कथा - साहेब

Submitted by jayshree deshku... on 27 April, 2019 - 07:29

साहेब
काळे साहेब तीन महिन्यांच्या सुट्टीनंतर आज ऑफिस मध्ये जॉइन होत होते. ह्या ऑफिस मध्ये आल्यापासून त्यांनी इतके दिवस कधीच सुट्टी घेतली नव्हती. कारण ह्या ऑफिसवर,त्यांच्या तिथल्या केबिनवर, स्वतःच्या तिथल्या पोस्टवर ते खुश होते. त्यांनी तिथे चांगलाच जम बसवला होता.ऑफिसच्या मागे असणाऱ्या ऑफिसर्स क्वारटेस मध्ये ते रहात होते. ह्या ऑफिससाठी जागा पाहण्यापासून ते ऑफिसची मशिनरी इंस्टाल होईपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी पुढाकार घेतला होता. साहजिकच हे सर्व करताना त्यांनी स्वतःचा फायदा पहिला होताच. ऑफिसच्या मागे क्वार्टरस बांधून झाल्यावर गार्डन व्ह्यू साईडला असलेली प्रशस्त ३ बी एच के ची क्वार्टर त्यांनी बळकावली. तेही ती त्यांच्या पोस्टला मिळत नसताना. ऑफिसमध्ये पण त्यांनी प्रशस्त केबिनवर कब्जा केला. झेरोक्स मशिन,fax machin, अलिशान कोच, अलिशान चेअर, मोठ टेबल सगळ्या सुविधा त्यांच्या केबिन मध्ये होत्या. सुंदर पेंटीग ,कार्पेट, शेल्फ , कपाट, कॉमप्यूटर ह्या गोष्टीही त्याच्याबरोबर होत्याच. त्यामुळे स्वार्थी, हरामखोर वगैरे वगैरे ऑफिसमध्ये त्यांची ख्याती होतीच. पण हे सर्व त्यांच्या मागे बोलल जाई. त्यांच्या समोर बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती. साऱ्या ऑफिसमध्ये त्यांचा वचक होता. एक प्रकारची जरब होती. रोज दहा वाजून दहा मिनटानी त्यांच्या टेबलवरचा फोन खणखणत असे. विठोबा धावत जाऊन फोन उचलायचा.
“गुड मोर्निग साहेब, ब्रिफकेस न्यायला येऊ का?”
एवढ बोलायचा आणि त्यांची ब्रिफकेस आणायला ऑफिसच्या मागे क्वारटेरकडे धावायचा. विठोबा धावत निघाला की सर्व ऑफिस स्टाफ भराभर काळे साहेबांच्या केबिनमध्ये घुसायचा. घाईने प्रत्येकजण मस्टरवर सही ठोकायचा आणि आपली खुर्ची गाठायचा. काम करायचं असो व नसो कुठलीतरी फाईल उघडून त्यात डोक खुपसून कामात मग्न असल्याचा देखावा तरी करायचा. विठोबा साहेबांच्या घरी जाऊन त्यांची ब्रिफकेस घेऊन निघायचा. पाठोपाठ साहेब रुबाबदार पणे ऐटीत पावले टाकत ऑफिसमध्ये प्रवेश करायचे. फाईलच्या आडून प्रत्येकजण तिरक्या नजरेने काळे साहेबाना निरखत राहायचा, मनात म्हणायचा, “नावाप्रमाणे आतून बाहेरून काळा ते काळाच पण रुबाब आणि तोरा किती !” स्वतःला जाड भिंगाचा चष्मा पण कधी फाईल वर किंवा टेबलवर धूळ दिसायचा अवकाश, लगेच विठोबावर ते खेकसायचे, “ कारे विठ्या डोळे फुटलेत का तुझे? धूळ दिसेना होय रे तुझ्या डोळ्याला?” विठोबा चाचरत म्हणायचा, “तस नाही जी, ते आपल चुकून राहिल असल” म्हणत हातात फडक घेऊन धावायचा. कुणाच्या कामात चूक झाली कि, साहेबांचा तोफगोळा सुरु होई “फुकटचे पगार खायला हवेत. पगार वाढीच्या संपात आधी आणि कामाला कधी मधी. ह्या सरकारी ऑफिसात बिनडोक्यांची भरतीच जास्त आहे.कामात चुका झाल्या तरी चालेल पण नेट सर्फिंग मध्ये नको. हो ना घाटपांडे? झाल का यु एस ला मुलाशी चाटिंग?” बिचाऱ्या घाटपांडे वर काळे साहेब सारखे वॉच ठेवून असत. आणि त्यांना डाफरण्याची एकही संधी कधीच सोडत नसत. घाटपांडे पण एका कानाने एकत आणि दुसऱ्या कानाने सोडून देत. आणि त्यांना हव तेच करत.त्या विरुद्ध लेले बाईंच्या बाबतीत त्यांचा सदाच soft corner असे.आपली लांबसडक वेणी पुढे घेत, घाऱ्या डोळ्यांच्या पापण्यांची उघड-झाप करत, लाडीक स्वरात लेले बाई म्हणत, “sorry sir I will improve next time.” काळे साहेब लगेच विरघळत म्हणत,
