रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

Submitted by कुमार१ on 5 May, 2019 - 21:56

सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो.

रसायने आणि कर्करोग या विषयावरील विवेचन माझ्या माबोवरील पूर्वीच्या एका लेखात (https://www.maayboli.com/node/64645) केलेले आहे. या लेखात आपण रसायनांचा हॉर्मोन यंत्रणांवर होणारा परिणाम बघणार आहोत.

सुमारे ८०० रसायने ही आपल्या हॉर्मोन्सच्या कार्यात व्यत्यय आणतात आणि त्यामुळे शरीरात व्याधी निर्माण होतात. हे वाचून क्षणभर विश्वास बसणार नाही, पण ते वास्तव आहे. अशा काही रसायनांचा विचार या लेखात केला आहे.

रसायनांच्या संपर्काचे मार्ग :

ही रसायने आपल्या शरीरात खालील मार्गांनी शिरतात:
१. नैसर्गिक पिके व पाणी
२. कीटकनाशके व औद्योगिक वापर
३. प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी
४. धूम्रपान व मद्यपान

५. वैद्यकातील औषधे
६. सौंदर्यप्रसाधने व घरगुती स्वच्छतेची रसायने
७. इलेक्ट्रोनिक उपकरणे

या रसायनांशी आपला संपर्क आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांत येत असतो. तो जर माणसाच्या गर्भावस्थेत किंवा वयाच्या तीन वर्षांपर्यंत आला तर त्याचे परिणाम हे अधिक वाईट असतात. मुले वयात येण्याचा काळ तर खूप संवेदनशील असतो. तेव्हा जननेंद्रियांची वाढ आणि पुरुषत्व वा स्त्रीत्व प्रस्थापित होणे या महत्वाच्या घटना घडतात. घातक रसायनांनी या गोष्टी बऱ्यापैकी बिघडवल्या आहेत.

तसेच स्तन, प्रोस्टेट आणि थायरॉईड या ग्रंथीमध्ये रसायनांमुळे होणारे बिघाड गुंतागुंतीचे असतात. रसायने सुरवातीस संबंधित अवयवात हॉर्मोन-बिघाड करतात आणि मग त्याचे पर्यवसान कर्करोगात होऊ शकते.
बरीच रसायने ही ‘इस्ट्रोजेन’ या स्त्री-हॉर्मोन सारख्या गुणधर्माची असतात. त्यांचा पुरुषांच्या शरीरातील शिरकावामुळे पुरुष-जननेंद्रियांच्या अनेक समस्या आणि वंध्यत्व उद्भवते. या गोष्टी विसाव्या शतकात वाढीस लागल्याचे दिसून येते. काही रसायनांचे परिणाम तर पुढच्या पिढीपर्यंत गेलेले दिसतात. हॉरमोन्सच्या यंत्रणा बिघडवणाऱ्या असंख्य रसायनांपैकी (Endocrine Disrupting Chemicals) बारा रसायने ही आपल्या नित्य संपर्कात येतात आणि त्यांना ‘डर्टी डझन’ असे म्हटले जाते. त्यातील काही महत्वाच्या रसायनांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

rasayane H.jpg

वरील तक्त्यात दिलेली रसायने म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. यापैकी काहींचा विचार आता विस्ताराने करू.

१. Bisphenol A : हे रसायन प्लास्टिकच्या वेष्टनातले खाद्य-पेय पदार्थ व पाणी यांच्यातर्फे शरीरात शिरते. सध्याच्या आपल्या आहारशैलीमुळे ते रोज कुठल्यातरी प्रकारे शरीरात जातेच. एका वेळेस त्याचे शरीरात जाणारे प्रमाण तसे कमी असते. पुढे त्याचा चयापचय होऊन ते काही तासातच लघवीतून उत्सर्जित होते. पण दिवसभरात आपण जर सतत प्लास्टिक-संपर्कातील अन्नपाण्याचे सेवन करत राहिलो तर मात्र त्याचा ‘डोस’ सतत मिळत राहतो आणि ते रक्तात काही प्रमाणात साठत राहते. तेव्हा प्रवास वगळता इतर सर्व वेळी आपण उठसूठ प्लास्टिक बाटलीतले पाणी पिणे टाळले पाहिजे. अन्नपाणी साठवण्यासाठी भविष्यात प्लास्टिकला योग्य आरोग्यपूरक पर्याय निघण्याची नितांत गरज आहे.

