सुगरणीचा खोपा

Submitted by onlynit26 on 9 May, 2019 - 01:13

सुगरणीचा खोपा
केसात भांग पाडत बारक्याने आरश्यात वळून पाहिले आणि बर्म्युडा- टिशर्ट घालत घाईघाईने बाहेर पडू लागला.
"बारक्या खय जातस रे?" पडवीतून त्याची आई म्हणजे सुलक्षणा माई जवळजवळ ओरडल्याच.
"नदीर न्हावक जातंय." बारक्या सुकत घातलेले टॉवेल घेत म्हणाला.
"मगे थोड्या येळापूर्वी न्हानयेत कोण न्हालो?" सुलक्षणा माई कंबरेवर हात घेत दम देत म्हणाल्या.
"मी न्हालंय गे, पण माका नदीत परत न्हावंचा हा." बारक्याचे लॉजीक माईना काही कळेना. त्या बारक्या गेला त्या वाटेकडे बघत राहील्या. इतक्यात बारक्याचे बाबा लाकडाचा भारा घेवून आले. त्यानी तो भारा घराच्या मागच्या बाजूला नेऊन टाकला आणि ते अंगणात आले.
"आयकलास ओ, आपल्या बारक्याची लक्षणा काय ठीक दिसत नाय हत." सुलक्षणा माई त्यांना पाण्याचा तांब्या देताना म्हणाल्या.
" काय नाय गो. वयात इलो हा तो.आता थोडो काकारतलोच ना?" बारक्याचे बाबा हसत हसत म्हणाले.
"तुमचा आपला कायतरीच." असे बोलून त्या घरात गेल्या.
बारक्या सायकल दामटवत नदीच्या दिशेने जाऊ लागला. थोड्याच वेळात तो नदीवर पोचला. नदीच्या काठावर असलेल्या भल्यामोठ्या फातरीकडे त्याने लक्ष टाकलं तर तिथे दोन बायका कपडे धुत होत्या. त्यांना पाहून बारक्याचा रसभंग झाला. त्याला हवी असलेली व्यक्ती अजूनही आली नव्हती. त्याने आपली सायकल एका झुडपाच्या आडोशाला लावली आणि तो तसाच पुढे गेला. कपडे काढून नदीच्या पाण्यात उतरला. तो खुप वेळ तसाच पोहत राहिला. पण त्याला हवी असलेली व्यक्ती काही येत नव्हती. शेवटी कंटाळून तो पाण्यातून बाहेर आला. अंग पुसता पुसता त्याला नदीच्या वरच्या बाजूला कोणीतरी बोलल्याचा आवाज आला. ती बोलणारी माणसे दिसायला लागली तसा त्याचा चेहरा खुलला. त्याला हवी असलेली व्यक्ती नदीच्या दिशेने येत होते. त्याने हातातील टॉवेल हळूच खाली ठेवत पुन्हा पुन्हा पाण्यात उडी मारली. त्या अगोदर त्याच्या मनाने केव्हाच उडी मारली होती.
चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या परबांकडच्या पूजेत त्यांच्याकडे आलेल्या पाहुणीकडून त्याला हिरवा कंदील मिळाला होता. त्या पाहुणीच्या मागे बरेच जण होते पण बारक्याचा नंबर पहिला लागला होता. तेव्हापासून बारक्या वेडा व्हायचा बाकी राहिला होता. गोरा गोमटा बारक्या अंगाने सडपातळ असला तरी चार चौघात उठून दिसणारा होता. शिवाय गावाजवळील शहरात कामाला होता. आज त्याला आपल्या भावंडासोबत 'ती' नदीवर जाणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. त्यासाठी त्याला परबांच्या घरातील सातवीत असणाऱ्या पमूचे खिसे गरम करावे लागले होते.
