मोकळा श्वास १

Submitted by jayshree deshku... on 14 April, 2019 - 06:53

||श्री गोंदवलेकर महाराज प्रसन्न ||
मोकळा श्वास १
स्वप्नाची सर्दी कमी होत नव्हती. मधून मधून श्वास घेण्यासही त्रास होत होता. सागर तिला बळेच डॉक्टरांकडे घेऊन गेला, म्हणला , “स्वप्ना बस झाले आता हे तुझे घरगुती उपचार, आज मी तुझ काही एक ऐकणार नाही चल आवर आपण आत्ता लगेच डॉक्टरांकडे जाणार आहोत. आता तुझी पन्नाशी क्रॉस झाली आहे म्हणल, अंगावर कुठलेही आजार काढायचे नाही. आणि मेडिक्लेम असताना तू एवढी काळजी कशासाठी करतेस?” नको ,नाही करत शेवटी स्वप्ना डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करायला लावल्या. मग मात्र सागरची चिडचिड सुरु झाली. स्वप्ना म्हणाली, “ मला माहित आहे, मला काही आजार झाला की तुझी चिडचिड सुरु होते, हेच मला आवडत नाही. म्हणूनच मी डॉक्टरांकडे यायला तयार नव्हते. बघ आता सर्दी-पडस म्हणल तरी डॉक्टर सगळ्या टेस्ट करायला लावतात. आणि तू लगेच माझाच काही गुन्हा असल्याप्रमाणे माझ्यावर चिडतोस. मला जर काही भयंकर आजार झाला तर तू काय करशील?” त्यावर सागर जास्तच चिडला म्हणाला, “ गप्प बस भलतच काहीतरी बोलू नकोस. मला खुप टेन्शन येत. मी तुझ्याशी भांडत जरी असलो तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम पण आहे.”
स्वप्नाचे टेस्ट रिपोर्ट आले. डॉक्टरांना लंग्सं कॅन्सर असण्याची दाट शक्यता वाटत होती. बायप्सी ठरली. स्वप्नापेक्षा सागर जास्त अगतिक झाला. झाडून सगळ्या देवांना नवस बोलून बसला. स्वप्ना स्वता:च्या मनाची तयारी करीत होती. ती विचार करत होती, कितीतरी लोकांना किती लहान वयात कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. अजून जग पाहिलेले किंवा जाणलेले सुद्धा नसते. आणि कोवळ्या वयात हा आघात सहन करावा लागतो. आणि जगाचा निरोप घ्यावा लागतो. आपलं तसं तर नाही. दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. मोठीची मुलगा , म्हणजे नातू पाहून झाला. म्हणल तर तसा संसार झालेला आहे. मुली दोघी सुस्थळी पडलेल्या आहेत. दोघींचे नवरे एकुलते एक आहेत. घरच गडगंज आहे. आणि त्या स्वत: खोऱ्याने डॉलरमध्ये कमवत आहेत. त्यांना बिलकुल माहेरची अपेक्षा नाही. उद्या मी जरी नसले तरी माझ्यावाचून मुलींचं काही अडणार नाही. पण? पण सागरच कसं होईल. तो तर पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. त्याच्या सगळ्या सवयी सांभाळून घेण्याची मला सवय झाली आहे. तो मुळातच स्वाभिमानी लेकींकडे जाऊन राहणार नाही. धाकटीच आणि सागरच जरा जास्तच जमत. ती मोठीपेक्षा जास्त लाघवी आहे. सागर वर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. तिच्याजवळ राहू शकेल सागर. तिच्याकडून तसा शब्द घ्यावयास हवा. ‘बाई ग माझ्यानंतर तुझ्या बाबांना नीट सांभाळ’. नाही म्हणणार नाही करेल सर्व, पण सागर तिच्याकडे जायला हवा ना! न जाऊन काय करेल ? घर एकट्याला खायला उठेल. पण ह्या लेकी तरी जवळ आहेत का, मोठी न्युझीलंडला आणि धाकटी लंडनला. तिथे त्या परक्या देशात बिनकामाचे राहून त्याला करमणार कसे? फक्त माझ्यानंतर काळजी सागरचीच आहे. होईल काहीतरी. आधी माझ्याबद्दलची चिंता वाटते, कॅन्सरच्या वेदना खुप असतात म्हणे सार सहन करण्याची ताकद, हिम्मत परमेश्वर मला देईल ना? उलट सुलट विचार स्वप्नाच्या मनात चालूच होते.
