पूरा लंडन ठुमकदा..

Submitted by Barcelona on 9 May, 2019 - 00:31

“किती वाजले?”
“नक्की नाही माहिती, पण १० वाजले असावेत.”
“हम्म … जॉन-हेनरी गेल्यापासून वेळेची फारच पंचाईत होते.”
साल 1856 मध्ये हा संवाद जणू रोजच व्हायचा. अशातच मारियाला ऐयरी साहेबांचा निरोप मिळाला. लंडनच्या गोठवणाऱ्या हिवाळ्यात मनाला ऊब देणारी बातमी होती ती. त्यांनी मारियाला जॉन-हेनरीचे काम पुढे चालू ठेवायला परवानगी दिली होती! पण एका अटीवर - जॉन-हेनरी प्रमाणे तिला ते नोकरीवर ठेवणार नाहीत, तिने आपल्या मेहनतीचा मोबदला म्हणून व्यापाऱ्यांकडून वर्गणी घेतली तर त्याला त्यांची ‘ना’ नव्हती पण नोकरी देणार नाही. मारियाला ते अगदी मान्य होते.

हल्ली डोअर स्टेप सबस्क्रीप्शन सर्व्हीसेस किंवा घरपोच सदस्य सेवा उत्तर अमेरिकेतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. अगदी आज आपल्यापैकी कुणी स्टीचफ़िक्स, कुणी ब्ल्यू एप्रन, तर कुणी ऍमेझॉन अशा कंपन्यांच्या सेवेचा लाभ घेतला असणार. कुणी “बॉक्स डावीकडे ठेवावा. उंबऱ्यावर ठेवायला ते काही माप नव्हे” अशा पाट्याही दारावर लावल्या असतील. कदाचित इंटरनेट द्वारे सभासद झाला नसाल पण किमान दूध, वर्तमानपत्र अशा परंपरागत घरपोच सदस्य सेवांचा लाभ घेत असाल. आजही असे व्यवसाय सुरु करणे धाडसाचे आहे. मग त्याकाळात तर दूध, वर्तमानपत्र ही घरपोच सर्रास मिळत नसे. १८५६ मध्ये मारियाला अशा व्यवसायाला परवानगी मिळाली ही मोठी नवलाईची गोष्ट होती.

त्या काळी ‘बिग बेन’ घड्याळाचे बांधकाम अजून पूर्ण झाले नव्हते आणि ‘घड्याळांचे कारखाने’ म्हणजे नुसती कविकल्पना ठरली असती. घड्याळजीं (क्लॉकमेकर्स) मंडळी हाताने घड्याळे बनवत. सरकारी किंवा दरबारी लोकं करार करून महागामोलाचं घड्याळ बनवून घेत. विरोधाभास असा की घड्याळजींकडे एखादे घड्याळ असेलंच असं नाही. शिवाय कुणी घड्याळाला किल्ली द्यायला विसरलं की ती मागे पडत. कुणीतरी अचूक वेळ सांगणारं हवं.

ग्रीनविच रॉयल ऑब्सर्व्हेटरी मधले संशोधक कालमापन करत त्याला अचूक वेळ मानले जात असे. (पुढे 1884 साली ग्रीनविच प्रमाण वेळ म्हणून तिला मान्यता मिळाली). रॉयल ऑब्सर्व्हेटरीच्या दाराजवळ अचूक वेळ सांगणारं घड्याळ होतं. त्यामुळे वेळी-अवेळी सारखं सारखं घड्याळजीं किंवा त्याच्या हाताखालची मुले येऊन वेळ विचारत. रॉयल ऑब्सर्व्हेटरी मधले कर्मचारी त्रासून जात. जॉन-हेनरी बेल्व्हील ग्रीनविच रॉयल ऑब्सर्व्हेटरी मध्ये सहाय्यक होता. खरंतर विविध संशोधनासाठी मदत करणे ह्यासाठी त्याला नेमले होते. पण ऐयरी साहेबांनी आता त्याला लंडनच्या साप्ताहिक फेरीवर नेमले. दर आठवड्याला लंडनमधल्या घड्याळजींना “जॉन अर्नोल्ड” ह्या घड्याळातील प्रमाण वेळ सांगणे एवढंच त्याचे काम. २० वर्षे नियमितपणे सेवा केल्यावर जॉन हेनरी १८५६ साली वारला. मारिया जॉन हेनरीची पत्नी!

