्यावरील खिंडीत येऊन थांबलो. आजोबांनी सांगितले होते त्याप्रमाणे खिंडीतून उजवी डावीकडे दोन वाटा मुख्य कड्यावर क्रेस्ट लाईन वर जात होत्या तिथे न जाता थेट सरळ खाली उतरणारी वाट घेतली. पलीकडच्या बाजूला अंदाजे अडीच तीनशे फुटांची उतराई. थोड उतरताच समोरच्या डोंगर रांगेपलीकडे तोरणा त्याचे विशाळा टेपाड आणि बुधला माचीचा भाग नजरेत आला. नंतर कारवीच्या रानातून उतरत वाट सपाटीवर आली. मागे वळून पाहिले तर आम्ही आलो ती माथ्यावरची खिंड. चढताना जाणवणारी आद्रता आणि घाटावरच्या वातावरणात कमालीचा फरक जाणवला. गार हवा खात एका झाडाखाली विसावलो नाहीतरी आता काही घाई नव्हतीच. पुढे काय ते ठरवू जसे जमेल तशी मजा घेत स्वांत सुखांत स्वच्छंद भटकू असेच तिघांनी ठरवलं. नदी पार करून ‘केळद’ ‘कुंबळे’ रस्त्यावर आलो. हीच नदी पुढे भाटघर जलाशयात भर घालते.
33_0.JPG
अर्धा तासानंतर केळदच्या वाडीत पोहचलो. आंबेनळी गावापासून इथवर रमत गमत यायला आम्हाला तीन तास लागले. ‘अंकुश धुमाळ’ यांच्या घरी पोहचतो तोच अंगणात नचिकेत आमची वाटच पाहत होता. मग गळाभेट घेत त्याला काल दिवसभर आणि सकाळचे घडले रामायण सांगितले. डोकं शांत झाल्यावर, हात पाय धुवून पहिलं जेवण केले. आता पुढचा पल्ला होता मोहरी. तिथपर्यंत गाडीची सोय झाली होती. मागे दिवाळीत आलो होतो तेव्हा केळदहून ‘मढे उपांड्या’ घाटाचा ट्रेक आणि ‘लक्ष्मण शिंदे’ यांचा पाहुणचार आठवला.
आता सद्या केळद ते कर्णवडी मढे घाटातून रस्ता प्रस्तावित आहे. कारण खाली कोकणातून पडवळकोंड रानवडी येथून पदरात असलेल्या कर्णवडी पर्यंत कच्चा का असेना रस्ता आहेच.
वेल्हाकडे जाणारा मुख्य रस्ता सोडून जीप सिंगापूरच्या वाटेला लागली. काही ठिकाणी चक्क गुळगुळीत डांबरी रस्ता, या भागात होऊ लागलेल्या फार्म हाऊस आणि प्लॉट बंगलोवाल्यांची सोय. डावीकडे भोर्डी पुढे एकलगाव तर उजवीकडे वरोती दूर हरपुड ही लहान गावं. हा रस्ता मला स्वतःला आवडायचं कारण, इथून होणारं राजगड तोरणा लिंगाणा व रायगड यांचे दर्शन.
34_0.JPG
वाटेत एकलगाव जवळ पुरातन पाण्याचे टाके पाहून थेट मोहरीत. ‘शिवाजी पोटे’ यांच्या अंगणात आमचा बाडबिस्तरा मांडला. शिवाजी पोटे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते, बाजूच्या ‘बाळू मोरे’ यांच्या सोबत गप्पा नव्या जुन्या आठवणी नंतर पाण्याचा हंडा मग कोरा चहा. सारं काही एकदम निवांत ! थोडा वेळ टंगळमंगळ केल्यावर, सगळ्यांना म्हटलं चला रायलिंगवर. सुरुवातीला मनोज थोडा अनुत्सुक होता, त्यालाही तयार केले. रायलिंगवर या आधी येणं झाले होते पण आज फुरसत मध्ये सूर्यास्त पहायला अनायसे संधी मिळाली. समोर शिवलिंगा सारखा लिंगाणा दूरवर शिवतीर्थ रायगड त्यामागे अस्ताला जाणारा तेजाचा लालबूंद गोळा.
सिंगापूर नाळ, बोराटा नाळ, भिकनाळ, फडताडनाळ, आग्यानाळ या भागातल्या इतर अनेक नाळा आणि वाटांच्या दरी खोऱ्यात काळोखाचे साम्राज्य पसरू लागले. संधिप्रकाशात आम्ही चौघेही निःशब्द शांतपणे बसून राहिलो.
जे काही अनुभवलं त्या बद्दल फार लिहावं असे वाटले तरी मला नाही जमणार. मनोज ने त्याचा अनुभव खाली लिहीला आहे, तो इथे शेअर करतोय. अर्थात त्याच्या परवानगीने...

