कर्करोग आणि दुर्दैव !

Submitted by कुमार१ on 14 April, 2019 - 22:48

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. या वैज्ञानिक लेखात हे दैव वगैरे कुठून आले हा प्रश्न लगेच मनात येईल. पण घाबरू नका ! कर्करोगासंबंधात ‘दुर्दैव’ हा शब्द दोन वैज्ञानिकांनीच उपस्थित केलेला आहे. सामान्य माणूस ज्याला दुर्दैव म्हणतो त्याचा वैज्ञानिक पातळीवरील अर्थही त्यांनी सांगितलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठीच मी हा लेख लिहीत आहे.

तर या सगळ्या प्रकरणाची सुरवात २०१५मध्ये झाली. Cristian Tomasetti (गणितज्ञ) आणि Bert Vogelstein (जनुकतज्ञ) या वैज्ञानिकांनी काही कर्करोगांचे मूळ कारण सांगणारी त्यांची “Bad Luck Theory” विज्ञान विश्वात सादर केली. ती जाणून घेण्यापूर्वी या विषयाचा पूर्वेतिहास थोडक्यात जाणून घेऊ.

कर्करोगाची कारणमीमांसा हा अनेक वर्षे सतत अभ्यास होत असलेला विषय आहे. त्यावर अफाट संशोधन होत आहे. त्यातून नवनवी गृहीतके पुढे येतात. मग त्यावर सखोल चर्चा होते आणि मतभेद झडत राहतात. या सगळ्यामागे वैज्ञानिकांचा हेतू एकच असतो. तो म्हणजे कर्करोगाच्या कारणाच्या सखोल मुळाशी पोचणे. एव्हाना या रोगाच्या बाबतीतली मध्यवर्ती कल्पना स्पष्ट झालेली आहे - मुळात कर्करोग होण्यास पेशींतील काही महत्वाच्या जनुकांचा बिघाड कारणीभूत असतो.

जनुकीय बिघाड(mutation) हा मुख्यतः दोन प्रकारे होतो:
१. वातावरणातील (environmental = E) कर्करोगकारक घटक : यात किरणोत्सर्ग, रसायने आणि काही विषाणूंचा समावेश होतो.

२. अनुवंशिकता (Heredity = H)

या दोन्ही प्रकारातील( E व H) कारणे प्रस्थापित झालेली आहेत. परंतु काही कर्करोगांच्या बाबतीत ती दोन्ही लागू होत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे संशोधकांना अन्य काही कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी पेशीतील DNAवर लक्ष केंद्रित झाले. जेव्हा एखाद्या मूळ पेशीचे विभाजन होते, तेव्हा त्यातील DNAचेही विभाजन (replication) होऊन त्याच्या प्रतिकृती तयार होतात. या प्रक्रियेत कधी ना कधी चुका (random errors) होतातच आणि त्या अटळ असतात. अशा काही चुकांतून जनुकीय बिघाड होतात. त्यातील काहींमुळे पुढे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाच्या कारणमीमांसेतील हे तिसरे कारण स्पष्ट झाले आणि त्याला ‘R’ (Replication दरम्यानच्या चुका) असे संबोधले गेले. वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते. आता ‘R’ प्रकारच्या चुका का होतात? तर याला काही उत्तर नाही. काही व्यक्तींत त्या जास्त तर काहींत कमी होतात इतकेच. म्हणून या तत्वास अनुसरून या वैज्ञानिक द्वयीने या प्रकाराला ‘bad luck’ असे लाक्षणिक अर्थाने संबोधले. अन्य काहींनी या गृहितकाला ‘TV थिअरी’ असेही नाव दिले – यातील T व V ही त्या दोघांच्या आडनावाची अद्याक्षरे आहेत !

२०१५मध्ये हे गृहीतक प्रसिद्ध झाले खरे पण त्यात काही त्रुटी होत्या. अन्य कर्करोग संशोधकांनी त्यावर खालील आक्षेप घेतले:
१. समाजातील एकूण कर्करोगांपैकी नक्की किती टक्के हे ‘R’ चुकांमुळे होतात?

