एका चष्म्याची दुसरी गोष्ट

Submitted by मकरंद गोडबोले on 25 April, 2019 - 08:04

"हे इथले हे कुठाय?"
"शीऽऽऽऽऽतल. तू याचे हे इथून उचललेस का?"
"नाही ताई. मी त्यांच्या कशालाच हात लावत नाही"
हा डायलाॅग रोज सकाळचा. आता माझे हे, म्हणजे काय हे सगळ्यांना ठाउक आहे. हा उगाच दादा कोंडकी विनोद करायचा सुफळ प्रयत्न नसून, मी त्याला दुसऱ्या कुठल्याही नावानी हाक मारू शकत नाही. माझे हे, म्हणजे माझा चष्मा पुसायचे लोशन असलेली फवारा तंत्रज्ञानावर आधारलेली बाटली. याला मी एकदा बाटली म्हटले तर वेगळीच बाटली हातात आली. वर सकाळी सकाळी ही बाटली का, असा कटाक्ष फुकट मिळाला. एकदा मी कुपी म्हटले, तर देवघरतली अत्तराची आली. वर डोळ्यात इतका संशय दाटला की ज्याचे नाव ते. म्हणून मग आता माझी ही कुठे आहे. फारफारतर चष्म्याची ही. ही बाटली मला एका ठिकाणी लागते, आणी ती तिथे कधीच नसते. ती का नसते, याला उत्तर नाही, तिला कधीच कुणी हात लावत नाही. तिला माझ्याशी सकाळी सकाळी लपंडाव खेळायला आवडतो. त्यामुळे मी बाहेर आलो, की ती लपून बसते. मग शोधाशोध. मग नाही मिळाली की वरचा डायलाॅग. मग हळूच शीतल ती बाटली हातात देते. तिला माहीत असतं, कारण तिनीच तर ती हलवलेली असते ना.
ही शीतल घरात आल्यापासून अनेक गोष्टी होउ लागल्या आहेत. मी सकाळी सकाळी चहा करायला गेलो. (थट्टा नाही राव. ही काल्पनिक गोष्ट नाही आहे. सत्यघटनेवर आधारीत) चहाच्या पातेल्यात पाणी घेतले, ते गॅसवर ठेवले. लायटर, एका फुटक्या कपात ठेवलेला असतो. (हा कप फुटका नाहिये. पण असे म्हटले नाही तर जातवाले चेकाळतील) तिथे आपोआप हात गेला. तर लायटर नव्हताच. या अशा नव्हताच या गोष्टी घरात फार वाढल्यात. मग मी आपला सगळे ड्राॅवर उघडून लायटर शोधतोय. वर हिची बोलणी खाल्लीच, "नुसते पाणी ठेवून चहा करतोय असे दाखवायचे ना नुसते…." या बाबतीत ही फक्त नावाला देशस्थ आहे, बोलायला सासरकडचीच. तर हा लायटर आमच्या शीतलनी धुवून ठेवला होता. मला सांगा, हे कसे डोक्यात येईल? आता कालचीच गोष्ट, मी चहा करायला पाणी ठेवले. (हे सत्य आहे) लायटरही मिळाला. जागेवर नव्हता, पण जवळपास होता. मग सवयिनी साखर टाकायला गेलो, तर डबा गायब. मी शोधतोय. चक्क धुतला का तेही बघितले. सापडेचना. वर मी बोलणी खातोय, "गेलं पाणी वाफ होउन. काळं पडलंय पातेल, आता हे साफ कोण करणार, तुझी…." तमाम सासुरवाशिणिंना, ही गाळलेली जागा नीट भरता येते. त्यामुळे ते साफ कुणी करावे ते मी मुळीच लिहिणार नाही. मग परत गुमान आता बाहेर कामाला जावे असा विचार केला की वरचा डायलाॅग. त्याच्याशिवाय मला बाहेर जाता येत नाही. म्हणजे झालंय काय, की माझा चष्मा…..
