मोकळा श्वास २

Submitted by jayshree deshku... on 15 April, 2019 - 12:19

|| श्री गोंदवलेकर महाराज प्रसन्न ||
मोकळा श्वास – २
“ठरल तर मग डन! दिदी तू १८ ऑक्टोबरला पुण्यात येत आहेस. माझ्या लेकीचा डॉलीचा पहिला वाढदिवस आपण भारतात साजरा करणार. आई जाऊन दोन वर्ष व्हायला आली तरी माझे भारतात येणे झालेच नाही.” स्वरा तिच्या न्युझीलंडला असलेल्या मोठ्या बहिणीशी लंडन वरून फोनवर बोलत होती.
“ खर आहे. आईच्या शेवटला आपण गेलोच नाही. मनातला तो हळवा कोपरा अजुनी कधी कधी सलतो आणि डोळ्याच्या कडा पाणावतात. काही करून निदान मी तरी त्यावेळी जायला हव होत. पण नाही गेले. दोघी मुली जावई असताना तिऱ्हाईताच्या हातून तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. किती यातना झाल्या असतील तिच्या आत्म्याला. पण ती बिचारी सार समजून घेणारी होती.”
“अमेयनी अंत्यविधी केला पण अजूनी फोनवर लागट बोलत रहातो. त्याचही बरोबर आहे म्हणा कोणीही झाल तरी बोलणारच. आपलच चुकल, निदान आपल्या नवऱ्याने तरी त्यावेळी जायला हव होत.”
“जाऊदे नको तो विषय मनाला खुप क्लेश होतात. मी येते १८ तारखेला. वाढदिवसासाठी हॉल बुक करून ठेवला आहेस ना? आपण आईच्या घरीच उतरू या. रखमाबाईने घर व्यवस्थित ठेवलं असेलच.” सौम्या स्वराशी फोनवर बोलत होती.
“बर झालं आई खर तर रखमाबाईच्या नावावर flat करणार होती. आणि केला पण होता म्हणे, पण पुन्हा विचार बदलून तिला केअर टेकर म्हणून रहा म्हणाली, माझ्या मुलींना त्यांच माहेरच घर असुदे म्हणाली. नाहीतर अमेयकडे रहाव लागलं असत. आणि पुन्हा टोमणे ऐकत बसावं लागल असत. आणि लॉज वर रहाव तर अमेयला राग आला असता.”
“ स्वरा अग पण रखमाबाईचा फोन लागत नाही. तू सुद्धा ट्राय करून बघ एकदा.”
“मी बघतेच पण नाही लागला तरी केळकर काकूंच्या कडे चावी असतेच ना. निघेल काही तरी मार्ग ओके चल माझी लेक उठली आहे. तिला भात भरवायचा आहे.” स्वराने फोन ठेवला.
