चंदनाची चोळी, माझे अंग अंग जाळी ...

Submitted by SureshShinde on 31 May, 2019 - 12:23
mri-scan

‘सर, आम्ही आपल्या घराबाहेर उभे आहोत.’
गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील माझा शोधनिबंध अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये स्वीकारला गेला असल्याने मी आजच पुण्याहून अमेरिकेला जाण्यासाठी निघणार होतो. मी आत्ता एक महिनाभर सुट्टीवर जाणार असल्यामुळे काम मात्र संपता संपत नव्हते. कालची तब्बल एकशे पंधरा रुग्णांची ओपीडी आणि आज सकाळचा हॉस्पिटल राऊंड, होम व्हिजिटस आटोपून नुकताच घरी आलो होतो. अमेरिकेने नुकत्याच लागू केलेल्या नियमांमुळे ई चेकिंग फारच क्लिष्ट झालेले आणि त्यातच पुन्हा एकदा फोनची घंटी वाजली. घरा बाहेर ऍडव्होकेट सुभाष फॅमिलीसह उभे होते. ऍड सुभाषराव आणि माझा गेल्या चाळीस वर्षांचा घरोबा ! सुभाषराव, शोभाताई आणि त्यांची मुले, सुकृत आणि स्वप्ना असे सर्वचजण सुविद्य कायदेतज्ज्ञ ! दुपारच्या उन्हात आंब्याच्या पेटीचा उपहार घेऊन दारात उभे होते.
‘सर, आपण सांगितल्याप्रमाणे सौ. शोभाच्या पाठीचा एम् आर आय चा रिपोर्ट दाखविण्यासाठी आलो आहोत.’ वकीलसाहेब सांगत होते.
रिपोर्ट तर नॉर्मल होता. सौ. माधुरीने लगबगीने सर्वांसाठी तयार केलेल्या थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेताघेता गप्पा सुरु झाल्या.
‘शोभाताई, तुमची जरीची साडी छान दिसतेय !’ माधुरी.
‘अहो माधुरीताई, या जरीच्या साडीने काल माझा जीव चांगलाच गोत्यात आणला होता’ शोभाताई म्हणाल्या.
‘कसे काय बरे?’ माझ्यातील चौकस डॉक्टर जागा झाला.
‘त्याचे असे झाले,’ शोभाताई सांगू लागल्या.
‘एक तर मी मुलखाची भित्री आहे.’ त्याच्याकडे पाहून सुभाषरावांनी मान डोलावली.
‘खरे म्हणाल तर आमच्या सौ म्हणजे अर्ध्या वकील आणि अर्ध्या डॉक्टर आहेत. वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांना उपजतच डॉक्टरकीचे ज्ञान आहे बर का !’ सुभाषरावांनी एक शाब्दिक चिमटा काढला. खरोखरच शोभाताईंचे वडील म्हणजेच डॉ. कल्याणकर हे श्रीरामपूर येथील एक प्रसिद्ध आणि सेवाभावी लोकप्रिय डॉक्टर होते.
‘पुढे काय झाले?’
माझी उत्सुकता जागृत झाली होती.
त्या पुढे सांगू लागल्या.
‘ त्या एमआरआय मशीनचे नाव ऐकून मला आधीच धडकी भरली होती. तेथील टेक्निशियनच्या सल्ल्याप्रमाणे मी सर्व धातूंचे दागिने, पर्स इत्यादी वस्तू साहेबांच्या ताब्यात दिल्या. त्यांनी माझ्या शरीरात काही धातू तर नाही ना याची चौकशी तर केलीच पण माझ्या शरीरावर एक मेटल डिटेक्टरची कांडी फिरवून खात्रीदेखील केली. त्यानंतर मला त्या मशीनच्या खोलीत घेऊन गेले. सुमारे दहा फूट उंच गोलाकार अश्या मशीनच्या मध्यभागी एक पोकळ भाग दिसत होता आणि त्याला लागूनच एक जेमतेम झोपता येईल असा लांबट भाग होता. बहुतेक मला त्यावर झोपावे लागेल असा मला अंदाज आला होता. तेव्हड्यात तो टेक्निशियन मला सांगू लागला.
‘बाई, घाबरू नका. या कोचवर झोपा. झोपल्यानंतर हालचाल केलीत तर फोटो चांगला येणार नाही. म्हणून तुम्हाला आम्ही या कापडी पट्ट्यांनी कोचला बांधणार आहोत. मशीन चालू झाल्यावर एक प्रकारचा आवाज येतो त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुमच्या कानात आम्ही कापसाचे बोळे घालणार आहोत. मशीन चालू झाल्यानंतर तुमचा कोच हळूहळू सरकत मशीनच्या मधील पोकळीत जाईल. फोटोचे काम सुमारे तीस मिनिटे चालेल. तुम्ही डोळे मिटून शांत पडायचे आहे. झोपलात तरी चालेल. एव्हडे सांगून तो खोलीतून बाहेर गेला. मशीन चालू झाल्याचा आवाज सुरु झाला आणि माझे प्राण मुठीत धरून मी हळूहळू त्या मशीनच्या पोकळीमध्ये शिरले.’
4474746E-07B8-46B2-A1D6-F41E59F2964E.jpeg
मित्रहो, या ठिकाणीं थोडेसे थांबून आपण MRI विषयी थोडेसे समजाऊन घेणे आवश्यक आहे. आपले शरीर हे सत्तर टक्के पाण्यामुळे बनलेले आहे. पाणी म्हणजे हैड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाने तयार होते. प्रत्येक हायड्रोजेनच्या अणूमध्ये एक प्रोटॉन असतो व त्या प्रत्येकावर एक पॉसिटीव्ह विद्युतभार असतो. म्हणजेच प्रत्येक प्रोटॉन हा एक मिनीमॅग्नेट अथवा अतिलघुचुंबक असतो. शरीरामधील हे अब्जावधी लघुचुंबक एकमेकांविरोधी दिशेमध्ये असल्यामुळे आपल्या शरीराभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही. एमआरआय मशीनमध्ये एक प्रचंड शक्तिशाली चुंबक म्हणजे मॅग्नेट असतो. याची क्षमता टेस्ला ह्या मापकाद्वारे मोजतात. आपल्याकडे साधारणतः 0.3 ते 3T शक्तीची मशिन्स उपलब्ध आहेत. जेंव्हा शरीर या महाचुंबक पोकळीत जाते तेंव्हा शरीरातील सर्व प्रोटॉन चुंबक एखाद्या शिस्तबद्ध सैन्याप्रमाणे सरळरेषेमध्ये फिरतात. आत्ता जर या चुंबकाच्या क्षेत्रामध्ये आणखी एक चुंबक ९० अंशामध्ये जोडला तर शरीरातील सर्व प्रोटॉन १८० अंशामध्ये फिरतात. जेंव्हा हा दुसरा मॅग्नेट बंद होतो तेंव्हा सर्व प्रोटॉन्स पुन्हा १८० अंशामध्ये फिरतात व त्या बरोबर छोटासा विद्युत प्रवाह तयार करतात. हा प्रवाह संगणकाद्वारे मोजला जातो व त्याच्या साहाय्याने शरीराची प्रतिमा तयार होते. शरीरातील प्रत्येक पेशीतील पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असल्यामुळे आतील सर्व पेशींचे बिनचूक चित्र तयार होते. शरीरातील आजारांचे बिनचूक निदान करता येते. फंक्शनल एमआरआय मशीनमुळे पेशींच्या कार्याचा अभ्यास करता येतो. एक्सरे किंवा सिटी स्कॅन पेक्षा एमआरआय या तंत्राचा शरीरावर कोठलाही दुष्परिणाम होत नाही व मिळणारी माहिती कित्येक पटींने जास्त असते. असो, पुन्हा आपल्या कथेकडे वळू या.

