मिशन बोकारो

Submitted by सदा_भाऊ on 27 April, 2019 - 07:14

तो काळ २००० सालाच्या पुर्वीचा होता. मी ताजातवाना इंजिनीयर आणि एकटा जीव शनिवारपेठेत रहात होतो. एका आतंरराष्ट्रीय नोकरीत नुकताच चिकटलो होतो. अजून पुण्याला व नोकरीला तसा फारसा रूळलो नसलो तरी पुणेरी उर्मटपणाचे धडे गिरवणे चालू होते. नोकरीतल्या बाॅस ते सहकाऱ्यांपर्यंत, पुणेरी मित्रांपासून घरमालकांपर्यंत माझ्या समोर तसे बरेच आदर्श होते. कंपनी जरी कितीही आंतरराष्ट्रिय किर्तीची असली तरी कारभार करणारी मंडळी अस्सल पुणेरीच होती. देशभर अनेक मोठ मोठ्या कारखान्यांमधे आमची आधुनिक संगणक प्रणाली (म्हणजे मराठीत साॅफ्टवेअर) कार्यरत होती. माझ्या ऑफीसचा बहुतांशी स्टाफ सदा फिरतीवर असे तर काही अनुभवी मंडळीना परदेश वाऱ्या करण्याचे कष्ट सोसावे लागत. माझ्या सारखे नवशिके भारताच्या कानाकोपऱ्यात पळत असत.

बऱ्याचदा आमचा बाॅस बोलता बोलता केबीन बाहेर डोकावून जाई. आमच्या कंपनीतला सराईत इंजिनीयरसना बाॅसच्या मनातले विचार कळत असावेत. प्रसंगावधान ठेवून उपस्थित गण मुंडी खाली घालून लपण्याचा प्रयत्न करीत असत. कोणत्यातरी दूरच्या राज्यातून इंजिनीयरला बोलावणे आले असल्याचा सुगावा त्या सराईत लोकाना आधीच लागत असे. मी त्यावेळी नुकताच चेन्नाई वरून काम फत्ते करून परतलो होतो. जणू विजय पताका फडकवल्या प्रमाणे ताठ मानेनं आणि छाती फुगवून बसलो होतो. बाॅसकडून अभिनंदनाचा वर्षावच होणार असल्याच्या तयारीत मी होतो. इतक्यात बाॅसने केबिन बाहेर डोकावले आणि जनतेवर एक कटाक्ष टाकला. मी सोडून बाकी प्रजा दिसेनाशी झाली. बाॅसला मीच समोर दिसल्यामुळे त्याने मला केबिनमधे बोलावले. मी उत्साहाने गेलो आणि माझ्यासाठी नवीन दौरा घेऊन आलो. बाॅसने चेन्नाईचा उल्लेख पण केला नसला तरी मी नव्या उमेदीने कामाला लागलो.

या वेळी मला बोकारे नामक स्थळी मोर्चा वळवायचा होता. भारताच्या नकाशावर अशा नावाचे गाव अस्तित्वात आहे हे पण माझ्या गावी नव्हते. या गावात भारत सरकारचा एक फार मोठा स्टील प्लँट आहे याचे ज्ञान पण त्याचवेळी मला झाले. त्यावेळी हे गाव बिहार राज्यात होते. नंतर ते झारखंडच्या स्थापने बरोबर त्या राज्यात समाविष्ट झाले. मला आता तिथेच जायचे होते. आमची एक संगणक प्रणाली त्या स्टील प्लँटला विकायची होती. आमच्या रिजनल सेल्स मॅनेजर बरोबर नुसतं जायचं आणि परत यायचं अशा बोलीवर बाॅसने मला पटवला होता. त्या साॅफ्टवेअर बद्दल मला काहीच कल्पना नसली तरी काही हरकत नाही; तिथं काहीच करायचं नाही. अशी काहीतरी विचीत्र समजूत माझी घालण्यात आली होती. मी पण त्यावर विश्वास ठेऊन तयार झालो. अर्थात मला पर्यायच नव्हता म्हणा! एक लॅपटाॅप, थोडे पैसे, कलकत्ता पर्यंत विमानाचे तिकीट आदी गोळा करून घरी परतलो.

