उन्हाळी भटकंती - माथेरान, (१) कर्जत ( बोरगाव ) ते माथेरान ( रामबाग पॅाइंट. )

Submitted by Srd on 2 May, 2019 - 08:17

उन्हाळी भटकंती - माथेरान
कर्जत ( बोरगाव ) ते माथेरान ( रामबाग पॅाइंट. )

उन्हाळी भटकंती म्हटली की माथेरानचे नाव सर्वात पुढे असते. सातआठ वाटा आहेत, जाताना चालत आणि येताना बस /टॅक्सी. कितीही वेळा गेलो तरी कंटाळा येत नाही किंवा अरे हे एकदा झाले आहे पुन्हा कशाला असं वाटत नाही. फक्त यावेळी कोणती वाट एवढाच विचार.

तर काल १ मे (२०१९). माथेरानला जावं असं सकाळी मनात आलं. वन-ट्री हिल किंवा रामबाग पॅाइंट मार्गे चढून बरीच वर्षं लोटली होती. नेमकं म्हणजे मोरबे धरण होणार याची चर्चा होती तेव्हा. चौक स्टेशनही नंतरचेच. पनवेल - चौक - आंबेगाव - वन-ट्री हिल पॅाइंटला गेलेलो तेव्हा इकडची वाट बंद होणार असं आंबेगाववाले बोलले होते. तयारी अशी काही करावी लागत नाहीच, दोन पाण्याच्या बाटल्या अन डबा पुरतो. धोपटी मारली खांद्यावर अन निघालो. हां, उन्हाळी भटकंतीत टोपीऐवजी छत्रीच उपयोगी पडते. कर्जतला ट्रेन पोहोचली तेव्हा फक्त अकरा वाजलेले. मागच्या बाजूला उजवीकडे ( पश्चिमेला ) बाहेर पडायचे, तिथे रूळ ओलांडले की बस, रिक्षा मिळतात. थांबा थांबा थांबा. पुलावरूनच जा, जीव धोक्यात घालू नका. असा कोरडा सल्ला लिहिलेल्या पाट्या नसून पूलच होता. कडेकोट बंदोबस्त. छ्या. पंधरा मिटरस पूल चढायचा काय तेवढे? पुढे साडेसातशे मिटर्सचा डोंगर आहे ना! बटाटे वडे न घेता कर्जत सोडणे फाऊल आहे हे प्लॅटफॅाम सोडल्यावर लक्षात आलं. तसे तिथले वडे पचपचीत ओलेच असतात. रस्त्याकडे टपऱ्या आहेत त्यातून शोधून(!) दोन वडे पार्सल घेतले. चहा वडा भजीच्या टपऱ्यांइतकी सुकटाचीही होती.

नाक्यावर बस स्टॅापला बस मिळतात पण मला वाट कंडक्टरने सांगितली नसती. लगेच शेअर टक्सीवाला "चला चौक चौक चला गाडी भरलीय"
"बोरगाव फाटा?"
"चला ,बसा सरकून मागे."
" माथेरानला जायला आंबेगाव आहे ना चौकजवळ तिकडे उतरव."
"ओ काका, आता एवढ्या उन्हाचं माथेरानला एकटे? नाय जमायचं तुम्हाला. आणि आंबेगावला बोरगावमार्गेच जावं लागतं. धरण जालं ना मोरबे. सोडू का बोरगाव फाट्याला?"
एकदम एवढे प्रश्न विचारले त्याने पण वाटही सांगितली.
" बरं उतरव बोरगाव फाट्याला, जरा पुढे जाऊन बघतो, येईन पुन्हा नंतर कधी सकाळी."
दहा मिनिटांत बोरगाव फाट्याला उतरलो तेव्हा साडे अकरा वाजले होते. तिकडे आत डांबरी रस्त्याने चालायला सुरुवात केली. कोणी माणूस दिसत नव्हते. एखाद दुसरी बाइक जात होती.