"चालायचच, असू दे ,असू दे” घाटपांडे इकडे जाळून राख होऊन जाई. आणि लेले बाईंवर चडफडत राही. मनातल्या मनात पुटपुटे , “ साल्या काळेला देवाने जबर शिक्षा केली पाहिजे.” चडफडणारया समस्त स्टाफच म्हणण देवाने खरोखरच ऐकल असाव.
लंच टाइम मध्ये एक दिवस डबा खाताना काळे साहेबांना गिळायला त्रास होऊ लागला. घसा दुखायला लागला. पावसाळ्याचे दिवस होते. व्हायरल इन्फेक्शन झाल असाव अस सर्वांना वाटल. साहेब डॉक्टरांकडे धावले. त्यांनी ओषधे लिहून दिली. पंधरा दिवस ओषधे घेऊन झाली पण घसा जैसे थे होता. पंधरा दिवसात काळे साहेबांचा चढा आवाज बंद होता. ते मुकाट्याने ऑफिसमध्ये वावरत होते. एकीकडे सर्वांना बरही वाटत होत आणि चुकल्यासारख पण होत होत. घरात बायको सूनही साहेबांना घाबरत असत. बिचकून वागत असत, आवाज बारीक झाला म्हणून काय झाल? नजरेतला धाक होताच ना? भाजीत तिखट मीठ जरी कमी-जास्त झाल की बायकोच्या दहा पिढ्यांचा उद्धार होई. बायको अजीजीने म्हणे, “ अहो आपल्याला आता सून आली, आता तरी जरा शांततेने घ्या. तोंड आवरा.” मग तर साहेबांना जास्तच चेव चढे. चढ्या आवाजात ते बोलत, “ मी नाही कुणाच्या बापाला घाबरत. इतके वर्ष संसार करता ना! मग कसा काय स्वयपाक बिघडतो?” सूनही भेदरून जाई. पण करणार काय नवराही बापाच्या शब्दाबाहेर नव्हता. पंधरा दिवसांच्या antibayotics च्या कोर्स नंतरही घशाचा त्रास कमी नव्हता म्हणून डॉक्टरांनी पुढच्या टेस्ट्स करायला सांगितल्या. टेस्ट्स झाल्या आणि काळे साहेबंना घशाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. साहेब हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. पुढच्या टेस्ट्स , किमो वगैरे सगळ्या प्रोसेस सुरु झाल्या. साहेबांनी ९० दिवसांची मेडीकल लिव्ह टाकली. बातमी वाऱ्यासारखी ऑफिस भर , ऑफिसच्या बाहेर ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये पसरली. काळे साहेबांचा आवाज बंद झाला तसा अनेकांना कंठ फुटला. मनाशी पुटपुटत राहणारे घाटपांडे खुले आम चर्चा करू लागले.
“बघा मी म्हणल नव्हत का, केलेली कर्मे इथेच भोगावी लागतात, आता कुणाला शिव्या हसडतो बघू ना”.
“ पांडे आता काळजीच नाही बघा, वरच तिकीट कटल बरका साहेबांच!” कुलकर्णी म्हणाला. “फुकटची चहा, मिसळ खायचा. कधी पैसे काढायचा नाही” एकबोटे बोलला.
“अरे एकबोटे, पण तुला तो रोजचा तासभर ऑफिसातून लवकर सोडायचा त्याच काय रे? तू थोडाच त्याला फुकटचा चहा पाजणार होय? आम्हाला कधी पाजलास बर?” दळवी सातमजली हसत बोलला. “ अग बाई लास्ट स्टेज आहे म्हणे, विठोबा सांगत होता. तो जातो ना म्हणे रात्रीचा हॉस्पिटल मध्ये झोपायला. मला बाई ऐकून खूप वाईटच वाटल.” लेले बाई बोलल्या.
“बरोबर आहे, आता हिच्या कामातल्या चुका पोटात घालणारा कोणी वाली नाही ना? आता शिक म्हणव बिनचूक काम करायला” कांबळे बाई मनाशी बोलली. तिला थोडा मनातून आनंदच झालेला होता.कारण काळे साहेब थोड अंतर राखूनच तिच्याशी बोलत असत. फटकूनच वागत असत म्हणा ना.
