वळीव-१

Submitted by हरिहर. on 30 May, 2019 - 06:38

आज सुट्टी असल्याने मला फारशी घाई नव्हती. फक्त पोळ्या केल्या तरी पार्थचे आणि गार्गीचे काम भागणार होते. बाप लेकी दुध पोळी आवडीने खातात. दुपारी काहीतरी घाट घातला की झाले. पार्थ सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता, दोन पोळ्या होईतोवर तो आला असता. मी एका बाजुला थोडी वेलची पुड टाकुन दुध गरम करायला ठेवले होते व दुसरीकडे पोळ्या करत होते. मागे फ्रिज उघडल्याचा आवाज आला. मला जरा आश्चर्य वाटले. पार्थ कसा काय इतक्यात आला? त्याला काही विचारावे म्हणून मी मागे पाहीले तर गार्गी फ्रिजमधुन काहीतरी काढत होती. तिने फ्रिजचे दार बंद केले आणि किचनओट्यावरचे सामान जरा बाजुला करुन हातातल्या सफरचंदाचा लचका तोडत ती टुनकन उडी मारुन ओट्यावर बसली. ही तिची नेहमीची सवय. इतरवेळी मी हसुन लेकीच्या गालाला पिठाचा हात लावला असता. पण आज माझ्या कपाळावर आठ्या आल्या.
मी जरा तुटक आवाजात म्हटले “किती वेळा सांगितले जीजी ओट्यावर बसत जाऊ नकोस अशी म्हणून. आणि पारोश्याने तर अजिबात नाही. जा अगोदर अंघोळ उरक. बाबा येईल इतक्यात”
गार्गी अगदी ठेवणीतला लडीवाळ आवाज काढत म्हणाली “असं काय गं अनू! मला आवडतं येथे बसुन तुझ्याशी गप्पा मारायला आणि तुला नुसतं पहायला सुध्दा. अन् सकाळीच अंघोळ झालीय माझी. तु लाटून दे, मी चटकन भाजते पोळ्या”
हे बोलताना ती गॅस लायटरचा टक टक आवाज करत होती. कमाले या पोरीची. रविवार असुन सकाळीच अंघोळ काय करतेय, पोळ्या भाजते काय म्हणतेय, काही समजेना. आज स्वारीचे काहीतरी काम असणार. तसही तिचे ते लायटर वाजवणे मला जरा अस्वस्थपणाचेच वाटले होते.
मी तिच्याकडे पक्कड सरकवत म्हटलं “झाल्यात माझ्या पोळ्या करुन. तू ते टक टिक करायचे थांबव आधी आणि हे दुधाचे भांडे घेऊन जा बाहेर. मी आलेच”

गार्गी भांडे बाहेर घेवून गेली. मीही तिच्या मागे पोळ्यांचा डबा घेवून बाहेर आले. समोरच पार्थ सेंटरटेबलवर पाय ठेवून सोफ्यावर निवांत बसला होता. बसला कसला, चक्क पसरला होता. “शिस्त म्हणून नाही अजिबात. रविवार म्हणजे काय वाटते दोघांना समजत नाही मला. अंगी नसलेला आळस मुद्दाम अंगात आणायचा, पसारा करायचा, नेहमीची कामे मुद्दाम उशीरा करायची किंवा करायचीच नाहीत, या गोष्टींमधे कसला आलाय सुट्टीचा आनंद? नाहीतर काय?” असल्या नको त्या विचारांनी अगदी वावटळ उठवली होती मनात. अशाच विचारात गुंतले तर ते ओठावर येतील की काय याची मला भिती वाटली. मन ताळ्यावर आणत आणि आवाज कमालीचा शांत ठेवत मी म्हणाले “अरे पार्थ, तू कधी आलास? आणि घामेजल्या अंगाने लोळतोय काय असा सोफ्यावर? उठ, अंघोळ उरक. मी पुन्हा दुध गरम करुन देणार नाही हां”
एवढा शांतपणा ठेवूनही शेवटचा ‘नाही हां’ जरा चढ्या आवाजातच आला असावा. कारण ‘काय वैतागे’ असा चेहरा करत, कानातले हेडफोनचे बोळे काढत पार्थ पाय ओढतच बाथरुमकडे गेला. मॉर्निंग वॉकवरुन आल्यावर फक्त दहा मिनिट सोफ्यावर बसला असेल पण एक पिलो जाग्यावर राहीली नव्हती. पानपतावर धारातिर्थी पडल्यासारख्या सगळ्या पिलो इकडे तिकडे माना टाकून पडल्या होत्या. मला आज सगळंच खटकत होतं.