फोटो १)
बोरगाव फाटा ते बोरगाव निर्मनुष्य रस्ता

फोटो २)
रस्त्यावरची एक गढी

वाटेत मोरबे धरणाचा भाग दिसतो, बरेच पाणी आटले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचा प्रश्न चांगला सोडवला होता. पाट्या लावल्या होत्या " ही जागा आणि धरण नवीमुंबईच्या मालकीचे आहे. यात कपडे धुणे वगैरे बंदी आहे." आता इकडच्या जुन्या वाड्या गावांचे सांडपाणी तिकडे धरणातच जाणार त्याशिवाय मार्गच नाही.

फोटो ३)
मोरबे धरण, मागे इर्षाळगडाची शिखरे

फोटो ४)
बोरगावकडे जाताना माथेरान डोंगराचे दिसणारे चौक पॅाइंट्स.

बोरगाव तसे आखीवरेखीव घरांचे गाव आहे. घरांना कुंपणं, दारापाशी दोन कळशा पाण्याने भरून ठेवलेल्या. एका ठिकाणी कूलरच ठेवलेला. गार पाणी पिऊन पुढे निघालो. धरणा कडेकडेने जात एका ठिकाणी डावीकडे वळावे लागते इथे एक आंब्याचे मोठे झाड आहे. मग नदीवरचा पूल येतो. फाटा ते हे अंतर चारसाडेचार किमी. बाजुला पोखरवाडी. छत्रीमुळे ऊन जाणवलं नाही. साडेबारा वाजले होते. इथे एक टपरी आहे. दोघेजण होते.
"माथेरानला वर जायचं आहे, आंबेगाव?"
"आता? "
"हो."
"दोन वाटा आहेत. या रोडनेच पुढे गेलात तर आंबेगाव, तिथून वर वनट्रीहिल पॅाइंट. शेवटी नाळेतून चढावे लागेल. आणि ही मातीची वाट वर चढतेय त्याने दांडवाडी. तिथून लाइटची डिपी आहे तिथे डावीकडे वर चढलात तर शेवटी रामबाग पॅाइंटला निघते. हीच सोपी आहे. चारपर्यंत जाल."
" इकडे बस येत नाही का?"
"येते ना, एकच येते दहाला. कर्जत - आंबेगाव एसटी."
" पाणी आहे ना बरोबर? वाटेत पाणी नाही."

दांडवाडीची वाट चढू लागलो तेव्हा पाऊण वाजलेला. भरपूर वारा सुटलेला. थकवा लागतच नव्हता.

फोटो ५)
दांडवाडीकडून वर जाताना डोंगर जवळ दिसू लागतो. काटेरी वाळकी झुडपं उन्हाळी भटकंती आहे हे विसरू देत नाहीत.

फोटो ६)
दुपारी सवा वाजता सूर्य डोक्यावर आला आहे.

फोटो ७)
उजवीकडच्या चौक पॅाइंटच्या खाली पोहोचल्यावर समोरच्या गारबटच्या टेकाडाच्या लेवलला येतो. उंची ५५०~ मिटर्स. रामबाग पॅाइंटला पोहोचण्यासाठी अजून २०० मिटर्स झाडीतून जायचं आहे. सावली आहे पण वारा नसतो.

एक दोन ठिकाणी झाडाच्या सावलीत मस्त झोप काढली. घरात पंख्याची हवा खात झोपणे कुठे अन हे वेगळेच. आजुबाजूस डोंगर आणि मोरबे धरणाचे पाणी पाहात वारा खात जमिनीवर पडताच अर्धा तासात ताजातवाना झालो. माथेरानच्या दुसऱ्या वाटांवर फार घामाघुम व्हायला होते. साडे तीन वाजता चौक पॅाइंटच्या खालच्या झाडीत पोहोचलो. दोन्ही चौक पॅाइंटसना थेट वर जायला वाट नाही. इथे साडेपाचशे मिटरस उंची दाखवते अन समोरच्या गारबटच्या टेकाडाच्या लेवलला येतो. म्हणजे अजून दोनशे मिटरस चढायचे आहे. आता उंच झाडांची गर्द छाया आणि बुलबुलांचे आवाज ऐकत पाचोळ्यातून आरामात चढ आहे. शेवटी दगडी रचलेल्या वाटेने रामबाग पॅाइंटला आलो तेव्हा साडेचार वाजले. उंची ७३०मिटरस.