२. या अभ्यासात स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचा समावेश नव्हता आणि हे तर बऱ्याच प्रमाणात आढळतात. त्यामुळे अशा चुका आणि विशिष्ट अवयवाचा कर्करोग याची सांगड कशी घालायची?

३. हा अभ्यास फक्त अमेरिकी रुग्णांच्या माहितीवर आधारित होता. मग जगातील विविध वंशियांना याचे निष्कर्ष कसे लागू होतील?

त्यातून स्फूर्ती घेऊन या द्वयीने या विषयाचा व्यापक अभ्यास केला. आता त्यांनी संशोधनात जगातील ६९ देशांतील रुग्णांचा समावेश केला. त्याचबरोबर एकूण ३२ प्रकारचे कर्करोग अभ्यासले आणि त्यात अर्थातच स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचाही समावेश होता. मग २०१७मध्ये त्यांनी पुढील निष्कर्ष जाहीर केले. त्यात विविध कर्करोग आणि त्यांच्या कारणांची साधारण टक्केवारी दिली. ती अशी होती:
१. ६६% कर्करोग हे ‘R’ मुळे होतात.
२. २९% .......... हे ‘E’ मुळे, तर
३. ५% ....... हे ‘H’ मुळे.

अर्थात ही सर्वसाधारण आकडेवारी होती. मग निरनिराळ्या अवयवांच्या रोगांचीही टक्केवारी काढली गेली. त्यातली काही प्रमुख अशी:
* प्रोस्टेट, मेंदू आणि हाडांचे कर्करोग : ९५% ‘R’ मुळे
* फुफ्फुस कर्करोग : ३५% ‘R’ मुळे (आणि ६५% ‘E’ मुळे).

यावरून एक लक्षात येईल. काही कर्करोगांच्या बाबतीत ‘R’ हे कारण अगदी योग्य आहे पण अन्य काहींच्या नाही. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यास ‘E’ म्हणजेच धूम्रपान अधिक अंशी जबाबदार आहे. त्यामुळे दुर्दैवाचे गृहीतक प्रत्येक कर्करोगाला लागू होईलच असे नाही.

आता या गृहितकावर अधिकाधिक टीका होऊ लागली. काही गणितज्ञांनी याचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या मते या वैज्ञानिक द्वयीने त्यांच्या अभ्यासात संख्याशास्त्राची सूत्रे नीट वापरलेली नाहीत. त्यामुळे या विषयावरील गोंधळ अजून वाढला.

Tomasetti आणि Vogelstein यांनी त्यांच्या गृहीतकाच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले. त्यांच्या मते ‘R’ कारण जर आपण रुग्णांना पटवून दिले तर त्यांच्या मनाला खूप बरे वाटते. विशेषतः खालील प्रकारच्या रुग्णांत याचा उपयोग होतो:
१. अजिबात धूम्रपान न करताही फुफ्फुसाचा कर्करोग झालेले रुग्ण.
२. काही जणांची आहारशैली अगदी आरोग्यपूर्ण असते तसेच ते वातावरणातील कर्करोगकारक जहाल घटकांच्या फारसे संपर्कात आलेले नसतात. तरीही त्यांना एखादा कर्करोग झालेला असतो.

३. लहान मुलांच्या कर्करोगात तर हे स्पष्टीकरण खूप कामी येते. त्यांचा रोग जर अनुवांशिक नसेल तर अशा वेळेस त्यांच्या पालकांना खूप अपराधी वाटते. मुलांत ‘E’ प्रकारची कारणे सहसा लागू नसतात. “मग माझ्याच मुलाच्या वाट्यास हे का आले?” असे ते उद्वेगाने म्हणतात. इथे ‘R’ चे स्पष्टीकरण चपखल बसते.

वरील तिन्ही प्रकारांत संबंधित रुग्ण “नशीब माझे” असेच स्वतःला दूषण देतो. त्याचेच शास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे ‘R’ थिअरी.

‘R’ गृहीतकाचे प्रवर्तक आणि टीकाकार यांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून आता असा सुवर्णमध्य काढता येईल:

१. कर्करोगाची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. तो E, H व R यांतील निव्वळ एका घटकामुळे होत नाही, तर या तिघांच्या एकत्रित परिणामातून होतो.

