वास्तु १०

Submitted by जयश्री साळुंके on 1 June, 2019 - 10:45

दाटलेला अंधार आणि वरून शांत भासणारं जंगल, त्यात दाटून आलेले ढग. सगळ्या वातावरणात एक कमालीची तणावपूर्ण शांतता होती. जंगली प्राण्यांचा आवाज येत होता पण तो देखील दुरून, त्यातल्या त्यात कोल्हेकुई जास्त भीतीदायक होती. सौम्यला जास्त भीती वाटत नव्हती म्हणुन टोर्चच्या प्रकाशात तो पुढे चालत होता आणि भाऊ त्याच्या मागे. पाऊस कधीही कोसळेल अशी चिन्ह दिसत होती आणि त्यामुळे लवकरात लवकर बाहेर पडावं किंवा एखाद्या आडोश्याच्या ठिकाणी तरी थांबाव असं सौम्यच मत होतं. पण त्यांच्या कमनशिबाने त्यांना न रस्ता सापडत होता ना आडोसा घ्यायला एखादं ठिकाण, सुन्या जंगलात गुफा सोडुन काय असणार आडोश्याला? आणि त्या गुफा थोडीच त्यांच्यासाठी सुरक्षित असणार होत्या? पण तरी काही तर करणं गरजेच होतं. ह्या सगळ्यात सौम्य च्या एक गोष्ट अचानक लक्षात आली ती म्हणजे ते बर्याच वेळापासून ते दोघ एकाच जागेवर फिरत होते.
एव्हाना त्याच्या मनातला गोंधळ कमी होत होता. कारण त्याला हळु हळु एकेक गोष्ट लक्षात येत होती. जर सईवर संमोहन केलेलं असतं तर तिच्या कपाळावर तो डाग नसता आला. आणि आजचं हे वातावरण त्यात बसलेला चकवा म्हणजे ह्या सगळ्यात नक्की काही तरी अमानवी शक्ती होती ह्यावर सौम्यचा विश्वास बसत चालला होता, पण मग सईच्या खोलीतलं ते चित्र, त्यात का वेगळेपण जाणवत होतं हे मात्र त्याच्या लक्षात येत नव्हतं.
पण आत्ता ह्या मिनिटाला चकव्यातून बाहेर पडण जास्त महत्वाचं होतं. त्यासाठी त्याने खुणा सोडायला सुरुवात केली, आजूबाजूच्या झाडांवर तो चाकूने फुल्या मारत पुढे जात होता, हे त्याने अजुन भाऊच्या लक्षात नव्हत आणून दिलं कारण तो आधीच घाबरलेला होता. एव्हाना पाऊस जोरात सुरु झालेला होता. एव्हढ सगळ करून पण काही फायदा झाला नव्हता. गेल्या कित्येक तासांपासून ते दोघं एकाच जागी फिरत होते. आणि वेळ समजायला पण काही मार्ग नव्हता. कारण अंधार तर केव्हाच पडला होता, दोघांच्या मोबाईलची चार्जिंग उतरली होती आणि पावसाचं पाणी घडाळ्यात जाऊन ती देखील काम करायची थांबलेली, आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणुन अचानक टोर्च देखील बंद पडल्यात. वादळवारा, वीजांचा प्रकाश तेव्हडा अधे मध्ये रस्ता दाखवत होता. प्राणांचे आवाज सुद्धा बंद होते, त्यामुळे आता त्या जंगलात सौम्य आणि भाऊ सोडुन बाकी कोणताही जीवित प्राणी असेल असं वाटत नव्हतं.
अश्यातच एका वीजेच्या प्रकाशात सौम्यला एक विझलेला होम दिसला. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर त्याला इथे मिळणार होती. सौम्य त्या दिशेने चालू लागला, थोडा जवळ पोहचला होता तो आणि त्याच वेळी पाऊस थांबून चक्क ऊन पडलं. सूर्याच्या प्रकाशात होमाचा परिसर खुप सुंदर दिसत होता, पण त्यात पाऊस पडून गेल्याचं कोणतच चिन्ह नव्हतं. झाडलोट केलेला परिसर, आजूबाजूला गावात होती तशीच गुलमोहराची झाडं, त्यांच्या सोबतच अनेक रानवेली. पण एव्हडी झाडं असूनही एक सुद्धा पक्षी नजरेत दिसत नव्हता हि बाब सौम्यच्या नजरेतून सुटली नाही. होमाच्या भोवती रेखीव नक्षी काम केलेलं होतं. आजू बाजूला खाण्यासाठी बरीच फळं ठेवलेली होती.
सौम्यच्या मनातली शंका बळ धरू लागली कि हे काम कोणत्याही मानवी शक्तीचं नव्हतं. भाऊला देखील याचा अंदाज लागला होताच, त्यामुळे तो कोणत्याही वस्तूला हात लावत नव्हता. सौम्यने सगळा परिसर व्यवस्थित डोळ्याखालून घातला. पण त्याला कोणतचं योग्य असं नजरेला दिसत नव्हतं. पण होमाच्या अतिशय जवळ गेल्यावर त्याला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे होमाचा रंग हा रक्ताने दिलेला होता, आणि त्यावर केलेली नक्षी हि त्याने आधी बघितलेली होती, स्वतःच्या घरी.
हि तीच नक्षी होती जी गिरीजा स्वतःच्या वहीवर कायम काढायची. आणि हे लक्षात आल्या मिनिटाला आजूबाजूला बदल घडायला लागला. आतापर्यंत सुंदर दिसणारी ती जागा घाणीने माखली. हाडांचा ढीग एका बाजूला दिसायला लागला, झाडांची जागा आता काळ्याशार वेलींनी घेतली होती, दुर्गंधी तर दोघांना असह्य झालेली, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे ते ऊन जाऊन पुन्हा अंधार पडायला लागलेला.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथानक छान सुरुय

फक्त एक गोष्ट खटकली
चकव्या सारख्या मामूली गोष्टीतुन सौम्य जर बाहेर पडू शकला नाही / किंबहुना चकवा लागतोय हे त्याला लगेच कळले नाही तर अतिउच्च पातळीवर कुसामर्थ्य बाळगुन असलेल्या अघोरीचा सामना तो नक्की कुठल्या बेस वर करणार !!

छान आहे कथा.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..