एका चष्म्याची गोष्ट

Submitted by मकरंद गोडबोले on 14 April, 2019 - 02:26

"प्रथमं दर्शनेयस्य इंप्रेशनं चलास्टस्य" असं कुणितरी म्हणून गेलंय. मला या कुणितरी ला एकदातरी भेटायचंय. सगळ्या म्हणून गेलेल्या गोष्टी हा एकच माणूस कसा म्हणून जाउ शकतो? जगात म्हणायला दुसरे कुणीच नाही की काय? पण तो वेगळा मुद्दा आहे. शैलेश बरोबर करायच्या पुढच्या पि एच डीचा विषय आहे तो. सद्ध्या गोष्ट आहे चष्म्याची. (विषयोळखम् संपूर्णम्)
भारतात फार पुरातन काळापासून चष्मे उपलब्ध होते. अगदी बोलणारे चष्मे पण होते. 'संजय उवाच' असे एका चष्म्याचे बोलके उदाहरण महाभारतात मिळते. आमचे पौराणिक दया(सद्ध्या बेकार आहे त्यामुळे अशी कामे करतोय. कुणी नोकरी देता का नोकरी? दयाला), यांनी तेंव्हाच मिळवलेल्या बातमी नुसार, आत्ताच हाती आले आहे की, दुर्योधन, ज्याला साधा तलाव दिसत नाही, तो त्याला फरशी समजून त्याच्यावर चालतो, असा मंददृष्टी युद्ध मात्र नीट करतो. आमच्या चाणाक्ष लेखकाने, हे चष्म्याशिवाय शक्य नाही, हे लगेचच ओळखले. दुर्योधन हा चष्मा घालत होताच हे नक्की झाले आहे. वर तो भयंकर जाड सोडावाॅटर टाईप असणार….
पण सोडावाॅटर चष्मा म्हणजे काय याची सुजाण प्रेक्षकांना जाण करायला हवी. तर आमच्या काळी, गाडीवर मसाला सोडा नावाचा प्रकार मिळायचा. तो फारच सुंदर लागायचा. वर त्यात सोड्यामधील कार्बनडायाॅक्साईड हा उडून जाउ नये, म्हणून चक्क गोटी असायची. तिच्यावर वरून एक स्पेशल बूच लावून, जोरदार बुक्की हाणली, की फट्, असा मोठा आवाज करून आत पडायची. मग त्यातून सोडा बाहेर यायचा. अशा या बाटल्यांना सोडावाॅटर असे नाव होते. (सर्व तेव्हाची माहिती, दयामुळे आत्ताच हाती आली आहे. त्याच्यावर दया करा, नोकरी द्या त्याला) म्हणजे चविसाठी चव, आणि मजेसाठी फट्कार अशा दोन्ही गोष्टी असलेला. हा सोडावाॅटर, याच्या तळाला एक जाड भिंग असायचे. मग आम्ही सोडा पिउन झाला, की त्या बाटलिला डोळे लावून त्या भिंगातून जगाकडे बघायचो. (हा ही एक प्रकारचा चष्माच की) तर सांगायचा मुद्दा म्हणजे, या बाटलितळातील जाड भिंगासारखा ज्याचा चष्मा, त्याला बोलवायला, "ए सोडावाॅटर…." हे बरे पडायचे. इतर साद्ध्या चष्म्यांना बदलत्या काळाप्रमाणे, 'चष्मिस्' 'ठापण्या' 'डोळस' अशी वेगवेगळी नावे होतीच. (इति जनरल्नाॅलेजाख्यानम् कंप्लिटम्)
तर दुर्योधनाकडे सोडावाॅटर चष्मा होता. म्हणजे तळे दिसत नाही हा एक भाग. पण पांडवांकडे बघायचा त्याच्याकडे एक दुसरा, सेम सोडावाॅटर टाईप चष्मा होता. त्यांचा हक्क त्याला मरेपर्यंत दिसला नाही. हे अशा जाड सोडावाॅटर टाईप चष्म्याशिवाय शक्य नाही, हे सूज्ञ वाचकाच्या लक्षात येईलच.
पण चष्मे फक्त कौरवांकडे नव्हते, तर पांडवांकडेही होते. तीरकमठाध्ययन करताना, अर्जुनाकडे एक इतरांचा पोपट करणारा खास चष्मा होता. ज्यानी त्याला फक्त पोपट दिसायचा, मग तो झाडावरचा असो, कि इतरांचा झालेला असो. हे चक्षुमोदनाचे पुराणकालातील उत्तम पुरावे होत. (इतिहासोध्यायः फिनिषम्)
चित्रपटसृष्टिचे चष्म्यावर विलक्षण प्रेम आहे. पण चष्म्याकडे बघायचाही एक वेगळा चष्मा चित्रपटसृष्टीकडे आहे. हिरो कधी चष्मा घालत नाही. (अपवाद इम्तिहान. विनोदखन्नाचा, चुपके चुपके, अमिताभ बच्चन….. आणि बाकिचे बरेच). शिक्षक, लेखक, अभ्यासू मुलगा, मुलगी, (नर्ड्स), जीवनाचा आनंद न घेणारे व्यक्तिमत्व (हुष्ष), वार्ताहर अशा काही खास भूमिकांसाठी चष्मा हा राखीव आहे. यांना सिनेमात चष्मा, हा असतोच. कधी कधी तर एकाच नटाच्या दोन भूमिका दाखवायला चष्मा वापरतात. वर नुसता चष्मा असला की सिनेमातल्या कुणालाच, हा तोच आहे हे ओळखता येत नाही. पण सिनेमातला चष्मा हा इतकाच मर्यादीत नाही. तर व्हिलन हा सुरुवातीपासून सर्वांना नीट व्हिलन आहे, असे कळावे यासाठी