२. जवळपास ४०% कर्करोगांचा प्रतिबंध आरोग्यपूर्ण जीवनशैलीतून करता येतो. त्यामुळे ‘E’ कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उदा. धूम्रपान व मद्यपानापासून अलिप्तता ही महत्वाची राहीलच. तसेच विविध किरणोत्सर्ग हेही याबाबतीत महत्वाचे आहेत.

३. कर्करोग्यांचे समुपदेशन करताना गरजेनुसार ‘R’ गृहीतकाचा वापर करता येईल.

काही कर्करोगांच्या बाबतीत E व H ही कारणे लागू नसतील तर ‘R’ हेच स्पष्टीकरण मानावे लागेल. अशा बाबतीत रोग टाळणे हे आपल्या हातात नसेल. पण कर्करोग जर अगदी लवकरच्या अवस्थेत कळून आला तर त्यावरील उपाय प्रभावी ठरतात. त्यादृष्टीने आयुष्याच्या योग्य त्या टप्प्यात विविध चाळणी चाचण्या करून घेणे हितावह ठरेल.
.....
आज समाजात विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८५ लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. त्यादृष्टीने कर्करोगावरील संशोधन हे बहुमूल्य आहे. कोणत्याही रोगावरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी त्याची कारणे सूक्ष्म पातळीवर समजणे गरजेचे असते. कर्करोगाच्या बाबतीत तर ते खूप गुंतागुंतीचे आहे. प्रस्तुत वैज्ञानिक द्वयीने मांडलेली ‘R’ थिअरी हे त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. जरी ती वादग्रस्त असली तरी ती या संशोधनाला एक वेगळे परिमाण देते हे निश्चित.
**************************

कर्करोग या विषयावरील माझे अन्य लेखन:
१. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर
(https://www.maayboli.com/node/64645)

२. मोबाईल फोन आणि कर्करोग ? : (https://www.maayboli.com/node/60382)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ व्यत्यय,
तुमची शंका रास्त आहे. खुलासा करतो.

१. “एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात”, हे विधान पाठयपुस्तकातील असून ते प्रस्थापित झालेले संशोधन होते.( अंदाजे २० वर्षांपासून)

२. “ २९% कर्करोग हे ‘E’ मुळे होतात”, हे विधान २०१७मध्ये प्रस्तुत थिअरीवाल्या मंडळींनी केले आहे !
… थोडक्यात, ते पूर्वापार संशोधनाला आव्हान देत आहेत.
पण……
त्यांची थिअरी अजूनही वादग्रस्त असून तिला सर्वांची मान्यता बिलकूल नाही.

@ हि हा,

*** टोकदार वस्तू ने टोचत राहणे, अति तिखट खाणे.‌ याने हा आजार होतो काय?>>>>

तुम्ही दिलेल्या उदा. मध्ये एखाद्या भागाचे chronic inflammation होते, जे कर्करोगासाठी पाया तयार करते.
अर्थात त्या क्रियांचा दीर्घ कालावधी लागेल. तसेच रोग प्रत्येकाला होईल असे नाही.

शक्यता वाढू शकेल” असे म्हणतो.

कर्करोग कोणालाही होऊ शकतो हे सत्य स्विकारुन, तो झालाच तर त्यावर होऊ शकणार्‍या उपचाराच्या खर्चाच्या तरतूदीसाठी विमा कंपन्या (medical insurance coverage) कितपत तयार झाल्या आहेत या बद्दल जाणकारांकडून मार्गदर्शन होऊ शकेल का ?>>>>>

सगळ्या मोठ्या कंपन्या इन्शुरन्स देताहेत. hdfc चा माणूस माझ्या मागे लागला होता, मी वारंवार नको म्हणूनही. वयानुसार प्रीमियम येतो जो मेडिक्लेम सारखा भरून विसरायचा. पण कॅन्सर झालाच तर मदत मिळते. Lic चे पण चांगले प्लॅन्स आहेत.

लेखात लिहिलेल्या प्रमाणे जे H कॅटेगरीत येतात, त्यांनी जरूर विचार करावा.