या जागेने फार पछाडले होते मला..अनेक वर्षांपुर्वी पहिल्यांदा पुस्तकात याचा उल्लेख वाचला (बहुदा तु वी जाधवांच्या) होता तेव्हा असे काही आहे याची जाणीव झाली...मग पुढे पुढे इथल्या जागेचा बाजार झाला (किंवा बाजार उठला म्हणा) तेव्हा तर या जागेने मोहात पाडले...

सह्याद्रीने आपल्या खिशात काही खास जागा दडवून ठेवल्यात (होत्या), घाम गाळून तंगडतोड केल्याशिवाय त्याचे दर्शन पण होत नाही (नव्हते) त्यातलीच एक जागा म्हणजे रायलिंग पठार...

गेली कित्येक वर्षे सिंगापुर नाळ, बोराटा नाळ, फडताड नाळ अश्या घाटवाटा खुणावत होत्या...त्याला जोडून निसणी, गायनाळ, आग्यानाळ अश्या वाटा बोलावत होत्या. या सगळ्याला कवेत घेउन आहे लिंगाणा किल्ला आणी त्याच्या कुशीत आहे रायलिंग पठार. प्लान अनेक बनवले पण इथे जाणे झाले नव्हते...जायचे म्हणजे सोपे कामही नाही (नव्हते). एकतर कोकणातून पाने, दापोली इथून बोराटा किन्वा सिंगापूर चढा किन्वा घाटावरून हरपुड, वरोती, मोहोरी करत पाय ताणा...

पण असे थोडेसे कष्ट जर घेतलेत तर रायलिंग पठारासारखा स्वर्गीय अनुभव विरळाच...आता हा अनुभव पठारालगतच्या लिंगाणामुळे (एवढा जवळ की दगड भिरकावला तर किल्ल्यावर जाईल) की पायाखालच्या खोल खोल दर्यामुळे की समोरच्या मॅग्नेटीक रायगडामुळे की कशामुळे जे त्याचे त्याने ठरवावे...

परवाच्या रेंज ट्रेकमधे मोहोरीच्या शिवाजीभौंच्या अंगणात सन्ध्याकाळी चार वाजता येउन पडलो तेव्हा ठरलेल्या प्लानची पूर्ण वाट लागली होती...आता इथेच मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. बाळूभौंना उद्याच्या प्लान साठी तयार केले आणी नुसताच निरुद्देश पडलो होतो..तेवढ्यात कोणालातरी रायलिंगला जायचे सुचले.. मला तरी बिल्कुल इच्छा नव्हती पण तयार झालो. पाऊणतास चालल्या नंतर जेव्हा पठारावर पोचलो तेव्हा सुर्य एक्झीट मारायच्या बेतात होता. कसल्या जबरी टायमिंग ला आम्ही पोचलो होतो...