बायप्सी झाली, रिपोर्ट आले. धडधडत्या अंतकरणाने सागर आणि स्वप्ना डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी सागरच्या खांद्यावर सहानुभूतीने हात ठेवत सांगितले “ माझा अंदाज चुकला असता तर मला बर वाटलं असत. पण लंग्सचा कॅन्सर डिटेक्ट झाला आहे. लास्ट स्टेज आहे. जास्तीत जास्त चार महिने हातात आहे.” रिपोर्ट ऐकून त्यामानाने स्वप्ना शांत राहिली पण सागर बधीर झाला. मलूल हसत स्वप्ना म्हणाली, “ अरे चार महिन्यांचा तरी अवधी पुढच्या आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी परमेश्वराने दिला आहे. काहीतरी ठरविता येईल. पण हृदयविकाराच्या झटक्याने जे जातात त्याचं काय? काही ठरविण्यासाठी वेळच नाही मिळत त्यांना. तू आता निदान मनाची तयारी तरी करू शकशील.”
डोळ्यात आलेले अश्रू पुसत त्याने स्वप्नाचा खांदा थोपटला आणि म्हणाला, “मी नाही तुझ्यासारखा शांत आणि सहनशील. माझ्यासाठी सार अवघड आहे.” स्वप्ना आणि सागर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन घरी आले. संध्याकाळी नेहमीप्रमाणे स्वप्नाने देवाजवळ दिवा लावला. सागर अस्वस्थ होता, स्वप्नावरच चिडला, उफाळून म्हणाला,
“काही नकोस देवापुढे दिवा वगैरे लावू काय वाईट दिवस दाखवला आहे देवाने. आणि तुलाच असे विचित्र आजार कसे होतात ग ? तू सिगारेट ओढतीस का मी ओढतो ? घरात कुणीच सिगारेट ओढत नाही मग लंग्स कॅन्सर कसा काय झाला तुला?”
“माझ नशीब ! दुसर काय उत्तर देऊ ह्यावर?”
“तुझ नाही माझं खडतर नशीब, सारे माझ्या नशिबाचे भोग आहेत. बायकोची आजारपण काढण्यासाठी माझा जन्म आहे. मला नाही सहन होत, मीच विष घेतो नाहीतर आड-विहीर जवळ करतो.” सागर त्राग्याने बोलत होता. आयुष्यात कुठली झळ सोसण्याची त्याला सवय नव्हती. आधी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणून त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपले होते. नंतर स्वप्ना संसारातले टक्के-टोणपे ,खस्ता खायची, फक्त आर्थिक बाजू काय ते सागर सांभाळायचा. त्यामुळे स्वप्नाला जरा जरी काही झालं की सागरची चिडचिड व्हायची. आणि आता तर स्वप्नाच एवढ मोठ दुखण त्याला भेडसावत होत. स्वप्नाला सागरच्या स्वभावाची कल्पना होती. तिलाही स्वत:च्या दुखण्याचा धक्का बसला होता. तरी ती शांततेने घेत होती. तिला फक्त सागरच्या प्रतिक्रियांची भिती वाटत होती. सर्व गोष्टींना सामोर जाण्याची ताकद परमेश्वरा माझ्या पेक्षा सागरला जास्त दे,त्याला शांत आणि सहनशील बनव, तरच मला शांत मरण येईल. म्हणून ती परमेश्वराकडे मागणे मागत होती. ती सागरला समजावत होती. म्हणाली,
“अरे सर्वच सुख परमेश्वर आपल्याच झोळीत कसे टाकेल? दोन्ही मुलींची काही काळजी ठेवली आहे का त्याने? उच्च शिक्षण, चांगली मोठ्या पदावरची नोकरी, उच्च शिक्षित जावई चांगले घर-दार सगळे तरी दिले देवाने. कणभरही दु:ख वाट्याला नको असे म्हणून कसे चालेल?”
“ खर स्थैर्य आताच संसारात आल होत. मजेने इकडे तिकडे फिरणे, बरोबरीने जगप्रवास करणे, एकमेकांची हौसमौज पुरवणे आताच तर सारे शक्य होते. आणि हे काय होऊन बसले? मी चिडू नको तर काय करू?” सागर म्हणाला.