रामबाग पॅाइंटला फक्त एकच जोडपे बसले होते. इतक्या दूरवर पर्यटक फारसे येत नाहीत. इथे एकजण घर बांधून हॅाटेल (रेस्टा) चालवतो. एक तिसरी चौथीतली लहान मुलगी फोनवर कुणाशी बोलत होती तिला खुणेने चहा विचारला. तिने लगेच "नंतर फोन करते, कश्टंबर आलेत" सांगून फोन बंद केला. बाकड्यावर बसल्याबरोबर एक छोटे मांजर पटकन पायाशी आले, तीन कुत्रे शेपुट हलवत उभे राहिले. मांजरापुढे पोळी टाकली, कुत्र्यालाही पोळी वडा दिला.
"असं नाही खात पोळी" म्हणत मुलीने पोळी कुस्करून दिली पिलाला.
"खूप वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा ~~"
((( हा संवाद तुम्हाला माथेरानमध्ये सतत ऐकायला मिळतो पर्यटकांकडून,)))
" इथे एक कुत्रा आणि पोपट होता. कुत्रा पटकन माझ्याजवळ येऊन चिकटून बसला. त्याला काही खायला दिले. पोपट ओरडत होता. मालक म्हणाले - "अहो तुम्ही पोपटाला दिले नाही म्हणून ओरडतोय, त्यालाही द्या." मग त्यालाही दिले.
"तुम्ही आजोबांच्या वेळी आला होता, आजोबा गेले. आता आजी आहे."
वरती मांडवावर माकडे जमा झालेली पण कुत्रे त्यांना खाली येऊ देत नव्हते.
तिने पटकन चहा आणला स्टीलच्या थाळीत मोठ्या पेल्यात गरमागरम चहा. वरती गारवा होता आणि एवढ्या पायपिटीनंतर वेळेला चहा. एक घुटका घेतला. चक्का दुधाचाच होता. अप्रतिम.
"शाळा कुठे तुझी?"
"बाजारात."
"किती रुपये झाले पाण्याची बाटली अन चहा?'
"तीस आणि पंधरा पंचेचाळीस रुपये."

पैसे देऊन निघालो. पाच वाजले होते. दस्तुरी नाक्याला नव्वद रुपये शेअर टॅक्सी किंवा पावणे सहाची एसटीची मिनी बस पंचवीस रुपयांत. पावले भराभर उचलली तर बस मिळेल. सर्व पाट्या रंगवलेल्या स्वच्छ ठेवल्या आहेत. नगरपालिकेची इमारत छान दिसतेय. पोस्ट ओफिस येईपर्यंत पर्यटक दिसले नाहीत. खान हॅाटेल, स्टेशन पासून थोडी गर्दी दिसायला लागली. पण तुरळकच. घोड्यांवर कॅालेजवयीन कन्यका बसल्या होत्या.
" एक लाइन में खडा करो ना फोटो लेना है।"
एका ठिकाणी एक बुरखावाले मोठे कुटुंब होतं. " तुम्हे याद है हम बचपन में यहा गोला खाते जा रहे थे।"
आठवणी - माथेरानचा गारवा , सुस्तपणा टिकवून ठेवतो बहुतेक.
फोटो ८)
माथेरानचे रस्ते, घोडे. पण हे सवारीचे नाहीत. दस्तुरी नाका ते हॅाटेले यांचं सामान नेतात.

फोटो ९)
पिसरनाथकडे जाणारी वाट. हे माथेरानचे ग्रामदैवत.