समोर हाताच्या अंतरावर लिंगाणा, हाकेच्या अंतरावर रायगड...पायाखाली अस्ताव्यत पसरलेली पाच पंचवीस घरांची गावे आनी त्यान्च्या त्याहुन पसरलेल्या वाड्या..अंगप्रत्यंगाने अक्षरशः शोषून घ्यावे असे वातावरण..एकीकडे नजरेने टिपत होतो तर एकीकडे मोबाइल मधे...

हळूहळू सुर्य अस्ताला गेला आणी पुलंच्या भाषेत दिवेलागणीची वेळ झाली. सगळीकडे ट्वायलाइट पसरलेला. खरेतर ही वेळ थोडी निराशेचीच पण तेव्हा तिथे निळ्या आकाशात पसरलेले केशरी फराटे जास्त मनोहारी वाटत होते....

हळूहळू सर्वदूर व्यापणार्या अंधाराला छेदून गावात दिवे ऊजळू लागले...डावीकडे खाली वाकी, शेवते, वाघोली, पणदेरी, तळात खाली पाने, दापोली, उजवीकडे खाली वारंगी, निजामपुर समोर खाली वाडी, वाळणकोंड उजवीकडे खानुचा डिग्गा तर अगदी नाकासमोर जगदिश्वर असे एकेक गावाचे काजवे ऊजळू लागले. दिवसभाराची वाहती गजबजती गावे अशी शान्त होताना बघून मस्त वाटत होते.

खरेतर सुर्यास्त झाल्या झाल्या आम्ही तिथून निघणार होतो पण आता पाय निघत नव्हता असे भारावलेले वातावरण. नजरेच्या एका फटक्यात अशी तळातली गावे बघणे फार मजेचे वाटत होते. त्यात आजुबाजुला निरव शांतता, बोचरी थंडी, समोर दरीत उडणारे असंख्य पाकोळी पक्षी, एखादीच उडणारी घार..त्यात नेमके त्याच वेळेला लिंगाणाच्या डोक्यावरून एक जेट त्याची सोनेरी शेपटी उडवीत गेले... हे म्हणजे बासुंदीपुरीच्या जेवणावर मघई पानासारखे झाले..

असे आम्ही मनाने, शरीराने तृप्त होऊन परत शिवाजीच्या घरी आलो.
माझा वरीजीनल प्लान जरी फिस्कटला होता तरी अनेक वर्षांपूर्वी पासूनचा पेन्डींग अनुभव सह्याद्रीने त्याच्या शिंपल्यातला एक खास टपोरा मोती देऊन दामदुप्पट भरपाई करुन पूर्ण केला होता...

- मनोज भावे.