ती चार पाच जणींबरोबर नदीकडे आली तसा बारक्या पाण्यात सुर मारू लागला. फातर खाली होईपर्यंत त्या सर्वजणी काठावरच उभ्या राहिल्या. तिची नजर बारक्यावर पडली तसे बारक्या तिच्याकडे बघून ओळखीचे हसला. ती मुंबईची असल्याने तो पुढाकार घ्यायला घाबरत होता. पण समोरूनच लाईन साफ मिळत होती. तिही बारक्याला पाहून हसली. जेव्हा त्यांची दुसऱ्यांदा नजरानजर झाली तेव्हा मग बारक्याने आपले सगळे दात दाखवत पाण्यात उलटा सुर मारला. जेव्हा तो पाण्यातून वर आला तेव्हा ती त्याला त्याच्याकडे विस्फारलेल्या नजरेने बघत होती. तिच्या साठी बारक्याच्या पाण्यातील करामती अचंबित करणाऱ्या होत्या. त्याचे उघडे शरीर न्याहाळताना तिची घालमेल होत होती. थोड्यावेळाने बारक्या ती कपडे धुत असलेल्या फातरीच्या आजुबाजुला पोहू लागला. तिच्या सोबत आलेली भावंडे लहान असल्याने त्यांना या दोघांचे प्रेमचाळे समजत नव्हते. बारक्या फुल जोशमध्ये आला होता. पाण्यात तऱ्हेतऱ्हेचे कसब करून दाखवत होता. तिही त्याला पाहून खुश होत होती. अचानक बारक्याने पाण्यात डूबकी मारली आणि पाच मिनिटे झाली तरी वर आलाच नाही. हे पाहून तिचा जीव कासावीस झाला. नविनच प्रेम असे बुडाले म्हणजे छत्री घेतल्या घेतल्या हरवल्याचे जसे दुखः होते तसे काहीसे तिचे झाले. ती मनातून चरकली. ती जोरजोरात ओरडू लागली. पण सोबत आलेल्या मुलींनी तिला गप्प केले. त्या मुलींना बारक्याची नाटके माहीत होती. त्या पोरी काही न बोलता खाली मान घालून हसू लागल्या. शेवटी बारक्याला पाण्यात जास्त दम धरता येईना. तो वर आला. त्याबरोबर तिचा जीव प्लास्टिकच्या टबात पडला. तिची धडधडत असलेली छाती पाहून बारक्या पाण्याच्या बाहेर आला. हीच ती वेळ होती. जिथे सायकल ठेवली होती तिथे जाऊन त्याने बर्म्युडा पँटच्या खिशातील एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर काहीतरी लिहीले. तो कागद हळूच तिच्या बाजूला टाकला. तिची नजर त्याच्यावर होतीच. बारक्या परत पाण्यात येऊन पोहू लागला पण त्याच्या काळजात धडधडत होते. प्रपोज करायला ही वेळ योग्य होती का? तिने नकार दिला तर? सगळ्या चाळ्यांना मैत्रीचं नाव देऊन तिने प्रेमाला बगल दिली तर? असे हजार प्रश्न त्याच्या मनात आले. तिने तो कागद कपडे सुकत घालण्याचे निमित्त करून उचलला. ती पाठमोरी असल्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत त्याला नव्हते पण ती जेव्हा परत नदीकडे तोंड करून कपडे धुवायला येऊ लागली तेव्हा बारक्याकडे पाहत ती चिठ्ठी आपल्या टॉपमध्ये गळ्याकडून हात घालत हृदयापाशी ठेवली. एका वेगळ्या ढंगाच्या होकाराने बारक्या पाण्यातच नाचू लागला.
अजून दोघांना एकमेकांचे नाव देखील माहीत नव्हते. तिचे कपडे धुवून होईपर्यंत बारक्या पाण्यातच भिजत राहीला. तिला अचानक काय झाले काय माहीत. ती गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यात तोंड धुण्यासाठी म्हणून गेली.
" गो शितल्या मॅडबिड झालस काय गो? पुढे जाव नूको पाणी खोल हा तकडे" तिच्या सोबत आलेल्यापैकी कोणीतरी बोलले.
" हे बघ , माझे नाव शीतल आहे. मला शितल्या म्हटलेलं आवडत नाही." बारक्याला तिचे नाव कळले. फक्त तिचा फोन नंबर मिळवायचा बाकी होता.
