वास्तु ४

Submitted by जयश्री साळुंके on 12 May, 2019 - 13:08

सईबाई कायम त्या विहिरी जवळ बसून असत, लग्नाचे दिवस जवळ येत होते. तसं तसं त्याचं विहिरीवरचं प्रेम जरा जास्तचं व्हायला लागलेलं. शेवटी हळदीचा दिवस उगवला, एकीकडे संपूर्ण वाडा नव्या नवरीसारखा सजवला होता मल्हाररावांनी. कुमुदिनीबाई तर पहाटे ४ वाजेपासून सगळी कामं बघत होत्या. पोरीचं लग्न म्हणुन सगळ्या कामात जातीने लक्ष देत होत्या. त्यातच सकाळी साधारण ७-८ वाजे दरम्यान घरच्या सुनबाईंना कळा सुरु झाल्यात. मग तर कुमुदिनीबाईना श्वास घ्यायला पण उसंत मिळेनाशी झाली. एकीकडे मुलीच लग्न तर दुसरी कडे घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची तयारी यात त्या पुर्ण व्यस्त झाल्यात. बाळंतपण अगदी सुखरूप झालं. मुलाचा जन्म झाला आणि मल्हाररावांनी पुर्ण गावाला पेढे वाटले. पण याच दरम्यान सईबाईंकडे कोणाचचं लक्ष नव्हतं आणि त्या विहिरीच्या कठड्यावर उभ्या होत्या. इकडे सर्वांना वाटलं कि त्या स्वतःच्या खोलीत बसून तयारी करताय, त्यामुळे कोणी जास्त लक्ष पण दिलं नाही. बाळाच्या जन्माच्या थोड्या वेळानंतर कुमुदिनीबाई सईबाईंच्या खोलीकडे जायला निघाल्यात पण तेवढ्यात हळदीसाठी आलेल्या सवाष्णानीं त्यांना मधेच थांबवलं, तिथून कुमुदिनीबाई थेट सईबाईंच्या खोलीत गेल्या, पण खोली तर रिकामी होती.
सगळीकडे विचारपुस सुरु झाली. घरातल्या एका गड्याने सईबाईंना बागेच्या दिशेला जाताना पहिले होते. त्यामुळे कुमुदिनीबाई तिकडे वळल्यात. त्यांना भाबडी आशा वाटलेली कि पोरीचं लग्न ठरलं आहे तर पोरगी काही विहीकडे जाणार नाही, पण जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा सईबाई कठड्यावर उभं राहून विहिरीतल्या पाण्याकडे अगदी टक लावून बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर त्या क्षणाला कोणतेही भाव नव्हते. नजर अगदी शून्यात, बघणार्याला भीती वाटेल अशी. ते दृश्य बघून कुमुदिनीबाईंच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्यांनी सईबाईंना जोरात आवाज दिला, आवाज कसला दिला त्यांच्या तोंडून अक्षरशः किंचाळी बाहेर पडली. सईबाईंनी स्वतःच्या आईकडे एक कटाक्ष टाकला आणि विहिरीत उडी मारली.
सर्व लोकं जमा झालेत, काही गडी माणसांनी विहिरीत उडी मारली पण तोपर्यंत उशीर होऊन गेलेला. सईबाईंच शरीर बाहेर काढण्यात आलं, ते बघून कुमुदिनीबाईंची शुद्ध हरपली. आनंदात असलेलं घर दुःखाच्या सावटाखाली गेलं. वाड्यात सईबाईंची आठवण येते म्हणुन मल्हाररावांनी कुमुदिनीबाईंसोबत वाडा सोडला. रामरावांनी वाड्याची धुरा सांभाळली, पण त्यांची मुलं मात्र आजी आजोबांसोबत म्हणजेच मल्हारराव आणि कुमुदिनिसोबत राहायला पाठवली, जेणेकरून त्यांना सईबाईंची आठवण जरा कमी येईल आणि मुलांमध्ये जीव रमेल. रामरावांच्या नंतर मात्र वाड्याकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं. सगळे शहरातच रमलेले. आणि आता इतक्या वर्षांनी रंगनाथरावांनी वाडा पुन्हा माणसात आणलेला.
तर आता ह्या सई ला विहिरीची ओढ स्वस्थ बसू देईना. दवाखान्याचं काम चालु असल्यामुळे इतके दिवस सईचं काम घरूनच चालू होतं, पण आता ते काम पुर्ण होतं आलेलं. घरून काम करतांना तिला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती विहिरीजवळ जाऊन बसत होती पण आता दवाखान्यात जायला लागणार म्हणुन सईची चिडचिड व्हायला लागलेली. घरच्यांना वाटलं कि पोरगी शहरातुन आली आहे म्हणुन तिला निसर्गाच्या सानिध्याची ओढ असावी, आणि म्हणुन तिला कोणी टोकत पण नव्हत. पण एकदा तर हद्दच झाली जेव्हा सईने स्वतःचा पलंग विहिरीजवळ लावायला सांगितला. तिने घरात जाहीर केलं कि ती यापुढे बागेत, विहिरीजवळचं झोपणार.
घरातल्या सर्व मंडळींनी तिला समजवण्याचा खुप प्रयत्न केला, पण उपयोग शून्य. रंगनाथरावांनी शेवटी जाहीर केलं कि ते विहीर बुजवून टाकणार आहेत. पण याचा परिणाम उलटा झाला. सईने जेवण बंद केलं, दवाखान्यात सुद्धा ती जाईनाशी झाली, तिने घरच्यांसोबत बोलणं पुर्ण टाळायला सुरुवात केली. सर्वांनी तिला समजण्याचा आणि समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला, पण पुन्हा तेच अपयश. घरातली शांती, हसरं-खेळतं वातावरण पुर्णपणे ढवळून निघालं होतं.
पोरीला नक्की झालं काय आहे हे माहिती करून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. घरातल्या सगळ्या बायकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिला समजवायचा प्रयत्न केला. सईची आई आणि आजी यांच्या डोळ्याचं पाणी तर थांबायला तयार नव्हतं. शेवटी कंटाळून त्यांनी तिच्याच मित्र परीवारीतील काही डॉक्टरानां तिची परिस्थिती सांगीतली आणि त्यांना गावात बोलावून घेतलं.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सईबाई आणि सई दोघी वेगळ्या आहेत हे कथा पुन्हाएकदा सलग वाचल्यावर कळालं.
पु.भा.प्र!

[नविन भागांच्या सुरवातीला आधीच्या भागांच्या लिंक दिल्या तर कथा सलग वाचयला मदत होईल.]

वाचतोय!!
पण जरा मोठे भाग येऊद्यात

आताच चारही भाग वाचले..छानच सुरू आहे कथा..फक्त भाग थोडे छोटे आहेत ... मोठे भाग आणि लवकर लवकर टाका.. उत्कंठा वाढली आहे