म्हणजे तसं काही खास कारण नाही विहीरीचं पाणी वापरायला, पण त्या विहिरची स्वतःची एक वेगळी कथा होती. रंगनाथ रावांच्या खापर पणजोबांनी मल्हारराव यांनी पाण्याची सोय म्हणुन बांधलेली ती विहीर. विहीर बांधताना त्यांना काही वस्तू तिथे सापडल्यात पण उगाच बाकीच्यांना शंका नको म्हणुन त्यांनी ती गोष्ट कोणाला सांगितली नाही. पण मी तर तिथेच होतो ना. मी बघितलेलं ते सगळं, काळे लिंबू, ती विचित्र अशी बाहुली, तिच्याकडे बघूनच किळस येत होती मला. पण मल्हाररावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळा घोळ इथेच झाला. मल्हारराव जुन खोड होते पण असल्या भाकड गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता, पहिलवान गडि तो, मनाने अतिशय चांगला, आखाड्यात एका वेळेला चार चार पहिलवानांना धोबीपछाड करणारा. पण त्या उलट त्यांची अर्धांगिनी, सौ कुमुदिनी बाई. गावची सगळी माणसं त्यांना बाईचं म्हणत. तशा मनाने बाई पण चांगल्या होत्या, गावच्या सगळ्यांना मदत करायच्यात. खंत फक्त एकच, लग्नाला सहा वर्ष उलटलीत तरी मुलबाळ होईना, गावच्या सगळ्या बायका त्यांचा आदर तर करायच्यात पण त्यांच्या पाठी मागे कुजबुज पण करायच्यात. मग म्हणुन नवसयास करून आता बाई ह्या मार्गाला लागलेल्या, अपेक्षा एवढीच कि त्यांच्या पोटी बाळाचा जन्म व्हावा. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, मुलगा झाला, रामराव नाव ठेवण्यात आलं. पण नवस देवाचा फळला कि अजुन कोणाचा हे नाही त्यांना कळालं म्हणुन बाईंनी सगळ्यांचे आभार मानले. पण विहिरीच्या जागेवर जे सामान त्यांनी ठेवलं होत ते तर मल्हाररावांनी आधीच फेकून दिलं होतं. मग मात्र बाईंची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली, सगळे उपचार करून मल्हारराव थकले. बाळाच्या पहिल्या वाढदिवशीच बाईंनी जगाचा निरोप घेतला. घरातल्या सगळ्यांनी मल्हाररावानां समजावून त्याचं दुसर लग्न लावून दिलं. सगळं काही सुरळीत सुरु होतं. दुसर्या बाईंच नाव पण मल्हाररावांनी कुमुदिनीच ठेवलं. बाई वयाने लहान होत्या पण घरात सगळ्यात मोठी सून म्हणुन जबाबदारी अगदी रीतसर पार पाडीत होत्या. त्यांना पहिली मुलगी झाली, बाळाचं नाव सईबाई ठेवण्यात आलं. त्याच दिवशी रामरावांचा पण वाढदिवस होता, आणि मोठ्या बाईंच श्राद्ध सुद्धा.
सईबाई दिसामासांनी वाढत होत्या, रामराव आणि त्यांच्यात अवघ्या दोन वर्षाचं अंतर, त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बाललीला बघण्यात पूर्ण वाड्याचा दिवस सरायचा. मल्हारराव आणि कुमुदिनीबाई तर प्रचंड आनंदात होते. पण जसे जसे दिवस सरत होते तसं तसं सईबाईना विहीरीचं आकर्षण वाटू लागलं. वाड्याच्या सगळ्या खोल्या, अंगण, बाग त्यांना खेळायला कमी पडू लागली. रामराव तसे कायम त्यांच्या सोबत असायचे म्हणुन त्यांना जास्त वेळ विहिरीकडे भटकता येत नसे पण त्यांची इच्छाशक्ती अति प्रबळ होत जात होती. असं करत करत चौदा वर्ष पुर्ण झालीत. सईबाई चौदा आणि रामराव सोळा वर्षाचे झालेत. आणि मल्हाररावानां त्यांच्या दोघांच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. योग्य स्थळ शोधायचे कार्यक्रम सुरु झालेत. रामरावांसाठी योग्य असं स्थळ सापडलं, पण सईबाईना शोभेल असा वर काही सापडत नव्हता. आणि त्यातच त्याचं विहिरीकडे जाणं सध्या जरा जास्तच वाढलं होतं. रामराव वडिलांना कामात मदत करायला लागल्यामुळे त्यांना वेळ कमी मिळे आणि जो वेळ मिळायचा तो त्यांना त्याच्या नव्या नवरीसोबत घालवायला आवडे. यात सईबाईकडे वेळ जास्तीचा होता आणि तो पूर्ण वेळ त्या विहिरीच्या काठी बसुन असत.
क्रमशः
वास्तु २
Submitted by जयश्री साळुंके on 10 May, 2019 - 11:01
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान चालूये. थोडा मोठा भाग
छान चालूये. थोडा मोठा भाग टाका
पहिला प्रयत्न आहे... सांभाळून
पहिला प्रयत्न आहे... सांभाळून घ्या
पहिलाच प्रयत्न असेल तर चांगले
पहिलाच प्रयत्न असेल तर चांगले लिहताय की!
पु भा प्र.