गार्गीने बाऊल काढुन टेबलवर घेतले होते. मला काही खायचे नव्हतेच. एखादे सफरचंद चालले असते. नावाला अंग ओले करुन पार्थ आला. तोवर गार्गीने त्याच्या बाऊलमधे पोळी अगदी बारीक चुरुन ठेवली होती. फोर्कने एक केळे कुस्कुरुन दिले होते. पार्थने खुर्ची ओढली आणि गार्गीने त्याच्या बाऊलमधे दुध ओतुन चमचा त्याच्या पुढे केला. तिची ही तत्परता पाहुन त्यालाही जरा आश्चर्य वाटले असावे. त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मीही फक्त ओठ बाहेर काढले. मलाही गार्गीचे काय चालले होते सकाळपासुन ते समजत नव्हते. गार्गीचेच काय, मला माझेच काय चालले होते ते उमजत नव्हते. गार्गीने पोळी गुंडाळून रोल केला आणि मगामधल्या दुधात बुडवला. ते पहाताच माझ्या मनात आलेच “काय एकेक तऱ्हा आहेत हिच्या”
मी कुरबुरत म्हणालेही “अगो कुस्करुन खा की पोळी व्यवस्थित. हे काय रोल करुन खातेस? मला नाही आवडत अजिबात”
तरीही रोलचा मोठा तुकडा दातांनी तोडत, बोबड्या आवाजात गार्गी म्हणाली “हे काय गं अनु! मी सकाळपासुन पहातेय. तुझा सकाळपासुनच मुड बरा नाहीए अजिबात. लहान लहान गोष्टींवरुन कुरबुर सुरु आहे तुझी”
पार्थचे आमच्याकडे लक्षच नव्हते. तो चमच्याने दुधपोळी खात होता आणि दुसऱ्या हाताने फोनची स्क्रिन वर खाली फिरवत होता.
गार्गीने त्याच्याकडे मोर्चा वळवत म्हटलं “बाबा, तू काय करतोय आज? कुठे जाणार आहेस का”
पार्थ मान हलवत म्हणाला “नक्की नाही अजुन. तुझं काही काम होतं का? येईन मी सोबत”
गार्गी तिच्या चेअरवरुन उठली आणि पार्थच्या शेजारच्या चेअरवर बसत म्हणाली “माझं नाहीए काही काम. पण तू आज अनुला मुव्हीला का घेवून जात नाहीस? ती नाही का, तुला खुप दिवस पहायची होती, ती मुव्ही लागलीए. मी करते हवं तर बुकिंग”
पार्थचे लक्ष अजुन मोबाईलमधेच होते. मान वर न करताच तो म्हणाला “कोणती मुव्ही गं?”
आता मात्र गार्गीने पलिकडे वाकुन त्याचा मोबाईल घेतला आणि बंद करत म्हणाली “असा कसा आहेस रे बाबा तू? मी तुला सरळ सरळ सुचवतेय की अनुला घेवून जा आज दिवसभर बाहेर कुठे तरी. मुव्ही वगैरे पहा. तर कुठे आणि कोणती काय विचारत बसलास लगेच. की मुद्दाम करतोस असं?”
सकाळपासुन मला जरा अस्वस्थच वाटत होते, पण गार्गीची बडबड ऐकुन मात्र आता माझा मुड खराब व्हायला लागला. मी उठुन उभी राहीले आणि खुर्चीची पाठ घट्ट धरुन म्हणाले “मी कुठे जायचे आणि नाही जायचे ते परस्पर कसे ठरवताय तुम्ही दोघे? मी कुठेही जाणार नाहीए जीजी. माझे एक दोन लेख राहीलेत तसेच, ते पुर्ण करणार आहे आज. आणि हे काय सारखं ‘अनु अनु’ लावलं आहेस? कित्ती वेळा तुला सांगितलय की आई म्हण म्हणुन?”
माझ्याही नकळत माझा आवाज चढला. ते ऐकुन पार्थही जरा गडबडला. गार्गीच्या हातावर थोपटत तो मला म्हणाला “असं काय करतेस अनु? काय झालंय? खरच बरं वाटत नाहीए का तुला? गार्गीवर कशाला चिडतेय उगाच?”
