चार भिंतीतली छोटीशी कथा..!

Submitted by Charudutt Ramti... on 31 May, 2019 - 06:30

आता मला नक्की तारीख आठवत नाही. मला स्वतःला तारखा ‘न’ आठवणे ह्यात मोठे नवल नाही. तारखाच काय महिना आठवला तरी खूप. पण तो ‘जुलै’ महिना, होता हे नक्की आठवतंय. कारण तेंव्हा पाऊस होता. खूप नाही पण बऱ्यापैकी. रीप रीप असा. किंवा बातमीदारांच्या भाषेत संततधार आणि मुसळधार ह्या दोघांच्या मधोमध फिट्ट बसेल असा.

घरमालकांनी ‘फ्लॅट सोडा’ असा तगादा लावला. हा गुलमोहोर कॉलनीतला फ्लॅट भाड्यानं घेऊन फक्त दीडेक वर्षंच झाली होती. दीड वर्षांपूर्वी चैत्री पाडव्याचा मुहूर्त गाठून इथं शिफ्ट केलं होतं. आधीच्या घरातून नवीन घरात ती कपाटं , ती टेबलं वगैरे अवजड सामान ह्या खोलीतून त्या खोलीत हलवताना, आयुष्यभर फक्त ऑफिसातल्या फायली आणि पेपर्स संथ गतीनं पुढं ढकलायची सवय असलेल्या ह्या पृष्ठवंशीय प्राण्याचा पाठीचा मणका मात्र सरकायची वेळ आली होती. पॅकर्स आणि मूव्हर्स वाले धडाधड टेम्पोतलं सामान वर फ्लॅटमध्ये आणून टाकतात. पण नंतर ते सामान जागच्या जागी लावताना त्या पॅकर्स आणि मूव्हर्स वाल्याचा खूप राग ही येतो आणि किंचित दया ही.

राग एवढ्यासाठी - की कोटेशन देताना "सामान खोलीत व्यवस्थित लावून देतो" असं म्हणून व्यवस्थित पैसे लावतात सढळ हातानं, पण एकदा का जुन्या घरातून भरलेला टेम्पो नव्या घरात रिकामा केला की मग मिनिट भर ही थांबत नाहीत ही त्यांची माणसं. पळाली. आणि दया मात्र एवढ्यासाठी की, दर तीन वर्षांतून एकदाच येतो हा प्रसंग तरीही ही असली उसाबर करताना आपली एवढी चिडचिड होते आणि मणक्याला बाक आल्यासारखा वाटतो. ह्या पॅकर्स आणि मूव्हर्स वाल्यांना तर हे रोजचेच अवजड सामानाच्या हलवाहलवीच्या शिक्षेचे भोग! म्हणून दया सुद्धा. असा विचार करत मग त्यादिवशी संध्याकाळी उरलेले पैसे दिले त्या कष्टकऱ्यांना आणि मग थोडी उसंत शोधत ‘मी’ आणि माझी संसारी बायको 'सीमा' दोघेही चांगलेच दमून एका सुतळीनं तोंड बांधलेल्या परंतु आत 'उश्या' , 'पुस्तकं' , 'बरण्या' , ‘भांडीकुंडी’ असली सगळी एकमेकांचा एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या संमिश्र घरगुती सामग्री भरलेल्या अश्या खाकी गोणपाटाच्या गोणीवर दमून धापा टाकत बसलो. त्यावेळी जर कुणी मला खरोख्खर अर्धाकप जरी चहा दिला असता तर मी त्याच्या घरात आयुष्यभर पाणी भरलं असतं.

पण चहा काय साधं पाणी सुद्धा मिळणं कठीण. कारण नवीन घरी शेजार होण्यासाठी पंधरा तीन आठवडे सहज लागतात.

ते काहीही असलं तरी पण हा 'गुलमोहोर' कॉलनीतला फ्लॅट मात्र खूप छान होता. वन 'बीएचके'च होता, पण ऐसपैस होता अगदी. फ्लॅटला ‘हवा’ , ‘उजेड’ आणि ‘पाणी’ - ह्या तीन गोष्टी मिळाल्या की फ्लॅट च्या भिंतीसुद्धा, ते एशियन की नेरोलॅक च्या जाहिरात वाले 'दिवारे बोल उठेंगी' असं म्हणतात तसं, एके दिवशी रविवारी सकाळी चहा चे झुरके घेता घेता महाराष्ट्र टाइम्स वाचत असताना " काय मग विनायक मोकाशी ? आज काय ठरवलाय सुट्टीचा प्रोग्राम ? " असं म्हणत आपल्याशी अचानक पणे ह्या निर्जीव भिंती सजीव होऊन बोलू लागतील की काय, असं वाटावं इतका सुंदर फ्लॅट होता तो.

मुळात मला बरेचदा असं वाटतं की तुमचा घरचा पत्ताच तुमचे त्या वास्तूतील दिवस कसे जाणार हे सुचवून जातो.

" होsss, होss, गुलमोsहोssर कॉलनी, बरोब्बर, अठरा नंबरची बस पकडा आणि पुष्कर टॉकीज चा स्टॉप आला की उतरा. तिथं कुणाsलाही विचाराss गुलमोssहोर कॉलनी! सांगतील कुणीही!! "

असं म्हणत घरी प्रथमच येणाऱ्या स्नेह्यांना 'गुलमोहोर कॉलनी' वगैरे पत्ता सांगताना उगाचंच आपल्या आयुष्यात खरोखरंच “उंच उंच हिरव्यागार फांद्यांवर लाल चुटुक गुलमोहोर बहरल्याचा” भास होतो.

नाहीतर …

“मळीच्या नाल्याच्या बाजूनं चालत पुढे या पाच मिनिटं आणि तिथे ‘गारबुल्यांची वस्ती’ कुठं आहे विचारा , तिथून पुढे दोनशे मीटर या आणि पुढे एक लोणारी कोळशाची वखार लागेल तिथे वळा, उजव्या बाजूला आधी एक कडुलिंबाचं आणि नंतर एरंडाचं मोठं झाड लागेल बघा! त्याच्या समोरच आहे... नाही तर एक काम करा ‘थांबा’ तिथेच! मीच येतो बाईक घेऊन तुम्हाला घ्यायला , चटकन सापडण्यासारखं नाही पहिल्यांदा येताना ! "

असे पत्ता सांगताना होणारी 'गले में खिचखिचावस्था' एकीकडॆ कुठे ? आणि ' गुलमोहोर कॉलनी विचारा! सांगेल कुणीही ' असं दुसरीकडे म्हणताना खर्ज आवाजात सहज येणारा फुकटचा 'रुबाब' कुठे ? पण हा रुबाब माझ्यासाठी फुकटच सोडा स्वस्त आणि रास्त भावातला सुद्धा नव्हता. कारण आधीच्या घरभाड्याच्या मी मानाने चांगले दुप्पट पैसे मोजून हे घर भाड्यानं घेतलं होतं. आणि माझ्या पगाराच्या आणि एचारेच्या मानाने सुद्धा बराच महाग होता हा भाड्याचा फ्लॅट. लहान पणी फक्त श्रीखंडाची गोळी खायची सवय असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या तिसरीतल्या निरागस पोराला उद्या जर ब्रिगेड रोड वरील चर्चला लागून असलेल्या 'सेंट व्हिन्सेंट कॉन्व्हेंट' मधली मुलं खातात, ते 'फरेरो रोशर' कंपनीचं स्विस चॉकलेट खायला मिळालं तर कसं वाटेल? तसं मला झालं, ह्या भाड्याच्या नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट झाल्यावर.