स्वराला तिच्या दिदिशी म्हणजे सौम्याशी बोलल्या पासून एक अनामिक हुरहूर लागून राहिली होती. तिला सारख आपलं बालपण आठवत राहिलं होत. ममा- पप्पा, सौम्या आणि मी , चौघांच हासर , सुखी कुटुंब. ममाचा निगुतीने संसार करण्याचा स्वभाव, सगळ कसं जिथल्या तिथं टाप-टीप ठेवलेलं असायचं, घर व्यवस्थित लावण्यापासूनच ममाच्या स्वभावातली कलात्मकता ठाई ठाई दिसून यायची. नंतर तिला जमेना तरी कामाला बायका ठेवून ती घर लख्ख ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. पप्पांचा ममाच्या बाबतीतला आणि मुलींच्या बाबतीतला हळवा स्वभाव. आम्हांला थोड जरी खरचटल तरी पप्पा कासावीस व्हायचे. ममाच संसारातल समर्पण आठवलं की, व्यवहाराने संसार करणाऱ्या आपण तिच्यापुढे खुपच खुज्या वाटत राहतो.सौम्या म्हणाली ते बरोबर आहे, रखमाबाईचा फोन लागत नाही. आणि whatsapp वगैरे रखमाबाईला काही माहित नाही. कसा contact करणार? तिच्या मुलाचा नंबर पण
आपल्या कडे नाही. केळकर काकूंचा नंबर पण नाही. ममा कितीतरी वेळा म्हणायची अग शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबध ठेवावेत. केव्हा कुणाची गरज भासेल ते सांगता येत नाही. आपण मात्र आपली चौकट सांभाळत राहिलो. ममा सगळ्यांशी संबध प्रस्थापित करून होती. शेवटी अमेयच्या पाया पडायची वेळ आली. त्याला contact करून पाहिला, तो म्हणे, “ साध्या ऑफिसच्या कामासाठी जपानमध्ये आहे. आणि म्हणाला वर्षभरात मी तुमच्या घराकडे फिरकलो नाही. काका काकू नाहीत तेव्हा कुलूप पाहण्या साठी कशाला तिथे जायचे? म्हणून गेलो नाही.” अमेयच बरोबर आहे म्हणा. तो कशाला लक्ष घालणार? आपण सुद्धा आता गरज पडली म्हणून लक्ष घालत आहोत. नाहीतर ममा गेल्यापासून घराचा विचारही आपल्या डोक्यात आला नाही. भारताशी नाळ तुटल्या सारखं वाटलं. पण असं होऊ शकत नाही ना! roots are there . सगळ्या नातेवाईकांना भेटाव, डॉलीचा वाढदिवस तिथं करावा असं शेवटी मनात आलच ना ! ममा आणि पप्पा असते तर आज ह्या वाढदिवस समारंभाला सोहळ्याच स्वरूप प्राप्त झाल असत. या आणि अशा विचारातच स्वराने भारतातल्या स्नेही, परिचितांना आणि नातेवाईकांना फोनवरून संपर्क साधला, वाढदिवसासाठी आमंत्रण दिल.
२३ ऑक्टोबरला डॉलीचा वाढदिवस होता. १६ ऑक्टोबरला रात्री स्वरा पुण्यात पोहचली. लंडन वरून निघेपर्यंत तिने रखमाबाईशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी रात्री लॉजवर उतरायचे आणि सकाळी flat वर जायचे असे स्वराने ठरवले.
रात्री लॉजवर नीटपणे झोप लागलीच नाही. स्वराची सारखी बेडवर चुळबुळ चालू होती. कृष्णाने म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला प्रेमाने थोपटत दिलासा दिला. “काळजी नकोस करू. घर व्यवस्थित असेल. रखमाबाई विश्वासाची बाई आहे.” “ते आहे रे पण संपर्क झाला नाही. नेमक तुझ्या आई-बाबांना पण अहमदाबाद वरून येऊन पुण्याला एक चक्कर टाका म्हणल तर जमल नाही. त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्षच केल. सौम्याच्या सासू- सासर्यांना काय तिच्याविषयीच ओलावा नाही तर आमच्या विषयी काय वाटणार?”
“ जाऊ दे आता विचार करण्यात अर्थ नाही. सकाळी सगळ चित्र स्पष्ट होईलच . आपलीही चूक झाली तेव्हा इतरांना दुषण लावण्यात अर्थ नाही. उंटावरून शेळ्या हाकण्या सारखे आहे.”