त्याचे बोलणे ऐकुन मी गप्प झाले पण माझे धुमसने त्याच्या लक्षात आले. तो सावकाश उठला आणि त्याने मला खांद्याला धरुन चेअरवर बसवले. ग्लासात पाणी ओतुन माझ्या हातात देत तो नुसताच माझ्या शेजारी बसुन राहीला. गार्गीने निमुटपणे पोळीचा उरलेला रोल उलगडला आणि दुधात कुस्करला. तिलाही ‘आई नक्की कशाने चिडली आहे अचानक?’ हे लक्षात नसेल आले. भाबडी पोरं. तिला दुधात पोळी कालवताना पाहून मला एकदम भरुनच आलं. पाणी पिता पिता मला उगाचच हुंदका फुटला. डाव्या डोळ्यातुन नकळत एक टप्पोरा अश्रू गालावरुन ओघळला. काहीही कारण नसताना आजची प्रसन्न सकाळ मी एकदम तणावाखाली घेतली होती. लाडका नवरा आणि एवढी गोड लेक माझी, माझ्यामुळे विनाकारण दुखावली होती. आता काही केले तरी रविवारची ती आमची ‘खास’ तार आज जुळणार नव्हती. मी खुप विचार करुनही मला काय झाले होते ते नक्की समजत नव्हते. मी डोळे न पुसताच पार्थकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. त्यानेही अगदी मुकपणे नुसत्या डोळ्याने मला आश्वस्त केले. त्याचं असं मनापासुन समजुन घेताना पाहुन मला एकदम धिर आल्यासारखे झाले. मी गार्गीकडे पाहीले. तिने उरलेली पोळी संपवली होती आणि खरकटा हात तसाच ठेवून माझ्याकडे पहात होती.
मी तिच्याकडे पाहुन नेहमीचं हसले तेंव्हा फुरगटून म्हणाली “गेला का तुझा फेरा येवून? गेला असेल तर सांग म्हणजे मी माझा सुरु करते आता”
वातावरण जरा निवळतय हे पाहुन पार्थ हसत उठला आणि बाऊल, दुधाचे भांडे उचलुन किचनमधे गेला.
आतुनच त्याचा आवाज आला “झारा, लाटणे वगैरे काही आयुधे लागली तर सांगा गं बायांनो”
पण त्याचा विनोद ऐकुनही गार्गी हसली नाही. तशीच टप्पोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात राहीली. तिचेही डोळे पानावले होते. तिच्या आवाजातला लटका रुसवा मला जाणवला. त्याबरोबरच “मला खरच तुम्हा दोघांना काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे” हा टोनही अगदी खोल कुठेतरी जाणवून गेला. शेवटी आई होते मी तिची. माझी लेक मला नाही कळणार मग कुणाला कळणार! नेहमी स्पष्ट बोलणाऱ्या गार्गीने आज सकाळपासुन जे नमन लावलं होतं त्यावरुन मला एक मात्र लक्षात आलं होतं की तिच्या मनात जे चाललं आहे ते येताना सोबत काही तरी वादळ नक्की घेऊन येणार होतं. काय असेल? सकाळ पासुन आपल्याला जे अस्वस्थ वाटत होते, उगाच हळवं व्हायला होत होतं ते सगळे म्हणजे या अज्ञात आगंतुकाची तर चाहूल नसेल? मी कशी माझ्यातच गुंतले इतकी आज की लेकीला काही बोलायचेय हेच माझ्या लक्षात आले नाही? मला स्वतःचाच राग आला. गार्गीकडे पाहुन एकदम माझ्या आईचीच आठवण झाली. मी लगबगीने हातातला ग्लास बाजुला सारुन उठले. तिचा दुध-पोळीचा खरकटा तळहात एका हातात घट्ट दाबून धरुन दुसऱ्या हाताने तिला कव घातली आणि पोटाशी ओढत विचारले “काय झालं ग जीजे? माझंच मेलीच लक्ष नव्हतं आज बघ. काय झालं बाळ, मला नाही सांगणार?”