“तू म्हणतोस त्यात तथ्य आहे थोड, अरे पण चिडून कुठले प्रश्न थोडेच सुटणार आहेत? तेव्हा पुढच्या भविष्याचा विचार करूया. आपल्या इथल्या भारतातल्या घराचं काय करायचं? तू कुठे रहाणार? सहा- सहा महिने दोघी मुलींकडे रहाणार का इथेच रहाणार? इथे आपल्या कामवाल्या रखमाबाई आहेत, त्या जातीने सर्व गोष्टी घरात बघतील. तुझ्या आवडी-निवडी, तुझा स्वभाव सार त्यांना माहित आहे. तुला फक्त बाजारहाट करावा लागेल. आणि मी तुला सार दाखवून ठेवते ना! अरे कुणाच कुणावाचून अडत नाही. माझ्या नंतर सवय होईल तुला सगळ्याची. हळू हळू सगळ सुरळीत होईल अरे.”
“नको बसं नको पुढच बोलू मी आता तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.”
सागरचा दुखावलेला स्वर पाहून स्वप्नाने पुढे बोलण वाढवलं नाही. जपाची माळ घेऊन ती स्वस्थपणे देवघराजवळ बसली. जप चालू असताना सुद्धा तिच्या डोक्यात सागरचाच विचार होता. आणि परमेश्वराजवळ हीच प्रार्थना ‘सागरला पुढे भविष्यात घडणाऱ्या घटना ,संकटे स्विकारण्याची ताकद दे, माझा संसाराचा मोह दूर कर, आणि राहिले दिवस तुझ्या नामस्मरणात जाऊ दे.’ ‘श्रीराम जयराम जय जयराम’ ......
स्वप्नाने मनाची तयारी तर केलीच होती पण पुढची इतर तयारी सुद्धा सुरु केली होती. पंधरा दिवसातच तिने वकिलांना बोलावून मृत्युपत्र बनवून घेतले. आणि त्यातील गोष्टी तिने सागरला सुद्धा न कळू देता गुप्त ठेवल्या. तिला शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक संस्थांना देणग्या द्यावयाच्या होत्या. सागरने कदाचित नकार दिला असता, राहू दे आपल्या मुलींसाठी असं कदाचित म्हणाला असता. म्हणून तिने मृत्युपत्र त्याच्यासमोर पण केले नाही. आपल्या घरी इमान इतबारे १७-१८ वर्षे काम करणाऱ्या रखमाबाईसाठी पण काही रक्कम फिक्स मध्ये ठेवावी म्हणजे त्याच्या व्याजातून तिच पोट भरेल. म्हातारपणी चार घरी जाऊन कष्ट करण्याची पाळी तिच्यावर न यावी. ही गोष्ट मनात आल्यावर स्वप्नाने विलंब न करता बँकेत जाऊन तशी तजवीज करून ठेवली. एक दिवस सागरचा चांगला मुड पाहून ती हळूच त्याला म्हणाली, “मला वाटते, सागर तू सुद्धा स्वत:चे मृत्युपत्र करून ठेवावे. पुढे-मागे तुला वाटले तर पुन्हा त्यात बदल कर हवा तर! सागरला ती गोष्ट पटली नाही. तो स्वप्नावर डाफरला. “तू नकोस माझी काळजी करू. मी पाहीन माझ!”
