वास्तु ८

Submitted by जयश्री साळुंके on 31 May, 2019 - 04:51

वातावरणात कमालीची शांतता होती. अगदी रातकिड्यांचा आवाज पण बंद होता. ना पानांची सळसळ, हवा देखील थांबली होती. सई शुद्धीवर तर आली होती पण तिच्यात उठायचे त्राण नव्हते. तिला तहान लागली होती, घसा पुर्ण कोरडा पडलेला होता. ती उठायचा प्रयत्न करत होती पण अशक्तपणा मुळे उठता येत नव्हत. आई आणि प्रज्ञा अगदी गाढ झोपलेल्या होत्या, सईने त्यांना उठवायचा प्रयत्न केला पण दोघींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सईने स्वतःच्या पद्धतीने उठायचा प्रयत्न केला. उठुन ती स्वयंपाक घराकडे जायला निघाली, पण खोलीतून निघाल्यावर तिला चक्कर आली, आणि नेमका त्याच वेळी तो तिथे आला, म्हणजे तो वाट बघतचं होता, आणि संधी आयती चालून आली म्हटल्यावर त्याने सईला अलगद सावरलं. पाणी पिऊन जरा बर वाटल्यावर सईने नीट निरखून बघितलं, अंधारामुळे तिला अजुन लक्षात नव्हत आलं, पण निरखून बघितल्यावर नजरेची ओळख पटली. वेद ज्याच्यावर सईने मनापासून प्रेम केल होतं, वेद जो सईचा बळी कधी घेता येईल याची वाट बघत होता.
इतक्या वर्षांपासून दोघ वाट बघत होते, सई वाट बघत होती वेद आणि तिच्या घरच्यांची भेट व्हायची, तर वेद वाट बघत होता कधी एकदा हे सगळ संपून त्याला सर्व जगावर राज्य करता येईल. मुळात त्याच खर नाव वेद नव्हतच, त्याने उगाच कोणाला शंका नको म्हणुन हे नाव वापरलं होत, त्याला खर नावचं नव्हत. जे कोणी त्याला ओळखायचे ते त्याला अघोरी म्हणूनच ओळखत होते, आणि पृथ्वीवर इतकी वर्ष फक्त अघोरी म्हणुन ओळखला जात होता तो, त्यामुळे त्याला स्वतःला सुद्धा त्याच नाव नव्हत आठवत. आजची त्याची सगळी तयारी फसली होती, जर सगळे वेळेवर आले नसते तर आज त्याच्या सगळ्या इच्छा पुर्ण झाल्या असत्या. पण म्हणुन त्याने माघार नव्हती घेतली, तो अजुन प्रयत्न करणार होता, त्यात त्याला काळजी फक्त एकच होती ती म्हणजे सौम्य.
सकाळी सर्व जण उठले तेव्हा सई तिच्या खोलीत शांत झोपलेली होती, सौम्य तिला बघून आला. तिच्या चेहऱ्यावर एक बट हवेसोबत अलगद हलत होती, ती बघून सौम्यने हात पुढे केला, ती बट मागे सारायला आणि नेमकं त्याला तिच्या कपाळावर काळा डाग दिसला. त्याला चांगलच आठवत होत कि काल सईला कोणतीही जखम झालेली नव्हती, मग हा डाग कसला याचा विचार त्याच्या डोक्यात चालू असतानाच वेद तिथे आला. सौम्यने वेदला काही कळू न देता तिथून पाय काढता घेतला. तो डाग त्याने या आधी पण एका व्यक्तीच्या हातावर बघितला होता, पण त्या डागाचा आणि सईचा काही संबंध असेल असं सौम्यला वाटत नव्हत. तरी सईच्या कपाळावर तो डाग सौम्यला अस्वस्थ करत होता.
प्रज्ञाला सकाळी अचानक आठवलं कि सईच्या खोलीतलं चित्र तिने कुठे बघितलं होतं. तिला यात काही तरी गडबड असल्याची शंका आली, पण तिला वाटलं कि एक मित्र म्हणुन वेद ने दिलं असेल सईला गिफ्ट. पण नीट निरखून बघितल्यावर तिला काही तरी खटकत होतं पण नेमकं काय ते कळायला कोणताच मार्ग नव्हता म्हणुन शेवटी तिने सौम्यला सगळ सांगितलं. पण मुळात वेद आणि सईचं नातं कोणाला माहित नसल्यामुळे सौम्यला यात काही गैर वाटलं नाही. त्याने विहिरीकडे सुद्धा एक फेर फटका घेतला, तिकडे काही सापडत का बघायला. गावात एक फेरी मारून आला, उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा करत गावातल्या म्हाताऱ्या माणसांकडून गावाच्या जुन्या गोष्टी माहित करून घेतल्यात. त्याला अजुन पण संमोहन असचं वाटत होतं, त्या दृष्टीने चौकशी करावी म्हणुन गावातल्या बाकी छोट्या वैद्य आणि बाबा-बुवांना भेटून आला. नेमक त्या वेळी अघोऱ्याबद्दल देखील काही लोकांनी त्याला सुचवलं.
सगळ्या धावपळीत दिवस संपला होता, बाहेर चांगलच अंधारून आलेलं, म्हणुन अघोऱ्याकडे दुसर्या दिवशी जायचा निर्णय त्याने घेतला. त्याला सईला नेमकं झालं काय आहे हे जरी माहित नसलं तरी, जे काही झालं ते गावात येऊनच झालं यावर त्याचा पुर्ण विश्वास होता. आणि म्हणुन जमेल तितकी सगळ्या प्रकारची शहानिशा करायची हे त्याने ठरवूनच टाकलं होत.
आता प्रश्न उरला होता तो सईच्या कपाळावर डाग आला याचा, असाच एक डाग सौम्यने त्याच्या मोठ्या बहिणीच्या हातावर बघितला होता. ती मैत्रिणींसोबत एका मैत्रिणीच्या लग्नाला जाणार होती तेव्हा. सौम्यला अजुन पण तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवत होता. तिची सगळी तयारी झाली होती, सौम्यची तेव्हा नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती. त्याची ताई घरातून निघाली त्यावेळी तिच्या हातावर पण असाच डाग आला होता. जायची घाई असल्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केले होतं. पण त्यानंतर ताई पुन्हा सौम्यला दिसलीच नव्हती. तिचं काय झालं हे कोणालाच माहित नव्हतं. पोलिसांनी देखील काही महिने शोध घेतला पण शेवटी हाती काहीच नाही लागलं. आणि आज तसाच डाग सईच्या कपाळावर बघून सौम्यला हे सगळं पुन्हा आठवत होतं.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults