वास्तु ३

Submitted by जयश्री साळुंके on 11 May, 2019 - 07:09

अशातच दोन वर्ष संपलीत आणि मल्हाररावानां सईबाईंसाठी योग्य असं स्थळ सापडलं. घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वाड्यातच नव्हे तर पुर्ण गावात त्यांच्या लग्नासाठी तयारी सुरु झाली. गाव तरी किती मोठं ते, इनमीन शे-सव्वाशे उंबरठे. त्यात मल्हारराव म्हणजे गावातलं मोठ प्रस्थ, त्यामुळे सईबाईंच लग्न म्हणुन सगळेच तयारीला लागले. आणि त्यातच अजुन एक गोड बातमी म्हणजे रामरावांच्या घरातला पाळणा लवकरचं हलणार होता, सुनबाईंचे दिवस भरत आलेले.
लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं पण सईबाईंच्या चेहऱ्यावरचं तेज हळु हळु कमी होत होतं, पण लग्नाच्या गडबडीत हा बदल कोणाच्या लक्षात नाही आला. सगळे जण लाग्नाची तयारी करत होते तर सईबाई जास्तीत जास्त वेळ विहिरीजवळ राहत होत्या, ना त्यांना वेळेच भान होतं न जेवणा-खाण्याचं, पहाटे पासुन त्या विहिरीवर जाऊन बसत आणि जोपर्यंत दुपारी कोणी घ्यायला येत नाही तोपर्यंत एक टक लावून फक्त पाणी बघत, बर्याचदा तर त्यांच दुपारच जेवण घेऊन कोणी गडी माणुस विहिरीवरच येई. कुमुदिनीबाईंना त्यांची काळजी वाटू लागली होती, त्यांनी सईबाईंसोबत बोलण्याचा बर्याचदा प्रयत्न देखील केला पण त्यांना उत्तर काही मिळालं नाही. शेवटी कंटाळून त्यांनी हि गोष्ट मल्हाररावांच्या कानी घातली. मल्हाररावानां वाटलं कि पोरगी घर सोडुन जायचं म्हणुन दुखी असावी आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. हि मल्हाररावांनी केलेली दुसरी चुक. कदाचित तेव्हा जर त्यांनी ती चुक केली नसती तर आज रंगनाथरावांना देखील त्यांच्या नातीवर हा प्रसंग ओढवला नसता.
रंगनाथ रावांच्या मोठ्या मुलाची मुलगी, सई. पोरगी मोठी हुशार, बाकीच्या भावंडांमध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे समजदार, चुणचुणीत, निर्णय घ्यायला खंबीर आणि स्वतःचा विचार बेधडक मांडणारी. गावात चांगली शाळा नाही म्हणुन रंगनाथरावांनी पुढाकार घेऊन सगळ्या नातवंडांना शहरात शिकायला पाठवलं होतं. मुलांसोबत रंगनाथरावांची लहानी मुलगी आणि रंगनाथरावांचे जावाई राहत. त्यांना स्वतःला देखील एक मुलगी होती पण ती अजुन इयत्ता दुसरी शिकत होती, आणि ह्या चौघ भावंडांचा त्यांना इतका लळा लागला होता कि ती भावाची नसून आपलीच मुले आहेत असचं सगळ्यांना ते सांगत.
तर ह्या एवढ्या मोठ्या पसार्यात पण सई सगळ्यात उठुन दिसे, समजूतदारपणा सोबतचं पोरीचं रूप पण शंभरात उठुन दिसेल असचं होतं, धारदार नाक, मासोळीसारखे डोळे ते पण घारे, गोरापान रंग, नाजूक चणीची त्यामुळे तिला अगदी वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासुन मागण्या येत होत्या, पण रंगनाथरावांची इच्छा होती कि पोरीने शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून मग काय तो निर्णय घ्यावा, त्यात सईच्या वडिलांची इच्छा होती कि तिने डॉक्टर व्हावं आणि गावात एक मोठं रुग्णालय बांधावं. सई सगळ्यांच्या इच्छा पुर्ण करीत होती. शहरातुन डॉक्टर बनुनचं पोरगी गावात परत आलेली. बाकीचे भावंड अजुन शिकत होते, त्यामुळे ते सर्व जण शहरातचं राहिले.
सईने गावी आल्या आल्या दवाखाना बांधायच्या कामाला सुरुवात केली, आणि दवाखान्याचं काम होई पर्यंत वाड्यातून कामाला सुरुवात केली. गावाचं पण एव्हाना तालुक्यात रुपांतर झालेले होतेच त्यामुळे तिला दिवसभरात कामाची कमतरता नव्हती. आतापर्यंत गावात एवढा शिकलेला डॉक्टर नव्हता म्हणुन लोकं अगदी छोट्या छोट्या सर्दी-खोकल्या पासून तर अगदी मोठ्या आजारांपर्यंत तिच्याकडेच सल्ला मागायला येत असतं.
पण घडायचा तो अनर्थ घडलाचं, बागेच्या जमिनीचा वापर नीट करावा म्हणुन सई पहिल्यांदा बागेची पुर्ण पाहणी करायची म्हणुन गेली. सोबत रंगनाथराव होतेच, त्यांनी तिला बागेचा पुर्ण परिसर दाखवला, आणि माघारी वळले, पण नेमकं तेव्हाचं सई च्या पायात काटा रुतला. काटा तर त्यांनी काढला पण रक्त वाहायला लागलं आणि आजूबाजूला चिखल असल्यामुळे जखमेत पण चिखल जाण्याची शक्यता होती. म्हणुन रंगनाथराव विहिरीतून पाणी आणायला गेले आणि सईचं पहिल्यांदा त्या अभद्र विहिरीकडे लक्ष गेलं.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिल्यांदा लिहिताय, म्हणून लहान भाग ठिक आहेत.
टाईप करायला खरंच खूप जीवावर येते.

