मनात खोलवर अचानकपणे घुसलेली "ती" बाहेर कशी काढावी?

Submitted by Parichit on 5 May, 2019 - 07:10

नमस्कार! आज खूप दिवसांनी मायबोलीवर आलो आहे. सुट्टी आहे म्हणून नाही. निवांत आहे म्हणून पण नाही. जरा वेगळेच कारण आहे. म्हणून आलो. बघतो तर इथे काही धाग्यांवर घमासान हाणामारी दिसली. काही धाग्यांवर विनोदी लिखाण दिसले. काही धाग्यांवर राजकीय फड रंगला आहे. काही धाग्यांवर छान छान कविता आहेत. पण आज कशातच माझे मन रमत नाहीये. त्याला कारणच तसे घडले. म्हटले तर हास्यास्पद म्हटले तर खूप गंभीर. ते इथे व्यक्त व्हावे वाटले म्हणून आलो आहे. बर आता जास्त फुटेज न खाता सरळ विषयावर येतो.

झाले असे कि काल एका मित्र त्याच्या कसल्यातरी कामासाठी एका शैक्षणिक संस्थेत चालला होता. एकटाच होता म्हणून त्याने सहज मला कंपनी देतोस का म्हणून फोन केला. मी हो म्हणालो. मी फार अवराआवरी केली नाही. दाढी नाही का भांग नाही का केसांना तेल नाही का नीटनेटके इस्त्री केलेले कपडे नाहीत. काही नाही. मिळाला तो कुडता अंगात अडकवला नी चप्पल घालून बाईकवर त्याच्या मागे बसून निघालो. त्या शैक्षणिक संस्थेत गेल्यावर तिथे फार गर्दी नव्हती. शनवार असल्यामुळे असेल कदाचित. आम्ही सेक्युरिटी गेट पाशी कुणला भेटायचे ते सांगून सरळ आत गेलो. गेल्यावर आत अजून एक कक्ष होता. संस्थेचे व्यवस्थापनाचे कामकाज तेथूनच चाले. तिथे सुद्धा बाहेर सेक्युरिटी बाई उभी होती. आत कोणाकडे खरंच काही काम असेल तर त्या आतल्या व्यक्तीला विचारून खात्री करून मगच आत सोडले जाई. (हे सगळे डीटेल्स मी का सांगतोय ते तुम्हाला नंतर कळेल).

आत गेल्यावर एका अतिशय हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याच्या स्त्रीने आमचे स्वागत केले. माझ्यकडे पाहून हसली मी पण स्माईल केले. पहिल्याच भेटीत काही व्यक्ती जवळच्या वाटू लागतात तसे काहींसे झाले. आता मात्र मला माझ्या अवताराची लाज वाटू लागली. (असे पूर्वी पण अनेकदा माझ्याबाबत झाले आहे. गबाळा अवतारात बाहेर पडतो तर नेमके गोड सुंदर मुलीशी बोलायचा प्रसंग येतो. आणि नीटनेटका असलो कि दिवसभर थेरडे ढेरपोटे खडूस लोक भेटत राहतात. बर ते जाउदे)

तर तिच्या समोर मांडलेल्या खुर्च्यांवर आम्ही दोघे बसलो. तिचे पद काय होते माहित नाही. बहुतेक रिसीप्शनिस्ट असेल. पण तिला त्याहून जास्त अधिकार असावेत. मित्राने कसल्या कामासाठी आलोय ते सांगितले. मग तिने आत जाऊन कोणाशीतरी सल्लामसलत केली आणि थोड्या वेळाने पुन्हा येऊन आम्हाला सविस्तर सगळे सांगितले. पैसे भरावे लागणार होते. मित्र तयार नव्हता. ती समजून सांगत होती. तरी मित्र मानायला तयार नव्हता. किंबहुना त्याला ती काय म्हणतेय ते समजतच नव्हते. पण मला मात्र तिचा मुद्दा थोडा थोडा लक्षात आला होता. मी मध्ये पडलो आणि मित्राला सांगू लागलो. तिच्याशी बोलू लागलो. नकळत मी मध्यस्त झालो. शेवटी तिने मलाच सगळे नीट सांगितले. मला ते पटले. मी मित्राला नीट समजून सांगितले. मग मात्र तो तयार झाला. तिने माझे आभार मानले. इतकी गोड व सुस्वभावी मुलगी मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो. दिसायला सुद्धा कित्ती कित्ती गोड होती. तिच्याकडे पाहताना माझे भान हरपत होते. आणि स्वत:च्या अवताराची लाज वाटून तिथल्यातिथे आपल्याच कानाखाली हाणून घ्यावी पण वाटत होते. तिच्या डोळ्यात सुद्धा माझ्याशी बोलताना वेगळी चमक जाणवत होती. पण दुर्दैवाने (म्हणजे माझ्या दुर्दैवाने) तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत होते!