स्वरा आणि कृष्णा सकाळी ममा-पप्पांच्या flat वर येऊन पोहचले. flat ला बाहेरून कुलूप नव्हत. ते पाहून स्वराला बर वाटलं. तिने घराची बेल दाबली. आतून दरवाजा उघडण्याची दोघेही आतुरतेने वाट पाहू लागले. तोपर्यंत स्वरा घराचं निरीक्षण करू लागली. घरापुढे धूळ आणि चिखलाचे पाय उमटलेले दिसत होते. घराच्या दरवाज्यावर २-३ ठिकाणी कुन्भारणीने घर केली होती. सेफ्टी दरवाजा आणि त्याच्या आतून डोकावणारा लाकडी दरवाजा दोन्ही पण धुळीने आणि जळमटाने माखले होते. त्यामुळे भकास दिसत होते. स्वराच्या मनात येऊन गेले, माझी ममा असताना घर बाहेरून सुद्धा लख्ख असायचं. दारात रांगोळी रेखलेली असायची. दारावरती तोरण, उंबरठ्यावर गोपद्म असायची. किती पवित्र वाटायचं. दरवाज्यावरच स्वस्तिक धुळीने अस्पष्ट झालेलं दिसत आहे. दरवाजा उघडला गेला. दरवाज्यात एक ताड-माड उंच, धिप्पाड, काळा, मळकट कपड्यातला माणूस दरवाज्याच्या चौकटीवर एक हात ठेवून आणि दुसऱ्या हाताने डोळ्यातली चिपड काढत, त्रासिक प्रश्नार्थक नजरेने कृष्णाला विचारत होता, “ काय? कोण पाहिजे? सकाळ सकाळ काय काम हाय?” कृष्णाची रागाने मुठ वळली. स्वराने त्याचा हात दाबला आणि शांत स्वरात त्या माणसाला विचारलं, “रखमाबाई कुठे आहेत?”
“कोन म्हनायचं आपन? त्ये माझी आय त्येनी गावाकडे हाय.”
“आम्ही ह्या घराचे मालक आहोत. माझ्या आई वडिलांचा हा flat आहे. रखमाबाईनां केअर टेकर म्हणून आम्ही ठेवलं होत. आणि तुम्ही कसे काय इथे?” जरा दटावणीच्या सुरातच स्वरा बोलली. दरवाज्यातला माणूस झोपेतून खडबडून जागा झाल्यासारखा म्हणाला, “कोन बी येऊन म्हणेल हामी मालक हायत म्हनून. कशावरून समजायचं? पुरावा हाय?” कृष्णा चिडून म्हणाला, “तुझ्याकडे काय पुरावा आहे रे? लोकाच्या घरात घुसून आयत्या बिळावर नागोबा होऊन राहिला आहेस. आज संध्याकाळ पर्यंत घर खाली कर.”
“सोडत नाय घर, कुठ जायचं तिथं जावा.” असं म्हणत त्या माणसाने धाडकन दरवाजा बंद करून घेतला. त्या माणसाचा उद्धटपणा आणि रगेलपणा पाहून स्वरा आवाक झाली. स्वरा आणि कृष्णा हताश होऊन बिल्डींग मधल्या केळकर काकूंच्या कडे गेले.तिथे त्यांना कळल, स्वराच्या आईने बिल्डींग मध्ये कुणाकडेच घराची चावी ठेवली नव्हती. शेवटचे दोन महिने रखमाबाईच घरातल सार बघत होती.बोलताना केळकर काकूंनी स्वराला टोमणा मारलाच, “काय करायचं आहे दोन मुली जावई असून? शेवटाला पाणी द्यायला कुणीच नाही. आम्ही कळवल तेव्हा पुतण्या तरी कसाबसा अंत्यसंस्कारासाठी आला.जास्त कुणी लोक नव्हते. आम्ही बिल्डींग मधल्या लोकांनीच सार उरकल. सगळे खूप हळहळले हो! त्यानंतर रखमाबाई घरात रहात होती. नंतर तिचा मुलगा आला. त्यान तिला घराबाहेर काढलं आणि स्वत: राहू लागला. आणि तुम्ही पोरी तरी कशा? आमच्याशी साधा फोन पुरताही संबध ठेवला नाही. त्या अमेयला आम्ही सांगितल तुम्हाला कळवून टाका म्हणून, पण त्याने काहीच रस दाखवला नाही. उलट म्हणाला, “काकुच्या पोरींना कुठल्या गोष्टीची गरज नाही तेव्हा जाईना का जागा चोरा-चिलटाच्या हाती. मला पण काकूने कधी विश्वासात घेतल नाही. मी कशाला लक्ष घालू?” केळकर काकू भडाभडा बोलत होत्या. म्हणाल्या, “ हे बघ स्वरा ऐक, पोलिसांना घेऊन ये आणि घर खाली करून घे. साऱ्या बिल्डींगला त्या रखमाच्या पोराचा त्रास व्हायला लागला आहे.झोपडपट्टीत सुध्दा रहायची लायकी नाही आणि flat बळकावून बसला आहे. बिल्डींग मध्ये गुंडांचा वावर वाढला आहे. भांडणे शिवीगाळ असले प्रकार चालू असतात. तुझी आई सात्विक, घराचं पावित्र्य राखून होती. आता पार घराची वाट लागली आहे.” बोलता बोलता केळकर काकूंनी चहाचे कप पुढे केले. पण मनाने बधीर झालेल्या स्वराला त्याची चव जाणवलीच नाही. हातातल्या खेळण्याशी निरागसपणे हसत खेळत असलेल्या डॉली कडे पण तिच लक्ष नव्हत. तिने मूकपणे केळकर काकूंचा निरोप घेतला.