स्वप्ना नको म्हणत असताना डॉक्टर आणि सागर तिला बळेच किमो घ्यायला लावत होते. तिचे म्हणणे होते, ‘नाही तरी हे सगळे सोपस्कार करून मी थोडीच वाचणार आहे? तेव्हा उगीच शरीराचे भोग कशासाठी वाढवायचे?’ पण हातात असतील ते सगळे प्रयत्न करायचे असं सागरच म्हणण होत. किमो नंतर गळणारे केस, वाढणारे पित्त, थकवा हे सार स्वप्नाला नको वाटत होत. त्यातसुद्धा घराची घडी नीट बसवून शांतपणे मोकळा श्वास घ्यावा असं तिला वाटत होत. तिने हळू हळू रखमाबाईवर सार स्वयंपाकाच काम सोपवलं होत. त्यांना ती सांगे, “रखमाबाई जास्त मसाला तिखट वापरून भाज्या करू नका, सागरला आवडत नाही, वरणात किंवा पोहे, उपमा करताना एखादीच हिरवी मिरची टाकत जा. आणि तीही मोठे तुकडे करून म्हणजे काढून टाकता आली पाहिजे. शेवयाची खीर कशी करायची ते समजल ना? सागरला ती खुप आवडते. आठवड्यातून एक –दोनदा करत जा.दोडका तोंडल ह्या भाज्या करत जाऊ नका. सागरला आवडत नाहीत. फ्लॉवर, कोबी, बटाटा ह्या भाज्या करत जा भेंडी केली तर मसाला भेंडी करत जा. आणि हो स्वयंपाकात ओल खोबर वापरत जा. चव येते त्याने बरका” एक ना दोन हजार सूचना रोज रखमाबाईंना स्वप्ना देत होती. वरकाम करणाऱ्या लताला काम स्वच्छ करण्याच्या सूचना. धुण्याचे भांड्याचे काम करणाऱ्या शांताबाईला भांडी पुसून मग ट्रोली मध्ये लावण्याच्या सूचना सार काही घराची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी स्वप्नाचा आटापिटा चालू होता. स्वप्नाचे बायकांना सूचना देणे चालू झाले की सागर उगीचच स्वप्नावर चीड चीड करत राही. कारण स्वप्ना लवकरच आपल्याला सोडून जाणार याची जाणीव त्याला छळत असे. तर स्वप्नाला वाटत असे, माझे आता कमी दिवस राहिले आहेत तेव्हा सागरने शांत झाले पाहिजे. माझ्याशी प्रेमाने वागले पाहिजे. एक दिवस ती कळवळून सागरला म्हणाली, “ सागर पुरे ना! जास्त दिवस नाहीत रे राहिले माझे. माझ्याशी शांतपणे बोलत जा, प्रेमाने वागत जा. माझ्यानंतर मुली-जावई तुझा चिडचिडा स्वभाव नाही सहन करणार. आणि कुणी तुझा अपमान केलेला, कुणी तुला बोललेलं मला आवडत नाही रे.” यावर सागर मनात चडफडत गप्प बसला खरा. पण त्याला वाटत होते, स्वप्ना माझी व्याकुळता समजू कशी शकत नाही. स्वप्नाच्या टेन्शन मुळे मीच रोज कणाकणाने मरत आहे.
स्वप्नाने मुलींना फोन करून एकदा भेटून जाण्यास सांगितले. दोघी मुली जावई १५ दिवसांसाठी आले. त्यात त्याचं मित्र –मैत्रिणींना भेटण झाल. मुलीचं सासरी जाण झाल. खरेदी झाली. आईबरोबर जेमतेम २-३ दिवसांचा वेळ त्यांनी घालवला. आईच सांत्वन करताना दोघी म्हणाल्या, “बाबांची काळजी करू नकोस, आम्ही दोघी आहोत ना! त्यांना वाऱ्यावर का सोडणार आहोत? तू आता जास्तीत जास्त आराम कसा घेता येईल ते बघ.” मुली आल्या आणि भुर्कन निघून गेल्या. त्याचं सांत्वन, दिलासा, येण-जाण सार सार स्वप्नाला कोरड वाटून गेलं. ना त्यांनी आईला तिच्या शेवटच्या इच्छा विचारल्या. किंवा त्यांच्या वागण्यात बाबांबद्दलची खरी कळकळ दिसली. घरी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच यथोचित आदरातिथ्य करणाऱ्या, घरच्या कामवाल्या पासून ते नातेवाईकां पर्यंत सगळ्यांना जीव लावणाऱ्या स्वप्नाला उगीचच वाटून गेलं, ‘अरे ह्या माझ्याच मुली का? मी तर असे संस्कार केले नव्हते त्यांच्यावर. त्यांच्या आजी-आजोबांचं पण सार निगुतीने करताना त्यांनी पाहिलं आहे मला. मग अशा का वागल्या? पडल्या पडल्या विचार करताना तिने शेवटी सागरला जवळ बोलावले आणि सागरला म्हणाली, “अरे तुझ्याशी मुली नीट बोलल्या ना रे? तुझी काळजी वाटती का रे त्यांना?”