१५ ऑफिसर आणि १०५ इतर स्टाफ अस १२० लोकांच तीन माजली मोठ ऑफिस ते. प्रत्येकाच्या बऱ्या-वाईट, उलट-सुलट चर्चा चालू राहिल्या. विठोबा आपला रोज काळे साहेबांची केबिन सकाळी १० वा. उघडत असे आणि संध्याकाळी ५:३० वा. बंद करत असे. कारण झेरोक्स मशिन दुसऱ्या मजल्यावर फक्त काळे साहेबांच्या केबिन मध्येच होते. त्याची इतरांना गरज पडे. काळे साहेबांच्या केबिन शेजारीच टी.रूम , तिथे चहा- कॉफीची मशिन बसवलेली. सकाळी ११:३० ते १२ च्या वेळात प्रत्येकजण चहा कॉफी साठी तिथे येऊन जाई. तेव्हा प्रत्येकाची नजर काळे साहेबांच्या रिकाम्या केबिनकडे जाऊ लागली. प्रत्येक ऑफिसरला वाटू लागल, ‘ अरे आपल्याला ही केबिन मिळती तर! प्रशस्त, हवेशीर, देखणी केबिन, शेजारीच टी रूम, मजा आहे. कदाचित काळ्या परत येण्याची शक्यताही कमी. कारण म्हणे लास्ट स्टेज आहे. माने madam जी.एम . ना जाऊन भेटल्या. आणि अखेर त्यांनी जी.एम कडे लग्गा लावलाच. त्यांनी आपली बाजू जी.एम कडे मांडली, “ सर माझ्याकडे काळे सरांचा customar care center चा additional charg आहे. तेव्हा अशी केबिन मिळाली तर ऑफिसच स्टेट्स वाढत सर. आता काळे जॉइन होण कठीण आणि झालेच तर माझी केबिन आहेच ना त्यांना.” अशारितीने जी.एम ना पटवून माने madam नी काळे साहेबांच्या केबिनचा कब्जा मिळवला.केबिन वरच्या पाट्या बदलल्या गेल्या. टी रूम कडे येणारा प्रत्येक ऑफिसर माने madam ची पाटी पाहून चुकचुकला ‘ अरे आपल्याला ही केबिन मिळती तर! प्रत्येकालाच हव ते मिळवण जमत अस नाही काळे साहेबांना आणि माने madam ना ते जमत’ विठोबाने काळे साहेबांच सामान माने madam च्या केबिन मध्ये शिफ्ट केल खर पण त्याचा जीव उगाचच धाकधूक होत होता.काळे साहेबांकडे रोज त्याच जाण होत, पण ही गोष्ट बोलायची त्याने टाळली. कारण काळे साहेब विठोबावर उखडले असते. तो काय करणार? तो बिचारा हुकमाचा ताबेदार. एकदा त्याला वाटले साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालावी. पण त्याचं हे अस दुखण, त्यात कशाला बोला? ते जॉइन होतील तेव्हा बोलू अस विठोबाने ठरविल. त्यात पुन्हा आपल्याला सगळे चोंबडा म्हणतात, चमचा म्हणतात. अजून नाही ते बोल कशाला लावून घ्या. कोणीतरी काळे साहेबांना एका होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा पत्ता दिला. त्यांच्या औषधांचा म्हणे कॅन्सर वर हमखास गुण येतो. साहेब ताबडतोब त्या डॉक्टरकडे जाऊन आले. त्यांची औषधे त्यांनी सुरु केली. महिनाभरात आजार स्टेबल होऊन तब्येत सुधारण्याची चिन्हे दिसू लागली. पण आवाज फार बारीक झाला होता. साहेबांचा पूर्वीचा चढा आवाज ते गमावून बसले होते. ते इतक्या हळू आवाजात बोलत की ते फक्त जवळ उभ्या असलेल्या माणसाला ऐकू येई.त्यामुळे साहेब मनातून निम्मे खचले होते. दीड- दोन महिन्यात त्यांची रया गेली होती. पण जेव्हा माणसाला त्याचे खरे मरण समोर दिसते तेव्हा उलट त्याची जगण्याची आसक्ती वाढते. तसे साहेबांचे झाले होते. आपल्याला अजून आयुष्यात खूप काही करायचे आहे. एवढ्यात मरण नको. नवीन जागेत राहावयास जायचे आहे. नातवंड खेळवायचे आहे. ते आजारातून नव्याने उभारी घेऊ पहात होते.
