माझी शाळा। माझं बालपण।

Submitted by अमृताक्षर on 13 April, 2019 - 12:54

लहान असताना उन्हाळयाच्या सुट्टीत आजीकडे जायची मजा काही औरच असते आज घरात बसून विडिओ गेम्स खेळणाऱ्या पोरांना पाहिलं की मनोमन वाटत आपण 95 च्या आधीची पिढी खरच खूप भाग्यवान आहोत बालपण काय असत हे आपणच शेवटचं खरंखुरं जगलय..

शाळेत जाताना सकाळी आई केसांना तेल लावून करकचून 2 वेण्या घालून द्यायची एक सॉक्स सापडत नाही म्हणून मला रोजच शाळेला उशीर व्हायचा मग आई जुना थोडा पांढरा पडलेला सॉक्स कुठून तरी शोधून आणायची आणि शाळेत पूर्ण दिवस तो एक सॉक्स वर ओढण्यात जायचा..

माझी शाळा घरापासून जवळच होती त्यामुळे 5 वी नंतर मी सायकल ने शाळेत जायची उशीर झाला की शाळेचं गेट बंद व्हायचं मग मी त्या गेटवरून चढून आत जायची पण कधीतरी सरांच्या नजरेस पडली की मग ग्राउंड च्या 5 फेऱ्या मारायला लागत आणि तो घाम गाळलेला कमी की काय म्हणून सर अजून आमच्याकडून ग्राउंडवरचा कचरा उचलून घेत पण त्यात एक चांगली गोष्ट ही व्हायची की वर्गात जाईपर्यंत अर्ध अधिक अथर्वशीष संपलेलं असायचं मला भलताच आनंद व्हायचा..

वर्गात बसलो असताना नवीन नवीन गोष्टी आम्हाला सुचायच्या कधी टेबल वाजव कधी विमान बनव तर कधी वही वर लिहून लिहून गप्पा कर..

एकदा तर माझा पेन सारखा बेंच वरून घरंगळतो म्हणून मी बेंच ला पेन बसेल इतकं छिद्र करून माझ छान पेन स्टँड बनवलं होत माझा आदर्श घेऊन माझ्या बऱ्याच मैत्रिणीच्या बेंचला मग पेन स्टँड झालं होतं..

दुपारी 1 चा टोल पडला की पोटात कावळे बोम्बलायचे मग मॅडम काय शिकवते काही कळायचं नाही कधी एकदा 2 वाजतात आणि तास संपतो याकडेच आमचं लक्ष..

जेवणाच्या सुटीत कधीतरी मी आणि माझी मैत्रीण पूजा शाळेच्या मागच्या दाराने तिच्या घरी जायचो तिच्याकडे चिंचेचं मोठं झाड होतं तिथून तोडून आणलेल्या चिंचा वर्गात तास चालू असताना चोरून चोरून खायचो ती चोरून खायची मजा आज कुठल्याही महागड्या हॉटेल ला जेवायला गेलो तरी यायची नाही

संध्याकाळी 4 वाजता आमची खेळाची तासिका असायची मग हाफ पॅन्ट आणि टीशर्ट वर सगळी पोर ग्राउंड वर जमायची पहिले थोडा व्यायाम करून मग आपला आवडीचा खेळ खेळायची मी स्केटिंग करायची पावलांना वेग देऊन भरधाव मोटारीसारखं धावताना खूप खूप कौतुक वाटायचं, खूप वेळा मी पडायची सुद्धा पण त्यात देखील शिकण्याचा एक नवा आनंद असायचा.. खेळाने दिवसभराचा क्षीण निघून जायचा..

5.30 चा टोल पडला की सगळ्यांची एकच झुंबड व्हायची, घरी जायची घाई सगळ्यानाच खूप असते या घाई घाईत वंदे मातरमचा वेग आणि पोरांचा सूर खूपच वाढायचा मग एकदा दप्तर उचललं की सायकल कड धाव..मी तर लांबूनच माझी सायकल दिसतेय का पाहत बसायची पण एका ओळीने बाहेर पडायला लागायचं म्हणून मग समोर काही जाता यायचं नाही एकदा बाहेर पडलो की रस्त्यावर मात्र पोरांची खूपच गर्दी असायची सगळ्याच शाळा जवळपास एकाच वेळेला सुटत असल्यामुळे सगळीकडे पोर आणि त्यांना घयायला आलेले रिक्षावाले यांचाच गोंधळ असायचा..

शाळेच्या बाहेर तेव्हा बोरं विकणारी आजीबाई बसायची मला आईने किती नको म्हंटल तरी ते बोरं खायचा मोह मला काही आवरायचा नाही मग मी 2 रु देऊन ते बोरं घ्यायची आणि एका हाताने बोर खात एका हाताने चेहऱ्यावर आलेले विस्कटलेले केस नीट करायची. खाऊन झालं की आम्ही एका मार्गाने जाणारे सगळे मित्रमंडळी घरच्या वाटेला निघायचो कोण आधी घरी पोचणार म्हणून शर्यत लावायचो खेळून खेळून घामाघूम झालेल्या अंगाला सध्याकाळचा गार वारा अगदी प्रसन्न करून जायचा.