“ज्या घरात आपलं बालपण गेलं, आपण लहानाचे मोठे झालो, ज्या घरासाठी ममाने खस्ता खाल्या, काडीकाडीने संसार उभा केला, तोच आता मोडला आहे.त्याची दुर्दशा झाली आहे.आणि त्याला कारण आपण आहोत. सौम्याने तरी चक्कर मारायला हवी होती, आई गेल्यानंतर.” अस्वस्थ होत स्वरा कृष्णाला म्हणाली.
“तुझी प्रेग्नन्सी आणि बाळंतपण ह्यात तू गुरफटलेली होतीस, पण मी एखादी चक्कर मारू शकलो असतो. पण टाळाटाळ केली, तेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात काय अर्थ?” कृष्णा शरमेने म्हणाला.
“बाहेरूनच घराचा अवतार बघवत नव्हता. आतमध्ये अजून काय पहावयास मिळणार आहे कुणास ठाऊक? ममा जर वरून बघत असेल तर सार पाहून तिचा आत्मा नक्कीच तळमळत असेल.” स्वरा पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाली.
“आपण ह्याला न्याय दिला तरच ममाच्या आत्म्याला शांती मिळेल स्वरा” लॉजच्या रुममध्ये प्रवेश करत सौम्या म्हणाली.
सौम्याला पाहिल्यावर स्वराने तिला मिठीच मारली. तिच्या खांद्यावर डोक टेकवत तिने अनावर झालेल्या आपल्या भावनांना अश्रू वाटे मोकळी वाट करून दिली.
“आता मी आले आहे ना! आपण दोघी मिळून परिस्थितीशी दोन हात करू. काय काय झाल मला थोडक्यात सांगशील का?” सौम्या स्वराला थोपटत शांत करत बोलली. कृष्णाने सारा वृतांत सौम्याला आणि तिचा नवरा विवेक ह्यांना सांगितला.
दुसरे दिवशी सगळे बँकेत पोहचले. बँकेच्या व्यवस्थापकाकडे स्वत:च्या मरणाआधी स्वप्नाने लॉकरची चावी सुपूर्द केली होती. सिल केलेली ती चावी मिळाल्यानंतर स्वरा आणि सौम्याने लॉकर उघडले. स्वप्नाचे दागिने, चांदीची भांडी, विल आणि घराचे पेपर सारे सुखरूप पाहून दोघींना हायसे वाटले. लॉकर मध्ये सेट मध्ये असणारे चांदीचे बाउल्स, ग्लासेस, ताटे सार पाहिल्यावर स्वराचे डोळे भरून आले. ती सौम्याला म्हणाली, “ममाला साऱ्या गोष्टी सेट मध्ये करून ठेवण्याची किती हौस होती नाही?” “आणि हो प्रत्येक गोष्टी दोन दोन घ्यायची, आपल्या दोघींसाठी म्हणून.” सौम्याने स्वराच्या बोलण्याला पुष्टी जोडली.