चिक्क्कीच्या दुकानांतही कोणी नव्हते. स्टेशनला रुळाकडे घुसलो. पाच-वीस झाले होते भराभर चाललो तर बस मिळेल. घाई करू नका,काळजी घेण्याचे सल्ले वाऱ्यावर फेकतात असे ऐकले असतील पण मी मिनि ट्रेनच्या रुळाच्या खडीवर फेकले. घसरून पडलो.
लगेच उठलो, ( तुम्हाला लागलं का? वगैरे आजूबाजूने आवाज आले तिकडे दुर्लक्ष करून चालू लागलो. ))

घड्याळात पाहिलं. अजून शक्य आहे. मागे जाणाऱ्या शटलला शिताफीने पार केलं. अमन लॅाज स्टेशनच्या पाटीवर उँचाई ७५० मिटर्स. ओके ओके.
कमानीपाशी एक नळ दिसला, पटकन हात धुतले. इथे टॅक्सी स्टँडकडे जाणार्या डावीकडच्या
रस्त्याने जाऊ लागलो तेव्हा येणाऱ्या प्रवाशांकडे पाहून समजले की बस वर आलेली आहे. बस परत निघालेलीच होती पण कार्समुळे अडली होती. चढलो आणि हुश्श झालं, पायपीट संपली होती आता फक्त रेल्वे. नेरळकडे जाणारा घाट छान केला आहे. कठडे रंगवलेत. सवासहाला कर्जत -बदलापूर रोडवर बाहेर सोडले, दहा मिनिटांत नेरळ स्टेशन गाठले. ६:४४च्या मुंबई लोकलला अवकाश होता. बाजारात शिरायला जागा नव्हती एवढे विक्रेते होते. आज बुधवार, नेरळचा आठवडी बाजार. मासे,भाजी,प्लास्टिक वस्तू विकणारे दिसले. परत प्लॅटफॅार्मवर येऊन पाच रुपयांचे गरम पाणी घेतले तेव्हा वरच्या चहाची आठवण आली.
फोटो १०)
एक सेल्फी हवाच. खालच्या पुलाअगोदरच्या फाट्यावर काढलेला.

तिथले स्थानिक गाववाले रोज वर माथेरानला जा ये करून काम करतात. दोन तासांत चढतात. त्यांना सवय असते ती आपल्याला नसते एवढंच. आता सिजन असतो तेव्हा घोडेवाले खाली नेरळला परत जात नाहीत, वरच मुक्काम ठोकतात. त्यांच्यासाठी लागणारे गवत या रामबाग पॅाइंटकडूनच सकाळी पोखरवाडी, बुरुजवाडी,दांडवाडी या वाड्यांतल्या कातकरी बायका डोक्यावर भारे ठेवून सकाळी नेतात.
आपला एक समज असतो की सकाळी लवकर चढले की त्रास कमी होतो पण उलट आहे. दुपारनंतर सूर्य पश्चिमेला आपल्या पाठीवर येतो आणि वारा सुरू होतो त्याचा वर चढताना फायदा होतो.

ट्रेकचे रूट ट्रेसिंग ( Track details )

फोटो ११
बोरगाव फाटा ते पोखरवाडी पूल.
( डांबरी रस्ता )

फोटो १२
पोखरवाडी पूल ते रामबाग पॅाइंट.
( चढण )

फोटो १३
रामबाग पॅाइंट ते दस्तुरी नाका.
( माथेरानला वरती सपाटीवर )

गाडी वेळेवर आली. घरी पोहोचलो अन पंख्याखाली बसलो टिवीसमोर. एबिपी माझा - "माथेरानच्या राणीचा एक डबा घसरला."
"तुम्हीपण खडीवर घसरलात ना?"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच दादा!
सध्या भटकणे कमीच झालंय पण आपल्यासारख्यांच्या धावपळीकडे बघून मन सुखावतंय.

खूप छान लिहिलेय !
फोटो देखिल सुंदर आलेत.
-
मात्र एक खटकले,
तुम्ही पायात चप्पल घालून हायकिंग करता ?