शोभाताई पुढे सांगत होत्या, ‘मी डोळे घट्ट मिटून निपचित पडले होते. कानात बोळे असूनही मशीनचा कर्णकर्कश हातोडा ठोकल्याप्रमाणे आवाज येतच होता. मधूनच दूरवरच्या ग्रहावरून यावा तसा त्या टेक्निशियनच्या सूचनांचा आवाजहि येतच होता. काही वेळातच माझे सर्व अंग गरम होऊ लागले. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले कि माझी साडी गरम होत आहे. साडीच्या निऱ्या जेथे खोचल्या होत्या त्या ठिकाणी तर करवतीने कापावे तसे काहीतरी होत होते. माझ्या संपूर्ण अंगाचा दाह होत होता, लाही लाही होत होती. मी मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. शब्दही फुटेना व माझा आवाज कदाचित बाहेरपर्यंत जात नव्हता. ३० मिनिटे संपता संपत नव्हती. मी तर घामाने पूर्ण न्हाऊन निघाले होते. ते एकदाचे आवाज थांबले, आणि मी त्या मशीनच्या गुहेमधून बाहेर सरकले. दरवाजा उघडून काही व्यक्ती आत आल्या व माझी त्या संकटातून सुटका झाली. बाहेर आल्यावर तेथील टेक्निशियनला माझा अनुभव सांगितलं पण बहुतेक त्याला त्याचे काही महत्व वाटले नाही. मी त्यांना माझ्या साडीला स्पर्श करून पाहायला देखील सांगितले पण त्यांना त्यात काही विशेष वाटले नसावे असे दिसले व मी देखील सर्वांना असेच होत असेल असे समजून साहेबांसह एमआरआय युनिटमधून बाहेर पडले. घरी येऊन पहिले असता निऱ्या बांधलेल्या ठिकाणी चक्क भाजल्याप्रमाणे लाल रेषा दिसत होत्या.’ एव्हडे बोलून त्यांनी मला पोटावरील भाजल्याच्या खुणाही दाखवल्या. त्यांना चांगलेच भाजलेले दिसत होते. त्यांच्या साडीच्या किनारीमध्ये जरीच्या तारा स्पष्ट दिसत होत्या.