आईची फोनवर ‘बिच्चारं! पोर किती राबतंय आणि वणवण भटकतंय’ अशी बरीच हळहळ व्यक्त करून झाली. बाबानी मला विचारले की ‘विमानाच्या तिकीटाचे पैसे कंपनीच देते ना रे?’ दोघांच्या प्रश्नांची उत्तरे देत आणि खाण्याचे आबाळ करणार नाही असे वचन देत मी मिशन बोकारोच्या तयारीला लागलो. दुसऱ्या दिवशी आवरून तडक विमानतळावर हजर झालो. डोमेस्टिक असले तरी वेळेतच सुटले. वाटेत कुठेही न थांबता थेट कलकत्त्याला पोचले. विमानतळावर मला न्यायला आमचे रिजनल सेल्स मॅनेजर येणार होते. त्यांचे नाव होते भुजबळ. ते मराठीच आहेत असे बाॅसने मला सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. नावावरून मी मनात त्यांची एक प्रतिमा करून ठेवली होती. आडदांड धिप्पाड, पिळदार मिशा आणि पहाडी आवाज असावा असं मला अपेक्षित होतं. पण मला नावाला साजेसं काहीच रूपडं या भुजबळ साहेबानी घेतलं नव्हतं. कृष देहयष्टी, अंगात फुल स्वेटर तरी थंडीने कुडकुडणारा आणि आवाज तर अगदीच फुस्स! तरीपण तोऱ्यात उभे असलेले चाळीशीतले भुजबळ साहेब मला भेटले. वयाचा आणि पदाचा मुलाहीजा बाळगून मी पण त्याना ‘साहेब’ संबोधून खुश केले. कलकत्त्याच्या भयंकर रहदारीतून प्रवास सुरू झाला आणि एका चिंचोळ्या गल्लीतील हाॅटेलच्या दारात आमची टॅक्सी थांबली. एकंदरीत आपला महाराष्ट्रच सर्वाधिक सुजलाम सुफलाम आहे असे माझे ठाम मत झाले. आम्ही दोघे एका हाॅटेलच्या दारात उतरलो. माझी खोली तशी यथातथाच होती. फक्त रात्रीचा तर प्रश्न आहे असं काहीतरी सांगून भुजबळ साहेबानी माझे पैसे भरून टाकले. आता पर्यंत बराच उशीर झाला होता. भुजबळ साहेबानी ताबडतोब जेवण करून रूमवर झोपून टाकण्याची आज्ञा दिली. पहाटे चार वाजता ट्रेन होती त्यामुळे तीन वाजता हाॅटेल सोडायचे होते. ‘वेळेत तयार रहा’ सांगून साहेब स्वगृही निघून गेले.

मी तर जाग येते का नाही या भीतीने नीटसा झोपलोच नाही. उगाचच गाढ झोप लागल्याचे स्वप्न मला पडल्याने जागाच राहीलो. निशाचरा सारखा अडीच वाजता उठून आंघोळ केली आणि भुजबळ साहेबांची वाट पहात बसलो. ते सुध्दा सांगितलेल्या वेळेत हजर झाले. आंघोळ दाढी करून साहेब एकदम फ्रेश दिसत होते. अंगात फुल स्वेटर तर होताच शिवाय एक कान टोपडं डोक्याचं थंडीपासून संरक्षणासाठी घातलेलं होतं. आम्ही ताबडतोब स्टेशनवर पोचलो. पहाटेच्या वेळी कलकत्याचे ते हावडा स्टेशन गजबजलेले असले तरी निम्म्याहून अधिक झोपलेलेच होते. अंथरूण पहाणे शक्य नसल्याने कोपरा पाहून पाय पसरलेली जनता दिसत होती. चित्र विचीत्र वासांमधून आणि वाटेतल्या अनंत अडथळ्याना पार करीत आम्ही बुकींग ऑफीस पर्यंत पोचलो. भुजबळ साहेबांकडे आमचे आरक्षणाचे तिकीट आधी पासूनच होते. हातात धरून ते गाडी क्रमांक आणि फलाट च्या तक्त्याकडे पळाले. तिथं भली मोठी गर्दी उसळलेली होती. खरंच आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक प्रवास का करतात हे एक न उलगडणारं कोडं आहे. पहाटेच्या थंडीत घामाघूम होत भुजबळ साहेब परतले. एका हातात तिकीटं तशीच तर दुसऱ्या हातात डोक्याचं टोपडं होतं. धापा टाकत जवळ येऊन त्यानी खुलासा केला. “ट्रेन १० वाजे पर्यंत लेट झाली आहे.” आता सकाळच्या चार पासून दहा पर्यंत या प्लॅटफाॅर्मवर काढावे लागणार या विचाराने माझ्या अंगावर काटा आला. या अशा झोपेच्या वेळी तिथं साधी बसायची पण सोय नव्हती. मीच जरा धीर दाखवत म्हणलं. “साहेब, मी जरा चौकशी करून येतो. द्या तिकीटं इकडं!” त्यांच्या उत्तराची वाट न पहाताच मी तिकीटाचे कागद खेचले आणि गर्दीकडे पळालो. समस्त गर्दी वासियांच्या तोंडाला कसल्यातरी पान मसाल्याचा वास येत होता आणि बाकी संपुर्ण शरीराला सरसोंका तेल व घाम यांचा मिश्र सुगंध दरवळत होता. अचानक माझ्या नाका वाटे संपुर्ण श्वसन संस्थेत पसरलेल्या अनामिक दर्पामुळे माझे डोके गरगरू लागले आणि माझ्या सुध्दा कपाळावर घर्मबिंदू गोळा होऊ लागले. तरीपण लढवय्याची जिगर ठेऊन मी मुसंडी मारली आणि गर्दीच्या खोलवर घुसलो. अनेकानी त्यांची लाळेरी तोंडं आणि चिकट हात माझ्या शुचिर्भूत शर्टाला पुसली गेल्याची पर्वा मी न करता गाडीच्या तक्त्या पर्यंत पोचलो. तक्ता नीट न्हाहाळला आणि भुजबळांच्या माहीतीवर शिक्का मोर्तब केले. पुरत्या दमछाकी नंतर मी भुजबळांना वर्दी दिली. आता काय करावे हा भुजबळाना प्रश्नच पडला. आम्ही पुन्हा तडक तेच हाॅटेल गाठले आणि सोडलेली खोली पुन्हा धरली. साधारण साडे पाच ते नऊ अशी मी छान ताणून दिली.

साडे नऊ च्या ठोक्याला आम्ही पुन्हा हावडा स्टेशन गाठले. पहाटेचे निद्रिस्त स्टेशन आता वेड लागल्या सारखे पळू लागले होते. सर्व दिशेने प्रत्येक जण उशीर झाल्या सारखा नुसता पळत होता. संथ गतीनं चालणारा मुर्ख ठरेल असा प्रत्येकाचा वेग होता. भुजबळांच्या गडबडीत आम्ही पुन्हा मघाच्याच तक्त्यापाशी पोचलो. फलकावरून आमच्या ट्रेन चे नावच गायब झाले होते. खिशातली शंभरची नोट हरवावी असा भुजबळांचा रडवेला चेहरा झाला. तरी त्यानी अवसान गोळा करून चौकशी खिडकीसमोरील रांगेत साधारण तासभर व्यर्थ केला. ट्रेन चुकून निघून तर गेली तर नसेल ना अशी मी शंकेची पाल त्यांच्या मनात सोडल्यावर तर बिचारे धारातीर्थच पडायचे राहीले. मी समोरून चाललेल्या एका हमालाला थांबवला; भुजबळानी त्याला ट्रेन बद्दल विचारणा केली. त्यानं ती ट्रेन नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे रद्द झाल्याचे सांगितले. भुजबळाना तर आता भलताच मानसिक धक्का बसला. मी पण आता खुपच गोंधळून गेलो होतो. बोकारो पर्यंत पोचायचे तरी कसे? नक्की नक्षलवादी म्हणजे काय याची जाणीव मला मुळीच नव्हती. यालाच म्हणतात अज्ञानात सुख. तसा भुजबळ मुरलेला माणूस होता. थोडा चलबिचल झाला तरी कच खाणारा मुळीच नव्हता. बोकारो ला जाणारी दुसरी ट्रेन कोणती याची शोध मोहीम चालू झाली. एक पण ट्रेन शेवटा पर्यंतची सापडेना. बऱ्याच ट्रेननी अंतिम टप्पा नाकारला होता. मला त्या भागातली मुळीच माहीती नसल्यामुळे मी भुजबळांच्या निर्णयावर विसंबून होतो. परतीच्या पुण्याच्या विमानाची चौकशी करूया का? हा प्रश्न मी जीभेवरून दहा वेळा घशात ढकलला.

आता भुजबळानी अशी माहीती मिळवली की एक कोणती तरी पॅसेंजर ट्रेन दुर्गापूर पर्यंत जात आहे. किमान तिथं पर्यंत तरी ट्रेन ने जावे अशा विचाराने त्यानी बरीच खटपट करून दोन जनरल बोगीची तिकीटे काढली आणि आमचा मोर्चा पॅसेंजरच्या प्लॅटफाॅर्म कडं वळला. उघड्यावरचं काहीही खायचं नाही अशी सक्ती भुजबळानी केली असल्यामुळे कितीही भुक लागली तरी केवळ मुग गिळण्याची परवानगी होती. आता कदाचित त्यानाच भुक लागली असावी. त्यानी त्यांच्या पाठीवरील पिशवीतून खाकरा आणि बिस्किटं काढली आणि माझ्या हातावर दोन दोन टिकवली. स्वत: पण तेवढीच घेऊन पुरवठ्याच्या हिशोबानं पुन्हा पिशवीत ढकलली. थंड पेयाच्या आणि मिळालेल्या खाद्याच्या साथीत पॅसेंजरची वाट पहाणे सोहळा पार पडू लागला. साधारण तासाभरानं ती पॅसेंजर फलाटावर येताना दिसली. कंटाळा आल्यावर पाय मोकळे करायला बाहेर पडल्या प्रमाणे ती ट्रेन अत्यंत धीम्या गतीने येऊन थांबली. आमच्या प्रमाणे बरीच गोर गरीब जनता सकाळ पासून खोळंबलेली होती याचं ज्ञान क्षणार्धात झालं. भुजबळ साहेबांच्या वेगानं मी माझी बॅग उचलून डब्याकडे पळालो. जनरल डब्यातूनच प्रवास असल्यामुळे आरक्षित जागा शोधण्याचे कष्ट नव्हते. तरीपण पॅक भरलेल्या डब्यांमधून कोणी बसायला जागा देता का अशा काकुळतीने आमची वरात पार पडली. अखेरीस एका ठिकाणी कुठंतरी कोपऱ्यात बुड टेकवायला दोघाना जागा मिळाली. ट्रेन मधला फॅन चालू आहे हे त्याच्या आवाजामुळं लक्षात येत होतं. आम्ही दोघेही चांगलेच घामाघूम झालो होतो. अखेरीस भुजबळानी त्यांचे फुल स्वेटर काढून कमनीय देहयष्टी दाखवलीच. अर्थात हाफ शर्टातून!

आमची ट्रेन काही वेळातच सुटली. खिडकीतून येणारा वारा आम्हाला आल्हाद दायक वाटू लागला. आसपासची जनता आम्हा पांढरपेशी दोघांकडे परग्रहावरील प्राण्याप्रमाणे पहात होता. माझ्या खांद्यावरील लॅपटाॅपच्या बॅगेकडे बरेच जण टक लावून पहात आहेत असं मला उगाचच जाणवू लागलं. मी ती बॅग पाठीवरून पोटाला, मांडीवरून पायात अशी उगाचच हालचाल करू लागलो. भुजबळाचे लक्ष माझ्या बॅगेकडे गेले. थोडी गार हवा खाऊन आणि हलका डुलका काढून ते पण फ्रेश झालेले होते. त्यानी मला विचारले “अरे! तू प्रेझेंटेशन बनवलंयस का?” या प्रश्नाने माझी तर हवाच गेली. एक तर मला तसलं काही माहीती नव्हतं, मी तसलं काही बनवलं नव्हतं आणि तसं काही करण्याची माझी मानसिक तयारी पण नव्हती. मी स्पष्ट नकार दिला. त्यावर थोडा त्रागा आणि थोडं शिकवण्याच्या सुरात त्यानी मला एक छोटं प्रेझेंटेशन बनवून ठेव, गरज पडू शकते. असा सल्ला दिला. मला मान्य करण्या शिवाय पर्यायच नव्हता. मी बॅगेतून लॅपटाॅप काढला आणि त्यावर काहीतरी बनवू लागलो. थोड्या वेळात माझ्या लक्षात आले की हजारो डोळे माझ्या स्क्रिन वर लागलेले आहेत. टोपीवाला आणि झाडावरील माकडां प्रमाणे आसपासची शंभर माकडं माझ्या टोपीकडं टक लावून पहात होती. फक्त मला टोपी प्रमाणे लॅपटाॅप टाकण्याची मुभा नव्हती. माझ्या आसपासच्या कंपार्टमेंट मधे आजूबाजूला बघ्यांची ही गर्दी उसळली. माझ्या प्रत्येक क्लिकवर बघ्यांचे डोळे विस्फारत होते. लॅपटाॅपची बॅटरी मरायला टेकली होती. मी कसेबसे काहीतरी प्रेझेंटेशन बनवले आणि लॅपटाॅप बंद केला. कोणीतरी खांद्याला थोपटून विचारलेच कितनेका है? मी ‘कंपनीका है’ सांगून उगाचच भाव खात दुर्लक्ष केले. मला त्यावेळी सेलिब्रीटी फिलींग येऊ लागले.