त्या नवीन फ्लॅट मधले पहिलं वर्ष एकदम मस्त गेलं. सीमाचं आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. नवी नवलाई म्हणतात ती तसली काहीतरी होती आयुष्यात आमच्या दोघांच्या. मी सकाळी लवकर ऑफिसला जायचो. यायचोही लवकर दिवस मावळायच्या आत. ती ही जवळंच असलेल्या एका सी.ए. कडे अकाउंट्स असिस्टंट म्हणून जायची. हे सी.ए. लोक खूप कामाला जुंपतात असं ऐकून होतो. पण सीमा बऱ्याच वेळेला फेसबुक वर ऑनलाइनच असायची. जेंव्हा फेसबुक वर ऑनलाईन नसायची त्यावेळी व्हॉट्सअप वर ऑनलाईन दिसायची. उरलेल्या वेळात सी.ए. ऑफिसात असतील तर कामं केल्यासारखं भासवायची. माझी सुद्धा अवस्था छान होती. ऑफिसात कामं आटोपशीर होती. बॉस बऱ्याच वेळेला टूरवरच असायचा. त्यामुळं माझेही बरे चालले.

असलं की सगळं चांगलं असतं. पण एकदा का बिनसलं की मात्र बिनसलं.

गुलमोहोर कॉलनीतील ह्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये ११ महिन्यांचा करार एक्सटेन्ड केला आणि अजून अकरा महिने वाढवून घेतला. मालक वाईट नव्हता. पण चांगलाही नव्हता. असेल कदाचित चांगला, अगदी वाईट नसला तरीही, पण आमच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेऊन असायचा. दोन मजले सोडून आमच्याच बिल्डिंग मध्ये पाचव्या मजल्यावर त्याचा मस्त पैकी ऐसपैस थ्री बीएचके होता. ( खरं म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये त्याचा नव्हे तर त्याच्याच बिल्डिंग मध्ये आमचा फ्लॅट होता , पण असुदे ! ) मालक स्टेट गव्हर्मेंट मध्ये व्हेटर्नरी ऑफिसर होता. चांगला क्लास वन ऑफिसर. वर आणि पाळीव कुत्र्यांच्यासाठी एक प्रायव्हेट क्लिनिक चालवायचा , बेकायदा असावं. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस करायला मुभा नसते असं ऐकलं होतं. पण सरकारी नोकरीत असूनसुद्धा हा ‘व्हेट’ वर, प्राय’व्हेट’ प्रॅक्टिसही करी. एकंदर दोन्हीकडेही खूप पैसे कमवत असावा. वर आणि आमच्या कडून महिन्याच्या महिन्याला चांगले मोजून भाड्याचे पैसे पाच तारखेला घायचाच. पाचही बोटं तुपात. मी , एन. ई. एफ. टी. करायला एकदिवस जरी उशीर केला तरी दुसरे दिवशी लगेच सकाळी बरोब्बर पावणे सातला एसेमेस किंवा व्हॉट्सअप यायचा, 'Mokashi, pl. share NEFT details'. जाम हिशेबी होता. आम्ही पहिल्या अकरा महिन्याचा करार एक्सटेन्ड करायला म्हणून गेलो तेंव्हा “भाडे दहा टक्के वाढवा तरच एक्सटेन्ड करतो” असा हट्ट धरून बसला. मला सीमानं पाच टक्क्यांपेक्षा जास्त नको ऍग्री व्हायला, आधीच आपण जास्त भाडं भरतोय असं जाण्यापूर्वी बजावलं होतं.

'जनावरांच्या डॉक्टरांच्यात माणुसकीचा असलेला अभाव' असा शोधनिबंध आधी कुणी नसेल लिहिला तर विषय चांगला आहे! - घरमालकाच्या सहा इंच खोल जाणाऱ्या सोफ्यात अंग चोरून बसलो होतो, घरमालक बेडरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहत, तेंव्हा मी सीमाला म्हणालो. तीनं माझ्या डाव्यापायाच्या करंगळीवर तिची टाच मारत मला " गंभीर प्रसंगी तुझे फालतू विनोद नकोयत " हे पूर्ण वाक्य फक्त तिचे दोन्ही डोळे वटारून मूकपणे व्यक्त केलं.

शेवटी बऱ्याच वेळ घासाघीस करून ‘दहा ऐवजी आठ टक्के’ भाडेवाढीवर आमची बोलणी निर्ययास्पद येऊन ठेपली. पण दुसऱ्या वर्षीच्या कराराचे अकरा पैकी पाचच महिने पूर्ण झाले आणि जनावरांचं हे डॉक्टर का पिसाळलं कुणास ठाऊक , एक महिन्याची नोटीस देऊन...

"पुढील महिनाखेर पर्यंत फ्लॅट रिकामा करा"- असा त्यानं आम्हाला एसेमेस टाकला.

सीमा आणि मी आम्ही अत्यंत विनयपूर्वक ( माझं नावंच विनायक ) " का ओ सर ? " अशी विचारणा केल्यावर ज. डॉक्टरांनी…

" जावयाची बदली झाली असून तो नागपूर वरून आता इथे शिफ्ट होणार आहे तेंव्हा मुलीला आणि जावयाला राहण्यासाठी हा फ्लॅट हवा आहे " , असं पूर्वी प्रदीप भिडे आणि अनंत भावे ज्या तिऱ्हाईत पणे दूरदर्शनवर मोजक्या आणि त्रोटक शब्दात अत्यंत निरिच्छ वृत्तीन मराठी बातम्या द्यायचे, तितक्याच त्रोटक पणे आणि निरिच्छ वृत्तीनं आमच्या ह्या जनावराच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं.

आणि ह्या बरोबरंच माझे आणि सीमाचे गुलमोहोर कॉलनीतील गुलबक्षी दिवस संपुष्टात आले. सीमा त्यादिवशी माझ्यावर जाम म्हणजे जाम वैतागली. पार अगदी तीनं पिढ्यांचा उद्धार झाला आमच्या मोकाशी घराण्याचा तिच्याकडून. आणि रात्री मात्र बिचारी अंथरुणात ढसाढसा डोकं गुडघ्यात खुपसून रडली. मी तिच्या डोक्यावरून सांत्वनासाठी हात फिरवला तर रागानं हात झिडकारून दिला.

चूक तिची नव्हती. तीनं, एखाद्या चिमणीनं काडी काडी जमवून आणि कुठुनश्या बागेत कापसाचा किंवा उडणाऱ्या म्हातारीचा पुंजका आणून गोंडस घरटं बनवावं, तसंच काडी काडी गोळाकरून दीडच वर्षांपूर्वी हे घर मांडलं होतं. कुठल्याश्या सोमवारच्या किंवा शुक्रवारच्या बाजारात जाऊन स्वस्त मिळतात म्हणून मुळातच स्वस्त असलेल्या वस्तू आणखी घासाघीस करून गृहसजावटीच्या कसल्या कसल्या गोष्टी घेऊन यायची. त्या मग मन लावून टेबलावर मांडून ठेवायची किंवा, भिंतीवर अथवा फ्रीझ वर चिटकवायची. स्वभावानं बिचारी मुळातंच काटकसरी. किचन मध्ये एक एक वस्तू गोळाकरून त्या जागच्या जागी लावण्यासाठी खलबत्यातल्या बत्त्यानं माझ्याकडून छोटे छोटे खिळे मारून घ्यायची. खिळा भिंतीत सरळ न जाता वाकला की माझ्यावर 'एक काम धड नाही जमत’ असं म्हणत चिडायची आणि स्वतः तो खिळा भिंतीत हळू हळू सरळ नीटस पणे ठोकत मग त्यावर स्टील ची रवी किंवा चहाचं गाळणं उलटं टांगायची आणि त्याकडे वस्तूकडे उगाचंच मिनिट दीड मिनिट पाहत उभी राहायची कौतुकानं आणि पर्युत्सुक पणे.

