वास्तु ९

Submitted by जयश्री साळुंके on 31 May, 2019 - 05:35

सौम्यची ताई, गिरीजा, ज्या लग्नाला जाणार होती ते लग्न सईच्या गावाच्या जवळच होतं. पण हि माहिती सौम्यकडे असण्याची शक्यता नव्हती. अघोरी सावज शोधत असतांना त्याची गिरिजावर नजर पडलेली होती, आणि अश्या प्रकारे गिरिजाच्या हातावर तो डाग आला होता. गिरीजाला विहिरीजवळ घेऊन यायचं म्हणुन अघोऱ्याने एका मुलीला गिरिजाला फसवून आणायला सांगितलं होतं. त्याच्या प्रभावामुळे त्या मुलीने गिरीजासोबत मैत्री केली होती. लग्नाच्या दिवशी गिरीजा अचानक गायब झाली, पण गर्दीमुळे कोणाच्याही हे लक्षात आलचं नाही. संध्याकाळी सर्व सोपस्कार पार पडल्यावर जेव्हा घरी जायची वेळ आली तेव्हा गिरिजाच्या बाकी मैत्रिणी तिला शोधू लागल्या, गावात सगळीकडे शोधाशोध झाल्यावर पोलिसांना देखील बोलवण्यात आलं होतं. गिरिजाच्या घरी बातमी कळाली तेव्हा त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती.
सगळीकडे शोध चालू असतांना इकडे गिरीजाने अगदी शांततेत विहिरीत उडी मारली होती. आणि तिचं शव देखील कोणाला सापडलं नव्हतं. कारण बळी घेताना मुलगी कुमारिका पाहिजे हा नियम होता, बळी गेल्यावर त्या शावासोबत काय कराव याच्याशी अघोऱ्याला काही घेण देण नव्हतं. पण तो गिरिजाच्या रूपावर भाळला होता. जिवंत असतांना नाही पण मेल्यावर गिरीजाच्या प्रेतावर त्याने स्वतःची भूक भागवली होती. पण ह्या सगळ्या प्रकारात गिरीजा आणि तिच्या आधी बळी गेलेल्या पाच जणींच्या आत्म्याला मात्र एका ठराविक परिघात फिरायची संधी मिळाली होती. पण हि गोष्ट अघोरीला नव्हती कळाली, कारण जरी त्या सहा जणी सुटल्या होत्या तरी त्यांचा परीघ त्यांना ओलांडता येत नव्हता. अघोरीच्या पूजा स्थानापासून अगदी काही अंतरापर्यंतच त्या जाऊ शकत होत्या.
दुसऱ्या दिवशी सौम्य अघोऱ्याकडे जायला निघाला. आणि त्याच वेळी अघोरी सईच्या खोलीत होता, तिला जेवण देत होता. सईच्या बळीची वाट बघण्याच अजुन एक कारण होत त्याच्याकडे. काही वर्षांपूर्वी जसं तो गिरीजेच्या रूपावर भाळला होता तसचं ह्या वेळी सईच्या बाबतीत देखील झालं होतं. गिरीजाला तरी त्याने एकदाच बघितलं होतं, पण सईसोबत तर त्याने किती तरी वर्ष काढली होती. दर वेळी सईसोबत असतांना तो स्वतःवर आवर घालत होता, पण दिवसेंदिवस त्याला ते कठीण होत होतं. आणि त्यामुळेच सौम्य काय करतोय याची त्याला काहीही कल्पना नव्हती. त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त सई आणि तिचं शरीर फिरत होतं.
सौम्यला अघोऱ्याची नेमकी जागा नव्हती माहित, न त्याला गावाच्या शेजारच्या जंगलाबद्दल माहिती होतं, म्हणुन त्याने सोबतीला सईच्या भावाला घेतलं होतं. सईच्या भावाने तिकडे जाण्याला बरीच नकारघंटा वाजवली होती पण त्याचा सौम्यवर काहीही परिणाम नाही झाला. सौम्यला सारखं वाटत होतं कि त्याच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर त्याला इथे मिळतील. जंगलात दोघ निघाले तर होते, पण नेमकी जागा कोणालाच माहित नव्हती आणि किती वेळ लागेल शोधायला हे पण माहित नव्हत म्हणुन दोघ बरीच तयारी करून आले होते.
दिवसभर जंगलाचा बराच भाग पायी तुडवल्यावर दोघ थकून एका झाडाला टेकून बसले होते. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे भाऊ सारखा सौम्यच्या मागे लागला होता माघारी फिरायला म्हणुन, पण शंकेच निरसन होईपर्यंत माघार घेण हे सौम्यला कधीच जमल नव्हत. अचानक खुप जोरात वारा सुटला, ढग जमायला लागले होते. जंगलात सगळीकडे काळोख पसरायला लागला होता. त्यामुळे तिथे थांबण्यात काही अर्थ नाही हे सौम्यला पण वाटायला लागलं होतं. त्याने देखील माघारी जायचा निर्णय घेतला, पण ते दोघ जंगलात इतक्या आत मध्ये शिरलेले होते आणि अंधार झाल्यामुळे नेमकं बाहेर कसं पडायचं हे सुद्धा त्यांना लक्षात येत नव्हत. पण काही तरी निर्णय घ्यावाच लागणार होता म्हणुन दोघं उठुन एका दिशेला चालू लागले. पण नेमकं ज्या दिशेला दोघ जात होते तीच दिशा त्यांना योग्य तो मार्ग दाखवणार होती. मुळात ज्या वेळी गिरिजाच्या लक्षात आलं कि सौम्य जंगलात आला आहे त्या वेळेपासून ती वाट बघत होती त्याच्या जवळ पोहचण्याची. पण अगदी दिवस पुर्ण संपला तरी सौम्यला योग्य दिशा सापडत नाही म्हणुन तिने हे सगळ घडवून आणल होतं. आणि आता ती वाट बघत होती तिचा भाऊ येण्याची. कित्येक वर्षात तिने सौम्यला बघितलं नव्हत पण तरी त्याच्या येण्याची चाहूल तिला समजली होती. तिच्या मुक्तीची वेळ देखील आता जवळ आली होती, आणि तिच्या सोबतच बाकी पाच जणी देखील लवकरच मुक्त होणार होत्या.
पण मुक्त होण्यापूर्वी त्यांना अघोऱ्याला संपलेलं बघायचं होतं.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

sweet