ती सगळी वाटेला लागल्याबरोबर बारक्याही आपल्या सायकलवरून घरी निघाला. बारक्याला त्याचा खुप मोठा विजय झाल्याचा आनंद वाटत होता. हिंदी गाण्याची शीळ वाजवतच तो घरात शिरला. माईनी ताटात वाढलेले कधी नव्हे ते न कुरकुरता जेऊ लागला
"बारक्या बरो हस ना?" माईनी त्याला भातावर कुळीथाची पिठी घालत विचारले.
"होय, बरो आसय , माका काय झालाहा?" तो जेवता जेवता म्हणाला.
"तसा नाय, तूका पिठी आवडत नाय तरीपण खातस म्हणान इचारलंय."
"गो खाता हा तेका खावदे ना, तू कीत्याक कीसपाटा काढीत बसतस. तेचा वयच तसा हा, कधी काय आवडात तेचो धरबंद नाय." बाजूला बसलेले बारक्याचे बाबा गालात हसत आपल्या पेल्यातील उरलेली पिठी त्याच्या भातावर ओतत म्हणाले. आपला बाप आपल्याकडे पाहून हसतोय हे पाहून बारक्या लाजला. तो आपले जेवण आटपून कामाला सुट्टी असल्याने वाडीत फिरायला गेला. त्याला परत एकदा शीतलचे दर्शन हवे होते.
बारक्या तडक निघाला तो परबांच्या बाजूच्या घरातल्या अंगणात जाऊन बसला. कधी नव्हे ती त्याने राण्यांच्या दाजींना हाक मारली. दाजींना कमाल वाटली. कधी न येणारा बारक्या आज आपल्याकडे कसा?
" बारक्या खय रे?" दाजीनी त्याला विचारले.
" खय नाय ओ. तुमच्याकडेच इल्लय." बोलताना बारक्याचे पुर्ण लक्ष परबांच्या घराच्या मागच्या दाराकडे होते.
कुठेतरी पाणी मुरत असल्याचा दाट संशय दाजींना आला. थोडावेळ बारक्यासोबत बोलून ते तिथेच अंगणात 'चोपाळ्यावर' झोपले. झोप निमित्त होते. बारक्या काय करतो ते त्यांना पाहायचे होते. बराच वेळ झाला तरी बारक्याचे काम होत नव्हते. दाजी बारक्याची चुळबूळ बघून मनातल्या मनात खुश होत होते.
थोड्या वेळाने बारक्याने घातलेली मांडी थोडी सैल केली आणि उभा राहिला तसे दाजीनी डोळे किलकिले केले. तिकडे शीतल बाहेर आली होती. दाजींचा अंदाज खरा ठरला होता. परबांकडे आलेल्या नवीन पाहूण्या पोरीसाठी सगळे चालले होते. बारक्या नजर लावून होता. पण शीतलची नजर काय बारक्यावर पडत नव्हती .
शेवटी बारक्या खाकरला. त्या बरोबर शीतलने मागे वळून पाहिले. हालचालींना वेग आला. बारक्याने शीतलला भरडावरच्या शाळेकडे ये असे खुणेनेच सांगितले. शीतल पण बारक्याची वाट बघत असावी. शीतल चिंचा निवडायला जाते असे सांगून लगेचच भरडाच्या दिशेने निघाली. चिंचेकडील जागेकडे कोणी फिरकत नसे. थोड्या आडवाटेला असलेल्या चिंचेखाली सामसूम असायची. बारक्या पण जायला उठणार इतक्यात दाजीनी त्याला पकडले
" बारक्या काय चल्लाहा ह्या?"
" खय काय? शाळेकडे जावन येतय जरा."
दाजी काय समजायचे ते समजले. मनाशी काहीतरी ठरवत त्यांनी बारक्याला सोडून दिले. बारक्याने कीतीही लपवले तरी दाजींच्या बेरक्या नजरेतून तो सुटणारा नव्हता.
दाजी वय वर्षे ५५. मजबूत शरीरयष्टी. झुपकेदार मिश्या , गाल थोडे बसलेले, गोरेपान शरीर,रंगावरून वाडीतील पोर त्यांना दाजीभट असे चिडवायची. पण दाजींना त्याचे सोयरसुतक नसायचे. गावातील सगळी पोरे त्यांना टरकून असायची कारण ते स्टिंग ऑपरेशन करण्यात तरबेज होते. काही लोक तर म्हणे आपल्या खाजगी बाबींचा छडा लावण्यासाठी दाजींना सांगायचे. अर्थात त्याचा योग्य तो मोबदला ते घेत असत. आपण त्यांना गावातील डीटेक्टीव म्हणायला हरकत नाही. तर अशा या दाजींकडे येऊन बारक्या फसला होता.