आता पुढच्या महिन्यात परत तिला तिचा सगळा संसार आठ दहा पोत्यात भरून दुसरीकडे लावायचा होता. तोही तात्पुरता. कारण नवीन घर भाड्यानं घेताना त्या फ्लॅट चा मालक `कोण एखादा पाळीव प्राण्याचा डॉक्टर निघतोय की आणि कोण रानटी जनावरांचा शिकारी निघतोय आणि परत वर्ष दीड वर्षात कुठे नवीन ठिकाणी बिऱ्हाड हलवायला लावतोय कुणासठाऊक.
तिला खूप विरस झाल्या सारखं वाटायचं हे सगळं. आमचे हे गुलमोहोर कॉलनीतील आनंदाचे क्षण एकदम अचानक पणे कुठेतरी हवेतच विरून जायची वेळ आली.

मी लॅपटॉप वर '99 एकर्स' किंवा 'नो ब्रोकर्स' डॉट कॉम किंवा तत्सम कोणत्यातरी फालतू साईट्स वर फ्लॅट भाड्यानं शोधात होतो. रात्रीचे साडेदहा पावणे अकरा झाले असतील.

“ विना, तुला नाही का रे वाटंत? आपलं स्वतःचं घर असावं म्हणून? छोटंसंच असलं तरी चालेल , लांब असलं तरीसुद्धा चालेल. पण घर आपलं पाहिजे. स्वतःच. आपण मन लावून एक एक वस्तू गोळा करून मांडलेला संसार 'आवरा आता इथून, पुरे झालं! ' असं म्हणतं कुणी चटकन बोलतं तेंव्हा किती जिव्हारी लागतं रे ! एक दिवस सकाळी उठून आपण आपली सगळी स्वप्नं एका पोत्यात गुंडाळून टेम्पोत भरायची का रे दर दीड दोन वर्षानंतर अशी , प्रत्येकवेळी ? " - सीमा स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली माझ्याशी. पण एकेक शब्द स्पष्ट आणि सुसंगतपणे उच्चारत होती, पण तरीही आवाजात कुठेतरी तिचा खोलसर असा कातरपणा दडलेला होताच.

तिला काय उत्तर द्यायचं तेच मला समजेना. मी एकदोनदा मागे तिला हिशोब करून समजावून सांगितला होता.

“आपल्याकडे अजूनही फ्लॅट च्या डाऊन पेमेंट साठी बेसिक अमाऊंटचे पैसेसुद्धा जमा झालेले नाहीत. आणि सगळे पैसे लोन काढून उभे केले तर ईएमआय गेल्यावर उरलेल्या पगारातून महिनाभर काय पंधरा दिवस ही घर चालवणं शक्य नाही” - असं मी तिला एकदोनदा समजावून सांगितलं होतं. आजच्या रात्रीसुद्धा मी तिला परत तोच हिशेब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पण आज रात्री झालेल्या बऱ्याच वेळेच्या चर्चे नंतर शेवटी तिनं काही तडजोडी कराव्या लागतील त्या करू पण " घर आपलं स्वतःचं हवं ! " असं मला निक्षून सांगितलं. आणि ती डोक्यावर चादर घेऊन झोपून गेली. ती झोपली, पण तिची झोप ही रोजच्या सारखी शांत आणि समाधानी नव्हती. तिचा श्वास फुलाला होता झोपेत धाप लागल्यासारखी ती श्वास घेत होती. अती विचार आणि मानसिक त्रासामुळं माणूस दमतो आणि झोपतो तशी ती झोपली त्या रात्री.

मी मात्र ती आक्खी रात्र जागून काढली. उभी आडवी तिरकी कशीही एक्सेल शीट केली तरी हिशेब लागतच नव्हता.

तिनं निर्णय घेतलाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटी, मीही घेतला. ‘बस’ झाली ही विंचवाच्या पाठीवरची गोष्ट. तिनं सकाळी तिच्या बाबांना फोन लावला. मी हि एकदोन मित्राबित्रांना फोन केले. पैसे बरेच शॉर्ट होते. लोन अमाऊंट जवळ जवळ दुपटीपर्यंत वाढवली. हिच्या वडिलांनी “थोडी फार मदत करू शकतो मात्र पैसे किती आणि कधी लागतात ते आधी सांगा” असं बजावलं. पण ती ही अमाऊंट फार मोठी होती, तिच्या घरच्यांच्या परिस्थितीच्या मानाने.

एकदा का निर्णय झाल्यावर मग साईट शोधणं सुरु केलं. जी साईट आवडायची ती परवडत नसे, आणि परवडणारी आवडत नसे. शेवटी एक स्कीम बरी वाटली. अक्षय त्रितीयेला ऍडव्हान्स चे पैसे दिले बिल्डर ला. फ्लॅट ताब्यात येण्यासाठी अजून चांगले आठदहा महिने लागणार होते. महिन्याची नोटीस संपत आली गुलमोहोर मधली. त्यामुळं तात्पुरतं दुसरं भाड्याचं घर शोधणं भाग होतं.
नाही म्हणणार माहिती होतं पण म्हंटल जनावरांच्या डॉक्टरांना एकदा विचारून तर पाहू “ आठ दहा महिने एक्स्टेंशन देतायत का ? ” असं म्हणून आम्ही दोघे त्यांना भेटायला गेलो.
पण आम्ही स्वतःचा फ्लॅट बुक केलाय असं सांगितल्यावर जनावरांच्या डॉक्टरांना एकदम 'पान्हा' फुटला. ते एक्स्टेंशन साठी लगेचच तयार झाले. ते आमच्या पुढ्यात बसून वाटीत घेऊन लक्षमीनारायण सारखा कसला तरी चिवडा खात होता, चिवड्यातले काजू सुद्धा जनावरं ज्या ताकदीनं रवंथ केल्यासारखं खातात, तसा ते कडबा झाल्यासारखे काजू खात होते. दहा महिन्यांचं एक्स्टेंशन दिल्याबद्दल त्या पशुधन्वंतरीला आम्ही कोपरा पासून नमस्कार करत धन्यवाद दिले.

इकडे सीमाचे आता नवीन घरात काय काय सामान कसं कसं लावायचं ह्याचे मनोदय सुरु झाले. पूर्वी आम्ही सुट्टीच्या दिवशी रविवारी दुपारी चार साडेचार नंतर संध्याकाळी बागेबिगेत टाइम पास म्हणून भेळ वगैरे खायला जायचो. किंवा रविवारी संद्याकाळी हमखास जेवायला बाहेर. आता रविवारच्या सुट्टीचा एकंच छंद लागला. आम्ही बुक केलेल्या बांधकामाच्या साईटवर जाणे आणि आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या अंडर कंस्ट्रक्शन टू बीएचके मध्ये ( खरंतर वन अँड हाफ बीएचकेच ) जाऊन तासंतास...

' विना इथे टीव्ही लावू' ,

'इथे फ्रिज चा एक्सट्रा पॉईंट करायला सांगू आपण विना '

'इथे एक ग्रॅनाईट चा टॉप बसवायला सांगूयात का रे विना आपण ? '

अश्या असंख्य मनोकामनांची यादी तयार करायची आणि संध्याकाळी साईट वरून घरी परत येता येता भेळ किंवा पाणीपुरी खायची. किंवा 'आता हॉटेलिंग जास्त नको , तेव्हडेच जरा पैसे वाचवूया , मी घरी कुकर लावते वरण भात खाऊ मस्त पैकी गरम गरम " असं म्हणत परत घरी यायचं.

पक्का हिशेब करूनही बिल्डर च्या एका हप्त्या वेळी गडबड झाली. एका मित्रानं पन्नास हजार देतो असं कबूल केलं होतं पण, ऐन वेळी त्याचंच काहीतरी फायनान्शियल प्लानिंग चुकलं आणि तो पैसे देऊ शकला नाही. मित्र शेयर मार्केट मध्ये एक्स्पर्ट होता. त्यामुळं त्याची गणितं चुकायला वेळ लागला नाही. पण दुर्दैवानं त्याच्या चुकीच्या गणितामुळं माझ्या काळजाचा ठोका चुकायची वेळ आली. मग सीमानं ती जॉब करायची त्या सीएंच्या कडं प्रॉब्लम सांगितला. त्यांनी सहामहिन्यांचा पगार तिला ऍडव्हान्स म्हणून दिला.