मारियाचे बालपण लंडनजवळच्या सफोकं परगण्यात गेलं. पुढे तिने भाषा विषयाचा अभ्यास केला. लंडनच्या शाळांमध्ये भाषातज्ञ म्हणून तिला मान होता. जॉन हेनरीशी तिने 1851 साली लग्न केलं. जॉन हेनरीची पहिली बायको बाळंतपणात वारली तर दुसरीचा बळी टायफॉईडच्या साथीने घेतला. त्याच्या मुली लग्न होऊन संसारात मग्न होत्या. वेळ सांगायच्या साप्ताहिक फेरीवर असतांना त्याची आणि मारियाची गाठ पडली. लग्नानंतर लवकरच मारियाला दिवस राहिले आणि “रूथ” चा जन्म झाला. मारिया रूथच्या संगोपनात मग्न होती. तशातच जॉन हेनरीची तब्बेत वरचेवर बिघडू लागली. शेवटी रूथ दोन वर्षाची असतांना जॉन हेनरीचे निधन झाले.

घर कसे चालवावे हा प्रश्न मारियाला भेडसावू लागला. जॉन हेनरी चाळीस वर्ष ग्रीनविच रॉयल ऑब्सर्व्हेटरीच्या सेवेत होता. तेव्हा मारियाने ऐयरी साहेबांना पत्र लिहून काही पेंशनची व्यवस्था करावी अशी विनंती केली. जॉन हेनरीची संशोधनाची हस्तलिखिते ऑब्सर्व्हेटरीने विकत घ्यावी असेही सुचवले. पण ऐयरी साहेबाने तिला उलट ‘अशी पद्धत नाही’ कळवले. मारियाला नकार मान्य नव्हता. तिने लहान मुलीसाठी तरी काही सोय करावी म्हणून विनंती केली. पण ऐयरी साहेबांनी तुम्ही भाषातज्ञ आहात तर तुम्हीच अर्थार्जन करा असे सुनावले. त्या काळात स्त्रियांनी नोकरी करण्याच्या फार प्रघात नव्हता. त्यात पुन्हा रूथला सांभाळायचा प्रश्न, मग नोकरी कशी जमणार ह्याची मारियाला काळजी पडली. तिने घरीच काही मुलामुलींना शिकवायला सुरुवात केली. पण शिक्षकी व्यवसायात फार पैसे मिळत नव्हते.

पैसे मिळत नसले तरी शिक्षिका म्हणून मारियाला समाजात मान होता. तिने फ्रेंच, इंग्रजी शिकवलेले विद्यार्थी आता घड्याळ व्यवसायात उत्तम नाव मिळवून होते. लंडनमधल्या घड्याळाजींचा वेळ सांगण्यासाठी जॉन हेनरीवर विश्वास होता. आता तो नव्हता तर मारियाने वेळ सांगावी असे त्या सर्व घड्याळजींचे मत पडले. दोनशे घड्याळजींना नकार देणं ऐयरी साहेबांना परवडणार नव्हते. पण स्त्रियांनी त्याकाळात ऑब्सर्व्हेटरीमध्ये नोकरी करण्याचा प्रघात नव्हता. म्हणून त्यांनी मारियाला सदस्य सेवा सुरू करायला परवानगी दिली. ही सदस्य सेवा आणि शिक्षिकेचे मानधन दोन्ही मिळून मारियाचे घर सुरळीत चालू झाले.