स्पेशल प्रयत्न करायचा एक चष्मा आहे. हिरो, हिराॅईन यांसाठीसुद्धा असेच स्पेशल चष्मे आहेत. मनमोहन देसाई यांना चष्मा कधी नीट कळला नाही. नाहीतर हरवलेल्या आई बापांना त्यांची मुले मिळवून देताना त्यांनी चष्म्याचा सुंदर वापर केला असता. म्हणजे कल्पना करा, की अमर अकबर ॲंथनी, मधे निरुपा राॅय रस्त्यावरून चष्मा घालून भिक मागते आहे. समोरून विनोदखन्ना गाॅगल घालून येतो. दोघे धडकतात. चुकून एकमेकांचे चष्मे घालतात. दोन पावले चालल्यावर दोघांना कळते, की चष्मे बदलले, तरी दोघांना दिसते आहे, म्हणजे दोघांचा नंबर सारखा आहे, अगदी स्फेरिकल सकट. मग एकदम ते मागे वळतात, आणि एकमेकांकडे बघून एकाचवेळी म्हणतात, "माॅं" "बेटा". किती रोमांचकारी झाला असता हा क्षण. किंवा मेरे मेहबूब मधे राजेंद्रकुमार, साधनाला धडकतो, तेव्हा तिचा चष्मा बुरख्यातून ओरडत बाहेर पडतो. राजेंद्रकुमारचा नुसताच पडतो, त्यांचा चष्मा बदलतो, आणि त्यांना कळते की तरी दिसते आहे. आणि मग लगेचेच, चित्रपटसृष्टिचा पटवायचा लाडका डायलाॅग, "हमारे खयालात कितने मिलते है" ऐवजी "हमारे नंबर कितने मिलते है" असे म्हणून ते प्रेमात पडतात. (चष्मा हरवला तर दुसऱ्याचा वापरता येईल, हा व्यावहारिक रुक्ष विचार इथे नाहीये, याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी) हे झाले असते. असे कितीतरी नवीन प्रकार पहायला मिळाले असते. आता मेरे मेहबूब हा मनमोहन देसाईनी काढला नाही हे वेगळे, पण चष्म्याची ऐडिया आली असती तर काढला असताना. (इती चित्रपटसृष्टीफोकसं केप्ट्म)
आजकाल दोन मोठे चश्मे बाजारात उपलब्ध आहेत. नुसते उपलब्ध नाहीत, तर चक्क व्हायरल आहेत. मोदीवंद्य आणि मोदीनिंद्य. एकमेकांच्या नव्वद अंशात यांना पोलराईज्ड करून ठेवले आहे. पहिला चष्मा घातलेल्यांना दुसरे विषय दिसत नाही, दुसरा घातलेल्यांना पहिले विषय दिसत नाहीत. या चष्म्याच्या अनेक स्टाईल्स आलेल्या आहेत त्यात राफेल नावाची एक स्टाईल आहे. हा चष्मा घातलेल्यांना कुठल्याही गोष्टीत राफेल दिसते. म्हणजे स्वैपाकाचा गॅस दोन दिवस उशीरा आला की, "त्या राफेल विमानाला इतके इंधन लागते, की आमचे गॅससुद्धा येत नाहीत" असे म्हणतात. सद्ध्या पुरावा नावाचा चष्मा फेमस आहे. काही झाले की त्याचा पुरावा मागायचा. मुलगा पेपर देउन घरी आल्यावर वडलांना सांगतो, की पेपर चांगला गेला. की ते म्हणतात, "पुरावा काय" ते मार्कशीट आल्यावर कळेलच असे म्हणले की, घरातला एखादा कोरा कागद दाखवून म्हणतात, "बघा पेपर कोराच दिलाय, कुठले मार्क मिळणार" अहो पण हा तो पेपर नाही असे म्हटले, "बघा पेपर दिलाच नाही तर कुठले मार्क मिळणार" म्हणतात. सर्जिकल स्ट्राईक नावाचा अजून एक चष्मा आहे. म्हणजे पर्वा शेजारचे रघूकाका, पलिकडच्या तात्यांना धडकले. घाईत असल्यामुळे ते साॅरी न म्हणताच निघून गेले. याचा राग येउन, मध्यरात्री तीन वाजून तेवीस मिनिटांनी, तात्यांनी, या वयात, कुंपणोल्लंघन करून, रघूकाकांच्या घरात पंधरा फूट आत जाउन, त्यांच्या दुचाकिची हवा सोडली, आणि साधारण तीस मिनिटात घरात परत आले. दुसऱ्या दिवशी या सर्जिकल स्ट्राईकचा कोण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. देशद्रोहाचाही एक चष्मा मार्केटमधे फिरतोय म्हणे आजकाल. (राजकारणकार्योद्दिष्टम् साध्यम्)

Group content visibility: 
Use group defaults

इथं माबोवर प्रत्येकाचा ज्याचा त्यालाच चालणारा स्वतंत्र गुणवैशिष्ट्य पुर्ण चष्मा आहे. प्रत्येकाचा स्फिरीकल नंबर वेगळा व काचाही वेगवेगळ्या रंगांच्या आहेत. नाही म्हणायला जवळपास नंबर असणाऱ्यांचे आपापसात छान जमतं. कधी कधी एक्स्ट्रा चष्मा उधारीवर देतात आपल्या आप्तांना. स्क्रीनवर सारख्या डोळ्यांनी तुंबड्या लावून लावून सोडावाटर टैप ढापणं लागलीत सगळ्यांना.

Lol