कोकणातील काळे मोती ..करवंद

Submitted by मनीमोहोर on 18 April, 2019 - 09:30

मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी मिळते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की. बीचं कवच काढून आतली बारकीशी चारोळी एकसंध मिळवली की काहीतरी खूप मोठं आचिव्ह केल्यासारखं वाटतं. बी बरोब्बर बोटात पकडणं , हातोडीने बी वर करेक्ट प्रेशरचा घाव घालून बीचे दोन भाग करणं आणि मग ती नखएव्हढी चारोळी मिळवणं.. म्हटलं तर खूप कठीण.. एक दोन तास बिया फोडत बसलं तरी अर्धा वाटी चारोळी ही मिळत नाही.

ह्या चारोळ्या

IMG_20170317_105644774.jpg

मे महिन्यातच मिळणारा माझा दुसरा आवडता रानमेवा म्हणजे डोंगरची काळी मैना. करवंद... आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत कातकरी स्त्रिया दुपारच्या वेळी दारावर करवंद विकायला घेऊन येत असत. तेंव्हा पाच आणि दहा पैशाला हा एवढा मोठा वाटा मिळत असे पण त्यासाठी ही आम्हाला आईकडे हट्ट करावा लागे तेव्हाच दोन चार दिवसातून एखाददा घेत असे आई. त्याकाळी खेळाची साधन जास्त नसल्याने करवंद खाताना आमचा कोंबडा की कोंबडी हा खेळ रंगत असे. काही करवंद आतून पांढरी असतात तर काही लाल. म्हणून ते खायच्या आधी समोरच्याने करवंद आतून पांढर ( कोंबडी ) निघेल की लाल ( कोंबडा ) हे गेस करायचं. आपला अंदाज बरोबर निघाला तर आपल्याला समोरचा भिडू एक करवंद देणार आणि चुकला तर आपण त्याला द्यायचं. असा तो खेळ. हातात असलेलं करवंद कोंबडा आहे की कोंबडी यावरून आमची भांडणं ही होत असत. थोडक्यात काय तर करवंदांमुळे आमची उन्हाळ्यातली दुपार त्या लाल लाल करवंदांसारखीच रंगीन होत असे.

लहानपणी कधी ट्रेन ने पुण्याला गेलो मे महिन्यात तर कर्जतचा वडा खाऊन झाला की मग पळसदारी पासून पार लोणावळ्या पर्यंत आदिवासी बायका करवंद विकायला घेऊन येत डब्यात . घाटामध्ये खिडकीशी बसून बाहेरची शोभा बघत द्रोणातली करवंद खाण्यात , मध्येच माकडं दिसली तर त्यांना टाकण्यात लोणावळा कधी आलं ते कळत ही नसे.

लग्न झाल्यावर सासर कोकणातलं खेडेगाव असल्याने करवंद अगदी जवळून बघता आली. एकदा मे महिन्यात कोकणात गेले होते. संध्याकाळी पाय मोकळे करायला आणि आंब्याच्या बागा बघायला म्हणून सड्यावर निघालो होतो. तर वाटेत अचानक “ जालीमंदी पिकली करवंद “ समोर आली आणि मी हरखूनच गेले. करवंदाची जाळी ( करवंदाच झुडूप ) मी प्रथमच बघत होते. एकाच वेळी काही पिकुन काळीभोर झालेली, काही डेखाकडे लालट होऊन पिकायच्या मार्गावर असलेली, काही अगदी हिरवी आणि काही फ़ुलं असं सगळंच होतं एकाच वेळी त्या जाळीवर. करवंदाच फ़ुलं साधारण जाईच्या फुलासारखचं दिसत आणि त्याला एक प्रकारचा गोड वास ही येतो. करवंदाची पान बेताच्या आकाराची गोलसर आणि थोडी जाड असतात. आमच्या बरोबर आलेल्या मुलांनी त्याची पिपाणी करून ती लगेच वाजवली देखील . सड्यावरच्या शांत वातावरणात कृष्णाच्या बासरी सारखी भासली मला ती.