लहानग्या रूथला सोबत घेऊन मारिया आठवड्यातून एकदा ऑब्सर्व्हेटरीला जात असे. मग “जॉन अरनॉल्ड” घड्याळ तिथल्या वेळेशी जुळवून घेत असे व ऑब्सर्व्हेटरी तिला त्याचे सर्टीफिकेट देत असे. घोळदार झगा, रूथ, आणि घड्याळाची हॅन्डबॅग सांभाळत सुमारे दोनशे सदस्यांना वेळ सांगत असे. पुढे रेडियो, बिगबेन इ अनेक मार्ग उपलब्ध झाले तरी मारियाचा व्यवसाय बंद पडला नाही. तिचा नियमितपणा वाखाणण्याजोगा होता. लंडनमध्ये जॅक दि रिपरने ह्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराने महिलांवर अत्याचार सुरू केले तेव्हा स्त्रिया एकट्या-दुकट्या बाहेर जायला धजावत नव्हत्या. त्या काळातही मारियाने कधी साप्ताहिक फेऱ्या चुकवल्या नाहीत. चिकाटी आणि सचोटी ह्यांच्या जोरावर तिने 35 वर्षे वेळ सांगायचा व्यवसाय केला.

वयाच्या 81 व्या वर्षी नजर अधू होवू लागली म्हणून मारियाने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही जवळ जवळ १०० सदस्य वर्गणीदार होते. काही सदस्य घड्याळजी होते तर काही श्रीमंतांना तिची सेवा “स्टेट्स सिम्बॉल” म्हणून हवी होती. गंमतीचा भाग म्हणजे ह्या सदस्यांच्या विनंतीवरून मारियाच्या लेकीने, रूथने हा व्यवसाय पुढे चाळीस वर्ष चालवला. मारिया वयाच्या 88 व्या वर्षी वारली. पण आजही तिचे (आणि रूथचेही) हॉरॉलॉजिस्ट म्हणून नाव आदराने घेतले जाते.

मारियाच्या वेळ सांगायच्या व्यवसायात आज कुणीही नाही पण सदस्य सेवा हे एक मोठं बिझनेस मॉडेल झाले आहे. मारियाची गोष्ट तशी खूप साधी पण तरी खूप विचार करायला लावणारी. आपल्या कामाचा पूर्ण आणि दूरगामी परिणाम कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही, पण पाट्या न टाकता आज काम करणे एवढं आपल्या हातात नक्कीच आहे.

(संदर्भ: दि हँडलर्स ऑफ टाईम - जॉन हंट 1999)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सीमंतिनी,

वेगळ्या विषयावरचे लेखन. आवडले.
विशेषतः शेवटी लिहिलेले - आपापले काम पाट्या न टाकता मनापासून करण्याबद्दल.

अश्या अनवट प्रोफेशन असलेल्या व्यक्तींवर / स्त्रियांवर एक लेखमालिका होऊ शकेल, मनावर घ्या.

आज मुंबई मिरर ला बातमी आहे. सेंट्रल रेल्वेचे टाइम टेबल बनवीणारा माणूस आता रिटायर होतो आहे.

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/your-locals-timekeeper-...

छान आहे लेख

अप्रतिम!! आजकालच्या लहान मुलांना जसे मोबाइल आणि वायफाय शिवाय लोक जगु शकत होते ह्याचे आश्चर्य वाटते तसेच त्या काळातल्या ह्या अनोख्या धंद्यावद्दल आता आपल्याला वाटते. Happy

माहितीपूर्ण लेख.. ती स्वताचे घड्याळ कॅलिब्रेट कसे करत असेल? लंडन मध्ये त्याबद्दल काय सोय होती?
त्या काळात भारतात कोनार्क मंदीरात सावली आणि तारिख त्यानुसार घड्याळ कॅलिब्रेट करता येत होते.

रेडियो आल्यावर ह्या सेवेची गरज संपली असेल.