तसे दिवसाला अनेक आकर्षक ललना भेटतच असतात. तेवढ्यापुरते आकर्षण देखील वाटते. बहुतेक वेळा ते शारीरिकच असते. कधीकधी ते जास्त वाटते. पण हिची बातच वेगळी. हिच्याविषयी शारीरिक आकर्षण जवळजवळ नाहीच. आणि मानसिक मात्र जास्त वाटत होते. हे फार वाईट असते. हे विसरता येत नाही. माझ्याबाबत नेमके हेच झाले. बोलत बोलता ती मनात उतरत गेली. खोलवर घुसत गेली. तिच्या डोळ्यात पाहता पाहता मी संपलो होतो. हिच्या कडे पाहत आयुष्य सरले पाहिजे असे भलतेच विचार येऊ लागले. "च्यायला हिच्याशी बोलता बोलता मरण आले तरी ते किती सुंदर असेल. आपली त्याबाबत तक्रार नसणार" अशा विचारांच्या पातळीवर मी पोचलो. सगळा खेळ अर्ध्या तासाचाच. किंवा कमीच. पण किती अनपेक्षित.

निरोप घेताना मित्राकडे नव्हे तर माझ्याच डोळ्यात बघून बाय बाय म्हणाली. त्यावर तिला मी कसा प्रतिसाद दिला आठवत ते नाही. पण त्तेथून निघावे वाटत नव्हते. पाय उचलत नव्हता. तिचा व्यक्तिगत नंबर मागावे वाटले पण मागणार कसा. आणि तिनेही तो का द्यावा. तसा आमचा काहीच संबंध नव्हता. मित्र सुद्धा संस्थेच्या कामासाठी आला होता.

पण त्यानंतर सगळा दिवस अस्वस्थ गेला. काल दिवसभर आणि रात्रभर तिचे बोलणे आणि तिचा चेहरा आठवत राहिला. काही कारण नसताना त्या मित्राला फोन केला व पुन्हा तिथे जावे लागेल का विचारले. त्याने "आता कशाला?" विचारल्यावर माझ्याकडे काही उत्तर नव्हते. एका विवाहीत मुलगी/स्त्रीकडे मी आकर्षित झालोय हे कळल्यावर त्त्याने मलाच मुर्खात काढले असते. कदाचित मला त्याने सुनावले पण असते. तो जरा सणकीच आहे. एकंदर, त्याला हे सांगत बसणे मूर्खपणाच होता. काहीतरी खोटे निमित्त काढून आपणच एकटे पुन्हा तिथे जावे व तिला भेटावे असा पण एक विचार मनात येऊन गेला. पण तिथली सुरक्षा व्यवस्था पाहता ते शक्यच नव्हते (आता कळले ना मी सगळे डिटेल मघाशी का सागितले). वेगवेगळ्या इतर पर्यायांवर सुद्धा विचार करून पाहिला. व अखेर पुन्हा ती कधीच भेटणार नाही हे जळजळीत वास्तव स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. मन उदास झाले.

आता, नशिबातच असली तर पुन्हा भेटेल सुद्धा हे मलाही माहित आहे. पण हे सगळे कोणाशी बोलू शकत नाही. जवळच्या मित्रांशी/नातेवाईकांशी तर नाहीच नाही. म्हणून इथे येऊन व्यक्त झालो. थोडे बरे वाटले. तुम्हाला पण असे अनुभव येतात का? तुम्ही काय करता? कोणी म्हणतील "दुसरी बघ आणि मन गुंतव". शारीरिक आकर्षण वाटणारी कदाचित दुसरी भेटली असती. पण मला खरंच असं वाटत नाही कि मनाला भिडणारी इतकी गोड दुसरी कोणी भेटेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे किस्से खरे असतील तर त्यावरून तुमचे प्रोफाईल बनते. त्यावरून एखाद्याची समस्या ताडणे यात काहीही चूक नाही. तुम्ही हे सर्व वाचकांना उचकवण्यासाठी देताय का ?

तुम्ही हे सर्व वाचकांना उचकवण्यासाठी देताय का ?

>>> याचे उतर दुसऱ्या धाग्यावर दिले आहे. वृत्तपत्रात सल्ले विचारणारे सादर असते. तिथे समुपदेशक त्या प्रश्नापुरता विचार करतात आणि सल्ले देतात ना? कि त्या व्यक्तीने आधी काय व कुठे कसे प्रश्न पाठवले त्याची शहानिशा करत नसतात? तसेच इथे पण आधीच्या धाग्यांवरून जज्ज एखाद्याला करून प्रोफाईल बनवले जाऊ नये व निरपेक्षपणे सल्ले दिले जावेत अशी माझी अपेक्षा आहे.

वृत्तपत्रात एकच मनुष्य प्रश्न विचारत नाही. तसे झाले तर समुपदेशक सुद्धा मागच्या प्रश्नाचा नक्कीच विचार करील.

> लग्न होणे म्हणजे विकत घेतात का जोडीदार एकमेकांना? कि बाबा मी ह्याला/हिला विकत घेतली आहे आता हि/हा म्हणजे माझ्या मालकीची वस्तू झाली, असे असते का? > आर्थिक स्वतंत्र नसलेल्या जोडीदाराला कमवणाऱ्या जोडीदाराने काही करारावर (अ/लिखीत) कामावर 'ठेवलेले' असते.

Pages