घरी पोचलो की कपडे बदलून कधी एकदा वाळूत खेळायला जातो असं आम्हाला व्हायचं मग आमची घरासमोरच्या ग्राऊंड वर मीटिंग व्हायची मी सगळ्यात मोठी असल्याने आज कुठला खेळ खेळायचा हे बरेच वेळा मीच ठरवायची मग रात्री 7.30 पर्यंत आमचे खेळ चालायचे कधी साखळी दंडा तर कधी पकडा पकडी..

आई ओरडून ओरडून घरी बोलवायची मातीत लोळून आलेल्या आम्हाला पाहून सरळ बाथरूमचा रस्ता दाखवायची मग तसंच ते मातीचे पाय घेऊन पूर्ण घरात आम्ही माती करायचो आई रागावू नये म्हणून मग छान अंघोळ करून गुणी बाळासारख तिच्या पुढ्यात उभं राहायचो ती आम्हाला पावडर गंध लावून तूळशीपुढे बसवायची तिथल्या दिव्याला हात जोडून प्रार्थना म्हणून घ्यायची दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोती हार आणि नंतर मग शुभम करोती कल्याणम.

रात्री झोपताना कधी श्रावण बाळाच्या तर कधी सुदामाच्या गोष्टी सांगायची पहिल्यांदा तर श्रावण बाळ दशरथाच्या बाणाने कसा मरतो हे ऐकून मी खूप रडली होती तेव्हापासून आईने श्रावण बाळ सांगायचं बंदच केलं.

उच्चार शुद्ध व्हावेत म्हणून ती कधी कधी आम्हा तिघा भावंडाकडून रामरक्षा म्हणून घ्यायची खूप कंटाळा आला तरी तेव्हा ईलाज नसायचा.

रविवारी आमची जबाबदारी बाबांवर असायची बाबा शिक्षक असल्यामुळे मूळातच तेव्हा कडक होते प्रत्येक रविवारी बाबा आमची नखं कापून द्यायचे माझ्या केसांना तेल लावून केस विंचरून द्यायचे बाबा कधी एकदाचे खेळायला जायला सोडतील असं आम्हाला व्हायचं मग एकदा संधी मिळाली की आम्ही जे पसार व्हायचो ते मग रात्रीपर्यंत काही कुणाला सापडायचो नाही. रात्री वाळूत चिऊ काऊ चे खोपे करत बसायचो नंतर कितीतरी वेळ भुताच्या गोष्टी करत बसायचो.

आई ओरडून घरी बोलवायची तेव्हा नाईलाजाने आम्ही जेवायला जायचो..
मग झोपताना उगाच ते भूत आपल्याला खाऊन टाकेल म्हणून आईच्या कुशीत शिरायचो.

उद्या परत शाळेला जायचं म्हंटल की खूप कंटाळा यायचा मग नेमकं प्रत्येक सोमवारी माझं पोट दुखायच नाहीतर मग ताप तरी यायचा पण आमची आई तसं काही ऐकायची नाही, संध्याकाळी जाऊ डॉक्टरकडे म्हणून द्यायची शाळेत पाठवुन...

आता घरी गेली की आवर्जून मी शाळेपासून एकदा चक्कर मारते सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यांपुढून चित्रासारख्या तरळून जातात..

ती बोरं विकणारी आजीबाई कुठेच दिसत नाही तीची जागा आता आईस्क्रीम वाल्याने घेतलीये शाळा तीच असली तरी खूप बदलीये आणि शाळेची पोरसुद्धा..

आता कुणी मुली तेल लावून दोन वेण्या घातलेल्या दिसत नाही, सायकल च्या त्या शर्यती दिसत नाही,स्केटिंग करताना लेकरू पडतंय म्हणून ग्राउंडवर पोरांपेक्षा आई बाबांनीच खूप गर्दी केलेली असते त्यांच्या शेकडो सूचना पोरांना भीतीने कधी पुढं जाऊच देत नाही, कधी मनमोकळं मातीत खेळुच देत नाही,पडेल लागेल म्हणून पालक लेकरांना स्वतःच्या नजरेआड करतच नाही.
त्यांना कदाचित या मातीची ममता माहिती नाही आमच्या तर कित्येक जखमा आई बाबांना माहिती पडायच्या आधीच ह्या मातीने भरून काढल्यात..या आधुनिकतेच्या गर्दीत निष्पाप इवल्या पोरांच्या पाठीवरच दप्तराच ओझं तेवढं वाढलय मन मात्र रिकामीच राहिली, शाळेचा फ्रॉक अजून आखूड झाला पण पोरांची टेन्शन लांबतच गेली, विकासाच्या नव्या दिशा गवसल्या पण आम्ही जगलेल ते निखळ बालपण मात्र कायमचं हरवलं..

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय!

श्रद्धे, तुही लिही की..
काय बालपणीच्या आठवणी आहेत ते...

ओके!!!