बारक्या शाळेकडे पोचला तेव्हा शीतल अगोदरच तिथे येऊन उभी होती. दोघांची नजरानजर झाली. तिच्या नजरेने बारक्या पुरता घायल झाला. बारक्याला आतापर्यंत पुऱ्या पंचक्रोशीत शीतल सारखे कोणीच सापडले नव्हते. शीतलही तशीच होती. भरलेले शरीर, मध्यम उंची, गोल चेहरा, लालचुटूक ओठ,गोबरे गाल, छातीवरच्या उन्नत उभारामुळे तिने घातलेल्या टॉपमध्ये छान दिसायची. चुडीदार ड्रेस मुळे तिचे अंग प्रत्यंग उठून दिसत होते. बारक्या तिच्या पुढे चालत असला तरी त्याचे सगळे लक्ष तिच्या कडेच होते. ते ते दोघे चिंचेच्या झाडाकडे पोचले तेव्हा तिथून दाजी खाली जाताना दिसले. बारक्याच्या अंगाचे पाणी पाणी झाले. तो जागच्या जागी थांबला. शीतलला पण त्याने थांबायला सांगितले. दाजीनी त्यांना पाहिले नसले तरी इथून पुढे जाण्यात धोका होता.
"शीतल, माका पुढे जावक भय दिसता."
"का? काय झाले?" तिने दाजींना पाहिले नसल्यामुळे तिला बारक्याची माघार पटत नव्हती.
"अगो राण्यांचे दाजी, आताच हयना पुढे गेले, ते बघलस नाय काय?"
"दाजी जाईनात का, आपल्याला ते काय करणार?”
"माझे आवशी हळू बोल, तुका कसा आता इस्कटून सांगु सगळा..." बारक्या दबक्या आवाजात शीतलला म्हणाला.
"इस्कटून म्हणजे?"
"तू हयसून चल पयला, नायतर आपली लवस्टोरी हयच संपायची." ती दोघं नाईलाजाने मागे फिरली.
त्या दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. शीतल थोडी नाराज झाली. बारक्या तिच्या दसपटीने नाराज झाला. पण धोका पत्करून चालणार नव्हते. त्यांची पहिलीच खासगी भेट अशी फसली होती.
त्या दिवसापासून त्यांनी भेटी गाठी काही दिवसांसाठी स्थगित केल्या . मोबाईल वर गप्पागोष्टी होऊ लागल्या. दाजीनीही हार मानली नव्हती.
एके दिवशी बारक्या आणि शीतलला राहवले नाही. गप्पागोष्टी खूप झाल्या. आता त्यांना भेट हवी होती. पण तशी मोक्याची जागा मिळत नव्हती. शेवटी तो दिवस उजाडला. बाळकृष्ण देसाई यांच्या घरात लग्न होते त्या दिवशी त्यांच्या काजूबागेत बारक्या आणि शीतलने भेटायचे ठरवले.
परबांच्या घरातील पमूला बारक्या आणि शीतलचे प्रकरण माहिती होते. बारक्याने पम्याचे गरम केलेले खिसे आता थंड पडत आले होते ते परत गरम व्हायला हवे होते. तो तडक दाजींकडे निघाला.
तो दाजींच्या अंगणात आला तेव्हा दाजी लाकडी पलंगावर झोपलेले होते.
त्याने दाजींच्या पायांना हात लावत त्यांना उठवले.
"काय रे पमल्या, दुपार तिपार नीज नाय तुका?" दाजी कुस बदलत म्हणाले.
"दाजीनू बातमी आयकश्यात तर झोप उडात तुमची." पमू पण दाजींच्या तालमीत तयार होत होता. त्याचे पहिले गिऱ्हाईक बारक्या होता.
"कसली बातमी?"
"बारको आणि शीतला आज देसायांच्या काजीत वडाखाली भेटाची हत, मेन केस तुमच्याकडे हा म्हणान तुमका खबर देतय." हे ऐकल्याबरोबर पमूच्या हातात पन्नास रूपये कोंबत दाजी देसायांच्या बागेकडे निघाले. बाग जवळ आली तसे दाजींनी पायातील चप्पल हातात काढून घेत पाचोळ्याचा आवाज होऊ न देता पायाच्या चवड्यावर चालू लागले. बागेच्या शेवटच्या टोकाला असलेला वड त्यांच्या दृष्टिक्षेपात आला. बारक्या- शीतल एकमेकांच्या बाजूला बसून सुरक्षित अंतर ठेवत गुजगोष्टी करत असतानाच दाजीनी आपल्या मोबाईल मध्ये त्यांचे चार पाच फोटो काढले आणि दोघांसमोर उभे ठाकले. दाजींना पाहून दोघांची पळताभूई थोडी झाली. सुरूवातीला घाबरलेला बारक्या लगेचच स्थिर झाला. त्याने शीतलला घरी जायला सांगून दाजींसोबत व्यवहाराचे बोलू लागला. बारक्याची मान आता पूरती अडकली होती. त्याचे आणि दाजीचे व्यवहार पुढे चालूच राहीले.
शेवटी शीतल मुंबईला जायचा दिवस जवळ आला. शीतलने भली मोठी यादी काढून बारक्याजवळ दिली. ती बघून बारक्या उडालाच. अगोदरच दाजी त्याचा खिसा ब्लॅकमेल करून खाली करत होते. त्यात या सगळ्याची भर पडली होती. तरीपण प्रेमाखातर सगळ्या भेटवस्तू तो जमा करायच्या कामाला लागला. काजूचे गर, आंब्या फणसाच्या पोळ्या, चारोळ्या, ताजी जांभळे, शीतलच्या आईला कोकम,कोकम तेल (मुटयाल) आणि खास शीतलसाठी सुगरणीचा खोपा. चार दिवसात बारक्याने काही वस्तू आपल्या घरात चोरी करून तर काही विकत घेऊन जमा केल्या. जांभळे आणि सुगरणीचा खोपा सोडून सारे काही मिळाले होते. जांभळे आदल्या दिवशी काढणार होता. प्रश्न होता तो सुगरणीच्या खोप्याचा. त्यासाठी बारक्याने खुप शोधाशोध केली पण सुगरणीचा खोपा काही त्याला मिळत नव्हता. अखेरीस दामू भटाच्या बागेत एका माडाच्या झाडावर तसे दोन घरटे असल्याचे बारक्याला कळले. पण दामू भट या नावानेच त्याला कापरी भरायची. खाष्ट दामू भट आपल्याजवळची कोणतीही वस्तू द्यायला तयार नसायचा. महाकंजुष माणूस होता तो. तिथे जाण्यात शहाणपण नव्हते. लहानपणी शाळेत असताना बारक्याला दामू भटाचा चांगलाच अनुभव आला होता.
त्याचे असे झाले, बारक्या आणि त्याचे शाळकरी मित्र शाळेच्या जवळ असलेल्या टोमॅटोच्या शेतात टोमॅटो खाण्यासाठी घुसले. लालभडक टवटवीत टोमॅटो पाहून पोरे त्यावर तुटून पडली. दुपारची वेळ होती. सर्वजण टोमॅटो खात खात चवळीच्या शेंगा पण ओरबडत होते. या सगळ्यात गुंग असताना पोरांना शेतात दामू भट त्यांच्याकडे येताना दिसला. बारक्यासकट सगळी पोरं हातातील टोमॅटो आणि चवळीच्या शेंगा खाली टाकत पळू लागली. दामू भट पोरं ज्या वाटेने आली होती त्या वाटेनेच आला असल्याने पोरांचे बाहेर पडायचे वांदे झाले. अशातच मुले वाट फुटेल तिकडे धावू लागली. बारक्या सोडून सारेजण बाहेर पडले. बारक्याची तब्येत तुंदिलतनू असल्याने त्याला तारेच्या कुंपणातून बाहेर पडता येईना. तो दामू भटाच्या तावडीत सापडला. दामू भटाने सुरूवातीला त्याला काहीएक न बोलता त्याच्या ढुंगणावर रपारप वेताच्या बारीक काठीने मारायला सुरुवात केली. शेवटी सज्जड दम भरत त्याला सोडून दिले. ही गोष्ट बारक्याने कोणालाच सांगितली नाही. दामूनेही हा प्रकार शाळेपर्यंत नेला नाही. या दिवसापासून बारक्या दामूला टरकूनच होता.
आणि आज बारक्याला अधिक चौकशीअंती एक बातमी लागली होती की , ते दोन खोपे दामू भटाने आपल्या भाचीसाठी राखून ठेवले होते. ते काहीही असले तरी प्रेमात आंधळ्या झालेल्या बारक्याने धोका पत्करत खोपा मिशनवर निघाला. त्याने एक बेत करून त्याप्रमाणे तो एके दिवशी पहाटेच कामगिरीवर निघाला. चांदणे असल्यामुळे पायाखाली व्यवस्थित दिसत होते. बोंबाबोंब होईल म्हणून त्याने सोबतीला कोणालाच घेतले नाही. बागेत शिरल्या शिरल्या त्याने मोबाईल सायलेंट करून ठेवला. खोपे असलेल्या माडावर झपाझप चढला. अलगद त्या दोन घरट्या मधला एक खोपा काढून हातात घेतला. तो माडावरच मनातल्या मनात जाम खुश झाला. घरट्याचे बांधकाम ,विणकाम जबरदस्त होते. शीतल खोपा पाहून जाम खुश होणार होती ह्याबद्दल बारक्याच्या मनात शंकाच नव्हती. एका हातात घरटे आणि दुसऱ्या हाताने माडाच्या खोडाला धरून बारक्या वरून उतरू लागला. एवढ्यात त्याच्या चड्डीमध्ये काहीतरी हूळहूळले. दोन हात बांधलेल्या बारक्याची परीस्थिती नाजूक झाली. दोन तीन 'हूमले' (लाल पिवळसर मोठ्या मुंग्या) अंगाला डसले. त्याने कसाबसा तोंडावर ताबा ठेवला पण हात सुटला आणि १० फुटावरून खाली पडला. नशीब चांगले म्हणून माडाच्या झावळांवर पडला. पण झावळांखाली एक नारळ पडलेला होता त्याने घात केला. त्यावर बारक्याचे ढुंगण चांगलेच आपटले. थोडा वेळ त्याला उठायलाच जमेना पण पडताना झालेल्या आवाजाने दामूभटाचे कुत्रे भुकांयला लागले. तसा बारक्या मार लागलेले ढुंगण सांभाळत घराकडे धावत सुटला. त्यात कमाल म्हणजे घरट्याला मात्र त्याने अजिबात इजा पोहचू दिली नाही. सुगरणीचा खोपा जशास तसा घरी घेवून आला.
दुसऱ्या दिवशी बारक्या कोणाच्याही नजरेस पडला नाही. शीतलला पण नाही. शीतल काळजीत पडली. बारक्याच्या ढुंगणाला बराच मूका मार बसल्यामुळे त्याला उठता बसताना खूपच त्रास होत होता. बारक्याने घरी ओहोळात पडलो, असे खोटे सांगितले असले तरी सुलक्षणा माईला खरे वाटेना. घरात शौचालय असताना ओहोळात कशाला गेला?पंधरा दिवसांपूर्वी पण असाच घरात आंघोळ करून परत नदीवर गेला होता. असे प्रश्न माईंना पडले. तरीही त्यांनी आईच्या मायेपोटी बारक्याला हळद तुरटीचा लेप लावला होता. बारक्या मात्र मनातल्या मनात चड्डीत घुसलेल्या मुंग्याना शिव्या घालत बसला होता.
शीतल जायचा दिवस उजाडला. बारक्या तब्येत ठीक नसताना पण शीतलला भेटायला गेला. शीतललाही ढुंगणाला मार लागला हे काही त्याने सांगितले नाही. दाजींना हप्ता पोचत असल्याने त्यांनीच एक सुरक्षित जागा बारक्या आणि शीतल यांच्या भेटीसाठी बघून दिली.
" तू का असा चालतोयस?” बारक्याला लंगडताना पाहून शीतलने विचारले.