अक्षयत्रितियेला टेन परसेन्ट बुकिंगचा चेक दिला तेंव्हा फक्त स्लॅब्स कॉलम्स आणि बीम्स होते. पांढऱ्या राखाडी रंगांचे. ठोकळे स्वरूप. जिन्यांना धरायला कठडे नव्हते. तिसऱ्या मजल्यावर जायचं म्हणजे जीव मुठीत धरून जावं लागे. जिन्याच्या एका बाजूला भिंत तर दुसऱ्या बाजूला स्लॅब च्या गंज पकडलेल्या सळ्या बाहेर आलेल्या असायच्या. ठीकठिकाणी सिमेंट चे दीड दोन फूट उंचिचे बुटकेसे डोंगर आणि त्या डोंगराच्या मधोमध खळं केलेलं असायचं. त्या खळ्यामधे पाणी टाकलेलं असायचं. त्या पाण्यात खळ्याच्या आतलं सिमेंट हळूहळू विरघळलेलं दिसत असायचं. खळ्याच्या आजूबाजूला फावडं, घमेलं, एखादी चांगली सहा साडेसहा फूट लांबीची सिमेंट 'सप्पय' करताना वापरण्याची एक चार इंच रुंदीची लोखंडी पट्टी पडलेली असायची. त्या फावड्यावर किंवा घमेल्यावर सिमेंटची पुट्टं चढलेली असायची.

त्या खळ्यांच्या आजूबाजूला साईटचे कामगार काहीतरी ठोकाठोकी करत बसलेले असल्याचे. किंवा नाहीतर मग वाळू संपली , सिमेंट संपलं असं निमित्त शोधून घडी दो घडी विश्रांतीच्या शोधात बिडी काडी ओढत बसायचे. किंवा सिमेंट माखलेल्या हातानंच तंबाखूचा बार मळायचे. एकदा तर मी एकाला, तंबाखू आणि चुना ठेवतात त्या डबीतला चुना संपला म्हणून चक्क एका अर्धवट बांधलेल्या भिंतीपलीकडे पडलेल्या चुन्याच्या गोणीतला चुना नखांन घेऊन त्याचा तंबाखूचा बार बनवताना मळताना पाहिलं होतं. सीमाला ते दृश्य दाखवल्यावर तर तिला जाम आश्चर्य वाटलं
" काय हे ? किती डेंजरस आहे हे ? असं त्या गोणीतला चुना तोंडात टाकणं ? " - ती चटकन बोलून गेली.

मी तिला म्हंटल…

" हो नं गं , हे कामगार असे तंबाखू खाता खाता एक दिवस साईट वरचा अक्खा चुना संपवतील आणि आपल्या बांधकामासाठी चुना शॉर्टेज मध्ये यायचा, आणि आपली पझेशनची डेट हुकायची " - आणि माझ्या ह्या फालतू विनोदावर तीनं त्या दिवशी खूप जोरात हसून मनापासून दाद दिली. ती दाद खरं तर माझ्या विनोदाला नसून तिच्या हळू हळू बनत असलेल्या स्वतःच्या घराला होती. घर जस जसं बनत गेलं तसं तशी तिच्या चेहऱ्यावरचा रक्तिमा सुध्दा वाढत गेला.

अश्या असंख्य सळ्या , अगणित तारा, लाकडी बेढब फळकुटी आणि त्या फळकुटांवर मारलेल्या एका बाजून आत घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर आलेल्या वेड्यावाकड्या गंजलेल्या खिळ्यांना चुकवत चुकवत मी आणि सीमा आम्ही दोघे जिन्यावरून कसे बसे जीव वाचवत तिसऱ्या मजल्यावर जात असू. मी जिन्यावर पुढे आणि सीमा माझा तळ हात किंवा मनगट घट्ट धरून तिची पांढरी सलवार त्या सिमेंट मिश्रित पाण्यात भिजू नये म्हणून किंचित घोट्याच्या वर धरून एक एक पायरी माझ्या आधारे चढत चढत. असे आम्ही त्या आमच्या अर्धवट बांधलेल्या फ्लॅट ला मोकाशींची "तिसरी मंजिल" असं नांव दिलं होतं.

त्या दिवशीची तारीख मला आठवत नाही. पण जुलै महिना नक्की आठवतोय. मी आणि सीमा दोघेही रेनकोट स्कुटरच्या डिक्कीत लॉक करून साईटवर फ्लॅट पाहण्यासाठी गेलो. बाहेर पाऊस पडत होता. साईटवर सगळीकडं चांगलीच दल दल होती. पाण्यामुळं डासही झाले होते. पाऊस माझा शर्ट आणि तिचा टॉप भिजवायच्या नादात असतानाच आम्ही एका अर्धवट स्लॅबच्या खाली आडोसा घेतला. काळसर ढगाळ आभाळामुळं दुपार तीन साडेतीनची वेळ असूनही अंधारून आलं होतं.

आता त्या गंजलेल्या सळ्यांची आणि खिळे बाहेर आलेल्या फळ्यांची आणि त्यांना चुकवण्याची दोघांच्या पायांना सवय झाल्यामुळं आम्ही पटापट पहिला दुसरा आणि तिसरा मजला चढून वर आमच्या 'तिसरी मंजीलपे' गेलो. एव्हाना नेहमी दिसणारे कामगारांचे चेहरे आम्हाला ओळखू येऊ लागले. त्यातले एकदोन आम्ही आलो की आमच्याकडे पाहून हसायचे देखील गालातल्या गालात. आम्हाला 'दो दिवाने शहर में , आबुदाना धुंडते' गाण्याची आठवण व्हायची. ( का? ते माहिती नाही पण, पूर्वी मला लहानपणी 'आबुदाना' हा शब्द 'साबुदाना' शब्दाचं स्पेलिंग मिस्टेक असावा असं वाटायचं. )

आमच्या फ्लोअर वर गेलो तेंव्हा सिमाला आणि मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. काम खूपच वर आलं होतं.

" अरे त्या 'पांडे' ला फोन कर ना. तो बोलला होता गेल्या वेळी की पुढच्या वेळी साईट वर आलात की मला फोन करा , फ्लॅट मध्ये एक्सट्रा कामं काय काय करायची आहेत ते आत्ताच सांगावं लागेल, एकदा सनला , गिलावा किंवा वॉल ला पीओपी केलं की एक्सट्रा कामं सांगता नाही येणार " - सीमानं मला आठवण करून दिली.

मी " अरे! हो की ... विसरलोच ! " असं म्हणत पॅन्ट च्या खिश्यातुन मोबाईल काढत पांडेला फोन केला. पांडे खालीच साईट ऑफिस मध्ये होता. पांडे हा साईट सुपरवाझर.
" दो मिनट में आता हू साब , फ्लॅट नंबर क्या " तिनसो दो " ना ? "

" हां हां , दफा तीनसो दो , भूल गये क्या पांडे जी ? " - असं म्हणत मी फोन ठेवला.

दोनच मिनिटात जिने भराभर चढल्यामुळं दम लागलेला पांडे धापा टाकत आला. " चलो मॅडम " सीमा ला ग्रीटिंग दिल्यासारखं एक सुखद हास्य करत तो बोलला. त्यातल्या त्यात दिसायला बऱ्या असणाऱ्या स्त्रीयांना लोकं फार भाव देतात कारण नसताना. माझी बायको असली तरी माझं 'जळणं' मला कंट्रोल करता आलं नाही.

" क्या पांडे जी आप भी बडे भुल्लकड़ निकले हा ? भूल गये आज एक्सट्रा कामोकी लिस्ट बनानी हैं ? " माझ्या बायकोला ग्रीट केलं आणि मला नाही केलं ह्याचा राग आल्यामुळं मी उगाचंच पांडेला टोकलं. सीमानं “मी आठवण करून दिलीय , तुझ्या तरी कुठं लक्षात होतं ‘मोकाश्या?’ ” अशी भावना व्यक्त करणारी तीक्ष्ण नजर माझ्याकडे फेकली.