दहा वाजून दहा मिनिटांनी काळे साहेबांच्या केबिन मधला फोन वाजला. विठोबाने फोन उचलला .पलीकडून काळे साहेबांचा क्षीण आवाज आला. विठोबा साहेबांची ब्रिफकेस आणण्यासाठी मागे क्वार्टर कडे धावला. साहेब विठोबा मागून चालत होते. पण त्यात नेहमीची ऐट नव्हती. साहेब ऑफिसमध्ये प्रवेश करत होते.प्रत्येकजण त्यांना स्माईल देत होते, विचारपूस करत होते. पण त्यांच्या बद्दलचा दरारा जाऊन त्या नजरेमध्ये आता त्यांच्याबद्दलची कीव आणि सहानुभूती होती. लिफ्टने साहेब सेकेंड फ्लोअर वर गेले. उजव्या हाताला वळणार तोच विठोबा म्हणाला,
“ सर डावीकडे वळा ,तुमची केबिन बदलली आहे.” “कोणी? कशी काय? कुणाची हिम्मत झाली? हे केव्हा झाल? तू मला अजूनपर्यंत का नाही सांगितल?” हजार सवाल चढ्या आवाजात विचारून साहेबांनी विठोबाला त्रस्त केल असत, पण शांतपणे त्यांनी खुणेनेच सवाल केला “हे काय?” “ तुमचा चार्ज माने madam कडे होता ना, तेव्हा त्यांनी हा बदल करवून घेतला. साहेब मनातल्या मनात बोलले, ‘ह्या बाईच्या वाटेला कोण जाणार? ते धाडस मी केलही असत पण बोलायला आवाज हवा ना!’ “ बर ठीक आहे” एवढंच साहेब बसक्या आवाजात बोलले आणि बदलेल्या केबिन मध्ये त्यांनी प्रवेश केला. छोटी,कोंदट केबिन,शेजारी प्रसाधनगृह. वाऱ्याच्या झुळूकी बरोबर मधूनच येणारी त्याची दुर्गंधी. दोन तासातच साहेबांना पकल्या सारख झाल.दुखण्याचा थकवाही होता, केबिन बदलल्याचा मनस्तापही असेल. त्यामुळे कदाचित त्यांना जास्त पकल्या सारखे वाटत असेल. त्यांनी रूम फ्रेशनर मारला आणि मेल चेक करायला सुरुवात केली. त्यांची ट्रान्सफर ऑर्डर आलेली होती. इंटरनल चेजच होता. कस्टमर केअर सेंटर माने madam कडे गेल होत आणि बिल्डिग मेंटेनस काळे साहेबांकडे दिला होता. त्यांना खूप फिल झाल.रिव्हरशन झाल्यासारखा कमीपणा वाटला. ‘हा आवाज जर चढा असता तर आपण जी एम ऑफिस पण डोक्यावर घेतल असत, आणि मनासारखं सगळ घडवून आणल असत.पण साला घाश्यातून आवाजच फुटत नांही ना!’ सार मनाशीच बोलले साहेब. त्यांना कळल त्रागा करून काही उपयोग नाही.एका गोष्टीची त्यांना नव्याने अनुभूती येत होती. आपल शरीर सुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. आपली साथ सोडायला बघत तर इतरांकडून आपण वावग्या अपेक्षा का करतो? आपल्याला सगळ कळत पण वळत नाही.आपला मूळ स्वभाव पटकन बदलायला तयार होत नाही. ऑफिसमधल्या साऱ्या गोष्टी आज त्यांना असह्य वाटायला लागल्या. चार्ज मेड ओव्हरच्या सह्या करताना त्यांचा हात थोडा अडखळला.पण त्यांनी सह्या केल्या. माने madam नी चार्ज घेतला आणि त्या सहजच बोलून गेल्या. “ सर आता ऑफिस मधला इंटरेस्ट कमी करा नाही तर व्ही.आर.एस. घ्या आणि तब्येतीकडे लक्ष द्या. साहेबांना ‘आता ऑफिस मधला इंटरेस्ट कमी करा’ हे शब्द उगाचच मनाला झोंबले, दिवसभर कानावर आदळत राहिले.
घरी आल्यावर साहेबांनी बूट सेल्फ मध्ये ठेवले नाही. बायको टी.व्ही. पहात होती तो त्यांनी विनाकारण बंद केला. पाय धुवून देवापुढे उदबत्ती, दिवा लावायची त्यांची सवय ते ही त्यांनी केल नाही. चहा मागितला नाही. बेडरूम मध्ये निवांत पडून राहिले. ऑफिसमध्ये साहेबांच्या मनाविरुद्ध बरच काही घडल असाव याची बायकोला कल्पना आली. रात्री झोपताना तिने त्यांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला. तब्येतीची विचारपूस केली, ऑफिस बाबत विचारल. पण त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही. त्यांना आता कुणाची किव, सहानुभूती नको होती. त्यांनी बायकोचा हात दूर झटकला आणि कुशी बदलली. आपल्या उर्वरित आयुष्यात शांत राहण्याचा, शक्यतो सर्वांशी चांगले वागण्याचा त्यांनी मनाशी निश्चय केला.