आनंद / समाधान विरुद्ध मानसिक ताणतणाव आणि कर्करोग याबाबत अभ्यास झाला आहे का? >>>>

माझे असे निरीक्षण आहे की जे लोक काही कारणांनी आतल्या आत घुसमटत राहतात, दुःखाने किंवा रागाने जळत राहतात त्यांना कॅन्सर कुठल्या न कुठल्या रुपात गाठतो. अर्थात याला काहीही आधार नाहीय, माझे निरीक्षण.

साधना जी माझंही असंच निरिक्षण आहे. जी व्यक्ती आपल्याला जे मिळालंय ते खूप कमी आहे असे मानून सतत असमाधानी राहते ती मृत्युला लवकर आमंत्रण देत असते. भले कर्करोग न होऊदे, निराश व्यक्ती साध्या साध्या आजारांनीही हे जग सोडून जातात.

साधना आणि अन्य सर्व सहभागींचे चांगल्या चर्चेबद्दल आभार !

‘समाजातील बहुतेकांना एकतर करोनरी हृदयविकार अथवा कर्करोग कधीतरी गाठणारच आहे’, अशा आशयाची रिचर्ड गॉर्डन यांची एक लघुकविता आहे. ती लिहून समारोप करतो.

Ashes to ashes

Dust to dust

If cancer doesn’t get you

Atherosclerosis must !

छान लेख आणि माहिती मिळाली....

<< वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते. >>
------- हे कळाले नाही. पेशींचे विभाजन (rate of cell division) सुरवातीला खुप जास्त असते आणी नंतर ते कमी होत जाते असे आहे ना ? तसेच पेशी शरिराच्या कुठल्या भागातली (त्वचा, lining of intestine, बोन्स, ब्रेन सेल/न्यूरॉन्स) आहे यावर rate of cell division अवलंबतो.

गर्भवती स्त्रीयांना सर्व प्रकारच्या रेडिएशन पासुन लांब ठेवण्याचा सल्ला सतत मिळतो कारण या अवस्थेत पेशी विभाजनाचे प्रमाण खुप जास्त असते.

वाढत्या वयासोबत मानवी शरिराने विविध प्रकारच्या रसायनांच्या / तसेच radiation च्या सानिध्यात घालवलेला एकूण काळ मोठा/ वाढलेला असतो जोडीला मागे सरलेल्या आयुष्यातले सर्व mutations या सर्वांची बेरिज केली तर कर्करोग होण्याची शक्यता वाढत्या वयात ६५+ जास्त असते.

उदय, धन्यवाद.

<< वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते. >>
------- हे कळाले नाही. >>>>

चांगला मुद्दा. स्पष्टीकरण देतो.

जन्मापासून मरेपर्यंत पेशी-विभाजन होत राहते. वाढत्या वयात त्याचा rate जास्त असेल हे बरोबर. पण, आपल्याला या मुद्द्याकडे विभाजनातील चुकांच्या दृष्टीने पाहायचे आहे. दर १० लाख विभाजनांमागे १ जनुकीय बिघाड होतो आणि तो जनुकांत कायमचा नोंदला जातो.

आता उदा. म्हणून एक १० वर्षांचा मुलगा बघू. समजा त्याच्या शरीरात आतापर्यंत १०० लाख विभाजने झालीत. त्यामुळे त्याचे ‘ज. बिघाड’ झाले १०.
आता ६० वर्षांचा माणूस बघा. समजा आतापर्यंतची विभाजने त्या मुलाच्या ५०० पट झाली आहेत. तर त्याच्यातील ज. बिघाड देखील ५,००० होतील.

जेव्हा बिघाडांची संख्या खूप होते तेव्हा त्यांच्या एकत्रित परिणामातून कर्करोगाची शक्यता वाढते.
अर्थात काही ठराविक अवयवांचेच कर्करोग वयानुसार वाढतात.

*** एक पाठ्यपुस्तकातील वाक्य जसेच्या तसे इंग्लिशमध्येच लिहितो:
As people live longer many more will develop cancer.

वाचतेय....
कुमार१, विपु पाठवलीये.

शशांक, त्या दुव्याबद्दल धन्यवाद.