२. Phthalates : अनेक सुगंधी प्रसाधनांमधून शरीरात जाणारी ही रसायने. त्यांचे पुरुषाच्या अंडाशयाशी चांगलेच वैर आहे. तेथील जननपेशींचा ती बऱ्यापैकी नाश करतात. त्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते तसेच त्यांची हालचालही मंद होते. यातून पुरुष-वंध्यत्व येऊ शकते. या व्यतिरिक्त त्यांचा स्वादुपिंड आणि थायरोइड ग्रंथींवरही विपरीत परिणाम होतो. त्यातून मधुमेह, स्थूलता आणि थायरोइडचे विकार होऊ शकतात.
अलीकडे केसांची ‘निगा’ राखणाऱ्या प्रसाधानांमध्ये ही रसायने मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तेव्हा अशी प्रसाधने वापरणाऱ्या मंडळीनो, सावधान !

३. शिसे: या जड धातूचे मेंदू व मूत्रपिंडावरील दुष्परिणाम परिचित आहेत. अलीकडे त्याचे हॉर्मोन यंत्रणेवरील दुष्परिणामही दिसून आले आहेत. शरीरातील बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.

पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात. या उतरंडीतील सर्वोच्च स्थानावर शिसे दुष्परिणाम करते. त्यातून आपली अख्खी हॉर्मोन यंत्रणाच खिळखिळी होते.

४. धूम्रपान व मद्यपानातील रसायने: तंबाकूच्या धुरातून benzopyrene, aromatic polycyclic hydrocarbons आणि cadmium ही रसायने शरीरात जातात. तर काही प्रकारच्या वाईन्समध्ये Resveratrol हे रसायन असते. ही सर्व रसायने आपली हॉर्मोन यंत्रणा बिघडवतात. महत्वाचे म्हणजे सर्व गर्भवतीनी या व्यसनांपासून लांब राहावे.

५. वैद्यकातील औषधे : यापैकी काहींचा दुष्परिणाम हा हॉर्मोन-बिघाड करतो. दोन ठळक उदाहरणे म्हणजे diethylstilbestrol (एक कृत्रिम इस्ट्रोजेन) आणि spironolactone ( एक मूत्रप्रमाण वाढवणारे औषध). अशा औषधांचा वापर नेहमी काळजीपूर्वक केला पाहिजे.

आधुनिक जीवनशैलीत आपण अनेक अनावश्यक रसायनांना आपल्या शरीरात धुडगूस घालू दिला आहे आणि त्यांचे परिणाम चिंताजनक आहेत. आपल्या हॉर्मोन-ग्रंथींमध्ये जननेंद्रिये व थायरॉइड या खूप संवेदनक्षम आहेत म्हणून त्यांचे बिघाड जास्त दिसतात. काही वैज्ञानिकांनी तर अशी भीती व्यक्त केली आहे की अशा बिघाडामधून समलैंगिकता किंवा लिंगबदल करण्याची इच्छा या गोष्टी वाढू शकतील.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर एकंदरीत नजर टाकता काही आजारांचे खूप वाढलेले प्रमाण लक्षात येईल. यामध्ये तरुणींमधील थायरॉइड विकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि तारुण्यात जडणारा मधुमेह यांचा समावेश आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या बहुमूल्य हॉर्मोन यंत्रणांना आपण आटोकाट जपले पाहिजे. त्यासाठी घातक व अनावश्यक रसायनांचा वापर टाळणे किंवा अगदी कमीतकमी करणे, हे गांभीर्याने घ्यायची गरज आहे.
*******************************************************************************************
* पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ व मिपा संस्थळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मच्छरदाणी सारखे नैसर्गिक उपाय >>> अगदी खरे! आम्ही घरांत डासांसाठीची कॉईल क्वचितच लावतो. मच्छरदाणीला पर्याय नाही Happy

चिऊ,
• रोजच्या वापरातले सामान जरी प्लॅस्टिकमधे नसले तरी जास्तीचे पाकिटातच राहते. ते चांगले का? >>
हरकत नाही. ‘पाकीट’ कशापासूनचे आहे ?

पत्र्याचे डबे वापरणॅ चांगले का? >>>
कोरडे पदार्थ ठेवायला ठीक. तरी अनुभवी लोकांचे मत वाचायला आवडेल.

बर्‍याचदा दही, आईसक्रीम इ. चे डबे परत वापरले जातात. ते वापरणे चांगले का? >>
साधारण हे दुय्यम दर्जाच्या साहित्यापासून बनवतात. त्यामुळे नको.

सिलिकॉन वापरणे कितपत चांगले? >>>
सिलिकॉनची भांडी शीतकपाटात ठेवायला चांगली. पण उष्ण तापमानात ठेवू नये. म्हणजेच ओव्हनमध्ये वगैरे नको. साध्या साठवणीला योग्य.