शेवटचा लहानसा चढ पार करून सपाटीवर आलो. तेव्हा नुकताच पौर्णिमेचा चंद्र क्षितिजावर उगवला होता. सारं वातावरण एकदम शांत आणि वेगळच भारावलेलं. तिघेही पुढे निघून गेले एकटाच आपलं आरामात माघून चालत होतो. मोहरी जवळ येताच कुणीतरी तोंडावर टॉर्च मारून ओरडले, "फिरा असेच एकटे एकटे फिरा आम्हाला सांगू नका!" जवळ गेल्यावर पहिलं तर ‘रेश्मा’ आणि सोबत ‘संदीप’ व ‘रोहन’. पुढे गेलेल्या मनोज सुनील सोबत बोलत उभे होते. मग समजलं ते तिघेही राजगड तोरणा रायगड रूट करत होते. गेल्या वर्षी बैलघाट कौल्याची धार नंतर संदीप आणि रेश्मा सोबत ट्रेक झालाच नाही आणि आता ही बरोब्बर वर्ष भरानंतर अचानक भयानक भेट. योगायोग म्हणजे संदीप सोबत माझी पहिली भेट याच मोहरीच्या वाटेवरची. चला आता चांगली कंपनी मिळाली, खरंच सांगतो सकाळ पासून जे घडले त्याचा सारा शीणवटा एक रायलिंगची सायंकाळ दुसरं संदीप कंपनी या दोघांनी घालवला. आमच्याकडे थोडा फार शिधा तसेच नचिकेतने आणलेले फ्रेश ठेपले होतेच. त्या तिघांकडे तर भरपूर शिधा होता, संदीप आणि रेश्मा यांचा ट्रेक म्हणजे खाण्याची पूर्ण चंगळच. पोटेंच्या अंगणातच चूल मांडली. रेश्माने लीड घेतली. निवडणे धुणे कापणं चिरण जो तो कुठंतरी गुंतला होता. सोयाबीन बिर्याणी सोबत अंड्याची भुर्जी, ठेपले, लोणचे, शेजवान सॉस.
dinner.jpg
जेवण झाल्यावर सर्व आवरून घेत खालच्या कुंडातून पाणी घेऊन आलो. दुधाळ चंद्रप्रकाशात एकदम मस्त माहोल मग जमली गप्पांची मैफिल, मनोजचे काही अनुभव, एक दुसऱ्याचे ट्रेकचे किस्से यात मध्य रात्र उलटून गेली. एकंदरीत दुसरा दिवस आरामशीर गेला.
सकाळी उजाडताच उठलो, कडाक्याची अशी थंडी नव्हती पण वारा मात्र बऱ्यापैकी बोचत होता. बाळू मोरेंनी गरमागरम चहा दिला. आज आमच्याकडे दोन तीन पर्याय होते मोहरीतून सिंगापूर किंवा बोराटा नाळेने दापोली अथवा पाने गाठणे.
चांदर गावात जाऊन निसणी घाटाने उतराई.
खानु जाऊन बोचेघोळ नाळेतून वारंगीत उतरणे किंवा अजून दौड मारता आली तर थेट घोळ गाठून मुक्काम करून कोकणदिवा पाहून कावळ्या घाटाने नाहीतर दापसरेहून ठिबठिब्या घाटाने जिते. यात आम्ही सिंगापूर बोराटा पर्याय बाद केला. बरं घोळ गाठायचे तरी पूर्ण दिवस लागणार त्यात सोबत हवीच. बाळू मोरे यांना काम असल्यामुळे येणं शक्य नव्हते, बरीच विनंती केल्यावर आम्हाला म्हणाले तुम्हाला चांदरहून पुढे पक्का माहितगार कुणीतरी सोबत लावून देतो. थोडक्यात चांदरला गेल्यावर काय ते पाहू असे ठरवले.
संदीप कंपनी बोराटा उतरून आजच रायगडी जाणार त्यांचा निरोप घेऊन चांदरकडे निघालो. मोहरीतून उत्तरेकडे पाहिल्यावर समोरच्या डोंगर रांगेत एक खिंड दिसते त्यापलिकडे चांदर.
37.JPG