(पुर्ण काल्पनिक)
क्रमश:
वळीव-२

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<रोलचा मोठा तुकडा दातांनी तोडत, बोबड्या आवाजात गार्गी म्हणाली “>>>> हे वाक्य वाचून मला तरी ती टीनेज वाटत नाही >>>>>>>>>>>>>>>>>>
बोबडेपणा तात्पुरता असणार, खाण्यापुरता. आईला मुव्हीला ने, मी बुकींग करते म्हणणारी किंवा बाबाला पोळी कुस्करून/ दूध ओतून देणे, दोघांना काहीतरी महत्वाचे सांगायचे यावरून ती टिनेज / कॉलेजला जाणारी वाटते.

माफ करा पण ईतरांसारखाच माझाही नावांवरून गोंधळ झाला.
ते जीजी म्हणणे सुद्धा असेच गोंधळात टाकणारे आहे. गार्गी एकुलती एक असेल (अजून दुसर्‍या अपत्याचा ऊल्लेख आला नाही म्हणून असे वाटले) तर तिचे पालक तिला जीजी का म्हणतील? लहान भाऊ बहीण (शक्यतो मोठ्या) बहिणीला जीजी म्हणतात आणि तिच्या नवर्‍याला जीजा. जसे ताई, माई, अक्का नावे पडण्यासाठी कोणी तरी लहान्याने आधी तसे म्हणणे जरूरी असते.
गार्गी आईला अनू म्हणाली तर मला वाटले ह्या बहिणी आहेत... आणि मग पार्थ भाऊ.. गोंधळ झाला सगळा.
गार्गीच्या भावंडाचे पात्र यायचे आहे का पुढच्या भागात?

जीजी>>> गार्गी चा शॉर्ट फॉर्म आहे.
बाकी मला तरी काही घोळ नाही वाटला. माझ्या चुलत बहिनीचा मुलगा तर चक्क आजीला नावाने हाक मारतो, लता! (लहान आहे अजुन)
असतात लहानपणी मुलं असे...

आणि लहान मुलगीही विशिष्ट वेळी मोठ्या मुलीसारखी वागते....
ती विशिष्ट वेळ इथे काय, हे पुढच्या भागात कळेलंच..

गार्गी लहान नाहीये. तिला अनु आणि पार्थला काही महत्वाचं सांगायचं आहे. ती बाबाला आईला सिनेमाला ने म्हणुन सुचवतेय. ती स्वतः बूकिंग करुन देतेय. आणि मग आईला तुझा फेरा येउन गेला का? असं ही विचारतेय. म्हणजे ती नक्कीच टीनेजर किंवा प्रौढ झालेली आहे Lol

छान आहे हा भाग...
मलातरी नावांत काही प्रॉब्लेम नाही वाटत...
Gargee = GG. Happy

प्रतिसादासाठी सगळ्यांचेच धन्यवाद!

प्राचीन, चिडचिड कळली तरी खुप झाले. Happy

शशांकदा, साळुंकेदादा प्रतिसादासाठी थँक्यू!

आता जरा नावांविषयी. पार्थ आणि गार्गी ही जुनीच नावे आहेत. मध्यंतरी त्यांची फॅशन गेली आणि आता पुन्हा ट्रेंड आलाय इतकेच. माझ्या ७० वर्षांच्या काकांचे नाव पार्थ आहे. माझे स्वतःचे नाव पद्मनाभ आहे जे मराठी लोकांमधे आजही फारसे प्रचलित नाही. Happy हाक मारायचे नाव हरिहर आहे तेही सहसा आढळत नाही.

नात्यांविषयी सांगायचे तर कथेच्या तिसऱ्याच ओळीत मी सांगीतले आहे की पार्थ आणि गार्गी यांचे नाते वडील आणि मुलीचे आहे. दुसऱ्या पॅराग्राफमधे अनुच्या वाक्यांवरुन समजते की गार्गी ही अनुची मुलगी आहे.

@सस्मित, "संवादही जरा जड कृत्रिम वाटले. सहजता नाही." अगदी सहमत आहे. मलाही त्याची जाणिव आहे. स्रीभुमिकेतुन लिहिताना तसे थोडे होणारच. दुसरे म्हणजे खाण्याच्या प्रत्येक प्रांताच्या पध्दती असतात. आमच्याकडे आजही पोळी, भाकरी कुरतडून खाल्लेल चांगलं समजत नाही. आणि चुरुन खाणे ही आमच्या भागाची खासीयत आहे. कथेचा भाग म्हणुन समजुन घ्या. नाहीतर एखाद्या दाक्षिणात्य लेखकाने सांबार भात खायचे केलेले वर्णन वाचुन काय म्हणाल तुम्ही? Lol
"माझा प्रतिसाद सिरीयसली घेणार नाहीतच तुम्ही तसंही." असं का बरं वाटले तुम्हाला?

