आसवे गळती किती?

Submitted by निशिकांत on 6 May, 2019 - 00:41

दोन पुतळे म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?
पंचधातू संगमरमर, आसवे गळती किती?

एक गांधी त्यात होते सांगती दुसर्‍यास ते
आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?

भोवताली मद्य विक्री, मासही विकते इथे
हेच का फळ मम तपाला? भावना सलते किती?

देउळे मशिदी कशाला? भांडती का ना कळे
पाठ माझे अंहिसेचे खिजवती मजला किती?

संसदेमध्ये कशाला टांगली तसवीर हो?
भूल थापा घोषणांची भोवती चलती किती?

लागले अंबेडकरही दु:ख अपुले सांगण्या
खूप पुतळे गाव शहरी, लोक ते बघती किती?

जाहलो मी अडथळा का? वर्दळीमध्ये असा
माखला जातो धुळीने श्वास गुदमरती किती?

व्यर्थ मी जन्मास आलो खूप लवकर वाटते
हार नोटांचे अताशा पाहतो मिळती किती?*

हटवुनी मायावती मज आपुल्या पुतळ्यास ती
चौथरे बांधील, तिजला नेहमी भरती किती?

छेडले पुतळ्यास माझ्या दुर्जनांनी जर कधी
डोंब उसळे दंगलीचा झोपड्या जळती किती?

का मला ठाऊक नाही कोण वापरते मला!
शांत बघतो निर्बलांना धेंड कुरतडती किती?

चल जरासे विठ्ठलासम वीट घे राहू उभे
निर्विकारी शांत असता लोक ते भजती किती?

हे बरे "निशिकांत" केले, राखला छोटेपणा
ना विभूती जाहल्याने यातना टळती किती?

*सुश्री. मायावतींना वाढदिवशी नोटांची माळ घातल्याचे टीव्हीवर दृष्य बघून सुचलेला शेर.

निशिकांत देशपंडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users