आम्ही तिघेही मग आमच्या फ्लॅट मध्ये गेलो. चौकटी बसल्या होत्या. दारं अजून बसायची होती. fly-ash च्या सुबक आयताकृती विटांच्या भिंती बनल्या होत्या. त्यामुळं फ्लॅट ला रूप चढू लागलं होतं. किचन चा ओटा बसला होता. किचन चा ओटा बसला हे पाहून सीमाच्या ओठांवर लाल चुटुक डाळिंब फुटावं तसं हसू फुटलं. ती ओट्या जवळ जाऊन ओट्यावर चक्क गॅसच आहे असं खोटं खोटं समजून ओट्याची उंची पाहू लागली.

आम्ही तिघेही मग आत बेडरूम मध्ये जाऊ लागलो. पुढे पांडे आणि त्याच्या मागेमागे आम्ही दोघं. आत बेडरूम मध्ये अंधार होता. बाहेर पाऊस होताच आणि fly ash विटांच्या मातकट रंगामुळे खोली अंधारी झाली होती.

आम्ही बेडरूम मध्ये गेलो तर आत लगबगीनं कुणीतरी आमची चाहूल लागल्यामुळं धडपडत उठल्या सारखं वाटलं. नीट पाहिलं तर एक अठरा एकोणीस वर्षांची ( खरं तर सोळा सतरा वर्षांचीच असेल एखाद वेळेस ) मुलगी बसली होती. वर्णानं काळी सावळी. कपडे जुनाट. फाटलेले. ब्लाउज ही अगदीच तुटका. छातीवर पदर घेतलेला. आणि पदरा च्या खाली एक तान्हं तिनं लपवलेलं. ते तिच्या पदराआडून त्या आईचं दूध पीत असावं. किंवा झोपलेलं असावं. पण बहुदा त्या मुलीच्या अंगावर ते अर्भक पितंच होतं. कारण आम्हा तिघांना असं अचानक आलेलं पाहून ती बिचारी लाजेनं भिजून गेली. आणि चटकिनं तिनं बसल्या बसल्याच भिंतीकडे तोंड वळवलं. आणि तिचा फाटका तुटका पदर बाळाच्या डोक्यावरून नीट सावरून तिच्या बाळाचं आमच्या नजरेपासून संरक्षण केलं आणि त्या पदरानं तिची स्वतःची सुद्धा लज्जा झाकण्याचा प्रयत्न केला.

एकंदर अवतारावरून ती साईटवर काम करणारी बाई होती. खरंतर मुलगी. बाई नव्हेच. फक्त मूल पदरी दिसत होतं म्हणून बाई. तिच्या शेजारी एक पुरुष खाली खरखरीत जमिनीवर उघड्या पाठीनी उताणा घोरत पडला होता.

मी आणि पांडेनं तिची ती अवस्था पाहून झर्रकन मान वळवत पाय मागे घेतले. मनोमन संकोचून. सीमा मात्र त्या छोट्या बाळाला ती एवढी छोट्या वयाची मुलगी दूध पाजते आहे हे दृश्य पाहून काळजी आणि कुतूहलाने त्या मुलीजवळ गेली. पण जवळच कुणी पुरुष उघड्या देहाने झोपला आहे हे पाहून ती ही चटकन मागे सरली.

" इंद्री व ss णी मा ss " बाळ मांडीवर घेतलेली सतरा अठरा वर्षांची मुलगी जरा बिचकलेल्या आवाजात ओरडून शेजारी झोपलेल्या पुरुषाला उठवू लागली. तो झोपलेला गृहस्थ सुद्धा एक साईटवरचा कामगारच होता. त्याचं नाव बहुदा " इंद्री " असावं. कारण त्या मुलीनं दोन वेळेला "इंद्री इंद्री" अशी हाक मारली. इंद्री झोपेतून खडबडून जागा झाला. आणि डोळे चोळत उठला. आम्हा तिघांना पाहून हडबडत उठून बसत तो …

" मम्मा श्रीदेवी , बन्नीम्मा , उंदडलील्ला , साहेब बर्ताड " असं काहीतरी आम्हाला न उमगणाऱ्या अगम्य भाषेत त्या शेजारी बसलेल्या मुलीनंच आपल्याला उठवलंय हे विसरत उलट तिच्यावरचं खेकसत तो ओरडला. एकंदर त्यांच्या बोली वरून हे दोघे कोणत्यातरी दक्षिण प्रांतातून तेही बहुदा सीमाभागातून कामगार म्हणून साईटवर आलेत आणि बहुदा नवरा बायको असावेत आणि हे मूल ही नुकतंच म्हणजे महिना दीड महिन्यापूर्वीच जन्माला आलेलं असावं असा एकंदर आम्ही अंदाज बांधला. पण त्यांच्या संवादातून एकच गोष्ट समजली ती म्हणजे त्याचं नाव 'इंद्री' आहे आणि तिचं नावं 'श्रीदेवी' आहे.

हे सगळं घडत असताना आम्ही थोडं इकडं तिकडं पाहिलं तर ह्या दोघांनी आमच्या बेडरूम मध्ये चक्क संसारच थाटला होता असं दिसत होतं. कोपऱ्यात एक स्टोव्ह होता. चारपाच जर्मन ची भांडी होती. दोन तीन विटा होत्या. त्यावर एक मोठं पाणी साठवायला असा जर्मन किंवा अल्युमिनियम चा डेरा होता. आमच्या अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या खिडकीला एक टोक आणि भिंती मधून एक चार बाय चार इंचांचं चौकोनी भोक असलेल्या कोनाड्यातून आरपार आलेल्या एका लाकडी तुळईला दुसरं टोक , असं करत एक दोर बांधून तिच्या मधोमध बाळाला झोपवण्यासाठी एक झोळी केली होती. दुसऱ्या कोपऱ्यात कोणत्यातरी देवीचा फोटो आणि त्याच्या शेजारी गळ्यात नाग धारण केलेल्या शंकराचा फोटो आणि त्या फोटोला ईबीत फासलेलं. दोन्ही फोटोला सुकलेल्या फुलांचा हार. हाराच्या दोन फुलांमध्ये खूप जास्त अंतर इतकं की पांढरा ‘दोरा’च हार म्हणून घातल्यासारखं वाटावं.

हे असलं सगळं इंद्री आणि श्रीदेवीच्या प्रपंचाचं मांडणं पाहून "पांडे" चिडलेला दिसला. त्यानं फोन करून साईटच्या मुकादमाला वर आमच्या फ्लॅट मध्ये बोलावून चांगलं झापडलं. तो मुकादम सुद्धा इंद्री आणि त्याच्या बायकोच्याच म्हणजे श्रीदेवीच्याच भागातला असावा . कारण त्या पांडे ची झाप खाऊन झाल्यावर त्यानं इंद्री ला आणि त्याच्या बायकोला झापलं. त्यांच्याच भाषेत.

मुकादमाला तोडकं मोडकं हिंदी येत होतं. त्यानं पांडेला आणि आम्हाला सांगितलं. की इंद्री साईटवर गेल्या दहा एक महिन्यापासून आहे. कदाचित जास्तच. वर्ष दीड वर्षापांसून. मागच्या संक्रांतीला तो गावाला गेला आणि परत येताना तो अचानक लग्न करून श्रीदेवीला घेऊन इकडं आला. चेहऱ्यावरूनच इंद्री हा श्रीदेवी पेक्षा चांगला बारा पंधरा वर्षांनी मोठा दिसत होता.

श्रीदेवी सुद्धा त्याच्या बरोबर साईटवर कामं करायची. दोन तीन महिन्यातच श्रीदेवीला दिवस गेले. पण ईंद्रीनं सांगितलं की श्रीदेवीला जवळ पासंच तिचं असं कुणीच नाही. ती जवळ जवळ एकटीच आहे. त्यामुळं इथंच साईटवर श्रीदेवीची डिलिव्हरी केली , बाकीच्या कामगार बायकांनी.

खरंतर बिल्डर नि सगळ्यांना खाली ग्राऊंडफ्लोर ला पार्किंगच्या रिकाम्या जागेच्या मागे पत्र्याच्या झोपड्या बांधून दिल्या आहेत. हे दोघेही तिथं राहायचे पूर्वी. पण हल्ली पाऊस सुरु झाला तसं पत्र्याची झोपडी जाम गार पडू लागली, त्यामुळं रात्र भर श्रीदेवीचं बाळ रडायचं. मग एकदिवस ह्या दोघांनी आपला संसार इथे थाटला. आणि इथं आल्यापासून इंद्री आणि श्रीदेवीचं बाळ खूप शांत झोपू लागलं.

मुकादमनं एखाद्या साऊथइंडिअन सिनेमाची ष्टोरी सांगवी तशी इंद्री आणि श्रीदेवी ची ष्टोरी पांडेला आणि आम्हाला वाळूच्या ढिगाऱ्यावर उभ्या उभ्या सांगितली.
पण मुकादम म्हणाला , “ पांडेजी , मई आजच उन दोनोंको कमरा काली कार्नेकू बोलतंय ! ”

हे सगळं असं चित्र पाहिल्यावर आणि ऐकल्यावर सीमा आणि मी आम्ही दोघेही जरा अनपेक्षित पणे स्तब्ध झालो. आपलं घर तयार होण्या आधीच इथं कुणीतरी आसरा घेतंय ही भावनांचं आम्हाला नवीन होती. ही भावना आणि घटना चांगली की वाईट , आम्हाला काहीच कळेना.

मुकादमाचं " मई आजच उन दोनोंको कमरा काली कार्नेकू बोलतंय " हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतंच सीमा म्हणाली ,

" नका जायला सांगू , राहूंदेत त्यांना इथंच ... खाली किती थंडी वाजत असेल अहो त्या बाळ बाळंतिणीला त्या पत्र्याच्या झोपडीमध्ये ? "

हे बोलताना ती अगदी गहिवरून गेल्यासारखी वाटली आतून बाहेरून. चेहऱ्यावर वेगळेच भाव आले तिच्या. आपल्या घरात एक बाळ बाळंतीण असल्यावर कसं बाईमाणूस काळजी घेतं दोघांची तसं काहीतरी तिला वाटून गेलं.

त्या रात्री मग सीमा हरवल्या सारखीच वाटली. आपल्याच भाव विश्वात.

“ किती लहान आहे रे ती श्रीदेवी , अजून विशी सुद्धा पार केलेली नसेल आणि पदरी एवढ्यात पोर ? त्या इंद्री का कोण आहे त्याला काही अक्कल ?
अरे लग्न झालं तेंव्हा अजून त्या बिचाऱ्या श्रीदेवी ला सगळं समजत तरी असेल का ? ” - सीमा एकटीच बडबडल्यासारखी बोलत होती स्वतःशीच कित्येक वेळ.
मग बराच वेळ आमचा दोघांच्यात निरवता पसरली. कदाचित सीमाच्या चेहऱ्यापुढं ते काही दिवसांचं थंडीत गारठलेलं अर्भक दिसत होतं.

“ त्या अर्भकाला बाळसं अजिबातच नव्हतं रे . उलट कृशच होतं ते. किती असेल वजन जन्माला आलं त्या वेळी ? काय माहित ? कुठून येणार बाळसं रे त्या श्रीदेवीच्या पोराला ? त्या श्रीदेवीच्याच शरीरात काही नाही , दिवसभर विटा आणि घमेली उचलून पार सुकलेली. काय दूध येणार तिला आणि काय पोषण मिळणार बाळाला ?” - सीमा बरेचवेळ अशी माझ्याशी बोलत राहिली. खरं तर माझ्यापेक्षा स्वतःशीच. तिच्या ह्या सगळ्या स्वगता मध्ये कधीतरी मधेच माझा डोळा लागला, मला समजलं नाही.

नंतर बरेच दिवस मग सीमानं सांगितल्याप्रमाणं श्रीदेविचा आणि इंद्रीचा संसार आमच्या त्या अर्धवट बांधकाम असलेल्या बेडरूम मध्ये सुरु राहिला. सीमानं प्रत्येक वेळेस पांडेला आणि मुकादमाला आवर्जून " त्यांना अजिबात बाहेर काढू नका राहूंदेत त्यांना इथंच " असं सांगितलं. पांडेनं सुद्धा जितके दिवस जमेल तितके दिवस त्यांना राहू दिलं आमच्या बेडरूम मध्ये.
एका रविवारी मी आणि सीमा साईट वर गेलो असताना, बेडरूम रिकामी होती. इंद्री श्रीदेवी आणि छोटं बाळ तिघंही रूम सोडून निघून गेली होती. त्या तिघांचा आमच्या दोघांशी झालेला अलिखित असा भाडेतत्वाचा करार संपला होता.

श्रीदेवी आणि इंद्री जाण्यापूर्वी आमच्या रूम मध्ये त्यांच्या पाऊलखुणा सोडून गेले होते. स्टोव्ह च्या मुळं काळवंडलेल्या भिंती. देवाचे फोटो होते त्या भिंतींवर कुंकवाने काढलेलं स्वस्तिक. त्या फोटोखाली सांडलेला बुक्का. अश्या अनेक पाऊलखुणा होत्या त्या रूम मध्ये…

आणि गंमत म्हणजे इंद्री आणि श्रीदेवी ह्या दोघानींच तो एकतर्फी करार संपवला होता की मुकादम किंवा पांडे ह्यापैकी कुणी त्यांना आमच्या घरातून आम्हालाच न विचारता हाकलून काढलं हे कळायला आम्हाला मार्गच नव्हता. इंद्री आणि श्रीदेवी आमच्या घरात घुसलेही आम्हाला न विचाराता आणि घर सोडून निघून गेले ते ही आम्हाला न कळवता.
ती ओकीबोकी रूम पाहून घरी आलो त्या रात्री सीमा चांगलीच विमनस्क झाली.

नंतर चौकशी केल्यावर समजलं , बेडरूम मध्ये फरशी बसवायची वेळ आली तसा पांडेचा नाईलाज झाला आणि त्यानं मग इंद्री आणि श्रीदेवी ला दुसरी कडे बस्तान बसवायला सांगितलं. कारण फरशी चं पॉलिश करताना ऍसिड वापरतात, त्यामुळं फरशीचं काम सुरु असताना तिथं कुणी राहणं शक्य नाही.

" विना , त्या इंद्रीला आणि श्रीदेवीला कधीच नाही का रे संसार करता येणार एके ठिकाणी धड ? की माझा संसार थाटण्यासाठी मी तिचा संसार मोडला ? कितीदा प्रत्येक वेळा मोडून परत नवीन रचायचा, हा संसार? असं मला वाटतं घर बदलायची वेळ आली की! तिला ही तसंच वाटलं असणार नक्की , आपलं घर सोडून जाताना. आणि ते इवलंसं बाळ होतं रे तिच्या बरोबर , आपलं घर सोडताना तिच्या पदरात? " असं बोलली आणि सीमा धाय मोकलून माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन ढसाढसा रडायला लागली.

मी ही " गप्प बैस , सीमा , प्लि s s ज प्लि s s ज " असं म्हणत तिची समजूत घालू लागलो.

" जास्त विचार करत बसू नकोस आणि आता झोप , नाही तर फार रडलीस तर तुझं डोकं दुखू लागेल "
मी सीमाला समजावलं. पण सीमा बहुदा त्या रात्री झोपलीच नाही / नसावी.