@दीपू भाऊ "शालीदा हे तुमचं म्हणजेच अप्पाचे लिखाण आहे की शालीताईंच ?" म्हणजे काय म्हणायचय तुम्हाला ते समजले नाही.

जीजी हा गार्गीचा शॉर्टफॉर्म आहे. GG. पुढच्या भागात त्याचा उल्लेख झाला असता.

जरा कथेविषयी. आजकाल बहुतेक मुलं वडीलांना अरेतुरे करताना दिसतात. माझ्या भावाची मुलगी मला अरे तुरे करते. सगळ्यांनी तिला खुप शिकवायचा प्रयत्न केला पण ती फक्त मलाच अरे तुरे करते, इतर काकांना अहो जाहो करते. आंणि आता मलाही ते आवडते. माझ्या मावसभावाची दहावीतली मुलगी तिच्या आईला नावाने हाक मारते. चिडली की मग मात्र आई म्हणून हाक मारते. मी पहिल्यांदा ते ऐकले तेंव्हा मला खुप छान वाटले. पिढी बदलत आहे हळुहळू. आपल्याला थोडे ऑड वाटणारच. पुर्वी नवऱ्याला 'इकडची स्वारी' म्हणायचे. आता हसु येते. आणि कथेतल्या पात्रांच्या चांगुलपणाविषयी म्हणाल तर हे अगदी साधे प्रसंग आहेत. अशा वेळी सगळे असेच वागतात. बायकोची मनःस्थिती ठिक नसते तेंव्हा बहुतेक नवरे समजुन घेतानाच मी पाहीले आहेत बुवा.

प्रतिसादासाठी पुनश्च सर्वाचे धन्यवाद! __/\__

अहो सांबार खायचं त्यात काय विशेष? ओरपुन फुरकुन सांबार राईस खाणारी माणसं मी ७ वर्ष सहन केलीत पाहिलीत Happy
पण चांगली रोल करुन खातेय पोळी तर ते आवडत नाहीये म्हणुन म्हटलं आईला मुड फारच बिघडलेला असावा.
असो.
आणि तुम्हाला मी फटकळ वाटते (असं एका धाग्यावरच्या प्रतिसादात वाचलं मी) म्हणुन म्हटलं माझी कमेंट काही मनावर घ्यायचा नाहीत तुम्ही. Happy बाकी काही नाही.
पुढचा भाग येउद्या.

मस्त आहे सुरुवात. कथा आवडली. आईचा मूड, बाबाचा आळस, मुलीची आईला खुश करण्याची धडपड सगळं क्युट वाटलं.

पुरुष लेखकांनी स्त्रीच्या मनात उतरून तीच व्यक्तीमत्व, तिच्या भावना इतक्या सुरेख उतरवणं : Thumbs up:

>>@दीपू भाऊ "शालीदा हे तुमचं म्हणजेच अप्पाचे लिखाण आहे की शालीताईंच ?" म्हणजे काय म्हणायचय तुम्हाला ते समजले नाही.<<

अहो, आत्तापर्यंत मिळालेली वन ऑफ दि बेस्ट काँप्लिमेंट आहे ती...

सगळ्यांचे धन्यवाद!
थॅंक्यू मीरा!
आदि, जागूताई खुप धन्यवाद!
राज, ते नंतर लक्षात आले.
सस्मित, सोमवारी दुसरा (आणि शक्यतो शेवटचा) भाग टाकेन.

सगळ्यांचेच खुप धन्यवाद!
तासाभरापुर्वी लिहायला घेतले आणि सुचेल तसा पुढचा भाग टाकला आहे.
खरे तर काहीही कथा डोक्यात नव्हती. जरा वेगळं लिहायचा प्रयत्न एवढाच हेतू ही कथा लिहिताना होती. उत्सुकता वाटावे असं काही नाहीए कथेत. किंबहुना मला सुचत नाहीए. पुन्हा असे धाडस करणार नाही हे नक्की. पुढच्या भागात कथा पुर्ण करेन. तेही दोनच दिवसात.

Pages