तर हाच आहे मूळ मुद्दा. माझा चष्मा. चिरंजीव मोठे झाल्यामुळे हल्ली मला खरेदितले काही कळत नाही, असे म्हणणाऱ्या घरात दोन व्यक्ती झाल्या आहेत. सोप्या करून ठेवलेल्या गोष्टी, उगाच अवघड करायची यांना सवय आहे. माझी खरेदी तशी सोपी हो. मुळात दोनदाच होते. एकदा वाढदिवसाला, आणि दिवाळिला. अधे मधे कधीच नाही. त्यामुळे हा प्रकार फार वेळा सहन करायला लागत नाही. पण जेव्हा होतो, तेव्हा काही वेळातच दोघांचे हे संगनमत होते. आता माझा खरेदिचा प्रकार किती सोपा के बघा. काॅटनकिंगच्या कुठल्याही दुकानात जायचे. आपल्या मापाची कुठली पॅंट उपलब्ध आहे ते बघायचे. त्याच्याशी मिळते जुळते कुठले शर्ट आहेत ते बघायचे. बील द्यायचे आणि यायचे. सगळे मिळून पंधरा मिनिटे जातात. बदलाची सुरुवात काही वर्षांपूर्वी झाली. मी निमूट एक पॅंट निवडली, आणि शर्टांकडे निघालो तर दादू ओरडला, “बाबा” सगळे दुकान मी काहीतरी चोरी केली आहे असे माझ्याकडे बघायला लागले. आणि मी ही मध्यमवर्गीय भिडस्तपणामुळे हातातल्या पॅँटकडे ही चोरिचीच का काय असे बघायला लागलो. तसे खरेच होते ना. अजून बील कुठे दिले होते. तोवर चोरिचिच. असे सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे खेचून झाल्यावर तो जवळ येउन हळूच मला म्हणाला, “याच रंगाच्या तीन पॅंट्स तुझ्याकडे आहेत” हे मात्र कानात बोलला म्हणून बरे. नाहितर लोकांनी मला रंगांधळा करून टाकले असते.
काहीच दिवसांपूर्वी मी सफरचंदी माणूस, स्टिव्ह जाॅब्स वरचे एक पुस्तक याला घेउन दिले होते. त्याच्यातली त्यानी मला खूप भारावून जाउन एक गोष्ट दाखवली होती. ती म्हणजे त्याच्या वाॅर्डरोबमधे म्हणे फक्त एकसारख्या जीन्स आणि राखाडी टिशर्ट होते. हे असेच काहिसे झुक्याचे ही आहे म्हणे. माझ्या डोळ्यासमोर हे दोन आदर्श तरळले. आता मी या आदर्शांसारखे, न ठरवता, केवळ मूळ स्वभाव तसाच आहे, म्हणून असे वागतोय, हे आमच्या श्रेष्ठ चिरंजिवाला का कळू नये, हे मला कळेना. मग मी ती पॅंट खाली ठेवून निमूट दुसरा रंग निवडला. तो ही होताच म्हणे. याच्या नंतर फक्त पिवळा रंग शिल्लक होता. तो तिला आवडला नाही, म्हणून सुटलो. वर शर्टाचे तसेच. आमच्याकडे घरी इस्त्री कुणिही करत नाही. तरी इझी आयर्निंगचा शर्ट का घ्यायचा, हे मला कळेना. तरी तोच घेतला गेला. आता मी माझा मी पणा न गाजवता, या दोघांना हवी तशी माझी खरेदी केली, म्हणून मग लगेच, कसे मला कळतंच नाही याच्यावर जवळपास शिक्कामोर्तबच झाला. अर्थात मी माझीच आवड लादली असती तर, हट्टी दुराग्रही अशी वेगळी विशेषणे होतीच. (म्हणजे विशेषण मिळणारच, कुठले ते फक्त आपण ठरवायचे)