नंतर ठरल्यावेळे प्रमाणे फ्लॅटचं सगळं काम उरकलं आणि फ्लॅटचं पझेशन मिळालं. दोन अडीच महिन्याचा किरकोळ डीले सोडला तर बऱ्यापैकी वेळेत झालं काम. आम्ही शिफ्टिंग केलं. आमच्या मालकांना भाड्याच्या फ्लॅट च्या किल्या सुपूर्द केल्या. घर भाड्यानं घेताना दिलेलं डिपॉजिट ही परत घेतलं. नवीन ठिकाणी स्वतःच सगळं घर हवं तसं लावलं सीमानं.
आमचा गुलमोहोर सारखाच संसार परत सुरु झाला स्वतःच्या नवीन घरात. वर्ष दीड वर्षं वाऱ्यासारखी उलटली. माझा पगार वाढला, सीमाचा ही थोडा फार वाढला आणि आर्थिक चणचण ही थोडीबहुत कमी होऊ लागली.

सीमाला वास्तू शांत करायची होती खूप हौसे मौजे ने पण मी टाळत गेलो. माझ्या कडे पैसेच शिल्लक नव्हते, कोणत्या कार्याबिर्यासाठी. सीमानं तिचं मन मारलं, पण काही बोलली नाही. सीमाला पुढच्याच वर्षी सप्टेंबर च्या पहिल्या / दुसऱ्या आठवड्यात दिवस गेले. सीमा तिच्या माहेरी गेली. सातव्या महिन्यात. दिवस भरले तरी पेन्स आल्याचं नाहीत म्हणून शेवटी डॉक्टरांनी सीझर चा निर्णय घेतला. १९ मे ला 'विपुल' झाला. विपुल झाल्यावर महिना दीड महिना सीमा माहेरी राहिली आणि नंतर माहेरीसुद्धा जागा कमीच आहे आणि खूप अडचण होती आहे सगळ्यांना म्हणून ठरल्या दिवसापेक्षा बरंच आधी परत आली.

परत आली ती तारीख मात्र माझ्या चांगली स्मरणात आहे. ९ जुलै. कारण तेंव्हाही पाऊस पडत होता. बऱ्यापैकी जोरात. दुपारी सीमा आणि तिनं दुपट्यात गुंडाळून आणलेला तान्हा विपुल दोघेही घरी आले. तिची आई सुद्धा आली. सीमाला अजून तीन चार महिने तरी मदतीची गरज आहे म्हणून. शेजारून भाकरीचा तुकडा मागून आणून सीमाच्या आईनं , सीमाची आणि तान्ह्या विपूलची दृष्ट काढली.

सीमा आणि तिची आई घरी येऊन पाठ टेकतेय न टेकतेय तोवरच, तान्हा विपुलला घरी आल्यावर पहिल्याच दिवशी खूप अस्वस्थ असल्यासारखा वाटू लागला. दीड दोन महिन्यांचं बाळ. नक्की काय होतंय हे सांगताही येत नाही तान्ह्या पोरांना. त्याला जागा बदल कदाचित समजला असावा किंवा काहीतरी बदललंय नेहमीपेक्षा हे जाणवलं असावं. संध्याकाळी साडेसात आठनंतर मात्र तो चांगलाच रडू लागला.

बाहेर पाऊस थांबत नव्हता. पोट दुखत असेल , गॅसेस झाले असतील पावसाळ्यामुळं असं म्हणत घरघुती उपचार केले सीमानं. तिला ही तान्ह्या बाळाचा अनुभव नव्हता. तिची आई आली होती बऱ्यापैकी बाळंपणाचे अनुभव गाठीशी असलेली , पण ती सुद्धा विपुलच्या अविरत रडण्यामुळं अस्वस्थ झाली. तिला देखील काय करायचंय ते समजेना. एक दोन फोन केले सीमाच्या माहेरी विपुल जन्मल्या जन्मल्या ज्या डॉक्टरांच्याकडे दाखवलं होतं आणि गोवर टायफाईड ची लस दिली होती त्या डॉक्टरांना. त्यांनी सुद्धा "लगेच कुठलं माहिती नसलेलं स्ट्रॉंग औषध नका देऊ तपासून घेतल्या शिवाय आणि थोडे घरघुती उपायच करा. सकाळी मात्र त्रास नाही थांबत असं वाटलं तर तिथल्याच पीडियाट्रिशियन ना दाखवा आणि तिथून गरज पडल्यास मला फोन करा " अशी सूचना केली.
साडे दहा पावणे अकरा वाजले रात्रीचे. विपुल च्या रडण्यामुळं आम्ही तिघेही जाम बेजार आणि अस्थिर झालो होतो. ओवा , वेखंड , लवंग , असले सतरा प्रकार झाले. पण तसा कुठलाच गुण येईना.
सीमा अस्वस्थपणे हातात विपुल ला घेऊन हलवत होती. हातानं झोका दिला की विपुल तेव्हडया पुरता गप्प होई आणि थांबलं की परत विव्हळल्यासारखा करी.

इतक्यात सीमा बोलली …
" विना, पटकन एक झोळी बांध रूम मध्ये "

मी लगबगीनं कपाटावरची नायलॉन ची दोरी काढली , एक टोक खिडकीच्या गजाला बांधलं दुसरं दाराच्या चौकटीस एक बोटभर लांबीचं हुक होतं त्याला बांधलं. जुनी शाल होती त्या शालिची झोळी बनवली. दोन्ही हातानी एकंदर सगळं मजबूत आहे का ते ओढून आणि ताणून पाहिलं. खात्री झाल्यावर सीमाला सांगितलं. सीमानं अलगद हातांनी विपुल ला झोळीत ठेवलं आणि झोका द्यायला सुरु केलं.

तीन चार आंदोलनं झाल्यावर विपुल जादू झाल्यासारखा रडायचं थांबला. आणि नुकत्याच बांधलेल्या झोळीत मिनिट भरात गाढ झोपी गेला.
तो झोपला हे दिसताक्षणी सीमाच्या डोळ्यात घळाघळा पाणी आलं. ती प्रचंड दमली होती.

रडता रडता तीन मला खुणेने बोलत सांगीतलं...

" विना , पाहिलंस , तू आपल्या विपुल साठी बांधलेल्या या झोळी ची दोनही टोकं त्या श्रीदेवीनं तिच्या बाळासाठी जशी बांधली होती बरोब्बर त्याच ठिकाणी बांधली आहेस "
झोळी बांधली तेंव्हा माझं लक्ष नाही गेलं , पण मी आता सीमानं सांगितलं तेंव्हा पाहिलं आणि माझ्याही काळजात चर्रर्र झालं क्षणभर. सीमाचं निरीक्षण अगदी तंतोतंत होतं.

नंतर बराच वेळ मी आणि सीमा आम्ही एकमेकांना मिठीत घेऊन रडत बसलो…किती वेळ कुणास ठाऊक ?

विपुल मात्र शांत झोपेत खुदु खुदु स्वतःशीच हसत होता.

(काल्पनिक)

चारुदत्त रामतीर्थकर
३१ मे २०१९, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर..
आम्हाला 'दो दिवाने शहर में , आबुदाना धुंडते' गाण्याची आठवण व्हायची. >>> पहिले काही परिच्छेद वाचता वाचताच हे गाणं आठवलं होतं !

कथा आवडल्याच्या अभिप्रायाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद !

मला तर, विना सीमाच्या फ्लॅट मधे श्रीदेवीचे बाळ गेले होते की काय आणि 'त्या' अस्तित्वामुळे विपुल रडत होता की काय असं वाटलेलं.
पण तसं काही नव्हतं म्हणून बरं वाटलं.

सुरुवातीचा बराचसा भाग अनावश्यक, ज्याला फाफटपसारा म्हणता येईल असा आहे. कथा अजून बांधेसूद करता येऊ शकेल. ललीतात असा पाल्हाळ चालून जातो, अशा प्रकारच्या कथेत शक्यतो पाळ्हाळ टाळावा असे आपले मला वाटते.