थोडक्यात उतराई मग पुन्हा खिंडीची चढाई असा मामला. वाट कारवीच्या रानातून उतरू लागली. सकाळी सकाळी अश्या रानात एक वेगळाच गंध असतो, पायाजवळचे गवत दवामुळे ओले झालेले तर वाटेवरची माती सुध्दा चिकटून असते. अर्धा तासात सपाटीवर भैरवनाथाच्या मंदिरापाशी आलो.
वाटेत बरेच गावकरी दिसले चांदर आजूबाजूच्या वस्ती शेतातून हातात थैली डोक्यावर दहा दहा पंधरा किलोची गोणी घेऊन जाणारी बाया माणसं. खरंच कष्टमय खडतर परिस्थितीत नावं न ठेवता पुढे जाणं हेच सूत्र. पुन्हा थोडी उतराई मग एक छानसा अर्थात कोरडा ओढा आडवा आला.
बाजूला पावसाच्या दिवसात जाण्यासाठी लाकड बांबू वापरून साकव केलेला. थोडफार सुका खाऊ खाऊन, सुरू झाली खिंडीची चढाई. वाटेत दगडी विहीर अडीअडचणीला पाणी नक्कीच उपयोगी. मोहरी पासून अंदाजे अडीच तीनशे मीटर उतरण तर दोनशे मीटर चढण असावी. खिंड चढून आल्यावर पलीकडे चांदर दिसेल असे वाटले होते पण कसलं काय आणखी बरीच चाल होती. सकाळी उन नव्हतं हीच जमेची बाजू. पुन्हा उतरत दुसरा ओढा पार करून गवताळ पठारावरून वाट, मागे दिसतेय आम्ही आलो ती खिंड.
40.JPG
लहान मोठे चढ उतार पार करत अडीच तासात चांदरच्या गावठाण वस्तीत आलो. मोरे मामांनी ओळखीच्या घरात नेलं, बाहेरून आवाज देताच आजी बाहेर आल्या. आम्हाला पाहून पुन्हा आत जात सतरंजी सारखं बसायला घेऊन आल्या. नको नको म्हणत आम्ही स्वच्छ सारवलेल्या अंगणात बैठक मांडली.
जे सोबत येऊ शकत होते ते बाहेर होते, मामांनी आणखी एकाला विचारलं पण कुणी घोळ पर्यंत यायला तयार नव्हते. शेवटी घोळचा घोळ बाजूला ठेवत खानुत जाऊन बोचेघोळने उतरायचं ठरलं. साहजिकच चांदर मध्ये न जाता वर खानुच्या डिगावर जायचे ठरले. पुढची वाट समजून घेत इथेच मोरे मामांचा निरोप घेतला. वस्ती बाहेर येत ओढ्याला उजवीकडे ठेवत वाट टेपाडावर चढू लागली. मागे खिंडीच्या पलीकडे रायगड डोकावला.
वीस एक मिनिटांत तीव्र चढण संपवत वाट डोंगर धारेवर आली, नंतर सौम्य चढण आणि डावीकडे वळून थेट डिगा चांदर रस्त्यावर.
45.JPG
खानुचा डिगा उंचावर आहे त्याखाली दीडएकशे मीटर चांदर जे सहज दिसते, तर दक्षिणेला रायलिंग पठार बाजूला लिंगाणा. खानुच्या डिग्यावर नेटवर्क मिळालं घरी फोन करून खुशाली कळवली. एके ठिकाणी थोड थांबून पाणी वगैरे भरून घेत खानुच्या वाटेला लागलो. गेल्या तीन वर्षांपासून डिगा ते खानु कच्चा रस्ता झाला आहे. ग्राउंड क्लिअरन्स चांगला असलेली जीप किंवा मिनी बस जाऊ शकते. आधी म्हणालो तसे डिगा उंचीवर साहजिकच वळण घेत घाट रस्ता उतरू लागला. डोंगर उतारावर ठिकठिकाणी केलेली शेती अधून मधून डोकावणारे धनगरांचे झापं. आजूबाजूला थोडफार का होईना अजूनही हिरवा रंग टिकवून असणारे डोंगर. त्या शांत निर्मनुष्य वाटेवरून विविध पक्ष्यांची किलबिल ऐकत तासाभरात दुर्गम अश्या खानुत दाखल झालो.
48.JPG
गावातल्या मंदिरात नुकताच ‘दत्तजयंती उत्सव’ पार पडला होता. त्याची साक्ष तिथे लागलेले बॅनर, सजावटीचे पताके आणि मागे पडलेल्या पत्रावळ्या व इतर कचरा. असो..