माझा चष्मा…. (हाच बहुतेक मूळ मुद्दा होता.) तो करायचे गणित फार सोपे असायचे. ठरलेल्या डाॅक्टरांकडे जाउन डोळे तपासून घ्यायचे. ती नंबरी चिट्ठी हातात घट्ट धरून जायचे चौकातल्या ’रिलायन्स आॅप्टिशियन’कडे. (हा लक्ष्मी रस्त्यावर, बेलबागेजवळ, टोपीवाले राजमाचीकर (गिरणिवाले नाहीत) यांच्या शेजारी अजूनही आहे) तो एक फ्रेम काढून द्यायचा. दुकानदार पुणेरी असल्यामुळे त्याला हीच का, असे विचारायची माझी टाप नसायची. उरलेल्या मला चांगल्या दिसणाऱ्या तरी नसतील, किंवा आईला परवडणाऱ्या तरी नसतील याची मला खात्री होती. झाली खरेदी. हल्ली मला अनेक नंबर असल्यामुळे प्रोग्रेसिव्ह लागतो, आणि तो परवडतो (ईलाजच नाही ना), येवढाच फरक. तो मला नीट काचांचा चष्मा करून देतो. त्याला हे नीट ठाउक आहे की मी प्लास्टिकचा चष्मा नीट वापरणार नाही म्हणून. पण मागल्या खेपेला मला काही कळत नाही असे सिद्ध झाल्यामुळे, आम्ही व्हिजन एक्सप्रेसमधे गेलो. तिथे एकावर एक फ्री ही स्किम चालू होती ही गोष्ट वेगळी. त्यातून दाद्यालाही चष्मा करून घ्यायचा होता हा निव्वळ योगायोग होता. तर तिथे गेल्यावर पहिल्यांदाच मला चष्मा घेतोय का काय असा प्रश्न पडला. म्हणजे झाले असे….. पण ते पुढच्या परिच्छेदात.
आमचा रिलायन्सवाला, काचा दाखवायचा. मोठ्या गोलाकार काचा. त्या बघायला लै झकास वाटायचे. मी त्यातली एक सोनेरी छटा असलेली काच नेहमिच निवडायचो. की रिलायन्स मला प्रेमाने सांगायचे, “बाळा, तुझी फ्रेम काळी आहे. तिला राखाडी काच चांगली दिसेल”. यावर मग फ्रेम सोनेरी द्या, यावरचे उत्तर मला पाठ होते. लहानपणी अनेक गोष्टी परवडायच्या नाहीतच, त्यामुळे त्याचे काही वावगेही वाटायचे नाही. मग मी निमूट राखाडी काच घ्यायचो. मला एकदम कळले की, आता मला ती सोनेरी काच घेता येईल. म्हणून आनंदून जाउन मी ही या नव्या चष्मेवाल्याकडे गेलो. आणि मला कळले की आता काचा दाखवायची पद्धत बंद झाली आहे. त्याऐवजी त्याने अनेक तक्ते, नकाशे, आणि ग्राफ्स दाखवले. यावरून काच कशी निवडायची ते मला कळेना. त्यातून त्यातील कुठलिच काच नाही हे आगाउ ज्ञान मला नव्याने झाले. या सगळ्या प्लास्टिकच्या होत्या. काचेची म्हणे मला इतकी वजनदार होणार होती, की माझे नाक तिच्या भारामुळे अजून नकटे होईल. हे असे स्पष्ट सांगायचे फक्त त्या विक्रेतीने सोडले होते. तिचा भार हा सगळ्यात महाग प्लास्टिक कसे चांगले आहे, आणी तेच कसे मला योग्य आहे हे पटवून देण्याकडे होता. तिला काही मला ते परवडणार नाही याची फारशी चिंता नव्हती. मग मलाच फार भिती वाटायला लागली. ही काच आपल्याला परवडली नाही तर काय? पण दादूच्या एकावर एक फ्री साठी मी ती उचलली.
या चरे न पडणाऱ्या फ्रेमला मोजून दोन वर्षात इतके चरे गेले, की त्यातून नीट दिसणे दुरापास्त झाले. आणि मग रोज पुसायला या बाटलिची गरज पडायला लागली. आणि त्यातून आमच्याकडे आली शीतल. जिच्यामुळे तो वरचा डायलॉग, रोजच सकाळी.
(क्रमशः)

Group content visibility: 
Use group defaults