चाळीतील री-युनिअन

Submitted by तुषार विष्णू खांबल on 31 May, 2019 - 06:14

आज कित्येक वर्षांनी मी संपूर्ण सजले आहे. मला तर खरंच वाटत नाहीय कि मी अजूनही इतकी सुंदर दिसते. अजूनही म्हणजे आता जवळपास १०० वर्षे उलटून गेली ना हो मला.... मग....
अहो असे शॉक लागल्यासारखे काय पाहताय. खरंच सांगतेय मी.. अगदी त्या मागच्या मारुतीची शप्पथ.!! मागे वळून पाहू नका हो... आता ते मंदिर नाहीय तिथे... ४-५ वर्षांपूर्वी एका बिल्डरने त्याची बिल्डिंग उभी करताना तोडलं ते. खूप आधार वाटायचा हो त्या मारुतीचा... पण आता बोलून काय उपयोग... तो पण गेला आपल्या मराठी माणसांसारखा तिकडे कल्याण-डोंबिवली का वसई-विरार म्हणतात तिकडे.... आता इथे एक मोठ्ठ आलिशान असं कसलंतरी पार्क उभारणार आहे म्हणे.... असू दे... आता राहतंय तरी कोण इकडे ते पार्क बघायला... मी पण चालले... अगदी कायमची... खरंच सांगतेय मी.. अहो म्हणून तर इतक्या वर्षांनी आज सजली आहे मी.. बघा ना कशी मस्त दिसतायतना हि नवीन तोरण... काय ते रंगबिरंगी फुगे, पडदे, खमंग सुटलेला जेवणाचा सुगंध.... आहाहाहा... डीजे चा दणदणाट, आता वय झालं म्हणून तो काही सहन होत नाही मला, पण करते मी आपल्या मुलांसाठी,
अहो तुम्हाला सांगते. अगदी २०-२५ वर्षांपूर्वीना हे असं वातावरण इथे जवळपास संपूर्ण वर्षभर असायचं. नवीन वर्ष सुरु झालं कि पहिला कार्यक्रम महिलांचं हळदीकुंकू. रोजच्या घरकामातून हा एक दिवस त्यांचा हक्काचा असायचा. पुरुषही असायचे कार्यक्रमात, सोबतीला हातभार लावण्यासाठी. परंतु संपूर्ण मान हा स्त्रियांचाच असायचा.
हळदीकुंकू झाले कि १५-२० दिवसात शिवरात्र यायची. त्या मारुतीच्या देवळात शंकराची पिंडी होती. एक आठवडा आधीपासून तय्यारी सुरु व्हायची. प्रत्येक घरातून वर्गणी जमा करणे, देवळाला रंगरंगोटी करणे, कागदाच्या पताका बनविणे, संपूर्ण परिसर झाडलोट करून स्वच्छ करणे.. अशी अनेक कामे असायची.. आणि हे सर्व करण्यात मोठ्यांपेक्षा लहान मुलंच पुढे असायची. नाही तर आजची मुले... नुसते हातात मोबाइल घेऊन पब-जी का फब-जी खेळत पडलेली असतात नुसती. शिवरात्रीच्या दिवशी बर्रोब्बर सकाळी ६:००वाजता लाईटवला संज्या त्याचे स्पीकर चालू करायचा. सगळी भक्तगीते.. आहाहाहा.. किती प्रसन्न वाटायचं सांगू.. नंतर दिवसभर भक्तांची ये-जा सुरु असायची. येणाऱ्या प्रत्येकाला खिचडी प्रसाद मिळेल ह्याची काळजी घेतली जायची. हा हा म्हणता दिवस कधी संपायचा ते समजायचे सुद्धा नाही.
हा उत्साह ओसरत नाही तोवर होळी यायची. माझी मुलं वेळेत अभ्यास करून होळीसाठी जमेल तशी लाकडे, गवत, शेणी इत्यादी गोष्टी जमा करायची. आणि उंचीने मोठी नसली तरी मानाने उंच अशी होळी बांधायची. रात्री सर्व एकत्र जमून होळीच दहन करायचे. दुसऱ्यदिवशी रंगपंचमी असते तेव्हा गोमूचे नाच असायचे घरोघरी जाऊन लहान मुले पैसे गोळा करायची आणि संध्याकाळी सर्व एकत्र जमून भेळपुरीची पार्टी करायचे
अशातच वेध लागायचे ते हिंदू-नववर्षाचे, म्हणजेच पाडव्याचे. गुढी उभारल्या जायच्या, घराघरातून श्रीखंड पुरीचा सुवास दरवळायचा, शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे गोडधोडाची देवाण घेवाण व्हायची. अगदी आनंदी आनंद नांदत असायचा सगळीकडे. नंतर मग मुलांच्या परीक्षा संपल्या कि बहुतेकजण गावी जायचे. तेव्हा मला मात्र थोडस एकटं-एकटं वाटायचं.