कच्ची करवंद आणि फ़ुलं

IMG_20170313_175505148_1.jpg

ही पिकलेली

18443464_1252873821506273_533402296411750400_n.jpg

आमच्याकडे असा समज आहे की चैत्रातल्या अमावस्येच्या रात्रीच करवंद पिकतात आणि काळी होतात. आणि हो .. "त्या बाबतीत " ही करवंदाची जाळी प्रसिद्ध आहेच. म्हणजे बघा, अमावस्या पौर्णिमेला कोणाला ही जाळीकडे फिरकायला ही परवानगी नसते. हं तर काय सांगत होते ... पिकलेली करवंद तर मला गोड लागत होतीच पण हिरवी कच्ची असलेली ही झाडावरून डायरेक्ट तोंडात टाकताना फारच गोड लागत होती. हाताल्या लागलेल्या चिकाची आणि तोडताना लागणाऱ्या काटयांची पर्वा न करता मी ती गोळा करतच होते. शेवट हातात मावेनाशी झाली तेंव्हा यजमानांनी त्याच्याच जरा मोठ्या पानांचे त्याचेच काटे टोचून सुंदरसे द्रोण करून दिले . त्या हिरव्यागार द्रोणात ती पिकलेली काळी भोर करवंद फारच खुलून दिसत होती. मग काय मी खूप गोळा केली आणि द्रोण एकावर एक ठेवून घरी घेऊन आले.

कच्च्या करवंदाच मेथांब्या सारखं गोड लोणचं करतो आम्ही. फक्त त्यांना चिक खूप असल्यामुळे दोन तीन वेळा पाण्यातून नीट धुवावी लागतात. ते गोड लोणचं खूपच छान लागत. कच्ची करवंद थोडी ठेचून त्यात नेहमीच मसाला घालून तिखट लोणचं ही छान होतं. तसच आंब्याच्या तात्पुरत्या लोणच्यात ही कच्ची करवंद घालता येतात . ती तीन चार दिवस मुरली की आतल्या बियांसकट खायला छानच लागतात.

ह्या बिचाऱ्या करवंदांची ना कोणी लागवड करत , ना कोणी त्यांची मशागत करत ना कोणी त्याना कधी खत पाणी देत. पण निसर्गच त्यांची काळजी घेतो आणि दर वर्षी उन्हाळ्यात आपल्याला गोड गोड फळं ही देतो. असो. त्याच्या सुकलेल्या फांद्याचा त्यावर असलेल्या मोठ्या मोठ्या काट्यांमुळे कुंपणासारखा उपयोग करता येतो .तसेच अलीकडच्या काळात काही ठिकाणी बागेला कुंपण म्हणून करवंदाची झाडं मुद्दाम लावल्याचं ही पाहिलं आहे.

एकदा मे महिन्यात आम्ही घरातल्या सगळ्या मुलांना घेऊन सड्यावर जात होतो. वाटेत करवंदाच्या जाळ्या बघून मुलं त्यावर तुटून पडली. मुंबईच्या मुलांच्या अंगात तर वारं च भरलं होतं. ती जाळी तशी खूप मोठी आणि गोल होती. मुलं चारी बाजूनी करवंद तोडत होती, खात होती. चिकामुळे चिकट झालेले हात दुसऱ्याच्या गालाला मुद्दाम लावून त्याला चिडवत होती, अशी सगळी मजा मजा चालली होती. परंतु त्या जाळीत लाल डोंगळ्यानी केलेलं एक भलं मोठं पानांचं वारूळ ही होतं. आत हजारोंच्या संख्येनी असतील डोंगळे जे चावले की अंगाला चिकटून बसतात आणि जिथे चावतात ती जागा भयंकर लाल होऊन खाज ही खूप सुटते. कुतूहलाने एक मुलगा ते काय आहे हे बघण्यासाठी त्यात हात घालतच होता पण तेवढ्यात यजमानांच लक्ष गेलं आणि त्याला अक्षरशः मागे खेचलं. खेचताना काटे लागले पण डोंगळ्यांपासून तरी वाचला. त्याने त्यात हात घातला असता तर काय झालं असत ह्या विचाराने आज ही अंगावर काटा येतो.

करवंदांची एक खूप मजेशीर, चांगल्या अर्थाने कायम लक्षात राहील अशी ही एक आठवण आहे. ती इथे शेअर केल्या खेरीज रहावत नाहीये. मे महिन्यात दुपारी आम्ही सगळ्या जणी मागच्या अंगणात काही तरी काम करत बसलो होतो. धनगराने सड्यावरून सकाळीच पिकलेली गोड करवंद आणून दिली होती, ती खात बाजूलाच मुलांचा खेळ ही रंगला होता. कारवंदांमुळे ओठ आणि जीभ लाल झालेली मुलं फार गोड दिसत होती. काम करता करता आमच्या गप्पा ही रंगात आल्या होत्या.