ते वाचले. स्तन-कर्करोगाच्या काही रुग्णांवर योग/ध्यान आदीचे प्रयोग त्यात केलेले दिसतात. तो एक अतिलघुगट अभ्यास आहे. या ‘उपचारांनी’ शरीरपेशींवर आरोग्यदायी परिणाम होतात असा त्याचा साधारण निष्कर्ष आहे. अर्थात, ही फक्त सुरवात आहे आणि यावर भरपूर संशोधन व्हावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मी कर्करोगाच्या काही अधिकृत संस्थळावर नजर टाकली. त्यानुसार असे संशोधन हे अद्याप बाल्यावस्थेत आहे असे दिसते. सध्या तरी या रोगाचा प्रतिबंध / पूर्ण बरे होणे आणि योग यांचा संबंध सिद्ध झालेला नाही.
भविष्यात असे अभ्यास जरूर व्हावेत.
बस, इतकेच सांगू शकतो.

मंजूताई, धन्यवाद. उत्तर दिले आहे.

धाग्याच्या विषयाशी संबंधित आहे की नाही हे माहीत नाही पण पर्यायी उपचारांबद्दल उल्लेख आला म्हणून एक आठवण झाली.
कॅन्सर माझा सांगाती हे डॉ . बावडेकरांचं आत्मचरित्र आहे त्यात यासंदर्भात माहिती आहे.

As people live longer many more will develop cancer.>>>>>
मला तर नेहमी असं वाटते की फार जास्त आयुष्य मिळण्यापेक्षा एका जोराच्या हार्ट अ‍ॅटॅकने फटकन मरण यावे !

> मला तर नेहमी असं वाटते की फार जास्त आयुष्य मिळण्यापेक्षा एका जोराच्या हार्ट अॅटॅकने फटकन मरण यावे ! > खूप जास्त काळ आजारी राहून, बेडरिडन वगैरे जगत राहण्यापेक्षा हेच चांगले आहे.
बेस्ट मरण म्हणजे रात्री झोपायचं आणि सकाळी उठायचच नाही. हार्टफेल. इतरांसाठी हा कितीही धक्का असला तरी स्वतः त्या व्यक्तीसाठी हे बेष्ट असतं, नशीबवान लोकं...
===

कमी वयातदेखील कर्करोग होणारे जे असतात त्यांच्यात H फॅक्टर जास्त असेल ना? पिढ्यानपिढ्या स्वजातीत लग्न करण्याचा या H मधे कितपत परिणाम आहे? यादृष्टीने काही अभ्यास झाला आहे का?

डॉक्टर साहेब उपास करून ऑटोफॅजिने कॅन्सर ची शक्यता कमी होते असे म्हणतात हे खरे आहे काय?
असे असेल तर असा उपचार केला जातो का?

@ अ‍ॅमी,

१. कमी वयातदेखील कर्करोग होणारे जे असतात त्यांच्यात H फॅक्टर जास्त असेल ना? >>>>
काही कर्करोगांत हे दिसते, पण सरसकट नियम नाही होऊ शकत.

२. पिढ्यानपिढ्या स्वजातीत लग्न करण्याचा या H मधे कितपत परिणाम आहे? यादृष्टीने काही अभ्यास झाला आहे का? >>>
असे अभ्यास जास्त करून आखाती देशांत झाले आहेत. त्याचे निष्कर्ष उलटसुलट आहेत. अशा जोडप्यांच्या संततीत काही अवयवांच्या कर्करोगांचा धोका अधिक दिसतो, तर अन्य काही अवयवांचे बाबतीत तो कमी देखील दिसतो.

त्यामुळे,
जगातील सर्व वंशीय लोकांसाठी सरसकट विधान करता येत नाही.

@ चामुंडराय,

उपास करून ऑटोफॅजिने कॅन्सर ची शक्यता कमी होते असे म्हणतात हे खरे आहे काय?
>>>>

हा सध्या लै गुंतागुंतीचा मामला आहे !
या विषयावर बरेच रुग्ण-अभ्यास (clinical trials) चालू आहेत. त्यांचे निष्कर्ष यायला वेळ लागेल. तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झालेले आहे:

१. विशिष्ट प्रकारच्या उपासांनी (IF वगैरे ) कर्करोग प्रक्रियेवर काही परिणाम होतो का? यात जनुकीय घटकांचाही अभ्यास होईल.
२. उपासानी केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी होतात आणि उपयुक्तता देखील वाढते असे गृहीतक आहे.
३. थोडक्यात ‘उपास’ ही या रोगातील एक पूरक उपचारपद्धती म्हणून पुढे येऊ शकेल.

