ही काय चूक आहे?

Submitted by निशिकांत on 23 April, 2019 - 00:40

पटले तसेच जगणे ही काय चूक आहे ?
येता मनात उडणे ही काय चूक आहे ?

सारे मला हिणवती आहे सनातनी मी
सावरकरास पुजणे ही काय चूक आहे ?

आहे गरीब इतका शिकणे अशक्य आहे
सांगा दलीत नसणे ही काय चूक आहे?

सासू सुनेत झगडा पत्नीस राग माझा
आईस देव म्हणणे ही काय चूक आहे ?

दोस्ती अमेरिकेशी कम्युनिस्ट लाल होती
नाती नवीन विणणे ही काय चूक आहे ?

या राजकारण्यांची वख वख नजर भुकेली
आण्णा हजार असणे ही काय चूक आहे ?

धान्यास पिकवितो जो असतो स्वतः भुकेला
घेऊन फास मरणे ही काय चूक आहे ?

न्यायालयात खटले वर्षानुवर्ष सडती
पणतूस न्याय मिळणे ही काय चूक आहे ?

"निशिकांत" पुण्य केले नाहीस तू कधी मग
ईश्वर तुला विसरणे ही काय चूक आहे ?

निशिकांत देशपांडे म्ओ.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

सासू सुनेत झगडा, धान्यास पिकवितो जो आणि न्यायालयात खटले हे शेर ख़ास आहेत.

-दिलीप बिरुटे