उसने दिलेले पैसे असे मिॆळवा.

Submitted by वकील२ on 22 April, 2019 - 04:38

आपल्या देशात माणूस आजही विश्वासावर बरेच व्यवहार करत असतो. गो-यांची भाषा व खानपान शिकलो तरी आजही बरेच व्यवहार आपण पारंपारीक पद्धतिने करत असतो. पण काही लोकं याचा गैरफायदा घेत असतात. त्यातीलच एक मोठा वाद हल्ली बघायला मिळतो तो म्हणजे रोखीत पैसे दिले व काहीच लिखापढी केलेली नाही. निव्वड विश्वासाच्या आधारे व्यवहार केला व आता मात्र पुढील पार्टी पैसे देत नाही. मग काय करावा असा प्रश्न पडतो. कारण कोर्टात जर फिर्याद घेऊन गेलात तर जज विचारणार की उसने दिल्याचा पुरावा द्या. अन आपल्याकडे नेमका तोच नसतो. मग तुम्हीच खोटे बोलत आहात म्हणून तुमचा दावा खारीज केल्या जातो. पण यावर एक जालीम उपाय आहे.
पुरावा तयार करणे
भारतीय पुराव्याचा कायदा, सेक्शन ६५-ब मध्ये तरतूद आहे की इलेक्ट्रॊनीक रेकॉर्डींग वा चित्रफीत ही कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाईल. अगदी या सेक्शनला डोक्यात ठेवून तुम्ही उसने दिलेल्या रकमेचा पुरावा निर्माण करु शकता. समजा तुम्ही रमेशला रु. १, ००,०००/- लाख उसने दिले होते व रमेशने ते आता परत करायला नकार दिला आहे. तुमच्याकडे कागद नाही व कोणताच पुरावा नाही. मग अशा वेळी हा सेक्शन ६५-ब आपल्या मदतीला धावून येतो. तुम्ही रमेशला फोन करायचा(स्वत:च्या रजिस्टर्ड नंबर वरुन) व आपली जुनी कहाणी दोहरवायची, "बघ रमेश, तुझी आई आजारी होती तेंव्हा तुझ्या गरजेच्या वेळी मी तुला रु. १ लाख उसने दिले. आज मला खूप गरज आहे. तू पूर्ण पैसे परत नकॊ देऊस हव तर पण किमान रु. ५०००/- तरी दे. मला खूप गरज आहे" वगैरे विनवणी करायची. त्यात "तो हो देतो" एवढं जरी बोलला तर तुमचा पुरावा निर्माण झाला. ही रेकॉर्डींग एका सी.डी. वर कॉपी करुन घ्यायची. व रेकॉर्डींग मधला संवाद जसच्या तस एका कागदावर टाईपही करुन घ्यायचा. अन मग याला सेक्शन ६५-ब चा पुरावा म्हणून दाखल करायचं.

बास, तुमचे पैसे परत मिळतात. अगदी हाच संवाद वॉट्सपवर केला तरी चालतो. तर मित्रांनो, कोणाला उसने पैसे दिले असतील व ते परत मिळत नसतील तर अजिबात घाबरु नका. वरील प्रमाणे पुरावा तयार करा व एखादा वकील धरा.

- वकील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users