साहेब ऑफिसमध्ये येत होते,जात होते. स्टाफ आता त्यांना टरकत नव्हता. त्यांची उपस्थिती खिजगणतीत धरली जात नव्हती, बोलण हाय, हलो पर्यंत सिमीत झाल होत. त्यांच्या कोपऱ्यातल्या केबिन मध्ये ना स्टाफची वर्दळ ना कस्टमरची वर्दळ. त्यांना एकट एकट वाटत होत. अशातच जी.एम. साहेबांची ट्रान्सफर ऑर्डर आली ती एकदम काश्मीरला. कोणी साउथ इंडियन लीलावती बाई त्यांच्या जागी जॉइन झाली. तिची इथे राहण्याची सोय नव्हती म्हणण्यापेक्षा ती क्वार्टर मध्ये रहाणार होती. तिच्या योग्य तिला कुठली क्वार्टर द्यावी हा एच. आर. पुढे प्रश्न होता. सगळ्यांच्या डोळ्यापुढे काळे साहेबांची क्वार्टर आली. काळे साहेबांना २BHK च्या क्वार्टर मध्ये शिफ्ट होण्याची ऑर्डर आली. तसेही ते सहा महिन्यांनी क्वार्टर सोडून त्यांच्या नव्या जागेत शिफ्ट होणार होतेच. तेव्हा ती क्वार्टर त्यांनी आनंदाने खाली केली असती. पण आधीच आतून धुमसत असणाऱ्या साहेबांना ही खूपच मोठी मानहानी वाटली. त्यांचा इगो दुखावला गेला. त्यांनी मुलाकडे विषय छेडला, “ आपण दुसरीकडे भाडयाने ३बी एच के ची जागा बघू; आणि मी व्ही.आर.एस.पण घेणार म्हणतोय” बायको त्यांची मनस्थिती ओळखून होती. ती पटकन म्हणाली, “माझही तेच म्हणण आहे. तुम्ही व्ही.आर.एस. घेऊन टाका. आता डोक्याला त्रास करून घेऊ नका” मुलगा थोडा रेंगाळला, थोडा विचार करत म्हणाला, “ बाबा तुमच्या दुखण्याचा खूप खर्च होतोय. तुम्हाला ऑफिसकडून reimbursment मिळते म्हणून जाणवत नाही. तुम्ही व्ही.आर.एस. घेतल्यावर हा खर्च लवकर मिळणार नाही. बाहेर ३BHK ला २० हजार भाडे पुन्हा वेगळे डीपोझिट हे सगळे कसे जमवायचे? त्यापेक्षा तुम्ही व्ही.आर.एस. चा विचार करू नका. आणि बाहेर पण जागा बघायला नको. आपण २BHK च्या क्वार्टर मध्ये शिफ्ट होऊ या. सुनेने पण त्याचीच री ओढली. साहेबांना जाणवलं, आपल्याला प्रतिशब्द करण्याची घरच्या लोकांची हिम्मत वाढली आहे. घरात आपला शब्द प्रमाण ही स्थिती आता राहिली नाही. त्यांना ती म्हण आठवली, ‘पिंजरया मध्ये वाघ सापडे, बायका मुले मारिती खडे’ आणि खेदाने हसू आले. साहेब मनाने खूप खचले. ते २BHK मध्ये शिफ्ट झाले. ती जी.एम. बाई एकटी तिथे रहाणार. सार कुटुंब गावाकडेच रहाणार. ह्या एकट्या बाई साठी आपण क्वार्टर खाली करून द्यायची, त्यांना पटत नव्हते. पण काय करणार? कायदा धाब्यावर बसवणाऱ्या साहेबाना कायद्यानेच विळखा घातला होता.
साहेब केबिन मध्ये बसून मेल चेक करत होते. विठोबाने fax आणून दिला. त्यांची टर्न प्रमाणे नव्या जी.एम. बाईनी रुरला ओर्डेर काढली होती. त्यांचे काम त्यांचे दुखणे कशाचाच विचार केला नव्हता. साहेबांना मनात आले, ‘माझ्या कष्टाची,कामाची कदर ना घरच्यांना ना ऑफिसला कुणालाच राहिली नाही का? त्या जी.एम. बाई समोर जाऊन मेडीकॅल ग्राउंड सांगायची, रडायचं. सहानुभूतीची भिक मागायची. हे सार साहेबाना नकोस झाल. पराभूत झाल्यासारखं वाटायला लागल. त्यांना एकदम खूप थकवा जाणवू लागला. घाम आला. त्यांनी मागे खुर्चीवर डोक टेकल आणि डोळे मिटून घेतले. ते अखेरचेच.