मी त्यांची ती परिस्तिथी पाहून आश्चर्याने भयचकित झालो. जर त्या साडीने पेट घेतला असता तर ....?
काही दिवसांपूर्वी वाचलेली अशीच एक कथा मला आठवली. अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये एक निराधार तरुण डोक्याला अपघात झाल्यामुळे दाखल झाला होता. शुद्धीवर आल्यानंतर त्याचे डोके दुखू लागले. डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला. ते ऐकून तो रुग्ण काळजीग्रस्त झाला. त्याने डॉक्टरांना एमआरआय करू नका अशी विनंती केली. आपल्या संपूर्ण शरीरावर गोंदवलेले असून जर एमआरआय केला तर शरीर भाजून निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सिनियर डॉक्टरांनी त्याला असे होण्याची शक्यता नसून एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नाईलाजास्तव त्याने संमतीपत्रावर सही दिली. एमआरआय स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली. एक शिकावू डॉक्टर हे सर्व संभाषण ऐकत होता. सर्वजण तेथून गेल्यानंतर तो त्या पेशंटपाशी गेला व त्याची चौकशी केली. ज्या माणसाने त्याचा सर्वांग tattoo केला होता त्याने एमआरआय बद्दल स्पष्ट इशारा दिला होता कि ट्याटू करण्यासाठी जो रंग वापरला आहे त्यामुळे एमआरआयकेल्यास शरीराला भाजण्याचा धोका संभवतो. सदर डॉक्टरने लायब्ररीत जाऊन इंटरनेटवर सर्च केल्यानंतर हि शंका खरी असल्याचे दिसले. गोंदवण्यासाठी वापरात असलेल्या प्रुशियन ब्लू या रंगद्रव्यामध्ये आयर्न ऑक्सिईड अर्थात लोहभस्म असल्याने एमआरआय मशीनच्या प्रभावामुळे अनेक व्यक्तींना थर्ड डिग्री बर्न्स झाल्याच्या घटनांची नोंद सापडली. एव्हडेच नव्हे तर शरीरात बसवलेले पेसमेकर्स, इम्प्लांट्स, धातूंचे भाग इत्यादीमुले धोका संभवतो. काही खेळाडूंनी घातलेल्या मायक्रोफायबर जर्किनमुळे भाजल्याच्या घटनाही नोंदलेल्या दिसत होत्या. जगामध्ये अशा घटनांची दखल घेऊन काही प्रतिबंधक उपाय म्हणून एमआरआय मशीनमध्ये जाण्यापूर्वी घेण्याची खबरदारी म्हणून रुग्णांनी उत्तर देण्याची प्रश्नमंजुषा तयार केली आहे. पण आपल्या देशामध्ये अश्या अघटित आणि अनपेक्षित घटना नेहमीच घडतच असतात. खरे तर बऱ्याच एमआरआय सेंटर्समध्ये रुग्णांना तेथील गाऊन घालण्याची सक्ती आहे. पण कार्यबाहुल्याच्या दबावामुळे म्हणा किंवा प्रतिबंधक सूचनांचे महत्व कर्मचाऱ्यांना न समजल्यामुळे म्हणा अश्या चुका पुन्हा पुन्हा होत राहतात. एमआरआयच्या प्रचंड चुंबकक्षेत्रामुळे घडलेले अनेक प्राणघातक अपघात तर आपल्या देशात अज्ञानामुळे किंवा बेदरकार वृत्तीमुळे झालेले आपण ऐकत असतो. जरीच्या साडीमुळे घडलेली हि अश्या प्रकारची घटना पहिलीच असावी ती पुन्हा होऊ नये म्हणून योग्य त्या माध्यमांपर्यंत पोहोंचवण्याचा प्रयत्न करण्याचे काम माझे काही सहकारी करणारच आहेत. सौ शोभाताईंना झालेला शारीरिक त्रास जरी फारसा जास्त नसला तरी कदाचित त्यातून काही गंभीर घटना होऊ शकली असती हि शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात ऍड. सुभाषराव हि घटना हॉस्पिटलच्या संचालकांच्या निदर्शनास आणून देतीलच पण हि माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न !A7F80411-078C-4B5A-9420-AA5796630072.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इतका त्रास होईपर्यन्त त्यांना कुणाला सांगायची किंवा मदत मागायची सोय नव्हती का? एम आर आय करताना त्या मशीनमधे गेल्यावर टेक्निशियन ला सिग्नल देता येतो ना? काही ठिकाणी टेक्निशियन शी बोलता येते, काही वेळा आपल्या हातात एक बटन दिले असते दाबायला, त्यामुळे काही प्रॉब्लेम असेल तर टेक्निशियन ला लगेच सिग्नल मिळतो. भारतात कशी पद्धत आहे माहित नाही.