अचानक घरातला एक अगदी छोटा तीन चार वर्षाचा मुलगा माझ्या जवळ आला. आपलं नाजूक , मऊ, छोटसं बोट माझ्या ओठावर चोळून माझे ओठ ही लाल करून गेला. पिकलेलं लाले लाल करवंद त्याने आधी स्वतः च्या बोटावर चोळलं आणि मग माझ्या ओठावर ! वरती म्हणाला ही , " बघ, तुला लिसपिक लावली". त्याचा तो निरागसपणा नितांत सुंदर होता. हे सगळं घडलं क्षणार्धात. पण त्या मऊ, कोवळ्या, निरागस, निष्पाप, निर्व्याज स्पर्शाची आठवण आज ही माझ्या मनावर मोरपीस फिरवते आणि एवढया जणी आजूबाजूला असून ही त्याने ह्यासाठी माझीच निवड करून मला एक अविस्मरणीय अनुभव दिला म्हणून मी स्वतः ला खूप भाग्यवान ही समजते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. करवंद तोडणं फार कष्टाचं काम असते. करवंदाच्या जाळीला खूप काटे असतात. पण धुवून मीठ टाकून खायला खूप मजा येते.

ममो, कितीसुरेख लिहिलंय!
चारोळीची माहिती माझ्यासाठी नवीन आहे.डोंगळे वाचून जीव सुखावला.

करवंद विकत घेऊन खायला फार जीवावर येते. जाळीत घुसून स्वतःच्या हाताने करवंद तोडून, हलकासा दाब देऊन चिक झटकल्या सारखा करून गट्टम् करण्यात जी मजा येते तिला तोड नाही

करवंदे कोकणी माणूसाचा जिव्हाळ्याचा विषय, मस्तच. तो लहान मुलाचा अनुभव आवडला . कालच माझ्या लेखवरच्या तुमच्या कमेंट मध्ये वाचनास आला होता, पण तुम्ही ईडिट केल बहुतेक..... सांगणारच होते परत टाका! राहुन गेलं.

छान वाटले वाचुन. तुमचे कोकणातले लेख खूप आवडले. माझे माहेर vengurla आजोल tarkarli आणी सासर देवगड. लहान असताना में महिना गावीच जायचा. सासूबाई करवंद मीठात घालुन सुकवतात आणी माझासाठी पाठवतात. मराठीत लीहीण्याचा पहिलाच प्रयत्न करते

मस्त! चारणाच वर्णन वाचून आठवलं ; लहानपणी माझ्या शाळेतही एक चंदनचारोळी नावाचा प्रकार खायचो आम्ही.

ममो मस्त लेख. तुम्ही मला गावी जायलाच लावणार बहुतेक. ;-). लिपसीक चा प्रसंग किती गोड.
डोंगळे म्हणजे मालवणी भाषेत ' हुमले'>>> मी पण हेच लिहायला आलेले.

अप्रतिम ओघवता लेख, नेहेमीप्रमाणे.

शेवटचा पॅराग्राफ तर फार गोड. >>>>>>> +9999 Happy

____/\___

ममो लेख चागलाच जमलाय..........खंबाटकी घाटात बर्याच बायका द्रोणात करवंद घेवून वीकायला उभी असतात....तो घाटच करवदाच्या जाळ्यानी भरलाय....कराडला या वैशाखी दीवसात हि रानमैना घेवून चांदोली भागातले बरेच धनगर लोक शहरात वीकायला येतात...

मस्तच लिहिलंयस .. शेवटी लिहिलेला अनुभव पण अगदी गोड !लहान मुलं काही गोष्टी एखाद्या छोट्याश्या कृतीतून किती सहज आणि त्यांच्या नकळत शिकवून जातात न !?
करवंद विकत घेऊन खायला फार जीवावर येते. जाळीत घुसून स्वतःच्या हाताने करवंद तोडून, हलकासा दाब देऊन चिक झटकल्या सारखा करून गट्टम् करण्यात जी मजा येते तिला तोड नाही>>++१११ अगदी माझ्या मनातलं

ममो चटकदार लेख. लहानपण याच्यातच गेल्याने त्याची गोडी जाणवली. तो पानांचा द्रोण खूप छान आहे गं !

Anjali_ kool आणि रश्मी धन्यवाद.

चारोळ्यांचा फोटो अपलोड केलाय.