गावोगावी कॅन्सर बरा करतो असे अनेक बाबा, महाराज, मंदीरं यांची जाहीरात चालते. काही लोक यांना बळी पडतही असतील.

नुकतेच ‘ लँसेट’ वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार आजपासून ते २०४० या काळामध्ये कर्करोग-उपचार घेण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण दरवर्षी ५३ टक्क्यांनी वाढेल.
२०४०पर्यंत कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या १.५ कोटींच्या घरात गेलेली असेल.

Credit: CC0 Public Domain
Drugs for diabetes, inflammation, alcoholism—and even for treating arthritis in dogs—can also kill cancer cells in the lab, according to a study by scientists at the Broad Institute of MIT and Harvard and Dana-Farber Cancer Institute. The researchers systematically analyzed thousands of already developed drug compounds and found nearly 50 that have previously unrecognized anti-cancer activity. The surprising findings, which also revealed novel drug mechanisms and targets, suggest a possible way to accelerate the development of new cancer drugs or repurpose existing drugs to treat cancer.

कॅन्सर हा अतिशय किरकोळ आजार आहे.
फक्त आर्थिक फायद्या मुळे त्याला गंभीर स्वरूप दिले गेले.
अशी शंका मला पहिल्या पासून होती.

Some of the compounds killed cancer cells in unexpected ways. "Most existing cancer drugs work by blocking proteins, but we're finding that compounds can act through other mechanisms," said Corsello. Some of the four-dozen drugs he and his colleagues identified appear to act not by inhibiting a protein but by activating a protein or stabilizing a protein-protein interaction. For example, the team found that nearly a dozen non-oncology drugs killed cancer cells that express a protein called PDE3A by stabilizing the interaction between PDE3A and another protein called SLFN12—a previously unknown mechanism for some of these drugs.
These unexpected drug mechanisms were easier to find using the study's cell-based approach, which measures cell survival, than through traditional non-cell-based high-throughput screening methods, Corsello said.
Most of the non-oncology drugs that killed cancer cells in the study did so by interacting with a previously unrecognized molecular target. For example, the anti-inflammatory drug tepoxalin, originally developed for use in people but approved for treating osteoarthritis in dogs, killed cancer cells by hitting an unknown target in cells that overexpress the protein MDR1, which commonly drives resistance to chemotherapy drugs.
The researchers were also able to predict whether certain drugs could kill each cell line by looking at the cell line's genomic features, such as mutations and methylation levels, which were included in the CCLE database. This suggests that these features could one day be used as biomarkers to identify patients who will most likely benefit from certain drugs. For example, the alcohol dependence drug disulfiram (Antabuse) killed cell lines carrying mutations that cause depletion of metallothionein proteins. Compounds containing vanadium, originally developed to treat diabetes, killed cancer cells that expressed the sulfate transporter SLC26A2.
"The genomic features gave us some initial hypotheses about how the drugs could be acting, which we can then take back to study in the lab," said Corsello. "Our understanding of how these drugs kill cancer cells gives us a starting point for developing new therapies."
The researchers hope to study the repurposing library compounds in more cancer cell lines and to grow the hub to include even more compounds that have been tested in humans. The team will also continue to analyze the trove of data from this study, which have been shared openly.

कॅन्सर हा अतिशय किरकोळ आजार आहे. >>>>

पूर्णपणे असहमत. या आजाराची pathology समजून घ्यावी. मग अंदाज येईल.
संशोधनातून सोपे उपचार निघत राहतील .

हे मराठी संस्थळ आहे. त्यामुळे वरच्याइतके मोठाले इंग्रजी परिच्छेद इथे डकवू नयेत ही विनंती. त्याचा सारांश मराठीत लिहिल्यास बरे होईल.

Pages