म्हातारं बाबा प्रकटले राम राम शाम शाम झाल्यावर पाण्याची कळशी आणून दिली. एखाद्या घरात लग्नकार्य किंवा एखादे मोठे कार्य झाल्यावर पाहुणे मंडळी गेल्यावर जो काही रितेपणा जाणवतो थोडा फार तसाच इथे जाणवत होता. काय माहित पण एक वेगळीच उदासीची छटा जाणवत होती, आता पर्यंत मजा मस्ती करत आलेलो आम्ही इथं येऊन एकदम गप्प झालो. समोरच्या घरातलं दृश्य तर हेलावून टाकणारे जख्ख म्हाताऱ्या आजोबांचा हात मोडलाय तर आजींना ऐकु येत नाही, घरात दोघेचं बाकी मुलं वगैरे कुठंतरी पोटापाण्यासाठी बाहेरगावी. त्यांनी तरी काय करावं थोडीफार पावसाळी शेती सोडली तर अश्या दुर्गम ठिकाणी रोजगाराची हमी नाहीच. साहजिकच कितीही वाटलं तरी घराबाहेर दूर जावेच लागते. सह्याद्रीतील बहुतेक लहान गावं दुर्गम पाडे वस्त्या बहुतेक ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळते.
जेवण झाल्यावर थोडा आराम करून बरोबर दोन वाजता निघालो. ‘बोचेघोळ’ एक मुख्य पुरातन घाटवाट. ट्रेकिंगला सुरुवात झाली तेव्हा पासून रायगड घेऱ्यातील सिंगापूर, बोराटा, कावळ्या आणि बोचेघोळ ही नावं ऐकत आलोय. आज या वाटेने जाण्याचा योग आला. त्यासाठी मी मनोजचे आभार मानतो. कारण इथे देत नाही.... बाहेर निघताना वाटेची सद्य स्थिती या बद्दल चौकशी करत असताना एकाने व्यवस्थित माहिती तर दिलीच वरून 'वाटेत जाताना आमचा देव लागेल जमले तर तिथून जाताना बूट काढून जा, तुम्ही फिरणारी माणसं तुम्हाला पटेल का पण बघा', असे सांगितले. खानु गावाला चारही बाजूने लहान लहान टेकड्यांनी घेरले आहे. नवख्या माणसाला घाटाची सुरुवात सापडणे कठीण, थोडक्यात सांगायचे झाले तर नैऋत्य दिशेला जी कमी उंचीची खिंड दिसते त्याच खिंडीतून वाट पुढे जाते. आमच्यात मनोजने ही वाट चार एक वर्षांपूर्वी केली होती. शेतं संपवून वाट डावीकडे टेकडीला वळसा घालून सरकू लागली. थोडफार झाडोरा आणि सौम्य चढाई आरामात अर्ध्या तासात खिंडीत आलो. मागे वळून खानु शोधायचा प्रयत्न केला पण दिसले नाही तसेच खिंडीच्या पलीकडे कोकण दिसेल तर तसेही नाही. पुन्हा टेकड्यांनी वेढलेल्या भागात शिरायचे होते.
61.JPG
खिंड उतरत मोकळं वनात आलो पिवळ्या धम्मक गवतामध्ये वाटच हरवली, थोडी शोधा शोध केल्यावर उतरणारी वाट मिळाली जी थेट ओढ्या जवळच्या काळकाई / राहटाई देवाच्या ठाण्याजवळ घेऊन आली.
भल्या मोठ्या दगडाला शेंदूरचे ठिपके वर टांगलेल्या घंटा, बाजूला कलश, अगरबत्ती समई, नुकतच कुणीतरी ठेऊन गेलेले पान सुपारी हळकुंडचे विडे तशीच देवाला आमंत्रण म्हणून ठेवलेली लग्न पत्रिका. खरंच अशी अनगड जागेवरील श्रद्धेची देवस्थानं मनाला फार भावतात. इथे आसपास बर्यापैकी जंगल त्यात ओढ्याला अजूनही वाहती बारीक धार, भर दुपारी गार वाटत होते. एकदम प्रसन्न असे वातावरण तिथेच पंधरा वीस मिनिटांचा मोठा ब्रेक घेऊन सव्वा तीनच्या सुमारास निघालो. ओढा पार करून वाट डावीकडे वरच्या बाजूला चढू लागली मधल्या झाडीच्या टप्प्यात आमच्या आणि मागे राहिलेला नचिकेत मध्ये थोडीशी चुकामुक झाली ए.. ओ.. ए.. ओ.. आवाज देत गडी लाईनीत आला. झाडी भरली वाट उंच टेपाडावर घेऊन आली आणि उलगडले bocheghal.jpg