आता घडाळ्यात दोन वाजत आले होते. ट्रेन चार पावलं चालायची आणि दहा मिनीटं थांबायची. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्याना बाजूला सरकून वाट देण्याचा सौजन्यपणा फक्त आमच्याच ट्रेनकडे होता. या वेगानं दुर्गापुर ला पोचायला संध्याकाळ होऊन जाईल अशा विचाराने भुजबळ साहेब अस्वस्थ झाले. शिवाय आमच्या पोटात कावळे चिमणी कबुतरं सर्वच पक्षांचे संमेलन भरले होते. आसपासच्या विविध गंध धारण केलेल्या जनतेचे मात्र सतत उदर भरण चालू होते. अन्नावरची वासना उडवण्याचे त्यांचे आटोकाट प्रयत्न चालू असले तरी पोटातील पक्षी काही शांत बसू शकत नव्हते. आता मी माझ्या पिशवीतला चिवड्याचा पुडा उघडला आणि भुजबळ साहेबांच्या समोर धरला. त्यांनी एक दोन घास खाल्ले पण अचानक काहीतरी खुणगाठ बांधून मला निक्षून सांगितले की आपण आता पुढच्या स्टेशन वर उतरू. तिथून पुढं टॅक्सीने जाऊ. मी तर फक्त होयबाचा धनी! मुकाट्यानं आज्ञा पाळत पुढच्या स्टेशनवर उतरलो. दोघानी स्टेशनच्या बाहेरच असलेल्या सोवळ्या व सुस्वच्छ हाॅटेलात दाल च्या संगतीने रोटी नामक प्रकार तोडला आणि पक्षाना शांत केले. मला दुर्बुध्दी की काय झाली आणि मी सहज स्वयंपाकघरात डोकावून पाहीले. तेथील स्वच्छता पाहून पुढील किमान दोन तास जरी जीवंत राहतो का नाही अशी शंका माझ्या डोक्यात येऊन गेली. आता पुढचा प्रवास टॅक्सीने करायचा होता. स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीनी इतक्या लांब येण्यास स्पष्ट नकार दिला. क्षण भर मला ट्रेन सोडल्याचा पश्चाताप झाला. पण भुजबळ साहेबानी हार न मानता एका वाहन चालकाला पटवलाच. कदाचित व्यवहार होताना गाडीची अवस्था भुजबळ साहेबानी पाहीली नव्हती. गाडीच्या हाॅर्नच्या साथीने बाकीचे सर्व भाग तितक्याच क्षमतेने वाजत होते. बसताना चुकून सीट झाडून बसण्याचा प्रयत्न केला आणि उठलेल्या धुरळ्यामुळे चांगलाच ठसका लागला.

काही म्हणा पण खाजगी वाहनातून आणि ते ही चालका सहीत प्रवास असेल तर खुपच आरामदायी वाटतो. आम्हाला दोघानाही तसंच काहीसं वाटू लागलं. त्या चालकाच्या तोंडात भरलेला माव्याचा मधूर सुगंध घेत आमचा प्रवास सुरू झाला. मी गाडीच्या कुवती वर व्यक्त केलेली शंका कदाचित चालकाला आवडली नसावी. तो ताशी १०० च्या वेगानं पळवू लागला. भुजबळ जरी निवांत डुलका काढत असले तरी माझे अर्धे लक्ष रस्त्यावर आणि अर्धे वेगावर होते. हा चालक मुद्दामून खड्ड्यातून गाडी घालतोय का खड्डेच पळत गाडीच्या खाली येतायत हे काही कळत नव्हते. भुजबळ साहेबांची ब्रह्मानंदी टाळी वाजलेली होती. आता या चालकावर जर अंकुश लावायचा असेल तर भुजबळ साहेबांची झोप मोडावीच लागेल असा हिंस्त्र विचार माझ्या डोक्यात आला. जान सलामत तो झोप पचास अशी स्वत:चीच समजूत घालीत मी साहेबांची झोपमोड केलीच. क्रिकेट आणि राजकारण हे दोन्ही विषय मेलेल्या भारतीय माणसाला पण बोलतं करू शकतात; भुजबळ तर फक्त झोपलेलेच होते. भारतीय राजकारणात आणि अर्थकारणात मुरब्बी असण्यासाठी कोणत्याही परीक्षेची गरज नसते; फक्त भरपूर गप्पा मारता यायला हव्यात. या नंतर भुजबळ साहेब आणि चालक या तज्ञांच्या राजकारणावरील विवेच्छक विश्लेषणावर आमचा पुढील प्रवास सुरू झाला. काँग्रेसची राजनीती, युवापिढी, सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्न या सर्व विषयांची उहापोह चर्चा अगदी राज्य, जिल्हा पातळीचे राजकारण इथंपर्यंत येऊन ठेपले. दोघा दिग्गज तज्ञांसमोर मी अगदीच किरकोळ ठरत होतो. तसे दोघां मधे काही तात्विक मतभेद होते पण मुख्यत्वे मला दोघांचेही म्हणणे पटत होते. मी नेमका चालकाच्या मागेच बसल्यामुळे आमच्या गप्पांच्या बरोबरीने त्याचे मुखतुषार माझा चेहरा रंगवू लागले.