MRI विषयी थोडक्यात पण अत्यंत रोचक माहिती समजली. अगदी प्रोटॉनच्या पातळीवर इलेक्ट्रोमॅग्नेटीझमचा परिणाम साधला जातो हे वाचून थक्क व्हायला झाले. धन्यवाद. बाकी MRI अत्यंत तीव्र चुंबकीय क्षेत्र असते हे जाणून होतो. मागच्याच वर्षी का काय मुंबईच्या नायर हॉस्पिटल मधली बातमी आठवली. जिथे लोखंडाचा एखादा कणसुद्धा अंगावर चालत नाही तिथे लोखंडाचे अख्खे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रुग्णाच्या एका तरुण नातेवाईकाला आत सोडण्याच्या हलगर्जीपणा मूर्ख वार्डबोयने केला होता. आत गेल्यावर हा तरुण डोळ्याचे पाते लवायच्या आत मशीनमध्ये अत्यंत वेगाने खेचला गेला. आतल्या आत सिलिंडर फुटले. आणि पुढे त्या तरुणासमवेत जे काही झाले त्याचे जे वर्णन काही माध्यमांतून वाचले ते इथे लिहिण्यासारखे नाही. इथे जरीची साडी सुद्धा कशी धोकादायक ठरते ते वाचून शहारे आले. अर्थात हे सगळे घाबरवण्यासाठी लिहिलेले नाही. पण याबाबत आपल्याला कोणत्या पातळीवर सावधगिरी बाळगली पाहिजे हे कळणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. या लेखामुळे ती जाणीव झाली. खूप खूप धन्यवाद.

खरच डेंजर आहे.
मागच्या वर्षी मुंबईत घडलेली घटना आठवली Sad

बऱ्याच दिवसांनी लिहिलंय.वेलकम बॅक. नायर मधली घटना आठवलीच.
रोचक लेख.
या मशीन मध्ये मेटल च्या दात कॅप बसवलेल्या रुग्णांचं काय?ते काही काढून ठेवता येणार नाहीत.

डेंजर आहे हे! टॅटूचं माहित न्हवतं.

इकडे टेक्निशिअन दर काही वेळाने सगळं ठीक आहे का? असं विचारत असतो आणि अनईझी वाटलं तर काय करायचं त्याचा काहीतरी संकेत ठरवून दिलेला असतो. कपडे ही बदलायला सांगतात.

एमाराय काढताना, एक बेल बटण हातात देतात फक्त बाहेरच्यस ठिकाणी(अमेरीकेत वगौरे), अजुन भारतात सर्वच ठिकाणी नाही देत. आजकाल जो तो अशी लॅब उघडून बसतो आणि काहीच सांगत नाहि नवशिके टेकनिशियन.

बरेच दिवसांनी आलात डॉक.
लेख माहितीपूर्ण आहेच आणि आपण किती गोष्टींबद्दल अनभिज्ञ असतो हे पुन्हा नव्याने कळले. त्या काकूंना खरंच काही सिरिअस झालं असतं तर. एक बटण किंवा अनइझी वाटले तर काहीतरी इशारा देण्यासाठी हवेच होते.
टॅटू माझ्याही अंगावर आहे ही माहिती लक्षात ठेवेन. Uhoh

अरे बापरे ही तर खरंच अंग अंग जाळी.
अनु मेटल कॅप असेल तर काही होतनाही. स्वानुभव. टेक्निशियन निदान अमेरिकेत तरी हातात एक पॅनिक झाल्यावर दाबायला बटण देतो शिवाय आपले वायटल्स पण ते लाइव्ह चेक करून मध्येच थांबवायच का ते ठरवतात. माझी पल्स कमी का जास्ती झाली होती म्हणून थांबलो होतो.
टॅटुचं नवीन कळलं.