लहानपणी टेलिफोनवर १७३ (किंवा १७४) डायल करुन अचुक वेळ कळत असे त्या साठी २ कॉलचे पैसे लागत होते. रेडीयोवर समय मिलालिझिये म्हणुन दिवसातुन काही वेळा वेळ सांगितली जायची. आंतरराष्ट्रिय विमान सेवेत वेळेत बदल झाल्यास हवाईसुंदरी वेळ सांगत असे.

हल्ली हे काम स्मार्ट्फोन फुकट करत आहे त्यामुळे ह्या सेवेची गरज राहिली नाही.

छान लेख. ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. नंबर डायल करून वेळ सांगायच्या सोयीबद्दलही माहित नव्हतं.

ती स्वताचे घड्याळ कॅलिब्रेट कसे करत असेल? >> मारिया आठवड्यातून एकदा ऑब्सर्व्हेटरीला जात असे. मग तिचे “जॉन अरनॉल्ड” घड्याळ तिथल्या वेळेशी जुळवून घेत असे व ऑब्सर्व्हेटरी तिला त्याचे सर्टीफिकेट देत असे. ऑब्सर्व्हेटरी मधले संशोधक प्रमाण वेळ कशी ठरवतात हा एक स्वतंत्र लेख होईल. रेडियोमुळे सेवेची गरज संपली तरी तिच्या नियमितपणामुळे/विश्वासर्हतेमुळे पुढे ४० वर्ष हा व्यवसाय रूथ (मुलीने) चालू ठेवला.

रेडीयोवर समय मिलालिझिये म्हणुन दिवसातुन काही वेळा वेळ सांगितली जायची. >> Happy

अमा >> लिंकबद्दल थँक्यू. अनिंद्य >> कळत-नकळत हातून अनवट व्यवसायांबद्दल लेखन घडतयं खरं. समाधानी यांनी म्हणाल्याप्रमाणे मी पोस्ट केलेल्या अगाथा व मरिन यांच्या गोष्टी अनवट व्यवसायांबद्दल आहेत.

माहितीपुर्ण लेख.
लहान असताना आण्णांच्या(आजोबांच्या) घड्याळ्याला मी किल्ली देत असे..,ते आठवले. Happy
पु.ले.शु!

सीमंतिनी,
तुला संपर्कातून एक ईमेल पाठवलं आहे. कृपया वाचून उत्तर द्यावे ही विनंती.

मस्त लेख आहे. नवीनच माहिती कळाली. >>>> +११११११

मला रिस्ट वॉचेस खुप आवडतात, सध्या माझ्याकडे किमान डझनभर तरी आहेत त्यातील एक माझ्या मम्मीचे चावीचे घड्याळ आहे जे मी अजुन जपुन ठेवलेय, एकदा परिक्षेचे वेळी तीने मला दीले होते ते, मी अजुनही महिन्यातुन किमान दोन-तिनदा नक्की वापरते ते खराब नको व्हायला म्हणुन .

अत्यंत रोचक माहिती! २ वर्षांपूर्वी हा वाचला असता तर त्या बिग बेन आणि पूरा लंडन ठुमकदा चा संबंध कळला नसता, किंवा तेव्हाच लक्षात आला असता. आत्ता 'चुकीची ऐकू आलेली गाणी' धाग्याच्या कृपेने उलगडा झाला. धन्यवाद सीमंतिनी.

रोचक लेख , मारिया आवडली. बिग बँग वाटायचे गाण्यातले शब्द , मगं मला वाटलं फक्त लंडन का सगळं जग चालते त्या घंटीवर ... आता कळलं.
आपल्या कामाचा पूर्ण आणि दूरगामी परिणाम कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही, पण पाट्या न टाकता आज काम करणे एवढं आपल्या हातात नक्कीच आहे.>>> अगदी सहमत.

मस्त लेख, छान माहिती.
शिर्षक छान निवडलं.
ऍनालॉगच काय डिजिटल घड्याळंही मागे/पुढे पळू शकतात.

छान लेख आवडला !
अडचणींवर मात करून मार्ग शोधणारे आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे लेखन नेहमीच आवडते !!

Pages