आमच्या छान रंगलेल्या गंप्पांमधे एक विघ्न आडवे आले. रस्त्याच्या मधोमध १०-१५ लोक वाट आडवून उभे होते. त्याना पाहून चालकाने गाडी थांबवली आणि उतरून त्याच्या जवळ बोलायला गेला. काहीतरी चर्चा करून परत आला आणि त्याने २०० रूपयाची मागणी केली आणि ते पैसे सर्रळ जाऊन त्यांच्या ताब्यात देऊन टाकले. पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. माझी जिज्ञासा गप्प बसू देत नव्हती. गाडी थोडी पुढं गेल्यावर मी पैशाचा विषय काढलाच. चालकाने समजावलं की हे पैसे देणं कसं महत्वाचं आणि अनिवार्य आहे. या भागात नक्षलवाद्यांचे सतत हल्ले होतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची वित्तहानी, जीवहानी सुध्दा होते. अशा वेळी आसपासच्या खेड्यामधील काही तरूण समाज सेवकानी एकत्र येऊन प्रवाशांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने कार्य सुरू केले. त्या कार्याला थोडासा हातभार म्हणून हे पैसा! या उलगड्या नंतर माझ्या मनामधे सर्व गुंडसदृष्य समाज सेवकांबददलचा आदर दुणावला. त्यानंतर साधारण शंभर किलोमीटर अंतरावर अजून एक गुंड सेवकांचा ताफा स्वागतासाठी उभा होता. यावेळी मात्र चारशे रूपयावर सौदा तुटला.

अजून किती समाज सेवक भेटणार असा विचार माझ्या मनात घोळत असतानाच अजून एका ताफ्या समोर आम्ही हजर झालो. यावेळी गुंड समुदाय काहीतरी वेगळ्या विचारात असल्यासारखा वाटत होते. त्यांचा चालका बरोबरची बोलणी फिसकटल्या सारखी वाटली. बिचारा तोंड पाडून परत आला. भुजबळानी घाबरून विचारले आता किती मागतायत? त्यानं काही बोलायच्या आत एका सज्जनाने आमच्या गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरण्याची आज्ञा केली. मी तर आता नवीन कोणते दिव्य पहायला मिळते या कल्पनेने घाबरून गेलो. उतरताना भुजबळानी स्वेटर खांद्यावर गुंडाळून घेतला. मी मात्र लॅपटाॅपची बॅग तिथंच सोडून उतरलो. कोणा एका स्वयंसेवकानं गाडीची डिक्की उघडून आमच्या कपड्याच्या बॅगा उचकटल्या आणि बंदूक, दारू गोळा अथवा दारू यातला काहीच मिळालं नाही म्हणून हळहळत पुन्हा डिक्की बंद केली. ‘कुछ नही मिला!’ अशी त्यानं त्याच्या म्होरक्याला वर्दी दिली. आम्हाला तिघाना रांगेत उभं करून त्या म्होरक्यानेच दूरून निरखले. ‘पैसा लेके छोड दो।’ अशी त्यानं तिथूनच आज्ञा सोडली. एका कार्यकर्त्यानं भुजबळच्या खिशावर हक्क दाखवत पाकीट काढून घेतले. त्यातले शिल्लक राहीलेले शेवटचे पाच हजार काढून घेऊन पाकीट प्रेमपुर्वक परत केले. माझ्या पाकीटातले दोन हजार रूपये मी त्यानी न मागताच प्रामाणिक पणे कार्यकर्त्यांच्या हातात सुपूर्द केले. एका अति सज्जन कार्यकर्त्याला भुजबळांचे खांद्यावर गुंडाळलेले स्वेटर आवडले म्हणून त्याने ते प्रेमपुर्वक आणि हक्काने ठेऊन घेतले.