जाई, धन्यवाद.

खरंय, प्रतिसादातूनपण मस्त माहिती मिळते आहे.

पाकिटेपण प्लॅस्टिकचीच आहेत. साधारण भारतात सुपरमार्केटमधे मिळतात तशी.
सिलिकॉनचे १-२ बेकिंग मोल्ड आहेत, ते आता वापरणे बंद करते.
परत एकदा धन्यवाद.

अवांतर, पाकिट हे पॅकेटचं मराठीकरण आहे का?

अवांतर, पाकिट हे पॅकेटचं मराठीकरण आहे का? >>

होय, ओघात केलेले आहे. तितकेसे बरोबर नसावे.
पॅकेट = लहान खोका (जालकोशातून).

छान लेख.
सर्वात उत्तम काचेच्या बाटल्या आणि स्टीलचे डबे वापरणे कोरडे पदार्थ साढविण्यासाठी खरतर. पण पुर्ण प्लॅस्टिक बंद करण अजुन जमल नाहीये. फ्रीज मधले सगळे कंटेनर जे मायक्रोवेव्ह साठी वापरले जातात ते काचेचे आहेत.
मी डाळी वगैरे साठवायला अलिकडे ह्या बरण्या घेतल्या आहेत. काढायला/घालायला अवघड आहेत पण एकदा सवय झाली कि सोपे आहे.
https://www.amazon.com/Weck-908-Cylindrical-Jar-Liter/dp/B00DHNTEGS?ref_...
पीठासाठी आणि तांदळासाठी मध्यम आकाराचे स्टीलचे डबे वापरते.
रोजच्या सिरिअल साठी मात्र ऑक्सो चे कंटेनर वापरते कारण मुलाला स्वतःचे स्वतः घ्यायचे असते सिरिअल आणि अजुन तो लहान आहे. काच वापरता येणार नाही.
https://www.amazon.com/OXO-Grips-Airtight-Cereal-Dispenser/dp/B01BN8TEP4...
आयकियाच्या प्लॅस्टिक बरण्या आहेत अजुन थोड्या. पण त्यात सांडगे वैगरे ठेवलेत. ते ही आता बंद करेन.

>>>>>>> सर्वात उत्तम काचेच्या बाटल्या >>>>

हे पारंपरिक काचेच्या बाबतीत अगदी बरोबर आहे. पण अलीकडे काही बरण्या चायना काचेपासून बनवल्या आहेत. त्यात मात्र cadmium किंवा lead चा वापर केला आहे.
म्हणजे काच सामान पारखून घेतले पाहिजे.

छान माहिती.
आजकाल भाज्यांवर रसायने फवारलेली असतात त्यामुळे माझे एक नातेवाईक भाज्या , फळे आणली की १/२ तास व्हिनेगार घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवतात. ते योग्य आहे का ? त्यामुळे फवारलेली औषधे, रसायने जातील का? व्हिनेगारचे पण अजून काही साईड इफेक्ट्स असतात का ?

चैत्रगंधा,
अलीकडे भाज्या ,फळे इ. धुण्याचे अनेक मार्ग प्रचलित आहेत:
मीठ, सोडा, विनेगार वगैरे लोक वापरतात. काही जण फक्त पाण्यानेच धुतात.

त्यामुळे फवारलेली रसायने काही प्रमाणात निघून जातील. पण वनस्पतीची वाढ होत असताना त्यात जमीन व खतांमधून जी रसायने अगदी गाभ्यात पोचतात त्याचे काय? निव्वळ वरून धुण्याने १००% रसायन-संरक्षण नाही मिळणार.
याबाबत आहारशास्त्र वा रसायनतज्ञांनी भाष्य करावे.

वाचतीय, उपयुक्त लेख अन प्रतिसाद ही.. विकतचे अनेक पदार्थ प्लास्टिक पॅकिंग मधे मिळतात अन संपेपर्यंत ते तसेच वापरले जातात, इक्डे लक्ष दिले पाहिजे. घरी आल्यावर स्टील डब्यात काढले पाहिजे.

मी तर असे म्हणेन आपलेच शरीर आपल्याला सर्वात. मोठा धोका देते .
वर dr साहेबांनी वर्णन केलेली रसायने शरीरावर जे अनिष्ट परिणाम करतात त्याचे स्पीड खूप कमी असते ..
आपल्या शरीरात काही बिघाड घडतोय हे आपल्याला समजत नाही .
जेव्हा समजते तेव्हा बिघडाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते ..
त्यामुळे माणूस किती तरी वर्ष हवी ती काळजी घेत नाही .
जेव्हा dr निदान करतात तेव्हा काळजी घेण्याची वेळ निघून गेलेली असते .
तेच शरीराची ताबडतोप तीव्र प्रतिक्रिया आली असती तर माणूस बिघाड होण्याच्या आधी सावध झाला असता.
शरीर ताबडतोप धोक्याचा इशारा देत नाही .
म्हणजे ह्या रसायन ची वाट लावण्याची यंत्रणा शरीरात असलीच पाहिजे .