सौम्याने आधी घराचे पेपर चाळले. घर स्वरा आणि सौम्याच्या नावावर केलेले होते. विलमध्ये दागिने आणि चांदीची भांडी याची खुलासेवार वाटणी करून ठेवलेली होती.घर विकता येणार नाही. ते आमच्या नंतर मुलींच्या माहेरपणाची सोय म्हणून राहील असा स्पष्ट खुलासा विलमध्ये केलेला होता.
“ आपल्याला आता घराचे पेपर मिळालेले आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. त्या रखमाबाईच्या बच्याला आता घर खाली करावेच लागेल.” विवेक कृष्णाच्या हातावर टाळी देत बोलला. बँकेतून चौघेही परस्पर पोलीस स्टेशनवर गेले. पोलिसांना घेऊन घर गाठलं. पोलिसांच्या दमदाटी पुढे अखेर रखमाबाईच्या मुलाने नमत घेतलं. आणि दोन दिवसात घर सोडायला तयार झाला.
दोन दिवसानंतर घराची चावी घेण्यासाठी सगळेजण घरी गेले पण घराला आतल्या आणि बाहेरच्या ग्रीलच्या दरवाज्याचे पण latch होते. रखमाबाईच्या मुलाचा काहीच पत्ता नव्हता.त्याने सहजासहजी सरळपणे घर सोडले नव्हते. बिल्डींग मधल्या कुणालाही न कळत त्याने घर सोडले होते. डुप्लिकेट चावी बनवणाऱ्या माणसाला बोलावून चाव्या बनवून घेऊन घर उघडावे लागले.घर उघडल्यावर आत शिरल्यानंतर सगळ्यांना आणखी मोठा शॉक बसला. घर म्हणजे एक उकिरडा करून ठेवलेला होता. धूळ, कचरा,तुटक्या चपला, फाटके बूट, दारूच्या रिकाम्या बाटल्या, फाटके कपडे, कागदाचे कपटे घरभर विखुरलेले होते. लहान मुलांनी केलेली शु-शी त्यातच सामील होती. घरच्या भिंतीचे पोपडे तर निघाले होतेच,पण रंगीत खडूच्या रेघोट्यांनी संपूर्ण भिंती खराब केलेल्या होत्या. बेसिन बाथरुमच्या पाण्याच्या तोट्या काढून नेलेल्या होत्या. नशीब म्हणजे पाणी बंद तरी केलेले होते. संडास बाथरूम मध्ये तर घाणीचे साम्राज्यच पसरलेले होते. किचन ओटा दोन वर्षात पुसलेला दिसत नव्हता. तेलाचे मेंचट थरावरथर साठलेले होते. gas शेगडीची वाट लावलेली होती. किचन ट्रोलीच्या बाबतीतही तशीच परिस्थिती होती. घरातली बरीचशी भांडी गायब होती.बेडची आणि त्याच्यावरच्या गाद्यांची वाट लावलेली होती. घराची सारी दुर्दशा पाहून सौम्या आणि स्वराचा राग अनावर झाला. आपल्या ममाने नीटनेटक स्वच्छ ठेवलेलं घर त्यांना आठवलं. तिने निगुतीने केलेला संसार आठवला. आपण स्वप्नाच्या अंतसमयी न येऊन केवढी मोठी घोडचूक केली याची सर्वांना प्रकर्षाने जाणीव झाली. स्वराला रडू अनावर झाल. ती मुसमुसत म्हणाली, “ ह्यांना घराचे केअर टेकर म्हणायचे की विध्वंसक? माझ्या ममाने ह्या नराधमाच्या आईवर केलेल्या उपकाराची थोडी सुद्धा जाणीव ह्याला राहिली नाही? फुकटात मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते हेच खरे.”