सौ. जयश्री सुभाष देशकुलकर्णी
Mob.-9423569199

Group content visibility: 
Use group defaults

आवडली!

फक्त ते व्हील चेअर शब्द वाचून साहेब अपंग आहेत कि काय वाटलं. आणि बूट सेल्फ ऐवजी शेल्फ करा.

गोष्ट चांगली आहे. भरपूर बारीक सारीक चुका सापडल्या. त्या सुधारणार का?
वर अ‍ॅमी म्हणाली त्याप्रमाणे व्हील चेअर आणि सेल्फ ऐवजी शेल्फ, क्वार्टर, machine, antibiotics. reimbursement, charge इत्यादी.

चांगले चित्रण केले आहे. आपल्या देशातील कार्यालयांमधले वर्ककल्चर हा मोठा विषय आहे. कथा फार प्रातिनिधीक वाटली.

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. सायो आपण दाखवलेल्या चुका बद्दलही धन्यवाद. पण दुरुस्ती कशी करायची ते मला माहित नाही.

jayshree - आपल्या मुळ कथेवर जा सर्वात वरती अवलोकन आणि संपादन असे दोन पर्याय आहेत, संपादन वरती टीक करा उचित बदल करुन शेवटी असलेले निळे सेव्ह बटण दाबुन सेव्ह करा.

मस्त कथा. बेफिकीर आधी लिहायचे ऑफिसच्या कहाण्या, त्याची आठवण झाली.
हल्ली अशा वेगळ्या कथा इथं सापडणं विरळाच. लिहीत राहा Happy

विलभ , राजे, मित प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हीच कथा मी तीन वर्षापूर्वी सुद्धा मायबोलीवर टाकली होती. कदाचित तेव्हा वाचली असेल. ही कथा माझा तीन वर्षापूर्वी ‘पुतळे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यातली आहे.
सिध्दी धन्यवाद

My memory is so powerful. Thanks. Agodar sangitale aste tar bare zale asate. Pu.le.shubhechha.

मस्त.
तुमहू फार नकारात्मक लिहिता अस जाणवतंय. वास्तववादि म्हणून.

डिम्पल, सुनिधी, सस्मित, उर्मिला प्रतिसादा बद्दल धन्यवाद. मला ग्रामीण भागात ऑर्डर निघाली असचं म्हणायचं आहे.

खूपच छान कथन केले आहे ..सरकारी कामकाज ..त्यांची यंत्रणा आणि लोकांचे स्वभाव ,वागणे ..सगळं च लेखन एकदम realistic वाटते......पू ले शु