जूनच्या सुरवातीला सर्व पार्ट यायचे तेव्हा मात्र पुन्हा सगळं भरल्या भरल्यासारखं वाटायचं. शाळेची आणि पावसाची एकत्रच सुरुवात व्हायची. मग त्या पावसात भिजणे, साचलेल्या तळ्यात होड्या सोडणे, कौलावरून ओघळणारे पाणी चेहऱ्यावर झेलणे असे विविध कार्यक्रम सुरु असायचे. काही नुकतेच नवयौवनाच्या उंबठ्यावर पदार्पण केलेलं तरुण-तरुणी एकमेकांच्या हृदयाला साद घालत असायचे.
असच मग वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, पिठोरी (गटारी) अमावस्या ह्या ना त्या निमित्ताने काही ना काही सुरूच असायचे. मग यायचा सर्व तरुणाईचा आवडता सण; गोपाळकाला. गुरुपौर्णिमेला सरावाचा श्रीगणेशा केला जायचा. ३ ते ४ थरांचा मानवी मनोरा रचला जायचा. नारळीपौर्णिमेला चोऱहांडी बांधली जायची. जन्माष्टमीला भजनकीर्तन करत बाळकृष्णाची यथासांग पूजा केली जायची. आंबोळ्या, शेगलाच्या पाल्याची भाजी, काळ्या वाटण्याच सांबार असा नैवेद्य असायचा. रात्री बाळकृष्णाला पाळण्यात घातले जायचे आणि मग हंडी फोडून सर्वाना काला (दही, पोहे, गूळ-खोबर इत्यादी मिक्स करून केलेला प्रसाद) वाटला जायचा. दुसऱ्या दिवशी बैलगाडी सजवली जायची. चाळीतील लहान मुलांना श्रीकृष्ण, राधा, सुदामा असे वेष परिधान केले जायचे आणि जवळपासच्या विभागात पारंपरिक वाद्ये वाजवत मिरवणूक काढून हंड्या फोडल्या जायच्या तेव्हा आतासारखी लाखोंची बक्षीसे नसायची. पण प्रत्येक ठिकाणी ११ रुपये, आणि मोट्ठी ढाल किंवा गदा अशी बक्षिसे असायची. दिवसभर चालत फिरायचं, ट्रक किंवा लग्झरी बस पण नव्हत्या. पण त्यात सुद्धा आनंद होता.
दिवसभरात हंडी फोडून कमावलेल्या पैश्यात अजून थोडी भर टाकून गणेशउत्सव साजरा केला जायचा. गणरायाची छोटी शाडू मातीची मूर्ती आणून मारुतीच्या मंदिरात तिची स्थापना केली जायची. दररोज ताज्या फुलांची आरास केली जायची. सकाळपासून भक्तिगीते वाजत असायची. भजन, कीर्तन, पारायण, हरिपाठ, अथर्वशीर्षपठण, मंगळागौर असे अनेक कार्यक्रम इथे राबवले जायचे. आणि पाचव्या दिवशी टाळमृदूंगाच्या तालात साश्रूनयनांनी गणरायाला निरोप दिला जायचा.
पितृपख संपून सर्वपित्री अमावस्या झाली कि नवरात्री सुरु व्हायची. देवळात घाट बसवला जायचा. नऊ दिवस अखंड नंदादीप तेवत असायचा. अष्टमीला होम हवन, नवमीला महाप्रसाद, आणि दसऱ्याच्या दिवशी सोन लुटलं जायचं.
ह्या दिवशी चाळीत नवीन गोष्टींचं आगमन व्हायचं. मला आठवत ना... चाळीत पहिला टीव्ही हा गावड्यांकडे आला. पहिला फ्रिज पाटलांकडे, पहिला फोन मोऱ्यांकडे, पहिली बाईक शिंद्यांकडे, अश्या अनेक गोष्टी पहिल्यांदाच इथे आल्या होत्या.. काय कौतुक असायचे त्या गोष्टींचं.. पण अहंकार मात्र कोणी दाखवला नाही.
दिवाळी आली कि काय जल्लोष असायचा.... काही विचारू नका... सहामाही परीक्षा संपून मुलांना सुट्ट्या लागलेल्या असायच्या. सर्वांच्या घरात फराळाची लगबग सुरु असायची. कोणाच्या घरात रंगरंगोटी सुरु असायची. नवीन कपडे घेतले जायचे. सर्व घरात एकाच प्रकारचे कंदील लावले जायचे. आणि हे सर्व चाळीतील मुलांनीच बनवलेले असायचे. चाळीच्या मध्यभागी एक भाला मोठ्ठा आकाशकंदील लावला जायचा. दिवाळी दिवशी सर्व मंडळी एकमेकांच्या घरी जात असत आणि फराळाचा आस्वाद घेत असत.