“ ज्याने आपल्या स्वत:च्या आईची कदर केली नाही तो बाकी कुठल्या गोष्टीची काय कदर करणार?” सौम्या म्हणाली.
“ आपल्या चुकीची खूप मोठी किंमत आपल्याला भोगावी लागत आहे.बरे घराचे महत्त्वाचे पेपर, किमती माल तरी लॉकर अध्ये सुरक्षित राहिला. आणि बँकेच्या व्यवस्थापकाने चांगले सहकार्य दिले.” कृष्णा म्हणाला.
विवेकने घराची साफ-सफाई करणाऱ्या एजन्सीला ताबडतोब फोन लावला. त्यांनी अर्जंट बेसिसवर दुसरे दिवशी येण्याचे कबूल केले. विमनस्क मनस्थितीत सगळे घरातून बाहेर पडले.
२३ ता. डॉलीच्या वाढदिवसाची लोकांना आमंत्रण गेली होती म्हणून कसबस ओढून ताणून चेहऱ्यावर उसने हसू आणून सगळ्यांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला जमलेल्या लोकांनी सागर स्वप्नाची आठवण तर काढलीच पण प्रत्येकाचा एक ठराविक प्रश्न होता, ‘स्वप्नाच्या अंत्यविधीला कोणीच कसे आले नाही.’ स्वरा आणि सौम्याला खूप खजिल व्हायला झाल.
दुसरे दिवशी सकाळी ब्रेकफास्टला सगळेजण टेबलावर जमा झाले. कृष्णाने विषय छेडला, “मी आत्ताच flat वर जाऊन आलो. flat ची साफ-सफाई तर चांगली झाली आहे. पण जी मोडतोड झाली आहे त्याच्या दुरुस्तीचे काय करायचे?”
“स्वरा मला वाटत तूर्तास आपण हा विषय बाजूला ठेवावा. मला तर अजून आठ दिवसांनी निघावं लागणार आहे. रजा नाही एवढी. आपण flat लॉक करून मूव्ह व्हाव.” सौम्या म्हणाली. “लॉज वर किती दिवस राहणार? आम्ही उद्या सकाळी मुंबई साठी रवाना होऊ म्हणतो. माझ्या आई-वडिलांना भेटण होईल. तुमच काय? तुम्ही अहमदाबादला कधी जाणार?” विवेक कृष्णाला विचारत होता.
“चार दिवस झाले माझी झोप उडाली आहे. माझ्या डोक्यात तिसरेच विचार चालू आहेत. मी आपल्या घराचं नूतनीकरण कराव ,त्याला नव्याने उभं कराव असं म्हणतीय.” हे ऐकून सौम्याला आश्चर्याचा धक्का बसला. डोळे विस्फारत ती स्वराला म्हणाली,
“अग ए विचार काय तुझा? ऑफिसला जॉईन व्हायचे नाही? का नोकरी सोडली? आणि लंडन मध्ये नवीन घर बुक करायचं चालल होत ना? त्याच काय?”
“ममा –पप्पांच घर पुर्वीसारख किंवा त्यापेक्षाही सुंदर नीटनेटक करून घ्याव हे मला जास्त महत्त्वाच वाटत आहे.” स्वरा म्हणाली.
“ते ठीक आहे पण लंडनमध्ये स्थिरावलेल्या तुला हे सर्व आत्ता कसे शक्य होणार?
“ कृष्णाचे मम्मी पप्पा पण आता थकले आहेत. दोघेही सत्तरीला आले आहेत. त्यांचा राहता बंगला जुना झाला आहे. त्याची कामे सारखी निघत आहेत, दोघांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु असतात. त्यानाही हल्ली वाटते, आपली नातवंड आपल्यासमोर ह्या बंगल्यात खेळावीत, बागडावीत असं त्यांचही स्वप्न आहे ग ! आपल्या ममा आणि पप्पांच होतच ना ग!”