पुढचा प्रवास मुकपणाने सुरू झाला. चालकाच्या तोंडातला मसाला संपला होता तरी तो गप मुकाट्यानं शांतपणे गाडी हाकत होता. ते भेटलेले समाजसेवक हे दस्तुरखुद्द नक्षलवादीचं होते असा खुलासा चालकाने केला. मी आणि भुजबळ साहेब सुन्न होऊन बसलो होतो. जीव वाचला यातच धन्यता मानून प्रवास पुढं चालू होता.

साधारण सूर्य अस्ताचे समयी आमची गाडी बोकारो नगरीत ला पोचली. आमच्या अंगाचे तुकडे पडले होते. आमचा स्थानिक सेल्स मॅनेजर श्रीवास्तव आमची वाटच पहात होता. आम्हाला पाहून तो भलताच खुश झाला. एका मोठ्या ऑर्डरची त्यानं शक्यता वर्तवली. तिथल्या हाॅटेलवर चेक इन केले आणि आराम करण्याचा मनोदय मी आणि भुजबळ यानी व्यक्त केला. श्रीवास्तव ने उद्या सकाळी भेटू आणि लगेच कस्टमर मिटींग ला जाऊ असे सांगितले आणि निघून गेला. भुजबळाना त्यांचे स्वेटर गेल्याचे फारच दु:ख झालेले होते. थंडीत कुडकडत स्वेटर ची आठवण काढीत घोकत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीवास्तव आला आणि त्यानं बातमी दिली... मिटींग एक महिना पुढं ढकलली असून तुम्हाला महिन्याभरानं पुन्हा यावं लागेल...! आत्ता परत जावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त धम्माल लिखाण !

----भुजबळाना त्यांचे स्वेटर गेल्याचे फारच दु:ख झालेले होते. थंडीत कुडकडत स्वेटर ची आठवण काढीत घोकत होते.---- आठवण काढीत घोरत होते असे हवे का ?

घोकत होते म्हणजे स्वेटर गेले, स्वेटर गेले असे थंडीने कुडकुडत वारंवार तेच वाक्य बोलत होते. खूप विस्ताराने लिहीता आली असती, घाईत लिखाण केले असे जाणवते. सुंदर लेख. पुलेशु.

मस्त लिहीलंय.पुन्हा त्यावाटेला कधी गेलाच नसाल असं वाटतंय Wink पण चुकून गेलेच असाल तर तो प्रवास कसा होता ते सांगा. Happy

मस्त लिहलंय. अतिशय आवडलं!
ते रेल्वे स्टेशनचे वर्णन वाचून शक्ती सिनेमात करिष्मा कपूर भारतात येते तेव्हाचे स्टेशन आठवले.
२००३च्या शेवटी माझी एक हॉस्टेलमेट होती बोकारोची. बोकरो-स्टीलसिटी अशा नावानेच ती माहीत असते उत्तरेकडच्यांना. टाटांचा प्लांट आहे ना तिथे?

धन्यवाद _/\_

कथेतील तपशील थोडी अतिशयोक्ती आणि थोडी करमणूक या प्रकारात आहे. फार मनाला लावून घेऊ नये. Happy

हा चालक मुद्दामून खड्ड्यातून गाडी घालतोय का खड्डेच पळत गाडीच्या खाली येतायत हे काही कळत नव्हते. >>>>> Lol भारीये सारे लिखाण.

फार मनाला लावून घेऊ नये.
कुणाला पडलंय? जिलबी तुम्ही पाडली. जमली की नाही चर्चा तर होणारच ना.

हा चालक मुद्दामून खड्ड्यातून गाडी घालतोय का खड्डेच पळत गाडीच्या खाली येतायत हे काही कळत नव्हते. >>>>> Lol भारीये सारे लिखाण.>>+१