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
अनघा, योग्य सूचना.

राजेश,
म्हणजे ह्या रसायनाची वाट लावण्याची यंत्रणा शरीरात असलीच पाहिजे >>>>

अगदी बरोबर. आपल्या यकृतात अशा सर्व घातक पदार्थांचा चयापचय करणारी यंत्रणा असते. ती रोज या सगळ्यांचा निचरा करते. तिची काम करण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. जर घातक पदार्थ अल्प प्रमाणात शरीरात आले, तर त्यांचा पूर्ण निचरा होईल.
पण....

सध्याच्या युगात घातक पदार्थांचे प्रमाण त्या मर्यादेबाहेर गेले आहे. >>> विविध आजार.

Kumar sir
ह्या विषयावर एक धागा काढा
जसे विष पोटात गेले की तबोडतोप उलटी होते आणि तो विषारी पदार्थ शरीर स्वीकारत नाही आणि बाहेर फेकला जातो
पण दारू,तंबाखू,etc he शरीराला घातक आहेत तरी शरीर ते का स्वीकारते तीव्र तिरस्कार क निर्माण करत नाही .
नक्की शरीर कशामुळे गंडते आणि क्षत्रू ल प्रवेश करण्यास पूर्ण मोकळीक देते

राजेश,
सूचना चांगली आहे. सवडीने बघू ☺️

प्रतिसादातही खूप माहिती मिळतेय.
काही बरण्या चायना काचेपासून बनवल्या आहेत. त्यात मात्र cadmium किंवा lead चा वापर केला आहे >>>>
@साद, चायना काच कशी ओळखायची? दिसण्यात काही फरक असतो का?

चायना काच कशी ओळखायची? >>>

ते नाही हो मला माहिती. आपल्या विश्वासू दुकानदाराला विचारायचे ! कदाचित किमतीतल्या फरकाने समजून येईल.

सीमा आणि साद, धन्यवाद.
चायना काच असते हे महितच नव्हतं.
राजेश, मला वाटतं की आपलं शरिर हे सगळं अ‍ॅडॉप्ट करायचा प्रयत्न करतं. उत्क्रांतीसारखं.
पण या रसायनाना अ‍ॅडॉप्ट करता करता पेशी अशा प्रकारे बदलतात की त्यालाच कॅन्सर म्हणतात.
शरीराने अती समजूतदारपणा दाखवल्याचा परिणाम.

ऑक्सो>>>>
यात व प्लास्टिक मध्ये काय फरक जाणवतो ?>>
ऑक्सो BPA free आहेच . पण Phthalates and PVC फ्री आहे. बरेच कंटेनर बीपीए फ्री असतात पण Phthalates and PVC असु शकते त्यात.
(ओक्सो हा इथला क्वालीटीसाठी प्रसिद्ध ब्रँड आहे. अर्थात किंमतही जास्त आहे. )

सीमा, धन्यवाद
म्हणजे ओक्सो हा महाग पण चांगला पर्याय आहे

लेख आणि चर्चेतून छान माहिती मिळाली.
पूर्णतः विषमुक्त अन्न हे किती मोठे दिवास्वप्न आहे ह्याची कल्पना येते आहे.

अनिंद्य व साद >>> + 1
चांगल्या व उपयुक्त चर्चेबद्दल पुन्हा एकवार सर्वांचे आभार !

सध्या पाॅलिथीन पिशव्यांमधे दूध, दही व इतरही अनेक पदार्थ विक्रीला ठेवलेले दिसतात.... याबाबत काही सांगू शकाल का ?
धन्यवाद.

शशांक,
*** पाॅलिथीन पिशव्यांमधे दूध, दही >>>>

त्याच्या सुरक्षिततेबाबत उलटसुलट मते आहेत. त्यातल्या त्यात उच्च घनतेचे पाॅलिथीन ठीक असे काहींचे मत आहे.

शेवटी पाॅलिथीन वापर ही तडजोडच आहे. पदार्थ त्यात कमीत कमी वेळ राहिलेले बरे.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख आणि चर्चा..
दूधाच्या पिशव्या की प्लास्टिक च्या बाटल्या या संदर्भातली एक ताजी बातमी:-
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/plastic-...

Pages