बापरे भयानक आहे हे!
MRI बद्दलची माहिती खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे तुम्ही. ती वाचून आधी ' बापरे' असंच वाटलं Happy सगळे प्रोटॉन्स एका दिशेने अलाइन होतात त्याचा शरीरावर काही भलताच परिणाम होत नाही का? असा प्रश्न मनात आला. होत नाही असं दिसतंय.
हल्ली सर्रास MRI करायला सांगतात. काळजी घ्यायला हवी.

बापरेन्भयंकर अनुभव!
टॅटूचे माहित नव्हते.

या मशीन मध्ये मेटल च्या दात कॅप बसवलेल्या रुग्णांचं काय?ते काही काढून ठेवता येणार नाहीत.

बाप रे !
जरतारीची साडी नेसून एमआरआय करायचा शौक का ?

हो. असे असू शकते. काठाला मेटल डिटेक्टर फिरला नसेल.
तरी पण नि-यांमधे किंवा पदरामधे उघड व्हायला हवे होते.

Oh. MRI ला साधं scanner समजण्याची चूक अनभिज्ञ पेशंट कडून सहज घडू शकते
टेक्नीशिअन्स ना proper ट्रेनिंग देतात का पेशंटला सर्व गोष्टींची पूर्व कल्पना देण्याकरता

मला चंदनाची चोळी बद्दल हा प्रश्न अनेक वर्षे आहे
आधी वाटायचं लाकडाचं कोर्सेट सारखं काही असेल
आता अंदाज आहे की कापडावर चंदन पावडर टाकून त्याला सुगंध देऊन त्याची चोळी शिवत असतील.

बापरे! भयंकर अनुभव.
स्कॅन करण्यापुर्वी हॉस्पिटलचे कपडे असतात तसे घालायला देउ शकतात. हॉस्पिटलाइज झालेल्या पेशंट्सना देतात तसे.

मला चंदनाची चोळी बद्दल हा प्रश्न अनेक वर्षे आहे>>>>चंदन उगाळून त्याचा लेप चोळीच्या आकारात लावणे ही एक कवीकल्पना आहे.

महितीपूर्ण लेख !
मेटल च्या दात कॅप बसवलेल्या रुग्णांचं काय?ते काही काढून ठेवता येणार नाहीत >> +१

बापरे, खरंच भयानक अनुभव पण माहितीपूर्ण लेख. आपल्यापैकी बऱ्याच जणांना MRI बद्दल माहिती नसतेच काही, हा लेख वाचून थोडी कल्पना आली.
गेल्यावर्षीची नायरमधली दुर्दैवी घटना आठवली.
टॅटू बद्दल माहिती नव्हती, माझ्याही अंगावर आहेत खरे टॅटू, पण त्यात कोणताही रंग नाही, तरीही खबरदारी घेतलेली बरी..

वेलकम बॅक डॉक्टर.

एमआरआय या तंत्राचा शरीरावर कोठलाही दुष्परिणाम होत नाही >>>> एखाद्या पेशंटला वारंवार एमआरआय करायला लागला, तरीही???

मला चंदनाची चोळी बद्दल हा प्रश्न अनेक वर्षे आहे>>>>चंदन उगाळून त्याचा लेप चोळीच्या आकारात लावणे ही एक कवीकल्पना आहे.

सॉरी डॉक्टर, महत्वाच्या विषयात विषयांतर झाले.

हे तर कोर्सेट च्या पेक्षा पण कायच्याकाय हायफाय आहे
(विषयांतर संपवते.)
एम आर आय आणि सिटी स्कॅन मध्ये फरक आहे का

Sad अवघडेय...

>चंदन उगाळून त्याचा लेप चोळीच्या आकारात लावणे ही एक कवीकल्पना आहे. > ठसका लागला कि मला Proud

चंदन उगाळून त्याचा लेप चोळीच्या आकारात लावणे ही एक कवीकल्पना आहे>> रखुमाईची अशी पूजा केली जाते.

चंदनाची चोळी, अंग अंग जाळी ...>>
बहुतेक ज्ञानेश्वरांची कल्पना आहे ही.

Pages