काळ नदीचे खोरे. उजवीकडे कावल्या बावल्याची खिंड आणि कणा डोंगर यांचे सरळ सोट कोकणात उतरलेले भेदक कडे व अनेक घळी.
पुढे सुरू झाली ती बोचेघळची मुख्य ट्रेव्हर्सी कड्याला बिलगून जाणारी अतिशय अरुंद वाट थोडी काही चूक झाली तर थेट दरीत.
68.JPG
काही ठिकाणी वाट ढासळून जेमतेम पाऊल मावेल इतपतच जागा त्यातही गावकऱ्यांनी आधाराला बाजूला लाकडाच्या मोळ्या व बांबू एकत्र बांधून आडवे टाकले होते अगदी खालच्या बाजूने सुध्दा जमेल तसा टेकू दिला होता. सावकाश तो टप्पा पार करत नागमोडी वळणं घेत वाट उतरू लागली. अगदी व्यवस्थित वापरातली मळलेली वाट एकदा वाटेला लागलो की झालं दुसरं महत्वाचं म्हणजे ही वाट पूर्णपणे दक्षिणेला जात राहते.
पुढे ओढ्याला उजवीकडे ठेवून गर्द रानातून वाट टप्पा टप्प्याने उतरत वळसा घेत पदरात आली. पंधरा मिनिटांच्या चालीनंतर हेडमाचीत जाणारी वाट सोडून उजवीकडे वळलो. हल्ली हेडमाची मध्ये कुणी राहत नाही पावसाळी शेती पुरते कुणी असले तरच. इथून भक्कम मळलेल्या वाटेने अर्ध्या तासात खाली आलो. आता सुरू झाली ती नदी पात्राला समांतर अशी चाल. काळ नदीच्या या बाजूने रायगडाचा भव्य पणा ठळकपणे जाणवतो.
75.JPG
भवानी टोकापासून ते टकमक टोका पर्यंत. दगड गोट्यानी भरलेली नदी पार करून वारंगीत आलो. घड्याळात सहा वाजत आलेले खानु ते वारंगी, बोचेघोळ उतरत यायला आम्हाला जवळपास चार तास लागले. हि वाट बरीच मोठी निघाली. पण मला स्वतःला खूप आवडली पुन्हा कधीही परत यायला आवडेल अशी.
रायगड जावे का ? किंबहुना अंधार पडत चाललाय त्या आत नदी पार करून छत्री निजामपूर जाऊन मग पुढे काही साधन मिळालं तर चितदरवाजापाशी पोहचता येईल. पण दमछाक झालेली तीन दिवस अवजड सॅक धरून खांदे आणि चालून चालून पाय बोलायला लागले. काय माहित पण आजच्या सायंकाळी घराची ओढ जाणवू लागली. इतक्या जवळ येऊन एक दिवस हाताशी असताना रायगड सोडावा असे वाटत नव्हते पण आम्ही चर्चेअंती झाला तसा रेंज ट्रेक तीन दिवसात संपवत घरी जायचे ठरवले. मंगळगडाच्या साक्षीने सुरुवात झालेला ट्रेक रायगडाच्या समोर संपला हेही काय थोडके नसे.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/02/ambenali-bocheghol.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच एकदम!
बाकी वाचुनच दमायला होते. सलाम आहे तुम्हाला.
फोटो छानच.

फोटो छान .
>> तीन दिवस अवजड सॅक धरून खांदे आणि चालून चालून पाय बोलायला लागले. >>
फारच मोठी बोचकी दिसताहेत.