>>> सुरुवातीचा बराचसा भाग अनावश्यक, ज्याला फाफटपसारा म्हणता येईल असा आहे. कथा अजून बांधेसूद करता येऊ शकेल. ललीतात असा पाल्हाळ चालून जातो, अशा प्रकारच्या कथेत शक्यतो पाळ्हाळ टाळावा असे आपले मला वाटते. <<<

हर्पेन , सूचना चांगली आहे. कथेचा आटोपशीर पणा जपण्याच्या दृष्टीनं तुमचं म्हणणं खरं आहे. पुढील कथेच्या वेळी नक्की अंमलात आणीन ही सुधारणा. ह्यावेळी जसं सुचलं तसं लिहीत गेलो...

>>> मला तर, विना सीमाच्या फ्लॅट मधे श्रीदेवीचे बाळ गेले होते की काय आणि 'त्या' अस्तित्वामुळे विपुल रडत होता की काय असं वाटलेलं. <<<

नाही तसा कोणताच प्लॉट डोक्यात नव्हता.

विविध सामाजिक स्तरातील भिन्नता , आर्थिक स्तर वेगळे असूनसुध्दा ' संसार आणि प्रपंच ' थाटण्याची स्त्री सुलभ उर्मी आणि समाजातील 'स्वतः घर' ह्या संकल्पनेचं , आर्थिक गणितापलीकडे जाऊन भावनिक महत्व कथा रूपानं व्यक्त करणं - एवढंच काहीतरी ' संदिग्ध ' असं काहीतरी डोक्यात होतं, ही कथा लिहायला घेण्या आधी.

अगदी सुरेख... घर बदलवतांना खरच एव्हडे हाल होतात... म्हणजे एकावेळी सगळ सामान गुंडाळण सोप पण ते लावायचं म्हणजे कटकट...
शेवट खुप भारी घेतलाय

सुंदर आहे कथा.
यात मला विना खुपच हळवा दिसला.
शेवटी ते का रडले, ते मला अजूनही स्पष्ट कळत नाहीये. कृपया कुणीतरी प्रकाश टाकावा....

> नाहीतर ' मळीच्या नाल्याच्या बाजूनं चालत पुढे या पाच मिनिटं आणि तिथे ‘गारबुल्यांची वस्ती’ कुठं आहे विचारा , तिथून पुढे दोनशे मीटर या आणि पुढे एक लोणारी कोळशाची वखार लागेल तिथे वळा, उजव्या बाजूला आधी एक कडुलिंबाचं आणि नंतर एरंडाचं मोठं झाड लागेल बघा! त्याच्या समोरच आहे... नाही तर एक काम करा थांबा तिथेच मीच येतो बाईक घेऊन तुम्हाला घ्यायला , चटकन सापडण्यासारखं नाही पहिल्यांदा येताना ! " असे पत्ता सांगताना होणारी 'गले में खिचखिचावस्था' आणि ' गुलमोहोर कॉलनी विचारा! सांगेल कुणीही ' असं म्हणताना खर्ज आवाजात सहज येणारा 'रुबाब' हा माझ्यासाठी स्वस्त आणि रास्त भावातला मात्र नक्कीच नव्हता. कारण आधीच्या घराच्या भाड्याच्या मानाने मी चांगले दुप्पट भाड्याचं घर घेतलं होतं ह्या वेळी. आणि माझ्या पगाराच्या आणि एचारेच्या मानाने सुद्धा बराच महाग होता हा भाड्याचा फ्लॅट. लहान पणी फक्त श्रीखंडाची गोळी खायची सवय असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या तिसरीतल्या निरागस पोराला जर ब्रिगेड रोड वरील चर्चला लागून असलेल्या 'सेंट व्हिन्सेंट कॉन्व्हेंट' मधली मुलं खातात ते 'फरेरो रोशर' कंपनीचं स्विस चॉकलेट खायला मिळालं तर कसं वाटेल? तसं मला झालं, ह्या भाड्याच्या नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट झाल्यावर. >

> दोन मजले सोडून आमच्याच बिल्डिंग मध्ये पाचव्या मजल्यावर त्याचा मस्त पैकी ऐसपैस थ्री बीएचके होता. मालक स्टेट गव्हर्मेंट मध्ये व्हेटर्नरी ऑफिसर होता. चांगला क्लास वन ऑफिसर. वर आणि पाळीव कुत्र्यांच्यासाठी एक प्रायव्हेट क्लिनिक चालवायचा , बेकायदा असावं. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस करायला मुभा नसते असं ऐकलं होतं. हा व व्हेट, प्रायव्हेट प्रॅक्टिसही करी आणि सरकारी सुद्धा. पण दोन्हीकडेही खूप पैसे कमवत असावा. वर आणि आमच्या कडून महिन्याच्या महिन्याला चांगले मोजून भाड्याचे पैसे पाच तारखेला घायचाच. पाचही बोटं तुपात. मी , एन. ई. एफ. टी. करायला एकदिवस जरी उशीर केला तरी दुसरे दिवशी लगेच सकाळी बरोब्बर पावणे सहाला एसेमेस किंवा व्हॉट्सअप यायचा, 'Mokashi, pl. share NEFT details'. जाम हिशेबी होता. आम्ही पहिल्या अकरा महिन्याचा करार एक्सटेन्ड करायला म्हणून गेलो तेंव्हा भाडे दहा % वाढवा तरच एक्सटेन्ड करतो असा हट्ट धरून बसला. मला सीमानं पाच टक्क्यांपेक्षा जास्त नको ऍग्री व्हायला, आधीच आपण जास्त भाडं भरतोय असं जाण्यापूर्वी बजावलं होतं.
'जनावरांच्या डॉक्टरांच्यात माणुसकीचा असलेला अभाव' असा शोधनिबंध आधी कुणी नसेल लिहिला तर विषय चांगला आहे! - घरमालकाच्या सहा इंच खोल जाणाऱ्या सोफ्यात अंग चोरून बसलो होतो ते बेडरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहत, तेंव्हा मी सीमाला म्हणालो. तीनं माझ्या डाव्यापायाच्या करंगळीवर तिची टाच मारत मला " गंभीर प्रसंगी तुझे फालतू विनोद नकोयत " हे पूर्ण वाक्य फक्त तिचे दोन्ही डोळे वटारून मूकपणे व्यक्त केलं.
शेवटी बऱ्याच वेळ घासाघीस करून दहा ऐवजी आठ टक्के भाडेवाढीवर आमची बोलणी निर्ययास्पद येऊन ठेपली. पण दुसऱ्या वर्षीच्या कराराचे अकरा पैकी पाचच महिने पूर्ण झाले आणि जनावरांच्या डॉक्टरांचं नक्की काय पिसाळलं कुणास ठाऊक , >

आपल्यापेक्षा निन्मवर्गात असलेल्यांबद्दल तुच्छता, उच्चवर्गात असलेल्यांबद्दल मस्तर....
अन् स्वतः काय करणार तर
> मी सकाळी लवकर ऑफिसला जायचो. यायचोही लवकर दिवस मावळायच्या आत. ती ही जवळंच असलेल्या एका सी.ए. कडे अकाउंट्स असिस्टंट म्हणून जायची. हे सी.ए. लोक खूप कामाला जुंपतात असं ऐकून होतो. पण सीमा बऱ्याच वेळेला फेसबुक वर ऑनलाइनच असायची. जेंव्हा फेसबुक वर ऑनलाईन नसायची त्यावेळी व्हॉट्सअप वर ऑनलाईन दिसायची. उरलेल्या वेळात सी.ए. ऑफिसात असतील तर कामं केल्यासारखं भासवायची. माझी सुद्धा अवस्था छान होती. ऑफिसात कामं आटोपशीर होती. बॉस बऱ्याच वेळेला टूरवरच असायचा. त्यामुळं माझेही बरे चालले. > Uhoh

नाही वाचली पूर्ण कथा!

Pages