“असं का म्हणतेस ? आपल्याच मुली आहेत त्या. त्यांना माझ्याबद्दल खुप काळजी वाटते आणि तुझ्याबद्दल वाईट वाटत होते खूप. त्यांनी तसं बोलून दाखवल अग.” हे बोलताना सागरचा स्वर खूप कातर झाला होता. तो तिथून उठून बाहेर हॉल मध्ये निघून गेला. स्वप्नाला वाईट वाटलं. आपल्या जवळ राहण्या ऐवजी सगळे आपल्याला टाळत आहेत असं वाटलं. नातेवाईक ,परिचित पण जास्त फिरकत नाहीत. स्वप्नाने विचार केला, कदाचित आपल्याला असे वाटत असेल. पण सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपले व्यवहार थोडेच चुकले आहेत? कोण कसा आपल्यासाठी वेळ काढणार?
मुलींच्या आणि नातवाच्या आठवणी काढण्यात ७-८ दिवस पटकन निघून गेले. त्यादिवशी बिछान्यावर रात्री पडल्यावर स्वप्ना सागरला म्हणाली, “अरे अजून झोप येत नाही रे तेव्हा आपण आपल्या आणि मुलींच्या लग्नाचे अल्बम पाहून झोपू या का?” सागर थोडा कुरकुरला पण आज काल स्वप्नाला कशाला नाही म्हणत नव्हता. दोघांचा पण एक दीड तास हसत खेळत, जुन्या आठवणी आठवत मजेत गेला. झोपताना सागर म्हणाला, “स्वप्ना मी चिडतो तुझ्यावर पण मला माफ कर. तुझ्या विरहाच्या कल्पनेने कासावीस होतो मी. पण ह्यापुढे अजिबात चिडणार नाही. तुझा हात कायम हातात रहावा असं वाटत ग.पण तू जिंकलीस, तू मला सोडून जाणार.” खरच सागरने स्वप्नाचा हात हातात घेतला आणि झोपी गेला. स्वप्नालाही झोपेच्या गोळी मुळे झोप लागली. सकाळी जाग आली तर सागर अजुनी उठला नव्हता. तिने सागरला हाक मारली पण तो उठलाच नाही. तिने ताबडतोब डॉक्टरांना आणि बहिणीला फोन करून बोलावून घेतले. पण रात्री झोपेतच हार्ट फेल्युअरने सागरने जगाचा आणि स्वप्नाचा निरोप घेतला होता. जेव्हा डॉक्टरांनी स्वप्नाला सांगितले, “सागर इज नो मोअर” तेव्हा स्वप्नाला खुपच मोठा धक्का बसला. रात्री स्वप्नाला तू जिंकलीस म्हणणाऱ्या सागरने अखेर तिलाच हरवले होते. मुलींना फोन झाले. मुलीनाही खरे वाटेना त्यांना पण मोठा शॉक बसला. मुली नुकत्याच येऊन गेल्या होत्या. त्यांना परत येणे शक्य नव्हते. त्यातच धाकटी कडे तिची प्रेग्नसी न्यूज कन्फर्म झाली होती. त्यामुळे ती लांबचा प्रवास करून येऊ शकत नव्हती. स्वत:ची तब्येत सांभाळत कामवाल्या बायकांना हाताशी घेऊन स्वप्नाने सागरचे दिवस केले म्हणण्या पेक्षा ओढून काढले. मोठी मुलगी कशी बशी शेवटच्या ३-४ दिवसांसाठी आली. सागरच्या अचानक जाण्याने खुपच पेच निर्माण झाले होते. सारे निस्तरणे गरजेचे होते. मुलींची आपल्या ह्या परिस्थितीत साथ हवी असे स्वप्नाला खूप वाटत होते. पण त्यांना ते अशक्य होते. सागरने स्वत:चे मृत्युपत्रही केले नव्हते. त्याच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट चेक कराव्या लागल्या. पण नशीब त्याने सगळ्या ठिकाणी नॉमिनेशन चेंज करून मुलींची नावे सगळ्या ठिकाणी लावली होती. राहता flat सागर –स्वप्ना दोघांच्या नावावर होता. स्वप्नाने मुलींना पुन्हा पुन्हा विचारलं , ‘तुम्ही दोघी इथे आलात तर तुमच्यासाठी flat ठेवू का?’ मुलींनी त्या गोष्टीला साफ नकार दिला. मग सहजच स्वप्नाच्या मनात आलं, रखमाबाईच्या नावावर flat करावा का? मुली कधी भारतात आल्या तर ती त्याचं माहेरपण करेल. पण पुन्हा वाटायला लागले, एवढी ५०-६० लाखांची इस्टेट तिच्या नावावर करावी की नाही? स्वप्नाची मनस्थिती द्विधा झाली. एक मन म्हणत होत, आयुष्याचे अखेरचे दिवस मोजत आहेस, लाभ- हानी, आपलं- परक ह्या गोष्टींना किती दिवस धरून रहाणार? जाता जाता एखाद्या गरीबाचा फायदा झाला तर दुवाच मिळतील. ज्यांच्याकडे गडगंज आहे त्यांची धन करण्यात काय अर्थ आहे. कामवाली झाली म्हणून काय झाल? तिला रात्रीतून श्रीमंत होण्याचा अधिकार नाही का? मुलींसाठी जीव काढून मुली कुठे वेळेला येत आहेत?वेळेला आपल्या मदतीला येणाऱ्या लोकांच्या प्रती कृतज्ञता हवीच ना. सागर गेला तर त्या दिवशी सकाळी कामाला आलेल्या रखमाबाई संध्याकाळपर्यंत थांबल्या होत्या. सगळेजण मला मुलींबद्दल विचारत आहेत, मी मुलींच्या अडचणी समजू शकते. पण लोकांना कसं सांगणार? सागरचा भाऊ माझी बहिण म्हणत होते, ‘तुझ हे असं आजारपण तेव्हा जवळच इमर्जन्सीला कुणीतरी हव. तुझ्यापेक्षा त्यांना पैसा जास्त महत्त्वाचा आहे का?’ खर तर मुलींना परदेशात पाठवायलाच नको होत.त्यांना एवढ लहानाच मोठ करून काय उपयोग? गरजेला त्यांची काहीच मदत नाही.’ वगैरे, लोकांच बरोबर आहे पण काय सांगायचं सगळ्यांना? आपल्या स्वार्थासाठी उंच आकाशात झेप घेऊ पाहणाऱ्या मुलींच्या आशा आकांक्षाचे पंख थोडेच छाटायचे?
एक दिवसभर विचार करून शेवटी स्वप्नाने रहाते घर आपल्यानंतर रखमाबाईंच्या नावावर करण्याचा विचार बदलला.कारण आपल्या नंतर रखमाबाईचा गुंड मुलगा तिला घरात सुखाने नांदू देईल की नाही याची शाश्वती नव्हती. इस्टेटीच्या बाबतचे सारे व्यवहार पूर्ण करून झाले.सागरची आपल्यानंतर काय म्हणून खुप काळजी वाटत होती. पण आता ती पण काळजी मिटली होती. पुरुषांच्या नंतर बायका निर्धाराने राहू शकतात. पण खरा प्रॉब्लेम पुरुषांनाच येतो. बायको नंतर विधुर पुरुषाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलतो.त्यात सागरला घरात लक्ष घालण्याची सवय नव्हती. कामवाल्या बायका असं किती आपल्या घरात मन लावून काम करणार? कामवाल्या बाईचा घरात फिरणारा हात आणि घरच्या बाईचा घराला घरपण देणारा हात यात फरक हा राहणारच ना! सागरला सगळ खूप अवघड गेलं असत. कदाचित ह्या टेन्शन मुळे त्याच्या हार्टवर प्रेशर आल असणार. एका अर्थाने तो ह्यातून सुटला हे बरेच झाले. आता मरताना मोकळा श्वास घेऊन मरायला काही हरकत नाही. असे स्वप्नाच्या मनात येऊन गेले. आणि आता रखमाबाई पण तिच्याजवळ येऊन राहिल्या होत्या. त्यामुळे रात्रीची छाया आता तिला सतावत नव्हती.

जयश्री देशकुलकर्णी
९४२३५६९१९९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वास्तव. अगदी योग्य मांडला आहे. नवरा बायको एकमेकांशिवाय नाहीच जगू शकत.. अगदी अगतिक होतात. पुढचा भाग टाकणारे? मोकळा श्वास 1 असा शीर्षक आहे म्हणून विचारलं. कथा पूर्ण वाटतेय

पुढचा भाग टाकला आहे. त्यात घराचे लिहिले आहे. मुल परदेशात गेल्यावर येणाऱ्या परिस्थितीशी कसं तोंड द्याव लागत त्याच वास्तव मला दाखवायचं आहे.