" काय नाय गो , व्हाळात पडलंय." असे बोलून तो कसनुसा हसला.
बारक्या आणि शीतल तिथे पोचले तेव्हा दिवस मावळतीकडे कलला होता. बारक्याने भेटीची पिशवी आणि सुगरणीचा खोपा शीतलला दिली. तिला खूप आनंद झाला. पिशवीतील वस्तू बाहेर काढत शीतल मनातल्या मनात सांगितलेल्या सगळ्या वस्तू आल्याची खात्री करत होती आणि बारक्या ती त्याला मिठी मारेल या आशेने तिच्याकडे बघत होता. पण ती त्या भेटवस्तू पाहण्यातच गुंग झाली होती. शीतल आपल्याला पण काहीतरी भेटवस्तू देईल असे त्यालाही वाटले होते. तसे त्याने तिला वेळोवेळी आपल्या जवळ चांगले घड्याळ नाहीये असे सांगितले देखील होते. पण ती रिकाम्या हातानेच आली होती. शेवटच्या दिवशी तर शीतलकडून बारक्याला चुंबनही हवे होते, त्यासाठी त्याने दुपारपासून तीन वेळा ब्रश केले होते. त्याच्या या वागण्यामुळे सुलक्षणा माईंना प्रश्नावर प्रश्न पडत होते. सकाळी एकदा ब्रश करायला कुरकूर करणारा बारक्या आज तीन तीन वेळा ब्रश करत होता. त्याला कुठे माहीत होते की शीतल उपवासाचे कारण सांगून त्याचे तोंड कडू करणार होती ते. या सगळ्या प्रकाराने बारक्या खुपच हळवा झाला होता. हुळहुळते ढुंगण सांभाळत बारक्या शीतलच्या बाजूला बसत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"इतक्या सगळा मागलंस ता कोनाकोनासाठी?"
"काजूगर लहान भावासाठी, मुठ्याल बाबांच्या पायाला लावण्यासाठी,कोकमं आईसाठी." शीतल आंब्याच्या पोळीचा सुवास घेत म्हणाली .
"आणि सुगरणीचो खोपो? "बारक्याने असं विचारल्यावर शीतल भलतीच लाजली. तिने आपला चेहरा ओढणीमध्ये लपवत दुसरीकडे पाहत म्हणाली.
" खोपा विनयसाठी. "
" विनय कोण? " तिच्या खांद्याला पकडत बारक्याने विचारले. विनय नाव ऐकूनच बारक्याचा विनय संपला होता. इतके दिवस सुरक्षित अंतर ठेवलेल्या बारक्याने पहिल्यांदाच तिला असा स्पर्श केला होता.
" माझा बॉयफ्रेंड. त्याचा कांदिवली चारकोपला बंगला आहे. त्यात त्याला तो टांगायचा आहे."
हे ऐकून बारक्याचे तोंड उघडेच राहिले. आपल्या सोबत झालेल्या धोक्याने त्याला क्षणभर काहीच कळत नव्हते. लगेचच तो भानावर आला. त्याचा हात भेटीच्या पिशवीकडे आणि खोप्या कडे गेला पण ते सगळे घेवून शीतल बरीच पुढे गेली होती. बारक्याला सूजलेल्या ढुंगणामुळे नीट चालताही येत नव्हते त्यामुळे तिच्या मागे धावणे बाजूलाच राहीले. तो काहीच करू शकला नाही.
ढुंगण सुजले असले तरी त्याच्या बुद्धीला गंज चढला नव्हता. त्याने लगेच पमूला फोन फिरवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल उठली तेव्हा खुंटीला टांगून ठेवलेली पिशवी आणि खोपा गायब होता. पण पमूचा खिसा मात्र परत एकदा गरम झाला होता. त्याला शीतलचे उतरलेले तोंड पाहून हसू येत होते.
समाप्त..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्स्तच. हेका म्हणतत मालवणी हिसको.
" काय नाय गो. वयात इलो हा तो.आता थोडो काकारतलोच ना?" बारक्याचे बाबा हसत हसत म्हणाले. >>तो काकारतलो शब्द वाचून कोंबडा दिसला डोळयासमोर आणि हसूच आले.

Lol मस्त

Pages