हा ही भाग छान. तुमचे व्याकरणही चांगले आहे.

मुळात मला लिहायचा पण कंटाळा आहे, अगदी पेपर मध्ये पासिंग साठी लिहिल जायचं, जास्तीचे मार्क मिळायचे नाहीत, कारण जास्तीच लिहलेलं पण नसायचं. त्यामुळे हा आयुष्यातला पहिला प्रयत्न चालू आहे लिखाणाचा

सर्व भाग आल्याशिवाय माझ्यासारखे बरेच जण असे क्रमश भाग वाचत नाहीत. कारण : काही लेखकांच्या डोक्यात प्रतिसाद वाचून, हवा जाते. आणि कथेचे भाग टाकायला ते दिरंगाई करतात.
तेंव्हा सर्व भाग लवकरात लवकर टाका आणि 'समाप्त' दिसेल तेंव्हाच सर्व वाचून प्रतिसाद देईन.
धन्यवाद.

काही लेखकांच्या डोक्यात प्रतिसाद वाचून, हवा जाते. आणि कथेचे भाग टाकायला ते दिरंगाई करतात.+111
Intresting आहे कथानक.. मोठे भाग टाकायचा प्रयत्न करा.. आणि नियमित टाका.

कारण : काही लेखकांच्या डोक्यात प्रतिसाद वाचून, हवा जाते. आणि कथेचे भाग टाकायला ते दिरंगाई करतात. --- अगदी बरोबर आणि याउप्पर लिहिलेले डिलीट करून उगीच स्वताला ग्रेट समजत भाव खाण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

या लेखकाकडून मला भरपूर अपेक्षा आहेत, डोक्यात हवा जाऊन न देता ते उत्तम रहस्यमय कथा इथे सादर करतील. नारायण धारपपेक्षा ते उत्तम कलाकृती आपल्यासमोर मांडतील. त्यांना थोडा वेळ द्या फक्त.

@ मानसी
लेखकाच्या profile वर जा.तिथे लेखन वर टिचकी मारा.त्यांच आतापर्यंतच सर्व लेखन तुम्हाला वाचायला मिळेल.

o k