तुळशीची लग्न झाली कि वयात आलेल्या मुलांची सुद्धा लग्न लावून दिली जात असत. कित्येक जणी सासरी गेल्या, काही माहेर सोडून इकडे नांदायला आल्या. पण प्रेम आणि जिव्हाळा यात कुठली हि कमतरता भासली नाही. कोणाच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद जसा मी अनुभवालाना; तसंच काहींच्या जाण्याचं दुःख देखील पचवले आहे.
दत्तजयंतीच्या मुहूर्तावर सत्यनारायणाची पूजा असायची. तेव्हा मुलांच्या विविध स्पर्धा ठेवल्या जायच्या, सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. पडद्यावर चित्रपट दाखवले जायचे. अश्या अनेक गमतीजमती मी इथे १०० वर्षाहून अधिक काळ उभी राहून अनुभवल्या.
हो... मीच... माझं नाव राधाबाई चाळ. ब्रिटिशांच्या काळात त्याच्या नोकर-चाकर यांना राहण्याकरिता माझी बांधणी करण्यात आली. त्यानंतर आज शंभराहून अधिक वर्ष मी ह्याठिकाणी उभी आहे. अनेक कुटुंबे माझ्या हृदयात वास्तव्य करून गेली. सर्वांचा सुखाचा, दुःखाचा, अडीअडचणीचा, आनंदाचा काळ मी माझ्या डोळ्यांनी पहिला आहे. काळ बदलत गेला. लोकांच्या गरज वाढत गेल्या. माझी जवळची, माझ्यावर प्रेम करणारी माणसे माझ्यापासून दूर जाऊ लागली. इतकी दूर का पेरून परत कधी यावंसं पण त्यांना वाटलं नाही.
आज पुन्हा सर्व एकत्र माझ्या कवेत आले आहेत. कारणच तसं खास आहे.. नाही नाही नाही.. कोणाचं लग्न वैगरे नाही आहे हो... हे सर्व आज मला भेटायला आले आहेत.... हो मलाच भेटायला.... कारण काही दिवसानंतर मी ह्या जगात नसेन.... ह्या जागी एक भली मोठी गगनचुंबी इमारत बांधणार आहेत. मी तुटणार याच दुःख आज इथे राहणाऱ्या आणि इथे राहून गेलेल्या प्रत्येकाच्या नजरेत मला दिसत आहे. त्यांनी कितीही ते लपविण्याचा प्रयत्न केला तरीही मला ते कळतंय. आपल्यालाही काळानुसार बदलावं लागणार हे सत्य मी स्वीकारलं आहे. म्हणूनच मी जमीनदोस्त होणार हे माहित असून सुद्धा माझ्या या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप आनंदी आहे. त्याकरिताच तर इतकी सजले आहे मी.
अरे बापरे!!!! अहो ७:३० वाजले. सर्व मंडळी पोचली सुद्धा... आणि मी इथे तुमच्याशी गप्पा मारत बसले आहे.. मला आता निघायला हवं... हे आनंदाचे क्षण डोळ्यात साठवून ठेवायचे आहेत मला.. खरं तर संपूर्ण आयुष्य ह्यांच्या सेवेत राहावं अशी माझी खूप इच्छा आहे. परंतु आता ते शक्य नाही.
तुम्ही एक काम कराल का माझं??? इथे तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर माझा एक निरोप द्याल का??? त्यांना फक्त एवढंच सांगा कि नवीन बिल्डिंगच्या आवारात एक मारुतीचं मंदिर बांधा आणि अजून एक, जितकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तितकंच प्रेम माझंही तुमच्यावर आहे. मला सदैव तुमच्या सोबत ठेवण्यासाठी माझ्या मातीच्या ढिगाऱ्यातील काही माती नवीन बिल्डिंगचा पाया भरताना त्यात ठेवा.. म्हणजेच माझ्या मनाला शांती मिळेल. करालना एवढं माझ्यासाठी??? प्लीज???
अपेक्षा करते कि तुम्ही माझं हे काम नक्की कराल.. चला येत मी... बाय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच लिहिलात. करिरोडला आमची चाळ आहे. अगदी सेम अशीच. जेव्हा ती तोडली जाईल तेव्हा तुमची ही कथा नक्की डोळ्यासमोर येईल. जुन्या सर्व आठवणी ताज्या झाल्या.