खुपच छान भटकन्ती! Happy
पण हातात छत्री धरुन, चप्पल घालुन एवढी चढण कशी चढलात?

छान भ्रमंती. मला आ वडेल असे फिरायला. पण उन्हात जमेल का असे वाट्ते. चप्पल घालून पाय घसरतो का? माझा कधी कधी सपाट जमिनीवर पण घसरतो. आत्ता एसीत बसून आंबाबर्फी खात वाचायला अन फोटो बघायला तर मस्तच लै भारी वाट्ते आहे.

तुम्ही बरोबर लिंबू पाणी साखर ठेवले पाहिजे. डिहायड्रेट झाले तर? आणि सन स्क्रिन लावा सन बर्न होईल. चीअर्स

>>चप्पल घालून पाय घसरतो का? >>
हो घसरतो, पण उंचवट्यावर टेकायचा. खडीवर नाही.

डिहायड्रेशन?>>
केळी उत्तम.

सकाळी लवकर सुरुवात करायची ना ?>>
दुपारचा अनुभव चांगला आहे. वारा सुरू होतो, ऊन पाठीवर येते. उन्हाळ्यात साडेसातपर्यंत उजेड असतो पश्चिमेला तो एक फायदा होतो.

एस आर डी , कमाल आहे तुमची. बर्‍याच दिवसांनी वाचले हे मी. दंडवत तुम्हाला. एवढ्या उन्हाची पायपीट केलीत? चांगलेच प्रवासवेडे दिसताय की. तरी बरे वेळेवर चहा- पाणी मिळाले. कुत्रा-मा़ंजर-माकडे वगैरेविषयी वाचुन मजा वाटली.

चौक हाइवे नाका ते नानीवली गाव - आंबेगाव - निडीची पट्टी - वन ट्री हिल (माथेरान, मुकाम गिरिविहार हाटेलात) - दुसरे दिवशी मलंग पॉईंट - हाशाची पट्टी - धोधाणी - (पनवेल)अशी भटकंती फेब्रुवारी २००४ मध्ये केली होती. मोरबे धरणाची भिंत बांधत होते. नानीवली गाव बहुतेक आता उठले, तो रस्ता बंद झाला.

एका आठवड्याने पुन्हा ट्रेक केला. (पनवेल) - धोधाणी - सनसेट पॉईंट - माथेरान बाजारपेठ - रामबाग पॉईंट - बुरुज वाडी - पोखरवाडी - ( बोरगाव मार्गाने कर्जत.)सकाळ ते संध्याकाळ.

हे दोन ट्रेकस फेब्रुवारीच्या गारव्यातले होते.
(( माथेरान ७५० मिटर्स उंचावर आहे, ३५० - ५०० मिटर्स उंचीवर काही ठाकरवाड्या आहेत चहुबाजूंनी त्यांना *** ची पट्टी अशी नावे आहेत. पट्टीतल्या ठाकरांना वर माथेरानमध्ये काम मिळते आणि वर वाहनांना बंदी असल्याने माथेरानचा पर्यटन व्यवसाय यांच्यावर अवलंबून आहे. अत्यंत कष्टाळू आणि समाधानी लोक आहेत.))

@रश्मी, थोडी सवय ठेवल्याने फारसा त्रास होत नाही.

३५० - ५०० मिटर्स उंचीवर काही ठाकरवाड्या आहेत चहुबाजूंनी त्यांना *** ची पट्टी अशी नावे आहेत >>> होय, माथेरानच्या पुर्व भागात जुम्मापट्टी पासुन जूम्मापट्टी ठाकूरवाडी, धनगरपाडा, बेकरेची वाडी. असाल धनगरपाडा, नाण्याचा माळ, भुतिवली, बोरीची वाडी, सागाची वाडी, चिंचवाडी या जवळ पास सारख्याच उंचीवर एकाच पातळीत वसलेल्या ते खाली पोखरवाडी पर्यन्त आणि पश्चिमेला हाशाची पट्टी.