“ लंडन मध्ये आठ वर्ष शांततेत आयुष्य जगण्याची सवय लागली आहे तुम्हाला. इथे भारतातला गर्दी गोंधळ सहन होणार का?” सौम्या म्हणाली. त्यावर हसत हसत स्वरा म्हणाली, “आपला जन्म तर भारतातच झाला आहे ना! थोडे दिवसात ह्या वातावरणाची पण सवय होऊन जाईल. आणि एकदा मनाने स्वीकारलं की सगळ काही सोप होऊन जात दिदी.”
“म्हणजे तुम्ही लंडन सोडण्याचा निर्णय घेताय तर? पण कृष्णाचे मम्मी पप्पा लंडन मध्ये का येऊन रहात नाहीत?”
“हे बघ दिदी त्याचं सार आयुष्य ज्या मातीत गेलं ते त्यांना बळजबरीने सोडायला लावायचं, त्यांचे सारे स्नेहबंध तोडायला लावायचं हे पटत नाही मनाला. लंडन मध्ये आमचे स्नेहबंध नुकतेच जुळायला लागले आहेत, ते सोडून देण तितकस अवघड नाही. त्यामुळे लंडन सोडण्याचा आमचा निर्णय पक्का झाला आहे.”
“ तिकडच्या सारखा पैसा, नोकरी इथ मिळणार का? नीट विचार करा.” विवेक म्हणाला.
“सध्या पैसा कमावण्यापेक्षा समाधान कमावण जास्त महत्वाचे आहे या निर्णयाला आम्ही येऊन पोहचलो आहोत.” कृष्णा म्हणाला.
“दिदी हे बघ दोघींपैकी एकीने जरी घराचा वारसा पुढे नेला तर ममा- पप्पांच्या आत्म्याला नक्कीच शांती समाधान मिळेल. कृष्णाच्या मम्मी –पप्पांच्या चेहऱ्यावर पण पुन्हा हसू फुलेल. आम्ही आता अहमदाबादला जाऊ तिथून इथे पुण्याला शनिवार-रविवार चक्कर टाकत जाऊ आणि घराच्या कामाकडे लक्ष देऊ” स्वरा म्हणाली.
“स्वरा तू भावनेच्या भरात तर निर्णय घेत नाहीस ना?”
“ नाही दिदी. पूर्ण विचारा अंतीच आहे. नेक्स्ट टाईम तू येशील तर आत्ता सारखं लॉजवर उतरण्याची पाळी तुझ्यावर येणार नाही. तुझ माहेर तुझ्या स्वागतासाठी सज्ज असेल बघ! ममा पप्पांच्या अंतकाळी जवळ न थांबल्याचा खूप मोठा सल आहे मनात. बेवारस मरण भोगल त्यांनी. ती वेळ पुन्हा आमच्यावर येऊ नये ही इच्छा आहे. निदान तुझ्यासाठी तरी माहेर उभं झाल तर मनात सलणाऱ्या जाणीवा थोड्या बोथट होतील.”
सौम्या धाकट्या बहिणीकडे कौतुक भरल्या नजरेने पहातच राहिली. तिला खूप भरून आले. तिने उठून स्वराला मिठी मारली. डोळ्यातल्या आसवांना वाट करून देत ती म्हणाली,
“ तुमच्या ह्या निर्णयासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंच. नंतर करून काय उपयोग?
माझ्या मामाने आजी जिवंत असताना या मुलीकडे 15 दिवस पाठव त्या मुलीकडे 15दिवस पाठव असा केला. आणि मृत्यू नंतर मोठा गावजेवण भजन. मोठा वर्षश्राद्ध कीर्तन असा केला. आणि आता whatspp वर पण msg टाकतो आई ची महती आणि तत्सम आई विषयीचे forwards. लोकं खुप निंदा करतात आणि आता त्याचे भाचे ज्यांना माहिती आहे तो आजीशी कसा वागला ते काय किंमत देत असतील त्याला. नुसता मुखवटा, बडेजावपणा.